श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, March 4, 2011

|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||४|| समास दुसरा : कीर्तन भक्ति ||

||श्रीराम ||

श्रोतीं भगवद्भजन पुसिलें| तें नवविधा प्रकारें बोलिलें |
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें| दुसरें कीर्तन ऐका ||||

सगुण हरिकथा करावी| भगवत्कीर्ती वाढवावी |
अक्षंड वैखरी वदवावी| येथायोग्य ||||

बहुत करावें पाठांतर| कंठीं धरावें ग्रन्थांतर |
भगवत्कथा निरंतर| करीत जावी ||||

अपुलिया सुखस्वार्था| केलीच करावी हरिकथा |
हरिकथेवीण सर्वथा| राहोंचि नये ||||

नित्य नवा हव्यास धरावा| साक्षेप अत्यंतचि करावा |
हरिकीर्तनें भरावा| ब्रह्मगोळ अवघा ||||

मनापासून आवडी| जीवापासून अत्यंत गोडी |
सदा सर्वदा तांतडी| हरिकीर्तनाची ||||

भगवंतास कीर्तन प्रिये| कीर्तनें समाधान होये |
बहुत जनासी उपाये| हरिकीर्तनें कलयुगीं ||||

विविध विचित्रें ध्यानें| वर्णावीं आळंकार भूषणें |
ध्यानमूर्ति अंतःकरणें- | लक्षून, कथा करावी ||||

येश कीर्ति प्रताप महिमा| आवडीं वर्णावा परमात्मा |
जेणें भगवद्भक्तांचा आत्मा| संतुष्ट होये ||||

कथा अन्वय लापणिका| नामघोष करताळिका |
प्रसंगें बोलाव्या अनेका| धात माता नेमस्त ||१०||

ताळ मृदांग हरिकीर्तन| संगीत नृत्य तान मान |
नाना कथानुसंधान| तुटोंचि नेदावें ||११||

करुणा कीर्तनाच्या लोटें| कथा करावी घडघडाटें |
श्रोतयांचीं श्रवणपुटें| आनंदें भरावीं ||१२||

कंप रोमांच स्फुराणें| प्रेमाश्रुसहित गाणें |
देवद्वारीं लोटांगणें| नमस्कार घालावे ||१३||

पदें दोहडें श्लोक प्रबंद| धाटी मुद्रा अनेक छंद |
बीरभाटिंव विनोद| प्रसंगें करावे ||१४||

नाना नवरसिक श्रृंघारिक| गद्यपद्याचें कौतुक |
नाना वचनें प्रस्ताविक| शास्त्राधारें बोलावीं ||१५||

भक्तिज्ञान वैराग्य लक्षण| नीतिन्यायस्वधर्मरक्षण |
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण| प्रांजळ बोलावें ||१६||

प्रसंगें हरिकथा करावी| सगुणीं सगुणकीर्ति धरावी |
निर्गुणप्रसंगें वाढवावी| अध्यात्मविद्या ||१७||

पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- | निरूपण करावें नेमस्त |
बहुधा बोलणें अव्यावेस्त| बोलोंचि नये ||१८||

करावें वेदपारायेण| सांगावें जनासी पुराण |
मायाब्रह्मीचें विवरण| साकल्य वदावें ||१९||

ब्राह्मण्य रक्षावें आदरें| उपासनेचीं भजनद्वारें |
गुरुपरंपरा निर्धारें| चळोंच नेदावी ||२०||

करावें वैराग्यरक्षण| रक्षावें ज्ञानाचें लक्षण |
परम दक्ष विचक्षण| सर्वहि सांभाळी ||२१||

कीर्तन ऐकतां संदेह पडे| सत्य समाधान तें उडे |
नीतिन्यायसाधन मोडे| ऐसें न बोलावें ||२२||

सगुणकथा या नांव कीर्तन| अद्वैत म्हणिजे निरूपण |
सगुण रक्षून निर्गुण| बोलत जावें ||२३||

असो वक्त्रुत्वाचा अधिकार| अल्पास न घडे सत्योत्तर |
वक्ता पाहिजे साचार| अनुभवाचा ||२४||

सकळ रक्षून ज्ञान सांगे| जेणें वेदज्ञा न भंगे |
उत्तम सन्मार्ग लागे| प्राणीमात्रासी ||२५||

असो हें सकळ सांडून| करावें गुणानुवादकीर्तन |
या नांव भगवद्भजन| दुसरी भक्ती ||२६||

कीर्तनें माहादोष जाती| कीर्तनें होये उत्तमगती |
कीर्तनें भगवत्प्राप्ती| येदर्थीं संदेह नाहीं ||२७||

कीर्तनें वाचा पवित्र| कीर्तनें होये सत्पात्र |
हरिकीर्तनें प्राणीमात्र| सुसिळ होती ||२८||

