श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Sunday, April 3, 2011

|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम || समास दहावा : मुक्तिचतुष्टय ||


|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास दहावा : मुक्तिचतुष्टय ||

|| श्रीराम ||

मुळीं ब्रह्म निराकार| तेथें स्फूर्तिरूप अहंकार |
तो पंचभूतांचा विचार| ज्ञानदशकीं बोलिला ||||

तो अहंकार वायोरूप| तयावरी तेजाचें स्वरूप |
तया तेजाच्या आधारें आप| आवर्णोदक दाटलें ||||

तया आवर्णोदकाच्या आधारें| धरा धरिली फणिवरें |
वरती छपन्न कोटी विस्तारें| वसुंधरा हे ||||

इयेवरी परिघ सप्त सागर| मध्य मेरू माहां थोर |
अष्ट दिग्पाळ तो परिवार| अंतरें वेष्टित राहिला ||||

तो सुवर्णाचा माहा मेरू| पृथ्वीस तयाचा आधारु |
चौरुआसी सहस्र विस्तारु| रुंदी तयाची ||||

उंच तरी मर्यादेवेगळा| भूमीमधें सहस्र सोळा |
तया भोवता वेष्टित पाळा| लोकालोक पर्वताचा ||||

तया ऐलिकडे हिमाचळ| जेथें पांडव गळाले सकळ |
धर्म आणी तमाळनीळ| पुढें गेले ||||

जेथें जावया मार्ग नाहीं| मार्गी पसरले माहा अही |
सितसुखें सुखावले ते ही| पर्वतरूप भासती ||||

तया ऐलिकडे सेवटीं जाण| बद्रिकाश्रम बद्रिनारायण |
तेथें माहां तापसी, निर्वाण- | देहत्यागार्थ जाती ||||

तया ऐलिकडे बद्रिकेदार| पाहोन येती लहानथोर |
ऐसा हा अवघा विस्तार| मेरुपर्वताचा ||१०||

तया मेरुपर्वतापाठारीं| तीन श्रृंगे विषमहारी |
परिवारें राहिले तयावरी| ब्रह्मा विष्णु महेश ||११||

ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा| विष्णुश्रृंग तो मर्गजाचा |
शिवश्रृंग तो स्फटिकाचा| कैळास नाम त्याचें ||१२||

वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचें| सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें |
अमरावती इंद्राचें| स्थळ खालतें| १३||

तेथें गण गंधर्व लोकपाळ| तेतिस कोटी देव सकळ |
चौदा लोक, सुवर्णाचळ- | वेष्टित राहिले ||१४||

तेथें कामधेनूचीं खिलांरें| कल्पतरूचीं बनें अपारें |
अमृताचीं सरोवरें| ठाईं ठाईं उचंबळतीं ||१५||

तेथें उदंड चिंतामणी| हिरे परिसांचियां खाणी |
तेथें सुवर्णमये धरणी| लखलखायमान ||१६||

परम रमणीये फांकती किळा| नव्वरत्नाचिया पाषाणसिळा |
तेथें अखंड हरुषवेळा| आनंदमये ||१७||

तेथें अमृतांचीं भोजनें| दिव्य गंधें दिव्य सुमनें |
अष्ट नायका गंधर्वगायनें| निरंतर ||१८||

तेथें तारुण्य वोसरेना| रोगव्याधीहि असेना |
वृधाप्य आणी मरण येना| कदाकाळीं ||१९||

तेथें येकाहूनि येक सुंदर| तेथें येकाहूनि येक चतुर |
धीर उदार आणी शूर| मर्यादेवेगळे ||२०||

तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें| विद्युल्यतेसारिखीं स्वरूपें |
तेथें येश कीर्ति प्रतापें| सिमा सांडिली ||२१||

ऐसें तें स्वर्गभुवन| सकळ देवांचें वस्तें स्थान |
तयां स्थळाचें महिमान| बोलिजे तितुकें थोडें ||२२||

