श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, March 10, 2011

||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||२|| समास चवथा : पादसेवन भक्ति ||


||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास चवथा : पादसेवन भक्ति ||

|| श्रीराम ||

मागां जालें निरूपण| नामस्मरणाचें लक्षण |
आतां ऐका पादसेवन| चौथी भक्ती ||||

पादसेवन तेंचि जाणावें| कायावाचामनोभावें |
सद्गुरूचे पाय सेवावे| सद्गतिकारणें ||||

या नांव पादसेवन| सद्गुरुपदीं अनन्यपण |
निरसावया जन्ममरण| यातायाती ||||

सद्गुरुकृपेविण कांहीं| भवतरणोपाव तों नाहीं |
याकारणें लवलाहीं| सद्गुरुपाय सेवावे ||||

सद्वस्तु दाखवी सद्गुरु| सकळ सारासारविचारु |
परब्रह्माचा निर्धारु| अंतरीं बाणे ||||

जे वस्तु दृष्टीस दिसेना| आणी मनास तेहि भासेना |
संगत्यागेंविण ये ना| अनुभवासी ||||

अनुभव घेतां संगत्याग नसे| संगत्यागें अनुभव न दिसे |
हें अनुभवी यासीच भासे| येरां गथागोवी ||||

संगत्याग आणी निवेदन| विदेहस्थिती अलिप्तपण |
सहजस्थिती उन्मनी विज्ञान| हे सप्तहि येकरूप ||||

याहिवेगळीं नामाभिधानें| समाधानाचीं संकेतवचनें |
सकळ कांहीं पादसेवनें| उमजों लागे ||||

वेद वेदगर्भ वेदांत| सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत |
अनुभव अनुर्वाच्य धादांत| सत्य वस्तु ||१०||

बहुधा अनुभवाचीं आंगें| सकळ कळती संतसंगें |
चौथे भक्तीचे प्रसंगें| गोप्य तें प्रगटे ||११||

प्रगट वसोनि नसे| गोप्य असोनि भासे |
भासाअभासाहून अनारिसे| गुरुगम्य मार्ग ||१२||

मार्ग होये परी अंतरिक्ष| जेथें सर्वहि पूर्वपक्ष |
पाहों जातां अलक्ष| लक्षवेना ||१३||

लक्षें जयासी लक्षावें| ध्यानें जयासी ध्यावें |
तें गे तेंचि आपण व्हावें| त्रिविधा प्रचिती ||१४||

असो हीं अनुभवाचीं द्वारें| कळती सारासारविचारें |
सत्संगेंकरून सत्योत्तरें| प्रत्ययासि येतीं ||१५||

सत्य पाहातां नाहीं असत्य| असत्य पाहातां नाहीं सत्य |
सत्याअसत्याचें कृत्य| पाहाणारापासीं ||१६||

पाहाणार पाहाणें जया लागलें| तें तद्रूपत्वें प्राप्त जालें |
तरी मग जाणावें बाणलें| समाधान ||१७||

नाना समाधानें पाहातां| बाणती सद्गुरु करितां |
सद्गुरुविण सर्वथा| सन्मार्ग नसे ||१८||

प्रयोग साधनें सायास| नाना साक्षेपें विद्याअभ्यास |
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास| पाविजेत नाहीं ||१९||

जें अभ्यासें अभ्यासितां न ये| जें साधनें असाध्य होये |
तें हें सद्गुरुविण काये| उमजों जाणे ||२०||

याकारणें ज्ञानमार्ग- | कळाया, धरावा सत्संग |
सत्संगेंविण प्रसंग| बोलोंचि नये ||२१||

सेवावे सद्गुरूचे चरण| या नांव पादसेवन |
चौथे भक्तीचें लक्षण| तें हें निरोपिलें ||२२||

देव ब्राह्मण माहानुभाव| सत्पात्र भजनाचे ठाव |
ऐसिये ठाईं सद्भाव| दृढ धरावा ||२३||

हें प्रवृत्तीचें बोलणें| बोलिलें रक्षाया कारणें |
परंतु सद्गुरुपाय सेवणें| या नांव पादसेवन ||२४||

पादसेवन चौथी भक्ती| पावन करितसे त्रिजगतीं |
जयेकरितां सायोज्यमुक्ती| साधकास होये ||२५||

