श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Monday, February 14, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ड ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ||

||श्रीराम ||

पुढें गेला विदेशासी| प्राणी लागला व्यासंगासी |
आपल्या जिवेसीं सोसी| नाना श्रम ||||

ऐसा दुस्तर संसार| करितां कष्टला थोर |
पुढें दोनी च्यारी संवत्सर| द्रव्य मेळविलें ||||

सवेंचि आला देशासी| तों आवर्षण पडिलें देसीं |
तेणें गुणें मनुष्यांसी| बहुत कष्ट जाले ||||

येकांच्या बैसल्या अमृतकळा| येकांस चंद्री लागली डोळां |
येकें कांपती चळचळा| दैन्यवाणीं ||||

येकें दीनरूप बैसलीं| येकें सुजलीं येकें मेलीं |
ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं| अकस्मात डोळां ||||

तेणें बहुत दुःखी जाला| देखोनिया उभड आला |
प्राणी आक्रंदों लागला| दैन्यवाणा ||||

तंव तीं अवघीं सावध जालीं| म्हणती बाबा बाबा जेऊं घाली |
अन्नालागीं मिडकलीं| झडा घालिती ||||

गांठोडें सोडून पाहाती| हातां पडिलें तेंचि खाती |
कांहीं तोंडीं कांहीं हातीं| प्राण जाती निघोनी ||||

तांतडी तांतडी जेऊं घाली| तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं |
कांहीं होतीं धादावलीं| तेंहि मेलीं अजीर्णें ||||

ऐसीं बहुतेकें मेलीं| येक दोनीं मुलें उरलीं |
तेंहि दैन्यवाणीं जालीं| आपलें मातेवांचुनी ||१०||

ऐसे आवर्षण आलें| तेणें घरचि बुडालें |
पुढें देसीं सुभिक्ष जालें| आतिशयेंसी ||११||

लेकुरां नाहीं वाढवितें| अन्न करावें लागे आपुलेन हातें |
बहु त्रास घेतला चित्तें| स्वयंपाकाचा ||१२||

लोकीं भरीस घातलें| पुन्हां मागुतें लग्न केलें |
द्रव्य होतें तें वेचलें| लग्नाकारणें ||१३||

पुन्हां विदेशासी गेला| द्रव्य मेळऊन आला |
तव घरीं कळहो लागला| सावत्र पुत्रांसी ||१४||

स्त्री जाली न्हातीधुती| पुत्र देखों न सकती |
भ्रताराची गेली शक्ती| वृद्ध जाला ||१५||

सदा भांडण पुत्रांचें| कोणी नायकती कोणाचें |
वनिता अति प्रीतीचें| प्रीतिपात्र ||१६||

किंत बैसला मनां| येके ठाई पडेना |
म्हणोनियां पांचा जणा| मेळविलें ||१७||

पांच जण वांटे करिती| तों ते पुत्र नायेकती |
निवाडा नव्हेचि अंतीं- | भांडण लागलें ||१८||

बापलेकां भांडण जालें| लेंकीं बापास मारिलें |
तंव ते मातेनें घेतलें| शंखतीर्थ ||१९||

ऐकोनि मेळले लोक| उभे पाहाती कौतुक |
म्हणती बापास लेक| कामा आले ||२०||

ज्या कारणें केले नवस| ज्या कारणें केले सायास |
ते पुत्र पितीयास| मारिती पहा ||२१||

ऐसी आली पापकळी| आश्चिर्य मानिलें सकळीं |
उभे तोडिती कळी| नगरलोक ||२२||

पुढें बैसोन पांच जण| वांटे केले तत्समान |
बापलेंकांचें भांडण| तोडिलें तेहीं ||२३||

बापास वेगळें घातलें| कोंपट बांधोन दिधलें |
मन कांतेचें लागलें| स्वार्थबुद्धी ||२४||

कांता तरुण पुरुष वृद्ध| दोघांस पडिला संमंध |
खेद सांडून आनंद| मानिला तेहीं ||२५||

