श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, May 19, 2011

|| दशक पाचवा : मंत्रांचा ||२|| समास दुसरा : गुरुलक्षण ||


||श्रीराम ||

जे करामती दाखविती| तेहि गुरु म्हणिजेती |
परंतु सद्गुरु नव्हेती| मोक्षदाते ||||

सभामोहन भुररीं चेटकें| साबरमंत्र कौटालें अनेकें |
नाना चमत्कार कौतुकें| असंभाव्य सांगती ||||

सांगती औषधीप्रयोग| कां सुवर्णधातूचा मार्ग |
दृष्टिबंधनें लागवेग| अभिळाषाचा ||||

साहित संगीत रागज्ञान| गीत नृत्य तान मान |
नाना वाद्यें सिकविती जन| तेहि येक गुरु ||||

विद्या सिकविती पंचाक्षरी| ताडेतोडे नानापरी |
कां पोट भरे जयावरी| ते विद्या सिकविती ||||

जो यातीचा जो व्यापार| सिकविती भरावया उदर |
तेहि गुरु परी साचार- | सद्गुरु नव्हेती ||||

आपली माता आणी पिता| तेहि गुरुचि तत्वतां |
परी पैलापार पावविता| तो सद्गुरु वेगळा ||||

गाईत्रीमंत्राचा इचारू| सांगे तो साचार कुळगुरु |
परी ज्ञानेंविण पैलपारु| पाविजेत नाहीं ||||

जो ब्रह्मज्ञान उपदेसी| अज्ञानांधारें निरसी |
जीवात्मयां परमात्मयांसी| ऐक्यता करी ||||

विघडले देव आणी भक्त| जीवशिवपणें द्वैत |
तया देवभक्तां येकांत- | करी, तो सद्गुरु ||१०||

भवव्याघ्रें घालूनि उडी| गोवत्सास तडातोडी |
केली, देखोनि सीघ्र सोडी| तो सद्गुरु जाणावा ||११||

प्राणी मायाजाळीं पडिलें| संसारदुःखें दुःखवलें |
ऐसें जेणें मुक्त केलें| तो सद्गुरु जाणावा ||१२||

वासनानदीमाहांपुरीं| प्राणी बुडतां ग्लांती करी |
तेथें उडी घालूनि तारी| तो सद्गुरु जाणावा ||१३||

गर्भवास अति सांकडी| इछाबंधनाची बेडी |
ज्ञान देऊन सीघ्र सोडी| तो सद्गुरु स्वामी ||१४||

फोडूनि शब्दाचें अंतर| वस्तु दाखवी निजसार |
तोचि गुरु माहेर| अनाथांचें ||१५||

जीव येकदेसी बापुडें| तयास ब्रह्मचि करी रोकडें |
फेडी संसारसांकडे| वचनमात्रें ||१६||

जें वेदांचे अभ्यांतरीं| तें काढून अपत्यापरी |
शिष्यश्रवणीं कवळ भरी| उद्गारवचनें ||१७||

वेद शास्त्र माहानुभाव| पाहातां येकचि अनुभव |
तोचि येक गुरुराव| ऐक्यरूपें ||१८||

संदेह निःशेष जाळी ||स्वधर्म आदरें प्रतिपाळी |
वेदविरहित टवाळी| करूंच नेणे ||१९||

जें जें मन अंगिकारी| तें तें स्वयें मुक्त करी |
तो गुरु नव्हे, भिकारी- | झडे आला ||२०||

शिष्यास न लविती साधन| न करविती इंद्रियेंदमन |
ऐसे गुरु आडक्याचे तीन| मिळाले तरी त्यजावे ||२१||

जो कोणी ज्ञान बोधी| समूळ अविद्या छेदी |
इंद्रियेंदमन प्रतिपादी| तो सद्गुरु जाणावा ||२२||

येक द्रव्याचे विकिले| येक शिष्याचे आखिले |
अतिदुराशेनें केले| दीनरूप ||२३||

जें जें रुचे शिष्यामनीं| तैसीच करी मनधरणी |
ऐसी कामना पापिणी| पडली गळां| २४||

जो गुरु भीडसारु| तो अद्धमाहून अद्धम थोरु |
चोरटा मंद पामरु| द्रव्यभोंदु ||२५||

जैसा वैद्य दुराचारी| केली सर्वस्वें बोहरी |
आणी सेखीं भीड करी| घातघेणा ||२६||

तैसा गुरु नसावा| जेणें अंतर पडे देवा |
भीड करूनियां गोवा- | घाली बंधनाचा ||२७||

जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान| आणी स्थूळ क्रियेचें साधन |
तोचि सद्गुरु निधान| दाखवी डोळां ||२८||

देखणें दाखविती आदरें| मंत्र फुकिंती कर्णद्वारें |
इतुकेंच ज्ञान, तें पामरें- | अंतरलीं भगवंता ||२९||

बाणे तिहींची खूण| तोचि गुरु सुलक्षण |
तेथेंचि रिघावें शरण| अत्यादरें मुमुक्षें ||३०||

अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता| परी विषईं लोलंगता |
ऐसिया गुरूचेनि सार्थकता| होणार नाहीं ||३१||

जैसा निरूपणसमयो| तैसेंचि मनहि करी वायो |
कृतबुद्धीचा जयो| जालाच नाहीं ||३२||

निरूपणीं सामर्थ्य सिद्धी| श्रवण होतां दुराशा बाधी |
नाना चमत्कारें बुद्धी| दंडळूं लागे ||३३||

पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त| तयांसि सादृश्य भगवंत |
आणी सामर्थ्यहि अद्भुत| सिद्धीचेनि योगें ||३४||

ऐसें तयांचें सामर्थ्य| आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ |
ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ| अंतरीं वसे ||३५||

निशेष दुराशा तुटे| तरीच भगवंत भेटे |
दुराशा धरिती ते वोखटे| शब्दज्ञाते कामिक ||३६||

बहुत ज्ञातीं नागवलीं| कामनेनें वेडीं केलीं |
कामना इच्छितांच मेलीं| बापुडीं मूर्खें ||३७||

