श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Tuesday, January 25, 2011

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास सातवा : सत्त्वगुण लक्षण ||



||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास सातवा : सत्त्वगुण लक्षण ||

||श्रीराम ||

मागां बोलिला तमोगुण| जो दुःखदायक दारुण |
आतां ऐका सत्वगुण| परम दुल्लभ ||||

जो भजनाचा आधार| जो योगियांची थार |
जो निरसी संसार| दुःखमूळ जो ||||

जेणें होये उत्तम गती| मार्ग फुटे भगवंतीं |
जेणें पाविजे मुक्ती| सायोज्यता ते ||||

जो भक्तांचा कोंवसा| जो भवार्णवींचा भर्वसा |
मोक्षलक्ष्मीची दशा| तो सत्वगुण ||||

जो परमार्थाचें मंडण| जो महंतांचें भूषण |
रजतमाचें निर्शन| तो सत्वगुण ||||

जो परमसुखकारी| जो आनंदाची लहरी |
देऊनियां, निवारी- | जन्ममृत्य ||||

जो अज्ञानाचा सेवट| जो पुण्याचें मूळ पीठ |
जयाचेनि सांपडे वाट| परलोकाची ||||

ऐसा हा सत्वगुण| देहीं उमटतां आपण |
तये क्रियेचें लक्षण| ऐसें असे ||||

ईश्वरीं प्रेमा अधिक| प्रपंच संपादणे लोकिक |
सदा सन्निध विवेक| तो सत्वगुण ||||

संसारदुःख विसरवी| भक्तिमार्ग विमळ दावी |
भजनक्रिया उपजवी| तो सत्वगुण ||१०||

परमार्थाची आवडी| उठे भावार्थाची गोडी |
परोपकारीं तांतडी| तो सत्वगुण ||११||

स्नानसंध्या पुण्यसीळ| अभ्यांतरींचा निर्मळ |
शरीर वस्त्रें सोज्वळ| तो सत्वगुण ||१२||

येजन आणी याजन| आधेन आणी अध्यापन |
स्वयें करी दानपुण्य| तो सत्वगुण ||१३||

निरूपणाची आवडी| जया हरिकथेची गोडी |
क्रिया पालटे रोकडी| तो सत्वगुण ||१४||

अश्वदानें गजदानें| गोदानें भूमिदानें |
नाना रत्नांचीं दानें- | करी, तो सत्वगुण ||१५||

धनदान वस्त्रदान| अन्नदान उदकदान |
करी ब्राह्मणसंतर्पण| तो सत्वगुण ||१६||

कार्तिकस्नानें माघस्नानें| व्रतें उद्यापनें दानें |
निःकाम तीर्थें उपोषणे| तो सत्वगुण ||१७||

सहस्रभोजनें लक्षभोजनें| विविध प्रकारींचीं दानें |
निःकाम करी सत्वगुणें| कामना रजोगुण ||१८||

तीर्थीं अर्पी जो अग्रारें| बांधे वापी सरोवरें |
बांधे देवाळयें सिखरें| तो सत्वगुण ||१९||

देवद्वारीं पडशाळा| पाईरीया दीपमाळा |
वृंदावनें पार पिंपळा- | बांधे, तो सत्वगुण ||२०||

लावीं वनें उपवनें| पुष्पवाटिका जीवनें |
निववी तापस्यांचीं मनें| तो सत्वगुण ||२१||

संध्यामठ आणि भुयेरीं| पाईरीया नदीतीरीं |
भांडारगृहें देवद्वारीं| बांधें, तो सत्वगुण ||२२.

नाना देवांचीं जे स्थानें| तेथें नंदादीप घालणें |
वाहे आळंकार भूषणें| तो सत्वगुण ||२३||

जेंगट मृदांग टाळ| दमामे नगारे काहळ |
नाना वाद्यांचे कल्लोळ| सुस्वरादिक ||२४||

नाना समग्री सुंदर| देवाळईं घाली नर |
हरिभजनीं जो तत्पर| तो सत्वगुण ||२५||

छेत्रें आणी सुखासनें| दिंड्या पताका निशाणें |
वाहे चामरें सूर्यापानें| तो सत्वगुण ||२६||

वृंदावनें तुळसीवने| रंगमाळा संमार्जनें |
ऐसी प्रीति घेतली मनें| तो सत्वगुण ||२७||

