||दशक पहिला : स्तवननाम ||१||समास दुसरा : गणेशस्तवन
||श्रीराम ||
ॐ नमोजि गणनायेका| सर्व सिद्धिफळदायेका |
अज्ञानभ्रांतिछेदका| बोधरूपा ||१||
माझिये अंतरीं भरावें| सर्वकाळ वास्तव्य करावें |
मज वाग्सुंन्यास वदवावें| कृपाकटाक्षेंकरूनी ||२||
तुझिये कृपेचेनि बळें| वितुळती भ्रांतीचीं पडळें |
आणी विश्वभक्षक काळें| दास्यत्व कीजे ||३||
येतां कृपेची निज उडी| विघ्नें कापती बापुडीं |
होऊन जाती देशधडी| नाममात्रें ||४||
म्हणौन नामें विघ्नहर| आम्हां अनाथांचे माहेर |
आदिकरूनी हरीहर| अमर वंदिती ||५||
वंदूनियां मंगळनिधी| कार्य करितां सर्वसिद्धी |
आघात अडथाळे उपाधी| बाधूं सकेना ||६||
जयाचें आठवितां ध्यान| वाटे परम समाधान |
नेत्रीं रिघोनियां मन| पांगुळे सर्वांगी ||७||
सगुण रूपाची टेव| माहा लावण्य लाघव |
नृत्य करितां सकळ देव| तटस्त होती ||८||
सर्वकाळ मदोन्मत्त| सदा आनंदे डुल्लत |
हरूषें निर्भर उद्दित| सुप्रसन्नवदनु ||९||
भव्यरूप वितंड| भीममूर्ति माहा प्रचंड |
विस्तीर्ण मस्तकीं उदंड| सिंधूर चर्चिला ||१०||
नाना सुगंध परिमळें| थबथबा गळती गंडस्थळें |
तेथें आलीं षट्पदकुळें| झुंकारशब्दें ||११||
मुर्डीव शुंडादंड सरळे| शोभे अभिनव आवाळें |
लंबित अधर तिक्षण गळे| क्षणक्ष्णा मंदसत्वी ||१२||
चौदा विद्यांचा गोसांवी| हरस्व लोचन ते हिलावी |
लवलवित फडकावी| फडै फडै कर्णथापा ||१३||
रत्नखचित मुगुटीं झळाळ| नाना सुरंग फांकती कीळ |
कुंडलें तळपती नीळ| वरी जडिले झमकती ||१४||
दंत शुभ्र सद्दट| रत्नखचित हेमकट्ट |
तया तळवटीं पत्रें नीट| तळपती लघु लघु ||१५||
लवथवित मलपे दोंद| वेष्टित कट्ट नागबंद |
क्षुद्र घंटिका मंद मंद| वाजती झणत्कारें ||१६||
चतुर्भुज लंबोदर| कासे कासिला पितांबर |
फडके दोंदिचा फणीवर| धुधूकार टाकी ||१७||
डोलवी मस्तक जिव्हा लाळी| घालून बैसला वेटाळी |
उभारोनि नाभिकमळीं| टकमकां पाहे ||१८||
नाना याति कुशुममाळा| व्याळपरियंत रुळती गळां |
रत्नजडित हृदयकमळा- | वरी पदक शोभे ||१९||
शोभे फरश आणी कमळ| अंकुश तिक्षण तेजाळ |
येके करीं मोदकगोळ| तयावरी अति प्रीति ||२०||
नट नाट्य कळा कुंसरी| नाना छंदें नृत्य करी |
टाळ मृदांग भरोवरी| उपांग हुंकारे ||२१||
स्थिरता नाहीं येक क्षण| चपळविशईं अग्रगण |
साअजिरी मूर्ति सुलक्षण| लावण्यखाणी ||२२||
रुणझुणा वाजती नेपुरें| वांकी बोभाटती गजरें |
घागरियासहित मनोहरें| पाउलें दोनी ||२३||
ईश्वरसभेसी आली शोभा| दिव्यांबरांची फांकली प्रभा |
साहित्यविशईं सुल्लभा| अष्टनायका होती ||२४||
ऐसा सर्वांगे सुंदरु| सकळ विद्यांचा आगरु |
त्यासी माझा नमस्कारु| साष्टांग भावें ||२५||
ध्यान गणेशाचें वर्णितां| मतिप्रकाश होये भ्रांता |
गुणानुवाद श्रवण करितां| वोळे सरस्वती ||२६||
जयासि ब्रह्मादिक वंदिती| तेथें मानव बापुडे किती |
असो प्राणी मंदमती| तेहीं गणेश चिंतावा ||२७||
