||दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास तिसरा : शारदास्तवन
||श्रीराम ||
आतां वंदीन वेदमाता| श्रीशारदा ब्रह्मसुता |
शब्दमूल वाग्देवता| माहं माया ||१||
जे उठवी शब्दांकुर| वदे वैखरी अपार |
जे शब्दाचें अभ्यांतर| उकलून दावी ||२||
जे योगियांची समाधी| जे धारिष्टांची कृतबुद्धी |
जे विद्या अविद्या उपाधी| तोडून टाकी ||३||
जे माहापुरुषाची भार्या| अति सलग्न अवस्था तुर्या |
जयेकरितां महत्कार्या| प्रवर्तले साधु ||४||
जे महंतांची शांती| जे ईश्वराची निज शक्ती |
जे ज्ञानियांची विरक्ती| नैराशशोभा ||५||
जे अनंत ब्रह्मांडें घडी| लीळाविनोदेंचि मोडी |
आपण आदिपुरुषीं दडी| मारून राहे ||६||
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे| विचार घेतां तरी नाडळे |
जयेचा पार न कळे| ब्रह्मादिकांसी ||७||
जे सर्व नाटक अंतर्कळा| जाणीव स्फूर्ती निर्मळा |
जयेचेनी स्वानंदसोहळा| ज्ञानशक्ती ||८||
जे लावण्यस्वरूपाची शोभा| जे परब्रह्मसूर्याची प्रभा |
जे शब्दीं वदोनि उभा| संसार नासी ||९||
जे मोक्षश्रिया माहांमंगळा| जे सत्रावी जीवनकळा |
हे सत्त्वलीळा सुसीतळा| लावण्यखाणी ||१०||
जे अवेक्त पुरुषाची वेक्ती| विस्तारें वाढली इच्छाशक्ती |
जे कळीकाळाची नियंती| सद्गुरुकृपा ||११||
जे परमार्थमार्गींचा विचार- | निवडून, दावी सारासार |
भवसिंधूचा पैलपार| पाववी शब्दबळें ||१२||
ऐसी बहुवेषें नटली| माया शारदा येकली |
सिद्धचि अंतरी संचली| चतुर्विधा प्रकारें ||१३||
तींहीं वाचा अंतरीं आलें| तें वैखरिया प्रगट केलें |
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें| तें शारदागुणें ||१४||
जे ब्रह्मादिकांची जननी| हरीहर जयेपासुनी |
सृष्टिरचना लोक तिनी| विस्तार जयेचा ||१५||
जे परमार्थाचें मूळ| नांतरी सद्विद्याची केवळ |
निवांत निर्मळ निश्चळ| स्वरूपस्थिती ||१६||
जे योगियांचे ध्यानीं| जे साधकांचे चिंतनीं |
जे सिद्धांचे अंतःकर्णीं| समाधिरूपें ||१७||
जे निर्गुणाची वोळखण| जे अनुभवाची खूण |
जे व्यापकपणें संपूर्ण| सर्वांघटीं ||१८||
शास्त्रें पुराणें वेद श्रुति| अखंड जयेचें स्तवन करिती |
नाना रूपीं जयेसी स्तविती| प्राणीमात्र ||१९||
जे वेदशास्त्रांची महिमा| जे निरोपमाची उपमा |
जयेकरितां परमात्मा| ऐसें बोलिजे ||२०||
नाना विद्या कळा सिद्धी| नाना निश्चयाची बुद्धी |
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी| ज्ञेप्तीमात्र ||२१||
जे हरिभक्तांची निजभक्ती| अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी |
जे जीवन्मुक्तांची मुक्ती| सायोज्यता ते ||२२||
जे अनंत माया वैष्णवी| न कळे नाटक लाघवी |
जे थोराथोरासी गोवी| जाणपणें ||२३||
जें जें दृष्टीनें देखिलें| जें जें शब्दें वोळखिलें |
जें जें मनास भासलें| तितुकें रूप जयेचें ||२४||
स्तवन भजन भक्ति भाव| मायेंवाचून नाहीं ठाव |
या वचनाचा अभिप्राव| अनुभवी जाणती ||२५||
म्हणौनी थोराहुनि थोर| जे ईश्वराचा ईश्वर |
तयेसी माझा नमस्कार| तदांशेंचि आतां ||२६||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शारदास्तवननाम समास तिसरा ||३||१. ३
शारदेचें मूळ स्वरूप :
वेदांची आई, ब्रह्मदेवाची कन्या, नादाचें जन्मस्थान, वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्रीशारदा तिला मी नमस्कार करतो.
शारदा काय करते :
तिच्यामुळे सूक्ष्म रूपानें शब्द उत्पन्न होतात, वैखरीनें अपार शब्द बोलले जातात आणि तीच शब्दांचें अंतरंग मंजे स्पष्ट करून दाखविते.
जीवनात शारदा कोठें कोठें आढळते :
योग्यांच्या समाधीमध्यें व धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्यें ती आढळते. विद्या व अविद्या या दोन्ही उपाधि ती नाहिंशा करते. आदिपुरुष जो ईश्वर त्याची ती भार्या आहे. ईश्चराशीं अत्यंत निकट असतां भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच होय. तिच्या जोरावरच साधु पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात.
