श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, April 1, 2011

|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम || समास नववा : आत्मनिवेदन ||


|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम || समास नववा : आत्मनिवेदन ||

|| श्रीराम ||

मागां जालें निरूपण| आठवे भक्तीचें लक्षण |
आतां ऐका सावधान| भक्ति नवमी ||||

नवमी निवेदन जाणावें| आत्मनिवेदन करावें |
तेंहि सांगिजेल स्वभावें| प्रांजळ करूनि ||||

ऐका निवेदनाचें लक्षण| देवासि वाहावें आपण |
करावें तत्त्वविवरण| म्हणिजे कळे ||||

मी भक्त ऐसें म्हणावें| आणी विभक्तपणेंचि भजावें |
हें आवघेंचि जाणावें| विलक्षण ||||

लक्षण असोन विलक्षण| ज्ञान असोन अज्ञान |
भक्त असोन विभक्तपण| तें हें ऐसें ||||

भक्त म्हणिजे विभक्त नव्हे| आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे |
विचारेंविण कांहींच नव्हे| समाधान ||||

तस्मात् विचार करावा| देव कोण तो वोळखावा |
आपला आपण शोध घ्यावा| अंतर्यामीं ||||

मी कोण ऐसा निवाडा| पाहों जातां तत्वझाडा |
विचार करितां उघडा| आपण नाहीं ||||

तत्वें तत्व जेव्हां सरे| तेव्हां आपण कैंचा उरे |
आत्मनिवेदन येणेंप्रकारें| सहजचि जालें ||||

तत्वरूप सकळ भासे| विवेक पाहातां निरसे |
प्रकृतिनिरासें आत्मा असे| आपण कैंचा ||१०||

येक मुख्य परमेश्वरु| दुसरी प्रकृति जगदाकारु |
तिसरा आपण कैंचा चोरु| आणिला मधें ||११||

ऐसें हें सिद्धचि असतां| नाथिली लागे देहाहंता |
परंतु विचारें पाहों जातां| कांहींच नसे ||१२||

पाहातां तत्त्वविवेचना| पिंडब्रह्मांडतत्वरचना |
विश्वाकारें वेक्ती, नाना- | तत्वें विस्तारलीं ||१३||

तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |
आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||

आत्मा एक स्वानंदघन| आणी अहमात्मा हें वचन |
तरी मग आपण कैंचा भिन्न| उरला तेथें ||१५||

सोहं हंसा हें उत्तर| याचें पाहावें अर्थांतर |
पाहतां आत्मयाचा विचार| आपण कैंचा तेथें ||१६||

आत्मा निर्गुण निरंजन| तयासी असावें अनन्य |
अनन्य म्हणिजे नाहीं अन्य| आपण कैंचा तेथें ||१७||

आत्मा म्हणिजे तो अद्वैत| जेथें नाहीं द्वैताद्वैत |
तेथें मीपणाचा हेत| उरेल कैंचा ||१८||

आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण| जेथें नाहीं गुणागुण |
निखळ निर्गुणी आपण| कोण कैंचा ||१९||

त्वंपद तत्पद असिपद| निरसुनि सकळ भेदाभेद |
वस्तु ठाईंची अभेद| आपण कैंचा ||२०||

निरसितां जीवशिवौपाधी| जीवशिवचि कैंचे आधी |
स्वरूपीं होतां दृढबुद्धि| आपण कैंचा ||२१||

आपण मिथ्या, साच देव| देव भक्त अनन्यभाव |
या वचनाचा अभिप्राव| अनुभवी जाणती ||२२||

या नांव आत्मनिवेदन| ज्ञानियांचें समाधान |
नवमे भक्तींचे लक्षण| निरोपिलें ||२३||

पंचभूतांमध्यें आकाश| सकळ देवांमधें जगदीश |
नवविधा भक्तीमध्यें विशेष| भक्ति नवमी ||२४||

नवमी भक्ती आत्मनिवेदन| न होतां न चुके जन्ममरण |
हें वचन सत्य, प्रमाण- | अन्यथा नव्हे ||२५||

