श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, January 28, 2011

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास दहावा : पढतमुर्ख लक्षण ||


||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास दहावा : पढतमुर्ख लक्षण ||

||श्रीराम ||

मागां सांगितलीं लक्षणें| मूर्खाआंगी चातुर्य बाणे |
आतां ऐका शाहाणे- | असोनि, मूर्ख ||||

तया नांव पढतमूर्ख| श्रोतीं न मनावें दुःख |
अवगुण त्यागितां सुख- | प्राप्त होये ||||

बहुश्रुत आणि वित्पन्न| प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान |
दुराशा आणि अभिमान| धरी, तो येक पढतमूर्ख ||||

मुक्तक्रिया प्रतिपादी| सगुणभक्ति उछेदी |
स्वधर्म आणि साधन निंदी| तो येक पढतमूर्ख ||||

आपलेन ज्ञातेपणें| सकळांस शब्द ठेवणें |
प्राणीमात्राचें पाहे उणें| तो येक पढतमूर्ख ||||

शिष्यास अवज्ञा घडे| कां तो संकटीं पडे |
जयाचेनि शब्दें मन मोडे | तो येक पढतमूर्ख ||||

रजोगुणी तमोगुणी| कपटी कुटिळ अंतःकर्णी |
वैभव देखोन वाखाणी| तो येक पढतमूर्ख ||||

समूळ ग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण |
गुण सांगतां अवगुण- | पाहे तो येक पढतमूर्ख ||||

लक्षणें ऐकोन मानी वीट| मत्सरें करी खटपट |
नीतिन्याय उद्धट| तो येक पढतमूर्ख ||||

जाणपणें भरीं भरे| आला क्रोध नावरे |
क्रिया शब्दास अंतरे| तो येक पढतमूर्ख ||१०||

वक्ता अधिकारेंवीण| वग्त्रृत्वाचा करी सीण |
वचन जयाचें कठीण| तो येक पढतमूर्ख ||११||

श्रोता बहुश्रुतपणें| वक्तयास आणी उणें |
वाचाळपणाचेनि गुणें| तो येक पढतमूर्ख ||१२||

दोष ठेवी पुढिलांसी| तेंचि स्वयें आपणापासीं |
ऐसें कळेना जयासी| तो येक पढतमूर्ख ||१३||

अभ्यासाचेनि गुणें| सकळ विद्या जाणे |
जनास निवऊं नेणें| तो येक पढतमूर्ख ||१४||

हस्त बांधीजे ऊर्णतंतें| लोभें मृत्य भ्रमरातें |
ऐसा जो प्रपंची गुंते| तो येक पढतमूर्ख ||१५||

स्त्रियंचा संग धरी| स्त्रियांसी निरूपण करी |
निंद्य वस्तु आंगिकारी| तो येक पढतमूर्ख ||१६||

जेणें उणीव ये आंगासी| तेंचि दृढ धरी मानसीं |
देहबुद्धि जयापासीं| तो येक पढतमूर्ख ||१७||

सांडूनियां श्रीपती| जो करी नरस्तुती |
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती- | वर्णी, तो येक पढतमूर्ख ||१८||

वर्णी स्त्रियांचे आवेव| नाना नाटकें हावभाव |
देवा विसरे जो मानव| तो येक पढतमूर्ख ||१९||

भरोन वैभवाचे भरीं| जीवमात्रास तुछ्य करी |
पाषांडमत थावरी| तो येक पढतमूर्ख ||२०||

वित्पन्न आणी वीतरागी| ब्रह्मज्ञानी माहायोगी |
भविष्य सांगों लागे जगीं| तो येक पढतमूर्ख ||२१||

श्रवण होतां अभ्यांतरीं| गुणदोषाची चाळणा करी |
परभूषणें मत्सरी| तो येक पढतमूर्ख ||२२||

