श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Sunday, October 9, 2011

|| दशक पाचवा : मंत्रांचा || समास चवथा : उपदेशलक्षण ||


|| दशक पाचवा : मंत्रांचा |||| समास चवथा : उपदेशलक्षण ||

||श्रीराम ||

ऐका उपदेशाचीं लक्षणें| बहुविधें कोण कोणें |
सांगतां तें असाधारणें| परी कांहीं येक सांगों ||||

बहुत मंत्र उपदेशिती| कोणी नाम मात्र सांगती |
येक ते जप करविती| वोंकाराचा ||||

शिवमंत्र भवानीमंत्र| विष्णुमंत्र माहाल्क्ष्मीमंत्र |
अवधूतमंत्र गणेशमंत्र| मार्तंडमंत्र सांगती ||||

मछकूर्मवऱ्हावमंत्र| नृसिंहमंत्र वामनमंत्र |
भार्गवमंत्र रघुनाथमंत्र| कृष्णमंत्र सांगती ||||

भैरवमंत्र मल्लारिमंत्र| हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र |
नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र| अघोरमंत्र सांगती ||||

शेषमंत्र गरुडमंत्र| वायोमन्त्र वेताळमंत्र |
झोटिंगमंत्र बहुधा मंत्र| किती म्हणौनि सांगावे ||||

बाळामंत्र बगुळामंत्र| काळिमंत्र कंकाळिमंत्र |
बटुकमंत्र नाना मंत्र| नाना शक्तींचे ||||

पृथकाकारें स्वतंत्र| जितुके देव तितुके मंत्र |
सोपे अवघड विचित्र| खेचर दारुण बीजाचे ||||

पाहों जातां पृथ्वीवरी| देवांची गणना कोण करी |
तितुके मंत्र वैखरी| किती म्हणौनि वदवावी ||||

असंख्यात मंत्रमाळा| येकाहूनि येक आगळा |
विचित्र मायेची कळा| कोण जाणे ||१०||

कित्येक मंत्रीं भूतें जाती| कित्येक मंत्रीं वेथा नासती |
कित्येक मंत्रीं उतरती| सितें विंचू विखार ||११||

ऐसे नाना परीचे मंत्री| उपदेशिती कर्णपात्रीं |
जप ध्यान पूजा यंत्री| विधानयुक्त सांगती ||१२||
येक शिव शिव सांगती| | येक हरि हरि म्हणविती |
येक उपदेशिती| विठल विठल म्हणोनी ||१३||

येक सांगती कृष्ण कृष्ण| येक सांगती विष्ण विष्ण |
येक नारायण नारायण| म्हणौन उपदेशिती ||१४||

येक म्हणती अच्युत अच्युत| येक म्हणती अनंत अनंत |
येक सांगती दत्त दत्त| म्हणत जावें ||१५||

येक सांगती राम राम| येक सांगती ॐ ॐ म |
येक म्हणती मेघशाम| बहुतां नामीं स्मरावा ||१६||

येक सांगती गुरु गुरु| येक म्हणती परमेश्वरु |
येक म्हणती विघ्नहरु| चिंतीत जावा ||१७||

येक सांगती शामराज| येक सांगती गरुडध्वज |
येक सांगती अधोक्षज| म्हणत जावें ||१८||

येक सांगती देव देव| येक म्हणती केशव केशव |
येक म्हणती भार्गव भार्गव| म्हणत जावें ||१९||

येक विश्वनाथ म्हणविती| येक मल्लारि सांगती |
येक ते जप करविती| तुकाई तुकाई म्हणौनी ||२०||

हें म्हणौनी सांगावें| शिवशक्तीचीं अनंत नांवें |
इछेसारिखीं स्वभावें| उपदेशिती ||२१||

येक सांगती मुद्रा च्यारी| खेचरी भूचरी चाचरी अगोचरी |
येक आसनें परोपरी| उपदेशिती ||२२||

येक दाखविती देखणी| येक अनुहातध्वनी |
येक गुरु पिंडज्ञानी| पिंडज्ञान सांगती ||२३||

येक संगती कर्ममार्ग| येक उपासनामार्ग |
येक सांगती अष्टांग योग| नाना चक्रें ||२४||

येक तपें सांगती| येक अजपाअ निरोपिती |
येक तत्वें विस्तारिती , तत्वज्ञानी ||२५||
येक सांगती सगुण| येक निरोपिती निर्गुण |
येक उपदेशिती तीर्थाटण| फिरावें म्हणूनी ||२६||

येक माहावाक्यें सांगती| त्यांचा जप करावा म्हणती |
येक उपदेश करिती| सर्व ब्रह्म म्हणोनी ||२७||

