श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, February 17, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास आठवा : आधिदैविक ताप ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास आठवा : आधिदैविक ताप ||

||श्रीराम ||

मागां बोलिला आध्यात्मिक| त्याउपरीं आदिभूतिक |
आतां बोलिजेल आदिदैविक| तो सावध ऐका ||||

श्लोक:  शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना |
       स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ||

शुभाशुभ कर्मानें जना| देहांतीं येमयातना |
स्वर्ग नर्क भोग नाना| या नांव आधिदैविक ||||

नाना दोष नाना पातकें| मदांधपणें अविवेकें |
केलीं, परी तें दुःखदायकें| येमयातना भोगविती ||||

आंगबळें द्रव्यबळें| मनुष्यबळें राजबळें |
नाना सामर्थ्याचेनि बळें| अकृत्य करिती ||||

नीती सांडूनियां तत्वतां| करूं नये तेंचि करितां |
येमयातना भोगितां| जीव जाये ||||

डोळे झांकून स्वार्थबुद्धीं| नाना अभिळाश कुबुद्धीं |
वृत्ति भूमिसिमा सांधी| द्रव्य दारा पदार्थ ||||

मातलेपणें उन्मत्त| जीवघात कुटुंबघात |
अप्रमाण क्रिया करीत| म्हणौन येमयातना ||||

मर्यादा सांडूनि चालती| ग्रामा दंडी ग्रामाधिपती |
देशा दंडी देशाधिपती| नीतिन्याय सांडितां ||||

देशाधिपतीस दंडिता रावो| रायास दंडिता देवो |
राजा न करितां नीतिन्यावो| म्हणौन यमयातना ||||

अनीतीनें स्वार्थ पाहे| राजा पापी होऊन राहे |
राज्याअंतीं नर्क आहे| म्हणौनियां ||१०||

राजा सांडितां राजनीति| तयास येम गांजिती |
येम नीति सांडितां धावती| देवगण ||११||

ऐसी मर्यादा लाविली देवें| म्हणौनि नीतीनें वर्तावें |
नीति न्याय सांडितां भोगावें| येमयातनेसी ||१२||

देवें प्रेरिले येम| म्हणौनि आदिदैविक नाम |
तृतीय ताप दुर्गम| येमयातनेचा ||१३||

येमदंड येमयातना| शास्त्रीं बोलिले प्रकार नाना |
तो भोग कदापि चुकेना| या नांव आदिदैविक ||१४||

येमयातनेचे खेद| शास्त्रीं बोलिले विशद |
शेरीरीं घालून, अप्रमाद- | नाना प्रकारें ||१५||

पापपुण्याचीं शरीरे| स्वर्गीं असती कळिवरें |
त्यांत घालून नाना प्रकारें| पापपुण्य भोगविती ||१६||

नाना पुण्यें विळास| नाना दोषें यातना कर्कश |
शास्त्रीं बोलिलें अविश्वास- | मानूंच नये ||१७||

वेदाज्ञेनें न चालती| हरिभक्ती न करिती |
त्यास येमयातना करिती| या नांव आदिदैविक ||१८||

अक्षोभ नर्कीं उदंड जीव| जुनाट किडे करिती रवरव |
बांधोन टाकिती हातपाव| या नांव आदिदैविक ||१९||

उदंड पैस लाहान मुख| कुंभाकार कुंड येक |
दुर्गंधी उकाडा कुंभपाक| | या नांव आदिदैविक ||२०||

तप्तभूमिका ताविती| जळत स्थंभ पोटाळविती |
नाना सांडस लाविती| या नांव आदिदैविक ||२१||

येमदंडाचे उदंड मार| यातनेची सामग्री अपार |
भोग भोगिती पाअपी नर| या नांव आदिदैविक ||२२||

पृथ्वीमध्यें मार नाना| त्याहून कठीण येमयातना |
मरितां उसंतचि असेना| या नांव आदिदैविक ||२३||

चौघे चौंकडे वोढिती| येक ते झोंकून पाडिती |
ताणिती मारिती वोढूनि नेती| या नांव आदिदैविक ||२४||

