श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Wednesday, February 16, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास सातवा : आधिभौतिक ताप ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास सातवा : आधिभौतिक ताप ||

||श्रीराम ||

मागां जालें निरूपण| आध्यात्मिकाचें लक्षण |
आतां आदिभूतिक तो कोण| सांगिजेल ||||

श्लोक ||सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते |
       द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ||

सर्व भूतांचेनि संयोगें| सुखदुःख उपजों लागे |
ताप होतां मन भंगे| या नांव आदिभूतिक ||||

तरी या आदिभूतिकाचें लक्षण| प्रांजळ करूं निरूपण |
जेणें अनुभवास ये पूर्ण| वोळखी तापत्रयाची ||||

ठेंचा लागती मोडती कांटे| विझती शस्त्रांचे धायटे |
सला सिलका आणी सरांटे| या नांव आदिभूतिक ||||

अंग्या आणी काचकुहिरी| आवचटा लागे शरीरीं |
गांधील येऊन दंश करी| या नांव आदिभूतिक ||||

मासी गोमासी मोहळमासी| मुंगी तेलमुंगी डांस दसी |
सोट जळू लागे यासी| आदिभूतिक बोलिजे ||||

पिसा पिसोळे चांचण| कुसळें मुंगळे ढेंकुण |
विसीफ भोवर गोंचिड जाण| या नांव आदिभूतिक ||||

गोंबी विंचु आणी विखार| व्याघ्र लाअंडिगे आणी शूकर |
गौसायळ सामर| या नांव आदिभूतिक ||||

रानगाई रानम्हैसे| रानशकट्ट आणी रीसें |
रानहाती लांवपिसें| या नांव आदिभूतिक ||||

सुसरीनें वोढून नेलें| कां तें आवचितें बुडालें |
आथवा खळाळीं पडिलें| या नांव आदिभूतिक ||१०||

नाना विखारें आजगर| नाना मगरें जळचर |
नाना वनचरें अपार| या नांव आदिभूतिक ||११||

अश्व वृषभ आणी खर| स्वान शूकर जंबुक मार्जर |
ऐसीं बहुविध क्रूर| या नांव आदिभूतिक ||१२||

ऐसीं कर्कशें भयानकें| बहुविध दुःखदायकें |
दुःखें दारुणें अनेकें| या नांव आदिभूतिक ||१३||

भिंती माळवंदे पडती| कडे भुयेरीं कोंसळती |
वृक्ष आंगावरी मोडती| या नांव आदिभूतिक ||१४||

कोणी येकाचा श्राप जडे| कोणी येकें केले चेडे |
आधांतरी होती वेडे| या नांव आदिभूतिक ||१५||

कोणी येकें चाळविलें| कोणी येकें भ्रष्टविले |
कोणी येकें धरून नेलें| या नांव आदिभूतिक ||१६||

कोणी येकें दिलें वीष| कोणी येकें लाविले दोष |
कोणी येकें घातलें पाश| या नांव आदिभूतिक ||१७||

अवचिता सेर लागला| नेणो बिबवा चिडला |
प्राणी धुरें जाजावला| या नांव आदिभूतिक ||१८||

इंगळावरी पाय पडे| शिळेखालें हात सांपडे |
धावतां आडखुळे पडे| या नांव आदिभूतिक ||१९||

वापी कूप सरोवर| गर्ता कडा नदीतीर |
आवचितें पडे शरीर| या नांव आदिभूतिक ||२०||

दुर्गाखालें कोंसळती| झाडावरून पडती |
तेणें दुह्खें आक्रंदती| या नांव आदिभूतिक ||२१||

सीतें वोठ तरकती| हात पाव टांका फुटती |
चिखल्या जिव्हाळ्या लागती| या नांव आदिभूतिक ||२२||

अशनपानाचिये वेळे| उष्ण रसें जिव्हा पोळे |
दांत कस्करे आणी हरळे| या नांव आदिभूतिक ||२३||

पराधेन बाळपणीं| कुशब्दमारजाचणी |
अन्नवस्त्रेंवीण आळणी| या नांव आदिभूतिक ||२४||

सासुरवास गालोरे| ठुणके लासणें चिमोरे |
आलें रुदन न धरे| या नांव आदिभूतिक ||२५||

चुकतां कान पिळिती| कां तो डोळा हिंग घालिती |
सर्वकाळ धारकीं धरिती| या नांव आदिभूतिक ||२६||