स्त्री सांपडली सुंदर| गुणवंत आणी चतुर |
म्हणे माझें भाग्य थोर| वृद्धपणीं ||२६||

ऐसा आनंद मानिला| दुःख सर्वही विसरला |
तंव तो गल्बला जाला| परचक्र आलें ||२७||

अकस्मात धाडी आली| कांता बंदीं धरून नेली |
वस्तभावही गेली| प्राणीयाची ||२८||

तेणें दुःख जालें भारीं| दीर्घ स्वरें रुदन करी |
मनीं आठवे सुंदरी| गुणवंत ||२९||

तंव तिची वार्ता आली| तुमची कांता भ्रष्टली |
ऐकोनियां आंग घाली| पृथ्वीवरी ||३०||

सव्य अपसव्य लोळे| जळें पाझरती डोळे |
आठवितां चित्त पोळे| दुःखानळें ||३१||

द्रव्य होतें मेळविलें| तेंही लग्नास वेचलें |
कांतेसिही धरून नेलें| दुराचारी ||३२||

मजही वृद्धाप्य आलें| लेंकीं वेगळें घातलें |
अहा देवा वोढवलें| अदृष्ट माझें ||३३||

द्रव्य नाहीं कांता नाहीं| ठाव नाहीं शक्ति नाहीं |
देवा मज कोणीच नाहीं| तुजवेगळें ||३४||

पूर्वीं देव नाहीं पुजिला| वैभव देखोन भुलला |
सेखीं प्राणी प्रस्तावला| वृद्धपणीं ||३५||

देह अत्यंत खंगलें| सर्वांग वाळोन गेलें |
वातपीत उसळलें| कंठ दाटला कफें ||३६||

वळे जिव्हेची बोबडी| कफें कंठ घडघडी |
दुर्गंधी सुटली तोंडीं| नाकीं स्लेष्मा वाहे| ३७||

मान कांपे चळचळां| डोळे गळती भळभळां |
वृद्धपणीं अवकळा| ठाकून आली ||३८||

दंतपाटी उखळली| तेणें बोचरखिंडी पडिली |
मुखीं लाळ गळों लागली| दुर्गंधीची ||३९||

डोळां पाहातां दिसेना| कानीं शब्द ऐकेना |
दीर्घ स्वरें बोलवेना| दमा दाटे ||४०||

शक्ती पायांची राहिली| बैसवेना मुरुकुंडी घाली |
बृहती वाजों लागली| तोंडाच ऐसी ||४१||

क्षुधा लागतां आवरेना| अन्न समईं मिळेना |
मिळालें तरी चावेना| दांत गेले ||४२||

पित्तें जिरेना अन्न| भक्षीतांच होये वमन |
तैशेंचि जाये निघोन| अपानद्वारें ||४३||

विष्टा मूत्र आणि बळस| भोवता वमनें केला नास |
दुरून जातां कोंडे स्वास| विश्वजनाचा ||४४||

नाना दुःखें नाना व्याधी| वृद्धपणीं चळे बुद्धी |
तऱ्हीं पुरेना आवधी| आयुष्याची ||४५||

पापण्या भवयाचे केंश| पिकोन झडले निःशेष |
सर्वांगीं लोंबलें मांस| चिरकुटासारिखें ||४६||

देह सर्व पाअरिखें जालें| सवंगडे निःशेष राहिले |
सकळ प्राणीमात्र बोले| मरेना कां ||४७||

जें जन्मून पोसलीं| तेंचि फिरोन पडिलीं |
अंतीं विषम वेळ आली| प्राणीयासी ||४८||

गेलें तारुण्य गेलें बळ| गेलें संसारीचें सळ |
वाताहात जालें सकळ| शरीर आणी संपत्ती ||४९||

जन्मवरी स्वार्थ केला| तितुकाहि वेर्थ गेला |
कैसा विषम काळ आला| अंतकाळीं ||५०||

सुखाकारणें झुरला| सेखीं दुःखें कष्टी जाला |
पुढें मागुता धोका आला| येमयातनेचा ||५१||

जन्म अवघा दुःखमूळ| लागती दुःखाचे इंगळ |
म्हणोनियां तत्काळ| स्वहित करावें ||५२||

असो ऐसें वृद्धपण| सकळांस आहे दारुण |
म्हणोनियां शरण| भगवंतास जावें ||५३||

पुढें वृद्धीस तत्वतां| गर्भीं प्रस्तावा होता |
तोचि आला मागुता| अंतकाळीं ||५४||

म्हणौनि मागुतें जन्मांतर| प्राप्त मातेचें उदर |
संसार हा अति दुस्तर| तोचि ठाकून आला ||५५||

