||श्रीराम
||
ऐक
ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |
पाहावें
आपणासि आपण| या नांव ज्ञान ||१||
मुख्य
देवास जाणावें| सत्य स्वरूप वोळखावें |
नित्यानित्य
विचारावें| या नांव ज्ञान ||२||
जेथें
दृश्य प्रकृति सरे| पंचभूतिक वोसरे |
समूळ
द्वैत निवारे| या नांव ज्ञान ||३||
मनबुद्धि
अगोचर| न चले तर्काचा विचार |
उल्लेख
परेहुनि पर| या नांव ज्ञान ||४||
जेथें
नाहीं दृश्यभान| जेथें जाणीव हें अज्ञान |
विमळ
शुद्ध स्वरूपज्ञान| यासि बोलिजे ||५||
सर्वसाक्षी
अवस्ता तुर्या| ज्ञान ऐसें म्हणती तया |
परी तें
जाणिजे वायां| पदार्थज्ञान ||६||
दृश्य
पदार्थ जाणिजे| त्यास पदार्थज्ञान बोलिजे |
शुद्ध
स्वरूप जाणिजे| या नांव स्वरूपज्ञान ||७||
जेथें
सर्वचि नाहीं ठाईंचें| तेथें सर्वसाक्षत्व कैंचें |
म्हणौनि
शुद्ध ज्ञान तुर्येचें| मानूंचि नये ||८||
ज्ञान
म्हणिजे अद्वैत| तुर्या प्रत्यक्ष द्वैत |
म्हणौनि
शुद्ध ज्ञान सतंत| वेगळेंचि असे ||९||
ऐक
शुद्ध ज्ञानाचें लक्षण| शुद्ध स्वरूपचि आपण |
या नांव
शुद्ध स्वरूपज्ञान| जाणिजे श्रोतीं ||१०||
माहावाक्यौपदेश
भला| परी त्याचा जप नाहीं बोलिला |
तेथीचा
तो विचारचि केला| पाहिजे साधकें ||११||
माहावाक्य
उपदेशसार| परी घेतला पाहिजे विचार |
त्याच्या
जपें, अंधकार- | न फिटे भ्रांतीचा ||१२||
माहावाक्याचा
अर्थ घेतां| आपण वस्तुचि तत्वतां |
त्याचा
जप करितां वृथा| सीणचि होये ||१३||
माहावाक्याशें
विवरण| हें मुख्य ज्ञानाचें लक्षण |
शुद्ध
लक्ष्यांचें आपण| वस्तुच आहे ||१४||
आपला
आपणासि लाभ| हें ज्ञान परम दुल्लभ |
जें
आदिअंतीं स्वयंभ| स्वरूपचि स्वयें ||१५||
जेथून
हें सर्व ही प्रगटे| आणि सकळही जेथें आटे |
तें
ज्ञान जालियां फिटे| भ्रांति बंधनाची ||१६||
मतें
आणी मतांतरें| जेथें होती निर्विकारें |
अतिसूक्ष्म
विचारें| पाहातां ऐक्य ||१७||
जे या
चराचराचें मूळ| शुद्ध स्वरूप निर्मळ |
या नांव
ज्ञान केवळ| वेदांतमतें ||१८||
शोधितां
आपलें मूळ स्थान| सहजचि उडे अज्ञान |
या नांव
म्हणिजे ब्रह्मज्ञान| मोक्षदायेक ||१९||
आपणासि
वोळखों जातां| आंगीं बाणे सर्वज्ञता |
तेणें
येकदेसी वार्ता| निशेष उडे ||२०||
मी कोण
ऐसा हेत | धरून पाहातां
देहातीत |
आवलोकितां
नेमस्त| स्वरूपचि होये ||२१||
असो
पूर्वीं थोर थोर| जेणें ज्ञानें पैलपार- |
पावले, ते
साचार| ऐक आतां ||२२||
व्यास
वसिष्ठ माहामुनी| शुक नारद समाधानी |
जनकादिक
माहाज्ञानी| येणेंचि ज्ञानें ||२३||
वामदेवादिक
योगेश्वर| वाल्मीक अत्रि ऋषेश्वर |
शोनिकादि
अध्यात्मसार| वेदांतमतें ||२४||
सनकादिक
मुख्यकरूनी| आदिनाथ मीन गोरक्षमुनी |
आणीक
बोलतां वचनी| अगाध असती ||२५||
सिद्ध
मुनी माहानुभाव| सकळांचा जो अंतर्भाव |
जेणें
सुखें माहादेव| डुल्लत सदा ||२६||
जें
वेदशास्त्रांचें सार| सिद्धांत धादांत विचार |
ज्याची
प्राप्ती भाग्यानुसार| भाविकांस होये ||२७||
साधु
संत आणी सज्जन| भूत भविष्य वर्तमान |
सर्वत्रांचें
गुह्य ज्ञान| तें संगिजेल आतां ||२८||
तीर्थें
व्रतें तपें दानें| जें न जोडे धूम्रपानें |
पंचाग्नी
गोरांजनें| जें प्राप्त नव्हे ||२९||
सकळ
साधनाचें फळ| ज्ञानाची सिगचि केवळ |
जेणें
संशयाचें मूळ| निशेष तुटे ||३०||
छपन्न
भाषा तितुके ग्रंथ| आदिकरून वेदांत |
या
इतुकियांचा गहनार्थ| येकचि आहे ||३१||
जें
नेणवे पुराणीं| जेथें सिणल्या वेदवाणी |
तेंचि
आतां येचि क्षणीं| बोधीन गुरुकृपें ||३२||
पाहिलें
नस्तां संस्कृतीं| रीग नाहीं महाराष्ट्र ग्रंथीं |
हृदईं
वसल्या कृपामुर्ती| सद्गुरु स्वामी ||३३||
आतां
नलगे संस्कृत| अथवा ग्रंथ प्राकृत |
माझा
स्वामी कृपेसहित| हृदईं वसे ||३४||
न
करितां वेदाभ्यास| अथवा श्रवणसायास |
प्रेत्नेंविण
सौरस| सद्गुरुकृपा ||३५||
ग्रंथ
मात्र महाराष्ट्र | त्याहून संस्कृत श्रेष्ठ |
त्या
संस्कृतामधें पष्ट| थोर तो वेदांत ||३६||
त्या
वेदांतापरतें कांहीं| सर्वथा श्रेष्ठ नाहीं |
जेथें
वेदगर्भ सर्वही| प्रगटजाला ||३७||
असो ऐसा
जो वेदांत| त्या वेदांताचाहि मथितार्थ |
अतिगहन
जो परमार्थ| तो तूं ऐक आतां ||३८||
अरे
गहनाचेंही गहन| तें तूं जाण सद्गुरुवचन |
सद्गुरुवचनें
समाधान| नेमस्त आहे ||३९||
सद्गुरुवचन
तोचि वेदांत| सद्गुरुवचन तोचि सिद्धांत |
सद्गुरुवचन
तोचि धादांत| सप्रचीत आतां ||४०||
जें
अत्यंत गहन| माझ्या स्वामीचें वचन |