नाना प्रकारीचे मार| दुर्जन मारिती अपार |
दुरी अंतरे माहेर| या नांव आदिभूतिक ||२७||

कर्णनासिक विंधिलें| बळेंचि धरून गोंधिलें |
खोडी जालिया पोळविलें| या नांव आदिभूतिक ||२८||

परचक्रीं धरून नेलें| नीच यातीस दिधलें |
दुर्दशा होऊन मेलें| या नांव आदिभूतिक ||२९||

नाना रोग उद्भवले| जे आध्यात्मिकीं बोलिले |
वैद्य पंचाक्षरी आणिले| या नांव आदिभूतिक ||३०||

नाना वेथेचें निर्शन| व्हावया औषध दारुण |
बळात्कारें देती जाण| या नांव आदिभूतिक ||३१||

नाना वल्लीचे रस| काडे गर्गोड कर्कश |
घेतां होये कासावीस| या नांव आदिभूतिक ||३२||

ढाळ आणी उखाळ देती| पथ्य कठीण सांगती |
अनुपान चुकतां विपत्ती| या नांव आदिभूतिक ||३३||

फाड रक्त फांसणी| गुल्लडागांची जाचणी |
तेणें दुःखें दुःखवे प्राणी| या नांव आदिभूतिक ||३४||

रुचिक बिबवे घालिती| नाना दुःखें दडपे देती |
सिरा तोडिती जळा लाविती| या नांव आदिभूतिक ||३५||

बहु रोग बहु औषधें| सांगतां अपारें अगाधें |
प्राणी दुखवे तेणें खेदें| या नांव आदिभूतिक ||३६||

बोलाविला पंचाक्षरी| धूरमार पीडा करी |
नाना यातना चतुरीं| आदिभूतिक जाणिजे ||३७||

दरवडे घालूनियां जना| तश्कर करिती यातना |
तेणें दुःख होये मना| या नांव आदिभूतिक ||३८||

अग्नीचेनि ज्वाळें पोळे| तेणें दुःखें प्राणी हरंबळे |
हानी जालियां विवळे| या नांव आदिभूतिक ||३९||

नाना मंदिरें सुंदरें| नाना रत्नांचीं भांडारें |
दिव्यांबरें मनोहरें| दग्ध होती ||४०||

नाना धान्यें नाना पदार्थ| नाना पशु नाना स्वार्थ |
नाना पात्रें नाना अर्थ| मनुष्यें भस्म होती ||४१||

आग्न लागला सेती| धान्यें बणव्या आणी खडकुती |
युक्षदंड जळोन जाती| अकस्मात ||४२||

ऐसा आग्न लागला| अथवा कोणी लाविला |
हानी जाली कां पोळला| या नांव आदिभूतिक ||४३||

ऐसें सांगतां बहुत| होती वन्हीचे आघात |
तेणे दुःखें दुःखवे चित्त| या नांव आदिभूतिक ||४४||

हारपे विसरे आणी सांडे| नासे गाहाळ फुटे पडे |
असाध्य होये कोणीकडे| या नांव आदिभूतिक ||४५||

प्राणी स्थानभ्रष्ट जालें| नाना पशूतें चुकलें |
कन्यापुत्र गाहाळले| या नांव आदिभूतिक ||४६||

तश्कर अथवा दावेदार| आवचितां करिती संव्हार |
लुटिती घरें नेती खिल्लार| या नांव आदिभूतिक ||४७||

नाना धान्यें केळी कापिती| पानमळां मीठ घालिती |
ऐसे नाना आघात करिती| या नांव आदिभूतिक ||४८||

मैंद उचले खाणोरी| सुवर्णपंथी भुररेकरी |
ठकु सिंतरु वरपेकरी| वरपा घालिती ||४९||

गठीछोडे द्रव्य सोडिती| नाना आळंकार काढिती |
नाना वस्तु मूषक नेती| या नांव आदिभूतिक ||५०||

