||श्रीराम ||
आतां सदगुरु वर्णवेना| जेथें माया स्पर्शों सकेना |
तें स्वरूप मज अज्ञाना| काये कळे ||१||
न कळे न कळे नेति नेति| ऐसें बोलतसे श्रुती |
तेथें मज मूर्खाची मती| पवाडेल कोठें ||२||
मज न कळे हा विचारु| दुऱ्हूनि माझा नमस्कारु |
गुरुदेवा पैलपारु| पाववीं मज ||३||
होती स्तवनाची दुराशा| तुटला मायेचा भर्वसा |
आतां असाल तैसे असा| सद्गुरु स्वामी ||४||
मायेच्या बळें करीन स्तवन| ऐसें वांछित होतें मन |
माया जाली लज्यायमान| काय करूं ||५||
नातुडे मुख्य परमात्मा| म्हणौनी करावी लागे प्रतिमा |
तैसा मायायोगें महिमा| वर्णीन सद्गुरूचा ||६||
आपल्या भावासारिखा मनीं| देव आठवावा ध्यानीं |
तैसा सद्गुरु हा स्तवनीं| स्तऊं आतां ||७||
जय जया जि सद्गुरुराजा| विश्वंभरा बिश्वबीजा |
परमपुरुषा मोक्षध्वजा| दीनबंधु ||८||
तुझीयेन अभयंकरें| अनावर माया हे वोसरे |
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें| पळोन जाये ||९||
आदित्यें अंधकार निवारे| परंतु मागुतें ब्रह्मांड भरे |
नीसी जालियां नंतरें| पुन्हां काळोखें ||१०||
तैसा नव्हे स्वामीराव| करी जन्ममृत्य वाव |
समूळ अज्ञानाचा ठाव| पुसून टाकी ||११||
सुवर्णाचें लोहो कांहीं| सर्वथा होणार नाहीं |
तैसा गुरुदास संदेहीं| पडोंचि नेणे सर्वथा ||१२||
कां सरिता गंगेसी मिळाली| मिळणी होतां गंगा जली |
मग जरी वेगळी केली| तरी होणार नाहीं सर्वथा ||१३||
परी ते सरिता मिळणीमागें| वाहाळ मानिजेत जगें |
तैसा नव्हे शिष्य वेगें| स्वामीच होये ||१४||
परीस आपणा ऐसें करीना| सुवर्णें लोहो पालटेना |
उपदेश करी बहुत जना| अंकित सद्गुरूचा ||१५||
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये| सुवर्णें सुवर्ण करितां न ये |
म्हणौनी उपमा न साहे| सद्गुरूसी परिसाची ||१६||
उपमे द्यावा सागर| तरी तो अत्यंतची क्षार |
अथवा म्हणों क्षीरसागर| तरी तो नासेल कल्पांतीं ||१७||
उपमे द्यावा जरी मेरु| तरी तो जड पाषाण कठोरु |
तैसा नव्हे कीं सद्गुरु| कोमळ दिनाचा ||१८||
उपमे म्हणों गगन| तरी गगनापरीस तें निर्गुण |
या कारणें दृष्टांत हीण| सद्गुरूस गगनाचा ||१९||
धीरपणे.म् उपमूं जगती| तरी हेहि खचेल कल्पांतीं |
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं| हीण वसुंधरा ||२०||
आतां उपमावा गभस्ती| तरी गभस्तीचा प्रकाश किती |
शास्त्रें मर्यादा बोलती| सद्गुरु अमर्याद ||२१||
म्हणौनी उपमे उणा दिनकर| सद्गुरुज्ञानप्रकाश थोर |
आतां उपमावा फणीवर| तरी तोहि भारवाही ||२२||
आतां उपमे द्यावें जळ| तरी तें काळांतरीं आटेल सकळ |
सद्गुरुरूप तें निश्चळ| जाणार नाहीं ||२३||
सद्गुरूसी उपमावे.म् अमृत| तरी अमर धरिती मृत्यपंथ |
सद्गुरुकृपा यथार्थ| अमर करी ||२४||
सद्गुरूसी म्हणावें कल्पतरु| तरी हा कल्पनेतीत विचारु |
कल्पवृक्षाचा अंगिकारु| कोण करी ||२५||
चिंता मात्र नाहीं मनीं| कोण पुसे चिंतामणी |
कामधेनूचीं दुभणीं| निःकामासी न लगती ||२६||
सद्गुरु म्हणों लक्ष्मीवंत| तरी ते लक्ष्मी नाशिवंत |
ज्याचे द्वारीं असे तिष्टत| मोक्षलक्ष्मी ||२७||
स्वर्गलोक इंद्र संपती| हे काळांतरीं विटंबती |
सद्गुरुकृपेची प्राप्ती| काळांतरीं चळेना ||२८||
हरीहर ब्रह्मादिक| नाश पावती सकळिक |
सर्वदा अविनाश येक| सद्गुरुपद ||२९||
तयासी उपमा काय द्यावी| नाशिवंत सृष्टी आघवी |
पंचभूतिक उठाठेवी| न चले तेथें ||३०||
म्हणौनी सद्गुरु वर्णवेना| हे गे हेचि माझी वर्णना |
अंतरस्थितीचिया खुणा| अंतर्निष्ठ जाणती ||३१||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्गुरुस्तवननाम समास चवथा ||४||१. ४
श्रीसदगुरु वर्णनातीत आहे :
आतां सदगुरुंचे स्तवन करायचें. पण श्रीसमर्थ म्हणतात कीं सदगुरुच्या स्वरूपाला माया स्पर्श करूं शकत नाहीं. आपलें सगळें ज्ञान मायेच्या कक्षेंतील असतें. त्यामुळें सदगुरुस्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणें शक्य नसतें. म्हणून सदगुरुचें वर्णन करतां येत नाहीं. श्रुति ही आत्मविद्येची आई आहे. परमात्मस्वरूपाचें वर्णन करण्यास तिनें प्रयत्न केला. पण अखेर "तें स्वरूप कळत नाहीं ; तें असें नव्हे, असें नव्हे'' याप्रमाणें बोलून नाईलाजानें गप्प बसली. तेथें आपल्यासारख्या मूर्खाची बुध्दि त्या स्वरूपाचें आकलन कसें करील !
