श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Wednesday, March 30, 2011


||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास आठवा : सख्यभक्ति ||

|| श्रीराम ||

मागां जालें निरूपण| सातवे भक्तीचें लक्षण |
आतां ऐका सावधान| आठवी भक्ती ||||

देवासी परम सख्य करावें| प्रेम प्रीतीनें बांधावें |
आठवे भक्तीचें जाणावें| लक्षण ऐसें ||||

देवास जयाची अत्यंत प्रीती| आपण वर्तावें तेणें रीतीं |
येणें करितां भगवंतीं| सख्य घडे नेमस्त ||||

भक्ति भाव आणी भजन| निरूपण आणी कथाकीर्तन |
प्रेमळ भक्तांचें गायन| आवडे देवा ||||

आपण तैसेंचि वर्तावें| आपणासि तेंच आवडावें |
मनासारिखें होतां स्वभावें| सख्य घडे नेमस्त ||||

देवाच्या सख्यत्वाकारणें| आपलें सौख्य सोडून देणें |
अनन्यभावें जीवें प्राणें| शरीर तेंहि वेंचावें ||||

सांडून आपली संसारवेथा| करित जावी देवाची चिंता |
निरूपण कीर्तन कथा वार्ता| देवाच्याचि सांगाव्या ||||

देवाच्या सख्यत्वासाठीं| पडाव्या जिवलगांसी तुटी |
सर्व अर्पावें सेवटीं | प्राण तोहि वेचावा ||||

आपुलें आवघेंचि जावें| परी देवासी सख्य राहावें |
ऐसी प्रीती जिवें भावें| भगवंतीं लागावी ||||

देव म्हणिजे आपुला प्राण| प्राणासी न करावें निर्वाण |
परम प्रीतीचें लक्षण| तें हें ऐसें असे ||१०||

ऐसें परम सख्य धरितां| देवास लागे भक्ताची चिंता |
पांडव लाखाजोहरीं जळतां| विवरद्वारें काढिले ||११||

देव सख्यत्वें राहे आपणासी| तें तों वर्म आपणाचि पासी |
आपण वचनें बोलावीं जैसीं| तैसीं येती पडसादें ||१२||

आपण असतां अनन्यभावें| देव तत्काळचि पावे |
आपण त्रास घेतां जीवें| देवहि त्रासे ||१३||

श्लोक ||ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम् |
     
जैसें जयाचे भजन| तैसाचि देवहि आपण |
म्हणौन हें आवघें जाण| आपणाचि पासीं ||१४||

आपुल्या मनासारिखें न घडे| तेणें गुणें निष्ठा मोडे |
तरी गोष्टी आपणांकडे| सहजचि आली ||१५||

मेघ चातकावरी वोळेना| तरी चातक पालटेना |
चंद्र वेळेसि उगवेना| तऱ्ही चकोर अनन्य ||१६||

ऐसें असावें सख्यत्व| विवेकें धरावें सत्व |
भगवंतावरील ममत्व| सांडूंचि नये ||१७||

सखा मानावा भगवंत| माता पिता गण गोत |
विद्या लक्ष्मी धन वित्त| सकळ परमात्मा ||१८||

देवावेगळें कोणीं नाहीं| ऐसें बोलती सर्वहि |
परंतु त्यांची निष्ठा कांहीं| तैसीच नसे ||१९||

म्हणौनी ऐसें न करावें| सख्य तरी खरेंचि करावें |
अंतरीं सदृढ धरावें| परमेश्वरासी ||२०||

आपुलिया मनोगताकारणें| देवावरी क्रोधास येणें |
ऐसीं नव्हेत किं लक्षणें| सख्यभक्तीचीं ||२१||

देवाचें जें मनोगत| तेंचि आपुलें उचित |
इच्छेसाठीं भगवंत| अंतरूं नये कीं ||२२||

देवाचे इच्छेनें वर्तावें| देव करील तें मानावें |
मग सहजचि स्वभावें| कृपाळु देव ||२३||

पाहातां देवाचे कृपेसी| मातेची कृपा कायेसी |
माता वधी बाळकासी| विपत्तिकाळीं ||२४||