येक शाक्तमार्ग सांगती| येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती |
येक इंद्रियें पूजन करविती| येका भावें ||२८||

येक सांगती वशीकर्ण| स्तंबन मोहन उच्चाटण |
नाना चेटकें आपण| स्वयें निरोपिती ||२९||

ऐसी उपदेशांची स्थिती| पुरे आतां सांगों किती |
ऐसे हे उपदेश असती| असंख्यात| ३०||

ऐसे उपदेश अनेक| परी ज्ञानेविण निरार्थक |
येविषईं असे येक| भगवद्वचन ||३१||

श्लोक ||नानाशास्त्रं पठेल्लोको नाना दैवतपूजनम् |
    आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ||
    शैवशाक्तागमाद्या ये अन्ये च बहवो मताः |
    अपभ्रंशसमास्तेऽपि जीवानां भ्रांतचेतसाम् ||
    न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ||

याकारणें ज्ञानासमान| पवित्र उत्तम न दिसे अन्न |
म्हणौन आधीं आत्मज्ञान| साधिलें पाहिजे ||३२||

सकळ उपदेशीं विशेष| आत्मज्ञानाचा उपदेश |
येविषईं जगदीश| बहुतां ठाईं बोलिला ||३३||

श्लोक ||यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् |
     तस्य दासस्य दासोहं भवे जन्मनि जन्मनि ||

आत्मज्ञानाचा महिमा| नेणे चतुर्मुख ब्रह्मा |
प्राणी बापुडा जीवात्मा| काये जाणे ||३४||

सकळ तीर्थांची संगती| स्नानदानाची फळश्रुती |
त्याहूनि ज्ञानाची स्थिती| विशेष कोटिगुणें ||३५||
श्लोक: ||पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् |
          तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम् ||

म्हणौनि जें आत्मज्ञान| तें गहनाहूनि गहन |
ऐक तयाचें लक्षण| सांगिजेल ||३६||


इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेशनाम समास चवथा ||||५. ४


आतां उपदेशाची लक्षणें ऐका. तीं नाना तर्‍हेची आहे. तीं कोणकोणतीं आहेत हें जर सांगू म्हटलें तर तीं असंख्य आहेत. परंतु कल्पना येण्यासाठीं त्यांपैकीं थोडी सांगतो.

पुष्कळ गुरु मंत्राचा उपदेश करतात. ते मंत्र कोणते त्यांची यादी येथें दिली आहे. :
उपदेश देणारे गुरु पुष्कळ प्रकारच्या मंत्राचा उपदेश देतात. उदा. कोणी फक्त नामस्मरणच सांगतात तर कोणी शिष्यांकडून ओंकाराचा जप करवितात. कोणी शिवमंत्र, भवानीमंत्र, विष्णुमंत्र, महालक्ष्मीमंत्र, अवधूतमंत्र, गणेशमंत्र, किंवा मार्तंडमंत्र सांगतात. कोणी मच्छकूर्मवराहमंत्र, नृसिंहमंत्र, वामनमंत्र, भार्गवमंत्र, रघुनाथमंत्र किंवा कृष्णमंत्र सांगतात. कोणी भैरवमंत्र, मल्हारीमंत्र, हनुमंतमंत्र, याक्षिणीमंत्र, नारायणमंत्र, पांडुरंगमंत्र किंवा अघोरमंत्र सांगतात. कोणी शेषमंत्र, गरुडमंत्र, पिशाच्चमंत्र, वेताळमंत्र, झोटिंगमंत्र असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात, त्याचें किती वर्णन करावें ! कोणी बाळामंत्र, बगुळामंत्र, कालीमंत्र, कंकालीमंत्र, बटुकमंत्र सांगतात. त्याबरोबरच निरनिराळ्या शक्तींची यंत्रेदेखील शिकवितात. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. सगळे वेगवेगळे व स्वतंत्र आहेत. त्यांत कांहीं विचित्र असतात. कांहीं भयंकर बीजांचे मंत्र असतात. त्यांचा संबंध भुताखेतांशी असतो. खरोखर पाहिलें तर पृथ्वीवरील देवांची गणना कोणी करुं शकत नाहीं. आणि जितके देव तितके मंत्र आहेत. म्हणून वाणीनें ते सगळे सांगणे अशक्य आहे. मंत्रमला असंख्यात आहेत. शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्यसंपन्न आहेत. हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेची विचित्र कला माणसाला कळणें शक्य नाहीं.

कांहीं मंत्रांनीं भुतें जातात, कित्येक मंत्रांनीं रोग बरे होतात, कित्येक मंत्रांनीं थंडीताप बरा होतो, तर कित्येक मंत्रांनीं विंचू, साप, यांचें विष उतरतें. असे नाना प्रकारचे मंत्र आहेत. गुरु ते मंत्र शिष्याच्या कानांत सांगतात. त्याबरोबरच जप, ध्यान, पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती पण सांगून ठेवतात.