निशेष कामनारहित| ऐसा तो विरुळा संत |
अवघ्यांवेगळें मत| अक्षै ज्याचें ||३८||
अक्षै ठेवा सकळांचा| परी पांगडा फिटेना शरीराचा |
तेणें मार्ग ईश्वराचा| चुकोनि जाती ||३९||

सिद्धि आणी सामर्थ्य जालें| सामर्थ्यें देहास महत्त्व आलें |
तेणें वेंचाड वळकावलें| देहबुद्धीचें ||४०||

सांडूनि अक्षै सुख| सामर्थ्य इछिती ते मूर्ख |
कामनेसारिखें दुःख| आणीक कांहींच नाहीं ||४१||

ईश्वरेंविण जे कामना| तेणेएंचि गुणें नाना यातना |
पावती, होती पतना- | वरपडे प्राणी ||४२||

होतां शरीरासी अंत| सामर्थ्यहि निघोन जात |
सेखीं अंतरला भगवंत| कामनागुणें ||४३||

म्हणोनि निःकामताविचारु| दृढबुद्धीचा निर्धारु |
तोचि सद्गुरु पैलपारु| पाववी भवाचा ||४४||

मुख्य सद्गुरूचें लक्षण| आधीं पाहिजे विमळ ज्ञान |
निश्चयाचें समाधान| स्वरूपस्थिती ||४५||

याहीवरी वैराग्य प्रबळ| वृत्ति उदास केवळ |
विशेष आचारें निर्मळ| स्वधर्मविषईं ||४६||

याहिवरी अध्यात्मश्रवण| हरिकथा निरूपण |
जेथें परमार्थविवरण| निरंतर ||४७||

जेथें सारासारविचार| तेथें होये जगोद्धार |
नवविधा भक्तीचा आधार| बहुता जनासी ||४८||

म्हणोनि नवविधा भजन| जेथें प्रतिष्ठलें साधन |
हें सद्गुरूचें लक्षण| श्रोतीं वोळखावें ||४९||

अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान| बाह्य निष्ठेचें भजन |
तेथें बहु भक्त जन| विश्रांति पावती ||५०||

नाहीं उपासनेचा आधार| तो परमार्थ निराधार |
कर्मेंविण अनाचार| भ्रष्ट होती ||५१||

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन| स्वधर्मकर्म आणि साधन |
कथा निरूपण श्रवण मनन| नीति न्याये मर्यादा ||५२||

यामधें येक उणें असे| तेणें तें विलक्षण दिसे |
म्हणौन सर्वहि विलसे| सद्गुरुपासीं ||५३||

तो बहुतांचें पाळणकर्ता| त्यास बहुतांची असे चिंता |
नाना साधनें समर्था| सद्गुरुपासीं ||५४||

साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे| तो मागुतां सवेंच भ्रष्टे |
याकारणे दुरीद्रष्टे| माहानुभाव ||५५||

आचार उपासना सोडिती| ते भ्रष्ट अभक्त दिसती |
जळो तयांची महंती| कोण पुसे ||५६||

कर्म उपासनेचा अभाव| तेथें भकाधेसि जाला ठाव |
तो कानकोंडा समुदाव| प्रपंची हांसती ||५७||

नीच यातीचा गुरु| तोही कानकोंड विचारु |
ब्रह्मसभेस जैसा चोरू| तैसा दडे ||५८||

ब्रह्मसभे देखतां| त्याचें तीर्थ नये घेतां |
अथवा प्रसाद सेवितां| प्राश्चित पडे ||५९||

तीर्थप्रसादाची सांडी केली| तेथें नीचता दिसोन आली |
गुरुभक्ति ते सटवली| येकायेकी ||६०||

गुरुची मर्यादा राखतां| ब्राह्मण क्षोभती तत्वतां |
तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां| गुरुक्षोभ घडे ||६१||

ऐसीं सांकडीं दोहींकडे| तेथें प्रस्तावा घडे |
नीच यातीस गुरुत्व न घडे| याकारणें ||६२||

तथापि आवडी घेतली जीवें| तरी आपणचि भ्रष्टावें |
बहुत जनांसी भ्रष्टवावें| हें तों दूषणचि कीं ||६३||

आतां असो हा विचारू| स्वयातीचा पाहिजे गुरु |
नाहीं तरी भ्रष्टाकारु| नेमस्त घडे ||६४||

जे जे कांहीं उत्तम गुण ||तें तें सद्गुरूचें लक्षण |
तथापि संगों वोळखण| होये जेणें ||६५||

येक गुरु येक मंत्रगुरु| येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु |
येक वस्तादगुरु येक राजगुरु| म्हणती जनीं ||६६||

येक कुळगुरु येक मानिला गुरु| येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु |
येक असद्गुरु येक यातिगुरु| दंडकर्ते ||६७||

येक मातागुरु येक पितागुरु| येक राजागुरु येक देवगुरु |
येक बोलिजे जगद्गुरु| सकळकळा ||६८||

ऐसे हे सत्रा गुरु| याहिवेगळे आणीक गुरु |
ऐक तयांचा विचारु| सांगिजेल ||६९||

येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु| येक म्हणती प्रतिमागुरु |
येक म्हणती स्वयें गुरु| आपला आपण ||७०||

जे जे यातीचा जो व्यापारु| ते ते त्याचे तितुके गुरु |
याचा पाहातां विचारु| उदंड आहे ||७१||

असो ऐसे उदंड गुरु| नाना मतांचा विचारु |
परी जो मोक्षदाता सद्गुरु| तो वेगळाचि असे ||७२||

नाना सद्विद्येचे गुण| याहिवरी कृपाळूपण |
हें सद्गुरूचें लक्षण| जाणिजे श्रोतीं ||७३||


इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुलक्षणनाम समास दुसरा ||||५. २



