श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Saturday, March 19, 2011

||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||२|| समास पाचवा : अर्चनभक्ति ||


||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास पाचवा : अर्चनभक्ति ||

|| श्रीराम ||

मागां जालें निरूपण| चौथे भक्तीचें लक्षण |
आतां ऐका सावधान| पांचवी भक्ती ||||

पांचवी भक्ती तें आर्चन| आर्चन म्हणिजे देवतार्चन |
शास्त्रोक्त पूजाविधान| केलें पाहिजे ||||

नाना आसनें उपकर्णें| वस्त्रें आळंकार भूषणें |
मानसपूजा मूर्तिध्यानें| या नांव पांचवी भक्ती ||||

देवब्राह्मणाग्नीपूजन| साधुसंतातीतपूजन |
इति महानुभाव गाइत्रीपूजन| या नांव पांचवी भक्ती ||||

धातुपाषाणमृत्तिकापूजन| चित्र लेप सत्पात्रपूजन |
आपले गृहींचें देवतार्चन| या नांव पांचवी भक्ती ||||

सीळा सप्तांकित नवांकित| शालिग्राम शकलें चक्रांकित |
लिंगें सूर्यकांत सोमकांत| बाण तांदळे नर्बदे ||||

भैरव भगवती मल्लारी| मुंज्या नृसिंह बनशंकरी |
नाग नाणी नानापरी| पंचायेत्नपूजा ||||

गणेशशारदाविठलमूर्ती| रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती |
श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती| देवतार्चनीं पूजाव्या ||||

मत्छकूर्मवऱ्हावमूर्ती| नृसिंहवामनभार्गवमूर्ती |
रामकृष्णहयग्रीवमूर्ती| देवतार्चनीं पूजाव्या ||||

केशवनारायणमाधवमूर्ती| गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती |
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती| रुषीकेश पद्मनाभि ||१०||

दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती |प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती |
अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती| जनार्दन आणी उपेंद्र ||११||

हरिहरांच्या अनंत मूर्ती| भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती |
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती| देवतार्चनीं पूजाव्या ||१२||

अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण| लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण |
श्रीहरीनारायण आदिनारायण| शेषशाई परमात्मा ||१३||

ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती| पाहों जातां उदंड असती |
त्यांचें आर्चन करावें, भक्ती- | पांचवी ऐसेए ||१४||

याहि वेगळे कुळधर्म| सोडूं नये अनुक्रम |
उत्तम अथवा मध्यम| करीत जावें ||१५||

जाखमाता मायराणी| बाळा बगुळा मानविणी |
पूजा मांगिणी जोगिणी| कुळधर्में करावीं ||१६||

नाना तीर्थांक्षत्रांस जावें| तेथें त्या देवाचें पूजन करावें |
नाना उपचारीं आर्चावें| परमेश्वरासी ||१७||

पंचामृतें गंधाक्षतें| पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें |
धूपदीप असंख्यातें| नीरांजनें कर्पुराचीं ||१८||

नाना खाद्य नैवेद्य सुंदर| नाना फळें तांबोलप्रकार |
दक्षणा नाना आळंकार| दिव्यांबरें वनमाळा ||१९||

सिबिका छत्रें सुखासनें| माहि मेघडंब्रें सूर्यापानें |
दिंड्या पताका निशाणें| टाळ घोळ मृदांग ||२०||

नाना वाद्यें नाना उत्साव| नाना भक्तसमुदाव |
गाती हरिदास सद्भाव- | लागला भगवंतीं ||२१||

वापी कूप सरोवरें| नाना देवाळयें सिखरें |
राजांगणें मनोहरें| वृंदावनें भुयरीं ||२२||

मठ मंड्या धर्मशाळा| देवद्वारीं पडशाळा |
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा| नाना वस्त्र सामुग्री ||२३||

नाना पडदे मंडप चांदोवे| नाना रत्नघोष लोंबती बरवे |
नाना देवाळईं समर्पावे| हस्थि घोडे शक्कटें ||२४||

आळंकार आणि आळंकारपात्रें| द्रव्य आणी द्रव्यपात्रें |
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें| नाना प्रकारीचीं ||२५||

वनें उपवनें पुष्पवाटिका| तापस्यांच्या पर्णकुटिका |
ऐसी पूजा जगन्नायका| येथासांग समर्पावी ||२६||

शुक शारिका मयोरें| बदकें चक्रवाकें चकोरें |
कोकिळा चितळें सामरें| देवाळईं समर्पावीं ||२७||

सुगंधमृगें आणी मार्जरें| गाई म्हैसी वृषभ वानरें |
नाना पदार्थ आणी लेंकुरें| देवाळईं समर्पावीं ||२८||

