श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, March 3, 2011

||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||४|| समास पहिला : श्रवणभक्ती ||



||श्रीराम ||

जयजय जी गणनाथा| तूं विद्यावैभवें समर्था |
अध्यात्मविद्येच्या परमार्था| मज बोलवावें ||||

नमूं शारदा वेदजननी| सकळ सिद्धि जयेचेनी |
मानस प्रवर्तलें मननीं| स्फूर्तिरूपें ||||

आतां आठऊं सद्गुरु| जो पराचाहि परु |
जयाचेनि ज्ञानविचारु| कळों लागे ||||

श्रोतेन पुसिलें बरवें| भगवद्भजन कैसें करावें |
म्हणौनि बोलिलें स्वभावें| ग्रंथांतरीं ||||

सावध होऊन श्रोतेजन| ऐका नवविधा भजन |
सत्शास्त्रीं बोलिले, पावन- | होईजे येणें ||||

श्लोक ||श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
      अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||

नवविधा भजन बोलिलें| तेंचि पुढें प्रांजळ केलें |
श्रोतीं अवधान दिधलें| पाहिजे आतां ||||

प्रथम भजन ऐसें जाण| हरिकथापुराणश्रवण |
नाना अध्यात्मनिरूपण| ऐकत जावें ||||

कर्ममार्ग उपासनामार्ग| ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग |
योगमार्ग वैराग्यमार्ग| ऐकत जावे ||||

नाना व्रतांचे महिमे| नाना तीर्थांचे महिमे |
नाना दानांचे महिमे| ऐकत जावे ||||

नाना माहात्म्यें नाना स्थानें| नाना मंत्र नाना साधनें |
नाना तपें पुरश्चरणें| ऐकत जावीं ||१०||

दुग्धाहारी निराहारी| फळाहारी पर्णाहारी |
तृणाहारी नानाहारी| कैसे ते ऐकावे ||११||

उष्णवास जळवास| सीतवास आरण्यवास |
भूगर्भ आणी आकाशवास| कैसे ते ऐकावे ||१२||

जपी तपी तामस योगी| नाना निग्रह हटयोगी |
शाक्तआगम आघोरयोगी| कैसे ते ऐकावे ||१३||

नाना मुद्रा नाना आसनें| नाना देखणीं लक्षस्थानें |
पिंडज्ञानें तत्वज्ञानें| कैसीं तें ऐकावीं ||१४||

नाना पिंडांची रचना| नाना भूगोळरचना |
नाना सृष्टीची रचना| कैसी ते ऐकावी ||१५||

चंद्र सूर्य तारामंडळें| ग्रहमंडळें मेघमंडळें |
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें| कैसीं ते ऐकावीं ||१६||

ब्रह्माविष्णुमहेशस्थानें| इन्द्रदेवऋषीस्थानें |
वायोवरुणकुबेरस्थानें| कैसीं ते ऐकावीं ||१७.

नव खंडे चौदा भुवनें| अष्ट दिग्पाळांची स्थानें |
नाना वनें उपवनें गहनें| कैसीं ते ऐकावीं ||१८||

गण गंधर्व विद्याधर| येक्ष किन्नर नारद तुंबर |
अष्ट नायका संगीतविचार| कैसा तो ऐकावा ||१९||

रागज्ञान ताळज्ञान| नृत्यज्ञान वाद्यज्ञान |
अमृतवेळ प्रसंगज्ञान| कैसें तें ऐकावें ||२०||

चौदा विद्या चौसष्टी कळा| सामुद्रिक लक्षणें सकळ कळा |
बत्तीस लक्षणें नाना कळा| कैशा त्या ऐकाव्या ||२१||

मंत्र मोहरे तोटके सिद्धी| नाना वल्ली नाना औषधी |
धातु रसायण बुद्धी| नाडिज्ञानें ऐकावीं ||२२||

कोण्या दोषें कोण रोग| कोणा रोगास कोण प्रयोग |
कोण्या प्रयोगास कोण योग| साधे तो ऐकावा ||२३||