जे मूर्ख अवलक्षण| जे कां हीणाहूनि हीण |
तेचि होती दक्ष प्रविण| सर्वविशईं ||२८||
ऐसा जो परम समर्थ| पूर्ण करी मनोरथ |
सप्रचीत भजनस्वार्थ| कल्लौ चंडीविनायेकौ ||२९||
ऐसा गणेश मंगळमूर्ती| तो म्यां स्तविला येथामति |
वांछ्या धरूनि चित्तीं| परमार्थाची ||३०||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननाम
समास दुसरा ||२||१. २
गणपतीचें निर्गुण अथवा तात्विक व विश्वव्यापक स्वरूप :-
सर्व सिद्धिंची फळें देणारा, अज्ञानाचें आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा, आणि मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकाररूप जो गणपती त्याला मी नमस्कार करतो. गणपतीनें माझे अत:करण आंतबाहेर व्यापून टाकावें. तेथें त्यानें कायमचें घर करुन राहावें, आणि आपल्या कृपादृष्टीनें पाहून मला मुक्याला ग्रथं सांगण्याचें सामर्थ्य द्यावें. त्याच्या कृपेच्या सामर्थ्यानें भ्रम व अज्ञान याचें आवरण विरुन जातें आणि सारे विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. अचानक त्याची कृपा झाली कीं, बिचारी संकटें भयानें थरथर कापू लागतात. इतकेंच नव्हे तर केवळ त्याच्या नामस्मरणानें तीं कोठल्या कोठें नाहींशीं होऊन जातात.
यासाठी गजाननाला विघ्नहर म्हणतात. जगांत ज्याला कोणि नाही त्याला तो आश्रयस्थान आहे. विष्णु, शंकर, वगैरे देव त्याला नमस्कार करतात. जगांत जें उत्तम आहे त्याला तो सांठा आहे. त्याला नमन करुन कोणतेही काम सुरुं केल्यास ते सर्व बाजुनें यशस्वी होतें. त्या कामांत संकटे, अडथळें व कटकटी निर्माण होत नाहींत.
गणपतीच्या सगुण रुपाचें वर्णन : त्याच्या रुपाचें चिंतन केले तर मनाला मोठें समाधान वाटतें. मग तें रुप प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यामध्यें एकवटते. त्याच्या बाकीच्या सगळ्या क्रिया बंद पडतात. गणेशाच्या सगुण रुपाची शोभा विलक्षण आहे. त्यामध्यें कौशल्यानें मोठें सॊंदर्यं रचलेले दिसतें. तो नाचूं लागला की सगळे देव स्वत:ला विसरुन नुसतें पाहातच राहतात.
त्याच्या गंडस्थळांतून सारखा मद गळत असतो. म्हणून जेव्हां पहावें तेव्हां तो मस्त दिसतो, परमानंदानें सदा डोलत असतो. आंतून उसळणार्या आनंदामुळे त्याचें वदन प्रसन्न असतें. त्याचें रुप भव्य आणि धिप्पाड आहे, त्याचा देह जबर शक्तिमान व प्रचंड आहे. त्याच्या विशाल कपाळाला दाट शेंदुर लावलेला आहे. त्याच्या गंड्स्थळांतून गळाणार्या मदाला अनेक प्रकारचे सुगंध येतात. ते आजुबाजूस दरवळतात. त्या कारणानें भुंग्यांचें थवे घूं घूं आवाज करीत त्याच्या डोक्याभोंवती गर्दी करतात. एखाद्या सोटासारखी त्याची सोंड कधीं सरळ तर कधीं मुरळलेली, गुंडाळलेली असते. कपाळावर दोन आवाळें छान दिसतात. खालचा ओठ लोंबलेला असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणाक्षणाला थोडा थोडा गळतो.
