श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Saturday, February 12, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास तिसरा : स्वगुणपरीक्षा ब ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास तिसरा : स्वगुणपरीक्षा ||

||श्रीराम ||

द्वितीय संमंध जाला| दुःख मागील विसरला |
सुख मानून राहिला| संसाराचें ||||

जाला अत्यंत कृपण| पोटें न खाय अन्न |
रुक्याकारणें सांडी प्राण| येकसरा ||||

कदा कल्पांतीं न वेची| सांचिलेंचि पुन्हा सांची |
अंतरीं असेल कैंची| सद्वासना ||||

स्वयें धर्म न करी| धर्मकर्त्यासहि वारी |
सर्वकाळ निंदा करी| साधुजनाची ||||

नेणे तीर्थ नेणे व्रत| नेणे अतित अभ्यागत |
मुंगीमुखींचें जें सीत| तेंही वेंचून सांची ||||

स्वयें पुण्य करवेना| केलें तरी देखवेना |
उपहास्य करी मना- | नये म्हणौनी ||||

देवां भक्तांस उछेदी| आंगबळें सकळांस खेदी |
निष्ठुर शब्दें अंतर भेदी| प्राणीमात्रांचें ||||

नीति सांडून मागें| अनीतीनें वर्तों लागे |
गर्व धरून फुगे| सर्वकाळ ||||

पूर्वजांस सिंतरिलें| पक्षश्राद्धहि नाहीं केलें |
कुळदैवत ठकिलें| कोणेपरी ||||

आक्षत भरिली भाणा| दुजा ब्राह्मण मेहुणा |
आला होता पाहुणा| स्त्रियेस मूळ ||१०||

कदा नावडे हरिकथा| देव नलगे सर्वथा |
स्नानसंध्या म्हणे वृथा| कासया करावी ||११||

अभिळाषें सांची वित्त| स्वयें करी विस्वासघात |
मदें मातला उन्मत्त| तारुण्यपणें ||१२||

तारुण्य आंगीं भरलें| धारिष्ट न वचे धरिलें |
करूं नयें तेंचि केलें| माहापाप ||१३||

स्त्री केली परी धाकुटी| धीर न धरवेचि पोटीं |
विषयलोभें सेवटीं| वोळखी सांडिली ||१४||

माये बहिण न विचारी| जाला पापी परद्वारी |
दंड पावला राजद्वारीं| तऱ्हीं पालटेना ||१५||

परस्त्री देखोनि दृष्टीं| अभिळाष उठे पोटीं |
अकर्तव्यें हिंपुटी| पुन्हां होये ||१६||

ऐसें पाप उदंड केलें| शुभाशुभ नाहीं उरलें |
तेणें दोषें दुःख भरलें| अकस्मात आंगीं ||१७||

व्याधी भरली सर्वांगीं| प्राणी जाला क्षयरोगी |
केले दोष आपुले भोगी| सीघ्र काळें ||१८||

दुःखें सर्वांग फुटलें| नासिक अवघेंचि बैसलें |
लक्षण जाऊन जालें| कुलक्षण ||१९||

देहास क्षीणता आली| नाना वेथा उद्भवली |
तारुण्यशक्ती राहिली| खंगला प्राणी ||२०||

सर्वांगीं लागल्या कळा| देहास आली अवकळा |
प्राणी कांपे चळचळां| शक्ति नाहीं ||२१||

हस्तपादादिक झडले| सर्वांगीं किडे पडिले |
देखोन थुंकों लागले| लाहानथोर ||२२||

जाली विष्टेची सारणी| भोवती उठली वर्ढाणी |
अत्यंत खंगला प्राणी| जीव न वचे ||२३||

आतां मरण दे गा देवा| बहुत कष्ट जाले जीवा |
जाला नाहीं नेणों ठेवा| पातकाचा ||२४||

दुःखें घळघळां रडे| जों जों पाहे आंगाकडे |
तों तों दैन्यवाणें बापुडें| तळमळी जीवीं ||२५||