जेणें
माझे समाधान| अत्यंत जालें ||४१||
तें हें
माझें जीवीचें गुज| मी सांगैन म्हणतों तुज |
जरी
अवधान देसी मज ||तरी आतां येच क्षणीं ||४२||
शिष्य
म्लान्वदनें बोले| धरिले सदृढ पाउले |
मग
बोलों आरंभिलें| गुरुदेवें ||४३||
अहं
ब्रह्मास्मि माहांवाक्य| येथीचा अर्थ अतर्क्ये |
तोही
सांगतों, ऐक्य- | गुरुशिष्य
जेथें ||४४||
ऐक
शिष्या येथीचें वर्म| स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म |
ये
विषईं संदेह भ्रम| धरूंचि नको ||४५||
नवविधा
प्रकारें भजन| त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन |
तें
समग्र प्रकारें कथन| कीजेल आतां ||४६||
निर्माण
पंचभूतें यीयें| कल्पांतीं नासतीं येथान्वयें |
प्रकृति
पुरुष जीयें| तेही ब्रह्म होती ||४७||
दृश्य
पदार्थ आटतां| आपणहि नुरे तत्वतां |
ऐक्यरूपें
ऐक्यता| मुळींच आहे ||४८||
सृष्टीची
नाहीं वार्ता| तेथें मुळींच ऐक्यता |
पिंड
ब्रह्मांड पाहों जातां| दिसेल कोठें ||४९||
ज्ञानवन्ही
प्रगटे| तेणें दृश्य केर आटे |
तदाकारें
मूळ तुटे| भिन्नत्वाचें ||५०||
मिथ्यत्वें
वृत्ति फिरे| तों दृश्य असतांच वोसरे |
सहजचि
येणें प्रकारें| जालें आत्मनिवेदन ||५१||
असो
गुरूचे ठाईं अनन्यता| तरी तुज कायेसी रे चिंता |
वेगळेंपणें
अभक्ता| उरोंचि नको ||५२||
आतां
हेंचि दृढीकर्ण- | व्हावया, करीं
सद्गुरुभजन |
सद्गुरुभजनें
समाधान| नेमस्त आहे ||५३||
या नांव
शिष्या आत्मज्ञान| येणें पाविजे समाधान |
भवभयाचें
बंधन| समूळ मिथ्या ||५४||
देह मी
वाटे ज्या नरा| तो जाणावा आत्महत्यारा |
देहाभिनानें
येरझारा| भोगिल्याच भोगी ||५५||
असो
चहूं देहावेगळा| जन्मकर्मासी निराळा |
सकळ
आबाळगोबळा| सबाह्य तूं ||५६||
कोणासीच
नाहीं बंधन| भ्रांतिस्तव भुलले जन |
दृढ
घेतला देहाभिमान| म्हणौनियां ||५७||
शिष्या
येकांतीं बैसावें| स्वरूपीं विश्रांतीस जावें |
तेणें
गुणें दृढावे| परमार्थ हा ||५८||
अखंड
घडे श्रवणमनन| तरीच पाविजे समाधान |
पूर्ण
जालियां ब्रह्मज्ञान| वैराग्य भरे आंगीं ||५९||
शिष्या
मुक्तपणें अनर्गळ| करिसीं इंद्रियें बाष्कळ |
तेणें
तुझी तळमळ| जाणार नाहीं ||६०||
विषईं
वैराग्य उपजलें| तयासीच पूर्ण ज्ञान जालें |
मणी
टाकितांचि लाधलें| राज्य जेवीं ||६१||
मणी
होतां सीगटाचा| लोभ धरूनिया तयाचा |
मूर्खपणें
राज्याचा| अव्हेर केला ||६२||
ऐक शिष्या
सावधान| आतां भविष्य मी सांगेन |
जया
पुरुषास जें ध्यान| तयासि तेंचि प्राप्त ||६३||
म्हणोनि
जे अविद्या| सांडून धरावी सुविद्या |
तेणें
गुणें जगद्वंद्या| पाविजे सीघ्र ||६४||
सन्यपाताचेनि
दुःखें| भयानक दृष्टीस देखे |
औषध
घेतांचि सुखें| आनंद पावे ||६५||
तैसें
अज्ञानसन्यपातें| मिथ्या दृष्टीस दिसतें |
ज्ञानाउषध
घेतां तें| मुळींच नाहीं ||६६||
मिथ्या
स्वप्नें वोसणाला| तो जागृतीस आणिला |
तेणें
पूर्वदशा पावला| निर्भय जे ||६७||
मिथ्याच
परी सत्य वाटलें| तेणें गुणें दुःख जालें |
मिथ्या
आणी निरसलें| हें तों घडेना ||६८||
मिथ्या
आहे जागृतासी| परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी |
जागा
जालियां तयासी| भयेंचि नाहीं||६९||
परी
अविद्याझोंप येते भरें| भरे सर्वांगी काविरें |
पूर्ण
जागृती श्रवणद्वारें- | मननें करावी ||७०||
जागृतीची
वोळखण| ऐक तयाचें लक्षण |
जो
विषईं विरक्त पूर्ण| अंतरापासुनी ||७१||
जेणें
विरक्तीस न यावें| तो साधक ऐसें जाणावें |
तेणें
साधन करावें| थोरीव सांडुनी ||७२||
साधन न
मने जयाला| तो सिद्धपणे बद्ध जाला |
त्याहूनि
मुमुक्ष भला| ज्ञानाधिकारी ||७३||
तंव
शिष्यें केला प्रश्न| कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण |
साधक
सिद्ध वोळखण| कैसी जाणावी ||७४||
याचें
उत्तर श्रोतयांसी| दिधलें पुढिलीये समासीं |
सावध
श्रोतीं कथेसी| अवधान द्यावें ||७५||
इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननिरूपणनाम समास
सहावा ||६||५. ६
ज्ञानाचें लक्षण
काय हें प्रथमच सांगतात :
शिष्या, ज्ञानाचें
लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपण आपल्याला पाहणें
याचें नांव ज्ञान होय. आपलें खरें स्वरुप पाहणें हें खरें ज्ञान. मुख्य देव जो
ईश्वर त्याला जाणावें. आपल्यामधील खरा मी तो आपलें खरें स्वरुप, तें ओळखावें. आणि टिकणारें काय व तात्पुरतें काय हें निश्चित ठरवावें.