देवें भक्त कोण वधिला| कधीं देखिला ना ऐकिला |
शरणागतांस देव जाला| वज्रपंजरु ||२५||

देव भक्तांचा कैवारी| देव पतितांसि तारी |
देव होये साहाकारी| अनाथांचा ||२६||

देव अनाथांचा कैपक्षी| नाना संकटांपासून रक्षी |
धांविन्नला अंतरसाक्षी| गजेंद्राकारणें ||२७||

देव कृपेचा सागरु| देव करुणेचा जळधरु |
देवासि भक्तांचा विसरु| पडणार नाहीं ||२८||

देव प्रीती राखों जाणे| देवासी करावें साजणें |
जिवलगें आवघीं पिसुणें| कामा न येती ||२९||

सख्य देवाचें तुटेएना| प्रीति देवाची विटेना |
देव कदा पालटेना| शरणागतांसी ||३०||

म्हणौनि सख्य देवासी करावें| हितगुज तयासी सांगावें |
आठवे भक्तीचें जाणावें| लक्षण ऐसें ||३१||

जैसा देव तैसा गुरु| शास्त्रीं बोलिला हा विचारु |
म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु| सद्गुरूसीं असावा ||३२||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्यभक्तिनाम समास आठवा ||||४. ८


प्रथम सख्यभक्तिची व्याख्या. :
मागील समासांत भक्तिचें वर्णन केलें. आतां आठवी भक्ति लक्ष देऊन ऐका. देवाशी अतिशय मैत्री करावी. स्नेह जोडावा. त्याला अतिशय प्रेमानें, अत्यंत आपलेपणानें बांधून ठेवावे. आठव्या भक्तिचें लक्षण असें आहे.

भगवंताला प्रेमानें वश करण्यास त्याला आवडेल असें वागावें. :
देवाला जें अतिशय आवडतें तेंच आपण करावें, त्याचप्रमाणें आपण वागावें. आपण असें वागलों म्हणजे त्यामुळें अगदी खात्रीनें भगवंताशी सख्य जमून येतें.

भगवंताला काय आवडतें तें ऐका. :
भक्ति, भाव, भजन, निरुपण, कथाकिर्तन आणि प्रेमळ भक्तांचें गायन भगवंताला आवडतें. देहावरील आसक्ति सुटून ती भगवंतावर स्थिर झाली कीं भक्ति जन्मास आली. भगवंताच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत निःसंदेह बनणें म्हणजे भाव संपादणें होय. जी वस्तु आहे, संपूर्ण खरी आहे, ती आपल्यापाशी असावी असें मनापासून वाटतें. याला राग किंवा आवड म्हणतात आणि राग स्थिर झाला कीं अनुराग निर्माण होतो. ती वस्तु प्रिय बनते, मिळाल्याखेरीज चैन पडत नाहीं, ती मिळविण्याचे मार्ग शोधायला प्रवृत्ती होते. याचें नांव अनुराग. भाव म्हणजे मिटलेलें कमळ तर अनुराग म्हणजे संपूर्ण उमललेंले कमळ समजावें. भगवंताचें स्मरण करुन त्याचा रस पुनःपुनः घेणें याचें नांव भजन. भजन अनेक प्रकारे होऊं शकतें. माळ घेऊन जप करणें, स्तोत्रें म्हणणें, भगवंताचें चरित्र वाचणें, त्याचें ग्रंथ वाचणें, त्याची पूजा करणें, त्याला वारंवार वंदन करणे, त्याची सेवा करणें. त्याची पदें म्हणणें, हे सगळे भजनानेच प्रकार आहेत. भगवंताच्या सगुण व निर्गुण स्वरुपाची बुध्दिप्रधान चर्चा, विवेचन किंवा प्रतिपादन म्हणजे निरुपण होय. माणूस कथाप्रिय असल्यानें भगवंताच्या नामापेक्षां त्याच्या कथाकीर्तनामध्यें तो चटकन तल्लीन होतो. कथेमध्यें विनासायास सत्संग मिळतो आणि श्रवणानें मन लवकर रसानें उद्दीपित होते. भगवंताच्या कथेनें अंत:करण निर्मळ होते व भगवंताच्या प्रेमांत आपोआप गुंतायला लागतें. आंतमध्यें नामस्मरण आणि बाहेर कथाकीर्तन हेंच तर मुळीं भक्ताच्या जीवनाचें सार असतें. भक्ताचें प्रेम उचंबळून आलें कीं कविता किंवा संगीत या रुपानेंच तें बाहेर पडतें. अर्थात भक्ताला काय व भगवंताला काय नुसती कविता किंवा नुसते संगित प्रिय नाहीं. त्यामागें असणारें भक्ताच्या हृदयांतील भगवंताचें प्रेम त्याला आवडतें. या सर्व गोष्टी भगवंताला आवडतात.