उठवेना बसवेना| रडवेना पडवेना |
यातनेवरी यातना| या नांव आदिदैविक ||२५||

आक्रंदे रडे आणि फुंजे| धकाधकीनें निर्बुजे |
झुर्झरों पंजर होऊन झिजे| या नांव आदिदैविक ||२६||

कर्कश वचनें कर्कश मार| यातनेचे नाना प्रकार |
त्रास पावती दोषी नर| या नांव आदिदैविक ||२७||

मागां बोलिलां राजदंड| त्याहून येमदंड उदंड |
तेथील यातना प्रचंड| भीमरूप दारुण ||२८||

आध्यात्मिक आदिभूतिक| त्याहूनि विशेष आदिदैविक |
अल्प संकेतें कांहींयेक| कळावया बोलिलें ||२९||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आधिदैविकतापनिरूपणनाम समास आठवा ||||३. ८

मागील दोन समासांत आध्यात्मिक आणि आधिभौतिक ताप सांगितले. आतां आधिदैविक ताप सांगतो, ते सावधपणें ऐका.

श्लोकाचा अर्थ : आपल्या चांगल्यावाईट कर्माप्रमाणें आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्गनरक यांचे भोग भोगावें लागतात त्यांना आधिदैविक ताप असें म्हणतात - श्री समर्थांचें सांगणें हें कीं मानवीसमाजांत अनेक शक्ति वावरतात. त्यांपैकीं एक किंवा अनेक शक्ति माणसाला वश होऊ शकतात. त्याचा उपयोग करून त्यानें केवळ स्वार्थ साधणें हीच अनीति व हाच अन्याय होय. अशा माणसाला या जगांतील सुखसोयी मिळतात हें उघड दिसतें. परंतु मृत्युनंतर त्याचा वचपा निघतो हें कोणी विसरुं नये. :
माणसांना त्याच्या चांगल्या वाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना, स्वर्गनरक, असे अनेक भोग भोगावे लागतात. त्यांना आधिदैविक ताप असें म्हणतात. माणूस मदांध होऊन अविचारी बनतो, अविचारांने तो अनेक दोष व पातकें करतो. तीं दु:ख देणारीं असल्यानें यमयातना भोगाव्या लागतात.

अंगबळ, द्रव्यबळ, मनुष्यबळ, शासनबळ, अशा निरनिराळ्या शक्तींच्या जोरावर माणूस वाईट कर्म करतो. खरोखर मनुष्य निती बाजूस सारतो आणि करूं नये तें करतो. मग यमयातना भोगतांना त्याच्या जीव कासावीस होतो. माणूस अति स्वार्थबुद्धीनें अंध बनतो, त्यांत अति लोभ आणि वांकडी बुद्धि ठेवतो. मग त्यांच्या बळानें पुढील गोष्टी करतो. निर्वाहाचें साधन जी जमीन तिची हद्द वाढविणें, दुसर्‍याचें द्रव्य, बायको व इतर वस्तू पळविणें किंवा लांबविणें, सदा मस्तवालपणें, उन्मत्तासारखें वागणें, जीवाचा नाश करणें, समाजविध्वंसक कर्म करणें, इत्यादि म्हणून असें कर्म करणर्‍याला माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. नीतिन्यायाची मर्यादा सोडून वागले तर गावाचा स्वामी त्याला शासन करतो. देशाच्या स्वामीला राज शासन करतो. राजा जर नीतिन्यायानें वागत नसेल तर देव त्याला शासन करतो. राजाला यमयातना भोगाव्या लागतात. जो राजा अनीतीनें स्वार्थ साधतो, तो पापी बनून राहतो, त्याचें पाप संचात जातें म्हणून तो मेला व राज्य संपलें कीं त्याला नरकवास मिळतो. राजानें राजाला आवश्यक ती नीतिमर्यादा सोडली कीं त्याला यम शासन करतो. पण यमानें नीतिमर्यादा सोडली तर देवगण धांवून येतो व त्याला शासन करतो. भगवंतानें अशी हि मर्यादा घालून दिली आहे म्हणून सर्वांनीं नीतीनें वागावें. नीतिन्याय झुगारून वागल्यास यमयातना भोगाव्या लागतात.