वीज पडे हिंव पडे| प्राणी प्रजंनी सांपडे |
कां तो माहापुरीं बुडे| या नांव आदिभूतिक ||५१||

भोवरें वळणें आणी धार| वोसाणें लाटा अपार |
वृश्चिक गोंबी आजगर| वाहोन जाती ||५२||

तयामधें प्राणी सांपडला| खडकी बेटीं आडकला |
बुडत बुडत वांचला| या नांव आदिभूतिक ||५३||

मनासारिखा नसे संसार| कुरूप कर्कश स्त्री क्रूर |
विधवा कन्या मूर्ख पुत्र| या नांव आदिभूतिक ||५४||

भूत पिशाच्च लागलें| आंगावरून वारें गेलें |
अबद्धमंत्रे प्राणी चळलें| या नांव आदिभूतिक ||५५||

ब्राह्मणसमंध शरीरीं| बहुसाल पीडा करी |
शनेश्वराचा धोका धरी| या नांव आदिभूतिक ||५६||

नाना ग्रहे काळवार| काळतिथी घातचंद्र |
काळवेळ घातनक्षत्र| या नांव आदिभूतिक ||५७||

सिंक पिंगळा आणी पाली| वोखटें होला काक कलाली |
चिंता काजळी लागली| या नांव आदिभूतिक ||५८||

दिवटा सरवदा भाकून गेला| अंतरीं धोका लागला |
दुःस्वप्नें जाजावला| या नांव आदिभूतिक ||५९||

भालु भुंके स्वान रडे| पाली अंगावरी पडे |
नाना चिन्हें चिंता पवाडे| या नांव आदिभूतिक ||६०||

बाहेरी निघतां अपशकून| नाना प्रकारें विछिन्न |
तेणें गुणें भंगे मन| या नांव आदिभूतिक ||६१||

प्राणी बंदी सांपडला| यातने वरपडा जाला |
नाना दुःखें दुःखवला| या नांव आदिभूतिक ||६२||

प्राणी राजदंड पावत| जेरबंद चाबुक वेत |
दरेमार तळवेमार होत| या नांव आदिभूतिक ||६३||

कोरडे पारंब्या फोक| बहुप्रकारें अनेक |
बहुताडिती आदिभूतिक| या नांव बोलिजे ||६४||

मोघरीमार बुधलेमार| चौखुरून डंगारणेमार |
बुक्या गचांड्या गुढघेमार| या नांव आदिभूतिक ||६५||

लाता तपराखा सेणमार| कानखडे दगडमार |
नाना प्रकारींचे मार| या नांव आदिभूतिक ||६६||

टांगणें टिपऱ्या पिछोडे| बेडी बुधनाल कोलदंडे |
रक्षणनिग्रह चहूंकडे| या नांव आदिभूतिक ||६७||

नाकवणी चुनवणी| मीठवणी रायवणी |
गुळवण्याची जाचणी| या नांव आदिभूतिक ||६८||

जळामध्यें बुचकळिती| हस्तीपुढें बांधोन टाकिती |
हाकिती छळिती यातायाती| या नांव आदिभूतिक ||६९||

कर्णछेद घ्राणछेद| हस्तछेद पादछेद |
जिव्हाछेद अधरछेद| या नांव आदिभूतिक ||७०||

तीरमार सुळीं देती| नेत्र वृषण काढिती |
नखोनखीं सुया मारिती| या नांव आदिभूतिक ||७१

पारड्यामध्यें घालणें| कां कडेलोट करणें |
कां भांड्यामुखें उडवणें| या नांव आदिभूतिक ||७२||

कानीं खुंटा आदळिती| अपानीं मेखा मारिती |
खाल काढून टाकिती| या नांव आदिभूतिक ||७३||

भोत आणी बोटबोटी| अथवा गळ घालणें कंठीं |
सांडस लावून आटाटी| या नांव आदिभूतिक ||७४||

सिसें पाजणें वीष देणें| अथवा सिरछेद करणें |
कां पायातळीं घालणें| या नांव आदिभूतिक ||७५||

सरड मांजरें भरिती| अथवा फांसीं नेऊन देती |
नानापरी पीडा करिती| या नांव आदिभूतिक ||७६||