म्हणौनि थोराहून थोर| चौथे भक्तीचा निर्धार |
जयेकरितां पैलपार| बहुत प्राणी पावती ||२६||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पादसेवनभक्तिनिरूपणनाम समास चवथा ||||४. ४


प्रथम पादसेवनभक्तिची व्याख्या सांगून श्रीसदगुरुंचें कार्य कोणते तें सांगतात. :
मागील समासामध्यें नामस्मरणाच्या लक्षणांचें विवेचन झालें. आतां भक्तीचा चौथा प्रकार जो पादसेवन तो ऐकावा. सदगतीसाठीं म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठीं कायेनें, वाचेंनें, मनानें आणि आपलेंपणानें सदगुरुची चरणसेवा करणें याला पादसेवनभक्ति म्हणतात.

जन्ममरणाची यातायात कायमची सुटावी म्हणून सदगुरुच्या चरणीं अनन्य होणें यांस पादसेवन म्हणतात. हा संसारसागर तरुन जाण्यास सदगुरुच्या कृपेवांचून दुसरा उपाय नाहीं. म्हणून शक्य तितक्या लवकर सदगुरुच्या चरणाची सेवा सुरुं करावी. भवसागर म्हणजे आपल्या देहासकट सर्व दृश्य व विनाशी वस्तूंचा अनंत समुदाय. आपण त्या समुदायामध्यें जन्मतो, जगतो, रस घेतो आणि अखेर असमाधानांत मरतो. त्यांमधून बाहेर पडून शांति मिळवण्यासाठीं त्यांतून बाहेर पडलेल्या पुरुषाचीच मदत हवी. मार्गदर्शन हवें. म्हणून संतपदीं स्थिर झालेल्या सदगुरुच्या चरणीं लीन होणें अवश्य असतें. सदगुरुची सेवा म्हणजे त्यानें दाखविलेल्या मार्गानें जाऊन आपलें जीवन भगवत-कृपेला पात्र करणें होय. सदगुरुची कृपा म्हणजेच ईश्वरकृपा समजावी. सदगुरु परमात्मवस्तु दाखवितो, आत्मसाक्षात्कार करुन देतो. सत्य काय असत्य काय, चांगले काय वाईट काय, ग्राह्य काय अग्राह्य काय या सगळ्यांचा विचार सदगुरुच समजावून सांगतात. त्यांच्याकडून श्रवण केल्यानें परमात्मवस्तूचें निश्चित ज्ञान अंत:करणात ठसतें.