येथें ज्या देवाचें भजन करावें| तेथें ते देवलोकीं राहावें |
स्वलोकता मुक्तीचें जाणावें| लक्षण ऐसें ||२३||

लोकीं राहावें ते स्वलोकता| समीप असावें ते समीपता |
स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता- | तिसरी मुक्ती ||२४||

देवस्वरूप जाला देही| श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं |
स्वरूपतेचें लक्षण पाहीं| ऐसें असे ||२५||

सुकृत आहे तों भोगिती| सुकृत सरतांच ढकलून देती |
आपण देव ते असती| जैसे तैसे ||२६||

म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत| सायोज्यमुक्ती ते शाश्वत |
तेहि निरोपिजेल सावचित्त| ऐक आतां ||२७||

ब्रह्मांड नासेल कल्पांतीं| पर्वतासहित जळेल क्षिती |
तेव्हां अवघेच देव जाती| मां मुक्ति कैंच्या तेथें ||२८||

तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ| निर्गुण भक्ती तेहि अचळ |
सायोज्यमुक्ती ते केवळ| जाणिजे ऐसी ||२९||

निर्गुणीं अनन्य असतां| तेणें होये सायोज्यता |
सायोज्यता म्हणिजे स्वरूपता- | निर्गुण भक्ती ||३०||

सगुण भक्ती ते चळे| निर्गुण भक्ती ते न चळे |
हें अवघें प्रांजळ कळे| सद्गुरु केलियां ||३१||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ||१०||४. १०


|| दशक चवथा समाप्त ||


समासाच्या बावीस ओव्यांपर्यंत श्री समर्थांनी त्यांच्या काळीं रुढ असलेल्या विश्वरचनेची कल्पना वापरली आहे. तिच्या आधारानें भूलोक व स्वर्गलोक यांचें वर्णन सांगून पहिल्या तीन मुक्तीचें स्वरुप स्पष्ट केलें आहें. :
मुळांत ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथें ही व्यक्त व साकार सृष्टि वगैरे कांहीं नसतें व नव्हतें. त्या निराकार ब्रह्मामध्यें एक स्फुरण उदभवलें. तो अहंकार होय. त्यांतून पंचभूतात्मक सृष्टी कशी निर्माण झाली याचा विचार ज्ञानदशकांत म्हणजे आठव्या दशकांत केला आहे. तें अहंकाराचें स्फुरण शक्तिरुप असतें. त्यांतून तेज प्रगटतें व त्या तेजाच्या आधारानें जिकडें तिकडें पाणीच पाणी भरून गेलें. त्या पाण्याचा आधार घेऊन शेषानें आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. छपन्न कोटी योजनें इतका पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या भोंवतीं सात सागरांचा वेढा आहे. मध्यें मोठा प्रचंड मेरु पर्वत आहे. आठ दिशापालकांचा समूह हें सगळें अंतर वेढून संरक्षण करतो. तो प्रचंड मेरु सोन्याचा आहे. पृथ्वीला तोच आधार देतो. चौर्‍यांशी हजार योजनें त्याची रुंदी आहे. त्याची उंची मोजणें शक्य नाहीं. तो भूमीत सोळा हजार योजनें आंत गेलेला आहे, रक्षणासाठीं त्याच्या भोंवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे.