स्वानप्रळये व्याघ्रप्रळये| भूतप्रळये सुसरीप्रळये |
शस्त्रप्रळये विझप्रळये| या नांव आदिभूतिक ||७७||

सीरा वोढून घेती| टेंभें लाउन भाजिती |
ऐशा नाना विपत्ती| या नांव आदिभूतिक ||७८||

मनुष्यहानी वित्तहानी| वैभवहानी महत्वहानी |
पशुहानी पदार्थहानी| या नांव आदिभूतिक ||७९||

बाळपणीं मरे माता| तारुण्यपणीं मरे कांता |
वृद्धपणीं मृत्य सुता| या नांव आदिभूतिक ||८०||

दुःख दारिद्र आणी रुण| विदेशपळणी नागवण |
आपदा अनुपत्ति कदान्न| या नांव आदिभूतिक ||८१||

आकांत वाखाप्रळये| युद्ध्य होतां पराजये |
जिवलगांचा होये क्षये| या नांव आदिभूतिक ||८२||

कठीण काळ आणी दुष्काळ| साशंक आणी वोखटी वेळ |
उद्वेग चिंतेचे हळाळ| या नांव आदिभूतिक ||८३||

घाणा चरखीं सिरकला| चाकाखालें सांपडला |
नाना वन्हींत पडिला| या नांव आदिभूतिक ||८४||

नाना शस्त्रें भेदिला| नाना स्वापदीं भक्षिला |
नाना बंदीं पडिला| या नांव आदिभूतिक ||८५||

नाना कुवासें निर्बुजे| नाना अपमानें लाजे |
नाना शोकें प्राणी झिजे| या नांव आदिभूतिक ||८६||

ऐसें सांगतां अपार| आहेत दुःखाचे डोंगर |
श्रोतीं जाणावा विचार| आदिभूतिकाचा ||८७||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिभौतिकतापनिरूपणनाम समास सातवा ||||३. ७

मागील समासांत आध्यात्मिक तापाचें लक्षण सविस्तर सांगितले. आता आधिभौतिक ताप कोणता तें सांगतो.

श्लोकाचा अर्थ : भूतमात्राच्या म्हणजे बाह्य पदार्थांच्या संयोगानें जें सुखदु:ख निर्माण होतें, त्या दुसर्‍या तापसंतापाला यथार्थ रीतीनें आधिभौतिक असें म्हणतात. 
सर्व भुताच्या संयोगानें जें सुखदु:ख उत्पन्न होतें, त्याचा ताप होऊन मन दु:खी होतें, बेचैन होतें त्याला आधिभौतिक असें म्हणतात. आधिभौतिक तापाची लक्षणें अगदी स्वच्छ आणि सोप्या रितीनें वर्णन करुन सांगतो. तीम समजली कीं तापत्रय संपूर्णपणें कळतील. ठेंचा लागणें, कांटे मोडणें, हत्यारांचें घाव लागणें, शरीरांत धस म्हणजे लांकडाचा बारीक कांट्यासारखा तुकडा शिरणें, चोयट्या, सराटे लागणें, अंगाची आग करणारी आग्या वनस्पती अंगास लागणें, अंगाला खाज असणारी खाजकुहिरी एकाएकी अंगास लागणें, गांधील माशी येऊन चावणें,

माशी, गोमाशी, मोहोळ माशी, मुंगी, तेलमुंगी व डांस यांचा दंश, सोट म्हणजे रक्त खाणारा किडा व जळू, अंगास चिकटणें, पिसवा, पिसोळे, चांचड म्हणजे तांबडे मुंगळे, कुसळें, मुंगळें, ढेंकुण, इसब उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचिडें, गोम, विंचू, साप, वाघ, लांडगे, डुक्कर, साळू, सांबर, रंगी, रानम्हशी, रंबील, अस्वलें, रानहत्ती, पक्ष्यांची पिसें, इत्यादि किड्यांचा दंश व जनावरांचा मार, मगरीनें ओढून नेणें, एकाएकी पाण्यांत बुडणें, पाय घसरून ओढ्याच्या प्रवाहात पडणें, विषारी सर्प, अजगर, मगरी, इतर जलचर प्राणी, अनेक जंगलीं जनावरें यांच्यापासून दु:ख होणें,