ऐसे कष्ट जाले बहुत| सकळ जालें वाताहात |
दरवडा घालून वित्त| चोरटीं नेलें ||२६||

जालें आरत्र ना परत्र| प्रारब्ध ठाकलें विचित्र |
आपला आपण मळमूत्र| सेविला दुःखें ||२७||

पापसामग्री सरली| देवसेंदिवस वेथा हरली |
वैद्यें औषधें दिधलीं| उपचार जाला ||२८||

मरत मरत वांचला| यास पुन्हां जन्म जाला |
लोक म्हणती पडिला| माणसांमध्यें ||२९||

येरें स्त्री आणिली| बरवी घरवात मांडिली |
अति स्वार्थबुद्धी धरिली| पुन्हां मागुती ||३०||

कांहीं वैभव मेळविलें| पुन्हां सर्वही संचिलें |
परंतु गृह बुडालें| संतान नाहीं ||३१||

पुत्र संतान नस्तां दुःखी| वांज नांव पडिलें लोकिकीं |
तें न फिटे म्हणोनी लेंकी| तरी हो आतां ||३२||

म्हणोन नाना सायास| बहुत देवास केले नवस |
तीर्थें व्रतें उपवास| धरणें पारणें मांडिलें ||३३||

विषयसुख तें राहिले| वांजपणें दुःखी केलें |
तंव तें कुळदैवत पावलें| जाली वृद्धी ||३४||

त्या लेंकुरावरी अतिप्रीति| दोघेहि क्षण येक न विशंभती |
कांहीं जाल्या आक्रंदती| दीर्घस्वरें ||३५||

ऐसी ते दुःखिस्ते| पूजीत होती नाना दैवतें |
तंव तेंहि मेलें अवचितें| पूर्व पापेंकरूनी ||३६||

तेणें बहुत दुःख जालें| घरीं आरंधें पडिलें |
म्हणती आम्हांस कां ठेएविलें| देवें वांज करूनी ||३७||

आम्हांस द्रव्य काये करावें| तें जावें परी अपत्य व्हावें |
अपत्यालागी त्यजावें| लागेल सर्व ||३८||

वांजपण संदिसें गेलें| तों मरतवांज नांव पडिलें |
तें न फिटे कांहीं केलें| तेणें दुःखें आक्रंदती ||३९||

आमुची वेली कां खुंटिली| हा हा देवा वृत्ती बुडाली |
कुळस्वामीण कां क्षोभली| विझाला कुळदीप ||४०||

आतां लेंकुराचें मुख देखेन| तरी आनंदें राडी चालेन |
आणी गळही टोंचीन| कुळस्वामिणीपासीं ||४१||

आई भुता करीन तुझा| नांव ठेवीन केरपुंजा |
वेसणी घालीन, माझा- | मनोरथ पुरवी| ४२||

बहुत देवांस नवस केले| बहुत गोसावी धुंडिले |
गटगटां गिळिले| सगळे विंचू ||४३||

केले समंधास सायास| राहाणे घातलें बहुवस |
केळें नारिकेळें ब्राह्मणास| अंब्रदानें दिधलीं ||४४||

केलीं नाना कवटालें| पुत्रलोभें केलीं ढालें |
तरी अदृष्ट फिरलें| पुत्र नाहीं ||४५

वृक्षाखालें जाऊन नाहाती| फळतीं झाडें करपती |
ऐसे नाना दोष करिती| पुत्रलोभाकारणें ||४६||

सोडून सकळ वैभव| त्यांचा वारयावेधला जीव |
तंव तो पावला खंडेराव| आणी कुळस्वामिणी ||४७||

आतां मनोरथ पुरती| स्त्रीपुरुषें आनंदती |
सावध होऊन श्रोतीं| पुढें अवधान द्यावें ||४८||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास तिसरा ||||३. ३

