श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Sunday, March 27, 2011

||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||४|| समास सातवा : दास्यभक्ति ||


||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास सातवा : दास्यभक्ति ||

||श्रीराम ||

मागां जालें निरूपण| साहवें भक्तीचें लक्षण |
आतां ऐका सावधान| सातवी भक्ती ||||

सातवें भजन तें दास्य जाणावें| पडिलें कार्य तितुकें करावें |
सदा सन्निधचि असावें| देवद्वारीं ||||

देवाचें वैभव संभाळावें| न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें |
चढतें वाढतें वाढवावें| भजन देवाचें ||||

भंगलीं देवाळयें करावीं| मोडलीं सरोवरें बांधावीं |
सोफे धर्मशाळा चालवावीं| नूतनचि कार्यें ||||

नाना रचना जीर्ण जर्जर| त्यांचे करावे जीर्णोद्धार |
पडिलें कार्य तें सत्वर| चालवित जावें ||||

गज रथ तुरंग सिंहासनें| चौकिया सिबिका सुखासनें |
मंचक डोल्हारे विमानें| नूतनचि करावीं ||||

मेघडंब्रें छत्रें चामरें| सूर्यापानें निशाणें अपारें |
नित्य नूतन अत्यादरें| सांभाळित जावीं ||||

नाना प्रकारीचीं यानें| बैसावयाचीं उत्तम स्थानें |
बहुविध सुवर्णासनें| येत्नें करीत जावीं ||||

भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा| रांझण कोहळीं घागरी बहुवसा |
संपूर्ण द्रव्यांश ऐसा| अति येत्नें करावा ||||

भुयेरीं तळघरें आणी विवरें| नाना स्थळें गुप्त द्वारें |
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें| येत्नें करीत जावीं ||१०||

आळंकार भूषणें दिव्यांबरें| नाना रत्नें मनोहरें |
नाना धातु सुवर्णपात्रें| येत्नें करीत जावीं ||११||

पुष्पवाटिका नाना वनें| नाना तरुवरांचीं बनें |
पावतीं करावीं जीवनें| तया वृक्षांसी ||१२||

नाना पशूंचिया शाळा| नाना पक्षी चित्रशाळा |
नाना वाद्यें नाट्यशाळा| गुणी गायेक बहुसाल ||१३||

स्वयंपाकगृहें भोजनशाळा| सामग्रीगृहें धर्मशाळा |
निद्रिस्तांकारणें पडशाळा| विशाळ स्थळें ||१४||

नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें| नाना खाद्यफळांचीं स्थळें |
नाना रसांचीं नाना स्थळें| येत्नें करीत जावीं ||१५||

नाना वस्तांची नाना स्थानें| भंगलीं करावीं नूतनें |
देवाचें वैभव वचनें| किती म्हणौनि बोलावें ||१६||

सर्वां ठाई अतिसादर| आणी दास्यत्वासहि तत्पर |
कार्यभागाचा विसर| पडणार नाहीं ||१७||

जयंत्या पर्वें मोहोत्साव| असंभाव्य चालवी वैभव |
जें देखतां स्वर्गींचे देव| तटस्त होती ||१८||

ऐसें वैभव चालवावें| आणी नीच दास्यत्वहि करावें |
पडिले प्रसंगीं सावध असावें| सर्वकाळ ||१९||

जें जें कांहीं पाहिजे| तें तें तत्काळचि देजे |
अत्यंत आवडीं कीजे| सकळ सेवा ||२०||

चरणक्षाळळें स्नानें आच्मनें| गंधाक्षतें वसनें भूषणें |
आसनें जीवनें नाना सुमनें| धूप दीप नैवेद्य ||२१||

शयेनाकारणें उत्तम स्थळें| जळें ठेवावीं सुसीतळें |
तांबोल गायनें रसाळें| रागरंगें करावीं ||२२||

परिमळद्रव्यें आणी फुलेएलेएं| नाना सुगंधेल तेलें |
खाद्य फळें बहुसालें| सन्निधचि असावीं ||२३||

सडे संमार्जनें करावीं| उदकपात्रें उदकें भरावीं |
वसनें प्रक्षालून आणावीं| उत्तमोत्तमें ||२४||