याला ज्ञान म्हणतात. खरा मी आत्मस्वरुप आहें, तोच ब्रह्मरुप
म्हणून ईश्वर आहे, आणि तें स्वरुपच कायम टिकणारें आहे.
म्हणून एकाच आत्मज्ञानाची ही तीन अभिन्न अंगें आहेत. ज्या अवस्थेमध्यें प्रकृतीचा
दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांचा डोलारा मावळतो आणि मी तूं
हा द्वैत भेद संपूर्णपणें नाश पावतो, त्या अवस्थेला ज्ञान
म्हणतात. परमात्मस्वरुपामध्यें " अहं " अशी स्फूर्ति होण्याच्या आधींची
जी अवस्था त्या अवस्थेमध्यें दृश्याचा मागमूस नाहीं, त्यामुळें
पंचमहाभूतांचा पत्ता नाहीं. आणि त्यामूळेच भेदाचें नांवच नाहीं. अशी जी दृश्य
जन्मास येण्यापूर्वीची सूक्ष्मातिसूक्ष्म अभेद स्थिती तिला ज्ञान म्हणतात. ज्ञान
म्हणजें प्रत्यक्ष परमात्मस्वरूपच होय. जो अनुभव मन व बुध्दि यांना आकलन होत नाहीं,
जो तर्काने विचाराच्या कक्षेंत आणता येत नाहीं, परावाणीच्याही पलीकडे तो आहे असें सांगतात त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात.
मन, बुध्दि आणि वाणी तिन्ही आत्माच्या प्रकाशानें सजीव
राहतात, त्याच्या सत्तेनें कार्यक्षम होतात. जागृती, स्वप्न व सुषुप्ति हा त्यांचा प्रांत होय. इतकेंच नव्हे तर तुर्येच्या
पलीकडे ज्ञान राहतें. म्हणून परावाणी सुध्दां तेथपर्यंत पोहोंचूं शकत नाहीं. जेथें
दृश्याचें भान संपूर्ण नाहींसे होतें, जेथें मी जाणतो,
मला ज्ञान आहे, ही जाणीव अज्ञान समजलें जातें.
असें अत्यंत मलरहित, शुध्द जें स्वरुपभान त्याला ज्ञान
म्हणतात. स्वरूपभानामध्यें माया मावळतें
म्हणून दृश्याचें भान उरत नाहीं. ज्ञानाने अज्ञान नाहींसें होतें आणि पूढे तें
ज्ञान देखील स्वरुपांत विलीन होतें. म्हणून " मी जाणतो " हें उरत नाहीं.
कोणत्याही भेदाचा, दृश्याचा, विकल्पाचा
मल नाहीं. म्हणून तें स्वरूप अति निर्मल व शुध्द आहें.
देहबुध्दिच्या तीन अवस्था ओलांडून चवथ्या अवस्थेंत प्रवेश केला
किं आत्मबुध्दि उदय पावतें. पण हिं सुध्दां मावळून केवळ स्वरूप उरणें हें खरें
ज्ञान समजावें. :
तुर्या हीं चौथी अवस्था सर्वसाक्षिणी असतें. म्हणून तिला
आत्मज्ञान म्हणतात. परंतू त्या अवस्थेंमध्यें साक्षित्वानें पदार्थज्ञान असतें.
यांसाठीं तें सर्वज्ञान होऊं शकत नाहीं. पदार्थज्ञान म्हणजें दृश्यपदार्थ जाणणें
होय. दृश्यरहित शुध्द स्वरूप जाणणें यांचे नांव आत्मज्ञान होय.
