श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, March 25, 2011

|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||४|| समास सहावा : वंदनभक्ति ||


|| दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास सहावा : वंदनभक्ति ||

|| श्रीराम ||

मागां जालें निरूपण| पांचवे भक्तीचें लक्षण |
आतां ऐका सावधान| साहावी भक्ती ||||

साहावी भक्ती तें वंदन| करावें देवासी नमन |
संत साधु आणी सज्जन| नमस्कारीत जावे ||||

सूर्यासि करावे नमस्कार| देवासि करावे नमस्कार |
सद्गुरूस करावे नमस्कार| साष्टांग भावें ||||

साष्टांग नमस्कारास अधिकारु| नानाप्रतिमा देव गुरु |
अन्यत्र नमनाचा विचारु| अधिकारें करावा ||||

छपन्न कोटी वसुमती| मधें विष्णुमूर्ती असती |
तयांस नमस्कार प्रीतीं| साष्टांग घालावे ||||

पशुपति श्रीपति आणी गभस्ती| यांच्या दर्शनें दोष जाती |
तैसाचि नमावा मारुती| नित्य नेमे.म् विशेष ||||

श्लोक || शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा |
        एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ||

भक्त ज्ञानी आणी वीतरागी| माहानुभाव तापसी योगी |
सत्पात्रें देखोनि वेगीं| नमस्कार घालावे ||||

वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ| पंडित पुराणिक आणी विद्वज्जन |
याज्ञिक वैदिक पवित्रजन| नमस्कारीत जावे ||||

जेथें दिसती विशेष गुण| तें सद्गुरूचें अधिष्ठान |
याकारणें तयासी नमन| अत्यादरें करावें ||||

गणेश शारदा नाना शक्ती| हरिहरांच्या अवतारमूर्ती |
नाना देव सांगों किती| पृथकाकारें ||१०||

सर्व देवांस नमस्कारिलें| ते येका भगवंतास पावलें |
येदर्थीं येक वचन बोलिलें- | आहे, तें ऐका ||११||

श्लोक ||आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं |
          सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ||

याकारणें सर्व देवांसी| नमस्कारावें अत्यादरेंसीं |
अधिष्ठान मानितां, देवांसी- | परम सौख्य वाटे ||१२||

देव देवाचीं अधिष्ठानें| सत्पात्रें सद्गुरूचीं स्थानें |
या कारणें नमस्कार करणें| उभय मार्गीं ||१३||

नमस्कारें लीनता घडे| नमस्कारें विकल्प मोडे |
नमस्कारें सख्य घडे| नाना सत्पात्रासीं ||१४||

नमस्कारें दोष जाती| नमस्कारें अन्याय क्ष्मती |
नमस्कारें मोडलीं जडतीं| समाधानें ||१५||

सिसापरता नाहीं दंड| ऐसें बोलती उदंड |
याकारणें अखंड| देव भक्त वंदावे ||१६||

नमस्कारें कृपा उचंबळे| नमस्कारें प्रसन्नता प्रबळे |
नमस्कारें गुरुदेव वोळे| साधकांवरीं ||१७||

निशेष करितां नमस्कार| नासती दोषांचे गिरिवर |
आणी मुख्य परमेश्वर| कृपा करी ||१८||

नमस्कारें पतित पावन| नमस्कारें संतांसी शरण |
नमस्कारें जन्ममरण| दुरी दुऱ्हावे ||१९||

परम अन्याय करुनि आला| आणी साष्टांग नमस्कार घातला |
तरी तो अन्याये क्ष्मा केला| पाहिजे श्रेष्ठीं ||२०||

याकारणें नमस्कारापरतें| आणीक नाहीं अनुसरतें |
नमस्कारें प्राणीयातें| सद्बुद्धि लागे ||२१||

नमस्कारास वेचावें नलगे| नमस्कारास कष्टावें नलगे |
नमस्कारांस कांहींच नलगे| उपकर्ण सामग्री ||२२||

नमस्कारा ऐसें नाहीं सोपें| नमस्कार करावा अनन्यरूपें |
नाना साधनीं साक्षपें| कासया सिणावें ||२३||

साधक भावें नमस्कार घाली| त्याची चिंता साधूस लागली |
सुगम पंथे नेऊन घाली| जेथील तेथें ||२४||

याकारणें नमस्कार श्रेष्ठ| नमस्कारें वोळती वरिष्ठ |
येथें सांगितली पष्ट| साहावी भक्ती ||२५||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वंदनभक्तिनाम समास सहावा ||||४. ६


