श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Wednesday, November 24, 2010

|| दशक पहिला : स्तवननाम ||१||समास पहिला : ग्रंथारंभलक्षण ||

||  || दशक पहिला : स्तवननाम ||१||समास पहिला  : ग्रंथारंभलक्षण 

श्रोते पुसती कोण ग्रंथ| काय बोलिलें जी येथ |
श्रवण केलियानें प्राप्त| काय आहे ||१||

ग्रंथा नाम दासबोध| गुरुशिष्यांचा संवाद |
येथ बोलिला विशद| भक्तिमार्ग ||२||

नवविधा भक्ति आणि ज्ञान| बोलिलें वैराग्याचें लक्षण |
बहुधा अध्यात्म निरोपण| निरोपिलें ||३||

भक्तिचेन योगें देव| निश्चयें पावती मानव |
ऐसा आहे अभिप्राव| ईये ग्रंथीं ||४||

मुख्य भक्तीचा निश्चयो| शुद्धज्ञानाचा निश्चयो |
आत्मस्थितीचा निश्चयो| बोलिला असे ||५||

शुद्ध उपदेशाचा निश्चयो| सायोज्यमुक्तीचा निश्चयो |
मोक्षप्राप्तीचा निश्चयो| बोलिला असे ||६||

शुद्धस्वरूपाचा निश्चयो| विदेहस्थितीचा निश्चयो |
अलिप्तपणाचा निश्चयो| बोलिला असे ||७||

मुख्य देवाचा निश्चयो| मुख्य भक्ताचा निश्चयो |
जीवशिवाचा निश्चयो| बोलिला असे ||८||

मुख्य ब्रह्माचा निश्चयो| नाना मतांचा निश्चयो |
आपण कोण हा निश्चयो| बोलिला असे ||९||

मुख्य उपासनालक्षण| नाना कवित्वलक्षण |
नाना चातुर्यलक्षण| बोलिलें असे ||१०||

मायोद्भवाचें लक्षण| पंचभूतांचे लक्षण |
कर्ता कोण हें लक्षण| बोलिलें असे ||११||


नाना किंत निवारिले ||नाना संशयो छेदिले |
नाना आशंका फेडिले| नाना प्रश्न ||१२||

ऐसें बहुधा निरोपिलें| ग्रंथगर्भी जें बोलिलें |
तें अवघेंचि अनुवादलें| न वचे किं कदा ||१३||

तथापि अवघा दासबोध| दशक फोडून केला विशद |
जे जे दशकींचा अनुवाद| ते ते दशकीं बोलिला ||१४||

नाना ग्रंथांच्या समती| उपनिषदें वेदांत श्रुती |
आणि मुख्य आत्मप्रचीती| शास्त्रेंसहित ||१५||

नाना समतीअन्वये| म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये |
तथापि हें अनुभवासि ये| प्रत्यक्ष आतां ||१६||

मत्सरें यासी मिथ्या म्हणती| तरी अवघेचि ग्रंथ उछेदती |
नाना ग्रंथांच्या समती| भगवद्वाक्यें ||१७||

शिवगीता रामगीता| गुरुगीता गर्भगीता |
उत्तरगीता अवधूतगीता| वेद आणी वेदांत ||१८||

भगवद्गीता ब्रह्मगीता| हंसगीता पाण्डवगीता |
गणेशगीता येमगीता| उपनिषदें भागवत ||१९||

इत्यादिक नाना ग्रंथ| समतीस बोलिले येथ |
भगवद्वाक्ये येथार्थ| निश्चयेंसीं ||२०||

भगवद्वचनीं अविश्वासे| ऐसा कोण पतित असे |
भगवद्वाक्याविरहित नसे| बोलणे येथीचें ||२१||

पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण |
तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी ||२२||
  
अभिमानें उठे मत्सर| मत्सरें ये तिरस्कार |
पुढें क्रोधाचा विकार| प्रबळे बळें ||२३||

