श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Saturday, February 19, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास दहावा : वैराग्य निरूपण ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास दहावा : वैराग्य निरूपण ||

||श्रीराम ||

संसार म्हणिजे माहापूर| माजीं जळचरें अपार |
डंखूं धावती विखार| काळसर्प ||||

आशा ममता देहीं बेडी| सुसरी करिताती तडातोडी |
नेऊन दुःखाचे सांकडी- | माजीं घालिती ||||

अहंकारनक्रें उडविलें| नेऊनि पाताळीं बुडविलें |
तेथुनियां सोडविलें| न वचे प्राणी ||||

काम मगरमिठी सुटेना| तिरस्कार लागला तुटेना |
मद मत्सर वोहटेना| भूलि पडिली ||||

वासनाधामिणी पडिली गळां| घालून वेंटाळें वमी गरळा |
जिव्हा लाळी वेळोवेळां| भयानक ||||

माथां प्रपंचाचें वोझें| घेऊन म्हणे माझें माझें |
बुडतांही न सोडी, फुंजे| कुळाभिमानें ||||

पडिलें भ्रांतीचें अंधारें| नागविलें अभिमानचोरें |
आलें अहंतेचें काविरें| भूतबाधा ||||

बहुतेक आवर्तीं पडिले| प्राणी वाहातचि गेले |
जेंहिं भगवंतासी बोभाईलें| भावार्थबळें ||||

देव आपण घालूनि उडी| तयांसी नेलें पैलथडी |
येर तें अभाविकें बापुडीं| वाहातचि गेलीं ||||

भगवंत भावाचा भुकेला| भावार्थ देखोन भुलला |
संकटीं पावे भाविकाला| रक्षितसे ||१०||

जयास भगवंत आवडे| तयाचें देवासीं सांकडें |
संसारदुःख सकळ उडे| निजदासाचें ||११||

जे अंकित ईश्वराचे| तयांस सोहळे निजसुखाचे |
धन्य तेचि दैवाचे| भाविक जन ||१२||

जैसा भाव जयापासीं| तैसा दैव तयासी |
जाणे भाव अंतरसाक्षी| प्राणीमात्रांचा ||१३||

जरी भाव असिला माईक| तरी देव होये माहा ठक |
नवल तयाचें कौतुक| जैशास तैसा ||१४||

जैसें जयाचें भजन| तैसेंची दे समाधान |
भाव होतां किंचित न्यून| आपणहि दुरावे ||१५||

दर्पणीं प्रतिबिंब दिसे| जैस्यास तैसें भासे |
तयाचें सूत्र असे| आपणाच पासीं ||१६||

जैसें आपण करावें| तैसेंचि तेणें व्हावें |
जरी डोळे पसरूनि पाहावें| तरी तेंही टवकारे ||१७||

भृकुटीस घालून मिठी| पाहातां क्रोधें तेंहि उठी |
आपण हास्य करितां पोटीं| तेंहि आनंदे ||१८||

जैसा भाव प्रतिबिंबला| तयाचाचि देव जाला |
जो जैसें भजे त्याला| तैसाचि वोळे ||१९||

भावें परामार्थाचिया वाटा| वाहाती भक्तीचिया पेंठा |
भरला मोक्षाचा चोहाटा| सज्जनसंगें ||२०||

भावें भजनीं जे लागले| ते ईश्वरी पावन जाले |
भावार्थबळें उद्धरिले| पूर्वज तेहीं ||२१||

आपण स्वयें तरले| जनासहि उपेगा आले |
कीर्तिश्रवणें जाले| अभक्त, भावार्थी ||२२||

धन्य तयांची जननी| जे लागले हरिभजनीं |
तेहिंच येक जन्म जनीं| सार्थक केला ||२३||

तयांची वर्णूं काय थोरी| जयांचा भगवंत कैवारी |
कासे लाऊन उतरी| पार दुःखाचा ||२४||

बहुतां जन्मांचे सेवटीं| जेणें चुके अटाटी |
तो हा नरदेह भेटी| करी भगवंतीं ||२५||

म्हणौन धन्य ते भाविक जन| जेंहिं जोडिलें हरिनिधान |
अनंत जन्मांतरींचें पुण्य| फळासि आलें ||२६||

आयुष्य हेचि रत्नपेटी| माजीं भजनरत्नें गोमटीं |
ईश्वरीं अर्पूनिया लुटी| आनंदाची करावी ||२७||

हरिभक्त वैभवें कनिष्ठ| परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ |
सदा सर्वदा संतुष्ट| नैराशबोधें ||२८||