ऐसी हे नवविधा भक्ती| केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती |
सायोज्यमुक्तीस कल्पांतीं| चळण नाहीं ||२६||

तिहीं मुक्तींस आहे चळण| सायोज्यमुक्ती अचळ जाण |
त्रैलोक्यास होतां निर्वाण| सायोज्यमुक्ती चळेना ||२७||

आवघीया चत्वार मुक्ती| वेदशास्त्रें बोलती |
तयांमध्यें तीन नासती| चौथी ते अविनाश ||२८||

पहिली मुक्ती ते स्वलोकता| दुसरी ते समीपता |
तिसरी ते स्वरूपता| चौथी सायोज्यमुक्ती ||२९||

ऐसिया चत्वार मुक्ती| भगवद्भजनें प्राणी पावती |
हेंचि निरूपण प्रांजळ श्रोतीं| सावध पुढें परिसावें ||३०||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदनभक्तिनाम समास नववा ||||४. ९


प्रथम आत्मनिवेदन याचा अर्थ सांगतात. :
मागीस समासांत आठवी भक्ति कशी असते याचें वर्णन झालें. आतां नववी भक्ति कशी असते तें लक्ष देऊन ऐकावें. निवेदनाला नववी भक्ति म्हणतात. आत्मनिवेदन करावें. तें सोपें व स्पष्ट करुन सांगतो. नि + विद म्हणजे समर्पण करणें. ताब्यांत किंवा हातांत देणें. कोणाकडे सोपविणें. या धातूपासून निवेदन शब्द बनतो. आत्मनिवेदन आपण स्वत:ला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणें, त्याच्या हातीं सोपविणें, किंवा त्याच्या ताब्यांत देणें होय. आपण स्वत:ला देवास वाहणें हें निवेदनाचें लक्षण आहे. तत्वाचें स्पष्ट विवेचन केलें म्हणजे निवेदन काय हें कळतें. देवाला वाहणें म्हणजे देवाला देऊन टाकणें. या देण्यामध्यें तीन गोष्टी असतात. (एक) देवास देतांना आपण अत्यंत आदरानें व प्रेमानें देतो. (दोन) एकदां दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ति आणि प्रिति आपण सर्वस्वी सोडतो. (तीन) त्या वस्तूला आपण विसरून जातो. पुढें तिचें काय झालें याचा विचार मनांतून काढून टाकतो. तत्वविवरण म्हणजे काय ? आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणतीं तत्वें उरतात तें पहावें. हीं तत्वें कळलीं कीं आपण स्वत: देवाला वाहावें म्हणजे काय करावें तें समजतें.

मी कशाचा बनलेला आहे याचा शोध सुरुं झाला म्हणजे एक चमत्कारिक विरोधाभास निर्माण होतों. तो असा. :
एकीकडे मी भक्त आहे असें म्हणायचें आणि त्याचबरोबर दुसरीकडे वेगळेपणानें भगवंताची भक्ति करायची. हें सारें कांहीं तरी विलक्षणच वाटतें. (यामधील विरोधाभास) भगवंताहून जो वेगळा उरत नाहीं तो भक्त बनतो. जो वेगळा राहतो. तो भक्त नसतो. म्हणून भक्त आहे आणि तो वेगळेपणांने भगवंताचें भगवंताचें भजनपूजन करतो
या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत.

हा विरोधाभास किती तर्कदुष्ट आहे तें स्पष्ट करुन सांगतात. :  
एकीकडे एखादें लक्षण आहेअसें म्हणायचें आणि लगेंच दुसरीकडे तें लक्षण नाहीअसें वागायचें. लक्षण आहे आणि लक्षण नाही किंवा ज्ञान आहे आणि ज्ञान नाहीं या परस्परविरोधी जोड्या एकाच वेळीं एकाच वेळीं एकाच माणसाच्या ठिकाणीं असूं शकत नाहींत. त्याचप्रमाणें तोच माणूस एकाच वेळी भक्त आणि विभक्त दोन्ही असूं शकत नाहीं.

