|| दशक पाचवा : मंत्रांचा ||२|| समास पहिला : गुरुनिश्चय ||
|| श्रीराम ||
जय जज जी सद्गुरु पूर्णकामा| परमपुरुषा आत्मयारामा |
अनुर्वाच्य तुमचा महिमा| वर्णिला न वचे ||१||
जें वेदांस सांकडें| जें शब्दासि कानडें |
तें सत्शिष्यास रोकडें| अलभ्य लाभे ||२||
जें योगियांचें निजवर्म| जें शंकराचें निजधाम |
जें विश्रांतीचें निजविश्राम| परम गुह्य अगाध ||३||
तें ब्रह्म तुमचेनि योगें| स्वयें आपणचि होईजे आंगें |
दुर्घट संसाराचेनि पांगें| पांगिजेना सर्वथा ||४||
आतां स्वामिचेनि लडिवाळपणें| गुरुशिष्यांचीं लक्षणें |
सांगिजेती तेणें प्रमाणें - | मुमुक्षें शरण जावें ||५||
गुरु तों सकळांसी ब्राह्मण| जऱ्हीं तो जाला क्रियाहीन |
तरी तयासीच शरण| अनन्यभावें असावें ||६||
अहो या ब्राह्मणाकारणें| अवतार घेतला नारायेणें |
विष्णूनें श्रीवत्स मिरविणें| तेथें इतर ते किती ||७||
ब्राह्मणवचनें प्रमाण| होती शूद्रांचे ब्राह्मण |
धातुपाषाणीं देवपण| ब्राह्मणचेनि मंत्रें ||८||
मुंजीबंधनेंविरहित| तो शूद्रचि निभ्रांत |
द्विजन्मी म्हणोनि सतंत| द्विज ऐसें नाम त्याचें ||९||
सकळांसि पूज्य ब्राह्मण| हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण |
वेदविरहित तें अप्रमाण| अप्रिये भगवंता ||१०||
ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें| ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें |
कर्ममार्ग ब्राह्मणाविणें| होणार नाहीं ||११||
ब्राह्मण वेद मूर्तिमंत| ब्राह्मण तोचि भगवंत |
पूर्ण होती मनोरथ| विप्रवाक्येंकरूनी ||१२||
ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- | होऊन, जडे भगवंतीं |
ब्राह्मणतीर्थे उत्तम गती| पावती प्राणी ||१३||
लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण| आन यातिसि पुसे कोण |
परी भगवंतासि भाव प्रमाण| येरा चाड नाहीं ||१४||
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती| तेथें मानव बापुडें किती |
जरी ब्राह्मण मूढमती| तरी तो जगद्वंद्य ||१५||
अंत्येज शब्दज्ञाता बरवा| परी तो नेऊन कायेए करावा |
ब्राह्मणासन्निध पुजावा| हें तों न घडे कीं ||१६||
जें जनावेगळें केलें| तें वेदें अव्हेरिलें |
म्हणोनि तयासि नाम ठेविलें| पाषांडमत ||१७||
असो जे हरिहरदास| तयास ब्राह्मणीं विस्वास |
ब्राह्मणभजनें बहुतांस| पावन केलें ||१८||
ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा| तरी किमर्थ सद्गुरु करावा |
ऐसें म्हणाल तरी निजठेवा| सद्गुरुविण नाहीं ||१९||
स्वधर्मकर्मी.म् पूज्य ब्राह्मण| परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण |
ब्रह्मज्ञान नस्तां सीण| जन्ममृत्य चुकेना ||२०||
सद्गुरुविण ज्ञान कांहीं| सर्वथा होणार नाहीं |
अज्ञान प्राणी प्रवाहीं| वाहातचि गेले ||२१||
ज्ञानविरहित जें जें केलें| तें तें जन्मासि मूळ जालें |
म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें| सुधृढ धरावीं ||२२||
जयास वाटे देव पाहावा| तेणें सत्संग धरावा |
सत्संगेंविण देवाधिदेवा| पाविजेत नाहीं ||२३||
नाना साधनें बापुडीं| सद्गुरुविण करिती वेडीं |
