श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Tuesday, March 8, 2011

||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम ||४|| समास तिसरा : नामस्मरणभक्ति ||


||दशक चवथा : नवविधा भक्तिनाम |||| समास तिसरा : नामस्मरणभक्ति ||

||श्रीराम ||

मागां निरोपिलें कीर्तन| जें सकळांस करी पावन |
आतां ऐका विष्णोःस्मरण| तिसरी भक्ती ||||

स्मरण देवाचें करावें| अखंड नाम जपत जावें |
नामस्मरणें पावावें| समाधान ||||

नित्य नेम प्रातःकाळीं| माध्यानकाळीं  सायंकाळीं |
नामस्मरण सर्वकाळीं| करीत जावें ||||

सुख दुःख उद्वेग चिंता| अथवा आनंदरूप असतां |
नामस्मरणेंविण सर्वथा| राहोंच नये ||||

हरुषकाळीं विषमकाळीं| पर्वकाळीं प्रस्तावकाळीं |
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं| नामस्मरण करावें ||||

कोडें सांकडें संकट| नाना संसारखटपट |
आवस्ता लागतां चटपट| नामस्मरण करावें ||||

चालतां बोलतां धंदा करितां| खातां जेवितां सुखी होतां |
नाना उपभोग भोगितां| नाम विसरों नये ||||

संपत्ती अथवा विपत्ती| जैसी पडेल काळगती |
नामस्मरणाची स्थिती| सांडूंच नये ||||

वैभव सामर्थ्य आणी सत्ता| नाना पदार्थ चालतां |
उत्कट भाग्यश्री भोगितां| नामस्मरण सांडूं नये ||||

आधीं आवदसा मग दसा| अथवा दसेउपरी आवदसा |
प्रसंग असो भलतैसा| परंतु नाम सोडूं नये ||१०||

नामें संकटें नासतीं| नामें विघ्नें निवारती |
नामस्मरणें पाविजेती| उत्तम पदें ||११||

भूत पिशाच्च नाना छंद| ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध |
मंत्रचळ नाना खेद| नामनिष्ठें नासती ||१२||

नामें विषबाधा हरती| नामें चेडे चेटकें नासती |
नामें होये उत्तम गती| अंतकाळीं ||१३||

बाळपणीं तारुण्यकाळीं| कठिणकाळीं वृधाप्यकाळीं |
सर्वकाळीं अंतकाळीं| नामस्मरण असावें ||१४||

नामाचा महिमा जाणे शंकर| जना उपदेसी विश्वेश्वर |
वाराणसी मुक्तिक्षेत्र| रामनामेंकरूनी ||१५||

उफराट्या नामासाठीं| वाल्मिक तरला उठाउठी |
भविष्य वदला शतकोटी| चरित्र रघुनाथाचें ||१६||

हरिनामें प्रल्हाद तरला| नाना आघातापासून सुटला |
नारायेणनामें पावन जाला| अजामेळ ||१७||

नामें पाषाण तरले| असंख्यात भक्त उद्धरले |
माहापापी तेचि जाले| परम पवित्र ||१८||

परमेश्वराचीं अनंत नामें| स्मरतां तरिजे नित्यनेमें |
नामस्मरण करितां, येमें- | बाधिजेना ||१९||

सहस्रा नामामधें कोणी येक| म्हणतां होतसे सार्थक |
नाम स्मरतां पुण्यश्लोक| होईजे स्वयें ||२०||

कांहींच न करूनि प्राणी| रामनाम जपे वाणी |
तेणें संतुष्ट चक्रपाणी| भक्तांलागीं सांभाळी ||२१||

नाम स्मरे निरंतर| तें जाणावें पुण्यशरीर |
माहादोषांचे गिरिवर| रामनामें नासती ||२२||

अगाध महिमा न वचे वदला| नामें बहुत जन उद्धरला |
हळहळापासून सुटला| प्रत्यक्ष चंद्रमौळी ||२३||

चहुं वर्णां नामाधिकार| नामीं नाहीं लाहानथोर |
जढ मूढ पैलपार| पावती नामें ||२४||

म्हणौन नाम अखंड स्मरावें| रूप मनीं आठवावें |
तिसरी भक्ती स्वभावें| निरोपिली ||२५||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरणभक्तिनिरूपणनाम समास तिसरा ||||४. ३

नामस्मरणानें समाधान पावावें :
सर्व लोकांना पवित्र करुन त्यांचा उध्दार करणारें कीर्तन मागील समासांत सांगितलें. आतां भगवंताचें नामस्मरण नांवाची तिसरी भक्ती ऐकावी. भगवंताचें स्मरण करावें. त्याचें नाम अखंड जपत जावें. नामस्मरणानें समाधान प्राप्त करुन घ्यावें.