हा विरोधाभास सुटण्यास आत्मानात्मविचार एवढा एकच मार्ग आहे. :
विभक्त म्हणजे वेगळा. जो भगवंतापासून वेगळां नाहींच तो भक्त होय. जो भगवंतापासून वेगळाच आहे तो विभक्त आहे तो विभक्त होय. जो भक्त आहे तो विभक्त नव्हे व जो विभक्त आहे तो भक्त नव्हे. परंतु आत्मानात्मविचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारक रीतीनें समजणार नाहींत. यालाच तत्वविवरण म्हणतात.

देव कोण ? मी कोण ? हे प्रश्न विचारानें सोडवावे. :
या कारणासाठी आत्मानात्मविचार करावा. खरा देव कोणता तो ज्ञानानें जाणावा. आपल्या स्वत:चा आपण आपल्या अंतर्यामीं शोध करावा. भगवंत व भक्ति करणारा भक्त यांचा परस्पर संबंध नीटपणें आकलन होण्यासाठीं मीचें तसेंच भगवंताचें खरें स्वरुप कळायला पाहिजे. म्हणून आपणच आपल्या अंतरंगांत विचार उतरुन खर्‍या मींचें ज्ञान करुन घ्यावें असा श्री समर्थांचा आग्रह आहे. मीचें ज्ञान झालें कीं भगवंताचें ज्ञान आपोआप घडतें.

मी कोण ? या प्रश्नाचें उत्तर शोधण्याच्या क्रियेमध्यें विश्वाच्या मूलतत्वांचें परिक्षण करावें लागतें. :
मी कोण आहे ? हा प्रश्न दिसतो साधा परंतु त्याचें उत्तर शोधूं लागलें म्हणजे मूलतत्वांची मीमांसा करावी लागते. अशी मींमांसा करतां करतां अखेर ज्या मीला आज आपण मीमानतो तो खरा नाहीं असें उघडपणें कळून येतें.

असें कां होतें त्याचें कारण सांगतात. :
एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचा जेव्हां निरास होत जातो, तेव्हां आपण निराळे असें उरत नाहीं. अशा रीतीनें तत्वनिरसनानें आत्मनिवेदन सहजच घडतें. माणूस म्हणजे देह + मन + आत्मा. आत्मा हा खरा मीहोय. परंतु आज आपण देह आणि मन या दोघांच्या युतीस मीअसें मानतो. वेदांताचें सांगणें असें कीं देह आणि मन दोन्ही पंचमहाभूतांपासून बनतात. विश्व तयार होतांना आकाशांतून वायु झाला, वायूंतून तेज झालें, तेजांतून आप झालें आणि आपांतून पृथ्वी झालीं. विश्व लयास जातांना उलट क्रमानें पृथ्वी आपांत विरते, आप तेजांत लोपतें, तेज वायूत जातें आणि वायु आकाशांत विरतो. हा जो नियम विश्वाला किंवा ब्रह्मांडाला लागूं पडतो तोच मानव देहाला किंवा पिंडाला लागूं असतो. आपण स्वत:च्या अंतर्यामीं मीपणाचा शोध घेऊं लागलो कीं देह बनवणारी स्थूल पंचमहाभूतें त्यांच्या सूक्ष्मरुपांत जातात. नंतर सूक्ष्म महाभूतें आणि मन मूळ प्रकृतीमध्यें विलीन होतात. म्हणून देहबुध्दीच्या आश्रयानें वावरणारा मीतत्वविचारापुढें टिकत नाहीं. खोटा मीनाहींसा होणें हेंच आत्मनिवेदन होय.