ज्या
आत्मस्वरुपाचें ठिकाणीं स्वरुपाखेरीज कांहींच उरत नाहीं तेथें सर्वसाक्षीपणा असूं
शकत नाहीं. म्हणून तुर्येमध्यें होणारें ज्ञान शुध्द आत्मज्ञान स्वतंत्र आहे,
निराळेंच आहे. ’ मी देहच आहे ’ ही दृढ भावना म्हणजे देहबुध्दि. ’ मी आत्माच आहे ’
ही दृढ भावना म्हणजे आत्मबुध्दि. जागेपण, स्वप्न व गाढ झोप या तीन अवस्था
देहबुध्दीच्या तर तुर्या अवस्था आत्मबुध्दीची. देहबुध्दीच्या ज्ञानामध्यें ज्ञाता
ज्ञेयाहून वेगळा राहतो. “ मी “ म्हणजे ज्ञाता व ’ तू ’ म्हणजे ज्ञेय. म्हणून तेथें
द्वैत आढळतें. तुर्येच्या ज्ञानामध्यें ज्ञाता “ मी “ आत्माच होतो. त्या
अवस्थेमध्यें ’ मी देहच आहे ’ हें भान लोपतें खरें परंतु ’ मी आत्मा आहे, मी दृश्य
पदार्थाहून निराळा आहे, मी त्यांना वेगळेपणानें पाहतो, ’ असें भान असतें. याला
सर्वसाक्षिणी अवस्था म्हणतात. यामध्यें ’ मी ज्ञाता आत्माच आहे ’ असा प्रत्यक्ष
अनुभव येतो म्हणून अज्ञान उरत नाहीं. परंतु दृश्याला साक्षी राहून वेगळेपणानें
पाहणें शिल्लक असतें. याचा अर्थ असा कीं दृश्य ज्ञेयपणानें ज्ञात्याहून वेगळें
राहतें. हेच द्वैत होय. आत्मज्ञानांत संपूर्ण अद्वैत असल्यानें द्वैत असणारी
तुर्या शुध्द आत्मज्ञान नव्हें.
उपनिषदांमधील महावाक्यांमध्यें आत्मज्ञानाचें सारें रहस्य
सांठविलें आहें. पण त्याचा नुसता जप करुन चालत नाहीं. त्यावर मनन करुन त्याचा
प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. :-
शुध्द ज्ञानाचें लक्षण ऐक. ’ जें शुध्द परमात्मस्वरुप आहे
तेंच आपण आहोंत ’ असा जो साक्षात अनुभव येतो त्याचें नाव शुध्द स्वरुपज्ञान होय,
हें श्रोत्यांनीं समजावें. महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे. परंतु त्यांचा जप
करण्यास सांगितलेला नाहीं. साधकानें महावाक्यांच्या अर्थाचा विचारच करणें अवश्य
आहे. महावाक्यामध्यें परमार्थाच्या उपदेशाचें सार आहे यांत शंका नाहीं. परंतु
त्यांचें मननच केलें पाहिजे. महावाक्यांचा नुसता जप केल्यानें अज्ञानाचा अंधार
नाहींसा होत नाहीं.
आत्म ब्रह्मस्वरुप किंवा परमात्मस्वरुप आहे आणि आपण
वास्तविक आत्मस्वरुप आहोत. म्हणून आपण ब्रह्मस्वरुप किंवा परमात्मस्वरुप आहोत.
सर्व महावाक्यांचा उपदेश हा असा आहे. मी देह नसून आत्माच आहे, आणि आत्मा
ब्रह्मस्वरुप असल्यानें मी ब्रह्मस्वरुप आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणें म्हणजें
आत्मज्ञान प्राप्त होणें समजावें. या ज्ञानाला शुध्द व निर्मळ स्वरुपज्ञान असें
वेदांतामध्यें म्हणतात. हें ज्ञान अति सूक्ष्म विचारानें आपल्यामध्येंच उदय पावतें
त्याच्यामध्यें सर्व विरोध मावळतात. उपनिषदांमध्यें तीनचार ठिकाणीं याचें फार
सुंदर वर्णन आढळतें. उदा. “ असौ य: पुरुष: स: अहं अस्मि । “ अर्थ : तो जो पुरुष
तोच मी आहे. (ईशावास्य) ’ यद आत्मतत्वेन तु ब्रह्मतत्वं दीपोपमनेह युक्त:
प्रपश्येत । अजं ध्रुवं सर्वतत्वैविशुध्दं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशै: । अर्थ
: ज्याप्रमाणें दिव्याच्या सहाय्यानें मनुष्य वस्तु पहातो त्याचप्रमाणें योगी
आत्मतत्वाच्या सहाय्यानें अज, ध्रुव, परम श्रेष्ठ व कांतिमान ब्रह्मतत्व पाहतो.
(श्वेताश्वतर २.१५) ’ यत्परं ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतनं महत । सूक्ष्मात
सूक्ष्मतरं नित्यं स त्वमेव त्वमेव तत ॥ [१६ । मयि एव सकलं जातं मयि सर्व
प्रतिष्ठितं । मयि सर्व लयं याति तद ब्रह्म अद्वयम अस्मि अहम ॥ [१९] अर्थ :
सर्वोत्तम ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे. विश्वाचें मूळ आहे. अतिशय सूक्ष्म आहे आणि
नित्य आहे. तें तूं आहेस, तें तूं आहेस. [१६] माझ्यांतून सर्व व्यक्तदशेस येतें,
माझ्यामध्यें जततें. आणि माझ्यांतच लय पावतें तें अद्वय ब्रह्म मीच आहे. [कैवल्य
१६.१९]. महावाक्यांचा अर्थ पाहिला तर तो असा आहे कीं आपण
परमात्मस्वरुपच आहोत. पण अर्थ न पाहतां त्यांचा नुसता जप केला तर व्यर्थ श्रम
मात्र होतात.
महावाक्यांचें मनन करुन त्यामधील अर्थाचा स्वत: अनुभव घेणें
हे ज्ञानाचें मुख्य लक्षण आहे. ’ आपण (म्हणजे मी) ब्रह्मच आहोत. ’ हा
महावाक्यांचा खरा, शुध्द व सूक्ष्म अर्थ आहे. आपलें हरवलेलें स्वस्वरुप किंवा
आत्मस्वरुप आपल्याला प्राप्त होणें, आपला खरा मी आपण जाणणें हें ज्ञान फारच दुर्लभ
आहे. कारण तें ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूपच असतें. स्वयंभू
म्हणजे स्वत: सिध्द. आत्म्याला जाणणारा आत्म्याशी तादात्म्य पावून आत्मज्ञान
मिळवितो. त्यामुळें त्याच्या ज्ञानाचें प्रमाण त्या ज्ञानामध्येंच अंतर्भूत असतें
म्हणून आत्मज्ञान स्वत:सिध्द असतें.
