श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, January 27, 2011

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास नववा : विरक्त लक्षण ||



||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास नववा : विरक्त लक्षण ||
              
||श्रीराम ||

ऐका विरक्तांची लक्षणें| विरक्तें असावें कोण्या गुणें |
जेणें आंगीं सामर्थ्य बाणें| योगियाचें ||||

जेणें सत्कीर्ति वाढे| जेणें सार्थकता घडे |
जेणेंकरितां महिमा चढे| विरक्तांसी ||||

जेणें परमार्थ फावे| जेणें आनंद हेलावे |
जेणें विरक्ति दुणावे| विवेकेंसहित ||||

जेणें सुख उचंबळे| जेणें सद्विद्या वोळे |
जेणें भाग्यश्री प्रबळे| मोक्षेंसहित ||||

मनोरथ पूर्ण होती| सकळ कामना पुरती |
मुखीं राहे सरस्वती| मधुर बोलावया ||||

हे लक्षणें श्रवण कीजे| आणी सदृढ जीवीं धरिजे |
तरी मग विख्यात होईजे| भूमंडळीं ||||

विरक्तें विवेकें असावें| विरक्तें अध्यात्म वाढवावें |
विरक्तें धारिष्ट धरावें| दमनविषईं ||||

विरक्तें राखावें साधन| विरक्तें लावावें भजन |
विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान| प्रगटवावें ||||

विरक्तें भक्ती वाढवावी| विरक्ते शांती दाखवावी |
विरक्तें येत्नें करावी| विरक्ती आपुली ||||

विरक्तें सद्क्रिया प्रतिष्ठावी| विरक्तें निवृत्ति विस्तारावी |
विरक्तें नैराशता धरावी| सदृढ जिवेंसीं ||१०||

विरक्तें धर्मस्थापना करावी| विरक्तें नीति आवलंबावी |
विरक्तें क्ष्मा सांभाळावी| अत्यादरेंसी ||११||

विरक्तें परमार्थ उजळावा| विरक्तें विचार शोधावा |
विरक्तें सन्निध ठेवावा| सन्मार्ग सत्वगुण ||१२||

विरक्तें भाविकें सांभाळावीं| विरक्तें प्रेमळें निववावीं |
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं| शरणागतें ||१३||

विरक्तें असावें परम दक्ष| विरक्तें असावें अंतरसाक्ष |
विरक्तें वोढावा कैपक्ष| परमार्थाचा ||१४||

विरक्तें अभ्यास करावा| विरक्तें साक्षेप धरावा |
विरक्तें वग्त्रृत्वें उभारावा| मोडला परमार्थ ||१५||

विरक्तें विमळज्ञान बोलावें| विरक्तें वैराग्य स्तवीत जावें |
विरक्तें निश्चयाचें करावें| समाधान ||१६||

पर्वें करावीं अचाटें| चालवावी भक्तांची थाटे |
नाना वैभवें कचाटें| उपासनामार्ग ||१७||

हरिकीर्तनें करावीं| निरूपणें माजवावीं |
भक्तिमार्गे लाजवावीं| निंदक दुर्जनें ||१८||

बहुतांस करावे परोपकार| भलेपणाचा जीर्णोद्धार |
पुण्यमार्गाचा विस्तार| बळेंचि करावा ||१९||

स्नान संध्या जप ध्यान| तीर्थयात्रा भगवद्भजन |
नित्यनेम पवित्रपण| अंतरशुद्ध असावें ||२०||

दृढ निश्चयो धरावा| संसार सुखाचा करावा |
विश्वजन उद्धरावा| संसर्गमात्रें ||२१||

विरक्तें असावें धीर| विरक्तें असावें उदार |
विरक्तें असावें तत्पर| निरूपणविषईं ||२२||

विरक्तें सावध असावें| विरक्तें शुद्ध मार्गें जावें |
विरक्तें झिजोन उरवावें| सद्कीर्तीसी ||२३||

विरक्तें विरक्त धुंडावे| विरक्तें साधु वोळखावे |
विरक्तें मित्र करावे| संत योगी सज्जन ||२४||

विरक्तें करावीं पुरश्चरणें| विरक्तें फिरावीं तीर्थाटणें |
विरक्तें करावीं नानास्थानें| परम रमणीय ||२५||

