श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, February 10, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास पहिला : जन्मदुःख निरूपण ||





||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास पहिला : जन्मदुःख निरूपण ||

||श्रीराम ||

जन्म दुःखाचा अंकुर| जन्म शोकाचा सागर |
जन्म भयाचा डोंगर| चळेना ऐसा ||||

जन्म कर्माची आटणी| जन्म पातकाची खाणी |
जन्म काळाची जाचणी| निच नवी ||||

जन्म कुविद्येचें फळ| जन्म लोभाचें कमळ |
जन्म भ्रांतीचें पडळ| ज्ञानहीन ||||

जन्म जिवासी बंधन| जन्म मृत्यासी कारण |
जन्म हेंचि अकारण| गथागोवी ||||

जन्म सुखाचा विसर| जन्म चिंतेचा आगर |
जन्म वासनाविस्तार| विस्तारला ||||

जन्म जीवाची आवदसा| जन्म कल्पनेचा ठसा |
जन्म लांवेचा वळसा| ममतारूप ||||

जन्म मायेचे मैंदावें| जन्म क्रोधाचें विरावें |
जन्म मोक्षास आडवें| विघ्न आहे ||||

जन्म जिवाचें मीपण| जन्म अहंतेचा गुण |
जन्म हेंचि विस्मरण| ईश्वराचें ||||

जन्म विषयांची आवडी| जन्म दुराशेची बेडी |
जन्म काळाची कांकडी| भक्षिताहे ||||

जन्म हाचि विषमकाळ| जन्म हेंचि वोखटी वेळ |
जन्म हा अति कुश्चीळ| नर्कपतन ||१०||

पाहातां शरीराचें मूळ| या ऐसें नाहीं अमंगळ |
रजस्वलेचा जो विटाळ| त्यामध्यें जन्म यासी ||११||

अत्यंत दोष ज्या विटाळा| त्या विटाळाचाचि पुतळा |
तेथें निर्मळपणाचा सोहळा| केवी घडे ||१२||

रजस्वलेचा जो विटाळ| त्याचा आळोन जाला गाळ |
त्या गळाचेंच केवळ| शरीर हें ||१३||

वरी वरी दिसे वैभवाचें| अंतरीं पोतडें नर्काचें |
जैसें झांकणें चर्मकुंडाचें| उघडितांच नये ||१४||

कुंड धुतां शुद्ध होतें| यास प्रत्यईं धुईजेतें |
तरी दुर्गंधी देहातें| शुद्धता न ये ||१५||

अस्तीपंजर उभविला| सीरानाडीं गुंडाळिला |
मेदमांसें सरसाविला| सांदोसाअंदीं भरूनी ||१६||

अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं| तेंहि भरलें असे देहीं |
नाना व्याधी दुःखें तेंहि| अभ्यांतरी वसती ||१७||

नर्काचें कोठार भरलें| आंतबाहेरी लिडीबिडिलें |
मूत्रपोतडें जमलें| दुर्गंधीचें ||१८||

जंत किडे आणी आंतडी| नाना दुर्गंधीची पोतडी |
अमुप लवथविती कातडी| कांटाळवाणी ||१९||

सर्वांगास सिर प्रमाण| तेथें बळसें वाहे घ्राण |
उठे घाणी फुटतां श्रवण| ते दुर्गंधी नेघवे ||२०||

डोळां निघती चिपडें| नाकीं दाटतीं मेकडें |
प्रातःकाळीं घाणी पडे| मुखीं मळासारिखी ||२१||

लाळ थुंका आणी मळ| पीत श्लेष्मा प्रबळ |
तयास म्हणती मुखकमळ| चंद्रासारिखें ||२२||

मुख ऐसें कुश्चीळ दिसे| पोटीं विष्ठा भरली असे |
प्रत्यक्षास प्रमाण नसे| भूमंडळीं ||२३||

पोटीं घालितां दिव्यान्न| कांहीं विष्ठा कांहीं वमन |
भागीरथीचें घेतां जीवन| त्याची कोये लघुशंका ||२४||

एवं मळ मूत्र आणी वमन| हेंचि देहाचें जीवन |
येणेंचि देह वाढे जाण| यदर्थीं संशय नाहीं ||२५||