मरणोत्तर भोगांचें तंत्र कोणतें तें आतां सांगतात :
देव यमदेवतेला प्रेरणा देऊन तिच्या द्वारें जीवाला भोग हे भोग भोगायला लावतो. म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात. यमयातनांचा हा ताप फार दु:सह व दुर्गम आहे. शास्त्रांमध्यें यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. तो भोग कधीही चुकवितां येत नाहीं. यासाठीं त्याला आधिदैविक म्हणतात. माणूस जीं नाना प्रकारची दुष्कर्में करतो त्यांचे सगळे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरांत सांठविलेले असतात. त्या दोषांनुसार त्याला यमयातनेचे क्लेश सोसावे लागतात. शास्त्रांमध्यें त्याचें सविस्तर वर्णन आढळतें. मरणोत्तर लोकांत पापपुण्याचीं शरीरें असतात. मनुष्य मेल्यावर त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार त्या शरीरांत घालून मग त्याला त्याच्या पापाची व पुण्याची फळें भोगावी लागतात. ज्याच्या पदरीं पुण्य पुष्कळ त्याला स्वर्गसुखाचें विलास पुष्कळ तर ज्याच्या पदरीं पाप पुष्कळ त्याला नरकयातनांचे क्लेश पुष्कळ होतात. असें शास्त्रांत सांगितलें आहें त्यावर अविश्वास धरूं नये. त्यामध्यें तथ्य आहे.

यमयातना म्हणजे काय क्लेश असतात याचें थोडेसें प्रत्यक्ष वर्णन सांगतात :
जे वेदाज्ञा पाळीत नाहींत, हरिभक्ती करीत नाहींत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. अक्षोम नावांच्या नरकांत अगणित जुने किडे वळवळ करीत असतात. पापी माणसाला यम त्यामध्यें हातपाय बांधून फेकतो. कांही पापी जीवांना कुंभपाकांत टाकतात.कुंभपाक म्हणजे अगदी लहान तोंडचें पण आंत मोठी जागा असलेलें मड्क्यासारखें कुंड. त्या कुंडात अत्यंत उकाडा व दुर्गंधी असते. जीवाला तापलेल्या भूमीवर भाजतात, जळत असलेला लाकडी खांब पोटावर फिरवतात, अनेक प्रकारचे चाप लावतात. यांच्या शिक्षेमध्यें मारण्याचे प्रकार पुष्कळ आहेत. क्लेश देण्याची साधनें यामापाशीं पुष्कळ आहेत. पापी माणसांना त्यांच्या यातना भोगाव्या लागतात. या जगांत मार देण्याचे पुष्काळ प्रकार आहेत.पण यमयातना त्याच्यापेक्षां सोसण्यात अधिक कठीण असते. तेथील मर थांबतच नाहीं. 

चार जण चार बाजूंनी खेचतात. कोणी झोकें देऊन पडतात, ताणतात, मारतात किंवा फरफटत ओढून नेतात. तेथें उठवत नाहीं, बसवत नाहीं, रडवत नाहीं, एकामागून एक यातना सारख्या चालूं असतात. जीव तेथें रडतो, मोठ्याने गळा काढतो, गहिवरतो, फुसफुसतो, तेथील धक्काबुक्कीनें घाबरतो, सारखी झुरणी लागल्यानें हाडांचा सांपळा उरतो, तरी झीज चालूंच राहते. कठोर बोलून कठोर मर देतात. यमयातनेचे असे अनेक प्रकार आहेत. पापी माणसांना त्यांचा त्रास भोगावा लागतो. मागील समासांत राजा ज्या शिक्षा देतो त्या सांगितल्या. पण यमाच्या शिक्षा त्यांहून पुष्कळ आहेत. यमयातना प्रचंड आहेत, भयंकर आहेत, फार अकराळ विकराळ आहेत. अध्यात्मिक, आधिभौतिक आणि त्यांहून विशेष असा आधिदैविक हे तीन ताप थोड्या लक्षणांसाहित समजण्यासाठी म्हणून सांगितलें.

॥ श्रीराम समर्थ ॥