काया वाचा आणी मनें| चित्तें वित्तें जीवें प्राणें |
सद्भावें भगवंत आर्चनें| या नांव आर्चनभक्ती ||२९||

ऐसेंचि सद्गुरूचें भजन- | करून, असावें अनन्य |
या नांव भगवद्भजन| पांचवी भक्ती ||३०||

ऐसी पूजा न घडे बरवी| तरी मानसपूजा करावी |
मानसपूजा अगत्य व्हावी| परमेश्वरासी ||३१||

मनें भगवंतास पूजावें| कल्पून सर्वहि समर्पावें |
मानसपूजेचें जाणावें| लक्षण ऐसें ||३२||

जें जें आपणांस पाहिजे| तें तें कल्पून वाहिजे |
येणें प्रकारें कीजे| मानसपूजा ||३३||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आर्चनभक्तिनाम समास पंचवा ||||४. ५



प्रथम पूजा व मानस पूजा म्हणजे काय हें सांगितले आहे. :
मागील समासामध्यें चौथ्या भक्तीचें लक्षण सांगितलें. आतां लक्ष देउन पांचवी भक्ति ऐका. अर्चन म्हणजे पूजा ही पांचवी भक्ति होय. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणें याचें नाव अर्चन. शास्त्रांत सांगितलेल्या पध्दतीप्रमाणेंच पूजा करावी. अनेक प्रकारची आसनें, पूजेची भांडीं, वस्त्रें, अलंकार वापरून पूजा करावी. त्याचप्रमाणें देवाच्या मूर्तींचें ध्यान करुन मनानें पूजा करावी. अशा पूजेला पांचवी भक्ति हें नाव आहे.

देव, ब्राह्मण, अग्नि, साधूसंत, अतिथि, यति म्हणजे संन्यासी, आत्मज्ञानी महात्मा, गाय या सर्वांची पूजा करावी. तिला पांचवी भक्ति हें नाव आहे. सोनें, चांदी, तांबें इ. धातूंच्या मूर्ति, दगडी व मातीच्या मूर्ति, तसबिरी आणि उत्तम भांडीं यांची पूजा करावी. तसेंच आपल्या घरच्या देवांची पूजा करावी. यास पांचवी भक्ति म्हणतात.

आतां कोणकोणत्या देवतांची पूजा करावी त्यांची नावें सागतात. त्यांतील बहुतेक नांवें आपल्या परिचयाची आहेत. :
सात आणि नऊ शुभचिन्हें असलेले दगड, शाळिग्राम, चक्राचें चिन्ह असलेले दगडाचे तुकडे, शंकराच्या पिंडी, उन्हांत धरल्यावर ज्यातून अग्नी बाहेर पडतो असे सुर्यकांत मणी, चांदण्यांत ज्यांतून पाझर बाहेर पडतो असे चंद्रकांत मणी, बाण, शेंदूर फासलेले दगड, नर्मदेंतील गोटे, भैरव, भगवती, मल्हारी, मुंज्या, नृसिंह, बनशंकरी, नाग, अनेक प्रकारची नाणी, पंचायतनें गणेश, शारदा, विद्दल, रंगनाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड,

मत्स्य, कुर्मे, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हयग्रीव,म्हणजे माणसाचें धड व घोड्याचे तोंड असा विष्णूचा अवतार अशा सगळ्यांची, त्यांच्या मूर्तीची पूजा करावी यापुढें संध्येतील चोवीस नावें आहेत केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसुधन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्यनाभ, दामोदर, संकर्षण वासुदेव, प्रदुम्न, अनिरुद्ध,पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह अच्युत, जनार्दन, उपेंद्र, याप्रमाणें हरिहरांच्या अनंत मूर्ती आहेत. भगवंत जगदात्मा, जगदीश यांच्या मूर्ती, आणि शिवशक्तीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती घेऊन त्यांची पूजा करावी. त्याचप्रमाणें अश्वत नारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रीमलनारायन, श्रीहरीनारायण, आदिनारायण, शेषशायी परमात्मा अशा परमेश्वराच्या अगणित मूर्ति आहेत. त्यांचें पूजन करणें ही पांचवी भक्ति होय.   

नंतर कुलधर्म व कुलाचार असें परंपरेनें चालत आले असतील तसें चालूं ठेवावे. :
याशिवाय आपल्या घरीं जे कुलधर्म असतील ते जसें चालत आले आहेत तसेंच करावें. ते उत्तम असोत किंवा मध्यम असोत आपण ते करीत जावे. जाखमाता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी या क्षुद्र देवतांची व स्त्रियांची पूजा जर कुळधर्मांत असेल तर ती सुध्दां करावी.