पोटीं नस्तां मळ मूत्र वोक| मरोन जाती सकळ लोक |
जाला राव अथवा रंक| पोटीं विष्ठा चुकेना ||२६||

निर्मळपणें काढूं जातां| तरी देह पडेल तत्वतां |
एवं देहाची वेवस्था| ऐसी असे ||२७||

ऐसा हा धड असतां| येथाभूत पाहों जातां |
मग ते दुर्दशा सांगतां| शंका बाधी ||२८||

ऐसिये कारागृहीं वस्ती| नवमास बहु विपत्ती |
नवहि द्वारें निरोधती| वायो कैंचा तेथें ||२९||

वोका नरकाचे रस झिरपती| ते जठराग्नीस्तव तापती |
तेणें सर्वहि उकडती| अस्तिमांस ||३०||

त्वचेविण गर्भ खोळे| तंव मातेसी होती डोहळे |
कटवतिक्षणें सर्वांग पोळे| तया बाळकाचें ||३१||

बांधलें चर्माचें मोटाळें| तेथें विष्ठेचें पेटाळें |
रसौपाय वंकनाळें| होत असे ||३२||

विष्ठा मूत्र वांती पीत| नाकीं तोंडीं निघती जंत |
तेणें निर्बुजलें चित्त| आतिशयेंसीं ||३३||

ऐसिये कारागृहीं प्राणी| पडिला अत्यंत दाटणीं |
कळवळोन म्हणे चक्रपाणी| सोडवीं येथून आतां ||३४||

देवा सोडविसी येथून| तरी मी स्वहित करीन |
गर्भवास हा चुकवीन| पुन्हां न ये येथें ||३५||

ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली| तंव जन्मवेळ पुढें आली |
माता आक्रंदों लागली| प्रसूतकाळीं ||३६||

नाकीं तोंडीं बैसलें मांस| मस्तकद्वारें सांडी स्वास |
तेंहि बुजलें निशेष| जन्मकाळीं ||३७||

मस्तकद्वार तें बुजलें| तेणें चित्त निर्बुजलें |
प्राणी तळमळूं लागलें| चहूंकडे ||३८||

स्वास उस्वास कोंडला| तेणें प्राणी जाजावला |
मार्ग दिसेनासा जाला| कासावीस ||३९||

चित्त बहु निर्बुजलें| तेणें आडभरीं भरलें |
लोक म्हणती आडवें आलें| खांडून काढा ||४०||

मग ते खांडून काढिती| हस्तपाद छेदून घेती |
हातां पडिलें तेंचि कापिती| मुख नासिक उदर ||४१||

ऐसे टवके तोडिले| बाळकें प्राण सोडिले |
मातेनेंहि सांडिलें| कळिवर ||४२||

मृत्य पावला आपण| मतेचा घेतला प्राण |
दुःख भोगिलें दारुण| गर्भवासीं ||४३||

तथापी सुकृतेंकरूनी| मार्ग सांपडला योनी |
तऱ्हीं आडकला जाउनी| कंठस्कंदीं मागुता ||४४||

तये संकोचित पंथीं| बळेंचि वोढून काढिती |
तेणें गुणें प्राण जाती| बाळकाचे ||४५||

बाळकाचे जातां प्राण| अंतीं होये विस्मरण |
तेणें पूर्वील स्मरण| विसरोन गेला ||४६||

गर्भीं म्हणे सोहं सोहं| बाहेरी पडतां म्हणे कोहं |
ऐसा कष्टी जाला बहु| गर्भवासीं ||४७||

दुःखा वरपडा होता जाला| थोरा कष्टीं बाहेरी आला |
सवेंच कष्ट विसरला| गर्भवासाचे ||४८||

सुंन्याकार जाली वृत्ती| कांहीं आठवेना चित्तीं |
अज्ञानें पडिली भ्रांती| तेणें सुखचि मानिलें ||४९||

देह विकार पावलें| सुखदुःखें झळंबळे |
असो ऐसें गुंडाळलें| मायाजाळीं ||५०||

ऐसें दुःख गर्भवासीं| होतें प्राणीमात्रांसीं |
म्हणोनियां भगवंतासी| शरण जावें ||५१||