धरून ईश्वराची कास| केली संसाराची नैराश |
तयां भाविकां जगदीश| सबाह्य सांभाळी ||२९||

जया संसाराचें दुःख| विवेकें वाटे परमसुख |
संसारसुखाचेनि पढतमूर्ख| लोधोन पडती ||३०||

जयांचा ईश्वरीं जिव्हाळा| ते भोगिती स्वानंदसोहळा |
जयांचा जनावेगळा| ठेवा आक्षै ||३१||

ते आक्षै सुखें सुखावले| संसारदुःखें विसरले |
विषयेरंगी वोरंगले| श्रीरंगरंगीं ||३२||

तयांस फावली नरदेह पेटी| केली ईश्वरेंसिं साटी |
येरें अभाविकें करंटीं| नरदेह गेला ||३३||

आवचटें निधान जोडलें| तें कवडिच्या बदल नेलें |
तैसें आयुष्य निघोनि गेलें| अभाविकाचें ||३४||

बहुता तपाचा सांठा| तेएणें लाधला परीस गोटा |
परी तो ठाईंचा करंटा| भोगूंच नेणे ||३५||

तैसा संसारास आला| मायाजाळीं गुंडाळला |
अंतीं येकलाचि गेला| हात झाडुनी ||३६||

या नरदेहाचेनि संगतीं|  बहुत पावले उत्तम गती |
येकें बापुडी यातायाती| वरपडी जालीं ||३७||

या नरदेहाचेनि लागवेगें| सार्थक करावे संतसंगें |
नीचयोनीं दुःख मागें| बहुत भोगिलें ||३८||

कोण समयो येईल कैसा| याचा न कळे किं भर्वसा |
जैसे पक्षी दाही दिशा| उडोन जाती ||३९||

तैसें वैभव हें सकळ| कोण जाणे कैसी वेळ |
पुत्रकळत्रादि सकळ| विघडोन जाती ||४०||

पाहिली घडी नव्हे आपुली| वयसा तरी निघोन गेली |
देह पडतांच ठेविली- | आहे नींच योनी ||४१||

स्वान शुकरादिक नीच याती| भोगणें घडे विपत्ती |
तेथे कांहीं उत्तम गती| पाविजेत नाहीं ||४२||

मागा गर्भवासीं आटाटी| भोगितां जालासि रे हिंपुटी |
तेथुनियां थोरा कष्टीं| सुटलासि दैवें ||४३||

दुःख भोगिलें आपुल्या जीवें| तेथें कैचिं होतीं सर्वें |
तैचेंचि पुढें येकलें जावें| लागेल बापा ||४४||

कैंचि माता कैंचा पिता| कैंचि बहिण कैंचा भ्राता |
कैंचीं सुहृदें कैंची वनिता| पुत्रकळत्रादिक ||४५||

हे तूं जाण मावेचीं| आवघीं सोइरीं सुखाचीं |
हे तुझ्या सुखदुःखाचीं| सांगाती नव्हेती ||४६||

कैंचा प्रपंच कैंचे कुळ| कासया होतोसी व्याकुळ |
धन कण लक्ष्मी सकळ| जाइजणें ||४७||

कैंचें घर कैंचा संसार| कासया करिसी जोजार |
जन्मवरी वाहोन भार| सेखीं सांडून जासी ||४८||

कैंचें तारुण्य कैंचे वैभव| कैंचें सोहळे हावभाव |
हें सकळहि जाण माव| माईक माया ||४९||

येच क्षणीं मरोन जासी| तरी रघुनाथीं अंतरलासी |
माझें माझें म्हणतोसी| म्हणौनियां ||५०||

तुवां भोगिल्या पुनरावृत्ती| ऐसीं मायबापें किती |
स्त्री कन्या पुत्र होती| लक्षानलक्ष ||५१||

कर्मयोगें सकळ मिळालीं| येके स्थळीं जन्मास आलीं |
तें तुवां आपुलीं मानिलीं| कैसीं रे पढतमूर्खा ||५२||

तुझें तुज नव्हे शरीर| तेथें इतरांचा कोण विचार |
आतां येक भगवंत साचार| धरीं भावार्थबळें ||५३||

येका दुर्भराकारणें| नाना नीचांची सेवा करणें |
नाना स्तुती आणी स्तवनें| मर्यादा धरावी ||५४||

जो अन्न देतो उदरासी| शेरीर विकावें लागे त्यासी |
मां जेणें घातलें जन्मासी| त्यासी कैसें विसरावें ||५५||

अहिर्निशीं ज्या भगवंता| सकळ जिवांची लागली चिंता |
मेघ वरुषे जयाची सत्ता| सिंधु मर्यादा धरी ||५६||