विरक्तें उपाधी करावी| आणि उदासवृत्ति न संडावी |
दुराशा जडो नेदावी| कोणयेकविषईं ||२६||

विरक्तें असावें अंतरनिष्ठ| विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट |
विरक्तें न व्हावें कनिष्ठ| पराधेनपणें ||२७||

विरक्तें समय जाणावा| विरक्तें प्रसंग वोळखावा |
विरक्त चतुर असाअवा| सर्वप्रकारें ||२८||

विरक्तें येकदेसी नसावें| विरक्तें सर्व अभ्यासावें |
विरक्तें अवघें जाणावें| ज्याचें त्यापरी ||२९||

हरिकथा निरूपण| सगुणभजन ब्रह्मज्ञान |
पिंडज्ञान तत्वज्ञान| सर्व जाणावें ||३०||

कर्ममार्ग उपासनामार्ग| ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग |
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग| सकळ जाणावें ||३१||

प्रेमळ स्थिती उदास स्थिती| योगस्थिती ध्यानस्थिती |
विदेह स्थिती सहज स्थिती| सकळ जाणावें ||३२||

ध्वनी लक्ष मुद्रा आसनें| मंत्र यंत्र विधी विधानें |
नाना मतांचें देखणें| पाहोन सांडावें ||३३||

विरक्तें असावें जगमित्र| विरक्तें असावें स्वतंत्र |
विरक्तें असावें विचित्रबहुगुणी ||३४||

विरक्तें असावें विरक्त| विरक्तें असावें हरिभक्त |
विरक्तें असावें नित्यमुक्त| अलिप्तपणें ||३५||

विरक्तें शास्त्रें धांडोळावीं| विरक्तें मतें विभांडावीं |
विरक्तें मुमुक्षें लावावीं| शुद्धमार्गें ||३६||

विरक्तें शुद्धमार्ग सांगावा| विरक्तें संशय छेदावा |
विरक्तें आपला म्हणावा| विश्वजन ||३७||

विरक्तें निंदक वंदावें| विरक्तें साधक बोधावे |
विरक्तें बद्ध चेववावे- | मुमुक्षनिरूपणें ||३८||

विरक्तें उत्तम गुण घ्यावे| विरक्तें अवगुण त्यागावे |
नाना अपाय भंगावे| विवेकबळें ||३९||

ऐसीं हे उत्तम लक्षणें| ऐकावीं येकाग्र मनें |
याचा अव्हेर न करणें| विरक्त पुरुषें ||४०||

इतुकें बोलिलें स्वभावें| त्यांत मानेल तितुकें घ्यावें |
श्रोतीं उदास न करावें| बहु बोलिलें म्हणौनी ||४१||

परंतु लक्षणें ने घेतां| अवलक्षणें बाष्कळता |
तेणें त्यास पढतमूर्खता| येवों पाहे ||४२||

त्या पढतमूर्खाचें लक्षण| पुढिले समासीं निरूपण |
बोलिलें असे सावधान- | होऊन आइका ||४३||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विरक्तलक्षणनाम समास नववा ||||२. ९


माणसाच्या अंगीं वैराग्य बाणलें म्हणजे त्यास कोणकोणत्या गोष्टी साधतात त्याचें वर्णन. :
आतां विरक्त म्हणजेच वैराग्यसंपन्न पुरुषाचीं लक्षणें ऐका. विरक्तीच्या अंगीं कोणते गुण असावेत तें सांगतों. त्या गुणांनीं त्याच्या अंगीं योग्याचें सामर्थ्य बाणतें. या गुणानीं कीर्ती सगळीकडे पसरते, आपल्या जन्माचें सार्थक होतें, आंनी विरक्ताचें वैभव वाढतें. या गुणानीं परमार्थ साधतो, स्वानंद उचंबळून येतो, आणि आत्मानात्मविवेकासकट वैराग्याला दुप्पट तेज येंतें.