मंत्राचें सुध्दां एक शास्त्र आहे. मंत्रांचा उपयोग करुन व्यवहारांतील शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठीं उपयोगांत आणला जातो. आणि शेकडा नव्याण्णव मंत्रवादी स्वार्थापायीं मंत्र वापरतात असें आढळतें. कांहीं गुरु भगवंताच्या निरनिराळ्या नामांचा जप सांगतात. त्याला सुध्दा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी अवश्य असतें.:
कोणीं शिव शिव म्हणण्यास सांगतात, कोणी हरि हरि म्हणायला लावतात, तर कोणी विठठल विठठल म्हणावें असा उपदेश देतात.


कोणी कृष्ण कृष्ण, कोणी विष्णु तर कोणी नारायण नारायण म्हणावें असा उपदेश देतात. कोणी अच्युत, कोणी अनंत तर कोणी दत्त दत्त म्हणत जावें असें सांगतात. कोणी राम राम तर कोणी ओम ओम म्हणावें असें सांगतात. कोणी सांगतात कीं भगवंताचें अनेक नामानीं स्मरण करावें. कोणी गुरु गुरु तर कोणी परमेश्वर म्हणण्यास सांगतात. कोणी सांगतात कीं विघ्नहर्त्या गणपतीचें चिंतन करीत जावें. कोणी श्यामराज, कोणी गरुडध्वज तर कोणी अधोक्षज म्हणत जावें असें सांगतात. कोणी विश्वनाथ तर कोणी मल्लारी म्हणायला सांगतात. कोणी तुकाई तुकाई म्हणून जप करवून घेतात. भगवंताची नावें घेण्याचा हा प्रकार किती सांगायचा ! शिवशक्तींचीं नावें अनंत आहेत. ज्याला जें नाव स्वाभाविकपणें आवडतें त्याचा उपदेश तो शिष्याला करतो.

परमार्थसाधना करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्यें अनेक अनुभव येतात. ज्याला जें साधन साधतें किंवा पचनीं पडतें तें तो आपल्या शिष्यानां सांगतो. तसेंच साधना करतांना मन व देहदेखील सूक्ष्म बनतात. त्यामुळें कांहीं अतींद्रिय अनुभव येतात. ज्याला असे नाद व प्रकाश यांचे अनुभव येतात तेच तो आपल्या शिष्यांना सांगतो. परमार्थाच्या वाटेवर हें सगळें कांहीं आहे. परंतु त्या सगळ्याला आत्मज्ञानाची पार्श्वभुमी हवीच हवी. नाहींतर तोच येवढा परमार्थ आहे अशी शिष्याची भुलावणी होतें. म्हणून आत्मज्ञानावांचून इतर सर्व गोष्टी व्यर्थ समजाव्या असें श्री समर्थ निक्षून सांगतात. :-
खेचरी, भूचरी, चाचरी, व अगोचरी या चार मुद्रा कराव्या असें कोणी सांगतो तर निरनिराळी आसनें करावी असें कोणी सांगतो तर निरनिराळीं आसनें करावी असें कोणीं सांगतो. कोणी तांबडा, पांढरा, काळा किंवा निळा अतींद्रिय प्रकाश दाखवितात तर कोणी अनाहत नांवाचा अतींद्रिय नाद ऐकवितात. आघाताशिवाय होणारे व आंत ऐकूं येणारे हे नाद वेणुनाद, पैंजणनाद, घुंगरूनाद, मृदंगनाद, मेघनाद असे अनेक प्रकारचे असतात. एखाद्या गुरुला शरीररचनेंचें संपूर्ण ज्ञान असतें व तों तेंच शिष्यांना सांगतो. कोणी कर्ममार्ग, कोणी उपासनामार्ग, तर कोणी आठ पायर्‍यांचा पातंजल योग सांगतो व शरीरांतील सहा चक्रांचें भेदन उपदेशितो. आठ पायर्‍या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि. सहा चक्रें – मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुध्द आणि सहस्त्रदल. प्राण व अपान यांचें मीलन करुन सुषुम्ना नांवाच्या कण्यांतील सूक्ष्म नाडीच्या मार्गानें प्रत्येक चक्राचें भेदन करुन प्राण मूर्ध्नि आकाशांत न्यावयाचा असतो. कोणी वेगवेगळीं तपें करायला सांगतात तर कोणी अजपाजप सांगतात. योग्यांचे म्हणणें असें कीं आपला श्वासोच्छवास चोवीस तास चालतो. तो आपोआप होणारा जपच आहे. श्वास आंत घेताना सो व श्वास बाहेर सोडतांना हम असा सूक्ष्म नाद होतो. त्या नादावर मन एकाग्र केलें तर चोवीस तास विनासायास जप चालतो. त्यास अजपाजप म्हणतात. इतर जे कोणी तत्वचिंतक असतात ते विश्वाच्या मूलतत्वांची विस्तारानें चिकित्सा करतात. कोणी सगुणाचा उपदेश करतात, कोणी निर्गुणाचें निरुपण करतात तर कोणी तीर्थाटन करावें असा उपदेश करतात. चार वेदांतील चार महावाक्यें आहेत, त्यांचा जप करावा असें कोणी सांगतात तर सगळें जें कांहीं आहे तें ब्रह्मच आहे – सर्वं खलु इदं ब्रह्मअसा कोणी उपदेश करतात.