कीर्तनें अवेग्रता घडे| कीर्तनें निश्चये सांपडे |
कीर्तनें संदेह बुडे| श्रोतयांवक्तयांचा ||२९||

सदा सर्वदा हरिकीर्तन| ब्रह्मसुत करी आपण |
तेणें नारद तोचि नारायेण| बोलिजेत आहे ||३०||

म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा| कीर्तनें संतोषे परमात्मा |
सकळ तीर्थें आणी जगदात्मा| हरिकीर्तनीं वसे ||३१||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनभजननिरूपणनाम समास दुसरा ||||४. २




ज्याला भगवंताचें भजन हवें त्यानें आपली वाणी भगवदगुणगायनाला वाहून टाकावी. वाणीला येण्यासाठीं चांगलें ग्रंथावलोकन असावें, उत्तम पाठांतर असावें. मनापासून कीर्तनाची आवड असावी :
भगवद भजन म्हणजे काय असा प्रश्न श्रोत्यांनीं विचारला. तें नऊ प्रकारचें आहे असें सांगितलें. त्यापैकी जें श्रवण त्याचें वर्णन संपलें. आतां दुसरें जें कीर्तन त्याचें  वर्णन ऐकावें. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगाव्या. भगवंताची कीर्ति वाढवावी. त्यासाठीं आपली वाणी योग्य रीतीनें अखंड बोलती ठेवावी. पुष्कळ पाठांतर करावे, पुष्कळ ग्रंथांचें तात्पर्य मुखोदत असावें. आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी. आपल्या हरिकथेमध्यें रोज नवीनपणा आणण्याचा सोस असावा. त्यासाठीं अतिशय प्रयत्न करावा. हरिकीर्तनानें सारें विश्व भरुन टाकावें भगवंताच्या गुण्गायनाची अगदी मनापासून मनापासून आवड असावी, जीवापासून त्याचीच गोडी असावी. सदासर्वकाळ उत्कंठा असावी.

भगवंताला स्वत:ला कीर्तन आवडतें. भक्तांना संतोष होईल असें भगवंताचें वर्णन करावें. त्यांत गोष्टी, विनोद, चुटके, गाणें, नाचणें सगळें कांहीं प्रमाणांत असावें. पण मूळ कथेचें सूत्र विसरुं नये. :
भगवंताला कीर्तन फारच आवडतें कीर्तनानें वक्त्याला व श्रोत्यांना दोघांना समाधान लाभतें. कलियुगामध्यें तर बहुजन समाजाला कीर्तनानेंच उध्दार करुन घेण्याचा उपाय सापडतों. भगवंताची जी निरनिराळी सगुण रुपें आहेत त्यांचे अवयव, अलंकार - भूषणें वगैरे कीर्तनात वर्णन करावे. आपण ज्या उपास्यदेवतेचें ध्यान करतो तिची मूर्ती अंत:करणात पाहून कथा करावी. तिच्या समोर आपण कथा करतो हि जाणीव ठेवून कीर्तन करावें. भगवंताचें यशत्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा मोठ्या आवडीनें व प्रेमानें वर्णन करावा. भगवंताचे गुण अशा रसानें वर्णन करावेत कीं त्यानें भगवदभक्तांचा आत्मा संतुष्ट होईल. कथा सांगताना तिच्यामध्यें कथानकाची सुसंगती असावी, शब्दांवर  कोट्या कराव्या, मधून मधून भगवंताच्या नामाचा घोष करावा, सर्वांनी हातांनी टाळ्या वाजवाव्यात. याशिवाय त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा काल्पनिक बोधकथा आणि सत्यकथा हटकून सांगाव्यात टाळ, मृदंग, गायन, नृत्य, तानाविना यासह भगवंताचें कीर्तन करावें. पण या सगळ्यांमध्यें कथेतील मागला पुढला संबंध मात्र तुटणार नाहीं हें ध्यानांत ठेवावें.

कीर्तनाच्या बाह्यांगामध्यें वरील गोष्टीबरोबर करूण रस असावा. प्रेमाचे सात्विक भाव असावें. नाना प्रकारचे काव्य म्हणावें. शृंगारासकट सर्व रस असावें. बोलताना शास्त्रांचा आधार घ्यावा. :
कथा सांगण्याच्या ओघांत करूनरसांचा लोट वाहील अशी धडाकून कथा करावी आणि श्रोत्याचे कान आनंदानें भरून टाकावें. कथा सांगतां सांगतां सात्विक भावानें मन भरुन जावें, शरीर कंप पावणें, अंगावर शहारे येणें, नाचावेसें वाटणें, प्रेमाश्रु येणें, गायला लागणें इ. अनावर होऊन देवासमोर लोटांगण घालून नमस्कार घालावा. कथेतील प्रसंग वर्णन करतांना पदें, दोहें, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावें. त्याचप्रमाणें भाटांनीं रचलेले वीररसाचे पोवाडे म्हणावे. हास्यरसाचा पण उपयोग करावा. कथेमध्यें श्रृंगारासकट नवरस असावें, उत्तम गद्य व पद्य वाडःमय बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी अशी वचनें कथेच्या ओघांत सांगावीं.