निरनिराळ्या तीर्थांत जाऊन तेथील देवांची पूजा करावी असें सांगून देवाचें वैभव वाढविण्यासाठीं देवाला काय काय वस्तु द्याव्या यांची लांब यादी दिली आहे. :
निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांस जावें, तेंथील देवांची पूजा करावी. अनेक प्रकारच्या साधनसामग्रीनें इश्वराची पूजा करावी.

उपचार कोणते ते ऐकावें :
पंचामृत, गंधाक्षता, फुलें, अत्तरादि पुष्कळ सुंगधी द्रव्यें, धूपदीप, नाना प्रकारच्या आरत्या व नीरांजनें, अनेक प्रकारच्या खाद्यांचे सुंदर नैवेद्य, अनेक प्रकारची फळें व तांबूल, दक्षिणा, अनेक प्रकारचे अलंकार, भारी वस्त्रें, वनमाला,

पालख्या, छत्रें, आराम देणारी आसनें, छत्र्या, पालखीवर धरायच्या उंच छत्र्या, अबदगिर्‍या, दिंड्या, पताका, निशाणें, टाळ, घोळ, मृदंग अनेक प्रकारची वाद्यें, अनेक प्रकारचे उत्सव, त्यांत अनेक भक्तांचे समूह, आणि तेथें हरिदास भगवंताचे गुण गाऊं लागले म्हणजे भगवंताबद्दल उत्तम श्रध्दा निर्माण होते. पाण्याचे आड, विहिरी, तळीं नाना प्रकारची देवळें व त्यांची शिखरें, मोठी आंगणें, सुंदर वृदांवनें, तळघरें, मठ, दुकानांच्या जागा, धर्मशाळा, देवाच्या दाराशी ओसर्‍या, इतर अनेक सांधनें, रंगीबेरंगी कागदी फुलांच्या माळा, अनेक प्रकारच्या वस्त्रांचा सांठा., तर्‍हेतर्‍हेचे पडदे, मंडप, छतें, मोत्याचें लोंबणारे घोस, हत्ती, रथ व गाड्या निरनिराळ्या देवळांना अर्पण करावे.

अलंकार व ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य व तें ठेवण्याच्या पेट्या, अन्नोदक आणि ताटें, वांट्या, पातेलीं, हंडे वगैरे भांडीं, जंगलें, बागा, फुलवाड्या, तापसी साधकांसाठीं झोंपड्या, अशा प्रकारचे उपचार अर्पण करुन जगन्नायक ईश्वराची पूजा होते. आपण ते उपचार त्याला मनापासून अर्पण करावें.

यानंतर पक्षी व जनावरें देवाला अर्पण करावी असें सांगून त्यांचीं नावें देतात. :
पोपट, साळुंख्या, मोर, बदकें, चक्रवाक, चकोर, कोकिळा, हे पक्षी आणि चीतळ, सांबर या प्रकारचीं हरणें देवालयांना अर्पण करावी. त्याचप्रमाणें कस्तूरीमृग, मांजरे, गाई, म्हशी, बैल, वानरें, हीं जनावरें, आणखी नाना प्रकारचे पदार्थ व लहान मुलें देवालयांना अर्पण करावीं.

अर्चन भक्तिचा समारोप करतांना श्री समर्थ मुद्दाम सांगतात कीं पूजा अगदी मनापासून करावी, जशी देवाची तशीच सदगुरुची करावी, बाहेरची करावी तशीच मनामध्यें करावी. :
काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा, जीव व प्राण ही सगळी भगवंताच्या पायीं अर्पण करुन अगदी मनापासून त्याची पूजा करणें यास अर्चनभक्ति म्हणतात. अशाच रीतीनें श्रीसदगुरूची पूजा करुन त्याच्याशी अनन्य शरणागत होणें, ‘ तुमच्याशिवाय मला दुसरें खरें कोणी नाहीं या भावनेनें त्याची पूजा करणें ही भगवंताची पूजा समजावी. हीच पांचवी भक्ति होय. बाहेरील उपचार वापरून अशी पूजा घडूं शकली नाहीं तर मनानें आंतमध्यें ती करावी. भगवंताची मानसपूजा होणें फार अगत्याचें आहे. आपल्या अंतर्यामीं मनानें भगवंताची पूजा करावी. बाहेरील सर्व उपचार आपल्या कल्पनेनें निर्माण करुण आंतल्या आंत ते भगवंताला अर्पण करावें. अशा रीतीनें मनानें केलेल्या भगवंताच्या पूजेला मानसपूजा म्हणतात. आपण देवाला जें जें वाहावें असें वाटेल तें तें कल्पनेनें निर्माण करुन त्याला वाहावें. मानसपूजा करण्याची पध्दत अशी आहे.

॥ श्रीराम समर्थ ॥