समासाच्या आरंभी गुरु आणि सदगुरु असा फरक करुन गुरु सदगुरु होऊं शकत नाहींत हें सांगतात. :
कांहीं माणसे मोठ्या विलक्षण क्रिया करुन दाखवितात. त्यांनाही गुरु म्हणतात. परंतु मोक्ष देणारे सदगुरु ते नव्हेत. माणसांच्या समूहाची नजरबंदी करणें, चेटुक करुन भुरळ पाडणें, सांबरमंत्र व कोटाळे हे नाथपंथीयांचे मंत्रप्रयोग करुन चमत्कार करणें, अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य करुन दाखविणें, अनेक वनस्पतींचा व रसायनांचा औषधीप्रयोग सांगणें, इतर धातूंचें सोनें बनविण्याचा मार्ग सांगणें, नजरबंदी करुन ताबडतोब इच्छा पुरविण्याचा मार्ग सांगणारे असे लोकही गुरु समजले जातात. श्री समर्थांनी येथें भारतीय समाजाच्या मोठ्या दुखण्यावर किंवा रोगावर बरोबर बोट ठेवलें आहे. जो आत्मज्ञानी असतो व तें ज्ञान आपल्याला देतो तो खरा गुरु, शिवाय भारतामध्यें येवढें थोर ज्ञानी महात्मे होऊन गेले तरी सामान्य माणूस अजून जो वरील चमत्कार करतो त्यालाच साधु किंवा ज्ञानी समजतो. भारतीय समाजांतील हा गैरसमज मोठा शापच आहे.

साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, तानापलते, अनेक वाद्यें यांचें शिक्षण देणारे लोक एक प्रकारचें गुरुच समजले जातात. कांहीं मंत्रशास्त्री मंत्रविद्या शिकवितात, ताईत, गंडेदोरे देण्याचे शिकवितात, कांहीं लोक पोट भरण्याची विद्या शिकवितात. ज्या जातीचा जो व्यापार असतो तो त्या जातींतील माणसांना पोट भरण्यासाठीं शिकवितात. तो व्यापार शिकविणारे गुरु खरे पण सदगुरु नव्हेत. आपले आईबाप एका दृष्टीनें आपले गुरुच असतात. पण संसारातून पैलतीराला पोहोंचविणारा सदगुरु निराळाच असतो. आपल्याला गायत्रीमंत्र शिकविणारा भटजी हा एक गुरुच होतो. परंतु आत्मज्ञानावांचून संसाराच्या पैलतीराला जातां येत नाहीं. तें कांहीं तो देत नाहीं म्हणून तो सदगुरु नव्हे.

आतां श्री सदगुरुची लक्षणें सांगतात. शिष्यांचें अज्ञान नाहींसें करुन त्याला ब्रह्मपदीं बसविण्याचें सामर्थ्य ज्याच्यापाशीं असतें तो खरा सदगुरु होय. बाकीचीं सारी लक्षणें या मुलभूत लक्षणांतून प्रगट होतात. :
जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहींसा करतो आणि जीवात्म्याचें परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो तो सदगुरु होय. हें सदगुरुचें प्रधान लक्षण होय. हे एक लक्षण असून इतर कांहीं करामती नसतील तरी तो सदगुरु राहतो. हें एकच लक्षण नसून इतर सार्‍या करामती असतील तरी तो सदगुरु राहात नाहीं.

देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असतो. त्यामुळें एकीकडे जीव आणि दुसरीकडे शिव असे द्वैत निर्माण होतें. तो वियोग आणि तें द्वैत नाहींसें करुन देव आणि भक्त यांची गाठ घालून दोघाचें ऐक्य करुन देतो तो सदगुरु होय. भवरुपीं वाघानें उडी घालून, गायवासराची ताटातूट केलेली पाहून ज्याला दया येते आणि जो त्यांना त्या वाघाच्या जबड्यांतून सोडवितो तो सदगुरु होय. हा दृष्टांत फार अर्थपूर्ण आहे. गाय म्हणजे ईश्वर, वासरू म्हणजे जीव, वाघ म्हणजे अशाश्वत संसार. वास्तविक जीव निरंतर ईश्वरापाशी असावयास पाहिजे. पण मायेचा किंवा अविद्येचा आघात झाल्यानें तो अशाश्वताच्या पसार्‍यांत गुरुफटून जातो. अविद्येच्या तडाख्यांतून सोडविणारा जर कोणी असेल तर तो सदगुरुच होय. जीव मायेच्या जाळ्यांत अडकतात. त्या कारणानें प्रपंचांतील दुःखानें दुखविलें जातात, गांजून जातात. अशा दु:खी जीवांना जो मायेच्या जाळ्यांतून सोडवितो तो सदगुरु होय. देहबुध्दीनें व्यापल्यामूळें जीव ममत्व ठेवून अनेक ठिकाणीं गुंतून जातो. त्यांत जो अनेक दुःखें भोगतो पण त्याचें त्याला त्यांतून बाहेर पडतां येत नाहीं. तेथें सदगुरु मदतीला येतो. वासनारुपी नदीला महापूर आलेला असतां जीव त्याअध्यें गटांगळया खात बुडण्याच्या बेतात येतो. अगदी दीनपणें  तो मदत मागतो. त्यावेळीं तेथें उडी घालून जो तारतो, बाहेर काढून वांचवितो तो सदगुरु होय. या जगामध्यें राजा असो कीं रंक असो, प्रत्येकजण सारखें हवेंपणानें वस्तूच्या मागें धावतो. जणूं काय वासनेच्या प्रवाहामध्यें तो ढकलला जात असतो. वासना कधीच थांबत नाहींच पण माणूस मात्र पांहता पांहता मृत्युच्या छायेंत सांपडतो. म्हणून जबरदस्त अशा वासनेच्या पकडींतून जीवाला सोडवितो तो सदगुरु होय. वासनेच्या बंधनाची बेडी पडल्यामूळें जीवाला गर्भवासाचे मोठें दुःख भोगावें लागतें आत्मज्ञान देउन ती बेडी जो चटकन सोडवितो तो सदगुरु होय. अविद्येमुळें वासना निर्माण होते व वासनेमुळें कर्माचें कठिण बंधन जीवाला अडकवून ठेवतें. कर्म  भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. त्या मूळ अविद्येलाच ज्ञानानें नाहींशी करुन पुढची दुःखपरंपरा टाळण्याचे मोठें काम सदगुरु करतो.