सुंदरें नाना उपकर्णें| मंडप चांदवे आसनें |
देवाळईं समर्पणें| तो सत्वगुण ||२८||

देवाकारणें खाद्य| नाना प्रकारीं नैवेद्य |
अपूर्व फळें अर्पी सद्य| तो सत्वगुण ||२९||

ऐसी भक्तीची आवडी| नीच दास्यत्वाची गोडी |
स्वयें देवद्वार झाडी| तो सत्वगुण ||३०||

तिथी पर्व मोहोत्साव| तेथें ज्याचा अंतर्भाव |
काया वाचा मनें सर्व- | अर्पी, तो सत्वगुण ||३१||

हरिकथेसी तत्पर| गंधें माळा आणी धुशर |
घेऊन उभीं निरंतर| तो सत्वगुण ||३२||

नर अथवा नारी| येथानुशक्ति सामग्री |
घेऊन उभीं देवद्वारीं| तो सत्वगुण ||३३||

महत्कृत्य सांडून मागें| देवास ये लागवेगें |
भक्ति निकट आंतरंगें| तो सत्वगुण ||३४||

थोरपण सांडून दुरी| नीच कृत्य आंगीकारी |
तिष्ठत उभा देवद्वारीं| तो सत्वगुण ||३५||

देवालागीं उपोषण| वर्जी तांबोल भोजन |
नित्य नेम जप ध्यान- | करी, तो सत्वगुण ||३६||

शब्द कठीण न बोले| अतिनेमेसी चाले |
योगोओ जेणें तोषविले| तो सत्वगुण ||३७||

सांडूनिया अभिमान| निःकाम करी कीर्तन |
श्वेद रोमांच स्फुराण| तो सत्वगुण ||३८||

अंतरीं देवाचें ध्यान| तेणें निडारले नयन |
पडे देहाचें विस्मरण| तो सत्वगुण ||३९||

हरिकथेची अति प्रीति| सर्वथा नये विकृती |
आदिक प्रेमा आदिअंतीं| तो सत्वगुण ||४०||

मुखीं नाम हातीं टाळी| नाचत बोले ब्रीदावळी |
घेऊन लावी पायधुळी| तो सत्वगुण ||४१||

देहाभिमान गळे| विषईं वैराग्य प्रबळे |
मिथ्या माया ऐसें कळे| तो सत्वगुण ||४२||

कांहीं करावा उपाये| संसारीं गुंतोन काये |
उकलवी ऐसें हृदये| तो सत्वगुण ||४३||

संसारासी त्रासे मन| कांहीं करावें भजन |
ऐसें मनीं उठे ज्ञान| तो सत्वगुण ||४४||

असतां आपुले आश्रमीं| अत्यादरें नित्यनेमी |
सदा प्रीती लागे रामीं| तो सत्वगुण ||४५||

सकळांचा आला वीट| परमार्थीं जो निकट |
आघातीं उपजे धारिष्ट| तो सत्वगुण ||४६||

सर्वकाळ उदासीन| नाना भोगीं विटे मन |
आठवे भगवद्भजन| तो सत्वगुण ||४७||

पदार्थीं न बैसे चित्त| मनीं आठवे भगवंत |
ऐसा दृढ भावार्थ| तो सत्वगुण ||४८||

लोक बोलती विकारी| तरी आदिक प्रेमा धरी |
निश्चय बाणे अंतरीं| तो सत्वगुण ||४९||

अंतरीं स्फूर्ती स्फुरे| सस्वरूपीं तर्क भरे |
नष्ट संदेह निवारे| तो सत्वगुण ||५०||

शरीर लावावें कारणीं| साक्षेप उठे अंतःकर्णी |
सत्वगुणाची करणी| ऐसी असे ||५१||

शांति क्षमा आणि दया| निश्चय उपजे जया |
सत्वगुण जाणावा तया| अंतरीं आला ||५२||

आले अतीत अभ्यागत| जाऊं नेदी जो भुकिस्त |
येथानुशक्ती दान देन| तो सत्वगुण ||५३||

तडितापडी दैन्यवाणें| आलें आश्रमाचेनि गुणें |
तयालागीं स्थळ देणें| तो सत्वगुण ||५४||

आश्रमीं अन्नची आपदा| परी विमुख नव्हे कदा |
शक्तिनुसार दे सर्वदा| तो सत्वगुण ||५५||