भूमि धरिली धराधरें| प्रगट होईजे दिनकरें |
ऐसी सृष्टी सत्तामात्रें| चालवी जो कां ||५७||

ऐसा कृपाळु देवाधिदेव| नेणवे जयाचें लाघव |
जो सांभाळी सकळ जीव| कृपाळुपणें ||५८||

ऐसा सर्वात्मा श्रीराम- | सांडून, धरिती विषयकाम |
ते प्राणी दुरात्मे अद्धम| केलें पावती ||५९||

रामेविण जे जे आस| तितुकी जाणावी नैराश |
माझें माझें सावकाश| सीणचि उरे ||६०||

जयास वाटे सीण व्हावा| तेणें विषयो चिंतीत जावा |
विषयो न मिळतां जीवा| तगबग सुटे ||६१||

सांडून राम आनंदघन| ज्याचे मनीं विषयचिंतन |
त्यासी कैंचें समाधान| लोलंगतासी ||६२||

जयास वाटे सुखचि असावें| तेणें रघुनाथभजनीं लागावें |
स्वजन सकळही त्यागावे| दुःखमूळ जे ||६३||

जेथें वासना झोंबोन पडे| तेणेंचि अपायें दुःख जडे |
म्हणौनि विषयवासना मोडे| तो येक सुखी ||६४||

विषयजनित जें जें सुख| तेथेंचि होतें परम दुःख |
पूर्वीं गोड अंतीं शोक| नेमस्त आहे ||६५||

गळ गिळितां सुख वाटे| वोढून घेतां घसा फाटे |
कां तें बापुडें मृग आपटे| चारा घेऊन पळतां ||६६||

तैसी विषयसुखाची गोडी| गोड वाटे परी ते कुडी |
म्हणौनियां आवडी| रघुनाथीं धरावी| ६७||

ऐकोनि बोले भाविक| कैसेनि घडे  जी सार्थक |
सांगा स्वामी येमलोक| चुके जेणें ||६८||

देवासी वास्तव्य कोठें| तो मज कैसेंनि भेटे |
दुःखमूळ संसार तुटे| कोणेपरी स्वामी ||६९||

धडपुडी भगवत्प्राप्ती- | होऊन, चुके अधिगती |
ऐसा उपाये कृपामूर्ती| मज दीनास करावा ||७०||

वक्ता म्हणे हो येकभावें| भगवद्भजन करावें |
तेणें होईल स्वभावें| समाधान ||७१||

कैसें करावें भगवद्भजन| कोठें ठेवावें हें मन |
भगवद्भजनाचें लक्षण| मज निरोपावें ||७२||

ऐसा म्लानवदनें बोले| धरिले सदृढ पाऊलें |
कंठ सद्गदित, गळाले| अश्रुपात दुःखें ||७३||

देखोन शिष्याची अनन्यता| भावें वोळला सद्गुरु दाता |
स्वानंद तुंबळेल आतां| पुढिले समासीं ||७४||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वैराग्यनिरूपणनाम समास दहावा ||१०||३. १०


|| दशक तिसरा समाप्त  ||


तिची मगरमिठी. जिवाभोंवती वासनेचें आवरण, त्यांतून स्वार्थाचा उगम, स्वार्थापायीं दुराचरण म्हणून गळ्यांत वासनाधामीण, सारखे विष ओकते, भयंकर जिव्हा लाळते. माझें माझें करून फुकट मारून जातो म्हणून डोक्यावर ओझें घेऊन बुडतो. अज्ञानाचा प्रभाव, अहंकारानें आत्मविस्मृती, अहंतेचा बुद्धीवर अंमल म्हणून अंधार, चोर आणि भूतबाधा. दृश्यांत अडकला म्हणून भोंवरा, व्यार्थ्मेला म्हणून वाहत गेला.