अज्ञान नाहींसें करुन आत्मज्ञान पदरांत टाकण्याचें कार्य सदगुरु कोणत्या रीतीनें किंवा पध्दतीनें करतात त्याचें वर्णन ऐकावें :
उपदेश शब्दानेंच करावा लागतो. पण अर्थ हें शब्दाचें अंतरंग असतें. सदगुरु प्रथम शब्दावरुन अर्थाकडे नेतात, परमात्मा त्या अर्थाचा लक्ष्य असतो. तेंच आपलें सर्वस्व म्हणजे आत्मस्वरूप आहे. सदगुरु नंतर अर्थावरुन आत्मस्वरुपाकडे नेतात. अशा रीतीनें स्वस्वरुपाकडे नेणारे सदगुरु अनाथ जीवाचें विश्रांतिस्थान असतात. जीव बिचारा एकदेशी असतो. एकदेशी म्हणजे एकांगी, अपूर्ण, देश काल परिस्थिति यांनीं वेढलेला. तो परिच्छिन्न असतो, सीमित असतो. ब्रह्म सर्वदेशी, सर्वांगी, पूर्ण, स्थळ काळ परिस्थिती यांच्या पलीकडे व अपरिच्छिन्न असतें. केवळ आपल्या उपदेशानें सदगुरु जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुप बनवितो. त्याचें संसाराचें संकट नाहींसे करतो. सदगुरुच्या शब्दांमागें त्याच्या तपश्चर्येचें मोठें सामर्थ्य असतें. तो केवळ शब्दांनीं शक्तिपात करतो. त्याचे शब्द जीवाच्या सूक्ष्म शरीरांत घुसतात. जीवाची अंतरंग रचना बदलण्याइतका विलक्षण बदल तेथें घडवून आणतात. म्हणून सदगुरुच्या शब्दांना फार मोल असतें.

वेदांच्या अंतरंगात म्हणजे अर्थात उपनिषदांमध्यें जें ब्रह्मज्ञान गुप्तपणें वास करतें तें ज्ञान सदगुरु बाहेर काढतात. लहान मुलाला लहान लहान घांस जसें भरवावें तसें तें ज्ञान सदगुरु आपल्या बोलण्यानें हळुहळु शिष्याच्या कानामध्यें घालतात, त्याला श्रवण करवितात. शिष्याचा अधिकार व धारणाशक्ति पाहून सदगुरु त्याला आत्मज्ञानाची गूढ रहस्यें सोपी करुन सांगतात. वेद असोत, शास्त्रें असोत, किंवा थोर सत्पुरुष असोत, या सर्वांचा आत्मस्वरुपाचा अनुभव एकच असतो. ज्ञान या दृष्टीनें सर्वांचें आत्मज्ञान सारखेंच असतें. साक्षात्कार या दृष्टीनें सर्वांचा आत्मसाक्षात्कार समान असतो. अगदी तोच अनुभव, अगदी तेंच ज्ञान, आणि तोच साक्षात्कार सदगुरुला झालेला असतो. त्याच्या ठिकाणीं वेद, शास्त्र व सत्पुरुष ज्ञानानुभवानें एकरुप झालेले असतात. म्हणून वेदांचें रहस्य, शास्त्रांचें विवेचन, सत्पुरुषांचा अनुभव आणि सदगुरुचा उपदेश सर्व अगदी एकरुप असले पाहिजेत. सदगुरु सर्व प्रकारचे संशय अगदी मुळासकट नष्ट करुन टाकतो. तो मोठ्या आदरानें स्वधर्माचें आचरण करतो. वेदाला विरुध्द असणारें म्हणजेच आत्मज्ञानाला सोडून असणारें मिथ्या भाषण करणें त्याला माहीतच नसते.

आत्मज्ञान फारच सुक्ष्म असल्यानें सदगुरुच्या देहावर अथवा त्याच्या दैनंदिन व्यवहारांत त्याचें अमुक चिन्ह दाखवितां येत नाहीं. याचा फायदा घेऊन खोटें गुरु जगांत बोकाळतात. म्हणून सदगुरु नाहीं कोण हें श्री समर्थ पुनश्च सांगतात. :
मनांत जें जें येतें तें तें कोणाची लाज भीड न न बाळगतां जो उघडपणें करतो तो कांहीं सदगुरु नव्हे. तो भिकारी आपल्या मागें लागण्यासाठीं आला असें समजावें. सदगुरु मुक्त असतो म्हणजे बंधनरहित असतो याचा अर्थ तो आपल्या मनाला गुरासारखें मोकाट सोडतो असा नव्हे. सत्पुरुषाची मुक्तावस्था ही आत्मज्ञानांतून प्रगट होणारी अतिमानवी अवस्था असतें, वासनेच्या आधीन होऊन बेशरमपणें इंद्रियभोग भोगण्यची हीनमानव पशुवृत्ती नसत. जो आपल्या शिष्याला साधनांत कसें राहावें हें शिकवीत नाहीं, इंद्रियें आवरुन ताब्यांत कशी ठेवावी तें दाखवीत नाहीं, असले गुरु दमडीला तीन मिळाले, इतकें स्वस्त मिळालें तरी त्यांच्या नादीं लागूं नये. त्यांना सोडून दूर राहावें.

इंद्रियदमन करुन साधनांत कसें राहावें ही अनुभवाची विद्या सदगुरुपाशी असावयास पाहिजे. जो आत्मज्ञान समजावून देतो, सगळीच्या सगळी अविद्या नाहींशी करतो, इंद्रिये ताब्यांत ठेवण्याचा अभ्यास सांगतो तोच खरा सदगुरु समजावा. अविद्येचा अंमल चालत असल्यामुळें दृश्य जग सर्वस्वी सत्य वाटतें. त्यामुळें इंद्रियांना आवर घालण्याची शक्ति व युक्ति शिष्याला शिकविणें हें सदगुरुचें प्रधान कार्य आहे. काय सांगावें ! कांहीं गुरु सदगुरु म्हणवून घेतात आणि पैशासाठीं लाचार होतात, शिष्याच्या आधीन होतात, वासनेच्या नादीं लागून दीनवाणें बनतात.