ब्रह्मज्ञान खरें पाहतां गुप्तच आहे. अत्यंत समाधान हें त्याचें चिन्ह आहे. अनेक शब्दांनीं या समाधानाचें वर्णन करतां येतें. अशा गुप्त गोष्टी सदगुरुच्या सेवासान्निध्यांत कळतात. :
परमात्मवस्तु डोळ्यांनीं पाहतां येत नाहीं. मनानें तिचें आकलन होत नाहीं. कारण मनाला ती भासत नाहीं.
संगत्यागावांचून तिचा अनुभव येत नाहीं. संग शब्द संज धातूपासून बनला आहे. संज म्हणजे चिकटणें. संग म्हणजे वस्तूला मनानें चिकटणें. संगत्याग म्हणजे एका भगवंतावांचून मन कोणत्याही वस्तूला न चिकटणें. ज्या वस्तूला मन चिकटतें तेथें बांधलें जातें. म्हणून संगत्याग म्हणजे यच्चयावत दृश्य वस्तूच्या बंघनांतून मन मोकळे होणें. ‘ मी अनुभव  घेतो ’ ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत अस्तें तोंपर्यंत ज्ञाता व ज्ञेय यांच्यावेगळेपणामूळें दृश्याशीं संबंध राहतो. म्हणून तेथें संगत्याग नसतो. दृश्य सर्वस्वीं विलीन झालें कीं अनुभव घेणारा ‘ मी ’ नाहींसा होतो. ज्ञेयाबरोबर ज्ञाता देखील नाहींसा होतो. या संगत्यागाच्या अवस्थेंत ‘ मी अनुभव घेतो ’ ही जाणीव उरत नाहीं. माझें हें बोलणें स्वानुभवी पुरुषालाच बरोबर कळेल. इतरांना मात्र तो केवळ शब्दांचा घोटाळा किंवा गोंधळ वाटेल. संगत्याग, निवेदन म्हणजे देवाला मीपणा अर्पण करणें, विदेहस्थिति, अलिप्तपणा, सहजस्थिति, उन्मनी आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत. संगत्याग परमात्मवस्तु अत्यंत सूक्ष्म आहे. बुध्दि, मन आणि इंद्रियें दृश्यांत वावरत असल्यानें, त्यांच्या द्वारा जीव दृश्याला चिकटत असल्यानें, तें संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजेच संगत्यागाखेरीज आत्मस्वरुपाचा अनुभव येत नाही. निवेदन माणसाचा अहंकार रुपी मी बुध्दि, मन, आणि इंद्रियें यांचें गांठोडें आहें. त्या गांठोड्यांत आंत बाहेर सारे अनात्म दृश्य भरलेलें आहे. तो मी नाहींचा केला कीं दृश्याचा नायनाट झाला. त्या ‘मीला भगवंताच्या चरणीं अर्पण करणें हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे म्हणून संगत्याग आणि निवेदन एकच समजावें. विदेहस्थिति सामान्य माणसाची सदेहस्थिती असते. ‘ मी देहच आहे या घट्ट भावनेंनें त्याचे सर्व व्यवहार घडतात. जगांतील सर्व दृश्याचें केंद्र असणारा देह त्याला अत्यंत खरा वाटतो. त्यामुळें तो अगदी आंतून देहाला चिकटलेला असतो, अर्थात त्यामुळेंच देहाला बांधलेला असतो. ज्या मानानें देहांचें प्रेम कमी होतें त्या मानानें दृश्याचें प्रेम सुटतें. देहाचा संपूर्ण विसर पडला कीं दृश्याचें प्रेम सर्वस्वी नाहींसे होतें. या अवस्थेंत देह असून नसल्यासारखा होतो. ती देहबंधशून्य अवस्था असते. म्हणून संगत्याग आणि विदेहस्थिति एकच असतात. अलिप्तपणा लिप्त शब्द लिप धातूपासून बनतो. लिप म्हणजे लिंपणें, लेप करणें, माखणें, दूषित केलेला, लेप लागलेला. अलिप्त म्हणजे न माखलेला, न दूषित झालेला, मूळ स्थिति जशीच्या तशीच शुध्द असलेला. आपली मुळची अवस्था अत्यंत शुध्द, पवित्र, दृश्याच्या पलीकडे व पूर्ण आहे. परंतु अविद्येच्या प्रभावानें आपण मूळ अवस्था विसरलों. आणि या दृश्य अशाश्वत विश्वामध्यें गुरफटून गेलों. आपला जीव आतंबाहेर दृश्यानें माखला गेला. आपण दूषित झालों. आपलें सुख दृश्यामध्यें आहे या भ्रमानें दृश्य वस्तु हव्याश्या वाटूं लागल्या. या वाटण्याला वासना म्हणतात. वासनेंनें आपल्याला अपवित्र केलें. दृश्य वस्तू बाधत नाहीं, तिची वासना मनाला विटाळ करतें वासना क्षय पावली कीं दृश्याची किंमत राहात नाहीं. त्याचें आकर्षण लटकें पडतें. मग दृश्य असून आपल्याला दूषित करीत नाहीं. म्हणून संगत्यागव व अलिप्तपण एकच.