नाहीं भक्तीचें साधन| नाहीं वैराग्य ना भजन |
क्रियेविण ब्रह्मज्ञान- | बोले, तो येक पढतमूर्ख ||२३||

न मनी तीर्थ न मनी क्षेत्र| न मनी वेद न मनी शास्त्र |
पवित्रकुळीं जो अपवित्र| तो येक पढतमूर्ख ||२४||

आदर देखोनि मन धरी| कीर्तीविण स्तुती करी |
सवेंचि निंदी अनादरी| तो येक पढतमूर्ख ||२५||

मागें येक पुढें येक| ऐसा जयाचा दंडक |
बोले येक करी येक| तो येक पढतमूर्ख ||२६||

प्रपंचविशीं सादर| परमार्थीं ज्याचा अनादर |
जाणपणें घे अधार| तो येक पढतमूर्ख ||२७||

येथार्थ सांडून वचन| जो रक्षून बोले मन |
ज्याचें जिणें पराधेन| तो येक पढतमूर्ख ||२८||

सोंग संपाधी वरीवरी| करूं नये तेंचि करी |
मार्ग चुकोन भरे भरीं| तो येक पढतमूर्ख ||२९||

रात्रंदिवस करी श्रवण| न संडी आपले अवगुण |
स्वहित आपलें आपण| नेणे तो येक पढतमूर्ख ||३०||

निरूपणीं भले भले| श्रोते येऊन बैसले |
क्षुद्रें लक्षुनी बोले| तो येक पढतमूर्ख ||३१||

शिष्य जाला अनधिकारी| आपली अवज्ञा करी |
पुन्हां त्याची आशा धरी| तो येक पढतमूर्ख ||३२||

होत असतां श्रवण| देहास आलें उणेपण |
क्रोधें करी चिणचिण| तो येक पढतमूर्ख ||३३||

भरोन वैभवाचे भरीं| सद्गुरूची उपेक्षा करी |
गुरुपरंपरा चोरी| तो येक पढतमूर्ख ||३४||

ज्ञान बोलोन करी स्वार्थ| कृपणा ऐसा सांची अर्थ |
अर्थासाठीं लावी परमार्थ| तो येक पढतमूर्ख ||३५||

वर्तल्यावीण सिकवी| ब्रह्मज्ञान लावणी लावी |
पराधेन गोसावी| तो येक पढतमूर्ख ||३६||

भक्तिमार्ग अवघा मोडे| आपणामध्यें उपंढर पडे |
ऐसिये कर्मीं पवाडे| तो येक पढतमूर्ख ||३७||

प्रपंच गेला हातीचा| लेश नाहीं परमार्थाचा |
द्वेषी देवां ब्राह्मणाचा| तो येक पढतमूर्ख ||३८||

त्यागावया अवगुण| बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण |
विचक्षणें नीउन पूर्ण| क्ष्मा केलें पाहिजे ||३९||

परम मूर्खामाजी मूर्ख| जो संसारीं मानी सुख |
या संसारदुःखा ऐसें दुःख| आणीक नाहीं ||४०||

तेंचि पुढें निरूपण| जन्मदुःखाचें लक्षण |
गर्भवास हा दारुण| पुढें निरोपिला ||४१||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पढतमूर्खलक्षणनाम समास दहावा ||१०||२. १०


|| दशक दुसरा समाप्त ||


शहाणा म्हणवितो आणि मूर्खपणानें वागतो तो पढतमुर्ख होय :
मूर्ख माणूस देखील चतुर बनेल अशीं लक्षणें मागें सांगितली. आतां जे लोक शहाणें असून मुर्खासारखें वागतात त्यांचें वर्णन ऐका. त्यांना पढतमुर्ख हे नांव आहे. त्यांचीं कांहीं लक्षणें आपल्या अंगीं आढळलीं तरी श्रोत्यांनीं मनाला लावून घेउं नये, ते अवगुण प्रयत्नांने सोडतां येतात व नंतर माणूस सुखी बनतो.