असे गुरु शिष्याच्या आधीन होतात कीं शिष्याच्या मनाला जें जें आवडेल तें तें करुन शिष्याला प्रसन्न ठेवण्यासाठीं धडपडतात. याचें कारण पापिणी वासना त्यांच्या मानगुटीस बसलेली असते, येथें सगळा उलटा प्रकार आढळतो. वास्तविक शिष्यानें सदगुरुच्या आधीन राहून त्याची मनधरणी करावयास हवी. शिष्य वासनेच्या नादीं असायला हवा. पण गुरुच जेव्हां वासनेंनें झपाटतो तेव्हां तेथें परमार्थ कसला ! सगळा स्वार्थाचाच बाजार ! शिष्याच्या भिडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरु अधमांत अति अधम असतो. असा गुरु चोरटा, द्रव्याचा लोभी, दुष्ट आणि फसवा आणि नीच असतो. गुरुबाजीला यापेक्षां आणखी कोणत्या शिव्या द्यावयाच्या शिल्लक आहेत ! वैद्यकीचें ज्ञान नसणारा एखादा दुष्ट वैद्य रोग्याला सर्वस्वी नागवितो आणि त्यांत पुनः भीड घालून शेवटीं रोग्याचा सर्वस्वी घात करतो. तसें हें नामधारी गुरु असतात. ज्याच्यामुळें आपण आणि देव यांच्यामधील अंतर वाढतें, आपण देवापासून दुरावतो, व जो भीड
घालून आपल्याला देहबुध्दीच्या बंधनांत अधिकच गुंतवतो, असा गुरु नसावा. ज्याच्याजवळ शुध्द ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारांत साधनाचें आचरण आहे असा सदगुरुच आपल्याला आपलें गुप्त आत्मस्वरुप दाखवितो. अंतर्यामीं खरें खरें ब्रह्मज्ञान आणि नित्याच्या बाह्य किंवा दृश्य व्यवहारांत साधकाला शोभेल असें आचरण, यो दोन गोष्टींनीं संपन्न पुरुषच शिष्याला उपयोगी पडतो. त्यांपैकीं एक उणें असेल तर निदान सामान्य प्रापंचिक शिष्याला तरी परमार्थ प्राप्त होणें कठीण जातें. कांहीं गुरु आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकानें प्रकाश, नाद व सुगंध यांचें अतींद्रिय अनुभव दाखवितात. कांहीं शिष्यांच्या कानांत मात्र मंत्र सांगतात. एवढेंच ज्ञान ज्याच्यापाशी असतें ते बिचारे स्वतःच भगवंतापासून दूर असतात.

शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीति आणि आत्मप्रचीति यांचा मनोहर संगम ज्या पुरुषाच्या ठिकाणीं आढळेल तीच उत्तम लक्षणांनीं सपन्न अशा सदगुरुची खूण आहे. जो मुमुक्षु आहे म्हणजे खरोखर हवा अशा जिज्ञासूनें त्याला अगदी मनापासून व आदरानें शरण जावें, त्याच्या चरणीं लीन व्हावें. तीन प्रचीतींचा भावार्थ असा, उदा. शरद ऋतूमधील पोर्णिमेचा मनोहर चंद्रमा घ्या. वेदांच्या काळापासून अनेक स्त्रीपुरूष त्याचें दर्शन घेत आलें. आपण सुध्दां त्याचें दर्शन घेतो. प्रत्येकाचें मन त्याच्या सौदंर्यानें भारुन जातें. त्याचप्रमाणें वेदांच्या काळापासून मोठमोठे आत्मज्ञानी होऊन गेले, आजही मोठे आत्मज्ञानी आहेत. आणि साधन करुन आपणही आत्मज्ञानी होऊं. सर्व आत्मज्ञानी पुरुषांना सच्चिदानंदाचें होणारें दर्शन सारखेंच असलें पाहिजे. पोर्णिमेचा चंद्रमा दृश्य विश्वाचा भाग असल्यानें त्यात कदाचित फरक पडेल. परंतु शाश्वत सच्चिदानंदस्वरुपामध्यें यत्किंचितही फरक होणार नाहीं. म्हणून श्रुतीमध्यें आणि संतांच्या ग्रंथामध्यें वर्णिलेला स्वरुपानुभव, आपल्या सदगुरुचा स्वानुभव आणि आपला स्वतःचा अनुभव मूलतः एकरुपच असले पाहिजेत. कांहि वेळा असें दिसतें कीं एखादा माणूस अद्वैत वेदांत सांगण्यामध्यें अचंबा वाटण्यासारखें वक्तेपण गाजवितो. पण त्याचें मन इंद्रियसुखाला लाचावलेलें असतें. अशा माणसाला गुरु केल्यानें आपलें सार्थक होणार नाहीं. वेदांत उत्तम रीतीनें सांगणें ही बुध्दीची करामत आहे. वेदांत उत्तम रीतीनें जगणें ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. दोन्ही एके ठिकाणीं असले तर उत्तमच पण परमार्थाला पहिलें नसले तरी चालतें. दुसरें मात्र हवेंच हवें.

