श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, February 17, 2011

।। दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ।।२।। समास नववा : मृत्युनिरूपण ।।


।। दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ।।२।। समास नववा : मृत्युनिरूपण ।।

।। श्रीराम ।।

संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ।।१।।

नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ।।२।।

सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ।।३।।

अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें ।
नेऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ।।४।।

होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं ।
सर्वत्रांस कुटाकुटी । मागेंपुढें होतसे ।।५।।

मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं ।
माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ।।६।।

मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार ।
मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ।।७।।

मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी ।
मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहांखळ ।।८।।

मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य ।
मृत्य न म्हणे आढ्य । सर्व गुणें ।।९।।

मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत ।
मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ।।१०।।

मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ।।११।।

मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ।।१२।।

मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ।।१३।।

मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंड राजे ।।१४।।

मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी ।
मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ।।१५।।

मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण ।
मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ।।१६।।

मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न ।
मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ।।१७।।

मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत ।
मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ।।१८।।

मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक ।
मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ।।१९।।

मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री ।
मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ।।२०।।

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ ।
मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ।।२१।।

मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या ।
मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ।।२२।।

मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी ।
मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ।।२३।।

मृत्य न म्हणे योग्याभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी ।
मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ।।२४।।

मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध ।
मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ।।२५।।

मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।
मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन। २६।।

मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर ।
मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ।।२७।।

मृत्य न म्हणे हठयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी ।
मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ।।२८।।

मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी ।
मृत्य न म्हणे निराहारी। योगेश्वर ।।२९।।

मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत ।
मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ।।३०।।

मृत्य न म्हणे हा स्वाधेन । मृत्य न म्हणे हा पराधेन ।
सकळ जीवांस प्राशन । मृत्युचि करी ।।३१।।

येक मृत्युमार्गी लागले । येकीं आर्धपंथ क्रमिले ।
येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ।।३२।।

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण ।
मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ।।३३।।

मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार ।
मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ।।३४।।

मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास ।
मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ।।३५।।

आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें ।
मागेंपुढें विश्वास जाणें । मृत्युपंथें ।।३६।।

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौऱ्यासी लक्ष जीवयोनी ।
जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ।।३७।।

मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा ।
मृत्यास न ये चुकवितां । कांहीं केल्या ।।३८।।

मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी ।
मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ।।३९।।

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ।।४०।।

श्रोतीं कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ।।४१।।

येथें न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात ।
प्रगट जाणती समस्त । लहान थोर ।।४२।।

तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल ।
याकारणें नासेल । उपजला प्राणी ।।४३।।

ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें ।
जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ।।४४।।

येरवीं प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार ।
बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंची नये ।।४५।।

गेले वहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे ।
गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ।।४६।।

गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी ।
गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ।।४७।।

गेले बहुतां बळांचे। गेले बहुतां काळांचे ।
गेले बहुतां कुळांचे। कुळवंत राजे ।।४८।।

गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ।।४९।।

गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंग़र ।
गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ।।५०।।

गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे ।
गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ।।५१।।

गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी ।
गेले बहुत नाअनापरी । धर्मरक्षक ।।५२।।

गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे ।
गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ।।५३।।

गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी ।
गेले बहुत वेवादी । बहुतांपरीचे ।।५४।।

गेलीं पंडितांची थाटें । गेलीं शब्दांचीं कचाटें ।
गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ।।५५।।

गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार ।
गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ।।५६।।

गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी ।
गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ।।५७।।

गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य ।
गेले बहुत सांगों काये । किती म्हणौनि ।।५८।।

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।
जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ।।५९।।

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मृत्यनिरूपणनाम समास नववा ।।९।।३. ९



मानवीजीवनाचा प्रवाह काळाच्या स्वामित्वाखाली अखंड वाहतो. मृत्यूकडे त्याची दिशा आहे. मृत्यु कसा व कोठें यायचा तें माणसाच्या कर्मानुसार ठरतें पण मृत्यु आला कीं कोणीही वाचवूं शकत नाही. :
संसार म्हणजे सारखा धांवणारा स्वार आहे. संसारांत मरणाची घटना आधार नाहीं, आजची उद्यावर ढकलतां येत नाहीं. माणसाच्या देहाला क्षणाक्षणाचें माप लावलेलें आहे, त्याचे आयुष्य क्षणाक्षणानें संपत आहे.

जन्माला आल्यापासून काळ सारखा बरोबर असतो. पुढें काय घडणार आहे तें कळत नाहीं. जसें ज्याचें कर्म असेल तसें माणूस स्वदेशीं अथवा परदेशीं देह ठेवतो. पूर्वसंचीत संपूर्णपणे संपले कीं मग क्षणभरही अवकाश राहात नाहीं. अखेरचें मिनिट संपतें न संपतें तोंच देह सोडून जावें लागतें. काळाचे दूत एकदम येतात, जीवाला मारीत सुटतात आणि पुढें घालून मृत्युच्या मार्गानें घेऊन जातात. एकदां मृत्यूचा वेढा पडला कीं माणसाला कोणीही पाठीशी घालूं शकत नाहीं, वांचवूं शकत नाहीं. सर्व प्राण्यांना मृत्यु जणूं काय चूर्ण करून टाकतो. कोणाची पाळी आधी तर कोणाची मागून येते इतकेंच. अंतकाळ ही एक जबर काठी आहे. बलवानांच्या डोक्यांत देखील ती बसते. बलाढ्य महाराजेसुद्धां मृत्युपुढें टिकत नाहींत.