भगवद्भजनावांचुनी| चुकेना हे जन्मयोनि |
तापत्रयांची जाचणीसांगिजेल पुढे ||५६||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ||||३. ५



नंतर तो परदेशास गेला व आपल्या उद्योगास लागला. अनेक प्रकारचे कष्ट त्यानें अगदी मनापासून सोसलें. हा कठीण संसार करतां करतां त्याला फार हाल सोसावे लागले. पुढें दोनचार वर्षे कष्ट करून त्यानें द्रव्य मिळवलें. मग लागलीच तो स्वदेशी परत आला तर देशांत दुष्काळ पडला होता. त्यामुळें माणसांना फार यातना सोसण्याची पाली आली. त्यानें घरांत येऊन पहिले तर पोरांपैकीं कोणाची गालफडें बसलेलीं, तर कोणाचें डोळें निस्तेज झालेले, तर कोणी दिन होऊन थराथरा कांपत असेलेले, कोणी, भिकार्याासारखीं बसलेली, कोणाच्या संगावर सूज आलेली, कोणी मारून गेलेईल, अशी मुलांमुलींची अवस्था त्यानें बघितली.

तें दृश्य पाहून त्याला तिशय दु:ख झालें; त्याला भडभडून आलें, आणि दिनपणानें तो मोठ्यानें रडूं लागला. तेव्हां ती सगळीं पोरें शुद्धीवर आली, सावध झाली. " बाबा, बाबा, जेवायला घाला " असें ओरडत अन्नासाठीं हपापलेलीं, भुकेलीं ती पोरें त्याच्या अंगावर झडप घालून पडली. पोरांनी बाबांचें गाठोडें सोडून पाहिलें. हातांत येईल तें त्यांनीं खाल्लें आणि कांहीं तोंडात तर कांहीं हातांत अशा अवस्थेंत त्यांचे प्राण गेले. घाईघाईने जेऊं घालीत असतां कांहीं पोरें जेवतां जेवतांच मेली. कांहीं तिशय भुकेली होती त्यांनीं फार खाल्यानें तीं अजीर्ण होऊन मेलीं. अशा रीतीने बहुतेक पोरें मेलीं, एकदोन जीं उरली तीं आई मेली म्हणून अगदी दीनवाणी झाली.

कांहीं दिवसांनी परिस्थिती सुधारली, लोकांनी भरीला घातले म्हणून त्यानें तिसरें लग्न केलें. म्हातारा नवरा वव तरणी बायको, शिवाय घरांत तरणीताठी मुले, त्यामुळें कटकटी होऊन अखेर मुलांनीं बापांस मारले. :
दुष्काळाचा जोर फार असल्यानें त्याचें सारें घरच बसलें. कांहीं दिवसानंतर देशांत अत्यंत सुबत्ता झाली. मुलांना वाढविणारे घरांत कोणी नाहीं. रोज आपल्या हातानें अन्न शिजवावें. त्या स्वयंपाकाचा त्यालां फार त्रास वाटूं लागला. लोकांनीं फार आग्रह केला म्हणून पुन्हां लग्न केलें. जवळ जो थोडा पैसा होता तो लग्नासाठीं खर्च केला. आतां पैसा हवा म्हणून पुहा तो परदेशीं गेला, पैसा मिळवून परत आला. घरीं येऊन पाहातो तर बायकोची आणि सावत्र मुलांचीं भांडणें लागलेली होती. बायको वयात आली होती, घरमालकीण झाली होती. मुलांना तें पाहवेना, तें तिचा द्वेष करुं लागले. कोणी कोणाचें ऐकेना. बायकोवर त्याचें अत्यंत प्रेम जडलें. एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय माजला. त्यांचें आपसांत पटेना, कशांतही एकमत होईना. म्हणून पांच जणांना पंच म्हणून बोलावलें.