हा संसार म्हणजे महापूर आहे. त्यांत असंख्य जलचर आहेत. संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करायला धांवतात म्हणून मृत्यु केव्हा येईल याचा नेम नसतो.
आशा व ममता या सूक्ष्म देहाच्या बेड्या आहेत, स्थूल देहाशी त्याला जखडून ठेवतात. पाण्यामधील सुसरी देहाचे लचके तोडतात व देहाला दु:ख देतात. त्याचप्रमाणे आशा व ममता जीवाला दु:खाच्या संकटात टाकतात. देहाभिमानरुपी मगर जीवाला बुडवून पाताळांत नेतो, दृशाच्या नादीं लावून भगवंतापासून दूर नेतो. तेथून प्राण्याची सुटका होता नाहीं, दृश्याचें खरेंपण सुटत नाहीं. कामवासनेची मगरमिठी सुटत नाहीं, कामवासना मनातून जातां जात नाहीं. तिरस्काराची वृत्ति जात नाहीं, दुसर्‍याला तुच्छ करण्याची संवय मोडत नाहीं. मद व मत्सर हे विकार कमी होत नाहींत, माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेंत असतो. वासनेची धामण गळ्यांत पडते, जीवाला वासना आवरण घालत. तेथें वेटोळें घालून ती विष ओक्त्ते, जीवाला निरंतर असमाधानी अस्वस्थ ठेवते. आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळीत असते, जीवाला सदा भीति व चिंता करायला लावून छळतें. डोक्यावर प्रपंचाचें ओझें घेऊन माणूस " माझें माझें " म्हणत राहतो, जें खरें आपलें नाहीं तें आपलें म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतो. बुडत असून सुद्धां कुळाचा अभिमान धरून तो तें ओझें सोडीत नाहीं. आयुष्य वाया जात असून देखील माणूस प्रपंचाचें माझेंपण सोडीत नाहीं.

भ्रांतीचा अंधार पडला, त्यांत अभिमान, चोरानें लुटलें, अज्ञानांतून अविवेक जन्म पावला, त्यांतून देहबुद्धि बळावली व तिनें जीवाला भगवंतापासून दूर नेलें. देहबुद्धि किंवा अहंता एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाप्रमाणें वाटेल तसें वागायला लावते. जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या भोंवर्‍यात सांपडली व असहायपणें प्रवाहांत वाहत गेली. शेकडा नव्याण्णव माणसें दृश्याच्या प्रेमांत गुंतून, अशाश्वताच्या मागें लागून फुकट मरून गेली. पण कांहीं माणसांनीं भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्यानें हांक मारिली, त्याच्या नांवानें धावा केला.

जे भाविकपणानें भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत, कारण त्यांना स्वानंद भोगायला मिळतो. अशांना संसारदु:ख बाधत नाहीं. :
ज्यांनीं असा धावा केला त्यांच्यासाठीं भगवंतानें उडी घातली आणि स्वत: त्यांना पलीकडच्या तीराला नेलें. ज्यांनीं अगदी मनापासून भगवंतास मदत मागितली त्यांना ती खात्रीनें मिळाली व त्यांचें दु:ख निवारण झालें. बाकीची बिचारी श्राधाहीन माणसे संसारांत वाहत गेली, दु:ख भोगीत मेली. भाव म्हणजे देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा. भगवंत अशा श्रद्धेचा भुकेला असतो. ती श्रद्धा व तिच्यामधून निर्माण होणारें प्रेम ज्याच्यापाशीं असतें त्याला भगवंत भुलून जातो. त्याच्यावर संकट आलें तर भगवंत मदत करतो व त्याचें रक्षण करतो.

भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्तीवाडःमयात वरवर येतात. भाव हा शब्द मुल भू धातूपासून बनतो. भू म्हणजे होणें किंवा असणें. भाव म्हणजे अस्तित्व. मावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्यें अंतर्भूत असलेला अर्थ. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निःशंक असणें हा भाव. ईश्वर आहे हि जाणीव ठेवून, हि जागृत भावना ठेवून वागणें हा भावार्थ होय. भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खून पटलेली असते. भावार्थ असला म्हणजे आचार, विचार व उच्चार यामध्यें ईश्वराच्या अस्तित्वाचें प्रतिबिंब दिसतें. भक्ती शब्द भज धातूपासून बनतो. भज म्हणजे सेवा करणें, पूजा करणें, मनानें चिकटणें आपलेंसे करून घेणें भक्ती म्हणजे अंत:करणाची तदाकारता. ईश्वराची भक्ति म्हणजे ईश्वरविषयक रती अथवा प्रेम होय. त्यामध्यें अंत:करण भगवदआकार घारण करते. भगवंत सच्चिदानंदस्वरूप असल्यानें भाक्तीदेखील परमानंदस्वरूप असतें. ज्याच्या मनामध्यें भाव असतो तो भाविक आणि भाव असून प्रेम असतें तो भक्त होय. जेथें भाव असतो तेथें बहुदा प्रेम असतेंच असते, असो. या " भाव " तत्वाचा एक मोठा नियम असा आहे कीं माणसाची ईश्वरप्रचीति भावावर अवलंबून असते. ज्या मानानें माणसामध्यें भाव शुद्ध, स्थिर आणि विशाल असेल त्या मानानें त्याची ईश्वरप्रचीति शुद्ध, स्थिर आणि विशाल असते. वास्तविक या सबंध दृश्य विश्वांमध्यें ईश्वर अंतर्यामीपणानें अनुस्यूत आहे दृश्याच्या जंजाळांत त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यास बाहव हें अमोघ साधन आहे. अंत:करण शुध्द व पवित्र राहिलें तर भाव सतेज राहतो, ईश्वराची जावीन ताजी राहते. अंत:करण अशुद्ध व अपवित्र झालें कीं भाव मंद होतो, ईश्वराचें अस्तित्व मलिन होऊन जातें. हेंच तत्व आतां श्री समर्थांच्या अमोघ वाणीनें ऐकावें. :
ज्याला देव मनापासून आवडतो त्याच्या संकटाचें ओझें देवावर पडतें. भगवंत आपल्या दासाचें सगळें संसारदु:ख नाहींसे करतो. जे सर्वस्वी ईश्वराच्या स्वाहीन होतात त्यांना स्वनादाचा रस चाखायला मिळतो असे दैव्व्न भाविक लोक धन्य होत. जसा त्याचा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो. देव अंत:करण पाहणारा असल्याने माणसाचा भाव बरोबर ओळखतो जर भाव खोटा किंवा दिखाऊ असेल तर देवदेखील मोठा लबाडाप्रमाणें वागतो. जो जशास तसें वागतो हि त्याची आश्चर्यकारक लीला आहे. जशी त्याची आराधना तासेंह त्याला देव समाधान देतो. भाव किंचित जरी उणा झाला, मंद झाला तर देव लागेनच दुरावतो, त्याची प्रचीति मंदावते.

