श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Wednesday, January 12, 2011

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास सहावा : तमोगुण लक्षण ||



||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास सहावा : तमोगुण लक्षण || 
  
||श्रीराम ||
  
मागां बोलिला रजोगुण| क्रियेसहित लक्षण |
आतां ऐका तमोगुण| तोहि सांगिजेल ||१||
  
संसारीं दुःखसंमंध| प्राप्त होतां उठे खेद |
कां अद्भुत आला क्रोध| तो तमोगुण ||२||

शेरीरीं क्रोध भरतां| नोळखे माता पिता |
बंधु बहिण कांता| ताडी, तो तमोगुण ||३||
  
दुसर्‍याचा प्राण घ्यावा| आपला आपण स्वयें द्यावा |
विसरवी जीवभावा| तो तमोगुण ||४||
  
भरलें क्रोधाचें काविरें| पिश्याच्यापरी वावरे |
नाना उपायें नावरे| तो तमोगुण ||५||
  
आपला आपण शस्त्रपात| पराचा करी घात |
ऐसा समय वर्तत| तो तमोगुण ||६||
  
डोळा युध्यचि पाहवें| रण पडिलें तेथें जावें |
ऐसें घेतलें जीवें| तो तमोगुण ||७||
  
अखंड भ्रांती पडे| केला निश्चय विघडे |
अत्यंत निद्रा आवडे| तो तमोगुण ||८||
  
क्षुधा जयाची वाड| नेणे कडु अथवा गोड |
अत्यंत जो कां मूढ| तो तमोगुण ||९||
  
प्रीतिपात्र गेलें मरणें| तयालागीं जीव देणें |
स्वयें आत्महत्या करणें| तो तमोगुण ||१०||
  
किडा मुंगी आणी स्वापद| यांचा करूं आवडे वध |
अत्यंत जो कृपामंद| तो तमोगुण ||११||
  
स्त्रीहत्या बाळहत्या| द्रव्यालागीं ब्रह्मत्या |
करूं आवडे गोहत्या| तो तमोगुण ||१२||
  
विसळाचेनि नेटें| वीष घ्यावेंसें वाटे |
परवध मनीं उठे| तो तमोगुण ||१३||
  
अंतरीं धरूनि कपट| पराचें करी तळपट |
सदा मस्त सदा उद्धट| तो तमोगुण ||१४||
  
कळह व्हावा ऐसें वाटे| झोंबी घ्यावी ऐसें उठे |
अन्तरी द्वेष प्रगटे| तो तमोगुण ||१५||
  
युध्य देखावें ऐकावें| स्वयें युध्यचि करावें |
मारावें कीं मरावें| तो तमोगुण ||१६||
  
मत्सरें भक्ति मोडावी| देवाळयें विघडावीं |
फळतीं झाडें तोडावीं| तो तमोगुण ||१७||
  
सत्कर्में ते नावडती| नाना दोष ते आवडती |
पापभय नाहीं चित्ती| तो तमोगुण ||१८||

ब्रह्मवृत्तीचा उछेद| जीवमात्रास देणें खेद |
करूं आवडे अप्रमाद| तो तमोगुण ||१९||
  
आग्नप्रळये शस्त्रप्रळये| भूतप्रळये वीषप्रळये |
मत्सरें करीं जीवक्षये| तो तमोगुण ||२०||
  
परपीडेचा संतोष| निष्ठुरपणाचा हव्यास |
संसाराचा नये त्रास| तो तमोगुण ||२१||
  
भांडण लाऊन द्यावें| स्वयें कौतुक पाहावें |
कुबुद्धि घेतली जीवें| तो तमोगुण ||२२||
  
प्राप्त जालियां संपत्ती| जीवांस करी यातायाती |
कळवळा नये चित्तीं| तो तमोगुण ||२३||
  
नावडे भक्ति नावडे भाव| नावडे तीर्थ नावडे देव |
वेदशास्त्र नलगे सर्व| तो तमोगुण ||२४||
  
स्नानसंध्या नेम नसे| स्वधर्मीं भ्रष्टला दिसे |
अकर्तव्य करीतसे| तो तमोगुण ||२५||
  
जेष्ठ बंधु बाप माये| त्यांचीं वचनें न साहे |
सीघ्रकोपी निघोन जाये| तो तमोगुण ||२६||
  
