श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, February 11, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास दुसरा : स्वगुणपरीक्षा अ ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास दुसरा : स्वगुणपरीक्षा ||

||श्रीराम ||

संसार हाचि दुःखमूळ| लागती दुःखाचे इंगळ |
मागां बोलिली तळमळ| गर्भवासाची ||||

गर्भवासीं दुःख जालें| तें बाळक विसरलें |
पुढें वाढों लागलें| दिवसेंदिवस ||||

बाळपणीं त्वचा कोंवळी| दुःख होतांचि तळमळी |
वाचा नाहीं तये काळीं| सुखदुःख सांगावया ||||

देहास कांहीं दुःख जालें| अथवा क्षुधेनें पीडलें |
तरी तें परम आक्रंदलें| परी अंतर नेणवे ||||

माता कुरवाळी वरी| परी जे पीडा जाली अंतरीं |
ते मायेसी न कळे अभ्यांतरीं| दुःख होये बाळकासीं ||||

मागुतें मागुतें फुंजे रडे| माता बुझावी घेऊन कडे |
वेथा नेणती बापुडें| तळमळी जीवीं ||||

नानाव्याधीचे उमाळे| तेणें दुःखें आंदोळे |
रडे पडे कां पोळे| अग्निसंगें ||||

शरीर रक्षितां नये| घडती नाना अपाये |
खोडी अधांतरीं होये| आवेवहीन बाळक ||||

अथवा अपाय चुकले| पूर्णपुण्य पुढें ठाकलें |
मातेस ओळखों लागलें| दिवसेंदिवस ||||

क्षणभरी मातेस न देखे| तरी आक्रंदें रुदन करी दुःखें |
ते समईं मातेसारिखें| आणीक कांहिंच नाहीं ||१०||

आस करून वास पाहे| मातेविण कदा न राहे |
वियोग पळमात्र न साहे| स्मरण जालियां नंतरें ||११||

जरी ब्रह्मादिक देव आले| अथवा लक्ष्मीने अवलोकिलें |
तरी न वचे बुझाविलें| आपले मातेवांचुनी ||१२||

कुरूप अथवा कुलक्षण| सकळांहूनि करंटेपण |
तरी नाहीं तीसमान| भूमंडळीं कोणी ||१३||

ऐसें तें केविलवाणें| मातेविण दिसे उणें |
रागें परतें केलें तिनें| तरी आक्रंदोनी मिठी घाली ||१४||

सुख पावे मातेजवळी| दुरी करितांचि तळमळी |
अतिप्रीति तयेकाळीं| मातेवरी लागली ||१५||

तंव ते मातेस मरण आलें| प्राणी पोरटें जालें |
दुःखें झुर्णीं लागलें| आई आई म्हणोनी ||१६||

आई पाहातां दिसेना| दीनरूप पाहे जना |
आस लागलिसे मना| आई येईल म्हणोनी ||१७||

माता म्हणौन मुख पाहे| तंव ते आपुली माता नव्हे |
मग हिंवासलें राहे| दैन्यवाणें ||१८||

मातावियोगें कष्टलें| तेणें मानसीं दुःख जालें |
देहहि क्षीणत्व पावलें| आतिशयेंसीं ||१९||

अथवा माताहि वांचली| मायलेंकुरा भेटी जाली |
बाळदशा ते राहिली| देवसेंदिवस ||२०||

बाळपण जालें उणें| दिवसेंदिवस होये शाहाणें |
मग ते मायेचें अत्यंत पेरूणें| होतें, तें राहिलें ||२१||

पुढें लो लागला खेळाचा| कळप मेळविला पोरांचा |
आल्यगेल्या डायाचा| आनंद शोक वाहे ||२२||

मायेबापें सिकविती पोटें| तयाचें परम दुःख वाटे |
चट लागली न सुटे| संगती लेंकुरांची ||२३||