घोडा, बैल, गाढव, कुत्रें, डुक्कर, कोल्हें, मांजर अशा अनेक प्रकारच्या क्रूर पशुंपासून दु:ख होणें, अशी कर्कश, भयंकर, नाना रीतीनें यातना देनारो अनेक असह्य दु:खें, भिंती व माळवदे किंवा गच्ची अंगावर कोसळणें, कडे, भुयारें कोसळणें, झाडें अंगावर पडून अवयव मोडणें, कोणाचा शाप बाधणें, कोणाचा जादूटोणा त्रास देणें, अकारण वेड लागणें, कुणीतरी खोटा आळ घेणें, कुणीतरी फांस घालणें, कल्पना नसतां शेराच्या झाडाचा चीक लागणें, बिब्बा उतणें, धुरानें जीव घाबरा होणें, मोठ्या विंचवावर पाय पडणें, दगडाखाली हात सांपडणें, पळताना अडखळून पडणें,

विहिरी, हौद, तलाव, मोठा खळगा, कडा, नदीचा कांठ, इत्यादीमध्यें एकाएकी शरीर पडणें, किल्ल्यावरून  खालीं कोसळणें, झाडावरून पडणें, त्या दु:खानें मोठ्यानें रडणें, थंडीनें ओठ फुटणें, हात, पाय व टांचा यांना भेगा पडणें, हातापायांची बोटें कुजणें, खातापीतांना अतिशय गरम तोंडात जाऊन जीभ पोळणें, दांतावर दांत करकरणें, दांतांना फटी पडणें, लहानपणीं परावलंबी असल्यानें शिव्यांचा मार सोसावा लागणें, अन्नवस्त्राची उणीव असणें, मुलींना सासुरवासापायीं गालगुच्चे, ठोसे, डागणें, चिमटे, इत्यादि क्लेश  सोसतांना रडें न आवरणें, चूक झाली कीं कान पिळला जाणें, किंवा डोळ्यांत हिंग घालणें, निरंतर धारेवर धरणें, दुष्ट माणसांनीं नाना तर्‍हेची मारहाण करणें, मुलींना माहेर दुरावणें, कानाला नाकाला भोकें पाडणें, जबरदस्तीनें गोंदणें, जरा चूक झाली की आगीचे चटके देणें, शत्रूच्या हल्यांत पकडलें जाणें, नीच जातींच्या लोकांना विकून टाकणें, त्यामुळें दुर्दशा होउन मरण येणें, आध्यात्मिक तापांत सांगिअतलेलें अनेक रोग होणें व त्यासाठीं वैद्य मांत्रिक बोलावणें,
      
रोग बरा व्हावा म्हणून अति कडक औषधें जबरदस्तीनें पाजणें, निरनिराळ्या वनस्पतींचे रस, काढे व चाटणें घेतांना जीव कासावीस होणें, जुलाब होण्यासाठीं किंवा ओकारी होण्यासाठीं औषध देणें, कठीण पथ्य करायला सांगणें, औषध घेण्याची रीत चुकल्यानें क्लेश होणें, शरीराची चिरफाड करणें, शस्त्रानें शरीरांतील रक्त काढणें, तापलेल्या सळइनें शरीर चोचवणें म्हणजे शरीराला दाबून भोकें पाडणें, रुईचा चीक घालणें, बिब्बा घालणें, नाना दु:खांचे आघात होणें, शिरा तोडणें, जळवा लावणें,

कितीतरी रोग आणि त्यांची कितीतरी औषधें आहेत. ते सांगूं लागल्यास अमर्याद आहेत. त्यांच्यामुळें यातना होणें, एक मांत्रिक बोलाविला व त्यानें धुराचा मारा केला. अशा नाना प्रकारच्या ह्या यातना आहेत त्या शहाण्यांनीं आधिभौतिक जाणाव्या. चोर दरवडा घालतात व लोकांना छळतात. त्यामुळें मनाला दु:ख होणें, आगीच्या जाळाचें चटके बसल्यानें यातना होऊन व्याकूळ होणें, नुकसान झाल्यामुळें विव्हळणें,