नव्या संसारात त्याचें मन रमूं लागतें खरें पण तो पैशांसाठीं प्राण टाकतो. त्यापुढें तो देवधर्म कांहीं मानीत नाही. :
दुसरें लग्न केलें. त्यानंतर तो मागचें दु:ख विसरला. संसारात सुख आहे अशी समजूत करून घेऊन तो दिवस घालवूं लागला. तो आतां अतिशय कंजूष झाला, पोटभर अन्न देखील खाईना. पैशासाठीं प्राण टाकूं लागला. जग बुडायचा प्रसंग आला तरी पैसा खर्च करीना, सांठविलेल्या पैशात सारखी भर घालूं लागला. अशी त्याची वृत्ति झाल्यामुळें त्याच्या अंतर्यामीं चांगली वासना टिकणें अहक्य झालें. स्वत: धर्मपालन करीना, दुसरा करुं लागला तर त्याला करुं देईना. सदासर्वकाळ सत्पुरुषांची व सज्जनांची निंदा करणें हाच त्याचा व्यवसाय झाला. तीर्थ, व्रत, अतिथी, अभ्यागत कांहीं ओळखीना, मुंगीच्या तोंडात जर धान्याचा कान दिसला तर ते सुद्धां वेंचून सांठवूं लागला. त्याला स्वत: पुण्य करण्याची बुद्धि होईना, दुसरा करुं लागला तर तें पाहवेना. आपल्याला आवडत नाहीं म्हणून करणार्‍याची चेष्टा करू लागला.

तो देवाला व भक्तांना खोटें मानूं लागला. अंगामधील शक्तीनें लोकांस दु:ख देऊं लागला, कठोर शब्द बोलून माणसांच्या अंत:करणाला यातना देऊं लागला. नीतीला बाजूला सारून तो अनीतीनें वागूं लागला, आणि सदा अभिमानानें फुगून वागूं लागला. त्यानें पूर्वजांना फसविलें, त्यांचें श्राद्ध पक्ष करीनासा झला. कांहीं तरीं युक्ति काढून त्यानें कुलदैवतालाही फसविलें, कुलाचार पाळीनासा झाला. एखाद्या कुलधर्मासाठीं सुवासिनी हवी होती. माहेरपणाला आलेल्या बहिणीलाच आक्षत म्हणजे आमंत्रण दिलें. बायकोला न्यायला आलेल्या मेहुण्यालाच ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिलें. अशा रीतीनें खर्च वाचवूं लागलां. त्याला हरिकथा आवडेनाशी झाली. देव तर मुळींच नको झाला. उगीच स्नानसंध्या कशाला करायची असें तो म्हणे.

तरुण वय आणि जवळ पुष्कळ पैसा सांठला. तो कामवासनेने बेफाम झाला आणि बाहेरख्याली झाला. :
लोकांचा विश्वासघात करून लोभानें त्यानें द्रव्य सांठविले. तारुण्याच्या मस्तीनें तो उन्मत्त झाला. तारुण्याचा भर अंगीं भरल्यानें धैर्यानें मन आवरून घरणें त्याला अशक्य झालें आणि मग जें करुं नये तें महापाप त्यानें केलें. नवी बायको केली खरी पण ती वयानें लहान होती. याला तर धीर धरवेना. शेवटीं स्त्रीसुखाच्या पायीं कोणास ओळखीनासा झाला. आई बहिण यांच्याप्रमाणें संबंध असणार्‍या स्त्रियांबद्दल देखील तो विचार करीनासा झाला. तो पापी वेश्यागमनी झाला. भलत्याच स्त्रीच्या मागें लागल्यामुळें त्याला सरकारनें शिक्षा दिली तरी त्याची संवय कांहीं जाईना. एखादी स्त्री नजरेंस पडली कीं ती आपल्याला हवी अशी वासना त्याला होई. पण ती प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळें त्याला दु:ख होई. तो हिरमुसला होई. अशा रीतीनें त्यानें खूप पाप केलें, चांगलें वाईट कांहीं उरलेंच नाहीं. त्या व्यसनानें एकाएकी त्याच्या अंगीं दु:ख भरलें.