रवरवादि कुंभपाक| नाना यातना येमेलोक |
सुखसुःखादि स्वर्गनर्क| कैसा तो ऐकावा ||२४||

कैशा नवविधा भक्ती| कैशा चतुर्विधा मुक्ती |
कैसी पाविजे उत्तम गती| ऐसें हें ऐकावें ||२५||

पिंडब्रह्मांडाची रचना| नाना तत्वविवंचना |
सारासारविचारणा| कैसी ते ऐकावी ||२६||

सायोज्यता मुक्ती कैसी होते| कैसें पाविजे मोक्षातें |
याकारणें नाना मतें| शोधित जावीं ||२७||

वेद शास्त्रें आणी पुराणें| माहावाक्याचीं विवरणें |
तनुशतुष्टयनिर्शनें| कैसीं ते ऐकावीं ||२८||

ऐसें हें अवघेंचि ऐकावें| परंतु सार शोधून घ्यावें |
असार तें जाणोनि त्यागावें| या नांव श्रवणभक्ति ||२९||

सगुणाचीं चरित्रें ऐकावीं| कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं |
श्रवणभक्तीचीं जाणावीं| लक्षणें ऐसीं ||३०||

सगुण देवांचीं चरित्रें| निर्गुणाचीं तत्वें यंत्रें |
हे दोनी परम पवित्रें| ऐकत जावीं ||३१||

जयंत्या उपोषणें नाना साधनें| मंत्र यंत्र जप ध्यानें |
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें| नानाविधें ऐकावीं ||३२||

ऐसें श्रवण सगुणाचें| अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें |
विभक्ती सांडून भक्तीचें| मूळ शोधावें ||३३||

श्रवणभक्तीचें निरूपण| निरोपिलें असे जाण |
पुढें कीर्तन भजनाचें लक्षण| बोलिलें असे ||३४||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्तिनिरूपणनाम समास पहिला ||||४. १




या समासांत श्रीसमर्थांनीं गणेशशारदा व श्रीसदगुरु यांना वंदन करून नवविधा भक्ति सांगण्यास सुरुवात केलीभक्तिचे हे प्रकार जुन्या संस्कृत ग्रंथांत विशेषतभागवतांत व नारद भक्तिसूत्रांत आढळतातपण दासबोधामध्यें केलेलें त्यांचें विवेचन श्री समर्थांच्या स्वतंत्र प्रतिभेचा नमुना आहे. :
श्रीगजाननाचा जयजयकार असो. सकल विद्या वैभवानें गणपति समर्थ आहे म्हणजे सर्वज्ञपणानें येणारें सामर्थ्य त्याच्यापाशीं आहे. अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ति त्यानें आपल्याला द्यावी अशी श्री समर्थ प्रार्थना करतात. शारदा वेदांना जन्म देते. तिच्या कृपेनें सर्व सिद्धि प्राप्त होतात, तिच्यामुळें अंत:करणात स्फूर्ति उदय पावून माझें मन चिंतनात मग्न झालें. तिला मी नमस्कार करतो. आतां मी सदगुरुचें स्मरण करतो. तो परमात्म्याहून श्रेष्ठ आहे. त्याच्या कृपेनें आत्मज्ञानाचा विचार समजूं लागतो. भगवंताचे भजन कसें करावें असा सुरेख प्रश्न श्रोत्यांनीं केला. त्याचें उत्तर देण्यासाठीं निरनिराळ्या ग्रंथांतील भक्तिविषयक विचार येथें सहजपणें सांगतो. भक्तिचे नऊ प्रकार श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावें. भगवद्वसंबंधी शास्त्रांमध्यें ते सांगितले आहेत. त्यांच्या आचरणानें माणूस पवित्र होऊन जातो.

श्लोकाचा अर्थ : श्रवणकीर्तननामस्मरणपादसेवाअर्चनवंदनदास्यसख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तिचे नऊ प्रकार आहेत. : 
शास्त्रांत जें नऊ प्रकारचें भजन सांगितले त्याचें सविस्तर वर्णन पुढें आहे. आतां श्रोत्यांनी नीट लक्ष दिलें पाहिजें.