आरशांत आपलें प्रतिबिंब दिसते. पाहणारा जसा असतो तसेंच तें हुबेहूब दिसतें. प्रतिबिंब कसें दिसावें याचें मर्म आपल्याजवळ असतें. आपण जशी हालचाल करतो तसेंच प्रतिबिंब आरशांत दिसतें. आपण डोळे वटारून पाहिलें तर प्रतिबिंबही वटारून पाहत असेलेले दिसेल. आपण कपाळाला आठ्या घालून पाहिलें तर प्रतिबिंब देखील रागीटपणें पहातें असें दिसेल. आपण हंसून पाहिलें तर तेंही आनंदलेलें आढळेंल. अगदी याप्रमाणें जसा ज्याचा भाव असतो त्या भावाचें प्रतिबिंब असा त्याचा देव होतो. जो ज्या मानानें भगवंताच्या अंकित होतो त्याच प्रमाणांत भगवंत कृपा करतो. भावानें परमार्थाचें मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहोंचवितात. त्या बाजारांत संतजनांच्या समुदायामध्यें मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते. म्हणजे शुद्ध भाव असेक तर परमार्थाचें साधन बरोबर होतें आणि त्याचें पर्यवसान भगवंताच्या भक्तिमध्यें होतें. भक्ति उत्पन्न झाली कीं संतसंगतीचें सुख लाभून विन्यास मोक्ष हातीं येतो. खर्‍या अस्तित्वबुद्धीनें जे भगवंताची आराधना करतात ते भगवंतीं लीन होऊन पवित्र बनतात. त्यांच्या भावसामर्थ्यानें त्यांच्या पूर्वजांचा देखील उद्धार होतो.

असें पुरुष स्वत: तरून जगाला तारतात. भगवंत त्यांचा कैवारी असतो. त्याची कांस धरून ते स्वानंदसोहळा भोगतात. ते खरे धन्य होत. :
ईश्वर दर्शनानें पावन झालेले पुरुष आपण स्वत: तरतात व लोकांच्या ही उपयोगी पडतात, लोकान तरतात. त्यांचा तोंडून देवाचा महिमा ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनतात. जे देवाची भक्ति करुं लागतात त्यांची आई धन्य समजावी. त्यांनींच जगामध्यें आपला जन्म सार्थकी लावला असें समजावें. ज्यांच्यावर दया करून भगवंत स्वत: बाजू सांभाळतो त्यांचा थोरपणा किती म्हणून सांगावा. देव स्वतः: त्यांना आधार देतो आणि दु:खाच्या पलीकडे घेऊन जातो.

हा दुर्लभ नरदेह भगवंतासाठीं वापरला तर जीवन धन्य होते. :
पुष्कळ जन्म होऊन गेल्यावर हा नरदेह मिळतो. त्याच्या योगानें यातायात चुकते. तो भगवंताचें दर्शन करून देतो. या कारणासाठीं ज्या भाविक लोकांनीं भगवंतरुपी संपत्ति मिळविली ते धन्य समजावेत. त्यांचें अनंत जन्माचें पुण्य फळास आलें म्हणून तें परमात्मप्राप्ति करून घेऊं शकले. मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटी समजावी. त्या पेटींत ईश्वरभजनाची उत्तम रत्नें असतात. ती रत्नें भगवंताला अर्पावी आणि आनंद लुटावा.