लेंकुराअंमध्यें खेळतां| नाठवे माता पिता |
तंव तेंथेहि अवचिताअ| दुःख पावला ||२४||

पडिले दांत फुटला डोळा| मोडले पाय जाला खुळा |
गेला माज अवकळा- | ठाकून आली ||२५||

निघाल्या देवी आणी गोवर| उठलें कपाळ लागला ज्वर |
पोटसुळीं निरंतर| वायगोळा ||२६||

लागलीं भूतें जाली झडपणी| जळीच्या मेसको मायेराणी |
मुंज्या झोटिंग करणी| म्हैसोबाची ||२७||

वेताळ खंकाळ लागला| ब्रह्मगिऱ्हो संचरला |
नेणों चेडा वोलांडिला| कांहीं कळेना ||२८||

येक म्हणती बीरे देव| येक म्हणती खंडेराव |
येक म्हणती सकळ वाव| हा ब्राह्मणसमंध ||२९||

येक म्हणती कोणें केलें| आंगीं देवत घातले |
येक म्हणती चुकलें| सटवाईचें ||३०||

येक म्हणती कर्मभोग| आंगीं जडले नाना रोग |
वैद्य पंचाक्षरी चांग| बोलाऊन आणिले ||३१||

येक म्हणती हा वांचेना| येक म्हणती हा मरेना |
भोग भोगितो यातना| पापास्तव ||३२||

गर्भदुःख विसरला| तो त्रिविधतापें पोळला |
प्राणी बहुत कष्टी जाला| संसारदुःखें ||३३||

इतुकेंहि चुकोन वांचला| तरी मारमारूं शाहाणा केला |
लोकिकीं नेटका जाला| नांव राखे ऐसा ||३४||

पुढें मायबापीं लोभास्तव| संभ्रमें मांडिला विव्हाव |
दाऊनियां सकळ वैभव| नोवरी पाहिली ||३५||

वऱ्हाडीवैभव दाटलें| देखोन परमसुख वाटले |
मन हें रंगोन गेलें| सासुरवाडीकडे ||३६||

मायबापीं भलतैसें असावें| परी सासुरवाडीस नेटकें जावें |
द्रव्य नसेल तरी घ्यावें| रुण कळांतरें ||३७||

आंतर्भाव ते सासुरवाडीं| मायेबापें राहिलीं बापुडीं |
होताती सर्वस्वें कुडकुडीं| तितुकेंच कार्य त्यांचें ||३८||

नोवरी आलियां घरा| अती हव्यास वाटे वरा |
म्हणे मजसारिखा दुसरा| कोणीच नाहीं ||३९||

मायबाप बंधु बहिणी| नोवरी न दिसतां वाटे काणी |
अत्यंत लोधला पापिणीं| अविद्येनें भुलविला ||४०||

संभोग नस्तां इतुका प्रेमा| योग्य जालिया उलंघी सीमा |
प्रीती वाढविती कामा- | करितां प्राणी गुंतला ||४१||

जरी न देखे क्षण येक डोळां| तरी जीव होय उताविळा |
प्रीतीपात्र अंतर्कळा| घेऊन गेली ||४२||

कोवळे कोवळे शब्द मंजुळ| मर्यादा लज्या मुखकमळ |
वक्त्रलोकनें केवळ| ग्रामज्याचे मैंदावें ||४३||

कळवळा येतां सांवरेना| शरीर विकळ आवरेना |
अनेत्र वेवसाईं क्रमेना| हुरहुर वाटे ||४४||

वेवसाय करितां बाहेरी| मन लागलेंसे घरीं |
क्षणाक्षणां अभ्यांतरीं| स्मरण होये कामिनीचें ||४५||

तुम्हीं माझिया जिवांतील जीव| म्हणौनी अत्यंत लाघव |
दाऊनियां चित्त सर्व| हिरोन घेतलें ||४६||

मैद सोइरीक काढिती| फांसे घालून प्राण घेती |
तैसें आयुष्य गेलियां अंतीं| प्राणीयांस होये ||४७||

प्रीति कामिनीसीं लागली| जरी तयेसी कोणी रागेजली |
तरी परम क्षिती वाटली| मानसीं गुप्तरूपें ||४८||