आपल्या देशांत अध्यात्म तत्वज्ञान आणि साधना दोन्ही बाजूंनीं पुष्कळ वाढलेंत्यांच्या विविध अंगांचें ज्ञान करून घ्यावें असें श्री समर्थ या समासांत सुचवितातसगळ्या गोष्टी कांहीं आंपण करून पहायच्या नसतातपरंतु प्रत्येकाचें मर्म काय आहे हेम साधकाला ठाऊक असावें असा त्यांचा कटाक्ष दिसतो. :
नऊ प्रकारांपैकी भक्तीचा पहिला प्रकार जो श्रवण आहे तो पुढीलप्रमाणें असतों. भगवंताची कथा ऐकावी, पुराण ऐकावें, प्रवचनांत व निरुपणांत अनेक प्रकारचें अध्यात्मविषय ऐकत जावें.

कर्ममार्ग, उपासनामार्गज्ञानमार्ग, गुरूभक्तिमार्ग, योगमार्ग, वैराग्यमार्ग इ. अनेक मार्ग ऐकत जावे. अनेक व्रतें, अनेक तीर्थें, अनेक दानें, यांचा महिमा ऐकत जावा. जगांतील अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अनेक मोठीं स्थानें, अनेक मंत्र साधने, तपें, पुरश्चरणें, यांची माहिती ऐकत जावी. कोणी नुसत्या दुधावर राहणारे, कोणी कांहिच न खाणारे, कोणी फळें खाणारे, कोणी पानें खाणारे, कोणी गवत खाणारे तर कोणी वाटेल ते खाणारे कसे असतात तें ऐकत जावें.

कोणी उन्हांत राहणारे, कोणी पाण्यात राहणारे, कोणी थंडींत राहणारे, कोणी अरण्यांत राहणारे, कोणी भुयारात राहणारे तर कोणी आकाशांत राहणारे कसे असतात तें ऐकत जावें. जप करणारे, तप करणारे, भयंकर रागीट योगी, देहधर्माचा निश्चयानें आवर करणारे हट्योगी, मद्य, मांस वगैरे पंचमप्रकार सेवन करणारे शक्तीचे उपासक, स्मशानांत राहून भूताखेतांना वश करणारें अघोरपंथीं कापालिक कसे असतात तें ऐकत जावें. योगशास्त्रांत विशेष प्रकारच्या प्राणायामांना मुद्रा म्हणतात. मुद्रा अनेक प्रकारच्या आहेत. त्यांपैकी खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी, षण्मुखी, महामुद्रा आणि शाम्भवी या प्रसिध्द आहेत. धारणा सिध्द होण्यासाठीं यांचा उपयोग होतो. खेचरी म्हणजे भ्रुकटीमध्यें दोन्हीं डोळ्यांची नजर वळवून आकाशांत मन स्थिर करणें. भूचरी म्हणजे म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दोन्ही डोळ्यांची नजर वळवून त्याच्यापुढें चार बोटें असणार्‍या अवकाशांत मन स्थिर करणें. चाचरी म्हणजे इष्ट देवतेच्या अनुसंधानांत मनाला गुंतवून कोणत्याही एका वस्तूवर नजर स्थिर न ठेवणें. अगोचरी म्हणजे चिदाकाशांत मन स्थिर करुन पदार्थ पाहून न पाहणें. षण्मुखी म्हणजे दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या आणि तोंड सारे बंद करुन आंतील सोऽहं ध्वनि ऐकुन तेथें मन स्थिर करणें. महामुद्रा म्हणजे डाव्या पायाची टांच सिवणीमध्यें दाबायची, उजवा पाय लांब ठेवायचा. त्याच्या पायाचा अंगठा धरायचा आणि प्राणायाम करुन उजव्या गुडघ्याला डोकें लावायचें. असेंच दुसर्‍या पायानें करायचें. कपिल मुनींना ही मुद्रा साधली होती. शाम्भवी म्हणजे मन रिकामें करायचें. दोन्ही डोळे उघडे ठेवून दृष्टी समांतर ठेवायची. कल्पनेनें आपली इष्ट देवता अथवा गुरुनें दिलेला मंत्र समोर बघायचा किंवा ऐकायचा. हा अलक्ष्यावर लक्ष देण्याचा सोपा प्रकार आहे. हळूहळू डोळे मिटतात आणि इष्ट देवता किंवा मंत्र ह्रदयाकाशांत स्थिर होतात. देह, स्थल, काल यांचा विसर पडतो. श्रीशंकराला ही साधली म्हणून तिचें नांव शाम्भवी. मुद्रांची ही महाराणी समजावी. नाना प्रकारची आसनें समजून घ्यावी. अतींद्रिय प्रकाशाचे विविध प्रकार उदा. शुभ प्रकाशाचा झोत, नीलबिंदुदर्शन, ज्योतीदर्शन, इ ऐकावें. योगी लोक ज्यांच्यावर मन केंद्रित करतात ती शरीरांतील चक्रस्थानें उदा. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुध्द आणि आज्ञा हीं ऐकत जावीं. तसेंच शरीररचनाशास्त्र, विश्वरचनाशास्त्र यांची माहिती ऐकत जावी. अनेक प्राण्यांची शरीररचना, पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना, पशु, पक्षी, मासे, वनस्पती वगैरे सृष्ट वस्तूंची रचना ऐकत जावी. चंद्र, सूर्य, तारांचे समुह, ग्रहांचे समूह, मेघांचे समूह, एकवीस स्वर्ग, सात पाताळें कसे आहेत ते ऐकावें.

ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, देव ऋषी, वायु, वरुण व कुबेर यांची स्थानें कशी आहेत तें ऐकावें. नऊ खंडे, चौदा भुवनें, आठ दिक्पाळांची स्थानें, निरनिराळी दाट अरण्यें, व उपवनें कशी आहेत तें ऐकावें. शंकराचे सेवकगण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबरू, अष्टनायिका, संगीतशास्त्र यांबद्दल माहिती ऐकावी. गंधर्व म्हणजे देवाचें गवई, विद्याधर म्हणजे देवांचा सहाय्यक कनिष्ठ देव, यक्ष म्हणजे कुबेरसेवक कनिष्ठ देव, किन्नर म्हणजे अश्वमुख कनिष्ठ देव, नारद म्हणजे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र व प्रख्यात देवर्षि, तुंबरू म्हणजे एक संगीततज्ञ गंधर्व, साहित्यशास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या काव्यांतील आठ प्रकारच्या स्वीया, अन्या, परकीया, साधारणा, इत्यादि स्त्रिया. संगीतामधील निरनिराळे राग, ताल, वाद्यें व नृत्य याचें ज्ञान, सुमुहूर्त किंवा चांगली वेळ आणि निरनिराळे प्रसंग याचें ज्ञान ऐकत जावें. चौदा विद्या, चौसष्ट कला, हातावरील रेषांची लक्षणें, उत्तम माणसाच्या संगी विलसणारी बत्तीस लक्षणें, सर्व कला, यांची माहिती ऐकावी. मंत्र, औषधी मणी, तोडगे, सिध्दि, नाना वल्ली, नाना औषधें, धातूंचीं रसायने तयार करण्याची क्रिया, नाडीपरीक्षा या गोष्टी ऐकाव्या. योग्याचें व्यक्तिगत मन जसजसें विश्वमनासी तादात्म्य पावूं लागतें तसतसें तें अत्यंत सूक्ष्म आणि विशाल बनत जातें. पंचमहाभूतांवर योग्याचें स्वामित्व स्थापित होतें. याला भूतजय म्हणतात. भूतजय साधला कीं योग्याच्या अंगीं अनेक प्रकारच्या विलक्षण शक्ति प्रगट होतात. त्यापैकीं आठ महत्वाच्या आहेत. आणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणा आणण्याची शक्ति. लघिमा म्हणजे अत्यंत हलकें होण्याची कला. महिमा म्हणजे अत्यंत विशाल होण्याची शक्तिप्राप्ति म्हणजे हवी ती वस्तु मिळवण्याची शक्ति. प्राकाम्य म्हणजे सर्व इच्छा फलद्रुप होण्याची अवस्था.वशित्व म्हणजे चराचर सृष्टि वश करुन घेण्याची शक्ति. ईशित्व म्हणजे विश्चामधील सर्व व्यापारावर स्वामित्व गाजविण्याचें सामर्थ्य. यत्रकामावसायित्व आप्तकाम व पूर्णकाम होणें, वाटेल तेव्हां वाटेल त्या ठिकाणीं जांता येणें वगैरे.