यानंतर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील लहानथोर माणसे अखेर कशी मरणाधीन आहेत याचें फार सरस वर्णन आहे. सबंध मानवीजीवन श्री समर्थांच्या पुढें जणूं काय हात जोडून उभें आहे असें वाटते. :
एकदां अंतकाळ आला कीं मग मृत्यु जसा विचार करीत नाहीं कीं हा क्रूर, झुंझार, किंवा रणांगणावर संग्रामशूर आहे. हा रागीट, प्रतापी, किंवा उग्र रुपाचा मोठा दुष्ट आहे. हा बलाढ्य, धनाढ्य, किंवा सर्व गुणांनीं संपन्न आहे. हा विख्यात, श्रीमंत किंवा अद्भुत पराक्रमी आहे. हा भूपती म्हणजे राजा, चक्रवर्ती म्हणजे महाराजा किंवा सम्राट, किंवा युक्तीबाज किंवा मंत्रतंत्र जाणणारा आहे.

हा घोडे बाळगणारा, हत्ती बाळगणारा, किंवा अनेक माणसे पदरीं बाळगणारा विख्यात राजा आहे. हा लोकांत श्रेष्ठ, राजकारणी, किंवा स्वतः: वतनदार असून अनेकांना वतने देणारा आहे. हा देसाई, व्यापारधंदा करणारा, किंवा हे निरनिराळ्या गांवचे पुंडराजे आहेत. हा सरकारी शिक्क्याचा अधिकारी, व्यापारी, ही परदारा किंवा राजकन्या आहे. हें कार्य, हें कारण, हा उच्चवर्णीय, हा नीचवर्णीय, किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे. हा विद्यासंपन्न, द्रव्यसंपन्न किंवा हे सभेतील मोठे पंडित आहेत, हा धूर्त, हा बहुश्रुत, किंवा मोठा सज्जन पंडित आहे. हा पुराणिक, याशिक, वैदिक किंवा ज्योतिषी आहे. हा अग्निहोत्री, हा वेदांचा ज्ञाता, मंत्रयंत्र जाणणारा, किंवा सारे वेद अभ्यासलेला आहे. हा शास्त्रज्ञ, वेदज्ञ, किंवा सर्व जाणणार सर्वज्ञ आहे. ही ब्रह्महत्या, गोहत्या, किंवा स्त्रिया व लहान मुलें यांची हत्या आहे. हा रागज्ञानी, तालज्ञानी, किंवा तत्व जाणणारा मोठा तत्वज्ञानी आहे. हा योगाभ्यासी, हा संन्यासी, किंवा, योगबलानें काळाला फसविणारा आहे. हा सावध, सिद्ध, किंवा प्रसिद्ध वैद्य व पंचाक्षरी आहे. हा गोसावी, तपस्वी, तेजस्वी, किंवा मोठा अनासक्त आहे.    

हा ऋषीश्वर, कवीश्वर, दिगंबर, किंवा समाधिस्थ आहे. हा हटयोगी, राजयोगी, किंवा सदा सर्वकाळ विरक्त आहे. हा ब्रह्मचारी, जटाधारी, कांहींच न खाणारा, किंवा मोठा योगी आहे. हा संत, महंत, किंवा हवें तेव्हां गुप्त होणारा आहे. हा स्वाधीन आहे किंवा पराधीन आहे. अशा रीतीनें सर्व जीवांना मृत्यु खून टाकतो. कांहीं जीव जन्मास आल्यावर लगेंच मरून जातात, कांहीं जीव अर्धे आयुष्य जगून मरण पावतात, तर कांही जण म्हातारपणीं मरतात. मृत्यु हे पाहात नाहीं कीं हा बाल, तरुण, सुलक्षणी, शहाणा किंवा पुष्कळ बोलणारा आहे, हा पुष्कळांचा आधार, उदार, सुंदर किंवा चौफेर ज्ञानसंपन्न आहे. हा पुण्य पुरुष, हरिदास, किंवा विशेष सत्कर्म करणारा आहे, हें मृत्यु ओळखीत नाहीं.

सर्व दृश्य विश्वाला मृत्यु अटळ आहे. जो जन्मास येतो तो तो हमखास मृत्यु पावतो. :
आतां हें बोलणें पुरे झालें. मृत्युच्या तडाख्यांतून कोणीही सुटूं शकत नाहीं. या सबंध दृश्य विश्वाला आज ना उद्या मृत्युच्या मार्गांने जावें लागतें. जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज असे प्राण्यांचे चार प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी, चौर्‍याशीं लक्ष जीवांचे प्रकार हें सगळे म्हणजे जे जे जीव दृश्य विश्वांत देह घेऊन जन्मास येतात त्यांना मृत्यु आल्यावांचून राहात नाहीं. मृत्यूला घाबरून, त्याच्या भयानें कोठें पळून जावें म्हटलें तरी मृत्यु काहीं कधी कोणाला साडीत नाहीं. वाटेल तें केलें तरी मृत्यु कांहीं चुकवितां येत नाहीं.