देवाला जें आवडतें तें आपल्याला आवडूं लागलें कीं देवाशी सख्य जडलें. :
देवाला जें आवडतें. तेंच आपल्याला देखील आवडावें तें आपल्याला आवडूं लागेल असेच आपण वागावें. कारण भगवंताच्या मनासारखें आपण वागूं लागलों म्हणजे आपोआप पण निश्चितपणें त्याच्याशी आपलें सख्य घडतें. परमात्मा सगुणामध्यें उतरला कीं त्याला माणसाचे गुणधर्म लागूं पडतात. त्यामूळें भक्ताला त्याच्याशी संबंध जोडण्यास सुलभ जातें. मानवतेचा उपयोग करुन भगवंताचे वाटचाल करायला शिकविणें हाच भक्तिमार्गाचा मोठा विशेष आहे.

देहसुखाचा निरास आणि अनन्यता यांनीं सख्य जडतें. :
भगवंताशी सख्य जडावें म्हणून आपण आपलें देहसुख सोडून द्यावें. इतकेंच नव्हे तर प्रसंग पडला असतां अगदी मनापासून आपलें शरीरसुध्दां भगवंतासाठीं खर्ची घालण्यास तयार असावें. देव माझ्या सुखासाठीं आहे असा दृष्टिकोन असणें ही स्वार्थबुध्दि होय. ही सुटल्याखेरीज भगवंताशी सख्य जडणें शक्य नसतें. म्हणून मी देवासाठी आहे असा दृष्टीकोन येणें हें भक्तांचें खरें लक्षण समजावें.

भक्ताचें मन भगवंताने भरुन जातें. म्हणून येतांजातां, उठतांबसतां तो भगवंताबद्दलच बोलत राहतो. :
आपल्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सारुन भक्त भगवंताचेच चिंतन सारखें करतो. देवाची कीर्ति कशी वाढेल हीच काळजी त्याला असते. यामुळें बोलणें, चालणें, गप्पा, गोष्टी, तात्विक चर्चा, या सगळ्या देवाभोवतीं केंद्रित करुन तो बोलतो. हीच भक्तीची एकाग्रता होय. योगाच्या एकाग्रतेमध्यें एका वस्तुवर मन केंद्रित होऊन बाकीच्या सगळ्याचा विसर पडतो तर भक्तिच्या एकाग्रतेमध्यें जीवाच्या सर्व शक्ति भगवंताच्या मार्गानें वाहूं लागतात. त्यामुळें चालतां बोलतां व्यवहार करतां भक्ताचें चित्त भगवंतापासून ढळत नाही.