जेणें जिंकिली रसना| तृप्त जयाची वासना |
जयास नाहीं कामना| तो सत्वगुण ||५६||

होणार तैसें होत जात| प्रपंचीं जाला आघात |
डळमळिना ज्याचें चित्त| तो सत्वगुण ||५७||

येका भगवंताकारणें| सर्व सुख सोडिलें जेणें |
केलें देहाचें सांडणें| तो सत्वगुण ||५८||

विषईं धांवे वासना| परी तो कदा डळमळिना |
ज्याचें धारिष्ट चळेना| तो सत्वगुण ||५९||

देह आपदेनें पीडला| क्षुधे तृषेनें वोसावला |
तरी निश्चयो राहिला| तो सत्वगुण ||६०||

श्रवण आणी मनन| निजध्यासें समाधान |
शुद्ध जालें आत्मज्ञान| तो सत्वगुण ||६१||

जयास अहंकार नसे| नैराशता विलसे |
जयापासीं कृपा वसे| तो सत्वगुण ||६२||

सकळांसीं नम्र बोले| मर्यादा धरून चाले |
सर्व जन तोषविले| तो सत्वगुण ||६३||

सकळ जनासीं आर्जव| नाहीं विरोधास ठाव |
परोपकारीं वेची जीव| तो सत्वगुण ||६४||

आपकार्याहून जीवीं| परकार्यसिद्धी करावी |
मरोन कीर्ती उरवावी| तो सत्वगुण ||६५||

पराव्याचे दोषगुण| दृष्टीस देखे आपण |
समुद्राऐसी साठवण| तो सत्वगुण ||६६||

नीच उत्तर साहाणें| प्रत्योत्तर न देणें |
आला क्रोध सावरणें| तो सत्वगुण ||६७||

अन्यायेंवीण गांजिती| नानापरी पीडा करिती |
तितुकेंहि साठवी चित्तीं| तो सत्वगुण ||६८||

शरीरें घीस साहाणें| दुर्जनासीं मिळोन जाणें |
निंदकास उपकार करणें| हा सत्वगुण ||६९||

मन भलतीकडे धावें| तें विवेकें आवराअवें |
इंद्रियें दमन करावें| तो सत्वगुण ||७०||

सत्क्रिया आचरावी| असत्क्रिया त्यागावी |
वाट भक्तीची धरावी| तो सत्वगुण ||७१||

जया आवडे प्रातःस्नान| आवडे पुराणश्रवण |
नाना मंत्रीं देवतार्चन- | करी, तो सत्वगुण ||७२||

पर्वकाळीं अतिसादर| वसंतपूजेस तत्पर |
जयंत्यांची प्रीती थोर| तो सत्वगुण ||७३||

विदेसिं मेलें मरणें| तयास संस्कार देणें |
अथवा सादर होणें| तो सत्वगुण ||७४||

कोणी येकास मारी| तयास जाऊन वारी |
जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||

लिंगें लाहोलीं अभिशेष| नामस्मरणीं विश्वास |
देवदर्शनीं अवकाश| तो सत्वगुण ||७६||

संत देखोनि धावें| परम सुख हेलावे |
नमस्कारी सर्वभावें| तो सत्वगुण ||७७||

संतकृपा होय जयास| तेणें उद्धरिला वंश |
तो ईश्वराचा अंश| सत्वगुणें ||७८||

सन्मार्ग दाखवी जना| जो लावी हरिभजना |
ज्ञान सिकवी अज्ञाना| तो सत्वगुण ||७९||

आवडे पुण्य संस्कार| प्रदक्षणा नमस्कार |
जया राहे पाठांतर| तो सत्वगुण ||८०||

भक्तीचा हव्यास भारी| ग्रंथसामग्री जो करी |
धातुमूर्ति नानापरी| पूजी, तो सत्वगुण ||८१||

झळफळित उपकर्णें| माळा गवाळी आसनें |
पवित्रे सोज्वळें वसनें| तो सत्वगुण ||८२||

परपीडेचें वाहे दुःख| परसंतोषाचें सुख |
वैराग्य देखोन हरिख- | मानी, तो सत्वगुण ||८३||

परभूषणें भूषण| परदूषणें दूषण |
परदुःखें सिणे जाण| तो सत्वगुण ||८४||

आतां असों हें बहुत| देवीं धर्मीं ज्याचें चित्त |
भजे कामनारहित| तो सत्वगुण ||८५||