त्याला उपदंशासारखे रोग झाले व रोगाचा जोर झाल्यामुळें त्याची अत्यंत दैनावस्था झाली. सर्वांगात किडे पडले, उठून बसण्याची शक्ति उरली नाहीं. अशा अवस्थेंत दरोडा पडून गांठीचा सगळा पैसा गेला. मग औषध लागूं पडून एकदांचा तो बर झाला. 
त्याच्या सर्व शरीरभर रोग पसरला, त्याला क्षयरोग झाला. आपण केलेल्या पापाची फळें लवकरच भोगण्याची पाळी आली.      
रोगानें सारें शरीर फुटलें म्हणजे सार्‍या अंगावर फोड उठले, त्याचें नाक झडलें, आणि सुरेखपणा जाऊन तो कांहींतरीच दिसूं लागला. त्याचा देह अगदी क्षीण झाला. त्याला नाना रोग उद्भवले. तारुण्याचा जोम नाहींसा झाला आणि तो अगदी खंगून गेला. त्याच्या सर्वांगाला कला लागल्या, देह अगदी कळाहीन झाला, शक्ति न उरल्यामुळें त्याच्या शरीरांत कंप भरला. त्याचे हातपाय वगैरे अवयव झाडले, सर्वांगामध्यें किडे पडले. त्याची हि अत्यंत घाणेरडी अवस्था पाहून लहान मोठी माणसे शिसारीनें थुंकूं लागली. त्यांत त्याला जुलाब सुरूं झाले, त्यामुळें त्याच्या आसपास फार घन पसरली. तो अतिशय खंगला पण त्याचा जीव कांहीं जाईना. तो म्हणूं लागला कीं, " देवा, आतां मरण येऊं दे. जीवाला यातना झाल्या. माझ्या पापांचा सांठा अजून संपला नाहीं का ? " असें म्हणून जेव्हां जेव्हां तो स्वत:च्या शरीराकडे पाही तेव्हां तेव्हां त्याची दारूण दशा पाहून दु:खानें घळाघळां रडूं लागला. अत्यंत दीनवाणा होऊन बिचारा मनांत तडफडूं लागला.

अशा प्रकारे त्याला फार कष्ट झाले. घरांतील सगळ्याची वाताहात झाली. उरलेला पैसा चोरांनीं दरवडा घालून लुटून नेला. धड इहलोक ना परलोक अशी अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला. स्वत:च्या मलमुत्राचें स्वत:च सेवन करण्याची पाळी आली. तेवढ्यांत त्याच्या पापकर्माचा भोग संपला. दिवसेंदिवस रोग कामो होत गेला. वैद्यांनीं औषधें दिलीं, उपचारदेखील केले. तो मरता मरता वाचला, जणूं काय त्याचा पुनर्जन्मच झाला. लोक म्हणूं लागले कीं हा पुन्हा माणसांत आला.

बायको वयांत आली, तिला आणून पुन: संसार थाटला. मग मुल व्हावें म्हणून तळमळ लागली. :
मग त्यानें बायको आणली. घरामध्यें व्यवस्थित दिवा लागूं लागला. पण त्यानें पुन्हा अत्यंत स्वार्थीपणानें वागायला आरंभ केला. त्यानें कांहीं संपत्ति मिळविली, सर्व चीजवस्तू गोळा केली. परंतु मुलबाळ नाहीं, घर बुडाल्यासारखें आहे अशी चिंता लागली. आधीच मुलबाळ नाहीं हें एक दु:ख त्यांत लोक वांझ म्हणूं लागलें त्याचें दु:ख होऊं लागलें. तो अपवाद जावा म्हणून निदान मुलगी तरी व्हावी असें मनांत आलें.