एका मूळ स्वरुपांतून हें सारें विश्व व्यक्तदशेला येतें व
पुन्हां त्याच स्वरुपांत तें लय पावतें. त्या आत्मस्वरूपाचें ज्ञान झालें कीं
अज्ञान नाहीसें होतें. मग आपण बांधलें गेलो आहोत. असा अज्ञानांतून निर्माण होणारा
भ्रम नाहींसा होतों. आपण विश्वापेक्षा देखील विशाल असतांना स्थळकाळांनीं
वेढल्यामुळें जणूं काय बध्द आहोत. तें
विश्वच मुळीं स्वरुपांत लीन झाल्यानें आत्मज्ञानी पुरुषाला बध्दपणाची भावना उरत
नाहीं. स्वस्वरुपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मतें आणि मतांतरें यामध्यें
विरोध आढळतो. परंतु आत्मज्ञान झाल्यावर हा सारा विरोध मावळतो. अति सूक्ष्म विचार
करुन पाहिल्यास सर्वांमध्यें ऐक्य सांपडतें. आत्मस्वरूप अनंत असल्यानें ज्याला
ज्या अंगाचें दर्शन होतें त्याला अनुसरून तो आपलें मत मांडतो. आत्मज्ञानी
पुरुषांच्या अनुभवामध्यें सर्व अंगे एकत्वानें गोळा होतात. अतिशय सूक्ष्म म्हणजे
खोल व व्यापक विचार मात्र केला पाहिजे.
अज्ञानाचा मल नसलेलें अगदी शुध्द आम्तस्वरूप या दृश्य
चराचराचें मूळ आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येऊन जें ज्ञान होतें त्यास वेदांतामध्यें
शुध्द ज्ञान असें म्हणतात. आपण आपल्या मूळ स्थानाचा म्हणजे स्वरूपाचा शोध केला तर
आपण आत्मस्वरूपांत जातो. तें स्वरूप ज्ञानमय असल्यानें तेथें अज्ञान आपोआप
नाहींसें होतें. म्हणून आत्मज्ञानाला मोक्ष देणारें ब्रह्मज्ञान असें नाव आहे.
आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा शोध करुं जातां आत्मज्ञान होतें. आत्मा सर्वव्यापी
असल्यानें आपण आत्मज्ञानामुळें सर्वज्ञ बनतो. आपल्याला सर्व ज्ञान हस्तगत होतें.
सर्व ठिकाणीं मीच व्यापून आहे असा अनुभव आल्यानें देहापुरताच मी आहे ही आकुंचित
वृत्ति शिल्लकच उरत नाहीं. “ मी कोण आहे? ” हें जाणण्याचा हेतु बाळगून जर आपण शोध
घेऊं लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असणार्या
मीला पाहतां पाहतां आपण अगदीम निश्चितपणें आत्मस्वरूपच होतो.
पूर्वी होऊन गेलेल्या सर्व थोर ज्ञानी पुरुषांना असें
आत्मज्ञान प्राप्त झालेलें होतें. आत्मज्ञानच सर्व वेदशास्त्रांचें रहस्य आहे.
सर्व संतांचें वर्मदेखील तेंच आहे. श्रध्दावंत पुरुषांना त्यांच्या भाग्यानुसार
आत्मज्ञान प्राप्त होत असतें. :
असो. पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानानें संसारांतून पार
पडलें तें आतां नीट ऐकू. महामुनि, वसिष्ठ आणि व्यास, समाधानी शुक आणि नारद,
महाज्ञानी जनकादिक या आत्मज्ञानानेंच थोरपदाला पोहोंचले.
वामदेवादि योगेश्वर, वाल्मिकी, अत्री ऋषीश्वर, शौनकादि हे सर्व वेदांत तत्वज्ञानाचें रहस्य
जें आत्मज्ञान त्यानेंच परमपदाला पोहोंचलें. सनकादि थोर ज्ञानी आणि आदिनाथ,
मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ हे नाथपंथी महायोगी, आणि आणखी असंख्य महात्मे
आत्मज्ञानानेंच कृतकृत्य झालें. मोठमोठे सिध्द, मुनी आणि महान अनुभवी या
सर्वांच्या अंतरगांची जी अवस्था म्हणजेच आत्मज्ञान, ज्या ज्ञानाच्या आनंदानें
महादेव निरंतर डोलत असतो, जें आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जें योग्य
प्रमाणांनीं निश्चित केलेला निर्णय आहे, जें साक्षात अनुभवाला येतें, आणि जें अति
सूक्ष्म विचारांतीं योग्य ठरतें, जें आत्मज्ञान श्रध्दावंताना त्याच्या
भाग्याप्रमाणें प्राप्त होतें. पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले व पुढे
होणारे सर्व साधु संत आणि सज्जन याचें गुह्य असलेलें असें जें आत्मज्ञान तें मी
आता सांगतो.