सदगुरूस्वरूपाचा विचार मला कळत नाहीं म्हणून मी त्याला दुरुंचे नमस्कार करतो. श्री समर्थ प्रार्थना करतात कीं "हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेंतून मला पलीकडे न्या"
मायेच्या सहाय्यानें सदगुरुचें वर्णन :
सदगुरूची स्तुति करावी अशी खरोखर अशक्य आशा मी धरली. ती सफल होण्यास माया मदत करील असा भरवंसा मला होता. पण तो फोल ठरला. मग इतकेंच सांगतो कीं "अहो सदगुरुस्वामी तुम्ही असाल तसें असा. मायेच्या बळाची मदत घेऊन तुमचें स्तवन करावें अशी मनापासून इच्छा होती. पण तुमचें नांव काढल्यावर माया लाजली आणि मागें सरली. मग मला कांहीं करतां येईना. हें सगळें खरें आहे. परंतु मुख्य परमात्मा आकलन होत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणें सदगुरुस्वरूप अनाकलनीय आहे तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाचा महिमा मी वर्णन करीन. जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचें चिंतन करतो. या नियमास अनुसरून मी आतां सदगुरूची वंदना करतो.
श्री समर्थानीं केलेलें सदगुरुचें स्तवन :
विश्वाला भरून उरणारा, विश्वाचें मूळ, सर्वोत्तम पुरुष. मोक्षाची विजयपताका, आणि दीनांचा मित्र असा जो सदगुरु, त्याचा जयजयकार असो.
सूर्यप्रकाशाची उपमा :
सूर्याच्या प्रकाशानें अंधार पळून जातो. त्याचप्रमाणें सदगुरुचा अभयहस्त ज्याच्या मस्तकीं राहतो, त्याची कृपा ज्याच्यावर होते, त्याच्यावर असलेला या अनावर मायेचा अमंल नाहींसा होतों.
उपमेंतील उणेपणा :
सूर्यप्रकाश असतो तर तोपर्यंत अंधार नसतो हें खरे. पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला कीं, रात्र होते आणि पुन: अंधार ब्रह्मांडांत भरतो. सदगुरु स्वामीराजा तसा नाही. अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो. त्याचा ठावठिकाणा साफ नाहिंसा करतो. त्यामुळें जीव जन्ममृत्यूच्या चक्रांतून सुटतो.
शिष्याला सोने व सरिता यांची उपमा :
सोनें खराब होऊन त्याचें लोखंड कधीच होत नाहीं. तसें सदगुरुच्या दासाचएं मन इतकें शुध्द असतें कीं, त्यांत संशय कधीच उत्पन्न होत नाहीं. किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर ती गंगाच बनते. मग तिला गंगेतुन वेगळी काढायचें म्हटलें तरी ती कधींच वेगळी होणार नाही. गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात. त्याचप्रमाणें सदगुरूची भेट व संगति होण्यापूर्वी शिष्य सामान्य माणूस असतो. परंतु सदगुरूची गांठ पसली कीं, तो लगेच तद्रूप होतो. त्याला सदगुरुचा अधिकार येतो.
परिसाची उपमा व तिचा उणेपणा :
परीस लोखंडाचे सोनें करतो पण तें सोनें दुसर्या लोखंडाला लावलें तर तर त्याचें कांही सोनें होत नाहीं. म्हणजे परीस लोखंडाला परीसपणा देत नाहीं. पण सदगुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. याचा अर्थ असा कीं, शिष्याला गुरुपद प्राप्त होतें. सोने आपल्या स्पर्शानें लोखंडाला सोनें बनवू शकत नाहीं. महणून परिसाची उपमा सदगुरूला लागूं पडत नाहीं.