जो भगवंताचा भक्त| तो जन्मापासून मुक्त |
ज्ञानबळें बिरक्त| सर्वकाळ ||५२||

ऐशा गर्भवासीं विपत्ती| निरोपिल्या येथामती |
सावध होऊन श्रोतीं| पुढें अवधान द्यावें ||५३||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला ||||३. १


पहिल्या दहा ओव्यामध्यें श्री समर्थांनी मानवी जन्म या घटनेची तत्वज्ञानदृष्ट्या आणि स्वरुपानुभवाच्या पार्श्वभूमीवर लक्षांत येणारी लक्षणें सांगितली आहेत. अव्यक्त अस्वस्था हि आपली स्वाभाविक स्थिति आहे, देह धारण करून व्यक्तामध्यें येणें म्हणजे खालीं घसरणें आहे. त्यामुळें अपूर्णपणाच्या सर्व अडचणी सोसाव्या लागतात, दृश्याच्या ताब्यांत जावें लागतें, आणि समाधान राखणें कठीण जातें. :
जन्म म्हणजे दु:खरुपीं वृक्षाचा अंकुर होय. वासना जन्माचें बीज आहे. जगांतील दु:खाचें मूळ कारण तीच आहे. पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचें दृश्य रूप होय. अंकुर हा आरंभ आहे. तो जसजसा वाढतो तसतसें त्यांतील दु:ख प्रगट रूप धारण करतें. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. सर्व काळी सर्व ऋतुंमध्यें समुद्र पूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काळीं सर्व ठिकाणीं दु:खाच्या खार्‍या पाण्यानें भरलेलें असतें. जन्म म्हणजे कधीही न चळणारा भीतीचा डोंगर आहे. मानवीजीवनांत भय खोलवर रुतून बसलेलें आहे. माणसानें कितीही प्रयत्न केले तरी जीवनांतील भय कांही केल्या हालत नाहीं, मग नाहीसें होण्याची गोष्ट तर दूरच राहते.

जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. जीवाच्या सर्व कर्मसांठ्यापैकीं कांहीं भाग भोगण्यासाठीं जीव जन्म घेतो असें वेदांत म्हणतो. कर्म सूक्ष्म अवस्थेंत असतें. त्याचा भोग होण्यासाठी आश्रय म्हणून देहाची जरूर लागते. म्हणून सूक्ष्म कर्म देहरूपीं आकार घेऊन जन्म पावते. अर्थात जन्म कर्ममय आहे. जन्म म्हणजे पापाची खाण आहे, भगवंताचें स्मरण तें पुण्य व त्याचें विस्मरण तें पाप होय. भगवंत अदृश्य तर जग दृश्य आहे. दृश्याचा जोर मोठा विलक्षण असतो. जगांत जन्म आल्यावर दृश्याच्या दडपणाखालीं जीव भगवंताला विसरूनच जातो. त्याला विसरून केलेलें सगळें पापच होय. जन्म म्हणजे काळाचा नित्य नवा जाच आहे. दृश्यांमध्यें क्षणाक्षणाला बदल घडवून आणणारी शक्ति ती कालच होय. काळाचें तोंड नेहमी विनाशाकडे असतें. रोज नवीन बदल व नवा नाश पुढें वाढून ठेवतो म्हणून काळ जाच करतो. जन्म म्हणजे कुविद्येचें फळ होय. कुविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते व वासना असते तोपर्यंत जन्म घेणें चुकत नाहीं. जन्म म्हणजे लोभाचें कमळ होय. लोभ म्हणजे आसक्ति. लाकूड कोरणारा भुंगा जसा कमळांत अडकून पडतो तसा ब्रह्मस्वरूप जीव आसक्तींत गुंतून देहांत जन्म घेतो, देहांत अडकून पडतो. जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा होय. जन्म येण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते. त्याचें ज्ञान स्वच्छ असतें. जन्म येऊन जगाचें वारें लागले कीं स्वरुपाची नेणीव निर्माण होते. मी देह आहे या भ्रमाचा पडदा ज्ञानावर पडून जीव भ्रमतो. जन्म म्हणजे जीवाचें बंधन होय. देह धरला कीं देहाच्या मर्यादा जीवावर लादल्या जातात, जीव आपलें स्वातंत्र्य गमावून बसतो. बंधनांतच तो जगतो व बंधनांतच देह ठेवतो. जन्म हें मृत्यूचें कारण होय. जन्म व मृत्यू परस्परावलंबी किंवा सापेक्ष घटना आहेत. एक असेल तर दुसरें असतें. म्हणून जन्म आला कीं मागोमाग मृत्यू देखील येतो. जन्म म्हणजे दृश्याच्या गुंतागुंतींत विनाकारण गुरफटणें होय. सूक्ष्म शरीर दृश्यांत येण्याची धडपड करतें म्हणून जन्म येतो. दृश्य अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचें आहे. एकदा त्यामध्यें अवतरल्यावर सामान्य माणूस त्यांत गुरफटूनच जातो. मग त्यापासून जीवाला फार दु:ख होतें. पण हें सगळें ओढवून घेण्याची जरूर होती कां ? अर्थात नाही.         