तये भार्येचेनि कैवारें| मायेबापासीं नीच उत्तरें |
बोलोनियां तिरस्कारें| वेगळा निघे| ४९||

स्त्रीकारणें लाज सांडिली| स्त्रीकारणें सखीं सोडिलीं |
स्त्रीकारणें विघडिलीं| सकळहि जिवलगें ||५०||

स्त्रीकारणें देह विकिला| स्त्रीकारणें सेवक जाला |
स्त्रीकारणें सांडविला| विवेकासी ||५१||

स्त्रीकारणें लोलंगता| स्त्रीकारणें अतिनम्रता |
स्त्रीकारणें पराधेनता| अंगिकारिली ||५२||

स्त्रीकारणें लोभी जाला| स्त्रीकारणें धर्म सांडिला |
स्त्रीकारणें अंतरला| तीर्थयात्रा स्वधर्म ||५३||

स्त्रीकारणें सर्वथा कांहीं|  शुभाशुभ विचारिलें नाहीं |
तनु मनु धनु सर्वही| अनन्यभावें अर्पिलें ||५४||

स्त्रीकारणें परमार्थ बुडविला| प्राणी स्वहितास नाडला |
ईश्वरीं कानकोंडा जाला| स्त्रीकारणें कामबुद्धी ||५५||

स्त्रीकारणें सोडिली भक्ती| स्त्रीकारणें सोडिली विरक्ती |
स्त्रीकारणें सायोज्यमुक्ती| तेहि तुछ्य मानिली ||५६||

येके स्त्रियेचेनि गुणें| ब्रह्मांड मानिलें ठेंगणें |
जिवलगें तीं पिसुणें| ऐसीं वाटलीं ||५७||

ऐसी अंतरप्रीति जडली| सार्वस्वाची सांडी केली |
तंव ते मरोन गेली| अकस्मात ||५८||

तेणें मनीं शोक वाढला| म्हणे थोर घात जाला |
आतां कैंचा बुडाला| संसार माझा ||५९||

जिवलगांचा सोडिला संग| अवचिता जाला घरभंग |
आतां करूं मायात्याग| म्हणे दुःखें ||६०||

स्त्री घेऊन आडवी| ऊर बडवी पोट बडवी |
लाज सांडून गौरवी| लोकां देखतां ||६१||

म्हणे माझें बुडालें घर| आतां न करी हा संसार |
दुःखें आक्रंदला थोर| घोर घोषें ||६२||

तेणें जीव वारयावेघला| सर्वस्वाचा उबग आला |
तेणें दुःखें जाला| जोगी कां महात्मा ||६३||

कां तें निघोन जाणें चुकलें| पुन्हां मागुतें लग्न केलें |
तेणें अत्यंतचि मग्न जालें| मन द्वितीय संमंधीं ||६४||

जाला द्वितीय संमंध| सवेंचि मांडिला आनंद |
श्रोतीं व्हावें सावध| पुढिले समासीं ||६५||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास दुसरा ||||३. २


प्रथम तान्हेपणाचें वर्णन :
हि सर्व दृश्यरूप सृष्टी दु:खाचें मूळ आहे. अर्थात माणूस जगांत जन्मास आला कीं तो दृश्य विश्वाचा भाग होतो. मग दु:खाचे निखारे त्याच्या देहाला चटके देतात. मागच्या समासांत गर्भवासातील यातनाचें वर्णन सांगितलें. जन्म झाल्यानंतर गर्भवासांतील यातना मूळ विसरते. पुढें दिवसेंदिवस तें वाढूं लागतें. तान्हेपणीं त्वचा अगदी नाजूक असते. जरा कांही दु:ख झालें कीं तें मूल व्याकूळ होतें. पण आपल्याला होणारेम सुखदु:ख त्याला शब्दांनीं सांगतां येत नाहीं. देहाला कांहीं दु:ख झालें किंवा भूक लागली म्हणजे तें मूल मोठ्यानें रडतें. परंतु त्याला अंतरी काय दु:ख होत आहे हेम कांहीं आईला कळत नाहीं. आई त्याला जवळ घेते व कुरवाळते. पण हा बाहेरून उपाय होतो. त्याच्या अंतर्यामीं काय दु:ख आहे हें कांहीं आईला बरोबर कळत नाहीं. तें मूल पुन्हा पुन्हा हुंदके देतें व रडतें. आई त्याला कडेवर घेऊन रडें थांबविण्याचा प्रयत्न करते. पण त्यःची पीडा, व्यथा न कळल्यानें मूल बिचारें तळमळतच राहतें.   