गुरुकृपेविण कुडकुडीं| वेर्थचि होती ||२४||
कार्तिकस्नानें माघस्नानें| व्रतें उद्यापनें दानें |
गोरांजनें धूम्रपानें| साधिती पंचाग्नी ||२५||
हरिकथा पुराणश्रवण| आदरें करिती निरूपण |
सर्व तीर्थें परम कठिण| फिरती प्राणी ||२६||
झळफळित देवतार्चनें| स्नानें संध्या दर्भासनें |
टिळे माळा गोपीचंदनें| ठसे श्रीमुद्रांचे ||२७||
अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें| मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें |
नाना प्रकारीचीं उपकर्णें| साहित्यशोभा ||२८||
घंटा घणघणा वाजती| स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती |
आसनें मुद्रा ध्यानें करिती| प्रदक्ष्णा नमस्कार ||२९||
पंचायेत्न पूजा केली| मृत्तिकेचीं लिंगें लाखोली |
बेलें नारिकेळें भरिली| संपूर्ण सांग पूजा ||३०||
उपोषणें निष्ठा नेम| परम सायासीं केलें कर्म |
फळचि पावती, वर्म- | चुकले प्राणी ||३१||
येज्ञादिकें कर्में केलीं| हृदईं फळाशा कल्पिली |
आपले इछेनें घेतली| सूति जन्मांची ||३२||
करूनि नाना सायास| केला चौदा विद्यांचा अभ्यास |
रिद्धि सिद्धि सावकास| वोळल्या जरी ||३३||
तरी सद्गुरुकृपेविरहित| सर्वथा न घडे स्वहित |
येमेपुरीचा अनर्थ| चुकेना येणें ||३४||
जंव नाहीं ज्ञानप्राप्ती| तंव चुकेना यातायाती |
गुरुकृपेविण अधोगती| गर्भवास चुकेना ||३५||
ध्यान धारणा मुद्रा आसन| भक्ती भाव आणी भजन |
सकळहि फोल ब्रह्मज्ञान - | जंव तें प्राप्त नाहीं ||३६||
सद्गुरुकृपा न जोडे| आणी भलतीचकडे वावडे |
जैसें आंधळें चाचरोन पडे| गारीं आणी गडधरां ||३७||
जैसें नेत्रीं घालितां अंजन| पडे दृष्टीस निधान |
तैसें सद्गुरुवचनें ज्ञान- | प्रकाश होये ||३८||
सद्गुरुविण जन्म निर्फळ| सद्गुरुविण दुःख सकळ |
सद्गुरुविण तळमळ| जाणार नाहीं ||३९||
सद्गुरुचेनि अभयंकरें| प्रगट होईजे ईश्वरें |
संसारदुःखें अपारें| नासोन जाती ||४०||
मागें जाले थोर थोर| संत महंत मुनेश्वर |
तयांसहि ज्ञानविज्ञानविचार| सद्गुरुचेनी ||४१||
श्रीरामकृष्ण आदिकरूनी| अतितत्पर गुरुभजनीं |
सिद्ध साधु आणी संतजनीं| गुरुदास्य केलें ||४२||
सकळ सृष्टीचे चाळक| हरिहरब्रह्मादिक |
तेहि सद्गुपदीं रंक| महत्वा न चढेती ||४३||
असो जयासि मोक्ष व्हावा| तेणें सद्गुरु करावा |
सद्गुरुविण मोक्ष पावावा| हें कल्पांतीं न घडे ||४४||
आतां सद्गुरु ते कैसे| नव्हेति इतरां गुरु ऐसे |
जयांचे कृपेनें प्रकाशे| शुद्ध ज्ञान ||४५||
त्या सद्गुरूची वोळखण| पुढिले समासीं निरूपण |
बोलिलें असे श्रोतीं श्रवण| अनुक्रमें करावें ||४६||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयेनाम समास पहिला ||१||५. १
श्रीसदगुरु ब्रह्मज्ञानी पुरुष असतो. तो परमात्म्याशी अभिन्न असतो. तो चालतें बोलतें ब्रह्मच समजा. तो स्वरुपभूत असल्यानें त्याचें वर्णन तरी कसें करणार ! हे सदगुरुराया, तुमचा जयजयकार असो ! तुम्ही पूर्णकाम आहात कारण तुमच्या वासना तृप्त झालेल्या आहेत. तुम्ही सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयांत राहणारे आत्मस्वरुप तुम्हीच आहात. तुमचा महिमा शब्दांनीं सांगण्यासारखा नाहीं. म्हणून तो वर्णन करतां येत नाहीं.