देहच मी आहे अशा मीपणानें अहंकार खरा नाहीं हें पुन्हा सांगतात. :
सगळें दृश्य विश्व पंचमहाभूतांचें बनलेलें आहे. त्याचें विवेकानें विवरण केलें तर सर्वांचा निरास होतो. म्हणजे तो शेवटपर्यंत खरेंपणानें टिकत नाहींत. अशा रीतीनें दृश्य विश्वाचें किंवा प्रकृतीचें निरासन झालें कीं आत्मस्वरूप तेवढें शिल्लक उअरतें. मग आपला मीवेगळा राहतोच कोठें ? मुख्य मूलतत्वें दोनच आहेत. एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृति. या दोघांमध्यें मीहा तिसरा चोर येतोच कोठें ? परमात्मा आणि प्रकृति ही दोन मूलतत्वें स्वत:सिध्द आहेत. परंतु मुळांत नसलेला आणि या कारणांसाठीं खोटा असलेला हा देहाहंकार आपल्याला चिकटतो. तरी पण विचारानें शोध घेतल्यास मुळांत त्याला कांहीं आधार नाहीं असा निश्चय होतो.

सर्व दृश्य विश्व पंचमहाभूतांचें बनलेलें आहे. आपण त्याचें साक्षी आहोत. पण अखेर साखरेंत जशी गोडी तसें आक्षित्वही आत्मस्वरुपांत विरुन जाते. तात्पर्य देहाहंतेला कोठें स्थान 
नाहीं. :
व्यक्ति आणि विश्व यांमधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याचप्रेमाणें तत्वांची मीमांसा करुन पाहीली तर असें आढळतें कीं या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्य वस्तु हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे.

आपल्या देहासकट या विश्वाकडे आपण साक्षित्वानें पाहूं लागलों, म्हणजे केवळ बघणार्‍याची भूमिका ठेवून तिर्‍हाईतपणानें पाहूं लागलों तर ती तत्वें सहज नाहींशी होतात. नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला कीं साक्षीपणाही उरत नाहीं. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता तसाच विश्वाच्या शेवटीं सुध्दां केवळ आत्माच शिल्लक उअरतो. हें जर खरें तर आपल्या मीपणाला वेगळें अस्तित्व राहातच नाहीं. साक्षात्कारी पुरुष असे सांगतात कीम विश्वरचनेमध्यें आत्मा आणि अनात्मा अशीं दोनच मूलतत्वें भरलेलीं आहेत. त्यापैकीं आत्मतत्व आद्य, निर्गुण, स्यंप्रकाश, स्वयंवेद्य, शुध्द, बुध्द व मुक्तस्वभाव आहे. त्यांतूनच निर्माण झालेलें अनात्म भूत, सगुण, परप्रकाश, परसंवेद्य, अशुध्द, अज्ञान आणि परतंत्र आहे. अनात्म संपूर्ण सत्य आहे या भ्रमानें जीव मीपणानें त्यांत गुंतून जातो. तेथून बाहेर पडण्यास प्रथम साक्षित्वाची भूमिका घ्यावयाची असते. त्यानें दृश्य खरेंपणानें टिकत नाहीं, असत्यपणानें तें ओसरतें. तें ओसरलें कीं साक्षित्व मूळ आत्मस्वरूपांत अंतर्धान पावतें. या सगळ्या प्रक्रियेमध्यें आपल्या मीपणाला कोठेंही स्थान नाहीं. ही गोष्ट श्री समर्थांना स्पष्ट करायची आहे. कारण मीपणा विरणें हें आत्मनिवेदनाचें मर्म आहे.

आत्मस्वरुपाचा अनेक अंगांनीं विचार केला तरी आपल्या देहाहंतेला, मीपणाला कोठेंच स्थान उरत नाहीं हें दाखवतात. :  
आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदानें तो संपूर्ण भरलेला आहे. आणि मीच तो आत्मा आहे असें श्रुति सांगते. म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे व स्वानंदानें संपूर्ण भरलेला आहे. हें जर खरें तर मीआणखी कोणी निराळा असूं शकत नाहीं. म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे,