ज्याच्या जीवनांत विचार आणि आचार, ज्ञान आणि क्रिया, किंवा ध्येय आणि साधन यांमध्यें समजून समजून विरोध आढळतो तो श्री समर्थांचा पढतमूर्ख आहे. :
जो पुष्कळ ग्रंथ वाचतो आणि स्वत: विद्वान आहे, जो सुंदर सरळ रीतीनें ब्रह्मज्ञान सांगतो, पण वासना आणि अभिमान बाळगतो तो पढतमूर्ख होय. ब्रह्मज्ञान झाल्यावर वाटेल तसें वागवेम, बंधनरहित आचरण करावें असें प्रतिपादन करतो, सगुणाची भक्ति व्यर्थ आहे असें जो सांगतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो तो पढतमूर्ख होय. आपण सात: मोठे ज्ञान आहोत या अभिमानानें जो सर्वांना नावें तेवतो, आणि लोकांचे दोष पाहण्यात मोठा चतुर असतो तो पढतमूर्ख होय. आपल्या शिष्याला पाळतां येणारच नाहीं अशी आज्ञा जो करतो किंवा शिष्य संकटांत सांपडेल अशी आज्ञा जो करतो, ज्याच्या शब्दानें लोकांचें मन कष्टी होतें तो पढतमूर्ख होय. रजोगुण व तमोगुण यांनीं जो भरलेला असतो, जो कपटी असतो, ज्याचें अंत:करण दुष्ट असतें, आणि श्रीमंत माणसांची जो खोटी स्तुती करतो पढतमूर्ख होय. एखादा ग्रंथ संपूर्ण वाचल्याशिवाय विनाकारण त्याला नांवें ठेवतो, आणि त्यांतील गुण सांगायला जावें तर जो अवगुणच शोधतो तो पढतमूर्ख होय. चांगलीं लक्षणें सांगायला गेलें तर ज्याला त्याचा कामतला येतो, द्वेष मत्सराच्या पोटीं जो अनेक उपद्व्याप करतो, नितीन्यायाची चाड नसून जो उद्धट असतो तो पढतमूर्ख होय. मी मोठा ज्ञानी आहे अशा धमेंडीनें जो भलतीच आकांक्षा धरतो, आलेला संताप ज्याला अनावर होतो, आणि ज्याचें बोलणें एक तर करणें दुसरेंच असतें तो पढतमूर्ख होय.

योग्यता नसतांना जो वक्ता बनतो आणि कोणी ऐकत नसून बोलण्याचें विनाकारण श्रम करतो, ज्याचें बोलणें कठोर असतें तो पढतमूर्ख होय. एखादा बहुश्रुत आणि तोंडाळ श्रोता गुणांच्या सहाय्यानें वक्त्याला कमीपणा आणील तो तो पढतमूर्ख होय. जो दुसर्‍याचे दोष काढून त्याला नावें ठेवतो. पण तेच दोष स्वत्ल्च्या अंगीं आहेत हें ज्याच्या लक्षांत येत नाही तो तो पढतमूर्ख होय. जर मोठा अभ्यासी असल्यानें सगळ्या विद्यांचें ज्ञान करून घेतो, परंतु जो लोकांना सुख समाधान देऊन त्यांचें मन शांत करुं शकत नाही तोतो पढतमूर्ख होय.        