उत्तम वक्त्याची कला अशीं कीं जसा प्रसंग तसा रंग त्याच्या निरुपणाला चढतो. प्रसंगाला अनुरुप अशा कल्पना त्याच्या मनांत आपोआप येतात. परंतु देहबुध्दीचे सारे संदेह नाहींसे होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मबुध्दीचा जय झालेला नसतो. स्वस्वरुपाबद्दल त्याला निश्चयात्मक ज्ञान नसतें. आत्मसाक्षात्कार होऊन स्वस्वरुपाबद्दल जें संपूर्ण संशयरहित ज्ञान होतें त्यास श्री समर्थ निश्वय असा शब्द वापरतात. पुष्कळ वेळा असें होतें कीं निरुपणामध्यें वक्ता आत्मज्ञानाचें सामर्थ्य सागतो, त्यानें प्राप्त होणार्‍या सिध्दीचें वर्णन करतो. तें निरुपण ऐकून श्रोत्यांच्या मनांत भलत्याच कल्पना येऊं लागतात. चमत्कारांचे वर्णन ऐकून त्यांची बुध्दि आत्मज्ञानापासून ढळूं लागते. ती हेलकावे खाऊं लागतें. आत्मज्ञानी पुरुषाच्या हातून चमत्कार घडतात हें खरें. परंतु तो त्यांच्या ज्ञानाचा एक गौण परिणाम असतो. निरूपणामध्यें त्यांच्यावर भर दिला तर श्रोते चमत्कारानेंच आकर्षिले जातात. मग जो चमत्कार करतो तो साधु असें चुकीचें समीकरण धरुन बसतात. आत्मज्ञानाबद्दल लागणारी बुध्दीची स्थिरता त्यांच्यापाशी राहात नाहीं.

साधकाच्य मनात असा विचार येतो कीं, पूर्वी मोठे ज्ञाते, विरक्त आणि भक्त होऊन गेले. त्यांची योग्यता भगवंताच्या बरोबरीनें होती. सिध्दि वश झाल्यानें त्यांच्या अंगीं मोठें अदभुत सामर्थ्य होतें. त्यांच्या अंगीं असें विलक्षण सामर्थ्य होतें तें आपल्यापाशी नाहीं. म्हणून आपलें हें नुसतें ज्ञान व्यर्थ आहे. अशा प्रकारचा सामर्थ्यप्राप्तीचा स्वार्थी विचार साधकाच्या मनांत दृढ होऊन राहतो. हा आत्मज्ञानाला मारक असतो. कारण त्यानें देहबुध्दीचें पोषण होतें. ज्ञानाची निष्ठा कमी होऊन दुराशाच बळावते. दृश्यामधून सुख घेण्याची वासना जेव्हां समूळ नाहींशी होते तेव्हांच भगवंताची भेट होते. अशी वासना बाळगणारे शब्दज्ञानी लोक कामनेच्या आधीन असतात, एकदंर चांगले नसतात. त्यांच्या सांगण्यानें लोकांमध्यें परमार्थाबद्दल खोट्या कल्पना प्रसार पावतात. म्हणून श्री समर्थ त्यांना वोखटे असें नरम निंदायुक्त विशेषण लावतात.

कोणत्या तरी वासनेनें वेडी झालेली अनेक शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधतां फुकट गेली. आपली इच्छा तृप्त व्हावी म्हणून धडपडणारे ते मूर्ख बिचारे कांहीं न कमविता मरुन गेले. ज्याला कशाचीही यत्किंचित वासना नाहीं असा संत विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचें मत वेगळेंच असतें. तो नेहमी अक्षय भगवंताबद्दलच बोलतो. संताची ही एक मोठी खूण आहे. त्याला केव्हांही पहा, कोठेंही पहा, कशाही परिस्थितींत पहा, कोणत्याही अवस्थेंत पह, एका भगवंतावांचून, शाश्वत ईश्वरावांचून तो कांहीं बोलणार नाहिं, सांगणार नाहीं, मनांत आणणार नाहीं. मला अमुक हवें असें त्याच्या तोंडून कधी निघणार नाहीं. अर्थांत असा पुरुष क्वचितच भेटतो.

खरोखर पाहिले तर भगवंत हा सर्वांचा कधी नाहींसा न होणारा असा कायमचा. ठेवा आहे. परंतु देहांतून सुख घेण्याची लालसा कांहीं केल्या कमी होत नाहीं. त्यामुळें भगवंताचा मार्ग बरोबर सापडत नाहीं. दृश्यामध्यें माझें सुख मला सांपडेल ही कल्पना जोपर्यंत घट्ट आहे तोपर्यंत अदृश्य भगवंतापाशी सुखाचा शोध माणूस करीत नाहीं. आणि हें उमजण्यास सदगुरुखेरीज अन्य उपाय नाहीं. समजा एखाद्यानें कांहीं साधन केलें व त्याला सिध्दि प्राप्त झाल्या. त्यामुळें त्याचें सामर्थ्य वाढेल यांत शंका नाहीं. परंतु त्या सामर्थ्यानें त्याच्या देहास महत्व येतें. देहाला महत्व आल्या कारणानें त्याच्या देहबुध्दीचें झुबांड वाढतें. मी देहच आहे हा भ्रम भगवंताच्या आड येतो. तो नाहींसा करण्यासाठीं सारीं साधनें असतात. पण साधनानें तो भ्रम जर अधिक घट्ट झाला तर मग परमार्थदृष्ट्या मिळविलें काय ? चांगल्यापैकीं साधकांचा असा अधःपात होतो असें श्री समर्थ सुचवितात. वासना भगवंतापासून दूर करते. ती संपूर्ण नाहींशी करुन जो भगवंतावर दृढ निष्ठा ठेवून राहतो तोच सदगुरु होण्यास लायक असतो. भगवंताचें सुख अक्षय आहे, कायम टिकणारें आहे. त्याला कधीही विनाश नाहीं. तें बाजूस सारुन जें सामर्थ्य संपादन करण्याच्या मागें लागतात ते मूर्ख असतात. वासनेसारखें दुसरें कोणतेंच दुःख नाहीं. मला भगवंत हवा ही एकच वासना तापदायक नाहीं. त्या वासनेखेरीज इतर सर्व वासना अनेक प्रकारची दुःखें निर्माण करतात. त्यांच्या मार्गे लागल्यानें माणसाचा अखेर अधःपात होतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपण सामान्य माणसे वासनेवांचून राहूं शकत नाहीं. हे जर खरें तर श्री समर्थ असें सांगतात कीं वासना ठेवायचीच झाली तर ती भगवंताच्या दर्शनाची ठेवावी. त्या वासनेपासून दुःख निर्माण होणार नाहीं आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