सहजस्थिती " सह जातं, सहजम " म्हणजे आपल्या बरोबर जन्मलेले, किंवा " सह जन्मना एव उत्पन्नम " म्हणजे जन्म: च प्राप्त झालेलें, जन्मास आलेंले मुल अमुक हवें अमुक नको असें म्हणत नाहीं. तें सुख मिळविण्याचा प्रयत्न करीत नाहीं. तसेंच दु:ख टाळण्याचा प्रयत्न करीत नाहीं. जितक्या सहजपणें तें सुखाला तयार असतें तितक्याच सहजपणें तें दु:खाला तयार राहतें. या अवस्थेला वेदान्तांत सहजस्थिति असें म्हणतात. दृश्य हें मुलत: भ्रम असल्यानें तें खरें सुखाचें नाहीं. तसेंच तें खरें दु:खाचें नाहीं. म्हणून दृश्याला चिकटलेलें मन तेथून संपूर्णपणें सुटून ह्र्दयकमलांत स्थिर झाल्यावांचून सुखदु:खांना सहजतेनें तोंड देतां येत नाहीं. दृश्यांत गुंतलेले मन सुटणें म्हणजेच संगत्याग होय. अर्थात संगत्याग साधला कीं त्याचें पर्यवसान सहजावस्थेंत होतें. यासाठीं दोन्ही एकच होत. उन्मनी उद अधिक मनस मिळून उन्मन शब्द बनतो. उद म्हणजे उर्ध्वगति, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकासणें, मुक्त करणें, इ. मनस म्हणजे मन. सामान्य माणसाचें मन जागेपण, स्वप्न आणि गाढ झोंप या तीन अवस्थांमध्येंच वावरतें. पण तीनही अवस्थांत तें दृश्याने भरलेलें असतें. जागेपणीं इंद्रियांच्या द्वारा जें जग आंत घेतलेलें असतें तेंच स्वप्नांत अवतरतें. तेच गाढनिद्रेंत तात्पुरतें लीन होऊन राहतें. साधनी माणूस साधनाच्या हत्यारानें मनांत भरलेला दृश्याचा भार कमी करत जातो. त्यामुळें मन सूक्ष्म बनत जातें. मनाची सूक्ष्मता एका विशिष्ट अंशाला पोहोंचली कीं साधकाला ‘ मी देह नसून आत्मा आहे ’ असा अनुभव येतो. मनाच्या या अवस्थेला चौथी किंवा तुर्या अवस्था म्हणतात,. या अवस्थेमध्यें एकीकडे स्वस्वरुपाचें भान असतें तर दुसरीकडे दृश्य जगताचें भान असतें मनाचा विकास होतां होतां तें तुर्येपर्यंत पोहोंचतें. पण याहीपुढें विकास होतो. स्वस्वरुपाला मीपणानें अनुभवणारा शुध्द मी सुध्दां लीन होऊन केवळ परमात्मस्वरूप तेवढें उरतें. येथे मन मनरुपानें नाहींसें होतें. यास उन्मनी म्हणतात. जगत परमात्मस्वरुप दिसूं लागल्यानें दृश्य संपूर्ण विलयास जातें. म्हणून संगत्याग आणि उन्मनी दोन्ही अगदी एकच समजावी.

विज्ञान – वि अधिक ज्ञा म्हणजे नक्की जाणणें, पूर्ण जाणणें, ‘ शास्त्रार्थस्य स्वानुभवायत्तत्वापादनम विज्ञानम ’ म्हणजे शास्त्रार्थ स्वानुभवारुढ करणें किंवा शास्त्रांत वर्णिलेल्या परमात्मस्वरूपाचा स्वत: अनुभव घेणें. विज्ञान म्हणजे सायन्स असा अर्थ जरी केला तरी त्यांमध्यें प्रत्यक्ष प्रयोगानें सिध्द झालेल्या प्रमेयांनाच ज्ञान म्हणून किंमत असते. परमात्मस्वरुपाचें अनुभवसिध्द ज्ञान या अर्थानें विज्ञान हा शब्द श्री समर्थांनीं येथें योजिला आहे. परमात्मस्वरुप अत्यंत सूक्ष्म असल्यानें त्यास कांहीही स्थूल किंवा दृश्य स्पर्श करुं शकत नाहीं. जोपर्यंत आपण दृश्याला चिकटलेले असतो तोंपर्यंत आपण परम्यात्माला अर्थात संगत्याग व विज्ञान म्हणजे परमात्मस्वरुपाचा साक्षात अनुभव एकच आहेत. ब्रह्मसाक्षातकाराला आणखी निरनिराळी नांवें आहेत. पण साक्षातकारानें मिळणारें समाधान वर्णन करणारें ते भिन्न भिन्न संकेत शब्द समजावे. पण हें सगळें कांहीं सदगुरुची चरणसेवा केली म्हणजे आपोआप कळायला लागतें.