कामवासना, पैसा आणि लौकिक यांच्या आधीन होऊन जो भगवंताला विसरतो तो पढतमूर्ख असतो असतें आतां सांगतात. :
कोळ्याच्या अंगांतील नाजुक तंतूंनीं एखादा हत्ती बांधून ठेवतात किंवा सुगंधाच्या लोभानें एखादा भुंगा कोमल कमळांत अडकून मारून जातो, त्याचप्रमाणें परमार्थ साधण्याचें समर्थ असणारा जो प्रपंचात गुंतून फुकट जातो तो पढतमूर्ख होय. जो स्त्रियांच्या संगतींत रमतों, स्त्रियांनाच ब्रह्मज्ञान सांगत सुटतो, निंद्य वस्तूंचें सेवन करतो तो पढतमूर्ख होय. ज्यानें स्वत:ला कमीपणा येतो तेंच जो मनांमध्यें घट्ट धरून ठेवतो, मी देहच आहे अशी ज्याची भावना असते तो पढतमूर्ख होय.

भगवंताची स्तुति करण्याचें सोडून जो माणसाची स्तुति करतो, किंवा ज्याच्याशीं गांठ पडते त्याचीच फार तारीफ करुं लागतो तो पढतमूर्ख होय. जो स्त्रियांच्या अवयवांचें वर्णन कतो, किंवा त्यांची नाना सोंगें घेऊन त्यांचा हावभाव, अभिनय करून दाखवितो, जो भगवंताला विसरतो तो पढतमूर्ख होय. ऐश्र्वर्य असेल तर त्याच्या घमेंडीमध्यें सर्व जीवमात्रांस  हीन समजतो, शास्त्रविरुध्द मतांचें जो प्रतिपादन करतो, त्यांना आधार देतो तो पढतमूर्ख होय.

जो विद्वान आहे व विरक्त आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे व महायोगी आहे, पण अधिकार असूनही जो लोकांना भविष्य सांगूं लागतो तो पढतमूर्ख होय. कांहीं चांगलें ऐकायला मिळालें कीं ज्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटतो तो पढतमूर्ख होय.

भगवंताला विसरणें हें तर पढतमूर्खांचें लक्षण आहेच, परंतु जो कशालाच व कोणालाच मानीत नाहीं, जो बोलतो एक व करतो दुसरेच, आणि जो स्वहित करून घेत नाहीं तो मोठा पढतमूर्ख समजावा. :
जो कधीं भक्तिमार्गानें गेलाच नाहीं, ज्याच्या अंगीं वैराग्य नाहीं ज्यानें कधीं भक्तपूजन केलें नाहीं, आणि असें असून जो आचरणरहित ब्रह्मज्ञान बोलतो तो पढतमूर्ख होय. तीर्थ, क्षेत्र, वेद आणि शास्त्र यांपैकीं जो कांहींच मानीत नाहीं, पवित्र कुळांत जन्म येऊन जो अपवित्रपणें म्हणजे भ्रष्टपणें वागतो पढतमूर्ख होय.

जो कोणी आपल्याला आदर देतो त्याची जो मनधरणी करतो, ज्याची खरी योग्यता नाहीं त्याची जो स्तुति करतो, पण लगेच त्याची निंदा व अनादर करायला तयार होतो तो पढतमूर्ख होय. माणसाच्या तोंडावर एक बोलायचें आणि त्याच्या पाठीमागें दुसरेंच बोलायचें ही ज्याच्या वागण्याची नेहमीची पद्धत असते, जे बोलतो एक तर करतो दुसरेच तो पढतमूर्ख होय. ज्याला प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो, परमार्थबद्दल अत्यंत अनादर असतो, समजून उमजून जो प्रपंचाचा आधार घेतो तो पढतमूर्ख होय. जें योग्य आहे तें सांगायचें सोडून केवळ दुसर्‍याला बरें वाटावें म्हणून जो अयोग्य देखील बोलतो, जो दुसर्‍यावर अवलंबून जगतो तो पढतमूर्ख होय.

जो चांगलें वागण्याचें सोंग बरोबर करतो किंवा ज्याचें वरवरचें वागणें सोंगाप्रमाणे बरोबर चालतें, पण करुं नये तेंच कर्म जो लपून करतो, आपला मार्ग चुकला हें समजून देखील केवळ हट्टानें त्यापासून बाजूला सरत नाहीं, तो पढतमूर्ख होय. रात्रंदिवस चांगल्या उपदेशाचें श्रवण करीत राहून सुद्धां जो आपले अवगुण सांडीत नाहीं, आणि स्वत:चें हित कशात आहे हे ज्याला काळात नाहीं तो पढतमूर्ख होय.