आत्मज्ञान सर्व ज्ञानाचें शिखर आहे. तें सदगुरुच्या
कृपेनें विनासायास प्राप्त होतें. सदगुरुचें वचन हेंच आत्मज्ञानाच्या बाबतींत
परमश्रेष्ठ प्रमाण समजावें. तें वचन काय आहे तें आतां सांगतात. :
तीर्थ, व्रत, तप, दान, धूम्रपान, पंचाग्नि साधन,
गोरांजन या साधनांनीं आत्मज्ञान प्राप्त होत नाहीं. आत्मज्ञान हेंच सगळ्या
परमार्थसाधनाचें खरें फळ आहे. तेंच ज्ञानाची परमावधि आहे. आत्मज्ञानानेंच
संशयवृत्तीचें मूळ संपूर्णपणें नाश पावतें. जगांत कितीतरी भाषा आहेत आणि प्रत्येक
भाषेमध्यें कितीतरी ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्यक्ष वेदांतावर कितीतरी ग्रंथ आहेत. या
सर्वाचा खोल अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान हाच होय. पुराणांचा अभ्यास करुन
आत्मज्ञान प्राप्त होत नाहीं. तें ज्ञान सांगतां सांगता वेद थकलें. असें विलक्षण
असणारें आत्मज्ञान आतां या क्षणीं गुरुकृपेनें समजावून देईन.
स्वत:वर गुरुकृपा झाल्यानें आत्मज्ञान आपल्या घरीं जणूं काय
पाणी भरतें अशी श्रीसमर्थांची अवस्था होती. तिचें वर्णन ऐकावें :
श्रीसमर्थ सांगतात कीं संस्कृत ग्रंथात काय आहे तें आपण
पाहिलेलें नाहीं, मराठी ग्रंथात आपला प्रवेश नाहीं. पण आपल्या हृदयांत
सदगुरुस्वामीची कृपामूर्ति मात्र स्थिरपणें राहिलेली आहे. आतां संस्कृत अथवा
प्राकृत ग्रंथांची गरज तरी काय आहे ? माझा स्वामी कृपेचा वर्षाचा करीत माझ्या
हृदयांत बसलेला आहे. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचें सायास न करतां मला
अगदी प्रयत्नावांचून गोड सदगुरुकृपा लाभलेली आहे. मराठी भाषेंत ग्रंथ आहेत
पण त्याहून संस्कृत भाषेंतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत. संस्कृत ग्रंथांमध्यें देखील
वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत.
वेदांतापेक्षां दुसरें कांहींच श्रेष्ठ नाहीं. कारण
वेदांचें सारें रहस्य वेदांतामध्ये प्रगट झालेलें आहे. असो, अशा जो तात्पर्यार्थ आहे आणि जो अत्यंत खोल परमार्थ
आहे, तो तूं आतां ऐक. अतिशय खोल आणि अर्थगंभीर असें जर कांहीं असेल तर तें
सदगुरुचें वचन आहे. त्या वचनानें निश्चितपणें समाधान मिळतें. सदगुरुचें वचन तोच
खरा वेदांत व तोच खरा सिध्दांत होय. तें वचन हेंच प्रत्यक्ष अनुभविलेलें ज्ञान
होय. माझ्या सदगुरुस्वामीचें जें वचन आहे तें अतिशय खोल अर्थानें भरलेलें आहे.
त्या वचनानें माझें संपूर्ण समाधान झालें. तें वचन खरोखर माझ्या जीवांचें रहस्य
आहे, गुपित आहे. तें मी तुला सांगेन म्हणतो. माझ्या सांगण्याकडे तूं लक्ष दिलेस तर
तें याच क्षणीं तुला सांगतो. शरणागत होऊन शिष्यानें श्रीसमर्थांचें पाय घट्ट धरले
आणि तो दीनमुखानें म्हणाला कीं “ मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. ” तेव्हां गुरुदेवांनीं
सांगण्यास प्रारंभ केला.
“ तूं स्वत: परमात्मरुपच आहेस ” असें सांगून मग
आत्मज्ञानाचें सर्व अंगानीं वर्णन केलें. सदगुरुशी अनन्य होऊन तें ज्ञान प्राप्त
होतें व पूर्ण समाधान मिळतें. दृश्य विलीन होऊन आत्मनिवेदन मात्र होणें अवश्य आहे.
:
“ अहं ब्रह्मास्मि ” हें महावाक्य आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ आहे. या
अर्थाचें रहस्य तर्कानें समजणार नाहीं. ते मर्म ऐक. तूं स्वत: ब्रह्मस्वरुप
आहेस. याबद्दल यत्किचिंत संशय धरुं नकोस, त्याविषयीं भ्रम बाळगूं नकोस.
भक्तीचे नऊ प्रकार मागें सांगितले. त्यांपैकीं आत्मनिवेदन हा मुख्य प्रकार आहे. तो
आतां संपूर्णपणें वर्णन करतो. विश्व निर्माण होतें त्या वेळीं ही पंच महाभूतें
क्रमानें निर्माण होतात. पण विश्व अशाश्वत आहे. कल्पांताच्या वेळीं तें नाश पावतें
तेव्हां ही पंचमहाभूतें ज्या क्रमाने निर्माण होतात त्याच क्रमानें लय पावतात.
इतकेंच नव्हे तर अखेर उरणारी दोघे प्रकृति आणि पुरुष ती देखील परब्रह्मांत विलीन होतात.