ऐसा हा सत्वगुण सात्विक| संसारसागरीं तारक |
येणें उपजे विवेक| ज्ञानमार्गाचा ||८६||

सत्वगुणें भगवद्भक्ती| सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
सत्वगुणें सायोज्यमुक्ती| पाविजेते ||८७||

ऐसी सत्वगुणाची स्थिती| स्वल्प बोलिलें येथामती |
सावध होऊन श्रोतीं| पुढें अवधान द्यावें ||८८||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सत्वगुणनाम समास सातवा ||||२. ७



अज्ञानाचा शेवट करून परमानंद देणारा हा सत्वगुण परमार्थाचें सौदर्य आहे :
गेल्या समासांत भयंकर दु:ख देणारा असा तमोगुण सांगितला. आतां अत्यंत दुर्लभ असा सत्वगुण ऐका. भजनाला सत्वगुणाचा आधार लागतो, योग्यांना त्याचा आश्रय करून सिद्धी मिळते आणि दु:खाचें मूळ असलेला संसार सत्वगुणाच नाहींसा करतो. सत्वगुणाने उत्तम गति मिळते, भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सांपडतो, आणि सायुज्यमुक्ती हातीं येते. सत्व गुण भक्तांचा आधार आहे, त्याच्या भरवशावर भवसागर तरुण जाता येतो. आणि मोक्षरुपी लक्ष्मीचें तो ऐश्वर्य आहे म्हणजे मुक्त पुरुषाच्या वागण्यांत तो दिसतो.
तो परमार्थाचें सौदंर्य आहे, तो महात्म्याचें भूषण आहे. म्हणजे सत्वगुणमुळें परमार्थ मन हरण करून नेतो, आकर्षण करतो आणि स्वानुभवी पुरुषांच्या वागण्याला त्याच्यामुळें शोभा येते. त्याच्यामुळें राज, तम या गुणांचें निरसन घडतें. सत्वगुण अत्यंत सुख देणारा आहे. परमानंदाचा अनुभव, देऊन तो जन्ममृत्यूचें निवारण करतो.

तो अज्ञानाचा नाश करतो, तो सर्व पुण्याचें मूळ स्थान आहे म्हणजे सत्वगुणांतून सर्व पुण्य उदय पावतें, सत्वगुणांनेच परमार्थमार्ग दिसूं लागतो. सत्वगुण हा असा आहे. तो देहांत प्रगट झाला म्हणजे जेम आचरण होऊं लागतें त्याचें वर्णन पुढीलप्रमाणें आहे.

ईश्वरावर प्रेम, विवेकी  वृत्ती, परमार्थाची आवड, हरिकथेची गोडी हिं सत्वगुणांची महत्वाचीं लक्षणें आहेत :
इतर सर्वांपेक्षा ईश्वरावर अधिक प्रेम असणें, चार लोकांप्रमाणें प्रपंच सांभाळणें, आणि हृदयांत सदैव विवेक जागा ठेवणें म्हणजे सत्वगुण होय. जो संसारांतील दु:खाचा विसर पाडतो, भक्तिमार्ग स्पष्टपणें दाखवितो, आणि प्रत्यक्ष भजन करायला लावतो तो सत्वगुण होय.

जो परमार्थाची आवड उत्पन्न करतो, आत्मतत्त्वाची गोडी निर्माण करतो, आणि परोपकार करण्याची उत्सुकता देतो तो सत्वगुण होय. जो स्नानसंध्या नियमानें करतो, पुण्यकर्मे सहज करतो. ज्याचें अंत:करण निर्मळ असतें तसेंच बाह्यांग म्हणजे शरीर व कपडे स्वच्छ असतात तो सत्वगुण होय. यजन म्हणजें स्वत: यज्ञ करणें, यजन म्हणजे दुसर्‍या कडून यज्ञ करविणें, अध्ययन म्हणजे स्वत: अभ्यास करणें, अध्यापन म्हणजे दुसर्‍यास शिकविणें, दान करण्याचें पुण्यकर्म करणें, हीं लक्षणें जेथें आहेत तो सत्वगुण होय. परमार्थ व तत्वज्ञान किंवा वेदांत ऐकण्याची आवड, भगवंताच्या सगुण चरित्राची गोडी, आणि श्रवण केलेल्या उपदेशानुसार आपल्या वागण्यांत ताबडतोब बदल कण्याची शक्ति असणें तो सत्वगुण होय.