परमात्म वस्तु अतींद्रिय व अचिंत्य आहे, अदृश्य व अलक्षण आहे, अति गूढ व दुर्लभ आहे. सगदुरुच्या कृपेनें ती वस्तु तद्रूपतेनें अनुभवतो. – जें परमात्मस्वरुप वेदांना अवघड वाटतें, शब्दांच्या क्षेत्रांच्या पलीकडे राहतें, आणि दुर्लभ आहे तें सतशिष्याला मात्र अगदी रोकठोक प्राप्त होतें. जें परमात्मस्वरुप योगी लोकाचें खास रहस्य आहे, जें शंकराचें खास राहण्याचें ठिकाण आहे, जेथें विश्रांतीलाही खास विश्रांति मिळतें, जें अतिशय गूढ आणि तसेंच खोल आहे, तें ब्रह्म तुमच्या कृपेनें शिष्य स्वतः आपण बनून जातो, त्याच्याशी शिष्य तदाकार बनतो. मग या अति कठीण संसाराच्या यातायातीनें तो मुळींच कष्टी होत नाहीं. या तीन ओव्यांमध्यें श्री समर्थांनीं फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.
(पहिली) दुर्लभ परमात्मा सतशिष्याला साक्षात् अनुभवास येतो. (दुसरी) तें स्वरुप अतिशय गूढ अ अत्यंत समाधान देणारें आहे. (तिसरी) शिष्य स्वतः तें बनतो. आणि (चौथी) त्यानंतर त्याच्या जीवनांत दुःख उरत नाहीं.
गुरु-शिष्यांच्या लक्षणांची प्रस्तावना करतात. :
श्रोते म्हणतात कीं स्वामींनीं आता आमचे लाड पुरवावें आणि गुरुशिष्यांचीं लक्षणें सांगावी. पण ती अशी सांगावीं कीं त्यांचें श्रवण करुन मोक्षाची तळमळ असणार्यांनीं लगेच सदगुरुला शरण जावें.
श्री समर्थांच्या काळीं समाजरचनेमध्यें ब्राह्मणाला फार महत्व होतें. तो बुध्दिमान होता व विद्येनें पुढारलेला होता. वैदिक जीवनपध्दतीची परंपरा त्यानें कशीतरी टिकवून धरली होती. व्यवहारामधील धर्मकर्मामध्यें त्याच्या शब्दाला फार किंमत असल्यानें तो एकप्रकारें गुरुत्व मिरवीत होता. पण भगवंताच्या बाबतींत तो मार्गदर्शन करुं शकत नव्हता. उलट असें मार्गदर्शन करणार्या संतानां त्यानें वेडेपणानें विनाकारण विरोध केला आणि तो स्वतःचें महत्व घालवून बसला. संतांनीं त्याला न दुखवता लोकसंग्रह केला. म्हणून या समासामध्यें श्री समर्थांनीं व्यवहारांत त्याचें मोठेपण मान्य केल्यासारखें दाखवून परमार्थात तें चालणार नाहीं असें मोठ्या खुबींने पण स्पष्टपणें सांगितलें आहें. ब्राह्मण हा सगळ्यांचा गुरु आहे. तो क्रियाहीन असला तरी म्हणजे तो ब्राह्मणधर्मानें वागत नसला तरी त्यालाच अगदी मनापासून शरण जावें. अहो या ब्राह्मणांसाठीं नारायणानें अवतार घेतला. विष्णूनें श्रीवत्स म्हणजे भृगूनें मारलेल्या लाथेची खूण मिरविली. तेथें इतरांची किंमत किती ?
ब्राह्मनांचें वचन प्रमाण मानतात. त्याच्या वचनानें शूद्र सुध्दां ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणाच्या वचनानें, मंत्रानें दगडामध्यें देवपण अवतरतें. ज्याची मुंज झाली नाहीं तो जन्मानें ब्राह्मण असला तरी निःसंशपणें शूद्रच असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म. म्हणून ब्राह्मणाला द्विज असें म्हणतात. सर्वांनीं ब्राह्मणाला पूज्य मानावें अशी वेदाज्ञा आहे. ती सगळ्यांनीं प्रमाण मानावी. जे वेदाच्या उलट आहे तें अप्रमाण मानावें. तें भगवंताला पण आवडत नाहीं. ब्राह्मणांच्या मदतीनें ज्योतिषांतील योग, होम, हवन, व्रतें, दानें, तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात. ब्राह्मणावांचून कर्ममार्गाचें आचरण होणार नाहीं. ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय. ब्राह्मणालाच देव समजावा. त्याच्या वचनानें सर्व इच्छा सफल होतात. ब्राह्मणाची पूजा केली तर मन शुध्द होतें व वृत्ति भगवंताच्या ठिकाणीं जडते. ब्राह्मणाचें तीर्थ घेतल्यानें माणसाला उत्तम गति लाभते. लक्षभोजन घालण्यासाठीं ब्राह्मणच लागतात. इतर जाति चालत नाहींत. भगवंत फक्त अंत:करणातील शुध्द भाव तेवढा पाहतो. इतर गोष्टींची तो किंमत ठेवीत नाहीं.