त्याच्या अलीकडे हिमालय आहे. तेथें सगळे पांडव गळून पडले. फक्त धर्म आणि यमदेव दोघेच पुढें गेले. हिमालयांतून जायला वाट नाहीं कारण वाटेमध्यें प्रचंड सर्प पसरलेले आहेत. बर्फाच्या थंडपणानें आराम भोगणारे ते सर्प पर्वतासारखें दिसतात. त्याच्या अलीकडे टोकाला बद्रिकाश्रम आणि बद्रिनारायण आहेत. मोठे मोठे तपस्वी मोक्ष पावण्यास देह ठेवण्यासाठीं तेथें जातात. त्याच्या अलीकडे बद्रिकेदार आहे. लहाम थोर सगळे यें पाहून येतात. असा हा मेरुपर्वताचा सगळा विस्तार आहे. त्या मेरुपर्वताच्या पठारावर किंवा सपाटीवर वाकड्यातिकड्या दिशांना तीन शिखरें आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश आपल्या परिवारासकट तेथें राहतात. ज्यावर ब्रह्मा राहतो तें शिखर साधें दगडाचें आहे. विष्णु राहतो तें शिखर पांचूचें आहे. आणि शंकर राहतो तें शिखर स्फटिकाचें आहे. त्याला कैलास म्हणतात. विष्णूच्या शिखराचें नांव आहे. वैकुंठ. ब्रह्मदेवाच्या शिखराचें नांव आहे सत्यलोक. त्याच्या खालीं अमरावती नांवाचें इद्राचें स्थान आहे. तेथें गण, गंधर्व, लोकपाळ, सगळे तेहतीस कोटी देव राहतात. सप्तस्वर्ग व सप्तपाताळ असे चौदा लोक मेरुपर्वतावर वसलेले आहेत. तेथें कामधेनूंचे मोठे कळप आहेत. कल्पवृक्षांचीं असंख्य जंगलें आहेत. जगोजागी अमृतानें भरलेली सरोवरें उचंबळत असतात. तेथें खूप चिंतामणी आहेत. हिर्‍याच्या व परिसाच्या खाणी आहेत. तेथील जमीन सोन्याची असल्यानें सारखी लखलख करतें.

तेथें नवरत्नांचिया पाषाणशिला आहेत. त्यांची अतिशय सुंदर प्रभा आजुबाजूला फांकते. तेथें सदासर्वकाळ हर्ष व आनंद भरलेला असतो. त्या ठिकाणीं जेवण अमृताचें असतें. दिव्य सुवास असलेली दिव्य फुलें असतात. अप्सरांपैकीं अष्ट नायिका व गंधर्व यांचें गायन सारखें चालूं असतें. तेथें तारूण्य कधीच कमी होत नाहीं, कोणाला रोग, व्याधी कधी होत नाहीं, कोणाला म्हातारपण आणि मरण कधीच येत नाहीं. तेथें एकापेक्षां एक सुंदर असतात, एकापेक्षां एक चतुर असतात. तसेंच ज्यांच्या धैर्याला, औदार्याला आणि शौर्याला कांहीं सीमा नाहीं असे लोक असतात.

तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात. तेथील रुप वीजेप्रमाणें लखलखणारें असतें. यश, कीर्ति आणि प्रताप यांना तेथें कांहीं मर्यादा नसते. तें स्वर्गभुवन असें आहेम सगळ्या देवांचें तें राहण्याचें ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच होईल.

प्रथम सलोकता मुक्ति सांगतात. :
या जगांतील वास्तव्यांत ज्या देवाची उपासना केलेली असते त्या देवाच्या लोकांत मृत्यूनंतर राहायला मिळतें. सलोकता मुक्तीचें लक्षण असें आहे.
  
आतां दुसर्‍या व तिसर्‍या मुक्तिबद्दल, समीपता व सरुपता यांच्याबद्दल सांगतात. :
देवलोकांत राहयला मिळणें यास सलोकता म्हणतात. देवाच्या जवळ राहायला मिळणें यास समीपता म्हणतात, ही दुसरी मुक्ती होय. देवाचें रुपच आपल्याला यावें ही सरुपता, तिसरी मुक्ति होय. उपासना करणार्‍या जीवाला देशाचें स्वरुप जरी प्राप्त झालें तरी श्रीवस्त्स कौस्तुभ आणि लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाहींत. सरुपता मुक्तीचें लक्षण असें आहे.