सत्वगुणी माणूस नाना प्रकारची दानें करतो, व्रतें करतो, मंदिरांना मदत करतो, इतकेंच नव्हे तर स्वत: देवाच्या सेवेंत झिजतो :
घोडे, हत्ती, गाई, भूमी, अनेक प्रकारचीं रत्नें दान करतो तो सत्वगुण होय. धन, वस्त्र, अन्न, पाणी यांचे दान करतो, तसेच जो ब्राह्मणांस भोजन घालतो तो सत्वगुण होय. कार्तिक व माघ महिन्यांतील स्नानें, व्रतें, उद्यापनें व अनेक दानें जो करतो, कांहीं कामना न ठेवतां जो तीर्थात्नेम व उपवास करतो तो सत्वगुण होय.

सहस्त्र भोजनें, लक्ष भोजनें, तशीच नाना प्रकारची दानें माणूस सत्वगुणामुळें अत्यंत निष्काम मनानें करतो, त्यांत कामना असेल तर तो रजोगुण होय. तीर्थाच्या ठिकाणीं जाऊन जो गरिबांना अग्रहारे म्हणजे इनाम जमीन अर्पण करतो, विहिरी व तळीं बांधतो, देवळें व शिखरें बांधतो तो सत्वगुण होय. देवाच्या दारापाशीं देवळाला लागून जो धर्मशाळा बांधतो, पायर्‍या, दीपमाला, वृंदावनें, आणि पिंपळाचे पार बांधतो तो सत्व गुण होय. देवासाठीं जो लहान मोठ्या बागा लावतो, बगीचे तयार करतो, पाण्याची सोय करतो, जो तपस्वी लोकांच्या मनास शांति देतो तो सत्वगुण होय.
जो संध्येचे मठ आणि भुयारें बांधतो, नदीकांठी पायर्‍या बांधतो, व देवाच्या दारीं जो कोठारें बांधतो तो सत्वगुण होय. निरनिराळ्या देवांची जीं स्थानें आहेत तेथें नंदादीप ठेवतो आणि देवाला दागिने, वस्त्रें, भूषणें अर्पण करतो तो सत्वगुण होय. झेंगट, मृदंग, टाळ, दमामे, (मोठे नगारे) नगारे, ढोल, दफ, इत्यादी गोड आवाजांची अनेक वाद्यें, आणि अनेक प्रकारची सुंदर सामग्री देवळाला अर्पण करतो व जो भगवंताच्या भजनांसाठीं उत्सुक असतो तो सत्वगुण होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, निशाणें, चवर्‍या, अवदागिर्‍या, इत्यादी देवाला अर्पण करतो तो सत्वगुण होय. वृंन्दावनें, तुळशीचीं वनें म्हणजे मोठ्या बागा, रांगोळ्या, संमार्जनें म्हणजे जागा झाडून सावरुन स्वच्छ करावयाची साधनें देवाला अर्पण करण्याची आवड तो सत्वगुण होय. नाना प्रकारचीं पुजेचीं भांडीं, मंडप, चांदवें व आसनें देवळाला अर्पण करणे तो सत्वगुण होय. देवाला खायला देतो व जो देवाला नाना प्रकारचे नैवेद्य करतो, दुर्मिळ व सुंदर अशी फळें जो देवाला अर्पण करतो तो सत्वगुण होय. अशा प्रकारची भक्तीची आवड ज्याला असते, देवांचें अगदी हलकें काम सेवा म्हणून करणें ज्याला मनापासून गोड वाटते, जो स्वत: देऊळ झाडतो तो सत्वगुण होय.

मनुष्य उत्सवप्रिय असतो. एरवी नियमानें उपासना करणार्‍या भक्ताला उत्सवामध्यें भगवंताचें विशेष प्रेम येतें. अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, चांगलें श्रवण घडतें. संतांचा समागम होतो. म्हणून सत्वगुणी माणसाला उत्सवाची आवड असते :
पुण्यतिथि, पर्वणी व महोत्सव यामध्यें ज्याचा जीव गुंतलेला असतो, ते येण्याची जो वा पाहतो आणि कायावाचामनानें जो आपलें सगळें अर्पण करतो तो त्वगुण होय. जो भगवंताची कथा ऐकण्यास उत्सुक असतो, सुवासिक गंध, फुलांच्या माळा व बुक्का घून जो सारखा देवापुढें उभा असतो तो सत्वगुण होय. स्त्री असो व पुरुष असो, प्रत्येक जण आपल्या अनुकूलतेप्रमाणें देवाला आवडणारें साहित्य घेऊन दोवाल्यंत उभा असतो तो सत्वगुण होय. स्वत:चें मोठें महत्वाचें काम जरी असलें तरी तें बाजूंस सारुन जो तांतडीने देवाकडे येतो, ज्याच्या अंतरंगात भगवंताचें प्रेम जीवाला अगदी चिटकून असतें तो सत्वगुण होय.