याल तर तुमच्यासह पण न याल तर तुमच्याविना मी भगवंताच्या मार्गांत राहणार असा भक्ताचा निश्चय असतो. म्हणून एकदा भगवंताला आपला म्हटला कीं मग वाटेल तें झालें तरी तो परतीचा विचार करीत नाहीं :
देवाशी सख्य जोडण्यासाठीं अगदी निकटच्या व जिव्हाळ्याच्या नातेवाईकाची ताटातूट करावी लागली तरी ती करावी. खरें म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करावें, इतकेंच काय पण अखेर त्याच्यासाठीं प्राण सुध्दां देण्यास तयार असावें. हातचें राखून देवावर प्रेम करतां येत नसतें. त्याच्याजवळ लबाडी खपत नाहीं, स्वार्थ चालत नाहीं, थोडे थोडें देऊन भागत नाहीं. प्राण पणाला लावून त्याला आळविलें तर त्याच्याइतका सुलभसाध्य कोणी नाहिं. आपण आल्प जीव ! आपलें आपलें असें या जगांत कितीसें असतें, तें सगळें त्याच्या सख्यासाठीं सोडायची तयारी हवी. सोडायलाच पाहिजे असें नाहीं. किंबहुना प्रंसग पण येत नाहीं. देवाशी आपलें सख्य राहावें यासाठीं आपलें म्हणून जें काहीं या जगांत आहे तें सगळें सोडण्याची तयारी असावी. असें अगदी जीवाभावाचें प्रेम भगवंतावर जडावें. एका दृष्टीनें प्रेम नाजुक असतें. रसमय असतें, पण दुसर्‍या दृष्टीनें मोठें त्यागमय असतें. जीवाला खेंचणारें असतें. यामुळें भगवंतावर खरें प्रेम जडलें कीं माणसाची मूल्यकल्पना बदलूनच जाते.

आपल्याला आपल्या प्राणापेक्षां प्रिय वस्तु जगांत नाहीं. त्या प्राणाला जसें आपण जपतो तसें भगवंताला जपावें. :
देव म्हणजे जणूं काय आपला प्राण समजावा. देव आपल्याला प्राणासारखा प्रिय असावा. आपल्या प्राणाला धक्का लागूं नये, आपला प्राणनाश होऊं नये म्हणून आपण त्यास अहोरात्र जपतो. असदी तसे भगवंताला चोवीस तास आपलेपणानें जपावें. सर्वोत्तम प्रेमाचें लक्षण हें असें आहे. आपल्याला जी वस्तु अत्यंत आवडतें, जिच्यावर आपलें अत्यंत प्रेम असतें, तिला आपण ‘ प्राणप्रिय ’ हें विशेषण लावतो. प्राणप्रिय म्हणजे प्राणासारखी प्रिय, प्राणाइतकी प्रिय, प्राणाहून प्रिय. भक्तांचें भगवंतावरील प्रेम हळूंहळूं इतकें वाढतें कीं भक्ताचा प्राण भगवंतमय होतो आणि भगवंत प्राणमय बनतो. अशी अवस्था झाल्यावर मग आपल्या हृदयामध्यें प्राण आहे कां भगवंत हें त्याचें त्यालाच कळेनासें होते. श्री समर्थांनीं वर्णन केलेले परम प्रेमाचें लक्षण असें असूंन प्रेमाची परिणतावस्था देखील हीच होय. वेदांतांतील ब्रह्म जसें मन आणि वाणी यांच्या कक्षेपलीकडे आए, परम प्रेम सुध्दां तसेंच अनिर्वचनीय आहे असें प्रेमपारंगत आचार्य सांगतात. परंतु या समासांत अति थोडक्यात केलेलें पवित्र प्रेमाचे सत्य, सूक्ष्म, सरळ रसमय आणि सुंदर वर्णन वाचून मन भारावून जातें. असें खरोखर मनांत येतें कीं सर्वसंगपरित्याग करुन भगवें धारण केलेल्या सज्जनगडाच्या या एकांतप्रिय वेदांती संन्याश्याकडून संसारातील व साहित्यातील प्रेमिकांनी शुध्द प्रेमाचे धडे घ्यायला हरकत नाही.

देवाला भक्ताची चिंता लागते. :
देवावर असें अत्यंत उत्कट प्रेम करुन त्याच्याशी सख्य जोडलें तर देवाला त्या भक्ताची काळजी लागते. उदा. पांडवांनीं भगवंतावर खरें प्रेम केलें. पांडवांना लाखेच्या घरांत जाळून भस्म करण्याचा कौरवांनीं प्रयत्न केला. पण भगवंताला त्यांची काळजी होती. त्यानें पांडवांना भुयाराच्या वाटेनें सुरक्षित बाहेर काढले.
आपण जितकें शुध्द प्रेम भगवंतावर करुं तितकेंच शुध्द प्रेम तो आपल्यावर करतो. आपण निष्ठेनें त्याच्याशी अनन्य राहिलो तर तोहि तसाच आपल्याशी अनन्य राहतो. म्हणून कांहीं झालें तरी त्याच्यावरील आपलेपणा कमी होऊं देऊं नये. आपण जे शब्द बोलतो अगदी तेच शब्दप्रतिध्वनी रुपानें आपण ऐकतो. त्याचप्रमाणें देवाचें सख्यपण आपल्याशी टिकून राहण्याचें रहस्य आपल्याच हातीं आहे.