अशा रीतीनें सर्व दृश्य वस्तु नाश पावल्या म्हणजे वास्तविक
मीपणानें वावरणारा मी देखील उरत नाहीं. कारण मुळांतच परमात्मा एकरुप असल्यानें एकस्वरुप
होण्यास निराळें कांहीं करावें लागत नाहीं. सर्व सृष्टि मूळ स्वरुपांत विलिन झाल्यावर मग फक्त एक
स्वरूप ब्रह्म तेवढें उरतें. त्यामध्यें पिंड व ब्रह्मांड यांना पहायचें म्हटलें
तरी तें आढळणार नाहींत. ज्ञानाचा अग्नि एकदा पेटला म्हणजे दृश्याचाकेरकचरा संपूर्ण
जळून भस्म होतो. ज्ञाता ज्ञानाशी तदाकार झाल्यानें, ज्ञाता स्वतः
ज्ञानरूपच झाल्यानें वेगळेपणाचें मूळच जळून जातें. लौकिक ज्ञानामध्यें
ज्ञाता ज्ञेयाला जाणत असतां त्याच्याहून वेगळा राहतो. त्यामुळें त्या
ज्ञानामध्यें वेगळेंपणाचें मूळ कायम राहतें. अलौकिक ज्ञानामध्यें ज्ञाता ज्ञेयाशी तदाकार होऊन
त्याला जाणतो. त्यामुळें तेथें वेगळेंपण उरतच नाहीं. शिवाय दोघे
गेल्यावर केवळ ज्ञान तेवढें शिल्लक राहतें. हें ज्ञान आत्मस्वरूपच असल्यानें त्यामध्यें दृश्याला
दृश्यपणानें राहणें नसतें. दृश्य भासणें हा अज्ञानाचा परिणाम असल्यानें अज्ञान
नाहींसे झालें कीं दृश्य आपोआप अंतर्धान पावतें. आपल्या इंद्रियांना
दिसणारें दृश्य विश्व हें मिथ्या आहे असें पटलें, म्हणजे तें जसें
दिसतें तसें तें नाहीं अशी खात्री पटली कीं दृश्याकडे धांव घेणारी वृत्ति आपोआप
मागे फिरते. अशा रीतीनें वृत्ति उलटून हृदयामधील आत्मस्वरूपाकडे धांव
घेऊं लागली कीं मग दृश्य असून सुध्दां नसल्यासारखें होतें. तें असून अनुभवास
येत नाहीं. अशा रीतीनें वृत्ति अंतर्मुख होऊन स्वस्वरुपापर्यंत
पोहोंचली कीं सहजच आत्मनिवेदन घडतें.
शिष्यानें सदगुरुशी अनन्य व्हावे, आपण देहाहून वेगळे आहोत
अशी जाणिव ठेवावी, एकांतांत बसून स्वस्वरुपांत लीन होण्याचा अभ्यास करावा. :-
असो. जो शिष्य आपल्या गुरूशी अनन्य असतो त्याला
आत्मनिवेदनाची काळजी करण्याचें कारण नसतें. अभक्त जसा भगवंताहून वेगळा राहतो तसा
शिष्य सदगुरूहून वेगळा राहतां कामा नये. शिष्याचें आणि सदगुरूचें मनोमीलन झालें
झालें पाहिजे. शिष्याचें जीवन सदगुरूनें भरून गेल्यावर आत्मनिवेदनासाठीं आणखी
निराळें कांहीं करावें लागत नाहीं. असें आत्मनिवेदन एकदम साधत नाहीं. तें दृढ होऊन
अनुभवास येण्यासाठीं सदगुरूचें चरित्र, गुण, महिमा, रूप, इत्यादींचें वारंवार
चिंतन करावयास हवें. त्यांच्या वचनांची आठवण करुन त्यांचा अर्थ पुनः पुनः मनांत
घोळवायला हवा. अशा प्रकारचें सदगुरूभजन केलें तर निश्चितपणें समाधान मिळतें.
शिष्या, यालाच आत्मज्ञान असें म्हणतात. आत्मज्ञानानें
समाधान मिळतें. संसारामधील भीति आणि चिंता याचें बंधन सर्वस्वी नाहींसें होतें. मी
देहच आहे असें ज्या माणसाला वाटतें तो आत्मघातकी असतो. मी देहच आहे या अभिमानाचा
परिणाम म्हणून त्याला जन्ममरणाच्या येरझारा सतत, वारंवार भोगाव्या लागतात.
वास्तविक खरा मी आत्मस्वरूप आहे. म्हणून मी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या
चार देहाहून वेगळा आहे. “ मी ” ला जन्ममरण नाहीं, कर्माचा स्पर्श होत नाहीं. या
सगळ्या दृश्यरूप खिचडीला, अठरा धान्याच्या कडबोळाला मी आंतबाहेर व्यापून आहे. तो
मी म्हणजे आत्मा तूंच आहेस. खर्या ज्ञानदृष्टीनें पाहिलें तर कोणाही जीवाला बंधन
नाहीं. मी बांधलेला आहे असें अज्ञानामुळें वाटतें. तो भ्रम आहे व त्यानें लोक
भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरुन ठेवल्यानें मी बांधलेला आहे हा
भ्रम निर्माण होतो व जीवाला भुलवून टाकतो. या भ्रमांतून सुटण्यासाठीं एक उपाय
करावा. आपण एकांतामध्ये बसावें, स्वस्वरूपांत लीन व्हावें, तेथें, तेथें विसावा
घ्यावा. हा अभ्यास करीत गेल्यानें परमार्थ स्थिर होतो, आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो.
परमार्थाचें अखंड श्रवण आणि मनन करीत राहिलें तरच समाधान मिळतें. अज्ञान
संपूर्णपणें नाहींसें होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोंचलें कीं अंगांत वैराग्य
भरून जातें. दृश्याबद्दलची यत्किंचित वासना अंतःकरणांत उरत नाहीं.
आत्मज्ञान होण्यास इंद्रियांना आवर घालून वासना निर्मूल
केली पाहिजे. :
कोणत्याही प्रकारचें बंधन न घालतां इंद्रियांना मनसोक्त भोग
भोगूं दिलें तर मनाची तळमळ शांत होणार नाहीं. इंद्रियें जे भोग मागतात ते त्यांना दिले
तर त्यांची वखवख अधिक वाढते, म्हणून मोकाटपणें भोगून मनाची तळमळ शांत होत नाहीं.
इंद्रियांचें भोग समाधान देत नाहींत हें उमजून ज्याचें मन त्यांच्याबद्दल विरक्त
बनतें त्यालाच पूर्ण आत्मज्ञान होतें. उदा. एका माणसानें मणी टाकला तेव्हां
गेलेलें राज्य त्याला परत मिळालें.