जो आपलें मोठेपण बाजूस सारतो, दूर सोडतो आणि देवाचे अगदी हलकें काम अंगावर घेतो, व देवाच्या दरांत तिष्टत उभा राहतो तो सत्वगुण होय. जो देवासाठी उपवास करतो, जेवण व पानतंबाखू ओडतो, जो नित्य नेमानें जप आणि ध्यान करतो तो सत्वगुण होय. जो कधीं कठोर शब्द बोलत नाहीं, जो अतिशय नियमानें वागतो, जो योग्यांना खुष करतो तो सत्वगुण होय.

जो अभिमान सोडतो व अत्यंत निष्काम वृत्तीनें कीर्तन करतो, आणि कीर्तन करतांना घाम, रोमांच, वगैरे सात्विक भाव ज्याच्या अंगावर उमटतात तो सत्वगुण होय. जो अंतर्यामीं देवाचें ध्यान करतो आणि त्यामुळे ज्याचें डोळे अश्रूंनी भरून येतात व त्या प्रेमामध्यें ज्याला स्वत:च्या देहाचें विस्मरण घडतें तो सत्वगुण होय.

स्वत:चें विस्मरण होणें हीच साधना बरोबर चालण्याची खूण आहे. भगवंताचे स्मरण अधिकाधिक स्थिर होऊन त्याच्या प्रेमाचा उत्कर्ष होऊं लागला कीं वैराग्याला जोर चढतो, भोगांचा वीत येतो आणि दृशांतून मन निवृत्त होतें, याचें वर्णन ऐकावे :
ज्याला भगवंताच्या सगुण चरित्राची फार गोडी असते, त्या प्रेमामध्यें कधीही बिघाड उत्पन्न होत नाहीं, आणि भगवंताचे प्रेम आरंभापासून शेवटपर्यंत जास्त वाढतच जातें तो सत्वगुण होय.

जो मुखानें भगवंताचें नाम गातो, हातानें टाळ्या वाजवितो, नाचत नाचत भगवंताचीं ब्रीदे म्हणतो, आणि भक्तांची पायधूळ घेऊन आपल्या कपाळी लावतो तो सत्वगुण होय.
ज्याचा देहाचा अभिमान क्षीण होऊं लागतो, दृश्याबद्दलचें वैराग्य जोरानें वाढूं लागतें, मायेचा पसारा भ्रमात्मक आहे असें कळूं लागतें तो सत्वगुण होय. संसार्मध्ये गुंतून राहण्यंत कांहीं अर्थ नाहीं, त्यांतून मोकळें होण्याचा काहीं तरी उपाय करायला पाहिजे असा आत्मानात्मविवेक ज्याच्या अंतर्यामीं उत्पन्न होतो तो सत्वगुण होय. संसाराच्या कटकटींनीं ज्याचें मन त्रासतें आणि त्यामुळें कांहीं तरी उपासना करावी असा परमार्थ विचार मनांत उत्पन्न होतो तो सत्वगुण होय. ब्रह्मचारी असो किंवा गृहस्थ असो, ज्या आश्रमांत तो असतो त्यांत अति आदरानें नित्यनेमाचें पालन करतो, परंतु सदैव त्याचें मन भगवंताच्या प्रेमामध्यें गुंतलेलें राहतें तो सत्वगुण होय.