दिवसांतून मिळेल तेव्हां नामस्मरण करावें. :
रोज नियमानें प्रात:काळी दुपारी आणि सायंकाळीं नामस्मरण करावें. शिवाय जेव्हां वेळ मिळेल तेव्हां सर्व काळी नामस्मरण करावें.

मनाच्या कोणत्याही अवस्थेंत नाम सोडूं नये. :
सुख असो, वा दु:खाचा प्रसंग असो, अस्वस्थता असो, वा चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो, मनाची अवस्था कशीची असली तरी नामस्मरणावांचून कधीहि राहूं नये. प्रपंचामधील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत राहावें. काळ आनंदाचा असो वा कठिण काळ असो, मोठा पर्वकाळ असो कीं योग्य काळ असो, विश्रांतीचा काळ असो कीं झोपेचा काळ असो, आपण नामस्मरण करावें. एखादा कठिण प्रश्न निर्माण झालेला असो, कांहीं अडचण असो वा एखादें संकट आलेलें असो, प्रपंचातील अनेक खटपटी चालंलेल्या असो किंवा मनाला कशाची तरी चुटपुट लागलेली असो वा एखादे संकट आलेलें असो, आपण नामस्मरण करावें.

दैनंनिन जीवनांत नामाचा सहज विसर पडतो. तो पडूं देऊं नयें :
चालतांना, बोलतांना, आपला धंदा व्यवसाय करतांना खातांना, जेवतांना सुखानें स्वस्थ असतांना, अनेक प्रकारचे देहाचे सुखभोग भोगताना आपण नामस्मरण विसरुं नये.

जीवनांत कधी यश तर कधी अपयश, कधी सुस्थिति तर कधी दुस्थिति असें वर खाली व्हायचेंच पण या सर्व बदलांमध्यें आपलें नामस्मरण स्थिर ठेवावें :
काळगतीनें कधी श्रीमतीं येईल तर कधी गरिबी येईल. पण बाहेरच्या परिस्थितींत बदल झाला तरी आंतील नामस्मरणाच्या स्थितींत बदल होऊं देऊं नये. ती स्थिती सगळ्याच्या वर कायम ठेवावी. मोठें वैभव लाभलें, सामर्थ्य वाट्यास आलें, सत्ता मिळाली, अनेक वस्तु चालून घरीं आल्या, आणि अशा रीतीनें फार मोठें ऐश्वर्य भोगण्याची संधि मिळाली तरी नामस्मरण मात्र सोडूं नये. समजा जीवनामघ्यें आधी अगदी वाईट स्थिति होती व त्यानंतर सुस्थिति आली अथवा आधी सुस्थिति होती व त्यानंतर वाईट स्थिति आली. यापैकीं वाटेल तो प्रसंग असेना कां, आपलें नाम मात्र सोडूं नये.

नामस्मरणानें काय काय घडून येतें त्याचें वर्णन ऐकावे. :
नामस्मरणानें संकटें नाहींशी होतात, विघ्नें निवारण होतात. नामस्मरणानें माणूस थोर पदवीला चढतो. मनापासून व श्रध्दा ठेवून नामस्मरण केलें तर भूतपिशाच्चांची पीडा नाश पावते, अनेक प्रकारच्या कपटांपासून रक्षण होते, ब्रह्मराक्षसाचा त्रास नाहींसा होतो, मुंजाची पीडा टळते, व मंत्र जपण्यात चूक झाल्यानें लागलेलें वेड बरें होतें. अशी अनेक दु:खे नामस्मरणानें नाहींशी होतात. नामानें विषाची बाधा टळते, नामानें चेटुक, जादूटोणा, वगैरेचा परिणाम नाहींसा होतो. नामस्मरणानें अंतकाळीं जीवाला उत्तम गति मिळते.

माणसानें आयुष्यभर नामस्मरण करावें. :
बाळपणीं व तरुणपणीं, म्हातारपणीं व संकटाचें प्रसंगीं, सदासर्वकाळ व अंतकाळींसुध्दा नामस्मरण करीत असावें.