असो. ब्राह्मणाला मोठमोठे देवदेखील नमस्कार करतात. तेथें माणसांना बिचार्यांना कोण विचारतो. ब्राह्मण बुध्दिहीन असला तरी तो सर्वांना वंद्य असतो. एखाद्या अंत्यजाला पुष्कळ शब्दज्ञान असलें तरीं तो उपयोगाचा नाहीं. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाहीं. लोकरीतीला सोडून कांहीं वेगळें करणें वेदाला मान्य नसतें. म्हणून त्याला पाखंड म्हणतात. असो. जे शिवाचे व विष्णुचे भक्त आहेत त्यांची ब्राम्हणावर श्रध्दा असते. ब्राह्मणांना पूज्य मानल्यानें पुष्कळ लोक पावन झालें.
वेद परंपरेचें व लोकपरंपरेचें वर्णन आतांपर्यंत झालें. ब्राह्मणांची बाजू उचलून धरावी हा कांहीं श्री समर्थांचा हेतु येथें नाहीं. लोकपरंपरेमध्यें ब्राह्मणाला गुरुत्व असतांना आणखी सदगुरु कशास हवा त्याचें कारण सांगतात. :
ब्राह्मणाला पूज्य मानल्यानें जर मोठ्या देवापर्यंत पोहोंचता येतें तर सदगुरु कशाला करावा ? त्याची जरुर काय ? असा प्रश्न येतो. आपला आत्मस्वरुपाचा जो ठेवा आहे तो सदगुरुशिवाय मिळत नाहीं म्हणून सदगुरु करावा, हें त्याचें उत्तर आहे. आपण जीं धार्मिक कृत्यें करतो त्यांच्यापुरता ब्राह्मण पूज्य मानावा हें बरोबर आहे. पण आत्मज्ञान मात्र सदगुरुवांचून प्राप्त होत नाहीं. आणि ब्रह्मज्ञान होत नाहीं तोपर्यंत जन्ममृत्यु कांहीं चुकत नाहींत व नुसतें दुःख मात्र भोगावें लागतें. ब्राह्मण कितीही चांगला असला तरी तो देहबुध्दीमध्यें राहणारा सामान्य स्वार्थी माणूस असतो. तो कांहीं कोणाला भगवत्-स्वरुपापर्यंत पोहोंचवूं शकत नाहीं. ब्रह्मज्ञानी सत्पुरुषच ती गोष्ट करुं शकतात. सदगुरुंनी कृपा केल्याखेरीज ब्रह्मज्ञान होणें शक्य नाहीं. आणि तें ज्ञान नाहीं तोपर्यंत अज्ञानी माणसे या दृश्याच्या प्रवाहांत वाहून जातात. आत्मज्ञान करुन न घेतां जें जें कांहीं माणूस करतो तें तें अज्ञानांतून होत असल्यानें पुनः जन्म घेण्याचें कारण होऊन बसतें म्हणून ज्ञान होण्यासाठीं सदगुरुची पाउलें, त्याचें घट्ट धरावें, सदगुरुला शरण जाऊन ज्ञान करुन देण्याबद्दल प्रार्थना करावी. भगवंताचें दर्शन व्हावें असें ज्यास खरोखर वाटतें त्यानें संताची संगत धरावी. सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोंचता येत नाहीं. संत हाच सदगुरु होऊं शकतो. म्हणून सत्संग करावा असें सांगत असतां सदगुरुचा सहवास करावा हा खरा हेतु आहे.