उगेंचि खावें उगेंचि असावें| स्तब्ध होऊन बैसावें |
कांहींच स्मरेना स्वभावें| तो तमोगुण ||२७||
  
चेटकविद्येचा अभ्यास| शस्त्रविद्येचा हव्यास |
मल्लविद्या व्हावी ज्यास| तो तमोगुण ||२८||
  
केले गळाचे नवस| रडिबेडीचे सायास |
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस| तो तमोगुण ||२९||
  
मस्तकीं भदें जाळावें| पोतें आंग हुरपळावें |
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें| तो तमोगुण ||३०||
  
देवास सिर वाहावें| कां तें आंग समर्पावें |
पडणीवरून घालून घ्यावे| तो तमोगुण ||३१||
  
निग्रह करून धरणें| कां तें टांगून घेणें |
देवद्वारीं जीव देणें| तो तमोगुण ||३२||
  
निराहार उपोषण| पंचाग्नी धूम्रपान |
आपणास घ्यावें पुरून| तो तमोगुण ||३३||
  
सकाम जें का अनुष्ठान| कां तें वायोनिरोधन |
अथवा राहावें पडोन| तो तमोगुण ||३४||
  
नखें केश वाढवावे| हस्तचि वर्ते करावे |
अथवा वाग्सुंन्य व्हावें| तो तमोगुण ||३५||
  
नाना निग्रहें पिडावें| देहदुःखें चर्फडावें |
क्रोधें देवांस फोडावें| तो तमोगुण ||३६||
  
देवाची जो निंदा करी| तो आशाबद्धि अघोरी |
जो संतसंग न धरी| तो तमोगुण ||३७||
  
ऐसा हा तमोगुण| सांगतां जो असाधारण |
परी त्यागार्थ निरूपण| कांहीं येक ||३८||

ऐसें वर्ते तो तमोगुण| परी हा पतनास कारण |
मोक्षप्राप्तीचें लक्षण| नव्हे येणें ||३९||

केल्या कर्माचें फळ| प्राप्त होईल सकळ |
जन्म दुःखाचें मूळ| तुटेना कीं ||४०||

व्हावया जन्माचें खंडण| पाहिजे तो सत्वगुण |
तेंचि असे निरुपण| पुढिले समासीं ||४१||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तमोगुणलक्षणनाम समास सहावा ||६||२. ६ 


अनावर क्रोधाचे वर्णन :
मागच्या समासांत रजोगुण प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा प्रगट होतो हें दाखवून त्याची लक्षणें सांगितलीं. आतां तमोगुण सांगतों  तो ऐका. संसारात दु:ख भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे मनांत जो उव्देग उत्पन होतो, किंवा परमावधीचा क्रोध आला म्हणजे तो तमोगुण होय. अंगांत एकदा कां क्रोध भरला म्हणजे मग तो आई, बाप कोणी ओळखत नाहीं, भाऊ, बहिण, बायको यांना बडवितो  तो तमोगुण. रागाच्या भरांत दुसर्या्चा प्राण घ्यावा किंवा आपण आपला प्राण घ्यावा  असें वाटतें, आपल्या जीवाचा विचार विसरतो, तो तमोगुण होय. क्रोधाचें वारें अंगांत शिरून एकदा कां तो बेफाम झाला कीं मग तो एखद्या पिशाच्यासारखा वागतो, किती उपाय केले तरी तो आवरत नाहीं, तो तमोगुण होय.