अनेक रोगांचा जोर होऊन त्यांच्या दु:खानें त्या पोराचा जीव खालीवर होतो. तें पोर रडतें, पडतें किंवा कधीं विस्तवानें पोळतें. आपल्या शरीराचें रक्षण करतां येत नाहीं म्हणून नाना प्रकारचे अपाय त्या मुलाला सोसावे लागतात. खोड्या करताना अपाय होऊन हात, पाय किंवा एखादा अवयव गमविण्याचा प्रसंग येतो.
 
मूल आईला ओळखूं लागते व तिच्याशिवाय त्याला क्षणभर करमत नाहीं. :
पण पूर्वपुण्य समोर उभें राहिलें आणि असले अपाय चुकले. मग मूल हळूहळूं आईला अधिकाधिक ओळखूं लागतें. क्षणभर सुद्धां आई दिसेनाशी झाली तर मूल दु:खानें रडतें व ओरडतें. त्या वयामध्यें आईशिवाय दुसरें कांहींच त्याला महत्वाचें वाटत नाहीं, आवडत नाहीं. तें मोठ्या आशेनें आईची वात पाहतें, केव्हांही आईपासून दूर राहात नाहीं. आणि एकदां आईची आठवण झाली कीं मग क्षणभर देखील तिचा वियोग त्याला सहन होत नाहीं. ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीनें प्रेमानें बोलविलें तरी आईवांचून दुसरे कोणी त्याची समजूत घालूं शकत नाहीं. आई कुरूप असो, हीनलक्षणी असो अथवा सर्वांपेक्षा दुर्दैवी असो, त्या मुलाला जगांत तिच्यासारखे दुसरे कोणी नसते. आई नसेल तर तें पोर केविलवाणें होतें व दिन दिसतें. आईंने रागावून त्याला दूर सारलें तरी मोठ्यानें रडून तें तिलाच मिठी मारतें. आईपाशींच त्या मुलाचें सर्व सुख केंद्रित असतें. आईपासून दूर झालें कीं ते तळमळू लागतें. अशा रीतीनें त्या काळांत आईवर अत्यंत प्रेम जडलेलें असतें.

मातेच्या वियोगाचें दु:ख होतें त्याचें वर्णन :
अशा अवस्थेंत आई मरण पावली. ते मूल पोरकें झालें. " आई, आई " असें म्हणत दु:खानें तें झुरणीस लागलें. तें आईला शोधतें पण ती कांहीं दिसत नाहीं. दीनवाणें होऊन तें लोकांकडे बघतें. आई येऊन आपल्याला भेटेल अशी आशा त्याच्या मनाला वाटते. आपली आई समजून एखाद्या बाईच्या तोंडाकडे तें पहातें. पण ती आपली आई नाहीं हे त्याला उमगतें. मग तें हिरमुसलें होऊन दिन बनतें. आईच्या वियोगानें त्याला कष्ट होतात. त्याचें मन दु:खीकष्टी राहतें. त्यामुळें त्याचा देहदेखील अतिशय रोडावतो. 