विसावें शतक विज्ञानप्रधान युग आहे.या युगामध्यें परंपरा न मानतां स्वतंत्रपणें बुद्धी चालविण्यात फार महत्व आहे. राजकारणी पुरुषांना समाजांत मोठेपणा आहे. श्री समर्थ ज्या कालांत जगले तें धर्मप्रधान युग होतें. ज्या युगांत परंपरेला फार महत्व असून बहुजनसमाज श्रद्धावंत होता. त्यामुळें धर्मचार्यांना समाजामध्ये फार मोठेपणा होता. ब्राह्मण आपल्याकडील धर्माचार्य असल्यानें व्यक्तीच्या खाजगी जीवनात आणि सामाजिक समारंभात त्यांचा महत्वाचा कार्यभाग असे. त्याच्या देखरेखीखाली चालणार्या अनेक कृत्यांचा उल्लेख करून तीं कर्मे कदाचित पुण्य मिळेल पण आत्मज्ञान होणार नाहीं असें श्री समर्थ स्पष्ट सांगत आहेत :
वेडी, अज्ञानी माणसे सदगुरुचें मार्गदर्शन नसल्यामुळें निरनिराळी हलक्या दर्जाची मामुली साधने करतात पण सदगुरूची कृपा नसल्यानें त्यांचें श्रम वाया जातात. कोणी कार्तिकस्नानें व माघस्नानें करतात, कोणी व्रतें उद्यापनें व दानें करतात, कोणी गोरांजनें धूम्रपानें करतात, तर कोणी पंचाग्निसाधन साधतात. गोरांजने म्हणजे स्वतःस जाळून घेणें, धुम्रपन म्हणजे झाडास उलटें टांगून घ्यायचें, खाली केलेला धूर पिऊन तप करायचें. पंचाग्निसाधन म्हणजे भर उन्हाळ्यांत चार बाजूला विस्तव पेटवायचा, पांचवा डोक्यावर सूर्याचा ताप सहन करून तप करायचें. अशा देह्काष्टांनी परमार्थ साधत नसतो. कोणी हरिकथा व पुरानें श्रवण करतात. कोणी मनापासून प्रवचनें करतात, कोणी अतिशय कठीण असलेल्या तीर्थयात्रा करतात. कोणी देवाची अगदी झकपक पूजा करतात, कोणी स्नानसंध्या करतात, कोणी दर्भासनें वापरतात, कोणी गोपीचंदनाचे टिळे लावून गळ्यांत मला घालतात, तर कोणी वैष्णव मुद्रांचे ठसे लावतात. यांनी कांहीं परमार्थ साधत नाहीं. अर्ध्यापत्रें म्हणजे देवतांना अर्ध्य देण्यासाठीं ताम्हणें, संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचा करंडा, गोकर्णे म्हणजे गाईच्या कानासारखा आकार असलेलीं चांदीचीं किंवा तांब्याचीं भांडीं, मंत्रयंत्रांचीं ताम्रपणे म्हणजे तांब्याच्या पत्र्यांवर शास्त्रविधीने लिहिलेले मंत्र आणि आकृती. त्या आकृतींना देवतांचीं यंत्रे म्हणतात. कांही लोक हीं भांडीं, अनेक प्रकारचीं लहान मोठी पूजेची भांडीं आणि इतर पूजासाहित्य अत्यंत सुंदर व सुशोभित ठेवतात. पण कांहीं लोक भगवंतापर्यंत पोहचवीत नाहीं.कांहीं लोक घनघन घंटा वाजवितात, कांहीं लोक स्तोत्रे म्हणतात, भगवंताचे स्तवन करतात, त्याची स्तुती गातात, कांहीं लोक असनें करतात, मुद्रा करतात, ध्यान लावून असतात, तर कांहीं लोक नुसत्या प्रदक्षिणाच घालतात. एवढ्याने परमार्थ पदरात पडत नाहीं. कोणी पंचायतनाची पूजा करतात. गणपती. शाळीग्राम, शंकर, सूर्य, आणि देवी मिळून पंचायतन होतें. कोणी मातीच्या लिंगांची लाखोली करतात. मातीचे शिवलिंग करायचें व त्यास बेल, नारळ, फळें, फुलें, वाहून अगदी यथासांग पूजा करायची अशी एक लाख लिंगांची पूजा केली म्हणजे लाखोली होते. असल्या लाखोलीनें भगवंताचें दर्शन होत नाहीं. कांहीं लोक उपवास करतात, कांहीं लोक एखादा नेम निष्ठेनें चालवतात. सांगण्याचा हेतु असा कीं पुष्कळ लोक