‌कोऽहमया प्रश्नाचें उत्तर सोऽहं हंसः” “मी कोण ?या प्रश्नांचें उत्तर तो मी व मी तोअसें आहे. या उत्तरामध्यें भरून असणारा सगळा अर्थ उकलून पहावा. आत्म्याच्या विचारांत शिरले कीं मीआणखी कोणी निराळा आहे असें सिध्द होत नाहीं. सोऽहं म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे. मी तोच असल्यानें त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाहीं. अगदी एकरुप आहोत. हें जर खरें तर मीकोणी निराळा, वेगळा आहे असें कसें म्हणतां येईल. म्हणून देहाहंकार मुळीं असत्य आहे. आत्मा अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे द्वैत नाहीं तें. ज्यांत दुसरेपणा नाहीं. ते अनात्म्याच्या प्रांतामध्यें जिकडे तिकडे द्वैत, दुसरेपणा, अनेकपणा पसरलेला आहे. मीआणि तूंयांचें वेगळेंपण असल्यावांचून अनात्म्याचें पाऊल हालतच नाहीं. आत्म्याच्या प्रांतांत मी तूंच असल्यानें तेथें वेगळेंपणाला वावच नाहीं. आपण द्वैताच्या साम्राज्यांत आहोंत म्हणून आत्माला अद्वैत म्हणायचें. कारण तो द्वैताचा स्पर्श होऊं देत नाहीं. खरें पाहिलें तर आत्म्याला द्वैत आणि अद्वैत या दोन्हीचा स्पर्श नाहीं. असें जर आहें तर आणखी वेगळ्या मीपणाचें कारण असूंच शकत नाहीं. म्हणून देहाहंकार असत्य आहे.

आत्मा सर्व बाजूंनीं परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथें गुण व अगुण दोन्हीही नाहींत. मानवी बुध्दीला गुणावांचून वस्तूची कल्पनाच करतां येत नाहीं. म्हणून सर्व अनात्मवस्तु आपण सगुण म्हणतो. पण आत्मवस्तु मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्यानें आपण तिला निर्गुण म्हणतो. वास्तविक आत्मस्वरुप गुण व अगुण या कल्पनेपासून सदा मुक्त आहे. असें जें निव्वळ निर्गुण आत्मस्वरुप त्यामध्यें ‘मी देह आहे’ ही क्षुद्र सगुण कल्पना कशी असणार ! अर्थात ती असूं शकत नाहीं म्हणून देहाहंता असत्य आहे. ‘निखळ निर्गुण’ हा श्री समर्थांचा शब्दप्रयोग मोठाच अर्थपूर्ण आहे. ‘तत त्वम असि’ म्हणजे ‘तूं तें ब्रह्म आहेस’ असें उपनिषदांतील स्वानुभवाचें महावाक्य आहे. यामधील तीन्ही पदांचें उल्लंघन करुन जो आत्मस्वरुपापर्यंत पोहोंचला त्याला भेद व अभेद दोन्ही लटकें होतात. वास्तविक आत्मवस्तु मुळांतच भेदरहित असल्यानें तिला भेद आणि अभेद स्पर्श करीत नाहींत. ती आत्मवस्तु जो आपण अंगें बनला त्याला ‘मी देह आहे’ अशी इ पणाची निराळी अवस्था कशी असणार ! म्हणून मीपणा असत्य आहे. ‘मी जीव आहे’ व ‘तो शिव आहे’ हा विद्याअविद्या यांनीं निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधि नाहींशीं केली तर मूळ आत्मस्वरुपांत जीवशिव असा भेद नाहीं हें ध्यानांत येईल. जीवशिव भेदरहित असलेला आत्मा हेंच आपलें खरें स्वरूप आहे असा निश्चय झाला कीं मग ‘मी देह आहे’ असा निराळा मीपणा उरतच नाहीं. म्हणून आपण कोणी निराळें ही देहाहंता असत्य आहे. दृश्य जगामध्यें सामान्य व विशेष याचें राज्य चालतें. अनेक व्यक्तिनां एकच सामान्य व्यापून असतें. उदा. अनेक माणसे ही विशेष तर त्यांना व्यापून असणारें व उरणारें सामान्य म्हणजे शिव होय. जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमध्यें भेद आहे तसाच अभेद पण आहे. जीवाचा जीवपणा विरला कीं शिवाचा शिवपणा विरतो. प्रथम जीव स्वतः विश बनतो. व नंतर परमात्ममयच होऊन जातो. म्हणून ‘मी’ कोणी त्याहून निराळा आहे असें मानायला कांहीं आधारच उरत नाहीं.