गवंताचा भक्त वैभवसंपन्न नसतो. त्याला भगवंत सांभाळतो, तो संसारसुखामागें धावत नाहीं. तो स्वानंद भोगतो, अक्षय सुख भोगतो. तो भगवंतामध्यें रंगलेला असतो. :
देवाचा भक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीनें अगदी खालच्या पायरीवर असतो. पण त्याचें वैभव निराळें असतें. तो गरीब असला तरी ब्रह्मादिकापेक्षां वरच्या पायरीवर असतो. त्याचें हवेंपण संपूर्ण संपल्यामुळें तो सदा सर्व काळ अत्यंत संतोषमय असतो, समाधानांत राहतो. ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो. अशा भाविकांना देव अंत व बाहेर सांभाळतो. त्यांची वृत्ति सांभाळतो व प्रपंच सांभाळतो.

वास्तविक संसारांत दु:खच आहे. देहबुद्धीच्या विवेकानें हे दु:ख ज्याला मोठें सुख वाटतें. तो पढतमूर्ख संसारसुखाला जणूं काय झोंबतात, त्यावर तुटून पडतात. ज्यांचा जीव अत्यंत आत्मीयतेनें इश्रामध्यें गुंतलेला असतो ते भक्त स्वानंदाचा सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो. पण तो सामान्य व्यवहारामधील दृश्य नसतो. स्वानंदरूप अक्षय सुखानें सुखी झालेले भक्त संसाराचीं दु:खें विसरतात. श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाच्या रंगाने जें रंगले ते इंद्रीयसुखाच्या रंगाला तुच्छ मानूं लागले, त्यांनीं तो रंग दूर सारला.

मानवी जीवन फार किमती आहे, तें वाया घालवूं नये, त्याचें सार्थक घावें. :
ही नरदेहरुपी पेटी मिळाल्यावर तिच्यांत ईश्वराला सांठविले तरच तिचा खरा उपयोग केला. असें जे करीत नाहींत ते दुर्दैवी अभाविक नरदेह वाया घालवतात.
एखाद्याला योगायोगानें मोठें रत्न मिळालें, पण कावडीच्या बदल्यात त्यानें तें घालविलें तर तो जसा आत्मघातकी होतो तसा अभाविक माणूस आपलें आयुष्य अगदी कवडीमोलानें वाया दडवतो. एका माणसानें पुष्कळ तप केलें तप सांठल्यानें त्याला परिसाचा गोटा मिळाला. पण तो मुळांतच दुर्दैवी असल्यानें त्याचा उपभोग कसा घ्यावा हें जाणत नाहीं.

त्याचप्रमाणें माणूस पुण्याइनें नरदेह घेऊन संसारांत आला. पान देवाला विसरून मायेच्या जाळ्यांत गुरफटला आणि अखेर हात झाडून म्हणजे सारें कांहीं येथेंच सोडून एकटा चालता झाला. या नरदेहाच्या संगतीनें पुष्कळ माणसें उत्तम गतीला पोहोंचली. पण इतर पुष्कळ बिचारी यातायातीचें दुःख भोगीत राहिली. या नरदेहाचा उत्तम उपयोग कारावा. संतसंग धरून शक्य तितक्या लवकर सार्थक करून घ्यावें. यापूर्वी खालच्या योनींत जन्म गेऊन जीवानें पुष्कळ दुःख भोगलेंलें आहे हें विसरूं नये.