आपला भाव जर अनन्य असेल, म्हणजे आपल्याला खरोखरच भगवंताखेरीज इतर आधार नसेल, आपलें सर्वस्व तोच असेल तर भगवंत देखील हांक मारल्याबरोबर ताबडतोब मदतीला धांवून येईल. पण आपण जर त्याला विटलों, त्याचा कंटाळा म्हणजे त्याच्याबद्दलची आपली आवड कमी झाली कीं लगेच देवदेखील आपल्याला विटतो, आपला कंटाळा करतो, आपल्या हांकेला ओ देत नाहीं. श्लोकार्थ : जे लोक मला ज्याप्रकारें भजतात त्याचप्रकारें मी त्याला भजतो, त्यांच्यावर अनुग्रह करतो. जशी भावना ठेवून आपण भगवंतावर प्रेम करूं तशाच भावनेनें भगवंत आपल्याला पावतो. म्हणून हें सगळें आपल्यापाशीच आहे हें विसरुं नये. जगाला एकवेळ फसवितां येईल पण भगवंत आपल्या अंतर्यामीं असल्यानें त्याला फसविणें शक्यच नाहीं. म्हणून आपला भाव जितका मलरहित होत जाईल तितका भगवंत अधिक सन्निधपणें वागत जाईल. समजा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणें घडून आली नाहीं आणि त्यामुळें भगवंतावरील आपलें ममत्व, प्रेम किंवा आपली श्रध्दा विचलीत झाली, तर भगवंताचें आपल्यावरील ममत्व, प्रेम किंवा आपली श्रध्दा विचलित झाली, तर भगवंताचें आपल्यावरील ममत्व लगेच लटकें पडतें. पण याला कारण आपणच असतो हें उघड आहे.

उदाहरणार्थ :- चातक आणि चकोर पहा. चातक मेघाचेंच पाणी पितो. समजा मेघानें कृपा करुन वृष्टि केली नाहीं तर चातकाची तहान शमत नाहीं. परंतु कांहीं झालें तरी चातकाचें मेघावरील ममत्व मुळींच कमी होत नाहीं. तसेंच चकोर केवळ ज्योत्स्नापान करुन जगतो, फक्त चंद्रकिरणें सेवन करुन राहतो. समजा चकोराला भूक लागली आहे आणि चंद्रमा कांहीं वेळेवर उगवला नाहीं, तर तो तसा भुकेलेला राहतो. कांहीं झालें तरी त्याचें चंद्रावरील ममत्व यत्किंचितही कमी होत नाहीं. सख्यत्व असावें तर असें. प्रेम, ममत्व, आपलेपण असावें तर असें. भगवंताचें सख्य मोठ्या विवेकांने घट्ट धरुन ठेवावें, स्थिरपणें  सांभाळावें. कांहीही झालें तरी, वाटेल तो प्रसंग तरी भगवंतावरील आपलेपणा सोडूं नये.