आतां पुढील दहा ओव्यांमध्यें श्री समर्थ कीर्तनाचें अंतरंग कसें असावें तें सांगतात - कीर्तनकार हा समाजाचा अध्यात्मविद्येतील नेता असतो तो स्वत: अनुभवी वक्ता असावा. नीति, न्याय, वैराग्य, भक्ति व ज्ञान यांचें पोषण होईल असेच त्यानें सांगत राहावें. सन्मार्गाचा प्रसार करणें हें कीर्तनाचे एक प्रमुख ध्येय आहे. :
भक्ति, ज्ञान व वैराग्य यांचे लक्षण काय, नीति, न्याय व स्वधर्म यांचें रक्षण कसें करावें, साधन मार्ग कसा असतो आणि परमात्मस्वरूप कसें आहे, या गोष्टी कीर्तनामध्यें स्पष्टपणें सांगाव्या. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी. निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुध्द परमात्मास्वरूप सांगावें. विषय मांडीत असतां पूर्वपक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा. तो मात्र निश्चितपणें विवेचन करून सांगावा. शक्यतों आपलें बोलणें अव्यवस्थित असूं नयें. वेदांचा अभ्यास करावा. लोकांना पुराणें समजून सांगावी. माया व ब्रह्म यांचें स्वरूप सर्व अंगांनीं स्पष्ट करून सांगावें. ब्राह्मणधर्माचें म्हणजे ब्राह्मणांना अवश्य असणार्‍या गुणांचें आदरानें रक्षण करावे. भगवंताची उपासना करण्याची साधनें आदरानें रक्षण करावी. आपली गुरुपरंपरा मोठ्या निश्चयानें टिकवून धरावी, तिच्यामध्यें भेसळ होऊं देऊं नये. वैराग्याचें रक्षण करावें, आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्यांचें रक्षण करावें. जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो हें सगळे सांभाळतो. ज्या बोलण्यानें संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल, तसेंच नीतीन्याय मोडेल आणि साधन सुटेल असें कांहीं सुध्दां कीर्तनांत बोलूं नये. भगवंताच्या सगुण चारित्र्याच्या कथेला कीर्तन हें नांव आहे. अद्वैताचें विवेचन आणि प्रतिपादन करणें यास निरुपण म्हणतात. हरिदासानें सगुणाचें महत्व सांभाळून, कायम ठेवून निर्गुणाचें प्रतिपादन करावें. जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवानें, विद्येनें, विचारानें आणि व्यासंगानें किंचित आहे, क्षुल्लक आहे त्याला वक्तृत्वांचा अधिकार नस्तो हें खरें मर्म आहे. वक्ता खरोखर स्वानुभवसंपन्न असा पाहिजे. जो अनुभवी वक्ता असतो तो सगळे सांभळून म्हणजे कोणाचाही बुध्दिभेद्न करतां ज्ञान सांगतो वेदांची आज्ञा तर मोडणार नाहीं. आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असें ज्ञान तो सांगतो. असो. हें सर्व राहूं द्यावें, ज्यामध्यें भगवंताच्या गुणांचें पुन:पुन: गायन व वर्णन असतें त्यास भगवदभजन म्हणतात. भक्तिचा हा दुसरा प्रकार होय.

कीर्तनानें काकाय घडून येतें त्याचें वर्णन :
कीर्तनानें मोठी पापें नाहींशीं होतात, कीर्तनानें उत्तम गति प्राप्त होते. कीर्तनानें माणूस भगवंताला योग्य होतो, तो शीलवान, चारित्र्यवान बनतो. कीर्तनानें वाणी पवित्र होते, कीर्तनानें एकाग्रता साधते, भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो. कीर्तनानें श्रोते व वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद ह निरंतर भगवंताचें कीर्तन करतो. त्यामुळें सर्व लोक त्याला नारायण म्हणतात. त्याला भगवदरुप मानतात. म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्यापलीकडे आहे. कीर्तनानें परमात्मा संतोष पावतो. भवंताच्या कीर्तनामध्यें सारीं तीर्थें आणि जगदात्मा ईश्वर दोन्ही राहतात.

॥ श्रीराम समर्थ ॥
  

समर्थभक्तांनी फेसबुक वर असल्यास येथे क्लिक करावे.