जन्म म्हणजे सुखाचा विसर होय. आपल्यापाशीच आपलें सुख आहे हें विसरल्यानें जीव देहाच्या द्वारें बाहेरून सुख मिळविण्याची धडपड जन्माच्या मुळाशीं आहे. जन्म म्हणजे चिंतेचा मळा होय. चिंता हि भीतीची प्रिय कन्या आहे जेथे भय तेथें चिंता असायचीच. म्हणून मानवीजीवनांत अमाप प्रमाणांत चिंता पिकते. जन्म म्हणजे वासनेचा मोठा विस्तार होय. वासना जन्मास कारण होते. पण ती सूक्ष्म असते, मुकुलित असते, देह मिळाल्यावर मग ती भरमसाट वाढते. ती स्वर्गलोकांपर्यंतसुद्दा पोचते. जन्म म्हणजे जीवाला स्वरूपापासून खाली ओढणारी किंवा स्वानंदापासून बाहेर काढणारी अवस्था होय. जन्म आला कीं जीव स्वरूपापासून च्युत झालेला असतो. जन्म म्हणजे कल्पनेचा छाप अथवा शिक्का होय. कल्पना हेच मुळांत दृश्य सृष्टीचें कारण आहे. मी देह आहे हि सूक्ष्म कल्पना जीवाला जन्मास घालते. जीवावर कल्पनेचा छाप असतो. जन्म म्हणजे ममतारूप दाकीनीचें झपाटणें होय. माझेपनाच्या वृतींने एकदा कां जीव गुंतून गेला कीं तिचा अंमल सूटता सुटत नाहीं, मेल्यावरही ती सोडीत  नाहीं, जन्म म्हणजे मायेंने केलेले कपट होय. दृश्य खरें दिसतें पण खरें नसतें. पण मायेच्या लीलेनें जीव फसतो आणि सत्यबुद्धीनें दृशाच्या नादी लागतो. हि देहबुद्धी मायेचें कपट होय. जन्म म्हणजे रागाचे वीरपण होय. अगदी कोवळ्या तान्ह्या बाळापासून तें अगदी सुज्ञ वृद्धापर्यंत कोणीही माणूस क्रोधाच्या तावडीतून सुटलेला नसतो. जन्म म्हणजे मोक्षाला आडवें येणारें विघ्नच होय. वास्तविक भगवंताच्या सत्तेनेंच जीवाचे सर्व व्यवहार होतात.तो भगवंताचाच आहे. तें सोडून तो वेगळा झाला कीं द्वैत निर्माण होतें आणि जीवास जन्म येतो. जीव मीपणानें वेगळा होतो. जन्म हा अहंतेचा गुण होय. मीपणा कार्यप्रवण होतो तेव्हा अहंकार पुढें येतो. अहंकार म्हणजे दर्शनी मीपणा समजावा. अर्थात अहंकार जीवाला जन्म घेण्याकडे ढकलतो. जन्म म्हणजेच ईश्वराचें विस्मरण होय. ईश्वराचें स्मरण म्हणजे विद्या तर त्याचें विस्मरण म्हणजे अविद्या. अविद्येंतून वासना उमटते आणि वासनेपोटीं जन्म येतो.  

