श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Wednesday, January 26, 2011

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास आठवा : सद्विद्या निरूपण ||



||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास आठवा : सद्विद्या निरूपण ||

||श्रीराम ||

ऐका सद्विद्येचीं लक्षणें| परम शुद्ध सुलक्षणें |
विचार घेतां बळेंचि बाणे| सद्विद्या आंगीं ||||

सद्विद्येचा जो पुरुष| तो उत्तमलक्षणी विशेष |
त्याचे गुण ऐकतां संतोष| परम वाटे ||||

भाविक सात्विक प्रेमळ| शांति क्ष्मा दयासीळ |
लीन तत्पर केवळ| अमृतवचनी ||||

परम सुंदर आणी चतुर| परम सबळ आणी धीर |
परम संपन्न आणी उदार| आतिशयेंसीं ||||

परम ज्ञाता आणी भक्त| माहा पंडीत आणी विरक्त |
माहा तपस्वी आणी शांत| आतिशयेंसीं ||||

वक्ता आणी नैराशता| सर्वज्ञ आणी सादरता |
श्रेष्ठ आणी नम्रता| सर्वत्रांसी ||||

राजा आणी धार्मिक| शूर आणी विवेक |
तारुण्य आणी नेमक| आतिशयेंसीं ||||

वृधाचारी कुळाचारी| युक्ताहारी निर्विकारी |
धन्वंतरी परोपकारी| पद्महस्ती ||||

कार्यकर्ता निराभिमानी| गायक आणी वैष्णव जनी |
वैभव आणी भगवद्भजनी| अत्यादरें ||||

तत्वज्ञ आणी उदासीन| बहुश्रुत आणी सज्जन |
मंत्री आणी सगुण| नीतिवंत ||१०||

आधु पवित्र पुण्यसीळ| अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ |
कर्मनिष्ठ स्वधर्में निर्मळ| निर्लोभ अनुतापी ||११||

गोडी आवडी परमार्थप्रीती| सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती |
श्रुति स्मृती लीळा युक्ति| स्तुती मती परीक्षा ||१२||

दक्ष धूर्त योग्य तार्किक| सत्यसाहित्य नेमक भेदक |
कुशळ चपळ चमत्कारिक| नाना प्रकारें ||१३||

आदर सन्मान तार्तम्य जाणे| प्रयोगसमयो प्रसंग जाणे |
कार्याकारण चिन्हें जाणे| विचक्षण बोलिका ||१४||

सावध साक्षेपी साधक| आगम निगम शोधक |
ज्ञानविज्ञान बोधक| निश्चयात्मक ||१५||

पुरश्चरणी तीर्थवासी| धृढव्रती कायाक्लेसी |
उपासक, निग्रहासी- | करूं जाणे ||१६||

सत्यवचनी शुभवचनी| कोमळवचनी येकवचनी |
निश्चयवचनी सौख्यवचनी| सर्वकाळ ||१७||

वासनातृप्त सखोल योगी| भव्य सुप्रसन्न वीतरागी |
सौम्य सात्विक शुद्धमार्गी| निःकपट निर्वेसनी ||१८||

सुगड संगीत गुणग्राही| अनापेक्षी लोकसंग्रही |
आर्जव सख्य सर्वहि| प्राणीमात्रासी ||१९||

द्रव्यसुची दारासुची| न्यायसुची अंतरसुची |
प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची| सर्वसुची निःसंगपणें ||२०||

मित्रपणें परहितकारी| वाग्माधुर्य परशोकहारी |
सामर्थ्यपणें वेत्रधारी| पुरूषार्थें जगमित्र ||२१||

संशयछेदक विशाळ वक्ता| सकळ क्लृप्त असोनी श्रोता |
कथानिरूपणीं शब्दार्था| जाऊंच नेदी ||२२||

वेवादरहित संवादी| संगरहित निरोपाधी |
दुराशारहित अक्रोधी| निर्दोष निर्मत्सरी ||२३||

विमळज्ञानी निश्चयात्मक| समाधानी आणी भजक |
सिद्ध असोनी साधक| साधन रक्षी ||२४||

सुखरूप संतोषरूप| आनंदरूप हास्यरूप |
ऐक्यरूप आत्मरूप| सर्वत्रांसी ||२५||

भाग्यवंत जयवंत| रूपवंत गुणवंत |
आचारवंत क्रियावंत| विचारवंत स्थिती ||२६||

येशवंत किर्तिवंत| शक्तिवंत सामर्थ्यवंत |
वीर्यवंत वरदवंत| सत्यवंत सुकृती ||२७||

विद्यावंत कळावंत| लक्ष्मीवंत लक्ष्णवंत |
कुळवंत सुचिष्मंत| बळवंत दयाळु ||२८||

युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ| बुद्धिवंत बहुधारिष्ट |
दीक्षावंत सदासंतुष्ट| निस्पृह वीतरागी ||२९||