या तीन मुक्ति साधलेले जीव पुण्यवान खरें. त्याचें वास्तव्य स्वर्गलोकांत असतें हें देखील खरें. परंतु जेव्हां त्यांचा पुण्यक्षय होतो तेव्हां त्यांना स्वर्गातून खाली यावें लागतें. :
जोंपर्यंत पुण्यसंचय असतो तोंपर्यंत स्वर्गात राहून तेथील सुखें भोगतां येतात, पण पुण्याई संपली कीं देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र आपण कायम तेथेंच राहतात. या कारणासाठी तिन्ही मुक्ति नाशवंत आहेत. सायुज्यमुक्ति मात्र शाश्वत आहे. कायम टिकणारी आहे. तिचें वर्णन करतों, तें लक्ष देउन ऐका. या मुक्तिचा भावार्थ असा कीं जोपर्यंत उपासना मायेच्या किंवा व्यक्ताच्या किंवा दृशाच्या कक्षेंत वावरते तोपर्यंत जीवाची वाढ होत राहिली तरी त्यास आत्मसाक्षात्कार होत नाहीं. सलोकतेच्या अवस्थेमध्यें तो आंतबाहेर भगवंताने भरुन जातो. भगवंतावरील प्रेमाच्या या तीन चढत्या अवस्था आहेत. परंतु त्यांच्यापलीकडे जाऊनच परमात्मस्वरुपांत विलीन व्हावें लागतें. सगुणांतून निर्गुणांत जायला हवें. देहबुध्दींतून देवबुध्दींत गेल्यावर तेथें न थांबतां पलीकडील आत्मबुध्दींत जाणें अवश्य असतें. :     
कल्पांताच्या वेळीं हें विश्व नाश पावतें. पर्वतासकट पृथ्वी जळून जातें. त्यावेळीं सगळे देव नाहींसें होतात. मग त्या संहारामध्यें पहिल्या तीन मुक्ति कशा टिकणार ? त्यावेळीं निर्गुण परमात्मस्वरुप जसें आहे तसेंच निश्चल राहतें. त्या निर्गुणाची भक्तिदेखील तशीच निश्चल राहते. सायुज्यमुक्ति ही अशी आहे. निर्गुण परमात्मस्वरुपाच्या ठिकाणीं अनन्यपणें विलीन झालें कीं सायुज्यमुक्ति मिळते. स्वस्वरुपांत समरस होणें हीच निर्गुण भक्ति व हीच सायुज्यता समजावी.

सगुण नाशवंत म्हणून सगुण भक्ति नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ति कायम टिकते. सदगुरु केल्यानें हें सगळें स्पष्टपणें समजतें.

मूळ परमात्मस्वरुपाला नामरुप नाहीं. भक्त ज्यावेळीं उपास्य देवतेला भजतो त्यावेळीं त्याच्यापुढें असणारें देवतेचें नामरुप मानवी कल्पनेंतून निर्माण झालेलें तेंच असतें. प्रेमाची जोपासना करुन त्या रुपाशी तदाकार होणें ही मानवतेची परिसीमा आहे यांत शंका नाहीं. परंतु तेथें स्थलकालाच्या मर्यादा असतातच. त्या ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय अनंतामध्यें झेंप घेतां येत नाहीं. मानवता मागें टाकून अनंतात नाहींसें झाल्यावांचून परमात्मस्वरुपाच्या साक्षात्कार होत नाहीं म्हणून सगुण भक्ति आणि निर्गुण भक्ति असा भेद करुन श्री समर्थांनीं निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिलें. निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिलें. निर्गुण भक्तीच्या पायरीला पोहोंचलेला भक्त सगुण भक्तीचा उच्छेद कधीच करत नाहीं. फक्त सगुणाच्या प्रेमाचा रस घेतांना त्याच्या मनांत भ्रमाचा लेशदेखील नसतो. किंबहुना सगुणाची त्याला इतकी संवय झालेली असते कीं भक्तसम्राट श्रीतुकोबाराय सांगतात : अद्वैतीं तों नाहीं माझें समाधान । गोड हे चरणसेवा तुझी असो.
भक्तीचें हें रहस्य गळीं उतरण्यास श्री सदगुरुचा सहवास अवश्य असतो.

श्रीराम समर्थ !!!