अशा प्रकारची कर्मे अतिशय कष्ट करुन करतात. त्याचें कांहीं फळही त्यांना मिळतें. परंतु भगवंताच्या प्राप्तीचें खरें वर्म किंवा रहस्य या लोकांच्या हातीं लागत नाहीं. त्या कर्माच्या पायीं लोक आत्मज्ञानाचें वर्म चुकतात. आतांपर्यत सांगितलेलीं सारीं कर्मे धर्माच्या दृष्टीनें मोठीं पुण्यकर्मे असतील. परंतु तीं एकजात देहबुध्दीला धरुन असल्याने दृश्याची आसक्ति अधिक घट्ट करतात. त्यांच्यामुळें माणूस भगवंताला प्रपंचांतील वस्तु मिळविण्याचें साधन बनवितो. म्हणून अशी कर्मे जन्मभर केलीं तरी आत्मज्ञानाचें रहस्य उकलत नाहिं. समजा एखाद्यानें स्वाहा, स्वधा, इत्यादि यज्ञ केले, होम हवन वगैरें वैदिक कर्मे केलीं पण मनामध्यें फळाशा धरली, स्वर्गसुख मिळावें, मुलेंबाळें व्हावी, किंवा कीर्ति मिळावी अशी इच्छा बाळगली, तर ती इच्छा कदाचित सफळ होईल. पण त्यामुळेंच त्यानें आपणहून पुढील विसार घेतला असें घडतें. येथें मीमांसकांच्या मताचा अनुवाद केला आहे.
समजा एखाद्यानें पुष्कळ कष्ट घेतलें आणि चौदा विद्यांचा अभ्यास केला, त्या विद्या हस्तगत करुन घेतल्या. एखाद्यानें खूप योगसाधना केली आणि त्याला यथावकाश ॠध्दी सिध्दी, अतींद्रिय शक्ति प्राप्त झाल्या. तरी सदगुरुची कृपा झाल्याखेरीज त्याचें आत्महित होत नाहीं, त्याला आत्मज्ञान होत नाहीं. आणि तें नाहीं तोपर्यंत इतर कांहीं केलें तरी यमपुरीच्या यातना चुकत नाहींत. दृश्यातील सगळ्या विद्या प्राप्त झाल्या तई माणूस अज्ञानाच्या कक्षेंतून बाहेर पडत नाहीं. इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष योगाचा अभ्यास करुन शरीराच्या, मनाच्या व वाणीच्या शक्ति अफाट वाढल्या तरी त्यांचा प्रभाव अज्ञानाच्या क्षेत्रांतच पडल्यानें अखेर वर्म चुकतें तें चुकतेंच.
ज्ञानावांचून मानवी जीवनाची पूर्णता नाहीं ही गोष्ट श्री समर्थांनी येथें मोठ्या प्रभावीप्रमानें सांगितली आहे. आत्मज्ञान असो कीं विज्ञान म्हणजे सायन्स असो. ज्ञानांतच खरें सामर्थ्य भरलेलें आहे. ज्या व्यक्तिच्या आणि समाजाच्या जीवनांत ज्ञानाचा प्रभाव नाहीं, ज्ञानाची उपासना नाहीं, वाढ नाहीं आणि लालसा नाहीं, ती व्यक्ति व तो समाज या जगांत उत्तम जीवन जगणें शक्यच नाहीं. :
जोपर्यंत आत्मज्ञान होत नाहीं तोपर्यंत जन्ममरणाचें चक्र कांही केल्या सुटत नाहीं. सदगुरुच्या कृपेखेरीज गर्भावास चुकत नाहीं व नरकांत जाणें सुटत नाहीं. जोंपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाहीं तोंपर्यंत ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ति, भाव आणि भजन या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात, निरुपयोगी होतात.
“ भक्तिचेनि योगे देव । निश्चयें पावती मानव ॥ ” हें समजून सांगण्यासाठीं दासबोध लिहिणारे श्री समर्थ आत्मज्ञानाचें महत्व किती ठासून सांगत आहेत हें ध्यानांत घ्यावें. प्रपंचात काय आणि परमार्थात काय विवेक आणि त्यांतून जन्मणारें ज्ञान यांनाच मानवी जीवनांत खरी किंमत आहे. माणसाचीं सारी कर्मे ज्ञानपर्यवसायी झाली पाहिजेत. नाहींतर त्या कर्माचे कष्ट तेवढे पदरांत पडतात आणि जीवन अर्धविकासीत राहतें.