असो ऐसे उत्तम गुण| हें सद्विद्यचें लक्षण |
अभ्यासाया निरूपण| अल्पमात्र बोलिलें ||३०||

रूपलावण्य अभ्यासितां न ये| सहजगुणास न चले उपाये |
कांहीं तरी धरावी सोये| अगांतुक गुणाची ||३१||

ऐसी सद्विद्या बरवी| सर्वत्रांपासी असावी |
परी विरक्तपुरुषें अभ्यासवी| अगत्यरूप ||३२||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद्विद्यानिरूपणनाम समास आठवा ||||२. ८


सद्विद्येच्या पुरुषाचीं  लक्षणें ऐकायला गोड असतात.विवेकानें तीं आपल्या अंगीं येऊं शकतात:
आतां सद्विद्येची लक्षणें ऐका. तीं फारच शुद्ध आणि चांगलीं आहेत.जर त्या लक्षणांवर विचार केला तर सद्विद्या आपणहून जबरदस्तीनें अंगीं बाणते. जो सद्विद्येचा पुरुष असतो त्याच्या अंगीं विशेष उत्तम लक्षणें असतात.त्याचे गुण ऐकत  असतां मनाला फार संतोष वाटतो.

उत्तम पुरुषाचे सामान्य वर्णन :
सद्विद्येचा पुरुष अति निष्ठावंत असतो, सत्वगुणानें संपन्न असतो, प्रेमळ असतो, तो शांति क्षमा दयाशील असून अति नम्र असतो, कोणत्याही कार्यासाठीं तो मनापासून झटतो आणि अगदी अमृताप्रमाणें गोड बोलतो.

पुढील सात ओव्यांमध्यें श्री समर्थांनीं लक्षणांच्या कांही जोडया सांगितल्या आहेत.एक लक्षण अंगीं असेल तर दुसरें बहुधा अंगीं आढळत नाहीं. त्यांतील एक जोडी जरी कुणाच्या अंगीं आली तरी तो थोरपण गाजवितो. मग ज्याच्या अंगीं पुष्कळ जोडया असतात त्याचें थोरपण काय सांगावें! फ़क्त महानुभाव पुरुषाच्या अंगींच अशा अनेक जोडया आढळतात:
उत्तम पुरुष अति सुंदर आणि मोठा चतुर असतो, अति बलवान आणि मोठा शांत, सौम्य असतो,अति श्रीमंत असून अतिशय उदार असतो. तो महाद्यानी असून  उत्तम भक्त असतो, मोठा पंडित असून अति विरक्त असतो, मोठा तपस्वी असून अतिशय शांत असतो.
मोठा वक्ता असून तो निलोभी असतो, सर्व जाणता असून दुसर्याला मोठया आदरानें वागवितो. स्वतः श्रेष्ठ असून सर्वांशीं अगदी लीन असतो. तो राज्यपदावर असून धार्मिक वृतीचा असतो,मोठा शूर असून अति विवेकी असतो, अगदी तरुण असून अतिशय नियमांच्या बंधनांत वागतो, वडिलांनी घालून दिलेल्या मार्गांनी तो चालतो पण त्याचबरोबर कुलांत चालत आलेले आचार पाळतो, नियमित व योग्य प्रमाणांत जेवण करतो. पण कोणत्याही विकाराला बळी पडत नाहीं, हटकून यश देणारा असून, हातावर यशाचें चिन्ह कमल असून  तो परोपकारी असतो. मोठा कार्य करणारा असून तो तितकाच निरभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवंताची भक्ती करतो व भक्त म्हणून नांव कमावतो, मोठें वैभव असून देखील अत्यंत प्रेमानें व आस्थेनें तो भगवंताचें भजन करतो. मोठा तत्वज्ञानी असून तो अत्यंत अनासक्त असतो, मोठा विद्वान असून अति सज्जन असतो, राजाला सल्लामसलत देणारा अमात्य किंवा मंत्री असून तो अत्यंत सदगुणी आणि तितकाच नीतिमान असतो.