प्रथम नमस्काराविषयीं सर्वसाधारण माहिती देऊन कोणाकोणास वंदन करावे तें सांगतात. :
मागील समासांत पांचव्या भक्तिचें वर्णन झालें. आता सहावी भक्ति मन लावून ऐका. नमस्कार करणें ही सहावी भक्ति होय. देवाला नमन करावे. संत, साधु आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावा. सूर्याला नमस्कार घालावे, तसेच देवाला नमस्कार घालावे. श्रीसदगुरुलाही अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावे. अनेक प्रकारच्या देवाच्या मूर्ति, भगवंत आणि सदगुरु हे खरे साष्टांग नमस्काराला पात्र आहेत. इतरांच्या बाबतींत ज्याची त्याची योग्यता पाहून नमस्कार करावा.

आपल्या पृथ्वीचा व्यास छपन्न कोटी योजनें आहे. त्यामध्यें अनेक विष्णुमूर्ति आहेत. त्या सर्वांना प्रेमानें साष्टांग नमस्कार घालावे. शंकर, विष्णु आणि सूर्य यांच्या दर्शनानें पापें नाश पावतात. त्याचप्रमाणें विशेषेंकरुन मारुतीला नित्यनेमानें नमस्कार करावा.

श्लोकार्थ : शंकर, शेषशायी म्हणजे विष्णु, सूर्य तसाच मारुअति यांचें दर्शन नित्यनेमानें घ्यावें. तें विशेष पुण्यकारक असते. :
भक्त, ज्ञानी, बैरागी, स्वानुभवी, तापसी, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ति पाहून त्यांना चटदिशी नमस्कार घालावा. वेद जाणणारे, पंडित, पुराणिक, विद्वान, याज्ञिक, वैदिक आणि पवित्र माणसे या सगळ्यांना नमस्कार करावा. ज्या माणसाच्या ठिकाणी विशेष गुण आढळतील तेथें श्रीसदगुरुचें अधिष्ठान आहे, तेथें सदगुरुंचें वसतिस्थान आहे असें समजावें, आणि म्हणून त्याला अत्यंत आदरानें नमस्कार करावा. गणेश, शारदा,अनेक प्रकारच्या शक्तिदेवता, हरिहरांच्या अवतारमूर्ति अशा रीतीनें वेगवेगळे देव कितीही सांगितलें आहे तें ऐकावें.

श्लोकार्थ : आकाशांतून पडलेलें पाणी ज्याप्रमाणें समुद्राला जाऊन पोहोंचतें त्याचप्रमाणें सगळ्या देवांना केलेले नमस्कार केशवाकडे जाऊन पोहोंचतात. :
या कारणानें सर्व देवांना अति आदरांने नमस्कार करावें. सर्व देवामध्यें भगवंताचे वास्तव्य आहे अशी खरी भावना ठेविली तर भगवंताला मोठा आनंद वाटतो. ही भक्तीची भाषा आहे. वरील भावना ठेवली तर दृश्यामध्यें अंतर्यामीपणानें राहणारें स्वरुप अनुभवाला येणें सुलभ जातें असा त्याचा अर्थ आहे. सगळ्या देवांच्या ठिकाणीं भगवंताचें वास्तव्य आहे. सर्व साधुसज्जनांच्या ठिकाणीं श्री सदगुरुचें वसतिस्थान आहे. ही भावना ठेवून म्हणजे देवांना आणि संतांना मनापासून नमस्कार करावा.

आतां नमस्कारापासून होणार्‍या लाभाचें वर्णन करतात. नमस्कारानें अंगीं लीनता येते व सदगुरू आणि भगवंत दोघे कृपा करतात हा सर्वांत उत्तम लाभ होय. कृपा म्हणजे साक्षात भगवंताची शक्ती. प्रत्येक जिवामध्यें भगवंताची शक्तीच काम करते हें खरें. परंतु ती जेथें विशेष रूपानें आणि विशेष प्रमाणांत प्रगट होते तेथें कृपा झाली असें म्हणतात. माणसाच्या सूक्ष्म देहांत ती अवतरते. योगमार्गामध्यें प्राणअपान एक होऊन सुषुम्ना खुली झाली कीं कुंडलिनीच्या रूपानें ती अनुभवला येते. ज्ञानमार्गामध्यें विचारांची एकाग्रता होऊन बुद्धी अत्यंत सूक्ष्म झाली कीं प्रतिभेच्या रूपानें ती वरून आल्याप्रमाणें अनुभवाला येते. आणि भक्तिमार्गामध्यें भावना तीव्र होऊन शरणागतभाव तयार झाला कीं ती हृदयामध्येंच  स्फ़ुर्तिच्या रूपानें अनुभवास येते. नमस्कारानें शरणागतभाव त्वरित तयार होतो. म्हणून साधनाचे कष्ट न होता केवळ वंदनभक्तीने साधक भगवंताच्या कृपेला पात्र होतो असें श्री समर्थ सांगत आहेत.  भगवंताच्या कृपेचा ओघ एकदा जीवाला व्यापून राहिला कीं त्याचें अनुसंधान विनाप्रयात टिकते :