मृत्यूमुळें देहाचा शेवट झालां कीं त्या देहाबरोबर त्यांत राहणारें सामर्थ्य देखील नाहींसें होतें. वासनेच्या नादीं लागल्यानें अखेर भगवंतच मात्र अंतरतो. वासना जीवाला अशाश्वत वस्तूंमध्यें गुंतिविते. अशाश्वत देहाचा शेवट झाला कीं वासनेचा सगळा पसारा विलयास जातो. भगवंताकडे मन कधीच वळविलें नसल्यानें तो दूरच राहतो. अशा प्रकारें जीव दोन्ही बाजूंनी नागवला जातो. यावरुन असें दिसतें कीं जो अत्यंत निष्काम आहे, वासनारहित आहे, आणि ज्याच्या बुध्दिमध्यें आत्मस्वरुपाविषयी अत्यंत दृढ निश्चय आहे, असा स्वानुभवी सदगुरु माणसाला या अशाश्वत दृश्यसागरांतून पलीकडे नेऊन सोडतो.

श्री समर्थ आतां सदगुरुची लक्षणें वर्णन करतात. आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ, स्थिर ब्रह्मज्ञान होणें हें सदगुरुचें खरें प्रधान लक्षण आहे. बाकीची सारीं लक्षणें या लक्षणावर आधारलेलीं आहेत. :
सदगुरुचें मुख्य लक्षण असें कीं सर्वप्रथम त्याला शुध्द ब्रह्मज्ञान असलें पाहिजे. त्या ज्ञानामुळें त्याच्या ठिकाणीं अगदी निश्चल समाधान पाहिजे. आत्मस्वरुपामध्यें तो अखंड स्थिरपणें राहिला पाहिजे. आत्मज्ञानानें त्याचें सर्व संशय नाश पावतात. तो समाधानकारक बनतो. तो स्वस्वरुपासून कधीही ढळत नाहीं. याबरोबरच तो अतिशय वैराग्यसंपन्न असतो. त्याचें मन कशातही गुंतलेलें नसतें. याशिवाय स्वधर्माच्या बाबतीत त्याचा आचार अत्यंत निर्मळ असतो. ज्ञान अंतःकरणात वास करतें. पण त्याचें प्रतिबिंब प्रत्यक्ष आचरणांत दिसलें पाहिजे. सदगुरुच्या जीवनांत ज्ञान आणि व्यवहार यांची सुसंगति असतें.

हें असुन शिवाय सदगुरुपाशी अध्यात्म विषयाचें नेहमी श्रवण असतें. त्याच्यापाशी नित्य हरिकथा आणि निरुपणें चालतात. जेथें निरंतर परमार्थाचें विवरण चालतें, जेथें नित्य सारासार विचार किंवा आत्मानात्मविवेक चालतो, तेथें जगाचा उध्दार होत असतो. पुष्कळ लोकांना नवविधा भक्ति कशी करावीं हें त्याच्यापाशी समजतें. कोणतेंही ज्ञान जिवंत असतें आणि त्याचा व्यवहार झाला म्हणजे त्यापासून पुष्कळ लोकांना फायदा होतो. सदगुरुपाशी आत्मज्ञान असतें. श्रवण, निरुपण आणि विवरण या मार्गांनीं त्याचा व्यवहार होतो. म्हणून जेथें श्रवण, निरुपण आणि विवरण सतत चालातें तेथें अनेकांचे संदेह निवारण होतात व अनेकांचा बुध्दीचा निश्चय होऊन ते भगवंताच्या मार्गाला लागतात. म्हणून ज्या ठिकाणी नऊ प्रकारची भक्ति आचरली जाते आणि जेथें साधनमार्गास अत्यंत महत्व असतें तें सदगुरुचें लक्षण आहे असें श्रोत्यांनीं ओळखावें. अंतर्यामी शुध्द ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत मनापासून केलेली उपासना अशी जोड जेथें असते तेथें अनेक साधकांना व उपासकांना समाधान मिळतें ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाला शोभेल असें बाह्य आचरण असणें फार अवश्य आहे ही गोष्ट श्री समर्थ पुनः पुनः सांगत आहेत.

ज्या परमार्थाला उपासनेचा, प्रत्यक्ष आचरणांत असणार्‍या भक्तिचा आधार नाहीं तो परमार्थ कामाला येत नाहीं. कर्माची जी शिस्त आहे ती सुटली तर अनाचार स्वैराचार वाढून माणसे भ्रष्ट होतात. या कारसाठीं आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्मकर्माचें आचरण, भगवंताचे साधन, हरिकथा, निरुपण, श्रवण, मनन, नीति, न्याय, मर्यादा या गोष्टींपैकी एक जरी कमी असली तरी परमार्थदृष्टीनें  तें विपरित दिसतें. म्हणून जेथें सदगुरु असतो तेथें या सर्व  गोष्टी प्रकर्षानें आढळतात. सदगुरुभोंवतीं गोळा होणारी माणसे सामान्य योग्यतेची असतात. त्यांचें वैराग्य काय, उपासना काय आणि भगवंताचें प्रेम काय सगळेंच सामान्य असतें. अशा लोकांना पचेल व जमेल असाच साधनमार्ग सांगावा लागतो, नव्हे स्वतः आचरुन दाखवावा लागतो. म्हणून सदगुरुपाशी वरील सर्व गोष्टी हव्या.