हा आदर्श पुरुष जितका अंतरीं पवित्र असतो तितकाच सदाचारी आणि प्रसंग ओळखून वागणारा असतो. ज्ञानाच्या अनेक शाखांमध्यें निश्चित मत देण्याइतका तो बहुश्रुत असतो:
सद्विद्या अंगी बनलेला पुरुष साधू वृत्तीचा, पवित्र मनाचा आणि पुण्यशील चारित्र्याचा असतो. त्याचें अंत:करण शुद्ध असतें, तो मोठा धर्मात्मा व दयाळू असतो, तो कर्मनिष्ठ असतो, स्वधर्मपालन केल्यानें आंतबाहेर स्वच्छ असतो. त्याच्या अंगीं लोभ नसतो व चूक झाली तर तिचा त्याला पश्चात्ताप होतो. परमार्थाची त्याला गोडी असतें, परमार्थावर त्याचे प्रेम असते. तो सन्मार्गानें जातो, सत्कर्माचें आचरण करतो, तों भगवंताचें अनुसंधान ठेवतो, मनाला स्थिर ठेवतो. त्याला श्रुती व स्मृति यांचें ज्ञान असतें. सहज व खेळ म्हणून आणि युक्तीनें कर्म करण्याची कला त्याला येते, भगवंताची स्तुति कशी करावी हें तो जाणतो. तो बुद्धिमान असतो, त्याला अनेक वस्तूंची परीक्षा असते. तो सर्व बाबतींत सावध असतो, लबाड माणसाची लाबाधी ओळखण्याइतका धूर्त असतो, योग्य रीतीनें व प्रमाणांत तर्क चालवतो, सत्यानें चालतो, त्याला वाड्:मयाचें ज्ञान असतें, तो मोठा नियमितपणानें वागतो, प्रसंगाला किंवा माणसाला आरपार पाहूं शकतो, तो मोठया कौशल्यानें वागणारा व चटपट कामे करणारा असतो. असे नाना प्रकारचे चमत्कारिक गुण त्याच्या अंगीं असतात.

कोणाचा व किती आदर राखावा, कोणाचा व कसा सन्मान करावा, हें तारतम्य तो बरोबर जाणतो. त्याचप्रमाणें कोठें कोणता प्रयोग करायचा, वेळप्रसंग कोणता आहेत हें त्याला बरोबर समजतें. कारणांचीं व कार्याचीं चिन्हें म्हणजे लक्षणें त्याला माहित असतात, तो मोठया हुषारीनें बोलणारा असतो. तो सावधपणानें वागतो, नेहमी उद्योगशील असतो, तो आपली साधकवृत्ती सोडीत नाहीं. तो वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करतो, तसेंच आत्मस्वरूपाचें बौद्धिक ज्ञान आणि त्याचा साक्षात अनुभव यांचा स्वानुभवानें निश्चयात्मक बोध तो करून देतो.

तो बोलतो कसा चालतो कसा, लोकांशीं वागतो कसा, दिसतो कसा, याचें वर्णन करून मग तो साधन कसें करतो तें सांगतात. :
तो कधीं पुरश्चरणें करतो, कधीं तीर्थक्षेत्रांमध्यें जाऊन राहतो, कधीं कठीण व्रतें करतो तर कधीं देहाला कष्ट देतो. उपासना कशीं करावी हें माहित असल्यानें उपासना चालूं असतं इंद्रियांना ताब्यांत ठेवून तो वागतो. त्याचें बोलणें सदैव सत्य असतें, शुभ असतें, मृदू असतें, निश्चित असतें, कायमचें असतें व आल्हादकारक असतें. त्याचा सर्व वासना तृप्त झालेल्या असतात, तो मोठा कोहोळ व गूढ अभ्यास करणारा योगी असतो. दिसायला तो भव्य व अतिशय प्रसन्न असतो. अंगीं खरी विरक्ती असून देखील तो अति सौम्य व सात्विक असतो. तसेंच अत्यंत निष्कपट आणि निर्वासनी असून तो नेहमी पवित्र मार्गाने जीवन जगतो. कोणतेहीं काम तो चतुरपणें करतो, तो उत्तम संगीत जाणतो व त्याचा बरोबर रस घेतो, मोबदल्याची अपेक्षा न ठेवतां तो लोकांना सन्मार्गाला लावतो. सर्व प्राणीमात्रांशीं स्नेह ठेवून त्यांच्याशीं तो अत्यंत सरळपणें वागतो.

पैसा आणि बायका यांच्या बाबतींत त्याचें वर्तन अत्यंत पवित्र असतें, त्याची सर्व वागणूक अगदी नितीमर्यादेला धरून असतें. त्याचें अंत:करण स्वच्छ असतें. त्याचा प्रपंच आणि व्यवहार जसा अगदी निष्कलंक व सरळ असतो तसा त्याचा परमार्थ देखील अगदी निर्मल व पवित्र असतो. त्याचें मन कशातही आसक्त नसतें, गुंतलेले नसतें म्हणून त्याचें समग्र जीवनच आंतबाहेर अत्यंत पवित्र असतें. सर्वांवर मित्रपणें स्नेह ठेवण्याची वृत्ती असल्यानें तो नेहमी दुसर्‍याचें कल्याण करतो, आपल्या गोड बोलण्यानें तो दुसर्‍याचें दु:ख नाहीसें करतो, आपल्या सत्तेच्या जोरावर तो सज्जनांचें व अनाथांचें रक्षण करतो, आणि आपल्या पराक्रमानें सार्‍या जगाचा मित्र बनतो.