ज्याला भगवंतावांचून इतर सर्व गोष्टींचा वीट येतो, जो परमार्थ अत्यंत जवळ करतो, आपलासा करतो, आणि संकट आलें असता त्यांस शांतपणे तोंड देण्याचें धैर्य ज्याच्या ठिकाणीं उत्पन्न होतें तो सत्वगुण होय. जो सदा सर्वकाळ अनासक्त असतो म्हणजे कशात गुंतलेला नसतो, नाना प्रकारच्या देह्सुखांना ज्याचें मन विटलेले किंवा कंटाळलेलें असतें, ज्याला सारखी, पुन: पुन: भगवंताची आठवण होते तो सत्वगुण होय. कोणत्याही दृश्य वस्तूवर ज्याचें मन अडकत नाहीं मनामध्यें भगवंताचें स्मरण सतत चालेलें असतें, अशी ज्याची पक्की निश्चल निष्ठा असते तो सत्वगुण होय. भगवंतावरील त्याचें प्रेम पाहून लोक म्हणतात हा वेडा आहे, याचें डोकें बिघडलें आहे, तरीपण त्याचें प्रेम अधिकच वाढत जातें. त्याच्या मनाचा पूर्ण निश्चय होतो तो सत्वगुण होय.       

सत्वगुणांत प्रतिभा जागृत होते, बुद्धि आत्मप्रकाशानें भरून जाते. शांती, क्षमा व दया हे दिव्य सदगुण अंत:कारणांत स्थिर होतात. वासना शांत होते, रसना ताब्यांत येते. तात्पर्य, स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी हातीं येते :
अंतर्यामी स्फूर्ति जागी होते, आत्मस्वरूपाच्या विचारांनी बुद्धि भरून जाते, वाईट संशय आपोआप नाहीसे होतात तो सत्वगुण होय. या शरीराचा उत्तम उपयोग करावा अशी ओढ अंत:करणांत उत्पन्न होते. सत्वगुणाचें कार्य हें असें आहे.
ज्याच्या वागण्यामध्यें शांति, क्षमा, आणि दया दिसू लागतात, भगवंताच्या भक्तीचा निश्चय ज्याच्या मनांत उत्पन्न होतो त्याच्या अंतर्यामीं सत्व गुण उदय पावला असें समजावें. अतिथी किंवा अभ्यागत घरीं आले असतां कांही तरी खाऊं घातल्याशिवाय त्यांना जो जाऊं देत नाहीं, त्यांना यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण होय. बैरागी, गोसावी किंवा कोणी दु :खी  दरिद्री  माणूस आसर्‍यासाठीं आला तर गृहस्थाश्रमाचें कर्तव्य म्हणून जो त्यांना आश्रय देतो तो सत्वगुण होय. आपल्या घरात पोटभर खायला नसूनसुद्धां जो कोणी येईल त्याला कांही खायला दिल्यावांचून जो जाऊं देत नाहीं, आपल्या शक्तीप्रमाणें जो नेहमीं देत राहतो तो सत्वगुण होय. ज्यानें आपली जीभ जिंकली आहे, ज्याची वासना तृप्त झाली आहे, ज्याला कामना, इच्छा उरली नाहीं तो सत्वगुण होय जें व्हायचें तें होतच जातें, या नियमानुसार प्रपंचामध्यें मोठें संकट आलें असतां ज्याचें मन डळमळत नाहीं, जो शांतचित्त राहतो तो सत्वगुण होय.

एका भगवंतासाठी इतर सर्व मुखें जो सोडून देतो, इतकेंच नव्हे तर देहाचें प्रेमसुद्धां जो सोडतो तो सत्वगुण होय. बाहेरच्या वस्तूंकडे वासना खेचीत असतां ज्याचें मन डगमगत नाहीं किंवा ज्याचें मनोधैर्य  चळत नाहीं तो सत्वगुण होय, शरीर दारिद्रयानें पीडलें आहे, तहा न  भूकेनें व्याकूळ  झालें आहे. अशा अवस्थेंत सुद्धां भगवंताच्या भक्तीचा ज्याचा निश्चय भक्कम राहतो तो सत्वगुण होय.