पण सुदैवाने आई जगली. मग तें मूल आणखी वाढलें कीं त्याचें सगळें लक्ष खेळण्याकडे लागतें. त्यांत अपघात होतात त्यांचें वर्णन. :
समजा आई जिवंत राहिली आणि दोघांची भेट झाली. मग दिवसेंदिवस त्या पोराचें बालपणही संपत जातें. बालपण मागें पडलें कीं दिवसेंदिवस पोर शहाणें होत जातें. मग आईवर जेम प्रेम जडलेलें असतें तितकें तें राहात नाहीं. मग पोराला खेळण्याचा नाद किंवा छंद लागतो. मुलांचा मेला जमवून खेळ खेळण्यांत तो रमतो. त्यामध्यें डाव जिंकला तर आनंद व हरला तर दु:ख असें सुखदु:ख होऊं लागतें. आईबाप मनापासून त्याला शिकवतात पण त्याला तें आवडत नाहीं, त्याचें त्याला अतिशय वाईट वाटतें, पोरांच्या बरोबर खेळायची लागलेली चटक कांहीं केल्या सुटत नाहीं. 

मुलांच्यामध्यें खेळत असतां त्याला आईबापांची मुळींच आठवण होत नाही. परंतु त्या खेळण्यांत अचानक दु:ख ओढवतें. कुठें दांतच पडतात, डोळाच फुटतो, पायच मोडतो व लंगडा होतो. मग मात्र मस्ती ज्र्ते आणि शरीराला व्यंग झाल्यानें कुरूपता येते. 

ताप, देवी, गोवर असले आजार होतात. त्यांतून मोठ्या कष्टानें तो वांचला तर त्याला चोप देऊन देऊन आईबाप शहाणा करतात. :
पुढें त्या पोराला देवी निघतात, किंवा गोवर येतो, किंवा डोकेदुखी जडते, किंवा सारखा ताप येतो, किंवा पोटशूळ उठून वायगोळा उठतो. या रोगांचें कारण काय याबद्दल लोक तर्क करू लागतात. कोणी म्हणतो त्याला भुतानें झपाटलें आहे, कोणी म्हणतो पाण्यांतील मेसको मायराणीनें धरलें आहे. कोणी म्हणतो मुंज्या, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बांधली आहे. कोणी म्हणतो वेताळ खंकाळ लागता, कोणी म्हणतो ब्रह्मसमंध संचरल, कोणी म्हणतो मंतरलेली वस्तु ओलांडली काय, कांहीं कळत नाहीं.

कोणी म्हणतो वीरदेव, कोणी म्हणतो खंडेराव तर कोणी म्हणतो हें सगळें खोटें, त्याला खरा ब्रह्मसमंध लागला आहे. कोणी म्हणतो कीं मंत्र वापरून त्याच्या अंगात एखादी देवता सोडली आहे तर कोणी म्हणतो त्याचा देहाला हे नानाप्रकारचे रोग जडले आहेत. त्यासाठीं चांगले वैद्य व मांत्रिक बोलावून ओषधपाणी चालूं होतें. कोणी म्हणतो हा कांहीं जगत नाहीं, कोणी म्हणतो हा कांहीं मरत नाहीं. कारण पूर्वीचें पाप असल्यामुळें यातनांच्या रूपानें तो भोग भोगीत आहे. माणूस गर्भवासाचें दु:ख जरी विसरला तरी जीवनांमध्यें त्रिविधतापांनीं पोळला जातोच. एकंदर या संसाराच्या दु:खांनीं माणसाला फार यातना सोसाव्या लागतात. या इतक्या सगळ्या भानगडींतून, अडचणींतून माणूस वाचलाच तर विद्या येण्यासाठीं त्याचे आईबाप त्याला मार मारून शहाणा करतात. लोकांत आपलें नांव राखील असा तो चांगला बनतो.       