कोणी शाक्तमार्ग सांगतात. या मार्गामध्यें शक्तीची किंवा देवीची उपासना करावी लागते. त्यांत मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन हें पंचमप्रकार सेवन करतात. कोणी मुक्तमार्ग म्हणजे सर्व बंधनें तोडून स्वैराचारानें वागण्याचा मार्ग स्थापन करतात तर कोणी अगदी मनापासून इंद्रियें पूजन करण्याचा प्रकार करवून घेतात. या मार्गात अखेर स्त्रीपुरुषांच्या गुह्य इंद्रियांची पूजा चालते व अर्थात अनाचार बोकाळतो. कोणी गुरु वशीकरण, स्तभंन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारची अनेक चेटकें स्वतः करतात आणि इतरांना करायला सांगतात. वशीकरण म्हणजे माणसाला संपूर्णपणें आपल्या आधीन करुन घेणें. स्तंभन म्हणजे माणसाच्या शरीरावर व मनावर परीणाम करुन त्याला स्तब्ध करणें किंवा तटस्थ करणें. मोहन म्हणजे माणसाला भ्रमिष्ट करणें किंवा बेहोष करणें. उच्चाटन म्हणजे माणसाला स्थानभ्रष्ट करणें, त्याला उचलून नेणें किंवा त्याचा नाश करणें. या सगळ्या अघोरी क्रिया आहेत. उपदेशांची अवस्था ही अशी आहे. किती सांगावें ! सांगणें आतां पुरे. उपदेशांचे हे असे असंख्य प्रकार आहेत.
आत्मज्ञानावांचून हे उपदेशाचे सगळे प्रकार व्यर्थ असतात. आत्मज्ञानासारखें पवित्र दुसरें कांहीं नाहीं.उपदेशाचें असे पुष्कळ प्रकार असले तरी आत्मज्ञानावांचून त्यांना कांहीं अर्थ नाहीं. याबद्दल भगवंताचें एक वचन आहे.

श्लोकाचा अर्थ : नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवताचें पूजन करतात. पण अर्जुना, आत्मज्ञानावांचून सगळी कर्म वाया जातात. शैवमत, शाक्तात, आगमशास्त्र व आणखी बरीच मतें आहेत. भ्रमांत वावरणार्‍या जीवांना झालेला तो बुध्दिभ्रंशच समजावा. या जगांत आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम असें दुसरें कांहीं नाहीं. :
या कारणांसाठीं आत्मज्ञानासारखें पवित्र व उत्तम दुसरें कांहीं नाहीं. म्हणून आधी आत्मज्ञान प्राप्त करुन घेतले पाहिजे. सर्व उपदेशांमध्यें आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे. याविषयीं भगवंतानें पुष्कळ ठिकाणीं सांगून ठेवलें आहे.

श्लोकाचा अर्थ : माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगीं जर आत्मज्ञान स्थिरावलें असेल तर या जगांत मी जन्मोजन्मीं त्याचा दास होतो. :
चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला सुध्दां आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाहीं, तर मग गरीब बिचार्‍या जीवात्म्याला तो कळत नाहीं यांत नवल नाहीं. तीर्थयात्रा, स्नान, दान, इत्यादि सगळ्या साधनांनीं मिळविलेलें पुण्य पुष्कळच असतें. पण आत्मज्ञानाची पुण्याई या सर्वांहून कोटीपटीनें अधिक असतें.

श्लोकार्थ : पृथ्वीवर जी तीर्थे आहेत त्यांच्या यात्रेचें फळ आणि स्नानदानाचें फळ यांची बेरीज कोटीपटीनें वाढविली तर ती कदाचित ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीनें होईल. म्हणून गहनाहून गहन किंवा अत्यंत गूढ असें जें आत्मज्ञान त्याचें लक्षण आतां सांगतों. तें श्रोत्यांनीं ऐकावें.


श्रीराम समर्थ ...