तमोगुणी माणसाला संघर्षाची भारी त्याचें खाणेपिणे सगळेच अचाट  असतें :
आवड असते, आपण आपल्यासारख्या शस्त्र चालवून जखम करतो किंवा दुसर्यानवर शस्त्र चालवून त्याचा घात करतो, असा प्रसंग येतो तेव्हां तो तमोगुण होय. डोळ्यांनी प्रत्यक्ष लढाई बघावी, युद्ध चालूं असतांना रणांगणावर जावें, असें मनापासून वाटतें, तो तमोगुण होय. ज्याच्या मनांत नेहमी गोंधळ, घोटाळा व संशय असतो, ज्याचा निश्चय सारखा बदलतो, ज्याला झोंप अतिशय आवडते, तो तमोगुण होय. ज्याची भूक अतिशय मोठी असतें, भूकेपुढे ज्याला कडू गोड समजत नाहीं, जो फार मूर्ख असतो तो तमोगुण होय. अत्यंत प्रेमाचें आपलें माणूस मरून गेलें तर त्याच्यासाठीं जो जीव देतो, किंवा जो स्वेच्चेने आत्महत्या करतो, तो तमोगुण होय. किडे, मुंग्या व जनावरे यांना ठार मारण्याची आवड असणें, तसेंच अत्यंत निदय असणें तो तमोगुण होय. स्रिया व मुलें  यांचा वध करणें, पैशासाठी ब्राम्हणवध करणें, गाई ठार मारण्याची आवड असणें, तो  तमोगुण होय.

विषसेवनाची व मारामारीची आवड, द्वेषाने दुसर्‍याचा कांटा काढणे, पापाचें भय नसणें, हीं व अशी तमोगुणाची चिन्हें आहेत :
विष खाण्याचे व्यसन ज्याला आहे अशा माणसाच्या आग्रहानें ज्याला विषसेवन करावेसें वाटते, परंतु दुसर्याखला  मारून टाकावें असें मनांत येतें, तो तमोगुण होय. मनामध्ये दृष्टबुद्धी धरून जो दुसर्यासचे कमालीचे नुकसान करतो, जो सदैव उन्मत आणि उर्मट असतो, तो तमोगुण होय, कोठें तरी भांडणतंटा व्हावा असें ज्याला वाटतें, धक्काबुक्की करावी अशी इच्छा ज्याला होते, ज्याच्या मनांत द्वेष पेट घेतो,तो तमोगुण होय.लढाई स्वतः पहावी किंवा लढाईच्या गोष्टी ऐकाव्या किंवा स्वतः लढाई करावी, शत्रूला मारावें तरी नाहींतर स्वतः मरावें असें ज्याला वाटतें, तो तमोगुण होय. जो भक्ती करतो त्याच्या मत्सराने भक्तीमध्ये विघ्नें घालून ती मोडावी असें वाटणें, देवालयें पाडावी असें वाटणें, चांगली फळें धरणारी झाडें तोडावी असें वाटणें तो तमोगुण होय. ज्याला सत्कर्मे आवडत नाहींत, नाना तर्‍हेचे चे दोष मात्र आवडतात, ज्याच्या  मनांत पापाचें भय नसतें, तो तमोगुण होय

लोकांना पीडा देणें, निर्दयपणे वागणें, भ्रष्टाचार करणें या गोष्टी तमोगुणी माणसाला सहज असतात :
ब्राह्मणास दिलेली वतने, वर्पासनें, निर्वाहाची साधनें जो नष्ट करतो, प्राणीमात्रांना उगीच दुःख देतो, ज्याला मुद्दाम मोठ्या चुका करण्याची आवड असते,तो तमोगुण होय जो आगी लावतो, शास्त्रांनी मारतो, पिशाच्चबाधा करून देतो, विष खायला घालतो आणि मत्सराने जीव घेतो तो तमोगुण होय. दुसर्याणच्या दुःखाने जो संताप पावतो, निर्दयपणे वागण्याची ज्याला हौस आहे, जो प्रपंचाला त्रासत नाहीं तो तमोगुण होय.लोकांत भांडण लावून द्यावें आणि आपण त्याची मजा पहावी अशी दुष्टबुद्धी ज्याच्या अंतर्याुमी असते तो तमोगुण होय. पुष्कळ पैसा मिळून श्रीमंती आल्यावर सुद्धां जो जीवाला उगीच कष्ट देतो, ज्याला दुसर्यातबद्दल दया येत नाहीं, ती तमोगुण होय. ज्याला भक्ती,भाव, तीर्थ व देव मुळींच आवडत नाहीं, वेद, शास्त्र, वगैरे कांही ज्याला मुळींच नको, तो तमोगुण होय. स्नानसंध्या, वगैरे कांहीही नेम ज्याला नसतो, आचारधर्म न पाळल्याने जो केवळ भ्रष्ट दिसतो, इतकेंच नव्हे तर जें करायला नको तेंच जो करतो तो तमोगुण होय.