विद्या कमविली, मुलगा वयांत आला, चांगला वागूं लागला म्हणून आईबापांनीं चांगली मुलगी पाहून लग्न केलें. लग्न झाल्यावर मुलाची वृत्ती कशी पालटते यांचें सुंदर वर्णन येथें आढळतें :-
पुढें आईबापांनीं संसाराच्या लोभामध्यें गुंतून मोठ्या उत्सुकतेनें व थाटानें त्याचें लग्न उभें केलें. आपला सगळा पैसा अडका दाखवून मुलाला मुली पसंत केली. आपापलें वैभव घेऊन खूप वर्‍हाडी लग्नासाठीं जमलें, लग्नाचा थाट पाहून नवरदेवाचें मनाला अत्यानंद झला. व तें सासुरवाडीकडे रंगून गेलें. आईबाप कशाही हीन किंवा दीन परिस्थितींत असेनात कां, सासुरवाडीला आपण नीटनेटकें गेलें पाहिजे असा विचार करून जवळ पैसा नसेल तर व्याजानें कर्ज काढून तो सासरीं थाटानें जातो. आंतून त्याचा सगळा जीव सासुरवाडीकंडे गुंतलेला असतो. आईबाप बिचारे दीन असहाय होऊन घरांत राहतात. ते सर्व बाजूंनीं नाडले जातात. जणूं काय त्यांच्या जीवनाचें तेवढेचं कार्य होतें आणि संपलें.

आता कामवासनेच्या आधीन गेलेल्या तरुण विवाहित माणसाचें श्री समर्थ वर्णन करतात. त्यांत अतिशयोक्ति आहे असें वाटण्याचें मुळींच कारण नाहीं. आज देखील तशी माणसे आढळतात. :
बायको घरीं आली कीं त्या तरुण मुलाला ती सारखी हवीहवीशी वाटते. आपल्या सारखा दुसरा कोणी सुखी नाहीं असें तो समजतो. एक बायको घरांत नसली तर आईबाप, भाऊ, बहिणी, असून देखील तो खिन्न होतो. आपल्या बायकोमध्यें तो इतका गुंतून जातो. पापी अविद्या त्यास अगदी संपूर्णपणें भुलवून टाकतें. स्त्री वयांत आली नसतां तो इतकें प्रेम करतो तर मग ती वयांत येऊन स्त्रीसुख मिळूं लागल्यावर त्याच्या वागण्यास मर्यादा राहात नाहीं हें स्वाभाविकच आहे. तिच्या प्रीतीनें त्याची कामवासना वाढत जातें. अशा रीतीनें मनुष्य त्यांत गुरफटतो. बायको क्षणभर नजरेआड झाली तर तिला पहायला तो उतावीळ होतो. प्रेमाच्या बायकोनें त्याचा विवेक हिरावून नेल्यासारखी अवस्था होते. तिचे ते गोड व मंजुळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमळासारखा सुरेख चेहरा यांनीं तो तरुण भुलतो. नुसतें तिचें तोंड पाहिलें तरी संभोगाच्या विचारांनीं मन भरून जातें. तिच्याबद्दल प्रेमाची लहर आली कीं मन ताब्यांत राहात नाहीं, विषय सेवनानें आलेला शरीराचा शिथिलपणा आवरत नाहीं. इतर कांहीं व्यवसाय करावा म्हटलें तर त्यांत मना रमत नाहीं. सारखी तिची हुरहूर लागते. बाहेर उद्योगधंदा करीत असतां त्याचें मन घरीं असलेल्या स्त्रीपाशीं गुंतलेलें असतें. क्षणोक्षणीं मनामध्यें आपल्या स्त्रीचें स्मरण त्याला होत राहतें.

" तुम्ही मला माझ्या जीवापेक्षांही अधिक आवडतां " असें म्हणत स्त्री अत्यंत लडिवाळपणा दाखविते. आणि अशा गोड वागण्यानें त्याचें सगळें मन आपल्याकडे ओढून घेते. लबाड ठग लोक प्रथम एखादें नातें जोडून माणसाला वश करून घेतात, मग गळ्याला फांस लावून त्याचा प्राण घेतात. त्याप्रमाणें मरण जवळ आलें कीं, आयुष्य संपलें कीं माणसाची अवस्था होते.

बायकोवर त्याचें फार प्रेम जडतें. तिला जर कोणी रागावलें तर त्याला मनांतून फार वाईट वाटतें. तो तें बाहेर दाखवीत नाहीं इतकेंच. बायकोची बाजू घेऊन तो आईबापांना शिवीगाळ करतो, वाटेल तसें बोलतो. शेवटीं तिरस्कारानें तो वेगळा निघतो. 