यानंतर नामस्मरणानें श्रेष्ठ पदवीला पोहोचलेल्यांचें दाखले देतात. :
श्री समर्थांचें मत असें कीं नामस्मरणाची थोरवी खरोखर भगवान श्रीशंकरच जाणतात. तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो. काशींत देह ठेवणार्‍या माणसाला श्रीशंकर रामनाम कानांत सांगतात व तो मुक्त होतो. म्हणून रामनामामुळेंच वाराणशीला मुक्ती देणारें क्षेत्र म्हणतात. वाल्मीकीनें राम राम म्हणण्या ऐवजी मरा मरा असें उरफाटें नाम घेतलें. पण त्याचा पाहतां पाहतां उध्दार झाला. इतकेंच नव्हें तर श्रीरामाचें भविष्य कालीं होणारें चरित्र त्यानें शतकोटि श्लोक रचून आधीच सांगून ठेविलें. भगवंताच्या नामानें प्रल्हाद तरला, अनेक प्रकारच्या संकटांमधून वाचला. नारायणाच्या नामानें अजामेळ पवित्र होऊन गेला. फर काय सांगावें ! नामानें पाषाण सुध्दा तरले. नामस्मरणानें अगणित भक्तांचा उध्दार झाला आहे. मोठमोठे महापापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले.

भगवंताचीं अनेक नामें आहेत. त्यांतील कोणत्याही नामाने माणूस साधू बनून जाईल. नुसत्या नामानें भगवंत कृपा करतो. :
परमेश्वराची नामें अनंत आहेत. नित्य नियमानें त्यांचें स्मरण केलें तर माणस तरून जातो. नामस्मरण करणार्‍याला यमयातना होत नाहीत. ज्यावेळी भक्ताला भगवंताचा स्पर्श होतो त्यावेळीं त्याच्या अनंत शक्तीपैकीं एक किंवा अनेक शक्तींची प्रचीति येते. या प्रचीतिवरुन भगवंताचीं अनेक नामें तयार होतात. त्यापैकीं कोणत्याही नामाच्या स्मरणानें माणूस भगवंतापर्यंत पोचूं शकतो. भगवंताच्या हजारों नामांमधील एक नाम पसंत करावें. मनापासून त्याचा जप करावा. आपलें सार्थक झाल्यावांचून राहणार नाहीं. नामाचें स्मरण करीत राहिल्यानें माणूस मोठा पुण्यात्मा बनून जातो. माणसानें इतर कांहींच न करावें, वाणीनें फक्त रामनामाचा जप करावा. तेवढ्यानें भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांनां सांभाळतो. भगवंताचें अखंड अनुसंधान टिकविण्याची युक्ती साधनें हें सार्‍या परमार्थाचे मर्म आहे. इतर साधनांचे कष्ट न करतां जर मनुष्य नामांत रंगला तर जे खरें साधायाचे तें साधलें असें समजावें.

अखंड नामस्मरण चालणें फार मोठी गोष्ट आहे. 
जो मनुष्य निरंतर म्हणजे अखंड नामस्मरण करतो त्याचे शरीर पुण्यमय असतें. हे समजून राहावें. नाम अंत:करणांत स्थिर होऊन त्याचा ओघ अखंडपणे चालण्यास विलक्षण लागतें. ज्याच्यापाशीं असें चालणारे नाम आहे त्याचा जीव पुण्यमय असतोच पण त्याचें शरीर देखील मोठे पुण्यमय असतें. महापापांचे मोठे डोंगर देखील रामनामाच्या जपानें नष्ट होतात. अत्यंत पापी माणसाचें अंत:करण निर्मल होऊन जातें.

नामाची थोरवी किती सांगावी ?
नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे कीं तो सगळा सांगणें शक्य नाहीं. नामस्मरणानें फार फार माणसांचा उध्दार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौली शंकर देखील नामस्मरणानें हलाहलाच्या तापापासून बचावले.

नाम कोणीही घ्यावें व तरुण जावे :
चारही वर्णातील माणसांना भगवंताचें नाम अधिकार आहे.नामस्मरणाच्या बाबतींत लहान थोर हा भेद नाहीं. अडाणी व मूर्ख माणसेसुद्धां नामाच्या आधारानें सुखानें संसारातून पार पडतात. संसाराच्या सुखदु: खांच्या हेलकाव्यांनी विचलित न होतां समाधानांत राहतात.

यासाठी निरंतर नामस्मरण करावें :
म्हणून अखंड नाम्स्माराण करावें. भगवंताचें रूप मनांत आठवण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीनें भक्तीचा तिसरा प्रकार मी स्वभावानुसार सांगितला

॥ श्रीराम समर्थ ॥