ज्ञानाला व्यवहाराची जोड फार अवश्य असते हीच गोष्ट पुन्हा सांगतात. :
सदगुरु अनेकांना जवळ ठेवून घेतो व त्यांचें पालनपोषण करतो. त्याला पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते. अशा सामर्थ्यवान सदगुरुपाशी परमार्थाची अनेक साधनें असतात. साधनाशिवाय परमार्थ पोसण्याचा प्रयत्न केला तर कांहीं काल तो चालतो, परंतु लगेच तो विलयास जतो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टी ठेवून साधनाची प्रतिष्ठा वाढवितात. जे परमार्थपुढारी सदाचार सोडतात, उपासना टाकतात ते भ्रष्ट दिसतात, अभक्त दिसतात. अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागो. त्यांना कोण विचारतो ! परमार्थामध्यें ज्यानें गुरुत्व आपल्याकडें घेतलें त्यानें आपल्या आचरणाची किती काळजी घ्यावयास हवी हे यावरून ध्यानांत येईल.

ज्या परमार्थामध्यें कर्म आणि उपासना दोन्हींना जागा नाहीं तेथें भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सांपडतो. अशा लोकांचा परमार्थ मिंधा असतो. प्रापंचिक लोक त्यांना हसतात.

श्री एकनाथ आणि श्री समर्थ यांच्या काळीं समाजामध्यें गुरुबाजी फार बोकाळली होती. स्वधर्मीय व परधर्मीय गुरुंचा नुसता सुळसुळाट झाला होता. त्यामुळें घरांतील एखाद्यानें जरी भलत्याच जातीचा गुरु केला तरी सर्वांनाच मोठी अडचण होई. त्यांतले त्यांत गुरु जर परधर्मीय असेल तर आणखीच गुंतागुंत निर्माण होत असे. हा प्रत्यक्ष अनुभव लक्षांत घेऊन श्री समर्थ सांगत आहेत हें ध्यानांत ठेवावे. :
खालच्या जातीचा गुरु केला तर त्यामुळें अडचणीची परिस्थिति निर्माण होते. संतांच्या सभेंत ब्रह्मस्वरुपाची चर्चा चालूं असतां जर एखादा चोर तेथें आला तर त्याला कसें कानकोंडें होतें तसें त्या शिष्याची समाजांत अवस्था होते.

त्याला लोकांसमोर गुरुचें तीर्थ घेता येत नाहीं. किंवा गुरुचा प्रसाद खाल्ला तर प्रायश्चित्त घ्यावें लागतें बरें, गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाहीं, टाकून दिला तर कमीपणा येतो. त्यामुळें एकदम गुरुभक्ति नाश पावते. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागावतात आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळायला जावें तर गुरुचें मन मोडल्यासारखें होते. त्यामुळें पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो. या कारणानें कनिष्ठ जातीला वरच्या जातीच्या गुरुत्वाचा अधिकार नाहीं. हें सगळें जरी खरे असलें तरी एखाद्या कनिष्ठ जातींतील गुरु आवडला तर त्यानें एकट्यानें भ्रष्ट व्हावें. पण आपल्याबरोबर अनेकांना भ्रष्ट करुं नये, तसें करणें फार वाईट आहे.

आतां हे जातींच्या गुरुचें विवेचन पुरें. सांगायचें इतकेंच कीं आपल्या जातीचा असावा. नाहीं तर निश्चिंतपणें भ्रष्टाचार घडतो. श्री समर्थांच्या वेळीं इकडे महाराष्ट्रात आणि उत्तर हिंदुस्थानांत कुलीन हिंदू घराण्यांतील बरेच पुरुष फकीरांचे शिष्य बनत. मग कांहीं दिवसांनीं सबंध कुटुंब परधर्मात जाई. ही अनावस्था टाळण्यासाठीं श्री समर्थांनीं वरील मर्यादा सांगितली.

वास्तविक जें जें कांहीं उत्तम आहे, भगवंताला पोषक आहे तेथें सदगुरुचें अधिष्ठान असतें. तरी पण समाजामध्यें अनेक प्रकारचे गुरु प्रचलित असतात. ते कांहीं सदगुरु होऊं शकत नाहींत. मोक्ष देणारा तोच फक्त सदगुरु होऊं शकतो. :
सर्व प्रकारचे उत्तम गुण सदगुरुचें लक्षण म्हणून मानायला हरकत नाहीं. हें जरी खरें तरीं सदगुरुची बरोबर ओळखण होण्यास इतर गुरुंबद्दल माहिती सांगणें जरुर आहे. एक नुसता गुरु तर एक मंत्रगुरु असतो. एक यंत्रगुरु तर एक तंत्रगुरु असतो, एक व्यायामाचा गुरु तर एखाद्याला लोक राजगुरु म्हणजे राजाचा उपाध्या म्हणतात. एक कुलगुरु तर एक मानलेला गुरु असतो, एक विद्यागुरु तर एक अविद्यागुरु म्हणजे भलतीच विद्या शिकविणारा गुरु असतो. एक खोटा गुरु तर एक जातीला शिक्षा करणारा गुरु असतो.

एक माता गुरु तर पितागुरु असतो, एक राजाचा गुरु तर एक देवगुरु असतो. ज्याच्या अंगीं पुष्कळ कला असतात त्याला जगदगुरु म्हणतात. अशा प्रकारचे हे सतरा गुरु सांगितले. याहून आणखी जे निराळे गुरु आहेत त्यांचेंही वर्णन ऐका. एक स्वप्नगुरु तर एक दीक्षागुरु असतो, कोणी देवाच्या प्रतिमेलाच गुरु मानतात. कोणी म्हणतात कीं आम्ही स्व्तःच आमचे गुरु आहोत. ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा शिकविणारा गुरुच बनतो. असा विचार केला तर गुरुंच्या संख्येला शेवटच नाहीं. असो. या रीतीनें गुरुंची संख्या फार मोठी आहे. त्यामध्यें प्रत्येक गुरुचें मत निराळें असतें. परंतु या सर्वांहून मोक्ष देणारा सदगुरु मात्र वेगळाच असतो. आत्मज्ञानांतून स्वाभाविकपणें अंगीं येणारे अनेक गुण आणि त्याहीपेक्षां अज्ञानी जीवांबद्दल अत्यंत दया अंगीं असणें हें सदगुरुचें लक्षण श्रोत्यांनीं ध्यानांत ठेवावें.


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