जन्म म्हणजे विषयांची आवड होय. विषय शब्दाचा अर्थ - " विशेषेण सिंचन्ति इंद्रियाणि मनश्च " ज्यांच्या ठिकाणीं इंद्रिये व मन बुडून जातात, मग्न होतात असे पदार्थ, म्हणजे इंदिर्य्भोग, अर्थात देहांतून सुख घेण्याची स्वाभाविक आवड होय. जन्म हि दुराशेची बेडी आहे. कधी तृप्त न होणार्‍या आशेच्या सांखळीनें माणूस जणू काय बांधलेला असतो. जन्म म्हणजे काळाची कांकडी असून तो ती खातो. माणूस जितक्या सहजपणें कांकडी खातो तितक्या सहजपणें काळ शरीर खून टाकतो.     

जन्म हा वाईट काळ होय. भगवंताचा विसर पडणे हाच जीवाचा वाईट काळ समजावा. जन्म हीच वाईट वेळ होय. देह हेंच मुळीं सगळ्या दु:खांना आमंत्रण असल्यानें तें कोणत्याही वेळीं जन्मलें तरी दु:ख दिल्याशिवाय रहात नाहीं. जन्म म्हणजे घाणेरड्या नरकांत पडल्यासारखें आहे. आत्मबुद्धि लोपून देहबुद्धींत घसरणें हें स्वर्गांतून नरकांत पडल्याप्रमाणेंच समजावें.

पुढील अठरा ओव्यांमध्यें श्री समर्थ शरीराच्या जन्माची क्रिया व त्याचा मालमसाला वर्णन करतात. तें वाचून शरीराची किळसच येते. :
हा देह कसा उत्पन्न होतो हें पाहायला गेलें तर त्यासारखें दुसरें अमंगळ कांहीं नाहीं असें खात्रीनें वाटेल. स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होते. विटाळ अतिशय अशुद्ध मानतात. देह त्या विटाळाचा पुतळा आहे. त्याला कितीही स्वच्छ केला तरी अखेर घाणेरडाच राहणार. त्याला निर्मळ ठेवण्याची हौस पुरणार नाहीं. स्त्रीचा विटाळ दाट होत जाऊन अखेर गोठतो. त्या गोठलेल्या विटाळाचें हे शरीर बनतें. शरीर वरवर सुरेख आणि आकर्षक दिसलें तरी आतंमध्यें घाणीचें पोतडेंच आहे. चांभाराची चर्मकुंडी अति घाणीनें दुर्गंधीनें भरलेली असतें. तिचें झांकण उघडण्याची सोयच नाहीं त्याचप्रमाणे देहाची अवस्था आहे. त्याचा आंत पाहण्याची सोय नाहीं.

कुंड धुतलें तर स्वच्छ होतें, देहाला रोज धुवून काढलें तरी दुर्गंधीनें, घाणीनें भरलेले हें शरीर निर्मळ होत नाहीं. देह कसा तयार केला पहा ! हाडांचा सापळा उभा केला. त्याला शिरा व नाड्या गुंडाळल्या. प्रत्येक सांध्यांत चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगविला. रक्ताला मुळीं " अशुद्ध " असेंच म्हणतात. अर्थात तें शुद्ध नसतें. तें देखील देहांत भरलेलें आहे. शिवाय अनेक रोग आणि अनेक प्रकारची दु:खें यांची देहांत वसती आहे.

शरीर म्हणजे अंत बाहेर घाणीनें लडबडलेलें, बरबटलेलें व नरकानें भरलेलें कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीनें भरलेली मुताची पिशवी आहे. शरीरांत जंत व किडे असतात. आंतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीनें भरलेली पिशवी आहे. शरीरांत गालिच्छ  कातडें सगळीकडे लोंबत असतें.