जो लोकसंग्रह करुं शकत नाहीं, जो सदगुरूला विसरतो, जो आपल्या प्रपंचासाठी परमार्थ वापरतो आणि अखेर धड प्रपंच ना परमार्थ अशी ज्याची अवस्था होते तो पुरुष पढतमूर्ख समजावा असें सांगतात. :
त्याचें प्रवचन ऐकायला थोर सज्जन व पारमार्थिक अधिकारी येऊन बसलें असतां त्यांची क्षुद्र न्यूनें काढून बाजूला जो बोलतो तो पढतमूर्ख होय. ज्याचा शिष्य परमार्थमार्गावरून घसरला आणि त्यानें गुरूचा अपमान केला, तरी जो पुन: त्याची अपेक्षा धरतो तो पढतमूर्ख होय. कीर्तन, प्रवचन वा पुराण श्रवण करीत असतां देह्धार्मामुळें कांहीं उणेपणा आला, खोकला आला किंवा शिंक आली किंवा कमरेला काळ लागली तर जो रागानें तणतणतो तो पढतमूर्ख होय. आपल्या ऐश्वर्याच्या घमेंडीनें व उन्मादानें जो सदगुरूची किंमत ठेवीत नाहीं, जो आपली गुरुपरंपरा कोणाशी सांगत नाहीं तो पढतमूर्ख होय. ज्ञानाच्या मोठमोठ्या बाता मारून जो आपला स्वार्थ साधतो, एखाद्या कंजुष माणसाप्रमाणें को पैसा सांठवितो, पैसा मिळविण्यासाठीं जो परमार्थ वापरतो तो पढतमूर्ख होय.

आपण स्वत: तसें न वागता जो लोकांना तसें वागण्याचा उपदेश करतो, स्वत: ब्रह्मज्ञानी नसून लोकांमध्यें ब्रह्मज्ञान पेरण्याचा खटाटोप करतो, त्याचा प्रसार करण्याच्या नादीं लागतो, विरक्तपणाचा पेशा असून जो परतंत्रपणें दुसर्‍याच्या आधीन होऊन वागतो तो पढतमूर्ख होय. जीं कर्मे केलीं असतां सगळा भक्तिमार्ग मोडकळीस येतो आणि स्वत:चें जीवन अस्ताव्यस्त होऊन जातें तीं कर्में करण्यास जो मागेपुढें पहात नाहीं तो पढतमूर्ख होय.

प्रपंच अशाश्वत म्हणून तो हातचा गेला, परमार्थ खोटा मानला गेला म्हणून तो केला नाहीं, अशी अवस्था असून देखील जो देवाब्राह्मणांचा द्वेष करतो तो पढतमूर्ख होय.

समासाचा उपसंहार करून श्री समर्थ पुढील दशकाची प्रस्तावना करतात. :
अवगुण सोडावें हा हेतु मनांत बाळगून पढतमुर्खाचीं कांहीं लक्षणें मी सांगितली, विचारवंतांनीं त्यामधील न्यून पूर्ण करावें व मला क्षमा करावी. या संसारामध्यें सुख मिळेल असें जो मानतो तो मुर्खांमधील मोठा मूर्ख समजावा. कारण या संसारदु:खासारखें दुसरें दु:ख नाहीं. पुढील दशकांत त्याचेंच वर्णन आहे, जन्म घेतल्यावर होणारें दु:ख आणि गर्भवासाचें भयंकर दु:ख यांचें वर्णन पुढें केलें आहे.  


दशक दुसरा समाप्त ... ... ...
जय जय रघुवीर समर्थ !!!