ऐसा अंतरी नासला| कामक्रोधें खवळला |
अहंभावे पालटला| प्रत्यक्ष दिसे ||२४||

कामक्रोधें लिथाडिला| तो कैसा म्हणावा भला |
अमृत सेवितांच पावला| मृत्य राहो ||२५||

आतां असो हें बोलणें| अधिकारासारिखें घेणें |
परंतु अभिमान त्यागणें| हें उत्तमोत्तम ||२६||

मागां श्रोतीं आक्षेपिलें| जी ये ग्रंथीं काय बोलिलें |
तें सकळहि निरोपिलें| संकळीत मार्गे ||२७||

आतां श्रवण केलियाचें फळ| क्रिया पालटे तत्काळ |
तुटे संशयाचें मूळ| येकसरां ||२८||

मार्ग सांपडे सुगम| न लगे साधन दुर्गम |
सायोज्यमुक्तीचें वर्म| ठांइं पडे ||२९||

नासे अज्ञान दुःख भ्रांती| शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती |
ऐसी आहे फळश्रुती| ईये ग्रंथीं ||३०||

योगियांचे परम भाग्य| आंगीं बाणे तें वैराग्य |
चातुर्य कळे यथायोग्य| विवेकेंसहित ||३१||

भ्रांत अवगुणी अवलक्षण| तेंचि होती सुलक्षण |
धूर्त तार्किक विचक्षण| समयो जाणती ||३२||

आळसी तेचि साक्षपी होती| पापी तेचि प्रस्तावती |
निंदक तेचि वंदूं लागती| भक्तिमार्गासी ||३३||

बद्धची होती मुमुक्ष| मूर्ख होती अतिदक्ष |
अभक्तची पावती मोक्ष| भक्तिमार्गें ||३४||

नाना दोष ते नासती| पतित तेचि पावन होती |
प्राणी पावे उत्तम गती| श्रवणमात्रें ||३५||

नाना धोकें देहबुद्धीचे| नाना किंत संदेहाचे |
नाना उद्वेग संसाराचे| नासती श्रवणें ||३६||

ऐसी याची फळश्रुती| श्रवणें चुके अधोगती |
मनास होय विश्रांती| समाधान ||३७||

जयाचा भावार्थ जैसा| तयास लाभ तैसा |
मत्सर धरी जो पुंसा| तयास तेंचि प्राप्त ||३८||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ||१||१. १


आरंभीचे श्रोते प्रश्न विचारतात कीं, "हा ग्रंथ कोणता? त्यात काय सांगितले आहे? आणि त्याचा अभ्यास केल्याने काय फळ मिळेल ? श्री समर्थ उत्तर देतात कीं "या ग्रंथाचे नांव आहे दासबोध. गुरु शिष्य यांच्या संवादरूपाने हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये भक्तीमार्गाचें स्पष्ट विवेचन आहे. 

दासबोधांत काय सांगितले आहे : दासबोधामध्ये नवविधा भक्ती, ब्रह्मज्ञान व वैराग्य यांचे लक्षण सांगितले आहे. ते सांगताना आत्मविद्येच्या अनेक अंगाचे विवेचन जागोजाग केलेले आढळेल.
दासबोधाचें प्रधान प्रमेय : भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यास ईश्वरांचे दर्शन हमखास घडते असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आहे.   

दासबोधांत निसंशयपणे वर्णिलेले विषय : उत्कृष्ट भक्ती कोणती, ज्यास अज्ञानाचा स्पर्श नाही असे शुध्द ज्ञान कोणते, आत्मस्थिती कशी असते याचा निर्णय येथे केला आहे त्याचप्रमाणे शुद्ध उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्ती कशाला म्हणतात, मोक्षप्राप्तीचें लक्षण काय, शुध्द आत्मस्वरूप कसें विदेहीस्थिती कोणती, अलिप्तपणा म्हणजे काय, सर्व देवांचा देव कोणता, उत्तम भक्त कोण, जीव आणि शिव यांचें स्वरूप काय. सर्वोत्तम ब्रह्म कसें, अनेक प्रकारची मतें व मतांतरे कोणतीं, आणि खरा मी कोण - या सर्व विषयांचे स्पष्ट, स्वछ्च, सरळ आणि निसंशय स्वरूप दासबोधात सांगितले आहे.