सकळांचें करावें पारपत्य| आलयाचें करावें आतित्य |
ऐसी हे जाणावी सत्य| सातवी भक्ती ||२५||

वचनें बोलावीं करुणेचीं| नाना प्रकारें स्तुतीचीं |
अंतरें निवतीं सकळांचीं| ऐसें वदावें ||२६||

ऐसी हे सातवी भक्ती| निरोपिली येथामती |
प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं| मानसपूजा करावी ||२७||

ऐसें दास्य करावें देवाचें| येणेंचि प्रकारें सद्गुरूचें |
प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें| करित जावें ||२८||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्तिनाम समास सातवा ||||४. ७


प्रथम दास्यभक्तिची व्याख्या सांगतात :
मागील समासामध्यें सहाव्या भक्तिचें वर्णन झालें. आतां सातवी भक्ति मन लावून ऐकावी. देवाचें दास्य करणें म्हणजे सातवी भक्ति होय. देवाची सेवा करण्यासाठीं देवाच्या दाराशीं नेहमी जवळ असावें, आणि देवाचें जें काम पडेल तें सगळें आपण स्वतः करावें. देवाचें वैभव, ऐश्वर्य आपण रक्षण करावें, त्यांत कमीजास्त होऊं देऊं नये. इतकेच नव्हे तर देवाचें वैभव, त्याची पूजाअर्चा, त्याचा उत्सव, वगैरे आणखी वाढेल असा आपण प्रयत्न करावा. देवाचें वैभव चढत्या प्रमाणांत कसें वाढवावें याचें सविस्तर वर्णन करतात. अर्चन भक्तिमध्यें सांगितलेल्या कांहीं गोष्टींचा पुनरुच्चार येथें आढळेल. मोडलेलीं देवालयें दुरुस्त करावी. मोडलेले तलाव नीट बांधून काढावे. सोपे, धर्मशाळा वगैरे नवीन बांधकामें सुरुं करावी. जीं जुनीं बांधकामें अगदीच मोडकळीस आलेली असतील त्यांचा जीर्णोध्दार करावा. अशा रीतीनें जें जें देवाचें काम करणें जरुर असेल तें तें लगेंच चालूं करावें.

हत्ती, रथ, घोडे, सिंहासनें, पालख्या, सुखवाहनें, पलंग, डोलारे, विमानें वगैरे सगळें नवें करावें. मेधडंबर्‍या, छत्रें, चामरें, अबदगिर्‍या. पुष्कळ निषाणें या वस्तु अति काळजीपूर्वक साफसूफ करुन जतन कराव्या. देवाची अनेक प्रकारची वाहनें, बसावयासाठीं चांगल्या चांगल्या जागा, तर्‍हेतर्‍हेची सोन्याची आसनें, वगैरे अगदी यत्नपूर्वक करावी.

घरें, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, हौदासारखी पाण्याची भांडीं, बर्‍याचशा घागरी, अशा प्रकारच्या भारी किमतीच्या वस्तु मोठ्या प्रयत्नानें देवासाठीं घ्याव्या. अनेक ठिकाणीं भुयारें, तळघरें आणि त्यांना जोडणारे बोगदे तयार करावें. त्यामध्यें जाण्यायेण्यासाठीं गुप्त दारें ठेवावी. आणि आंतमध्यें अत्यंत मौल्यवान जडजवाहिर ठेवण्यासाठीं कोठारें करावी.

देवासाठी दागिने, भूषणें, भारी किंमतीची वस्त्रें, अनेक प्रकारची सुंदर रत्नें, अनेक धातूंची व सोन्याची भांडीं मोठ्या खटपटीनें मिळवून ठेवावी. फुलाबागा, रानें, निरनिराळ्या झांडाच्या राया तयार कराव्या. त्या झाडांना पाणी देऊन फळती करावी. अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक प्रकारची वाद्यें, नाटकें करण्यासाठी रंगभूमी, पुष्कळ चांगल्यापैकी गायक, स्वयंपाक घरें, जेवण्यासाठीं मोठ्या जागा, स्वैपाकाचें सामान ठेवण्यासाठीं कोठी घरें, धर्मशाळा, झोपण्यासाठीं ओसर्‍या, या सगळ्या शाळा विशाल असाव्या.

अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तु ठेवण्यासाठीं जागा, नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तु व फळें ठेवण्यासाठीं जागा, अनेक प्रकारचे पातळ पदार्थ ठेवण्यासाठीं जागा खटपट करुन तयार कराव्या. अशा अनेक प्रकारच्या वस्तु ठेवण्याच्या अनेक जागा जर जुन्या होऊन मोडकळीस आल्या असतील तर त्या नव्या करुन द्यावा. देवाचें वैभव शब्दांनीं सांगावें तितकें थोडेंच होईल.

मी देवासाठीं आहे ही भावना ठेऊन ज्या ज्या कृतीनें देवाचें वैभव वाढेल तें तें करण्यास निरंतर तयार असावें. अगदी हलक्यांतील हलकें काम करण्यास चटकन पुढें व्हावें : 
देवाकडे येणाऱ्या सर्व माणसांबद्दल अत्यंत आदर असावा. त्यांची सेवा करण्यास सदा तयार रहावें. आपल्या वाट्यांस आलेलें काम तर तत्परतेनें करावेंच. परंतु मंदिराच्या कार्यभागाचा विसर पडणार नाहीं हेंही सांभाळावें. देवाच्या जयंत्या, पर्वे आणि महोत्सव अशा विलक्षण वैभवानें चालवावें कीं लोकांना तें कल्पनेच्या पलीकडे वाटावें. देवाचा उत्सव व त्याचें वैभव पाहून स्वर्गातील देवसुद्धां चकित होऊन जावे. देवाचें वैभव असें चढतेंवाढतें ठेवावें पण अगदी हलक्यांतील हलकें काम देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ति सोडूं नये. जो प्रसंग पडेल तेथें सेवा करण्यासाठी निरंतर तयार असावें.

देवासाठीं जें जें कांही हवें असेल तें ताबडतोप द्यावें. देवाची सर्व सेवा अगदी आवडीनें करावी. देवासाठीं कोणती सेवा करावी याचें थोडक्यांत वर्णन करतात :  पाय धुण्यासाठीं, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावें: गंधाक्षता, कपडे, दागिने, आसनें, पिण्यास पाणी , फुलें, धूप, दीप, नैवेद्य, झोपण्यासाठीं उत्तम जागाआणि चांगलें गार पाणी या वस्तू तयार ठेवाव्या. विड्याचें सामान टेवावें. रागदारीमध्यें बसविलेलें रसाळ गायन करावें सुगंधी पदार्थ, फुलांची तेलें, अनेक सुगंधी तेलें, पुष्कळ प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळें जवळ ठेवावी आणि लोकांना द्यावी.

झाडलोट करून सडा घालावा, पाण्याचीं भांडीं स्वच्छ पाण्यानें भरून ठेवावी. कपडे अगदी स्वच्छ धुवून आणावे. देवाकडे येणार्‍या सगळ्यांचा आदरसत्कार करावा. त्यांना काय हवे नको तें पहावें. आल्यागेल्याचा पाहूणचार करावा. सातवी भक्ति ही खरोखर अशा प्रकारची आहे.

जसें देवाचें वैभव वाढवावें तसेंच सदगुरुचें वाढवावें. प्रत्यक्ष न आलें तर मानसपूजेंत तरी जरुर करावें. :
देवाच्या दासाचें बोलणें दयेनें भरलेले असावें. दुसर्‍याबद्दल अनेक प्रकारें चांगलें बोलणें असावें. ऐकणारांचें अंत:करण समाधान पावेल, शांत होऊन सुखावेल असें त्याचें बोलणें असावें. अशी ही सातवी भक्ति माझ्या बुध्दिप्रमाणें मी वर्णन केली. ती प्रत्यक्ष घडली तर उत्तमच. पण तशी न घडली तर निदान मानसपूजेंत तरी अवश्य करावी. वर सांगितलेल्या पध्दतीनें देवाचें दास्य करावें. त्याच रीतीनें सदगुरुचें दास्य करावें. तें प्रत्यक्ष करणें शक्य नसल्यास मानसपूजेंत तरी जरुर करावें.

श्रीराम समर्थ !!!