आतांपर्यत केलेल्या विवरणाचा सारांश सांगतात. तो असा कीं मी देह आहे हा भ्रम आहे, तें असत्य आहे. एक परमात्मा तेवढा खरा. त्याच्याशी अनन्य होऊन जाणें, वेगळेपणानें न उरणें याचें नांव भक्ति. या आत्मनिवेदन भक्तिमध्यें खरें समाधान प्राप्त होतें. :
‘मी देह आहे’ या भावनेमुळें आपण कोणी निराळे आहोत, स्वतंत्र आहोत असा जो आपला दृढ विश्वास असतो. तो भ्रम असतो. तो अगदी असत्य आहे. एक भगवंतच काय तो खरा आहे. तसेंच भक्त आणि भगवंत दिसायला निराळे दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकांशी अनन्य असतात, एकरुप असतात. हें जें मी सांगतो त्याचा खरा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. भक्तानें आपला संपूर्ण मीपणा भगवंताला वाहणें आणि त्याच्याशी संपूर्ण्पणें एकरुप होऊन जाणें यास आत्मनिवेदन असें म्हणतात. आत्मनिवेदनानेंच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभतें. नवव्या भक्तिचें लक्षण येथपर्यंत सांगितलें. स्वरुपाशी तादात्म्य पाव्णें यामध्यें समाधानाची गुरुकिल्ली आहे. म्हणून भक्तिनें काय किंवा ज्ञानानें काय अखेर आत्मनिवेदन होऊन आत्मस्वरुपाशी अनन्य व्हावें लागतें. स्वरुप साक्षात्कार कोणत्याही मार्गानें जरी झाला तरी समाधानाचें चिन्ह एकत्र राहतें. अशा रीतीनें भक्त ज्ञानी बनून जातो पण भक्तपणें नांदतो.

येथें आत्मनिवेदनाचें श्रेष्ठ स्थान सांगतात. :
ज्याप्रमाणें पंचमहाभूतांमध्यें आकाश श्रेष्ठ, सगळ्या देवांमध्यें जगदीश्वर श्रेष्ठ, त्याचप्रमाणें भक्तिचे जे नऊ प्रकार सांगितले त्यामध्यें नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ति सर्वात श्रेष्ठ भक्ति आहे. नववी भक्ति जी आत्मनिवेदन ती जर साधली नाहीं तर माणसाचें, भक्ताचें जन्ममरण चुकणार नाहीं. हें माझें बोलणें अगदी खरें आहें, अनुभवाला धरुन आहे. तें खोटें होणार नाहीं.

यानंतर पुढील समासांत सांगितलेला जो चार मुक्तिंचा विषय त्याचा उपक्रम करतात. :
नवविधा भक्ति ही अशी आहे. ती आचरली तर सायुज्जमुक्ति मिळते. या सबंध विश्वाचा लय झाला तरी सायुज्जमुक्ति अचल राहते, तिच्यामध्यें बदल होत नाहीं. एकंदर मुक्ति चार. त्यांपैकीं पहिल्या तीन मुक्तिमध्यें फरक घडून येतो. सायुज्जमुक्ति मात्र अचल राहते, तिच्यांत फरक प्डत नाहीं. तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्जमुक्तीमध्यें कोणताही फेरबदल होत नाहीं. ती जशीच्या तशीच कायम राहते. वेद आणि शास्त्रें यांनीं एकंदर चार प्रकारच्या मुक्ति वर्णन केल्या आहेत. त्यांपैकीं तीन नश्वर आहेत, अशाश्वत आहेत. पण चौथी मात्र शाश्वत आहे. अविनाशी आहे. पहिली मुक्ति सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरुपता आणि चौथी सायुज्जता. अशा या चार मुक्ति आहेत. भगवंताच्या भक्तिनें माणसाला त्या प्राप्त होतात. हा विषय स्पष्टपणें पुढें सांगायचा आहे.

श्रोत्यांनीं तो सावधपणें ऐकावा.