थोर पुरुषांच्या शांतीमध्ये आणि ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमध्यें शारदाच प्रगत होते. ईश्वराची स्वत:ची ही शक्ति अत्यंत वासनारहित अवस्थेचें सौंदर्य समजतात.
शारदेचें सामर्थ्य :
शारदा अनंत विश्वें निर्माण करते आणि गंमतीनें खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते. पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपांत लीन होऊन लपून बसते. इंद्रियांनी पाहूं लागले तर ती दिसतें पण विचारानें तिचा शोध घेऊं लागले तर ती आढळत नाहीं. म्हणून ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही. तिचें खरें स्वरूप आकलन होत नाही.
शारदेचें विविध रंगी रूप :
विश्वरूपीं नाटकांतील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीनें नाचविते. जाणीवेमध्यें उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे. ज्ञानांमध्ये वास करणारें सामर्थ्य तिचेंच रूप असून तिच्या कृपेनेंच परमानंदाचा विलास भोगता येतो.
विश्वांतील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते, परब्रह्मरूप सूर्याशीं त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते. दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या सहय्यानें ती नाहींसा करते. शारदा म्हणजे मोक्षाचें वैभव व मंगलांत मंगल अशी अमृतरूपीं सतरावी जीवनकलाच होय. लावण्यखाणी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणांची लीला आहे. अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते, त्याच्या संकल्पांचा विस्तार करणारी इच्छाशक्ति तीच आहे. काळावर स्वामित्व गाजविणारी सदगुरूकृपा ती हीच होय. परमार्थाचें साधन करणार्या साधकाला आत्मानात्मविवेकानें शारदा आत्मस्वरुपाची बरोबर कल्पना देते. शब्दांच्या मदतीनें म्हणजे श्रवणमनानें ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते.
अशा रीतीनें पुष्कळ रूपांनीं नटणारी ही शारदा एकच माया आहे. ती स्वयंभू व पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या अंतर्यामीं चार प्रकारे सांचलेली आढळते.
कर्तृत्व सगळें शारदेचें :
माणसाच्या अंत:करणारा परा, पश्यंती व मध्यमा या तीन वाणींमध्यें जें स्फुरतें तें वैखरीनें प्रत्यक्ष शब्दांत प्रगट होतें. शब्दानें सर्व व्यवहार चालतो. म्हणून जगांतील सगळें कर्तृत्व शारदेच्या शक्तीनें चालतें. शारदा ब्रह्मादिकांची आई आहे. विष्णु शिव तिच्या पोटी जन्मतात. तीन लोक असलेली ही अफाट विश्वरचना एका शारदेचाच विस्तार आहे.
साधकाच्या जीवनांत शारदेचें स्थान :
शारदा परमार्थाचें मूळच आहे इतकेंच नव्हे तर केवळ अत्म्विद्याच आहे. शारदा म्हणजे ईश्वराची निवांत, निर्मळ आणि निश्चळ अवस्था होय. योग्यांना ध्यान लावण्यास मदत करणारी, साधकांना आत्मचिंतनाची कला शिकविणारी, आणि सिद्धांच्या अंत:करणात समाधिरूपानें स्थिर होणारी तीच असते.
शारदेचें स्वरूप आकलन झालें कीं निर्गुणाची ओळखण होते व स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खूण पटते. सर्व दृश्य आकारांत ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो. शास्त्रें, पुराणें, वेद, श्रुती, इत्यादि ग्रंथ सारखें शारदेचेंच स्तवन करतात. सगळी माणसेदेखील नाना रूपांनी तिलाच स्तुती अर्पण करतात.
शारदेचें माहात्म्य : शारदेमुळें वेदशास्त्रांना मोठेपणा आहे. वास्तविक परमात्मस्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे. शब्द तेथें पोंचूच शकत नाही. त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्यें आणून "परमात्मा" असें नांव देणारी, उपमेच्या पलीकडे असणार्याला उपमेच्या प्रांतांत आणणारी ही शारदा आहे. परमात्मास्वरूप "मी आहे" अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणें हें शारदेचें स्वरूप समजावें. मुळांत ती ज्ञानमयच असल्यानें सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धि आणि निश्चित बुद्धीरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो.
त्याचप्रमाणें भगवंताच्या भक्तांची भक्ति अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणार्या ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिति, आणि जीवन्मुक्तांची सायुज्यमुक्ती ती शारदाच होय.
शारदेचा विलक्षणपणा :
शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाहीं अशी भगवंताची किंवा ईश्वराची माया. तिनें मोठ्या कौशल्यानें रचलेंलें विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही. स्वत:ला ज्ञानी समजणार्या मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना ज्ञानाच्या अभिमानानें ती अधिक गुंतवते. डोळ्यांनीं जें दिसते, शब्दांनीं जें जाणतां येतें आणि मनाला जें जें कल्पितां येतें तें सगळें हिचेंच रुप समजावें.
भगवंताचें स्तवन असो, भजन असो किंवा त्याची भक्ति असो, शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय तें करतां येत नाहीं. माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. म्हणून शेवटी थोरांपेक्षां थोर व ईश्वराचा ईश्वर असणार्या शारदेला तिच्या अंशानेच म्हणजे तादात्म्यानेंच मी नमस्कार करतो.