या गुणांनीं आत्मसुख बरून वाहूं लागतें, सद्विद्या वास होतें म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येतो, आणि मोक्षासह सर्व भाग्य व ऐश्वर्य जीवनांत विलसूं लागतें. या गुणांनीं मनांतील सर्व अपेक्षा पूर्ण होतात, सार्‍या इच्छा पुरतात, आणि अत्यंत गोष बोलण्यासाठीं प्रत्यक्ष सरस्वति मुखांत येऊन राहते. विरक्ताची हीं लक्षणें ऐकावीत, मनांत तीं घटत धरून ठेवावीत. म्हणजे मग माणूस जगामध्यें प्रख्यात होतो.

समर्थांचा विरक्त स्वत: मोठा ब्रह्मज्ञानी, अत्यंत निष्काम, विलक्षण शांत आणि चतुर लोकसंग्रहकर्ता पुरुष आहे. मोठ्या धीरपणें तो आपलें नेतेपण सांभाळतो, तो लोकांना अध्यात्म शिकवितो, त्यांच्या अंतर्यामी खरा विवेक निर्माण करतो, समाजातील उच्च, नीच, उत्तम, हीन, वगैरे सर्व कक्षेंतील माणसांना जवळ करून तो त्यांना सन्मार्गाकडे वळवितो. तो सर्वांचें समाधान करतो. :
विरक्तानें नेहमी विवेक जागृत ठेवावा, त्यानें लोकांमध्यें अध्यात्म वाढवावें, आणि इंदियें आवरून ताब्यांत ठेवण्याविषयीं त्यानें मोठें धैर्य दाखवावें. त्यानें आपले साधन चांगलें सांभाळावें. त्यानें लोक भजनास लावावें म्हणजे भगवंताच्या मार्गास लावावें, पण त्यानें विशेषत: ब्रह्मज्ञान प्रगट करावें म्हणजे ब्रह्मज्ञान कसें असतें हें स्वानुभवानें व शब्दानें लोकांना प्रत्यक्ष दाखवावें. त्यानें लोकांमध्यें भक्तिमार्ग वाढवावा, शांती कशी असतें हें त्यानें शांति ठेवून दाखवावें, आपली विरक्ती त्यानें मोठ्या प्रयत्नानें सांभाळावी. त्यानें सत्कार्मांना महत्व देऊन त्यांची स्थापना करावी, त्यानें विरक्तीचा, वैराग्याचा अनासक्तीचा प्रसार करावा, आणि स्वत: निर्वासनता, निष्कामता आपल्या जीवाशी घट्ट धरून ठेवावी.

त्यानें धर्मांचें महत्व वाढवावें, त्याचें पुनरुज्जीवन करावें, त्यानें अत्यंत नीतिमान असावें, आणि अगदी मनापासून आपली क्षमाशील वृत्ती जपावी. त्यानें मंद झालेला परमार्थ पुन्ह: सतेज करावा, त्यानें सदा चिंतनशील असावें, विचाराची कक्षा वाढवीत असावें, आणि सत्वगुण जवळ ठेवून नेहमी सन्मार्गानें जावें. त्यानें श्रद्धावंतांना सांभाळावें, भगवंतावर प्रेम करणार्‍यांचा मनस्ताप शांत करावा, आणि भोळ्या भाबड्या पण शरण आलेल्या माणसांना दूर करुं नये. त्यानें अति सावधपणें वागवेम, त्यानें दुसर्‍याचें अंतरंग ओळखून असावें, आणि त्यानें नेहमी परमार्थाचा कैवार घ्यावा, परमार्थाची बाजू उचलून धरावी. त्यानें नेहमी अभ्यास करावा, त्यानें बहुश्रुत असावें, त्यानें नेहीम उद्योगरत राहावें, आणि आपल्या वक्तृत्वाच्या बळानें बिघडलेला किंवा मंद झालेला परमार्थ पुन्हा प्रचलित करावा. त्यानें शुद्ध ज्ञान आत्मज्ञान सांगत जावें, त्यानें वैराग्याची स्तुती करीत जावी, आणि लोकांच्या शंकांचे निवारण करून त्यांना खात्रीनें भरलेले समाधान द्यावें. 