मानवीजीवन किती अशाश्वत आहे, अस्थिर आहे आणि भ्रामक आहे यांचे फारच प्रभावी वर्णन श्री समर्थांनी पुढील पंधरा ओव्यामध्यें केलें आहे. :
केव्हां कशी वेळ येईल याचा भरंवसा नसतो. झाडावर राहणारे पक्षी क्षण्भरांत जसें दाही दिशांना उडून जातात तसें जीवनांत घडून येतें. त्याप्रमाणें आपलें सगळें वैभव, बायको, मुलेंबाळें वगैरे सर्व, काय सांगावे कशी वेळ येते, एकाएकी नासून जाते. जो क्षण आलेला पहिला तो लगेच आपल्या हातून सुटला व भूत काळांत गेला. अशा रीतीनें सबंध आयुष्य निघून जातें आणि मग देह पडला कीं खालच्या योनींत जन्म घेण्यावांचून गत्यंतर नसते. कुत्रा किंवा डुक्कर यांच्या सारख्या हलक्या प्रतीच्या देहांत दु:खच भोगावें लागतें. त्या देहांत कांहीं उत्तम गती मिळत नाहीं. पूर्वी गर्भवासामध्यें यातना सोसताना जीव निराश होतो, सुदैवाने अत्यंत कष्टानें जीव तेथून सुटतो. गर्भवासामध्यें जीव जे दुख भोगतो तेथें कोणाचें सहाय्य नसतें. त्याचप्रमाणें जीवन संपल्यावर जीवाला पुढें एकटेंच जावें लागतें, कसली आई, कसला बाप, कसली बहिण, कसला भाऊ, कसले सखे, कसली बायको, कसली मुलें बाळें व इतर कुटुंबीय माणसें ! हीं सारीं माणसें ममत्वानें आपलीं मानलेली असतात हें ओळखून राहावें. ही सगळीं मंडळीं सुखाच्या लालसेने गोळा होतात. आपल्या सुखदु:खामध्यें कोणीही वाटेकरी असत नाहींत. कसला प्रपंच आणि कसले कुळ ! विनाकारण तळमळ करुं नये. धन, धान्य व ऐश्वर्य हें सगळें नाशवंतच आहें. कसलें घर आणि असला संसार ! त्यासाठी एवढी आटापिट करण्याचें कारण नाहीं ! जन्मभर त्याचें ओजेम वाहून अखेर तें सगळें सोडून जावें लागतें. कसलें तारुण्य, कसलें वैभव, कसलें विलास आणि कसला नखरा ! हा सारा भ्रम आहे, जीवाला भुलवून फसविणारा देखावा आहे. याच क्षणीं जर मृत्यु आला तर माणूस देवाला अंतरतो, कारण माझें माझें म्हणून तो प्रपंचात गुंतलेला असतो. माणसाने आजवर अनेक जन्म घेतलेले असतात. प्रत्येक जन्मांत आईबाप असतातच. मग या हिशोबानें आतांपर्यंत कितीतरी आईबाप होऊन गेले त्याचप्रमाणें बायको, मुले, मुली, यांची संख्या सुद्धां लाखाने भरेल. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधानें प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात, एका ठिकाणी जन्माला येतात, ती सर्वस्वीं आपली मानणें हे पढतमूर्खाचें लक्षण आहें.      

आपलें म्हणून आलेले हें शरीर सुद्धां जर खरें आपलें नाहीं तर मग इतरांची कथा काय ? एका भगवंतावांचून खरोखर आपलें कोणी नाहीं. भावबलानें त्याला घट्ट धरून ठेवावें.

या विश्वांतील सर्व व्यवहार भगवंताच्या सत्तेनें  चालतात. तोच आपल्याला जन्मास घालतो, आपल्याला सांभाळतो त्याला न विसरणें यांत खरे माणूसपण आहे. तैत्तिरीय उपनिषदांच्या ब्रह्मावल्लीमध्यें असा मंत्र आहे. " भीषा‍ऽस्माद वात: पवते, भीषोदेति सूर्य: भीषाऽस्माद अग्निश्च इंद्रश्च, मृत्यु: धावति पंचम  इति " याचा अर्थ " याच्या भयानें वायू जातो, याच्या भयाने सूर्य उदय पावतो, याच्या भयाने अग्नी, इंद्र व पांचवा मृत्यु धावतो " असा आहे. ईश्वराच्या सत्तेनें सर्व विश्व चालतें. हा याचा भावार्थ समजावा. आतां श्री समर्थांच्या ओव्या पहा :
आपल्या काधीही न भरणार्‍या या पोटासाठीं अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते, त्यांची स्तुतिस्तोत्रें गावीं लागतात, त्यांच्यापुढें मोठ्या अदबीनें वागावें लागतें. मुद्दा असा कीं जो पोटाला अन्न देतो त्याला आपलें शरीर विकावें लागतें. मग ज्यानें आपल्याला जन्माला घातलें त्याला विसरणें योग्य होईल काय ?

तो भगवंत कसा आहे पहा. त्याला रात्रंदिवस सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे. त्याच्या सत्तेनें ढग पाऊस पाडतो, सागर आपल्या मर्यादेंत राहतो. शेष पृथ्वी आपल्या डोक्यावर तोलून धरतो आणि सूर्य वेळेवर उगवतो. अशा रीतीनें भगवंत सगळी सृष्टी केवळ आपल्या सत्तेनें चालवतो. देवांचा तो देव असा कृपाळू आहे. त्यांचे कौशल्य आपल्याला कळत नाहीं स्वत:च्या कृपाळूपणें तो सर्व जीवांचा सांभाळ करतो.

अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्य भोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागें लागतात. त्यांना कधीही समाधान मिळत नाहीं. :
असा सर्वांच्या अंतर्यामीं आत्मरूपानें विलसणारा श्रीराम सोडून देहसुखाची वासना धरणारे लोक हीं दुरात्मे समाजवे. ते आपल्या कर्माचे फळ भोगतात. एका भगवंता खेरीज जी जी ईच्छा करावी तिच्यातून शेवटीं निराशाच निर्माण होतें. माझें माझें करतां करतां शेवटीं व्यर्थ श्रममात्र होतात आपले श्रम वाया जावें असें ज्याला वाटत असेल त्यानें दृश्य सुखाचा नाद लावून घ्यावा. सुख देणारी वस्तू मिळाली नाहीं कीं जीव तळमळायला लागतो. आंतबाहेर आनंदानें भरलेला राम सोडून जो इंद्रीयसुखाचे मनांत सारखे चिंतन करतो अशा देहाभोंवतो घोटाळणार्‍या माणसाला कधीही समाधान मिळत नाहीं. तात्पर्य, आपल्याला खरें सुख मिळावें असें ज्याला वाटत असेल त्याने भगवंताच्या भजनीं लागावें. दु:खाचें मूळ असणारें सगळे स्वजन बाजूस करावी.

आतां श्रीसमर्थ वासनेचा स्वभाव सांगतात. वासना दृश्यावर चिकटते, प्रथम सुख देते पण अंतीं दु:खांत लोटते. म्हणून दृश्याची आवड न ठेवतां भगवंताची आवड धरावी. :
ज्या दृश्यावर वासना तुटून पडते तेथें जीवाला अपाय होतो, दु:खच पदरांत पडतें. म्हणून ज्याची देहसुखाची वासना विरली तोच एकटा खरा सुखी होय. देहांतून घेता येणारें जें जें सुख असतें तें तें अखेर दु:खच निर्माण करतें. आरंभीं तें गोड वाटतें पण अखेर दु:खाला कारण होतें. हा येथील अटळ नियम आहे. गळाला कणकीची गोळी असते. गळ गिळतांना माशाला सुख वाटते. पण गळ जेव्हां ओढला जातो तेव्हां माशाचा घसा फाटतो. किंवा हरिणाला हिरवा चारा फार आवडतो. तो चारा तोंडांत घेऊन पळतांना बिचारें दगडावर आपटते व तोंड फोडून घेतें. त्याचप्रमाणें देहसुखाच्या गोडीची अवस्था होतें. प्रथम तें गोड वाटतें. पण शेवटीं ते ताप देतें. यासाठीं माणसानें भगवंताची आवड धरावी. हें उत्तम होय.

आतापर्यंत ग्रंथ म्हणजे " अथातो देवजिज्ञासा " समजावा. श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. यानंतर भगवंत कसा आहे, तो कोठे राहतो, त्याची कृपा कशी करून त्याचें भजन कसें करावें वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्यांत मजा आहे. :
हे ऐकून भाविक श्रोता विचारतो कीं " स्वामी, सार्थक कसें घडेल ? कोणत्या उपायानें यमलोक चुकेल ? देव राहातो कोठें ? मला तो कसा भेटेल ? हा दु:ख मूळ संसार कोणत्या
उपायानें तुटेल ? अहो कृपामूर्ती ! खात्रीनें भगवंताची प्राप्ति होऊन माझी अधोगति चुकेल असा उपाय मला दीनाला सांगा. "

हें श्रोत्यांचें बोलणें ऐकून वक्ता म्हणाला कीं, " अगदी मनापासून एकनिष्ठा ठेवून भगवंताचें भजन करावें. त्यानें आपोआप विनासायास समाधान लाभेल. " त्यावर श्रोता बोलला कीं,
"
भगवंताचे भजन कसें करावें, मन कोठे गुंतवून ठेवावें, भगवंताच्या भजनाचें लक्षण काय, हें सगळें मला समजून सांगा. " दीन वदनानें शिष्यानें अशी प्रार्थना केली आणि
श्री सदगुरुचें चरण घट्ट धरलें. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून दु:खाश्रू गळू लागले. शिष्याचा असा अनन्यभाव पाहून सदगुरूदाता मनापासून प्रसन्न झाला. 

आतां पुढील समासामध्यें स्वानंद उचंबळून येईल.      

॥ श्रीराम समर्थ ॥