भगवंताला अंतर्यांमीं अगदी घट्टपणें घरावें, त्याला सर्व व सर्वस्व मानावें. :
भगवंताशी सख्यपणाचा संबंध जोडावा. आईबाप, गणगोत, विद्या, लक्ष्मी, पैसाअडका, ऐश्वर्य, सकळ कांहिं आपला भगवंत आहे ही खरी खरी भावना ठेवावी. याचा अर्थ असा कीं मानवीजीवन संबंधमय असतें. माणसाला ज्या ज्या व्यक्तीशी आणि वस्तूशी संबंध येतो त्या त्या व्यक्तीवर आणि वस्तुवर त्याचें ममत्व, प्रेम, आपलेपण वाटलें जातें. त्यांतून उरलेलें भगवंताच्या वाट्यांस येतें. श्री समर्थ आवर्जून सांगतात कीं ज्याला भगवंताच्या सख्याचा आनंद लुटायला आहे त्यानें इतर सर्व ठिकाणचें प्रेम गोळा करून तें सगळे लोक बोलतात. पण ती नुसती भाषापध्दति असते. कारण त्यांची निष्ठा कांहीं तशी नसते. संतानीं आम जनतेला परमार्थ खुला केला हे त्यांचे जनतेवर मोठें उपकार आहेत, हें खरें. पण त्यामुळेंच परमार्थाच्या दुधांत प्रपंचाचें पाणी इतकें मिसळलें कीं ते धड दूधही राहिलें नाहीं व पाणीही उरलें नाहीं परमार्थाच्या भाषेच्या आवरणाखाली लोक शुध्द प्रपंचच करुं लागले परमार्थ हा प्रपंचाचें एक साधनच होऊन बसला.

म्हणून श्री समर्थ स्पष्टपणें ही गोष्ट नजरेस आणीत आहेत :
या कारणासाठीं माणसानें असें करू नये. भगवंताशी जें सख्य करायचें तें अगदी मनापासून करावें, अगदी ख्ररें खरें करावें. भगवंताला आपल्या अंतर्यामी आपण अगदी घट्ट धरुन ठेवावें. आपण मनांत धरलेला एखादा हेतु आपल्या मनाप्रमाणें सिध्दीस गेला नाहीं तर देवावर रागावणें, नाराज होणें हें कांहीं सख्य भक्तिचें लक्षण नव्हे. जों असें करतो त्याच्या जीवनांत भगवंताला वासनापूर्तीचं साधन म्हणून एक स्थान असतें. भगवंताविषयीं ही अगदी हीन कल्पना होय.

भगवंताला शरण जाण्यांत भक्तीचें खरें मर्म सांठविलें आहे. त्याच्या इच्छेमध्यें आपली इच्छा विलीन करण्यांत शरणागतीची गुरुकिल्ली आहे. :
देवाच्या इच्छेनें जें घडून येईल तेंच आपल्याला योग्य आहे असें ओळखून आपण समाधानांत राहावें. आपल्या इच्छेचा आग्रह धरुन भगवंताहून दूर होऊं नयें. आपण देवाच्या इच्छेनें वागावें. देव जें घड्वून आणील तें मनापासून आवडून घ्यावें. जर आपली मनोवृत्ती अशी बनली तर मग साहजिकच भगवंत आपल्यावर कृपा करतो. हें तत्व फारच अर्थगंभीर आहे. ब्रह्मज्ञानी तसेंच तत्वज्ञानी पुरुष असें सांगतात कीं जगतांतील सर्व जीवांना जगदीश्वर स्वत:कडे खेचीत आहे. प्रत्येकाच्या जीवनांत घडणार्‍या घटनांची दिशा भगवंताकडे असते. माणूस जर जीवनप्रवाहांत बिनतक्रार वाहात जाईल तर तो विनाश्रम त्याच्यावर देव कृपा करतो. म्हणजे त्यांच्या जीवनांत अनंत भगवंताची सत्ता उघडपणें अनुभवास येऊं लागते. शरणागतीची ही युक्ति ज्याला साधले त्याच्या जीवनांत अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. या कांहीं पुस्तकांमधील कल्पना नाहींत तर भक्तांच्या अनुभवाच्या सत्यकथा आहेत.

आतां देव कृपा कशी करतो याचीं उदाहरणें देतात. :
भगवंत तर कृपेचा महासागर आहे. त्याच्या कृपेने तुलनेनें आईची कृपा अगदी क्षुल्लक आहे. मोठें संकट आलें असतां मुलाचा जीव घेण्यास आई तयार होते.