विरक्तानें अध्यात्म वाढवावें व परमार्थ उजळावा असें सांगितले. भक्तिमार्गाचा प्रसार होण्यासाठीं विरक्त कोणते उपाय करुं शकतो त्याचे वर्णन आतां सांगतात. :
प्रचंड प्रमाणावर पर्वांचा उत्सव विरक्तानें करावा, भक्ताचें मोठे समुदाय एकत्र आणावें, आणि भजन, पूजन, जप, कीर्तन वगैरे उपासना करण्याचे मार्ग मोठ्या वैभवानें साजरे करावे. पुष्कळ हरिकीर्तनें करावीं, प्रवचने आणि निरुपणें यांची तर नुसतीं गर्दी करुन सोडावी, आणि अशा रीतीनें जे निंदक दुर्जन असतात त्यांना भक्तिमार्गाच्या ऐश्वर्यानें लाजवून टाकावें.  विरक्तानें खूप लोकांवर उपकार करावा, सज्जनपणाचा जीर्णोद्धार करावा, आणि आग्रहानें पुण्यमार्गाचा प्रसार करावा. अध्यात्माचा विस्तार करतांना विरक्तानें स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवंताचे भजन, नित्यनेम आणि पवित्रपणा या सर्व गोष्टींचा समावेश करावा. त्याबरोबरच अंत:करण शुध्द असावें. विरक्तानें अति दृढ निश्चयानें वागवेम, सर्वांना सुख लागेल अशा तर्‍हेनें प्रपंच करावा, आणि केवळ आपल्या सहवासानें सर्व लोकांचे कल्याण करावें. 

श्री समर्थांचा विरक्त पुरुष एकांतप्रिय असून मोठाच लोकसंग्रही असतो. त्याचें लोकसंग्रह करण्याचें तंत्र काय असतें याचें वर्णन आतां करतात. :
विरक्तानें निर्भय व गंभीर असावें, उदार असावें, आणि प्रवचनाच्या बाबतींत तर त्यानें अत्यंत प्रामाणिक व वाहिलेलें असावें. त्यानें नेहमी सावध असावें, केव्हांही शुध्द मार्गानेंच जावें, आणि अशा रीतीनें लोकांकरिता झिजून आपलें नांव मागें ठेवावें. विरक्तानें आपल्यासारखें विरक्त पुरुष शोधून काढावें, साधु पुरुष ओळखून काढावें, आणि संत, योगी व सज्जन यांच्याशीं मित्रत्वाचा स्नेहसंबंध जोडावा. त्याने स्वत: पुरश्चरणें करावीं, हिंडून तीर्थस्नानें पहावीं, आणि उपासनेला योग्य अशी निरनिराळीं स्थानें सुंदर बनवून टाकावीं. विरक्तानें लोकांची म्हणजे, परोपकाराचीं कामें आपल्या मागें लावून घ्यावीं. परंतु आपली अलिप्तपणाची अंतरस्थिति कायम ठेवावी, मागें लावून घेतलेल्या कामांमध्यें आसक्त होण गुंतून जाऊं नये. तसेच कशाबद्दलही कोणतीही अपेक्षा त्यानें आपल्या मनांत ठेवूं नये. विरक्तानें नेहमी अंतर्मुख वृत्तीनें असावें, तरीपण त्यानें आचरणानें पवित्र असावें, कोणाच्या तरी ताब्यांत जाऊन त्यानें कधीही मिंधेपण न घ्यावें.

विरक्तानें काळाची पावलें ओळखावी, प्रसंग कसा आहे तें ओळखावें, विरक्त सर्व बाजूनें हुशार असावा. विरक्तानें एकांगीं असूं नये. त्यानें ज्ञानाच्या सर्व अंगांचा अभ्यास करावा.    