नमस्कारानें  नम्रता येते, अहंकार कमी झाल्यानें विकल्प कमी होतो, आणि अनेक साधुसज्ज्न पुरुषांशी निकट स्नेह जडतो. नमस्कारानें आपले अवगुण कमी होतात. मोठी चूक घडली तरी नमस्कार घातल्यानें त्याबद्दल क्षमा होते. आणि आपसांत बेबनाव उत्पन्न झाला असेल तर नमस्कार केल्यावर दुसर्‍याच्या मनांतील किलीम्ष नाहीसें होऊन पुनः पूर्ववत प्रेम जडतें. माणसाचें डोकें उडविणें ही सर्वात मोठी शिक्षा आहे असे सगळे लोक मानतात. हें जर खरें तर देव आणि भक्त यांच्यापुढें नेहमी आपलें डोकें लववावें. म्हणजे शिक्षा भोगली कीं मग गुन्हा ठरत नाहीं. तसें देवाभक्तांना वंदन केलें कीं माणसाचें पाप उरत नाहीं. नमस्कारानें कृपा उचंबळते म्हणजे ज्याला नमस्कार करावा त्याचें अंत:करणात दया भरुन येते. नमस्कारानें ज्याला नमस्कार करावा तो प्रसन्न होतो, आणि नमस्कारानें सदगुरु साधकाकडे ओढले जातात. सगी मनापासून कोणताही विकल्प न ठेवतां भगवंताला नमस्कार केला तर पापांचे डोंगर छिन्नविच्छिन्न होऊन जातात. आणि मुख्य गोष्ट ही कीं परमेश्वर कृपा करतो.

नमस्कारानें भ्रष्ट माणसे पवित्र होऊन जातात. नमस्कारानें संतानां शरण जाता येतें, म्हणजे त्यांच्या चरणी लीन होता येते. नमस्कारानें जन्ममरणाची पीडा दूर सरते. समजा एखादा माणूस फार मोठा गुन्हा करुन आला आणि त्यानें साष्टांग नमस्कार घातला, तर जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनीं त्याला क्षमा केली पाहिजे. या कारणानें आचरण करण्यास नमस्काराइतकें सुरेख दुसरें साधन नाहीं. नमस्कारानें माणसाच्या अंगीं सदबुध्दि उत्पन्न होते.

नमस्कार हें फार सोपें साधन आहे. साधूला मनापासून नमस्कार केला कीं तो आपली काळजी वाहतो :
नमस्कारासाठीं कांहीं खर्च करावा लागत नाहीं. नमस्कारासाठीं कांहीं कष्ट पडत नाहींत. नमस्काराला कांहीं इतर साधनसामग्री, इतर कांहीं उपकरणें, साहित्य लागत नाहीं, नमस्कारइतकें अत्यंत सोंपें साधन नाहीं. पण  जो नमस्कार करायचा तो अत्यंत मनापासून, अगदी अनन्य  होऊन करावा. इतर साधनांचा प्रयत्न करून  उगीच कष्ट कशाला करायचें ! जो साधक अत्यंत श्रद्धेनें व मनापासून साधला नमस्कार घालतो त्याची काळजी त्या साधला लागते. मग तो त्या साधकाला अगदी सोप्या मार्गानें जीकडचा तिकडे म्हणजे भगवंतापर्यंत बरोबर नेऊन पोहोंचवितो  या कारणासाठीं नमस्कार हें मोठें श्रेष्ठ साधन आहे. नमस्कारानें भगवंत आणि संत आपल्याकडे ओढले जातात. अशा रीतीनें सहावी भक्ती स्पष्टपणें सांगितली.


!! श्रीराम समर्थ !!