श्रीसदगुरुच्या संगतीत सेवा करुन राहिलें तर साक्षात्काराची निरनिराळी अंगें आपोआप उघड होतात. हा मार्ग आंतील आहे, गुप्त आहे. तेथें ज्ञेयाशी तादात्म पावून ज्ञाता त्याचें ज्ञान करुन घेतो. असें हें सगळें पादसेवनानें आकलन होतें. :
वेदांचा अर्थ, वेदाचें रहस्य अथवा मर्म, वेदांत तत्वज्ञान, शैव, सिध्दांचा मार्ग, सिध्दांच्या स्वानुभवाचें रहस्य, नाद बिंदू शून्यता, अलक्ष्यीं लक्ष इत्यादि असणारे अनुभव, परमात्म वस्तु. अशी पारमार्थिक अनुभवाची अनेक अंगें आहेत. संताचीं संगत लाभली तर तीं सर्व कळतात. पादसेवन्भक्तिच्या निमित्तानें अशा गुप्त व गूढ गोष्टी उघडपणें स्पष्ट होतात. परमात्मवस्तु प्रगट असून नसल्यासारखी आहे. ती अत्यंत झांकलेली असून मनाला भासते. परंतु ती वस्तु भास व अभास याहून निराळीच आहे. तिला ओळखण्याचा मार्ग गुरुकडूनच शिकावा लागतो. याचा अर्थ असा कीं आपण देहबुध्दीनें अथवा मीपणानें त्या वस्तूचा शोध घेऊं लागलों तर ती सर्व ठीकाणीं व्याप्त असून देखील आपल्या ज्ञानकक्षेंत येत नाहीं. तसेच क्वचित प्रसंगीं आपल्या मनाला तिच्या अस्तित्वाची खूण पटते. परंतु ती सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्यानें मीपणा बाजूस ठेवून तिला कसें पहावें हें सदगुरुपाशीच शिकावें लागतें.

परमार्थ हा मार्ग खरा. पण तो आंत जाण्याचा मार्ग आहे. आंत पाहतांना एका आत्मस्वरुपावांचून सर्व कांहीं अनात्मच समजायला पाहिजे. कारण जें जें कांहीं पाहतां येतें तें आत्मा नव्हें. मीपणानें पाहूं जातां आत्मवस्तु पाहतां येत नाहीं, ती अलक्षितच राहते. पूर्वपक्ष आणि सिध्दांत ही वेदांतशास्त्रांतील विषय मांडण्याची पध्दत आहे. पूर्वपक्षामध्यें स्वस्वरुपाबद्दल शंका किंवा आक्षेप घेतला जातो, सिध्दांतामध्यें त्याचें निरसन करुन स्वरुपसिध्दि केलेली आहे. म्हणून श्री समर्थ सांगतात कीं आतं पाहताना जें जें ज्ञेयपणानें ज्ञात होईल तें तें सगळें अनात्म्याच्या साम्राज्यांत जातें. आत्मवस्तु तशी पाहतां येत नाहीं. ती कशी पहावी तें लगेंच पुढील ओवींत सांगतात. जी वस्तु लक्ष देउन आंतमध्यें पहावी, ध्यानांमध्यें ज्या वस्तूचें ध्यान करावें, त्ती वस्तूच आपण होऊन जावें. आणि शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति यांचा आत्मप्रचीतिशी मेळ घालावा. आत्मवस्तु पाहतांना वेगळेपणानें उरतां कामा नये. तद्रुप होऊनच ती पहावी लागते.

असो स्वस्वरूपाचा अनुभव घेण्याचे हे असे मार्ग आहेत. सारासार विचार केला म्हणजे ते कळतात. वर ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर सत्पुरुषाच्या संगतीत राहिल्यानें अनुभवास येतील.

परमार्थामध्यें कितीतरी गोष्टी आपल्याला अज्ञात असतात.शिवाय दृश्य व्यवहारांत प्रयत्न करून पुष्कळ गोष्टी साध्य करून घेतां येतात. तसें येथें नसतें. म्हणून सद्गुरूची सेवा करून त्याच्या संगतींत राहिलें तर सगळें सहज कळतें :

सत्य असलेली परमात्मवस्तू तिच्याशी तद्रूप होऊन पहिली, अनुभवली कीं असत्य असलेलें दृश्य विश्व खरेंपणानें उरत नाहीं, आणि दृश्यच जोपर्यंत खरें वाटतें तोपर्यंत परमात्मवस्तूचा अनुभव येत नाहीं. म्हणून अखेर अनुभव घेणार्‍याच्या आंतरिक अवस्थेवर सत्य व असत्य यांची प्रचीति अवलंबून राहते.   