सागर व त्याचा उणेपणा :
सदगुरु सागरासारखा आहे आहे म्हणावें तर तें योग्य नाहीं. सागराचें पाणी खारट असतें. अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांतकाळीं तो नसतो. म्हणून ही उपमा उणी पडते.
गगन व त्याचा उणेपणा :
सदगुरू गगनासारखा आहे म्हणावें तर तें बरोबर नाहीं. आकाश केवळ शून्य दिसतें. पण सदगुरू शून्यापलीकडील स्वरूप आहे. म्हणून ही उपमा उणी पडते.
पृथ्वी व तिचा उणेपणा :
सदगुरू पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय आणि गंभीर आहे म्हणावें तर तें बरोबर नाहीं. कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल पण सदगुरू अभंग राहील. म्हणून ही उपमा उणी पडते.
सूर्य व शेष यांचा उणेपणा :
सदगुरू सूर्यासारखा आहे म्हणावें तर तें बरोबर नाहीं सूर्याचा प्रकाश तो किती? शास्त्रांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत. पण सदगुरुला मात्र मर्यादा नाहींत. सदगुरुच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कोठेंच मर्यादा नाहींत. तो अनंत आहे. म्हणून सूर्य उपमेला उणा पडतो. आतां शेषाची उपमा घ्यावी तर तो डोक्यावर ओझें वाहतो. म्हणून ती उपमा उणी पडते.
पाणी व त्याचा उणेपणा :
सदगुरू पाण्यासारखा आहे म्हणावें तर तें योग्य नाहीं पाणी चंचळ असते. आणि कालांतरानें सगळें आटून जातें. परंतु सदगुरुस्वरूप मोठें निश्चल असून तें कधींच नाश पावत नाहीं. म्हणून ही उपमा उणी पडते.
अमृत व त्याचा उणेपणा:
सदगुरू अमृतासारखा आहे म्हणावें तर तें बरोबर नाहीं. स्वर्गांत राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्युच्या मार्गानें जातात . तें नुसतें नांवाचें अमर असतात. पण सदगुरू ज्याच्यावर कृपा करतात तो खर्या अर्थानें अमर बनतो. म्हणून ही उपमा उणी पडते.
कल्पतरू व त्याचा उणेपणा :
सदगुरू कल्पतरुसारखा आहे म्हणावें तर तें योग्य नाहीं. आपण जेवढी कल्पना करुं तेवढेंच कल्पतरू आपल्याला देतो. परंतु सर्व मानवी कल्पनाच्या पलीकडे असणार्या सदगुरूपुढें कल्पतरूची किंमत राहत नाहीं. किंबहुना कल्पना ओलांडूनच सदगुरूपाशीं जावें लागतें. म्हणून ही उपमा उणी पडते.
चिंतामणी व त्याचा उणेपणा :
सदगुरू चिंतामणीसारखा आहे म्हणावें तर तें योग्य नाहीं. ज्याच्या मनांत चिंता आहे त्याला चिंतामणीचें महत्व वाटतें. सदगुरू शिष्याच्या मनांत कसली चिंताच उरुं देत नाहीं. ज्याला कांहीं इच्छाच शिल्लक उरली नाहीं तो कामधेनूची धार काढायला जाणार नाहीं. म्हणून ही उपमा उणी पडते.
श्रीमंती व तिचा उणेपणा :
सदगुरुला श्रीमंत म्हणावें तर तें योग्य नाहीं. जगातील सर्व संपत्ति नाशवंत असते. पण सदगुरुच्या द्वाराशीं अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्याचें ऐश्वर्य हीं सगळी कालांतरानीं नाश पावतात. पण सदगुरुच्या कृपेची प्राप्ती झाली कीं, ती कोणत्याही कालीं नाश पावत नाहीं. म्हणून ही उपमा उणी पडते.
विनाशी विश्व उपमेस उणे :
ब्रह्मा, विष्णु आणि शंकर हे सगळे नाश पावतात. एक सदगुरूचें स्थानच तेवढें सदैव अविनाशपणें टिकतें. सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळें दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सदगुरुला देतां येत नाहीं. पंचमहाभूतांची उठाठेव सदगुरूस्वरूपांत नाहीं.
वर्णन करतां येत नाहीं हेंच त्याचें वर्णन :
या कारणास्तव सदगुरूचें वर्णन करतां येत नाहीं. त्याचें वर्णन करण्याचा प्रयत्न करून तें करतां न येणें हेंच त्याचें वर्णन समजावें. सदगुरुरुपाचा अनुभव ही आतील अवस्था आहे. जे स्वत: अंतर्यामीं स्थिर झाले आहेत. त्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा कळतात. म्हणून या समासांत सदगुरूबद्दल जें मी सांगितलें तें फक्त अंतर्निष्ठांनाच कळेल.