कितीतरी सुंदर मंदिरे, जडजवाहिराचे सांठे, सुंदर किंमती वस्त्रे, धान्यें, पदार्थ, पशु, घरांत सांठवलेला पैसा, भांडीं, वस्तु, माणसे, शेतें, धान्यें, गवताच्या गंजी, धान्याच्या सालपटांचे दिगरे, ऊंस, इत्यादि एकाकीं जळून जातें, अशी आग अपोआप लागली कां कुणी मुद्दाम लावली हें जरी सोडलें तरी तिच्यामुळें नुकसान होतें व माणसें भाजतात. आग लागून होणारें अपघात पुष्कळच आहेत. पण त्यामुळें माणसाच्या मनाला होणार्‍या यातना आधिभौतिक ताप होय. वस्तू हरवणें, विसरणें, गमावणें, सडणें, गहाळ होणें, फुटणें, पडणें, परत मिळणे अशक्य होणें, चोरांनीं किंवा शत्रूंनीं एकाएकी धाड घालणें व संहार करणें, घरें लुटणें, जनावरे पळविणें, शेतांतील धान्य कापून नेणें, केळी तोडणें, पानमळ्यांत मीठ घालून तो नासून टाकणें, लुटारू, उचले, घर खणून चोरी करणारे, किमयागार भुरळ पडणारे ठग, लुच्चे फसविणारे, लुटारू, दरवडेखोर इत्यादि लोकांनीं धाड घालणें, लुटणें व फसविणें, गाठोडी लांबविणार्‍यांनीं गांठोडें चोरुन द्र्व्य व दागदगिने लांबविणें, उंदरांनीं अनेक वस्तु पळविणें, अंगावर वीज पडणें, अति थंडी पडणें, मोठ्या पावसांत सापडणें, महापुरांत बुडणें, नदीच्या प्रवाहांत भोवरें, वळणें, घार, पुरांत वहात येणार्‍या वस्तु म्हणजे लांकडें वगैरे, मोठ्या लाटा असतात. विंचु, गोमा, अजगर त्यामध्यें वाहून जातात. त्यांत सांपडणें, वाहात वाहात एखाद्या खडकावर किंवा बेटावर अडकणें, व बुडतां बुडतां वांचणें, कुरुप, कर्कश, क्रुर स्वभावाची बायकों मिळणें, मुलगी विधवा होंणें, मुलगा मुर्ख असणें, यामुळें मनासारखा संसार नसणें, भूत पिशाच्च लागणें, अंगावरून वारें जाणें, मंत्राची जप चुकल्यानें भ्रम होणें, एखाद्या ब्रह्मसमंध शरीरांत शिरून बरीच वर्षें त्रास देणें, शनीची वाईट दशा येणें,

इतर ग्रहांची वाईट दशा येणें, काळवार कालतिथी, चंद्राचे अशुभ योग असणारी काळवेळ, घातनक्षत्र, शिंकेचा अपशकुन, पालीची चुकचुक, पिंगळा, कावळा, होला या पाखरांची अपशकुनी कलकल इत्यादि अपशकुनांनीं मनामध्यें काळजीचा काळोख पसरणें, दिवटा म्हणजे रात्री मशालीच्या प्रकाशांत भविष्य सांगत फिरणारा व सरवदा म्हणजे भविष्य सांगणारा हे दोघे कांहीं तरी अशुभ भविष्य सांगून गेले त्याच्या मनाला धक्का लागणें, त्यामुळें वाईट स्वप्नें पडून भय वाटणें, कोल्हेकुई, कुत्र्याचें रडणें, पाल अंगावर पडणें, अशा अनेक अपशकुनांनीं मनाला फार काळजी वाटणें, घराबाहेर पडले कीं नाना प्रकारचे विचित्र अपशकून होऊन मन उदास होणें, कैदेंत सांपडणें, तेथें अनेक यातना भोगाव्या लागणें, अनेक दु:खानीं कष्टी होणें, राजाकडून शिक्षा होणें, घोड्याच्या काढण्या, चाबूक, छड्या यांचा मार मिळणें, दरींत लोटून मारणें, तापल्या तव्यावर उभें करून मारणें, कोरडे म्हणजे चामड्याचा चाबुक, झाडाच्या पारंब्या, फोक म्हणजे झाडाची सालपटें, अशीं, अनेक मारण्याची साधनें वापरून खूप मार देणें, जाड सोट्यासारख्या मुदगलानें मारणें, दारुच्या बुधल्यास बांधुन आग लावून मारणें, चारी बाजूला ताणून बडगे हाणून मारणें, गुद्दे मारणें, गचांड्या मारणें, गुडघ्यांचां मार देणें, लाथा मारणें, चपराका मारणें, शेणमार करणें, कानांत् खडे खुपसणें, दगडांनीं मारणें, असे नाना प्रकारचे मार भोगावें लागणें,  