विरक्त खर्‍या अर्थानें बहुश्रुत असावा. त्याच्या ज्ञानाला खोली असली पाहिजे हें तर खरेंच, पण त्याचबरोबर त्यास लांबी व रुंदीदेखील हवी असा श्री समर्थांचा दृष्टिकोन आहे. :
भगवंताच्या सगुण चरित्राचें वर्णन, वेदांतसिद्धांताचें विवेचन, सगुण रूपाचें भजनपूजन, परमात्मस्वरूपाचें ज्ञान, शरीररचनेचें ज्ञान आणि तत्वज्ञान या सर्व अध्यात्म अंगांचें ज्ञान विरक्ताला असावें. तसेंच कर्ममार्ग म्हणजे काय, उपासनामार्ग कोणता, ज्ञानमार्ग कसा असतो, सिद्धांत मार्ग कशाला म्हणतात, प्रवृत्तीमार्ग व निवृत्तिमार्ग यांचीं लक्षणें कोणतीं या सगळ्या परमार्थ साधनांचें ज्ञान विरक्ताला असावें. भगवंताचे प्रेम उदय पावल्यावरची अवस्था, वासना क्षीण झाल्यावरची अलिप्तपणाची अवस्था, योगाभ्यासानें येणारी अवस्था, ध्यान साधलें म्हणजे होणारी अवस्था, देहाचें भान लोपल्यावर होणारी अवस्था, तुर्या पचनीं पडल्यावर होणारी अवस्था या सर्व साक्षात्कार लक्षणाचें ज्ञान विरक्ताला असावें. नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व दर्शनें, नाना प्रकारच्या योगमुद्रा व योगासनें, अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारची यंत्रे, अनेक प्रकारचे विधी व विधानें, तसेच लोकांमध्यें प्रचलित असलेल्या अनेक मतांचे मर्म, या सर्व पारमार्थिक गोष्टी विरक्तानें समजून घेऊन मग सोडून द्याव्या.

हें सांगून झाल्यावर सर्वसाधारणपणें आपल्या वागण्यांत विरक्तानें कोणतें धोरण सांभाळावें ते सांगतात. :
विरक्तानें जगमित्र असावें, त्यानें संपूर्णपणें स्वतंत्र असावें, तो विचित्र व विलक्षण दिसेल इतके नाना तर्‍हेचे गुण त्याच्या अंगीं असावे. विरक्तानें अगदी खरोखर वैराग्यसंपन्न असावें, तो भगवंताचा भक्त असावा, कशातही आसक्ति न ठेवतां त्यानें साडीव मोकळें, बंधनरहित असावें. विरक्तानें शास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करावा, परमार्थाला घटक असणारीं, विरोध करणारीं मतें खोडून काढावीं, आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असणार्‍या लोकांना शुध्द साधनमार्गाला लावावें. विरक्तानें आपल्या निरुपणामध्यें अगदी शुद्ध परमार्थमार्ग सांगावा, शंका घेणार्‍याच्या शंकांचें त्यानें निरसन करावें. जगांमधील सर्व लोकांवर त्यानें आपलेपणानें प्रेम करावें. विरक्तानें आपल्या निंदकांना वंदन करावें, जे साधकवृत्तीचे असतील त्यानां साधनमार्गाचे बरोबर ज्ञान करून द्यावें. आणि "मला भगवंत हवा" हि इच्छा उत्पन्न होईल असें उत्कट प्रवचन करून प्रपंचांत गुंतलेल्या लोकांना परमार्थासाठीं जागें करावें. सारांश, विरक्तानें उत्तम गुणांचा स्वीकार करावा. वाईट गुणांचा त्याग करावा, आणि आपल्या वैराग्याच्या आड येणारी जीं संकटें व अडचणीं असतील त्यांना विवेकाच्या जोरावर नाहींसें करून टाकावें.

शेवटीं या महत्वाच्या समासाच्या श्री समर्थ उपसंहार करतात. :
अशीं हीं उत्तम लक्षणें आहेत. एकाग्र मन करून तीं ऐकावीत. विरक्त पुरुषानें त्यांचा अव्हेर करुं नयें. माझ्या अनुभवला आलेली व म्हणून मला पटलेलीं इतकीं लक्षणें मी सहज बोलून गेलो त्यांतील जेवढीं पसंत पडतील व आवडतील तेवढीं घ्यावीत. मी फार बोललो म्हणून श्रोत्यांनी खिन्न होऊं नये. परंतु हीं उत्तम लक्षणें न स्वीकारतां अवलक्षणांचा अंगीकार केला तर माणसाच्या जीवनाला कांहीं ताळतंत्र राहत नाहीं, अशा माणसाच्या अंगीं पढतमूर्खपणा येउं पाहतो. पुढील समासांत त्या पढतमूर्खाच्या लक्षणांचें विवेचन आहे. तें लक्ष देऊन ऐकावें.


http://www.facebook.com/home.php?sk=group_156567157721240&ap=1
सामील व्हा, समर्थांचे दासबोधातील विचार पाहा...एक व्हा !