चौदा विद्यांचा हा स्वामी, त्याचे डोळे अतिशय लहान असून तो त्याची सारखी उघडझांक करतो. चांगले लांबरुंद पण लवचिक असलेले आपले कान तो पंख्यासारखे हालवतो व त्यांचा फडफड असा आवाज होतो. त्याच्या मुकुटांत सुंदर रंगांचीं रत्नें आहेत. ती तेजानें झळकतात. त्यांचें सुंदर रंग आजुबाजूला प्रकाशतात. गणपतीच्या कानांतील कुंडलें चमकतातच पण त्यांत बसवलेले नीलमणी विशेष प्रकाश टाकतात. त्याचे दांत घट्ट व पांढरे शुभ्र आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचें कडें आहे. कड्याच्या खालीं लहान लहान सोन्याची पानें चमकतांना दिसतात. त्याचें विशाल पोट थलथलतें. जिवंत नाग कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीची लहान लहान घुंघरें अगदी मंद आवाजानें झणत्कार करतात. त्याला चार हात आहेत. त्याचें पोट चांगलें सुटलेलें असून कमरेला पितांबर घट्ट बांधलेला आहे. पोटावरचा मोठा नाग फणा उभारून फुत्कार टाकतो. तो नाग फणा काढून डोलतो व जिभल्या चाटतो. कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशीं फणा उभारून टकमका पाहतो. गणपतीच्या गळ्यांत नाना तर्हेच्या फुलांच्या माळा आहेत. त्या कमरेच्या सापपर्यंत लोळत राहतात. हृदयावरील रत्नजडित पदक मोठें शोभून दिसतें.
चार हातांपैकी एका हातांत परशु, दुसर्या हातांत कमळ, तिसर्या हातांत टोंकदार तेजस्वी अंकुश, आणि चौथ्या हातांत गोल मोदक घेतलेला आहे. मोदक त्याला अतिशय आवडतो. अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला व कौशल्य यांनी संपन्न असे अनेक तर्हेचें नृत्य तो करतो. साथीला टाळ व मृदंग हीं वाद्यें असतात. मधून मधून त्याचा हुंकार त्यामध्यें भर घालतो. हुंकार करणें नृत्याचें एक गौण अंग आहे. शरीरानें स्थूल दिसणारा गणपती क्षणभरही स्वस्थ नसतो. चपळपणांत तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सोन्द्र्याची खाणच अशी त्याची मूर्ति मोठी सुलक्षणी व सुबक आहे. त्याच्या पायांतील पैंजण रुणझुण असा गोड आवाज करतात. वाकींचा देखील मोठा ध्वनि होतो. घुंघरूं घातलेली त्याची दोन्ही पावलें मन हरण करतात. ईश्वराच्या सभेला गणपतीमुळें मोठी शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांचें तेज सर्वत्र पसरतें. त्याचें सान्निध्य लाभलें कीं साहित्य निर्माण करण्यास अष्ट नायिका सदैव साह्य करतात. असा हि गणपती सर्व अवयवांनीं सुंदर आहे. सर्व विद्यांचा तो स्वामी आहे, सांठा आहे. त्याला मी अगदीं मनापासून साष्टांग नमस्कार करतो.
गणपतीच्या उपासनेचें फळ :
गणेशाच्या रूपाचें चिंतन केले तर अज्ञानानें भ्रमलेल्या माणसांच्या बुद्धींत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचें वर्णन ऐकले तर सरस्वती प्रसन्न होते.
त्याला ब्रह्मादि देव नमस्कार करतात. त्याच्या पुढें माणसाला कांहींच किंमत नाही. तरीपण ज्याची बुद्धि मंद असेल त्यानें गणपतीची उपसना करावी, त्याचे चिंतन करावें. जी माणसे अवलक्षणी व मूर्ख असतात किंवा जी अति हीन असतात, ती माणसे गणपतीच्या चिंतनानें हुशार बनतात व सर्व विषयात पारंगत होतात. गणपती मोठा समर्थ आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे, साधकाला स्वानुभवाचा स्वार्थ साधून देणारा आहे. या कलियुगांत देवी आणि गणपती मुख्य देवता मानतात. मनांत परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणें त्या मंगलमूर्तीची स्तुती केली आहे.