जबरदस्त वक्तृत्वशक्ति अंगीं असल्यामुळे सर्व प्रकारचे संशय तो घालवितो. तो स्वत: सर्व विषय जाणतो तरी दुसर्‍याचें सांगणें मनापासून ऐकतो. तसेच हरिकथा व प्रवचन ऐकत असतां प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचें लक्ष असतें. संभाषणामध्यें तो कधींही वितंडवाद करीत नाहीं. कोणतीही उपाधी तो आपल्या अंगीं लागूं देत नाहीं. त्यामुळें तो अलिप्तपणें राहतो. तो भलती आशा ठेवीत नाहीं. तो कधीं क्रोधाच्या आधीन जात नाहीं, अत्यंत निर्दोष व मत्सरापासून मुक्त असतो.

त्याचें ज्ञान अज्ञानापासून मुक्त असल्याने अगदी शुध्द व निश्चित असतें. समाधान प्राप्त झालेलें असून तो भगवंताचें भजनपूजन करतो, भक्तपणानें वागतो. आणि सिद्धावस्था साधल्यावरही साधकपणानें राहतो, साधनाचें रक्षण करतो.

संस्कृतमध्यें नामांना मत आणि वत असे प्रत्यय लागून सामान्यत: विशेषणें बनतात. उदा : - रुपवत, गुणवत, कीर्तीमत, लक्ष्मीवत, इत्यादी. पुष्कळपणा, प्रशंसा, नित्यसंबंध, जवळ असणें, मध्यें असणें, असा अर्थ हे प्रत्यय दाखवितात. पुढील पांच ओव्यांमध्यें आदर्श किंवा उत्तम पुरुषाच्या अंगीं असणारीं महत्वाचीं सर्व लक्षणें श्री समर्थांनी विशेषण-रूपांनी मोठया चातुर्यानें एके ठिकाणीं गुंफिली आहेत. तीं सागतांना त्यांची निर्मळ स्फूर्ती स्पष्टपणें दिसते हें तर खरेंच परंतु त्याबरोबर त्यांचें मराठी भाषेवरील प्रभुत्व देखील प्रत्ययास येतें. :
साद्विद्येनें संपन्न असलेला पुरुष मूर्तिमंत सुख व संतोष आहे असें त्याला पाहिल्यावर वाटतें. तो आनंदमूर्ती असतो. अखंड प्रसन्न राहतो.आत्मरूपानें तो सर्व प्राणीमात्रांशीं एकरूप झालेला असतो. आत्मवत सर्व भूतेषु असें त्याचें वागणें असतें. तो भाग्यवंत व जयवंत असतो, रूपवंत व गुणवंत असतो. तो आचारवंत व क्रियावंत असून शिवाय विचारवंत असतो आणि अशी त्याची अवस्था असतें.

तो यशवंत व कीर्तिवंत असतों, शक्तिवंत व सामार्थ्वंत असतों, वीर्यवंत किंवा पराक्रमी असतो व ज्याचा आशीर्वाद फळास येतो असा असतो. तो अत्यंत सत्यवान असून पुण्यकर्मे करणारा असतो. तो विद्यावंत व कलावंत असतो, ऐश्वर्यसंपन्न व सुलक्षणसंपन्न असतो, कुलशीलवान असतो, अत्यंत पवित्र आचरणाचा असतों, बलवान असून दयाळू असतों. तो मोठा युक्तीबाज असतों, गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो, बुद्धिमान असून मोठा धैर्यवान असतो. परमार्थाची दीक्षा त्यानें घेतलेली असतें. तो सदा सर्वकाळ अत्यंत संतुष्ट असतो. त्याला कशाचीही वासना उरलेली नसते. तो अत्यंत वैराग्यसंपन्न असतो.

समास संपवितांना श्री समर्थ एक अति महत्वाची गोष्ट सांगतात ती ही कीं, जर कोणी प्रयत्न करील तर हे उत्तम गुण तो अंगीं आणूं शकेल. हाच त्याचा खरा प्रयत्नवाद. ! :
असो आतापर्यंत सांगितलेले हे उत्तम गुण सद्विद्येची लक्षणें आहेत. ते अंगीं आणण्याचा अभ्यास करावा म्हणून त्याचें थोडेंसें वर्णन केले.

सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण कांहीं अभ्यास करून, प्रयत्न करून अंगीं आणतां येत नाहींत. ते गुण सहज व उपजत असल्यानें त्यावर उपाय करता येत नाहीं. पण इतर उत्तम गुण अभ्यासानें साध्य करून घेतां येतात. ते अंगीं आणण्याचा प्रयत्न करावा. अशी ही चांगली सद्विद्या सर्व माणसांच्या अंगीं असावी. पण विरक्त पुरुषानें मात्र तिचा अगदी अगत्यानें अभ्यास करावा.