कफ, वात, पित्त या दोषांपैकीं कोणत्या दोषानें कोणता रोग होतो, तो रोग बरा करण्यास प्रयोग कोणता, तो प्रयोग करण्यास अनुकूल काल कोणता हें ऐकत जावें. नरकांतील रवरवादि, कुंभीपाक, तेथील नाना यातना, यमलोक, स्वर्गातील सुख, नरकांतील दु:ख कसें आहे तें ऐकावें. भक्तिचे नऊ प्रकार सलोकता, समीपता, सरुपता व सायुज्याता या चार मुक्ति, उत्तम गति पावण्याचा मार्ग हें सगळें ऐकावें. पिंडविचार, ब्रह्मांदविचार, अनेक तत्वांचें विवेचन, सारासारविचार कसा तें ऐकत जावें. सायुज्यमुक्ति कशी प्राप्त होते आणि मोक्ष कसा प्राप्त होतो हें समजण्यासाठीं त्यासंबंधीं विवेचन करणारी अनेक मतें शोधून पहावी. वेद, शास्त्रें, पुराणें, महावाक्यांवरील भाष्यें, चार देहाच्या निरसनाचें वर्णन ऐकत जावें.

ॠग्वेद - प्रज्ञानं ब्रह्म, यजुर्वेद - अहं ब्रह्मास्मि, सामदेव - तत्वमसि, अथर्ववेद - अयमात्मा ब्रह्म चार वेदांचीं ही चार महावाक्यें आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचें चार देह आहेत.

अशा रितीनें वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या. पण त्यामधील तत्वांश किंवा रहस्य तेवढें शोधून ग्रहण करावें. जें असार किंवा व्यर्थ व निरुपयोगी असेल तें समजून सोडून द्यावें. याला श्रवणभक्ति म्हणतात. भगवंताच्या सगुण अवतारांची  व भक्तांचीं चरित्रें ऐकावीं. भगवंताचें निर्गुण स्वरूप आत्मविचारांनें नीट समजून घ्यावें. अशी ही श्रवणभक्तिचीं लक्षणें आहेत, हें ओळखावें. भगवंताच्या सगुण स्वरूपाचें वर्णन म्हणजे त्याचें चरित्र तर त्याच्या निर्गुण स्वरुपांचें वर्णन म्हणजे तत्वमीमांसा होय. हीं दोन्ही फार पवित्र आहेत. तीं ऐकत जावी. सगुणाच्या बाबतींत जंयत्या, उपोषणें, अनेक साधनें, मंत्र, यंत्र, जप, ध्यान, कीर्तिवर्णन, स्तुतिगायन, स्तोत्रें, भजनें अशी आहेत. तीं सगळीं ऐकावी. तात्पर्य असें कीं सगुणाच्या चरित्राचें श्रवण करावें, निर्गुण रुपाचें ज्ञान करुन घ्यावें आणि भगवंताशी वेगळेपण टाकून, त्याच्याशी तदाकारतेचें रहस्य शोधावें. भगवंताशी दुजेपण सोडून एकरुपता कशी साधेल हें पहावें. आतांपर्यंत श्रवणभक्तीचें वर्णन झालें. पुढच्या समासांत कीर्तन व भजन यांचें लक्षण सांगितलें आहे.

॥ श्रीराम समर्थ ॥