वडील बंधु, आई, बाप यांचें बोलणें ज्याला सहन होत नाहीं, त्यांच्या बोलण्यानें एकदम संतापून जो घरांतून निघून जातो तो तमोगुण होय. कांही काम न करितां खावें, आळशीपणानें असावें, उगीच एके ठिकाणीं बसून राहावें, असें ज्याला वाटतें आणि ज्याला कशाचेंच स्मरण नाहीं तो तमोगुण होय.

तमोगुणी लोक जेव्हां देवाचें कांही करतात त्वहं ते किती अघोरीपणानें तें करतात यांचे सुंदर वर्णन : 
जारण मरण उच्चाटन या चेटकीविद्येचा अभयस करावासा वाटतो, शस्त्रविद्या शिकण्याची हौस असते, मल्लविद्या याविशी वाटते तो तमोगुण होय. मानेला गळ अडकवून लोंबकळण्याचा नवस करणे, धगधगीत आगींतून चालण्याचें कष्ट सोसणें, लाकडी यंत्रानें, त्रिशुलानें जीभ टोचून घेणें हें प्रकार तमोगुण होय. डोक्यावर खापर ठेवून त्यांत निखारे जाळावें, पेटलेल्या काकडयानें अंगाला चटके द्यावे, किंवा आपण स्वत: शरीराला शस्त्र टोंचून ठेवावें असें वाटणे तो तमोगुण होय. आपलें डोकें कापून तें देवाला वाहावें, किंवा एखादें अंग, अवयव तोडून देवाला अर्पण करावा, किंवा आपणहून आपला कडेलोट करून घ्यावा असें वाटणें तो तमोगुण होय. हट्टानें देवापुढें धरणें धरणें, देहाला टांगून घेणें, देवाच्या दारांत जीव देणें, हें सर्व तमोगुण होय. जो फळें खून किंवा पाणी पिऊन राहतो, किंवा कडकडीत उपवास करतो, पंचाग्नीसाधन करतो म्हणजे आपण मध्यें बसून चार बाजूस पेटलेली अग्नीची कुंडें आणि डोक्यावर तळपणारा सूर्य अशा पांच अग्नीमध्यें बसून जप करतो, धुम्रपान साधन करतो म्हणजे आपण स्वत:ला उलटें टांगून घेतो व खाली जमिनीवर पेटविलेल्या अग्नीचा धूर नाकातोंडात ओढतो, किंवा जो स्वत:ला पुरून घेतो तो तमोगुण होय. मनांत एखाद्या वस्तूची वासना ठेवून अनुष्ठान करणें, उगीच नुसता प्राणायाम करणे, किंवा अहोरात्र जमिनीवर पडून राहणें, हें सर्व तमोगुण होय.     

नखें व केस वाढवायचें, हात कायमचा वर करून ठेवायचा, बोलणें कायमचे बंद करायचें हे सर्व तमोगुण होय. नाना प्रकारच्या क्रियांनी देहाला पीडा देणें, पण देहाला दु:ख झालें कीं मनात चरफडणें, रागानें देवाला फोडून टाकणें हे सर्व तमोगुण होय. जो माणूस देवांची निंदा करतो तो वासनेंत अडकलेला भयंकर माणूस असतो. जो संतसंग धरीत नाही तो तमोगुण होय. तमोगुण हा असा आहे. तो असाधारण म्हणजे विलक्षण आहे. तो सोडून द्यावा यासाठीं थोडक्यांत त्याचें विवेचन केले आहे. तमोगुण प्रत्यक्ष वर्तनांत कसा आढळतो हें आतापर्यंत सांगितले. तो अधोगतीला नेण्यास कारण होतो. तमोगुणापाशीं मोक्षप्राप्ति करून देण्याचें लक्षण नाहीं. माणूस जीं कर्मे करतो त्यांचें संपूर्ण फळ आज ना उद्या त्याला मिळतें. राजोहून आणि तमोगुण प्रपंचात गुंतवून ठेवतो, सर्व दु:खाचें मूळ जो जन्म तो रजतमांनीं तुटत नाही. जन्म येणें थांबवण्यासाठीं सत्वगुण अवश्य आहे. त्यांचे वर्णन पुढील समासांत केलें आहे.