पंचांनी वाटे केले पण तें मुलांना पटले नाहींत. वाट्यांच्या निकाल लागला नाहीं. शेवटीं पुन्हा भांडणास तोंड लागलें. बापलेकांचें भांडण झालें, त्यांत मुलांनीं बापाला मारलें. तेव्हां आई बोंब मारुं लागली. ती बोंब ऐकून पुष्कळ लोक गोळा झाले, उभे राहून मजा पाहुं लागले, व म्हणूं लागले कीं, " मुलें बापाच्या कामाला चांगली उपयोगी पडली. " ज्यांच्याकरितां नवससायास केले तें मुलगे मोठे झाल्यावर बापालाच मारीत आहेत बघा !
असें हें पापमय भांडण पाहून सर्वांना आश्चर्य वाटलें. मग तेथें जमलेल्या लोकांनीं तें भांडण मिटविलें. नंतर पांचजणांनीं बसून त्यांच्यांत सारखे वाटे केले. अशा रीतीनें त्यानीं बापलेकाचें भांडण मिटविलें.

बाप तरुण स्त्रीला घेऊन वेगळा राहूं लागला. तेवढ्यांत परचक्र आलें व शत्रूंनी त्या बाईला घरून नेलें. ती पुढें भ्रष्ट झाली. :
बापाला वेगळें केलें, त्याला राहायला एक खोंपट बंधन दिलें. तशांत त्या स्त्रीचें मन स्वार्थबुद्धीनें भरून गेलें. बायको तरुण, नवरा म्हातारा, घरांत या दोघांचाच संबंध, तिसरा कोणी नाहीं. अशा अवस्थेमध्यें सुद्धां खेद न करतां दोघांनीं आनंद मानला. नवी बायको मोठी सुंदर, सदगुणी आणि चतुर होती. आपलें भाग्य मोठें म्हणून म्हातारपणीं अशी बायको आपल्याला मिळाली. असा आनंद त्यानें मानला, मागचें सारें दु:ख तो विसरला. इतक्यांत जिकडे तिकडे आरडओरड झाली कीं शत्रूचा हल्ला आला आहे. एकदम शत्रूची घड आली, त्यानें बायको कैद करून नेली घरांतील सगळी चीजवस्तु लुटून नेली.

त्यामुळें त्याला अतिशय दु:ख झालें, तो मोठ्यानें रडूं लागला. आपली गुणी आणि सुंदर बायको त्याला सारखी आठवूं लागली. तेवढ्यांत " तुमच्या बायकोला भ्रष्ट केलें " अशी बातमी आली. तें ऐकून तो जमिनीवर धडकन कोसळला. डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडा लोळूं लागला, त्याच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या, बायकोची आठवण झाली कीं दु:खाच्या आगीनें त्याचें मन पोळून निघत होतें. जो पैसा मिळविला होता तो त्यानें लग्नासाठीं खर्च करून टाकला, आणि अखेर दुष्टांनीं बायकोलासुद्धां धरून नेले.

आतां त्याला देव आठवूं लागला. त्याच्यावांचून आपलें कोणी नाहीं हें त्याच्या ध्यानांत आलें. :
तो म्हणूं लागला " मला म्हातारपण आलें, मुलांनी मला वेगळे काढले. देवा, हें केवढें दुर्दैव माझ्यावर कोसळलें ! पैसा गेला, बायको गेली, घर गेलें, शक्ती गेली. देवा, आतां मला तुझ्याशिवाय दुसरें कोणीच नाहीं. " 
पूर्वी देवाची कधी पूजा केली नाहीं, तो वैभवाला भुलला. पैसा सर्वस्व मानून चालला. पण अखेर म्हातारपणीं त्याला पश्चात्तापाची पाळी आली.