सर्व अवयवांमध्यें डोकें श्रेष्ठ आहे. त्याला उत्तमांग म्हणतात. पण तेथें नाकांतून शेंबूड वाहतो, आणि कान फुटला तर त्यांतून येणारा दुर्गंध सहन होत नाहीं. डोळ्यांतून चिपडें निघतात, नाकांमध्यें मेकडें दाटतात. राज सकाळीं तोंडांतून विष्ठेसारखी घाण पडते. ज्या तोंडामध्यें लाळ, थुंकी, इतर घाण आणि पिवळा दाट शेंबुड असतो त्याला कमळाची आणि चंद्राची उपमा देतात. तोंड असें घाणेरडें तर पोटांमध्यें विष्ठा भरलेली असतें. या गोष्टी प्रत्यक्षच आहेत. त्यांना दुसर्‍या प्रमाणांची गरजच नाहीं. अति उत्तम अन्न पोटामध्यें घातलें तर त्याची कांहीं विष्ठा बनते. कधी कधी तें ओकून पडतें तेव्हां त्याकडे बघवत नाहीं. अस्ग्डी गंगेचें पाणी प्यायलें तरी त्याचें मूत बनतें. सारांश माल, मूत आणि ओक यावरच देह जगतो. यानींच देह वाढतो यांत संशय नाहीं. माल, मुत्र आणि ओक जर पोटांत नसतील तर माणसे मारून जातील. राजा असो कीं रंक असो त्याच्या पोटांत विष्ठा असतेच असते. देहांतील ही घाण टाकून तो स्वच्छ करण्याचा अट्टाहास केला तर देह मरून जाईल. अशी एकंदर या देहाची व्यवस्था आहे.

जोपर्यंत देह धडधाकट आहे तोपर्यंत तो कसा आहे याचें वर्णन करतांना आतां सांगितलेली गालिच्छ दशासांगावी लागते. पण ती मनाला खरी वाटत नाहीं. देह खराच इतका खराब आहे काय अशी शंका मनांत येते. 

येथून पुढील वीस ओव्यांमध्यें आईच्या पोटांत जीवाचें कसे व किती हाल होतात याचें सविस्तर वर्णन आहे. :
अशा या देहरूपीं तुरुंगांत वस्तीला आल्यामुळें जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयामध्यें वायू नसतो त्यामुळें दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन भोकें, तोंड, गुद आणि उपस्थ अशी देहाची नऊ दारें बंद राहतात. तीं आपलें कार्य करुं शकत नाहींत.

आईच्या पोटांतील ओक आणि विष्ठा यांचें पाणी पाझरतें. तें जठराग्नीच्या उष्णतेनें तापतें आणि त्यामुळें गर्भाचें मांस व त्याची हाडे उकडून निघतात. गर्भाला कातडी नसते. तो मांसपिंड खोळींत असतो, पातळ वेष्टनांत असतो. तेथें तो हालचाल करुं लागतो तोंच आईला डोहाळे सुरु होतात. डोहाळ्यामुळें ती कडू व तिखट पदार्थ खाऊं लागते. त्या अन्नानें पोटांतील पोराचें अंग होरपळतें. गर्भ म्हणजे काय म्हणाल तर चामड्यांत गुंडाळलेलें गांठोडें असतें. त्याच्या आंत विष्ठेचें पोतडें असतें. गर्भाच्या नाळामधून, बेंबीच्या नळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळतात. माल, मूत्र, ओक आणि पित्त या रसांमुळें नाकातोंडातून जंतु बाहेर पडतात, अर्थात त्या गर्भाचा जीव अतिशय घाबरा होतो. अशा कैदखान्यांत अतिशय अडचणींत सांपडलेला जीव कळवळून देवाला विनवितो कीं, " देवा, आतां येथून सुटका कर. " " देवा येथून सुटका केलीस तर मी स्वत:चें कल्याण करून घेईन. मी गर्भवास चुकवीन. पुन्हा या जागीं जन्मास येणार नाहीं. " गर्भाशयांतील यातनांमुळें जीव अशी प्रतिज्ञा करतो तोंच त्याची जन्मवेळ कवळ येते व प्रसूति वेदनांनीं आई आरडओरडा करुं लागते. पोराच्या नाकातोंडांत मांस दडपून बसल्यामुळें टाळूतील छिद्रानें त्याला श्वास घ्यावा लागतो. पण जन्म व्हावयाच्या वेळीं तेंही बुजून जातें. टाळूचें छिद्र बंद झाल्यानें पोराचे जीव घाबरा होतो आणि तें तळमळून पोटांत इकडेतिकडे हालूं लागते. 