एका काम वासनेच्या पायीं माणसाचा कसा अध:पात होतो याचें वर्णन श्री समर्थ करतात. :
स्त्रिकरिता त्यानें लाज सोडली, मित्र दूर केले, तिच्या पायीं सर्व जवळचे नातेवाईकांशी संबंध बिघडविलें. स्त्रीकरितां त्यानें आपला देह जणूं काय विकला, तिच्यासाठीं नोकर बनला, तिच्या आधीन होऊन आपला विवेक गमावला, विवेकभ्रष्ट झाला. स्त्रिसाठीं तो लंपट होतो, अतिशय नम्रता धारण करतो, तिच्यासाठी दुसर्‍याचा ताबेदार बनतो. स्त्रिसाठीं तो लोभी बनतो, धर्म सोडतो, तीर्थयात्रा, नित्यकर्म या गोष्टी करुं शकत नाहीं. स्त्रिसाठीं कधींही चांगल्यावाईटाचा विचार केला नाहीं. तन, मन, धन हें सगळें त्यानें अगदी मनापासून तिच्यासाठीं वाहून टाकिलें. स्त्रिसाठीं त्यानें परमार्थ बुडविला. तो स्वत:च्या कल्याणाला मुकला. स्त्रिच्यामुळें विषयवासना वाढली आणि अखेर ईश्वराकडे जाण्याची लाज वाटूं लागली. स्त्रिकरितां त्यानें भक्ति सोडली, विरक्ति सोडली, इतकेंच नव्हे तर सायुज्यमुक्ति देखील स्त्रिपुढें तुच्छ मानली. एक स्त्रिच्या नादीं लागून त्यानें सगळें ब्रह्मांड कमी योग्यतेचें मानलें. प्रेमाचें नातेवाईक त्याला शत्रूप्रमाणें वाटूं लागले.

अशा प्रकारचें अत्यंत स्त्रिआधीन जीवन जगत असतां ती मृत्यू पावते. तो वियोगदु:खानें जणूं काय वेडा होतो. तो बैरागीच व्हायचा पण कांहीं कारणानें घरीं थांबतो. मग दुसरें लग्न करतो. :    
स्वत:च्या बायकोबरोबर अशा रीतीचें त्याचें प्रेम अत्यंत आंतून जडलेलें असतें. त्याच्या पायीं त्यानें सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. दुर्दैवाने ती बायको मरण पावते. तिच्या मृत्यूनें तो फार शोक करतो. तो म्हणतो कीं, " माझा फार मोठा घात झाला, आतां कसला संसार, माझा संसार बुडाला. " जिवलग माणसांचा सहवास सोडला आणि वेगळें घर केलें. तर एकाएकी घर मोडलें. मग दु:खानें तो म्हणतो कीं, " आतां या मायेच्या जाळ्याचा त्याग करुं ! " स्त्रिचें प्रेत आडवे मांडीवर घेऊन तो छाती आणि पोट बद्वितो. लाज सोडून सर्व लोकांसमोर बायकोची स्तुति करतो. दु:खानें फार मोठा आवाज काढून ढसाढसा रडतो आणि म्हणतो कीं, " माझें घर बुडालें. आतां यापुढें मी संसार करणार नाहीं. " वात झालेल्या माणसाप्रमाणें तो भ्रमिष्टासारखा वागूं लागला. सगळ्या गोष्टींचा त्याला कंटाळा आला. त्या दु:खामुळें अंगाला राख फासून जोगी खाला किंवा दीक्षा घेऊन साधु बनला.

पण कांहीं कारणानें घरांतून निघून जाणें झालें नाहीं. मग पुन: दुसरें लग्न केलें. दुसर्‍या बायकोमध्यें त्याचें मन अतिशय रमून गेलें. दुसरें लग्न केल्याबरोबर लगेच आनंदाला भारती आली. 

पुढील समास ऐकण्यासाठीं आतां श्रोत्यांनीं सावध व्हावें.