ज्याप्रमाणें एखादा आंधळा माणूस कोणाचें मार्गदर्शन न घेतां चाचपडत चालूं लागला तर तो चिखकांत पडतो किंवा खोल खड्यांत पडतो, त्याचप्रमाणे जीवनांत ज्याला सदगुरुची कृपा मिळत नाहीं तो भलत्याच मार्गानें वावरतो, उगीच इकडे तिकडे भटकतो. याच्या उलट ज्याप्रमाणें डोळ्यांमध्यें अंजन घातलें कीं जमिनींत पुरलेलें गुप्त द्रव्य आपोआप दिसूं लागतें, त्याचप्रमाणें सदगुरुच्या उपदेशरुपी अंजनानें ज्ञानदृष्टि प्राप्त होते आणि हृदयाच्या गुहेमध्यें गुप्त असलेला आत्मा ज्ञानप्रकशामध्यें प्रत्यक्ष अनुभवास येतो. सदगुरु कृपा करतो म्हणजे काय करतो हें येथें स्पष्ट केलें. देहबुध्दीमध्यें वावरणारा जीव अहंकारकेंद्रित राहून स्वत:कडे व जगाकडे पाहतो. अज्ञानाचा हा स्वार्थमय दृष्टिकोन कांहीं केल्या तो सोडूं शकत नाहीं सदगुरु कृपा करतात म्हणजे जीवाला ईश्वरकेंद्रित करतात किंवा स्वस्वरुपकेंद्रित बनवितात. मग तो आत्मबुध्दीनें स्वत:कडे व जगाकडे पाहूं लागतो. ज्ञानाचा हा निःस्वार्थमय दृष्टिकोन देणें हें सदगुरुच्या कृपेचें खरें लक्षण समजावें.
सदगुरु जीवाची तळमळ शांत करतात, ईश्वरदर्शन घडवितात. पूर्वी मोठे संत झाले, त्यांनीं गुरुदासत्व पत्करलें, म्हणून मोक्षासाठीं सदगुरु करावा असें अखेर सांगतात. :
सदगुरु केला नाहीं तर जन्म वाया जातो, सदगुरु पाठीशी नसेल तर सगळे जीवन दु:खमय बनतें. सदगुरुशिवाय जीवाची तळमळ निवत नाहीं. अभय देणारा आपला हात सदगुरुंनीं डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्चर प्रगट होतो, ईश्चराचें दर्शन घडतें आणि संसाराची दु:खें नाहींशी होऊन जातात. जीवाला वरच्या पातळीवर उचलून ईश्वर दर्शनाला योग्य करण्यासाठीं सदगुरु आपली शक्ति त्याला देतात यांत शंका नाहीं. किंबहुना आपले विचार दुसर्यास देणें, पटविणें, शिकविणें यांत देखील न कळत देणारा शक्तिपातच करीत असतो. पूर्वीच्या काळीं मोठमोठे संत, महंत आणि मुनिश्रेष्ठ होऊन गेले. त्यांनासुध्दा आत्मज्ञानाचा विचार त्यांच्या सदगुरुपासूनच प्राप्त झाला. श्रीराम, श्रीकृष्ण, वगैरे अवतार यांनीं अति मनापासून सदगुरुसेवा केली. तसेच अनेक सिध्द, साधु आणि संत यांनीं देखील सदगुरुचें दास्य केलें. हें एवढें विश्व चालविणारें ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर, पण ते सुध्दां सदगुरुच्या चरणाशी लीन होऊन राहतात. तेथें आपलें महत्व मिरवित नाहींत. असो. ज्याला मोक्ष मिळावा असें वाटतें त्यानें सदगुरु प्राप्त करुन घ्यावा. सदगुरुवांचून मोक्ष मिळणें कल्पातीही शक्य नाहीं.
पुढील समासाच्या विषयाचा उपक्रम. :
आतां सदगुरु कसे असतात असें विचाराल तर ते इतर गुरुसारखें नसतात. सदगुरुच्या कृपेनें शुध्द ज्ञान किंवा आत्मज्ञान हृदयामध्यें उदय पावतें. अशा सदगुरुनां ओळखावें कसें याचें विवेचन पुढिल समासांत केले आहें. ते विवेचन श्रोत्यांनीं या समासांतील संदर्भ न सोडता श्रवण करावें. सदगुरु आत्मज्ञान करुन देतो हें मुख्य सूत्र ध्यानांत ठेवून ऐकावें.
श्रीराम समर्थ !!!