टांगणें, चाप लावणें, दोन्ही हात मागें खेंचून बांधणें, वेड्या घालणें, झाडाच्या बुंध्यावर नालाप्रमाणें वाकायला लावून मार देणें, कोलदांडे घालणें, इकडे तिकडे हालूं न देणें, चुन्याचें पाणी मिठाचें पाणी, मोहरीचें पाणी, गुळाचें पाणी, नाकांत किंवा कानांत किंवा घशांत ओतल्यामुळें यातना होणें, पाण्यांत बुचकळणें, हातपाय बांधून हत्तीपुढें टाकणें, जनावराप्रमाणे फटकें मारून हांकणें, छळ करणें, उगाच कष्ट देणें, कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ, तोडून टाकणें, बाणांचा मार देणें, सुळी देणें, डोळे काढणें, वृषण कापणें, बोटांच्या नखांमध्यें सुया टोंचणें, पारड्यामध्यें घालणें, कडेलोट करणें, तोफेच्या तोंडी बांधून उडविणें,

कानांत खुंट्या ठोकणें, गुदद्वारांत मेख मारणें, अंगाचें कातडें सोलणें, पोत्यांत भरून मारणें, बोटें ठेचून टाकणें, गळ्याला गळ लावणें, तापविलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणें, उकळतें शिसे पाजणें, जालिम विष पाजणें, डोके उडविणें, अंगावर माणसें नाचवून मारणें, अंगावरील कपड्यांत कुत्रीं, वाघ, भुतेंखेतें, सुसरी, शस्त्रं, विजा यांचा अतिरेक होऊन जीवितांची हानी होणे, अंगातील शिरा तोडणें, जळत्या टेंभ्यानीं चटके देणें व भाजून काढणें, अशा अनेक यातना भोगणे, मनुष्य, द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरे व चीजवस्तु यांची हानी होणें, बाळपणीं आई मरणें, तरुणपणीं बायको मरणें, म्हातारपणी मुलगा मरणें, दु:ख, दारिद्र्य, कर्ज, परदेशीं पळून जाणें, लुट होऊन सर्वस्वी नागवलें जाणें, संकटें येणें, अंगावर जड वस्तु पडणें, वाईट अन्न खाण्याच्या प्रसंग येणें, कॉलर्‍याच्या सांथीनें हजारों माणसें मरणें, युद्धांत पराजय होणें, जीवलगांचा मृत्यू होणें, आधीच कठीण काल असून त्यांत दुष्काळ येणें, मनांत धाकधूक असून त्यांत वेळ वाईट येणें, उद्वेग उत्पन्न होणें, काळजीनें जीवाचे हाल होणें,

घाण्यांत किंवा चरकांत शिरून चाकाखालीं सांपडणें, निरनिराळ्या प्रकारच्या आगींत पडणें, अनेक शस्त्रांनीं अवयव तुटणें, अनेक जंगली जनावरांनीं खाऊन टाकणें, अनेक लोकांच्या कैदेंत अडकणें, वाईट जागेत राहावें लागल्यानें जीव घाबरणें, अनेक प्रकारच्या अपमानानें लाजिरवाणें वाटणें, अनेक प्रकारच्या दु:खानें खंगून जाणें. आतांपर्यंत वर्णन केलें अशा प्रकारचे दु:खाचें अपार डोंगर आहेत. ते सगळे सांगतां येणार नाहींत. पण जे येथें सांगितले आहेत त्यांवरून श्रोत्यांनीं आधिभौतिक तापाचा विचार समजून घ्यावा.     

॥ श्रीराम समर्थ ॥