दासबोधात सांगितलेले आणखी विषय : वर सांगितलेल्या विषयांबरोबरच उपासनेचे मुख्य लक्षण, नाना प्रकारच्या काव्यांची लक्षणे, नाना प्रकारच्या चतुरपणाची लक्षणे शिवाय मायेच्या उत्पत्तीचे लक्षण, पंच महाभूतांची लक्षणे आणि या सृष्टीचा कर्ता कोण व त्यांचे लक्षण कोणते या सर्वांचे नि:संदिग्ध वर्णन दासबोधामध्ये केलें आहे.

दासबोधात अनेक शंकांचे निवारण आहे : अनेक विकल्पांचे व भ्रमांचे म्हणजे चुकीच्या समजुतींचे निवारण येथे केले आहे. अनेक संशय छेदून टाकले आहेत. त्याचप्रमाणे अनेक आक्षेपांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरें दिली आहेत. 

दासबोधाची रचना कशी : अशा पद्धतीचे अनेक विषयांचे विवेचन दासबोधात आले आहे. ग्रंथाच्या अंतरंगामध्ये सांगितलेले सगळेच्या सगळे येथे सुरुवातीस सांगणे शक्य नाही. सबंध दासबोध वीस दशकांत विभागला असून प्रत्येक दशकांत दहा समास आहेत. प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकात सांगितला असल्याने सगळा दासबोध स्पष्ट करून मांडला आहे. दासबोध लिहिण्यास घेतलेले आधार ग्रंथ : दासबोधातील विषयविवेचनास अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत, त्यामध्ये उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि वेद हे आधार महत्वाचे आहेत. परंतु या शास्त्रप्रचीतीबरोबर प्रामुख्याने आत्म्प्रचीतीचाच म्हणजे स्वानुभवाचाच खरा आधार घेतला आहे.
मत्सरी लोकांची टीका : अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला दासबोधातील विषय खोटा किंवा चुकीचा म्हणता येणार नाही, तरी त्यास खोटा व चूक म्हणणारे निघतात हे प्रत्यक्ष अनुभवला येते. मत्सरी माणसे याला खोटे म्हणत असतील, पण तसें म्हणत असता सर्व थोर आधारग्रंथांना  व प्रत्यक्ष भगवंताच्या वचनांना, अर्थात सगळ्या वेदांत ग्रंथांना खोटे मानावे लागेल हे त्यांच्या ध्यानात येत नाही.

आधार ग्रंथाची नामावली : शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत किंवा शारीरभाष्य. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे. प्रथम कोणत्याही विषयाचे स्वरूप विवेकानें निश्चित केले आहे, नंतर त्यास आधार देणारी व बरोबर तसाच अर्थ असणारी भगवंताची वचने घेतलीं आहेत. दासबोधामधील विषयप्रतिपादन भगवंताच्या मतास अनुसरून आहे. भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी क्षुद्र व हीन माणूस असेल असे वाटत नाही.         

क्षुद्र टीकाकारांच्या मनोवृत्तीचे वर्णन : एखाद्या ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचता जो मनुष्य त्याला उगाच नावें ठेवतो तो दुष्टबुद्धीचा असतो. केवळ मत्सराने आपला दुरभिमान, आपली हीन वृत्ती तो प्रगट करतो. दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो, मत्सराने तिरस्कार प्रगट होतो आणि मग त्यातून तीव्र क्रोधाचा विकार पोसला जातो. अशा रीतीने ज्याचे मन विकृत झालें आहे, ज्याच्या अंतर्यामीं कामक्रोध खवळलेले असतात तो केवळ अहंकाराने या नासक्या मन:स्थितीला पोचतो असें जगात प्रत्यक्ष आढळते. कामक्रोधांनी बरबटलेला माणूस चांगला असूचं शकत नाही. उदा राहू वास्तविक अमृत प्याला. तो अमर व्हायला हवे होता. पण कामक्रोधामुळे अमर होण्याऐवजी मारून मात्र गेला.