यानंतर श्री समर्थांनी म्हातारपणीं होणारी देहाची दीनवाणी अवस्था सांगितली आहे. हे वर्णन खरोखरच वास्तववादी आहे. :
देह अत्यंत क्षीण झाला, सर्व शरीर वाळून गेलें, वातपित्त उसळलें, कफानें गळा दाटून गेला. जिभेची बोबडी वळली, कफानें गळा घरघरूं लागला, तोंडाला अति घाण येऊं लागली, नाकांतून शेंबूड वाहूं लागला. मान थरथर कापूं लागली, डोळ्यातून भळाभळा पाणी वाहूं लागलें. म्हातारपणीं अशी ही अवकळा, वाईट अवस्था प्राप्त झाली. दातांची कवळी उखडल्यामुळें तोंडाचें बोळकें झालें व तोंडांतून अति दुर्गंध असलेली लाळ गळूं लागली. डोळ्यांनी दिसेना, कानांनी शब्द एकूं येईना. मोठ्या आवाजात बोलवेना, दमा वाढूं लागला पायांतील शक्ती गेली, बसण्याची शक्ती गेली म्हणून सारखा आडवा पडूं लागला, तोंडाप्रमाणें गुद्द्वारही वाजूं लागलें.

भूक
लागली तर ती आवरेना, पण वेळेवर  खायला अन्न मिळेना. मिळालें तर दांत गेल्याने चावून खातां येईना. पित्तामुळें खालेलें अन्न पचेना, तें खाल्लें कीं ओकून पडूं लागलें. किंवा खालच्या वाटेनें तसेंच्या तसेंच बाहेर पडून जाऊं लागलें. बसल्या जागींच हागणें, मुतणें, बेडकें थुंकणें, ओकणें यामुळें स्वच्छतेचा सगळा नाश करून टाकला. या कमालीच्या घाणीमुळें त्याच्यापासून दुरून जरी गेले. तरी सर्वांचा श्वास कोंडतो. अनेक दु:खें असतात, अनेक रोग होतात त्यांत म्हातारपणीं बुद्धि फार चंचल होते. तरी आयुष्याची मुदत कांहीं संपत नाहीं. पापण्यांचें व भुवयाचे केस पिकून सारे गळून जातात. एखाद्या जुन्या कापडासारखे अंगावरचें मांस लोंबू लागतें.

देह सगळा पराधीन झालेला, स्नेही सोबती सगळे लांबूनच चौकशी करतात. अशा अवस्थेंत सगळेजण म्हणतात कीं " हा अजून मरत कां नाहीं ? "

ज्यांना जन्मल्यापासून पोसलें, वाढविलें तेच उलट जातात, शत्रुत्व करतात. शेवटीं माणसाला फार कठीण प्रसंग येतो.

जन्मभर सुखासाठीं धडपड करून अखेर दु:खच पदरांत पडतें असा जीवनाचा स्वभाव आहे. जन्मभर केलेला स्वार्थ व्यर्थ जातो. संसार फार कठीण आहे. म्हून भगवंताला शरण जावें. :
तारुण्य गेलें, बळ गेलें, संसार करण्याची हौस गेली, शरीर आणि संपती यांचा नाश झाला. जन्मभर स्वार्थ साधण्याच्या मागे लागला. पण तो सारा व्यर्थ गेला, शेवटीं मरण्याच्या वेळीं कठीण प्रसंग आला. जन्मभर सुखासाठीं श्रम केले, पण अखेरीस दु:खानें यातना सोसाव्या लागल्या. आणि मरणानंतर यमयातनांचा धोका पुन्हा आहे तो निराळाच.

तात्पर्य जन्म हाच सार्‍या दु:खाचें मूळ आहे. प्राणी जन्मला कीं, त्याला दु:खाच्या आगीचे चटके बसतातच. म्हणून शक्य तितक्या लवकर माणसानें स्वत:चें कल्याण करून घ्यावें.

असो हे असें हें भयंकर म्हातारपण सर्वांचा येतें. म्हणून प्रत्येकानें भगवंताला शरण जावें. गर्भावस्थेमध्यें जीवाला जो पश्चात्ताप होतो तोच पुढें त्याला म्हातारपणी होतो. म्हणून अंतकाळी जीवाला पुन्हा पश्चात्ताप होतो. यासाठीं त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आईच्या उदरांत कांहीं काळ राहावें लागतें. तरून जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा त्याच्या माथीं पडतो. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्ममरणाच्या खेपा चुकत नाहींत. आतां पुढील समासांमध्यें तीन तापांचा जाच कसा होतो तें मी सांगणार आहे.

॥ श्रीराम समर्थ ॥