पण शरण आलेल्या भक्ताला देवानें ठार मारले असें आजपर्यंत कोणी पाहिलें नाहीं किंवा ऐकिलें नाहीं. उलट जो देवास शरण जातो त्याला देव सर्व प्रकारच्या संकटातून सांभाळून नेतो. देव भक्तांचा कैवारी म्हणजे कृपापक्षपाती असतो. देव पापी लोकांना पापमुक्त करतो. देव अनाथांचा हरप्रकारें सहाय्यकर्ता बनतो. देव अनाथांचा पक्षपाती असतो म्हणून अनेक प्रकारच्या संकटामधून त्यांचें रक्षण करतो. उदा. भक्ताच्या मनांतील भाव बरोबर ओळखणारा भगवंत गजेद्रासाठीं धावून गेला नाहीं काय ! येथें अनाथ म्हणजे शरणागत असाच अर्थ आहे. जगाच्या मदतीची आस सोडून जो अत्यंत दीनपणें भगवंताकडे वळतो तो खरा अनाथ व तोच खरा शरणागत होय. अशा दीनासाठीं भगवंत पक्षपात करुन धांवत येतो.

देव कृपासिंधु आहेच. पण प्रेमसंपादन कलेमध्यें देवाइतका प्रवीण कोणीं नाहीं. म्हणून देवावर अत्यंत प्रेम करावें. :   
देव कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्तांचा विसर कधीच पडत नाहीं. बरोबरच आहें. जितकी स्मृती भक्ताला भगवंताची तितकीच स्मृती भगवंताला भक्ताची हा येथील नियम आहें. भक्ताला भगवंताची केव्हांही विस्मृति होत नाहीं. म्हणून भगवंताला पण भक्ताचा कधीच विसर पडत नाहीं.

आपल्या भक्ताचें प्रेम कसें राखावें, त्याला प्रेमांकित कसा करुन ठेवावा, त्याच्या प्रेमाला जपून वाढीला कसें लावावें हे सगळें देव बरोबर जाणतो, म्हणून देवाशी सख्य जोडावें. आपले निकट नातेवाईक सगळे स्वार्थी असतात. खर्‍या प्रसंगीं ते आपल्या उपयोगी पडत नाहींत. देवाशी एकदां कां सख्य जोडलें कीं मग तें तुटत नाहीं. देवाचे प्रेम एकदां कां लागलें की मग तें कमी होत नाहीं उलट ते वाढतच जातें. भगवंताला जे शरण जातात त्यांच्या बाबतींत भगवंत निरंतर एकरुप राहतो, सदासर्वकाळ त्याचा कैवार घेतो. कारखान्यामध्यें मोठाली चक्रें फिरत असतात. एखाद्या चक्रामध्यें माणसाच्या वस्त्राचें टोंक जरी अडकलें तरी संबंध माणूस चक्रामध्यें खेंचला जातो. त्याचप्रमाणें एकदां कां भगवंताच्या प्रेमाची चटक लागली कीं तें सारखें वाढतच जातें. इतकें कीं अखेर जीवाला सर्व बाजूंनीं व्यापून टाकतें. दिन दिन बढत सदायो ” (अर्थ) - दिवसेंदिवस तें प्रेम सवापटीनें वाढत चाललें आहे. असा कृष्णानुरागिणी मीराबाईनें भगवत प्रेमाच्या बाबतींतील आपला अनुभव सांगून ठेवला आहे.

अखेर या अप्रतिम समासाचा समारोप करतांना श्री समर्थ सांगतात कीं आपल्या अगदी अंतरीच्या गोष्टी भगवंताजवळ सांगाव्या. असें सख्य करावें. हें सख्य जसें भगवंताशी तसेंच सदगुरुशी असावें. :
म्हणून देवाशी खरें सख्य जोडावें आपल्या जीवाभावाच्या गुप्त गोष्टी भगवंतापाशीच सांगाव्या. आठव्या भक्तीचें लक्षण हें असें आहे. जसा देव तसाच सदगुरु असें शास्त्रांत सांगून ठेवलें आहे. म्हणून ज्या रीतीनें भगवंताशी सख्य जोडायचें त्याच रीतीनें सदगुरुशी देखील सख्य जोडावें.

श्रीराम समर्थ !!!