हा विषय बोलणें आता पुरें. आपल्याला सोसेल, झेपेल तेवढेच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावे, परंतु अहंकार बाजूस सारून ते घ्यावें हे सगळ्यात उत्तम होय. "या ग्रंथात काय सांगितले आहे ?" असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता, त्याचें उत्तर आतापर्यंत थोडक्यात दिले. दासबोधाच्या अभ्यासाने मिळणारे फळ : दासबोधाचा अभ्यास केला तर काय फळ मिळेल ते आता सांगतो. अभ्यास करणऱ्या माणसाचे वागणे एकदम बदलते. त्याचे सारे संशय तत्काळ समूळ नाश पावतात. ईश्वर दर्शनाचा ओप व सुखाचा मार्ग सापडतो. परमार्थ साधण्यासाठी कठीण व कष्टदायक साधनांची जरूर राहात नाही. सायुज्यमुक्तीचे रहस्य सहजपणे हातीं येते. या ग्रथांच्या अभ्यासाचे खरे फळ असें आहे कि, त्याने अज्ञान, दु:ख व खोट्या समजूती समूळ नाहीशा होऊन चटकन ज्ञानप्राप्ती होते. योगी पुरुष वैराग्याला मोठे भाग्य समजतात. ते वैराग्य माणसाच्या अंगी बाणते, तसेच अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारात चातुर्याने व प्रसंग पाहून कसे वागावें तें समजते. भ्रमिष्ट म्हणजे वेड्या व चुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी, दुर्गुणी आणि हीनलक्षणी माणसे उत्तम लक्षणी बनतात. दुसर्याची लबाडी ओळखण्याइतकी धूर्तता अंगी येते. तर्क चालविता येवून सूक्ष्म विचार करतां येतो. तसेच वेळप्रसंग जाणतां येतो. आळशी माणसे उद्योगी बनतात, पापी माणसे पश्चाताप पावून पावन होतात. भक्तिमार्गाची निंदा करणारी माणसे स्वत: आदराने भक्ती करू लागतात.
प्रपंची गुंतलेल्या स्वार्थी माणसांना ईश्वर दर्शनाची इच्छा उत्पन्न होते. बेशिस्त माणसे व्यवस्थित वागू लागतात. नास्तिक माणसे भक्तिमार्गाने चालून मोक्षापर्यंत पोचतात. अभ्यासी माणसाचे अनके दोष नष्ट होतात. अपवित्र माणसे पवित्र होतात. माणसाला उत्तम गती लाभते. "मी देहच आहे" या घट्ट समजुतीने वागनारयाला जीवनांत अनेक कठीण प्रसंग येतात. दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात. तसेच नानाप्रकारच्या संशयांनी निर्माण होणारे भ्रम नाहीसे होतात. संसारातील दु:खाचे व निराशेचे अनेक प्रसंग लोपतात. दासबोधाच्या अभ्यासाचे हे फळ आहे त्याने जीवाची अवंती थांबते. माणसाच्या मनाला खरी विश्रांती व समाधान मिळते. वाचणारयाची जशी वृत्ती तशी त्याला फलप्राप्ती : वर सांगितलेले सगळे खरे आहे परंतु अभ्यास करण्याची मनोवृत्ती जशी असेल तसे फळ त्याला मिळेल. मत्सरवृत्ती व दोषवृत्ती ठेवून ग्रंथ वाचणारयाला तसेच फळ मिळेल हे सांगणे नको !