मृत्यु असा सर्वभक्षक, सर्वनाशक व सर्वकष आहे. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार सुद्धां जर अखेर मृत्युपंथानें गेलें तर तेथें इतर जीवप्राण्यांची कथा काय ? या जगाला मृत्युभूमी असें नांवच आहे. म्हणून विचारी माणसानें मृत्यूची निरोगी जाणीव ठेवून सार्थक करून घ्यावें. :
हा माणूस स्वदेशांतील किंवा विदेशांतील आहे, किवा हा कायम उपवास करणारा आहे. याबद्दल मृत्यूची चौकशी करीत नाही. माणूस अतिशय थोर असला तरी, प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर असलें तरी, किंवा प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असले तरी मृत्यु त्यांची पर्वा करीत नाही.

मृत्यूबद्दल केलेलें हें विवेचन ऐकून श्रोत्यांनी रागावूं नये. हा मृत्युलोक आहे हें हे सर्वजण जाणतात. जन्मलेल्या प्राण्याला केव्हांतरी मृत्युच्या मार्गानें जावेंच लागतें. याबद्दल संशय बाळगूं नये. हा लोक मृत्युलोक या नावांनेच विख्यात आहे. सर्व लहानथोरांना याची स्पष्टपणें जाणीव आहे. पण कोणी त्याबद्दल संशय बाळगला तरी हा मृत्युलोक कांहीं बदलणार नाहीं. त्या संशयामुळें जन्मलेला प्राणी किंवा माणूस आपल्या जीवनाची नासाडी मात्र करील. हा मृत्युलोक आहे ही जाणीव ठेवून माणसानें आपलें सार्थक करून घ्यावें. मृत्यूने देह नेला तरी कीर्तीरूपाने स्वत: लोकामध्यें उरावें. मृत्यूला टाळण्याचा हा एकमार्ग आहे, एरवी माणूस लहान असो वा थोर असो तो मृत्यु पावणार हें अगदी निश्चित समजावें. आतांपर्यंत जे सांगितले तें कधी खोटें होईल असें मानूं नये.

पुढील बारा ओव्यांमध्यें श्री समर्थ असें सांगतात कीं जीवनाच्या विविध क्षेत्रांत ज्यांनी आपला पराक्रम गाजविला, ज्यानीं जगामध्यें उलथापालथ केली. असें सर्व स्त्रीपुरुष अखेर मृत्यूनें नाहींसे केलें. :
मोठ्या वैभवाचे, आयुष्याचें, असीम प्रभावाचे पुरुष मृत्युपंथानें गेले. मोठ्या पराक्रमाचे, मोठीं कपटकर्मे करणारे पुरुष गेले. मोठे शूर योद्धे युद्धामध्यें मरण पावलें.

मोठ्या बळाचे, फार काळ जगलेले, अनेक कुळांमधील मोठे कुळवंत राजे, सगळे गेले. पुष्कळांना पोसणारे, मोठे बुद्धी चालविणारे, मोठ्या युक्तीनें तर्क करणारे, तर्कवादी, सगळे गेले. विद्येचा सागर असणारे, बळाचा डोंगर असणारे, कुबेराप्रमाणें धन असणारे, सगळे मृत्युपंथानें गेले. मोठ्या पुरुषार्थाचे, मोठ्या पराक्रमचे, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते, सगळे गेले. मोठे शस्त्रधारी, मोठे परोपकारी, नाना प्रकारांनीं धर्माचें रक्षण करणारे, सारे गेले. मोठ्या प्रतापाचे, मोठ्या सत्कीर्तीचे, मोठ्या नीतीचे नीतिमान राजे, सगळे गेले. मोठे मतवादी, मोठे कार्यवादी, अनेक प्रकारचे मोठमोठे वाद खेळणारे, सारे गेले.

पंडितांचे समुदाय गेले, शब्दांच्या खटपटी लटपटी  करणारे गेले, नाना मतांनुसार अचाट वाद करणारे पण गेले. तापसी लोकांचे समूह गेले, असंख्य संन्यासी गेले, सारासार विचार करणारे विचारवंत गेले, मृत्यूनें नाहींसे केले. पुष्कळ संसारी गेले, पुष्कळ वेशधारी गेलेनाना प्रकारचे नाना छंद करणारे पुष्कळ लोक आपला छंद करून अखेर गेले. ब्राह्मणांचे समुदाय गेले, पुष्कळ मोठमोठे आचार्य पण गेलें असें पुष्कळ पुष्कळ गेले, ते किती म्हणून सांगावें !

असे सारे गेले पण संत मात्र टिकले. असो. याप्रमाणे सगळे सगळे गेले. परंतु आत्मज्ञान होऊन जे स्वस्वरूपाशी एकरूप झाले तेवढे मात्र टिकले.

॥ श्रीराम समर्थ ॥