त्यासाठीं खूप खटपट केली. पुष्कळ देवांना नवस केले, तीर्थे, व्रतें, उपासतापास, धरणें, पारणें यांचा सपाटा लाविला. संभोगसुख बाजूलाच राहिले, वांझपणानें दोघांना कष्टी केलें. इतक्यांत कुलदेवता प्रसन्न झाली आणि शेवटीं एकदाचें मुल झालें. त्या मुलावर दोघांचें अत्यंत प्रेम जडलें, पोराला क्षणभर देखील नजरेआड होऊं देत नव्हते. त्याला जरा कांहीं झालें कीं दोघेही मोठ्यानें रडायला लागत. अशी तीं दु:खी दोघें अनेक दैवतांची पूजा करीत. पण पूर्वीच्या कांहीं पापामुळें ते मुल अचानक मारून गेलें. त्यामुळें त्यांना फार दु:ख झालें, घरामध्यें जणूं अंधार पसरला. मग ते म्हणूं लागले कीं, " देवा आम्हाला वांझ करून कशाला जिवंत ठेवलें आहेस ! आम्हाला हा पैसा काय करायचा आहे ! पैसा सगळा जाऊं दे, पण मुलबाळ होऊं दे. मुलासाठीं हें सारें सोडलें तरी चालेल. "

एक पोर झाल्यानें वांझपणा गेला होता. पण तें मेल्यानें मरतवांझ म्हणजे जिचीं पोरें वाचत नाहींत अशी वांझ हें नांव पडलें. तें कांहीं केल्या जात नाहीं. त्या दु:खानें दोघेजण पुन्हा रडूं लागले.


श्री समर्थांच्या काळचे चांगले समजूतदार लोक मुलबाळ होण्यासाठीं काय काय प्रकार करीत त्याचें वर्णन पुढील सातआठ ओव्यांमध्यें आढळतें. : आमचा वंशवेल कां तुटला ! हायरे देवा, आमचें निर्वाहसाधन बुडालें, आमची कुलस्वामिनी आमच्यावर काम रागावली ? तिनें आमच्या कुलाचा दिवा मालविला. आम्हाला जर पुत्रमुख पहायला मिळालें तर मी मोठ्या खुषीनें निखार्‍यावरून चालत जाईन, आणि कुलस्वामिनीसमोर गळ टोचून घेईन. आई, त्या मुलाला मी तुला वाहीन आणि तुझा भुत्या करीन, केरपुंजा त्याचें नाव ठेवीन, त्याचा नाकांत वेसण घालीन. पण मुलगा व्हावा हि माझी इच्छा पूर्ण कर.

अशा रीतीनें पुष्कळ देवांना नवस केले, पुष्कळ गोसावी, बैरागी शोधले, त्यांचे उपाय केले, सबंध विंचू गटारात गिळले. समंधाना प्रसन्न करण्यासाठीं प्रयंत्न केले, अंगांत देवतासंचार करून घेतला, ब्राह्मणांना केळी, नारळ, आबें यांची दानें दिलीं. अनेक प्रकारचे चेटकाचे प्रयोग केले, अगदी हीन मंत्रप्रयोगही केले, परंतु प्रारब्ध अनुकूल नसल्यानें त्यांना मुलगा कांहीं झाला नाहीं. मुलगा व्हावा या वासनेनें झाडाखाली अस्पर्श असतांना न्हायला बसणें, फळती झाडें जाळणें, अशी पापकर्मे करुन पाहिलीं.

दोघांनीं आपलें वैभव सोडलें आणि डोक्यांत वारें शिरल्याप्रमाणें भ्रमिष्टासारखे वागूं लागले. अशा वेळीं खंडोबा आणि कुलस्वामीनी एकदाचे प्रसन्न झाले. त्यांची मन:कामना पूर्ण झाली. नवराबायको आनंदून गेली. 

आतां पुढचें ऐकण्यासाठीं श्रोत्यांनीं सावध होऊन लक्ष द्यावें.