दु:ख गिळणें, निंदकावर उपकार करणें, इंद्रियदमन करणें, नामस्मरणीं विश्वास असणें, संताला शरण जाणें, त्याची कृपा होणें, लोक शहाणे करणें, ग्रंथ जमविणें, दुसर्‍याचें दु:ख सहन न होणें, हीं सत्वगुणांचीं सर्व सामान्य लक्षणें आहेत. :
आपण अन्याय केला नसतांना कोणी आपल्याला छळतात, अनेक प्रकारे दु:ख देतात. तें सगळें जो शांतपणें गिळतो, सहन करतो, तो सत्वगुण होय. जो देहानें दुसर्‍यासाठीं झीज सोसतो, दुर्जनाशीं आपलेपणानें वागतो, निंदकावर उपकार करतो, तो सत्वगुण होय. मन ऐकत नाहीं, नको त्या गोष्टीच्या मागें धांवतें तें विवेकानें जो आवरतो, इंद्रिये ताब्यांत ठेवून वागतो तो सत्वगुण होय. ज्याला प्रात:स्नान आवडतें, पुराण ऐकणें आवडतें, ज्याला मंत्र म्हणून केलेली देवाची पूजा आव्स्ते तो सत्वगुण होय. ज्याला पर्वकाळांबद्दल मोठा आदर असतो, वसंतपुजेची फार आवड असते, आणि देवाच्या जन्मोत्स्वाबद्दल अति प्रेम असतें तो सत्वगुण होय. कोणी बेवारस परदेशी माणूस मेला तर जो त्याचा अग्निसंस्कार करतो किंवा त्या संस्काराला हजार राहतो तो सत्वगुण होय. 

एक इसम दुसर्‍याला मारहाण करीत असेल तर मध्यें पडून जो मारामारी थांबवितो, अडकलेल्या लोकांना सोडवितो तो सत्वगुण होय. लिंगार्चन करणें, लाखोली वाहणें, अभिषेक करणें, नामस्मरणावर श्रद्धा असणें, कांहीं करून देवदर्शनासाठी वेळ काढणें म्हणजे सत्वगुण होय. संत बघितल्याबरोबर चट्टदिशीं त्याच्याजवळ जातो, त्याच्या दर्शनानें आनंदानें भरून जातो, आणि अगदी मनापासून त्याला नमस्कार करतो तो सत्वगुण होय. संताची कृपा ज्याच्यावर होतें त्यानें आपल्या वंशाचा उद्धार केला असें समजावें. सत्वगुणामुळें त्याच्या ठिकाणीं ईश्वराचा अंश अधिक असतो.

जो लोकांना सन्मार्ग दाखवतो,त्यांना भगवंताच्या भक्तीला लावतो, अज्ञानी लोकांना ज्ञान शिकवतो तो सत्वगुण होय. ज्याला पुण्यसंस्कार देवप्रदक्षिणा अन देवास नमस्कार या गोष्टी आवडतात, ज्याच्यापाशीं पाठांतर असतें तो सत्वगुण होय. ज्याला भक्तीची फार उत्कट इच्छा असतें, जो ग्रंथ संग्रह करतो, जो अनेक प्रकारच्या धातुमुर्तीची पूजा आवडीने करतो तो सत्वगुण होय. देवपूजेची स्वच्छ चकचकीत भांडीं, जपाच्या माळा, गोमुखी, आसनें, पवित्र, स्वच्छ वस्त्रें ज्याला आवडतात तो सत्वगुण होय. दुसर्‍याला दु:ख झाले कीं ज्याला दु:ख होतें, दुसर्‍याला संतोष झाला कि ज्याला सुख वाटते, वैराग्य पाहून ज्याला, आनंद होतो तो सत्गुण होय.

जो दुसर्‍याचें भूषण तें आपलें भूषण व दूषण तें आपलें दूषण मानतो, दुसर्‍याच्या दु:खानें जो स्वत: कष्टी होतो तो सत्वगुण होय.

आतां फक्त तीन ओव्यांत सबंध समासाचा सारांश सांगतात. :
विस्तारानें सांगितलेले सत्वगुणाचें लक्षण आता पुरें. थोडक्यात सांगतो कीं, देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड आहे, ज्याचें चित्त देवांत आणि धर्मांत रमतें, आणि इच्छा न ठेवतां जो भगवंताची भक्ति करतो तो सत्वगुण होय.

सात्विक माणसाच्या अंगीं आढळणारा हा सत्वगुण संसारसागरांतून तारणारा आहे. त्यानें ज्ञानमार्गांतील आत्मनात्मविवेक उत्पन्न होतो. सत्वगुणानें भगवंताची  भक्ति घडते, सत्वगुणानें ज्ञानाची प्राप्ती होतें, मनुष्य आत्मज्ञानी होतो. सत्वगुणानेंच सायुज्यमुक्ति मिळते. अहि सत्वगुणाची अवस्था थोडक्यांत माझ्या बुद्धिप्रमाणें मी सांगितली. श्रोत्यांनीं सावध व्हावें व पुढील समासाकडे लक्ष द्यावें.