त्यांचे
असें झालें कीं एक राजा होता त्याच्याकडे एकानें एक शिगाचा मणी आणला. तो फारच प्रकाशमान
आणि मोहक होता. त्यानें तो राजाला दाखविला आणि सांगितलें कीं, ' पौर्णिमेच्या
दिवशीं हा मणी स्वर्ग, मृत्यु, पाताळ या तिन्ही लोकांतील आपल्याला हवी ती वस्तू देऊं
शकतो ' राजाला मणी फारच आवडला व त्यानें त्याची किंमत विचारली. मणी आणणारा माणूस म्हणाला
' तुझे सबंध राज्य मला देशील तर हा मणी मी तुला देईन. ' राजानें विचार न करतां मूर्खपणानें
राज्य त्याला दिले आणि तो मणी घेतला. पुढें पौर्णिमेस राजानें त्या मण्याची प्रार्थना केली. पण
तिचा कांहीच उपयोग झाला नाहीं. तेव्हां राजानें तो मणी परत केला आणि आपलें राज्य हस्तगत
केलें. तात्पर्य, इंद्रियांचे भोग दिसायला सुंदर दिसतात पण त्याच्या पायीं आपण आपलें
स्व-राज्य, स्वानंद साम्राज्य किंवा आत्मज्ञान गमावून बसतो. त्यांचा नाद सोडला कीं
गमावलेले स्व-स्वरूप परत मिळतें.
अविद्येमुळें आपल्याला
भ्रम होतों. जें मिथ्या आहे तें सत्य वाटतें. अविद्या नाहींशी होण्यास ज्ञान हाच
उपाय आहे. :
मी तुम्हाला एक निश्चित भविष्य सांगतो. तें लक्ष देऊन ऐकावें. माणसाला ज्या
गोष्टींचा सारखा ध्यास लागतो तीच त्याला मिळतें. म्हणून आपण अविद्या सोडावी आणि
सदविद्या धरावी. भगवंताच्या किंवा आत्मस्वरूपाच्या नादीं लागावें. आत्मज्ञान
झाल्यावर जगाला वंद्य होण्याची योग्यता येण्यास उशीर लागत नाहीं.
संन्निपातज्वर मोठा दोषी असतो त्यामध्यें रोग्याला भ्रम होतो आणि मग
कांहीतरी भयंकर दृश्यें त्याला दिसू लागतात. पण योग्य औषधोपचार होऊन त्याचा ताप
उतरला कीं भ्रम नाहींसा होतो आणि तो खरा आनंद भोगतो. त्याचप्रमाणें अज्ञानरूप
सन्निपातानें जीवाला भ्रम होतो आणि मग कांहीतरी भलतेंच व खोटें दृश्य दिसूं
लागतें. त्यावर आत्मज्ञानाचें औषध घेतलें कीं अज्ञान नाहींसे होतें. मग आपल्याला
जेम दृश्य दिसत होतें तें मुळांतच नव्हतें असा प्रत्यक्ष अनुभव येतो.
अविद्या एक प्रकारची
झोप आहे. झोपेमध्ये कांहींतरी भयानक स्वप्न पडतें व मनुष्य
घाबरतो. तसें अविद्येमुळे मिथ्या असलेले दृश्य दिसतें व मनुष्य घाबरतो. तसें
अविद्येमुळें मिथ्या असलेलें दृश्य दिसतें व मनुष्य घाबरतो. त्यावर एक
उपाय म्हणजे माणसाला जागे करणें. दृश्य मिथ्या आहें हें पटून त्याबद्दल विरक्ति
उत्पन्न होणें याला जागेपण म्हणतात. :-
एका झोपी गेलेल्या माणसाला एक भयंकर स्वप्न पडलें. त्या खोट्या
असणाऱ्या स्वप्नानें घाबरून तो ओरडू लागला. तेव्हां त्याला जागे केलें.
त्यामुळें तो आपोआप झोपेआधीच्या निर्भय स्थितीला आला. त्याला पडलेलें स्वप्न खोटें
होतें पण त्याला तें खरें वाटलें. त्यामुळें त्याला दु:ख झालें. जें खोटें असतें
त्याचें संपूर्ण निरसन कधीच होंत नसतें. त्याचा कांहीतरी परिणाम उरतोच.
जो जागा असतो त्याला स्वप्न खोटें असतें. जो झोपलेला असतो त्याला तें
सर्वबाजूनें वेंढून टाकतें. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीति उरतच नाहीं.
ज्यावेळीं अविद्यारूप झोप जीवाला अगदी झापड घालतें त्यावेळीं दृश्याची वाईट
स्वप्नें पडतात. त्यामुळें तो घाबरतो व त्याचें सगळें शरीर भयानें कांपू लागतें.
या अविद्यारूप झोपेतून संपूर्ण जग येण्यास सारखें श्रवण आणि मनन करावें. जागेपण
कसें ओळखावें त्याची खूण सांगतो ती ऐकावी. जो अगदी मनापासून इंद्रियभोगाविषयीं
पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असें ओळखावें.
आतां पुढील चार
समासांची प्रस्तावना करतात. :-
ज्याला संपूर्ण विरक्ति साधली नाहीं त्याला साधक असें म्हणतात.जगामधील
आपलें मोठेपण सोडून त्यानें साधन करीत राहावें. ज्याला साधन करावेसें वाटत नाहीं
तो सिद्धपणाच्या अभिमानानें बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षा मुमुक्ष
केंव्हाही चांगला कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्यानें
तो ज्ञानाचा अधिकारी असतो. हें ऐकून शिष्यानें प्रश्न केला कीं बद्ध व
मुमुक्ष यांचें लक्षण काय? साधक आणि सिद्ध कसे ओळखावे? सद्गुरू म्हणाले कीं, या
प्रश्नाचें उत्तर पुढील समासात दिले आहे. तें वर्णन साधक श्रोत्यांनी लक्ष देऊन
ऐकावें.
श्रीराम समर्थ ...