श्वासोच्छवास कोंडल्यामुळें त्याला फार कष्ट होतात. कासावीस झालेल्या त्या पोराला बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा होते. अतिशय घाबरलेल्या चित्तानें मूल बाहेर येण्यासाठीं धडपड क्रम लागतें. तें भलत्याच जागीं अडकतें. मूल आडवें झालें, त्याला कांपून तुकडे करून काढा, असें लोक म्हणतात. मग तुकडे तोडून तें मूल बाहेर काढतात. त्याचें हातपाय तोडतात. तोंड, नाक, पोट जो भाग हातीं लागेल तो कांपतात.

याप्रमाणें शरीराचें लचके तोडले जात असतां त्या मुलांचे प्राण जातात. या सगळ्या खटपटीत आईचेंही देहावसान घडतें. मूल स्वत: मृत्यु पावलें व आईचाही प्राण घेतला. शिवाय गर्भावस्थेमध्यें भयंकर दु:ख भोगलें तें निराळेंच. परंतु पूर्व पुण्याईनें योनींतून सरळ बाहेर येण्याचा मार्ग सांपडला तरी त्याचा गळा, खांदा, वगैरे अवयव कुठेंतरी अडकतो व तो बाहेर पडूं शकत नाहीं. मग त्या अरुंद मार्गांतून पोराला जोरानें खेंचून बाहेर काढतात. ओढून काढतां काढतां तें पोर गतप्राण होते.
गर्भांतील मूल जन्मास येतांना देहाची अवस्था काय होते याचें सामान्य वर्णन झालें. या सर्व खटाटोपांत त्या जीवाच्या अंतर्यामीं काय चालते त्याचें वर्णन आतां सुरूं होतें. जीवाच्या अंतर्यामींची अवस्था फक्त अतींद्रियज्ञानी संतच जाणतात. :
जन्मास येण्याच्या धडपडींत बाळाचें प्राण जात असतां अखेरच्या क्षणीं त्याला भगवंताचा विसर पडतो. गर्भात असतांना असणारी भगवंताची आठवण तो विसरून जातो.

गर्भांत असताना मूल म्हणतें, " सोहं सोहं " - म्हणजे मी तो आहे, मी ईश्वर आहे. जीवाला आत्मबुद्धि असते, स्वस्वरूपाची जाणीव असते. बाहेर पडतांच तें म्हणूं लागतें " कोहं, कोहं " - म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे. जीवाला देहबुद्धि येते, स्वस्वरूपाची जाणीव लोपून जाते. सारांश गर्भवासामध्यें प्राणी अशा पुष्कळ यातना सोसतो. गर्भावस्थेमध्यें तो दु:खानें दडपला गेला होता, मोठ्या कष्टानें एकदाचा बाहेर आला, पण बाहेर आल्याबरोबर लगेच गर्भवासाच्या यातना विसरुन गेला. त्याचें मन शून्याकार झालें म्हणजें मनाचें व्यवहार पूर्णपणें थांबले. त्याला पूर्वीचें कांहीं स्मरण उरलें नाहीं. अज्ञानाचे आवरण, झांकण आल्यानें हि भ्रांत अवस्था आली. तरी जन्मलेल्या बालकाला त्यामध्यें बरेंच वाटतें. देह विकार पावूं लागला, त्याची वाढ होऊं लागली म्हणजे सुखदु:खाचे हेलकावे असूं लागतात. असो अशा रीतीनें हें शरीर मायेच्या जाळ्यांत सर्व बाजूनें अडकलेलें आहे, देहबुध्दीनें व्यापलेलें आहे.

या गर्भवासाच्या  यातनांतून सुटका होण्यास भगवंताला शरण जावें. :
सर्व प्राण्यांना गर्भवासामध्यें अशा प्रकारचें दु:ख सोसावें लागतें. म्हणून प्राण्यानें भगवंताला शरण जावें. जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मापासून मुक्त असतो. त्याला पुन्हा जन्म येत नाहीं. अर्थात त्याला गर्भवासाच्या यातना नाहींत. आत्मज्ञानाच्या जोरावर तो सर्वकाळ विरक्त असतो. कशात गुंतलेला नसतो. याप्रमाणें गर्भवासातील दु:खपरंपरेचें वर्णन मला सुचलें तसें मी केलें. श्रोत्यांनीं पुढील भाग लक्ष देऊन ऐकावा.