पाहणारा कोणी परमात्मवस्तु पाहायला लागतो. परंतु पाहणारा तिच्याशी तद्रूप झाला तरच ती पाहता येते किंवा प्राप्त होते. अशा तद्रूपतेनेंच अंगी समाधान बाणतें हे समजून असावें. जोपर्यंत द्रष्टा द्रष्टेपणानें वेगळा राहुन परमात्मवस्तु अनुभवण्य़ाची धडपड करतो. तोपर्यंत तिचें दर्शन होत नाहीं. द्र्ष्टा परमात्मवस्तूमध्यें विलीन झाला, ती वस्तूच आपण होऊन राहिला, ‘ तें गें तेंचि आपण व्हावे ’ ( श्री समर्थ ) म्हणजेच तिंचे दर्शन घडतें व अंगीं समधान विलसूं लागतें. समाधानाची अनेक अंगें आहेत. सदगुरुची सेवा करण्यानें तीं आपल्या अंगीं प्रकट होऊं लागतात. म्हणून सगगुरुच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाहीं. प्रयोग म्हणजेच नाना दिव्य वनस्पतीचें सेवन करणें, तसेंच नाना मंत्रांचा जप करुन जप करुन सिध्दि मिळविणें किंवा यंत्रांची पूजाअर्चा करुन इष्टप्राप्ति करुन घेणें. साधनें म्हणजे ज्ञान, भक्ति, कर्म, योग, इ. आत्मज्ञानाचे मार्ग. सायास म्हणजे उपासतापास, व्रतें, तीर्थयात्रा, इ. शरीर कष्ट. साक्षेपें विद्याभ्यास म्हणजे मोठ्या प्रयत्नानें अनेक शास्त्रांचा अभ्यास करुन विद्यावान होणें. या सर्व गोष्टी व्यवहारांत चांगल्या खर्‍या परंतु सदगुरुपाशी राहून जें मिळतें त्याच्या तुलनेनें वरील गोष्टी कुचकामाच्या असताता. सदगुरु जे देतो तें त्या गोष्टी देऊं शकत नाहींत. परमात्मवस्तूचा अभ्यास करतां येत नाहीं कारण मीपणावांचून अभ्यास होत नाहीं. आणि परमात्म्याला मीपणां चालत नाहीं. परमात्मवस्तू साधनानें साध्य होत नाहीं कारण साधन करणारा जीव अल्प, त्याचें साधन अल्प आणि साधनाचा काल अल्प. आणि परमात्मा सर्व दृष्टीने अनंत. अर्थात अल्पाने अल्पपणा सांभाळून अनंताला गवसणीं घालण्याचा प्रयत्न कितीही केला तरी त्याला यश येणें शक्यच नाहीं. या गूढ गोष्टी सदगुरुचा सहवास झाल्याखेरीज आकलन होत नाहींत. म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग समजून घ्यायचा असेल तर सदगुरुची, संताची संगत घरावी. संताच्या संगतीशिवाय परमात्मस्वरुपाच्या अनुभवाचा विषय बोलण्यास जाऊं नयें.

पादसेवनभक्तीचा असा गूढ अर्थ सांगून झाल्यावर श्री समर्थ शेवटीं व्यवहारदृष्ट्या त्या भक्तीप्रकाराचा अर्थ सांगतात :
सद्गुरूच्या चरणाची सेवा करणें याचें नांव पादसेवन. असें हें चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितलें. देव, ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत आणि अत्यंत सात्विक सज्जन माणूस हि सेवेला योग्य स्थानें आहेत. अशा माणसांबद्दल दृढ सदभावना मनांत बाळगावी. हें आहे व्यवहाराचें बोलणें, व्यवहार किंवा परंपरा रक्षण करण्यासाठीं मी हें सांगितले. पण खरें म्हणजे सदगुरुच्या चरणांची सेवा करणें हेंच पादसेवन होय. ही चौथी पादसेवन नांवाची भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरली असतां साधकाला सायुज्यमुक्ती मिळते. म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठांत श्रेष्ठ भक्ती आहे, असा निश्चित निर्णय मी करतो. या भक्तीनें पुष्कळच लोक संसारसागराच्या पैलतीरास पोहोंचतात.


॥ श्रीराम समर्थ ॥