श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Tuesday, February 15, 2011

।। दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ।।२।। समास सहावा : आध्यात्मिक ताप ।।


।। दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ।।२।। समास सहावा : आध्यात्मिक ताप ।।

।। श्रीराम ।।

तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण ।
श्रोतीं करावें श्रवण । यकाग्र होऊनी ।।१।।

जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला ।
आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ।।२।।

क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन ।
बंदीं पडिल्याचें बंधन- । तोडिनां, सुख ।।३।।

माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला ।
कां तो स्वप्नींचा चेइला । स्वप्नदुःखी ।।४।।

कोणी येकासी मरण- । येतां, दिलें जीवदान ।
संकटास निवारण । तोडितां सुख ।।५।।

रोगियास औषध । सप्रचित आणी शुद्ध ।
तयासी होये आनंद । आरोग्य होतां ।।६।।

तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला ।
तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ।।७।।

ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे ।
येविषईं येक असे । वाक्याधार ।।८।।

श्लोक ।।देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते ।
     इममाध्यात्मिकं तापं जायते दुःक देहिनाम् ।।१।।

     सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
     द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ।।२।।

     शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
     स्वर्गनरकादिं भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ।।३।।

येक ताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक ।
तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ।।९।।

आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आदिभूतिकांचें लक्षण । जाणिजे कैसें ।।१०।।

आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा ।
हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ।।११।।

हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता ।
आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ।।१२।।

देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण ।
सुखदुःखें सिणे जाण । या नांव आध्यात्मिक ।।१३।।

देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जालें ।
तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ।।१४।।

देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें ।
आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ।।१५।।

खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजऱ्या देवि गोवरु ।
देहामधील विकारु । या नांव आध्यात्मिक ।।१६।।

काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड ।
व्याधी मूळव्याधी माहाजड । या नांव आध्यात्मिक ।।१७।।

अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे वाउगी ।
हिरडी सुजे भरे बलंगी । या नांव आध्यात्मिक ।।१८।।

वाउगे फोड उठती । कां ते  सुजे आंगकांती ।
वात आणी तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ।।१९।।

नाइटे अंदु गजकर्ण । पेहाचे पोट विस्तीर्ण ।
बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ।।२०।।

कुष्ट आणि वोला कुष्ट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ।।२१।।

वाटी वटक वायेगोळा । हातीं पाईं लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ।।२२।।

वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ ।
आर्धशिसी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ।।२३।।

दुःखे माज आणि मान । पुष्ठी ग्रीवा आणि वदन ।
अस्तिसांदे दुःखती जाण । या नांव आध्यात्मिक ।।२४।।

कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी ।
विदेसीं लागलें पाणी । या नांव आध्यात्मिक ।।२५।।

जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणी अंधारें ।
ज्वर पाचाव आणी शारें । या नांव आध्यात्मिक ।।२६।।

शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ।।२७।।

आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवे मानसीं ।
विसराळु दुश्चित्त आहिर्निशी । या नांव आध्यात्मिक ।।२८।।

मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें ।
खडाचढाचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ।।२९।।

मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।
येक वेथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ।।३०।।

गांठी ढळली जाले जंत । पडे आंव आणी रक्त ।
अन्न तैसेचि पडत । या नांव आध्यात्मिक ।।३१।।

पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस ।
फोडी लागतां कासावीस । या नांव आध्यात्मिक ।।३२।।

उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट झाला ।
खरे पडसा आणी खोंकला । या नांव आध्यात्मिक ।।३३।।

उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ ।
मोवाज्वर आणी संताप । या नांव आध्यात्मिक ।।३४।।

कोणी सेंदूर घातलाअ । तेणें प्राणी निर्बुजला ।
घशामध्ये फोड जाला । या नांव आध्यात्मिक ।।३५।।
गळसोट्या आणी जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे ।
दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ।।३६।।

जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा ।
आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ।।३७।।

कळा तिडकी लागती । कां ते दंत उन्मळती ।
अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ।।३८।।

कर्णदुःख नेत्र दुःख । नाना दुःखें घडे शोक ।
गर्भांध आणी नपुश्यक । या नांव आध्यात्मिक ।।३९।।

फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें ।
दुश्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नांव आध्यात्मिक ।।४०।।

मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें ।
पांगुळ कुर्हें आणी पावडे । या नांव आध्यात्मिक ।।४१।।

तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें ।
शडांगुळें गेंगाणें विदरें । या नांव आध्यात्मिक ।।४२।।

दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ ।
अति कृश अति स्थूळ । या नांव आध्यात्मिक ।।४३।।

तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटीळ ।
मत्सरी खादाड तपीळ । या नांव आध्यात्मिक ।।४४।।

संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी ।
पापी अवगुणी विकारी । या नांव आध्यात्मिक ।।४५।।

उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक ।
सुजी आणी चालक । या नांव आध्यात्मिक ।।४६।।

सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात ।
संसारकोंडे आपमृत्य । या नांव आध्यात्मिक ।।४७।।

नखविख आणी हिंगुर्डें । बाष्ट आणी वावडें ।
उगीच दांतखीळ पडे । या नांव आध्यात्मिक ।।४८।।

झडती पातीं सुजती भवया । नेत्रीं होती राझणवडीया ।
चाळसी लागे प्राणियां । या नांव आध्यात्मिक ।।४९।।

वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें ।
चुकुर होइजे मानसें । या नांव आध्यात्मिक ।।५०।।

नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे ।
चाईचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ।।५१।।

नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी ।
व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ।।५२।।

वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा ।
देह क्षीण सर्वदा । या नांव आध्यात्मिक ।।५३।।

नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें ।
प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ।।५४।।

ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप ।
सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ।।५५।।

बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें ।
पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ।।५६।।

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सहावा ।।६।।३. ६


जीवनांतील नाना प्रकारच्या दु:खानीं माणूस गांजला म्हणजेच तो जीवनाचा खरा अर्थ किंवा परमार्थ शोधू लागतो. त्यांत त्याला सत्संगती लाभली किं बरोबर भगवंताच्या मार्गाला लागतो. :
मी आतां तापत्रयाच्या लक्षणांचें (नीट) वर्णन करतो. मन एकाग्र करून श्रोत्यांनीं तें ऐकावें. जो तापत्रयानें पोळलेला असतो तू संतांच्या संगतीनें निवतो म्हणजे शांत होतो. त्याला समाधान लाभतें. एखादी वस्तु हवी म्हणून विव्हळ झालेल्या माणसाला ती वस्तु मिळाली कीं संतोष होतो. तसें दु:खी माणसाला सत्संगानें समाधान मिळतें. जसें भुकेल्या माणसाला अन्न मिळालें, तहानलेल्या माणसाला पाणी मिळालें, किंवा कैद्याचें बंधन तुटलें म्हणजे त्यांना सुख होतें. महापुरांत सांपडून घाबरलेल्या माणसाला परतीराला नेलें, किंवा वाईट स्वप्नानें दु:खी झालेल्या माणसाला जागेम केलें, मरणाच्या दाराशीं पडलेल्या माणसाला जीवदान दिलें म्हणजे त्याला सुख होते, संकटातून सोडविलें म्हणजे सुख होतें. एखाद्या रोग्याला अनुभवसिद्ध म्हणजे खात्रीचें आणि उत्तम औषध मिळालें म्हणजे त्याचा रोग नाहींसा होऊन त्याला आनंद होतो. त्याचप्रमाणें संसारातील दु:खानें गांजलेला आणि त्रिविधतापानें पोळलेला माणूसच परमार्थ मिळविण्यास लायक होतो.

त्रिविधतापांची लक्षणें सांगणारे तीन श्लोक दिले आहेत. त्याचा अर्थ. :
ते त्रिविधताप कसे आहेत म्हणाल तर मी आतां सांगतो तसे आहेत. त्यांच्याविषयी एक आधारवचन आहे.
श्लोकाचा अर्थ : देह, इंद्रियें आणि प्राण यांच्यामुळें जें सुखदु:ख प्राप्त होतें म्हणजे भोगावें लागतें त्याला आध्यात्मिक ताप असें म्हणतात. माणसांना त्यापासून दु:खच होतें.

सर्व भुतांच्या संयोगानें जें सुखदु:ख उत्पन्न होतें तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप होय. माणसाच्या चांगल्यावाईट कर्माप्रमाणें मेल्यावर यायात्ना, स्वर्ग, नरक, वगैरे जे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक ताप असें म्हणतात. एक ताप आध्यात्मिक, दुसरा ताप आधिभौतिक, आणि तिसरा ताप आधिदैविक असे तीन ताप समजावे. आध्यात्मिक ताप कसा असतो, त्याची अवस्था कोणती, हेम सगळें स्पष्ट कळेल असें विस्तारानें आपण सांगावें. " हां जी " म्हणजे " बरें आहे " असें वक्ता, श्री समर्थ म्हणाले आणि त्रिविधतापांची कथा विस्तारानें सांगूं लागले. आतां आध्यात्मिक ताप सावधपणानें ऐका.

प्रथम आध्यात्मिक तापाची व्याख्या म्हणजे प्रधान लक्षण सांगतात. :
देह, इंद्रियें आणि प्राण यांच्या योगानें माणूस सुखदू:खे भोगतो आणि त्यामुळें त्रस्त होतो. त्या तापला आध्यात्मिक असें नाव आहे. जें दु:ख देहांतून निर्माण होतें आणि इंद्रियें व प्राण यांच्या द्वारा भोगावें लागतें, त्याला तीन तापांपैकीं आध्यात्मिक ताप असें म्हणतात. शरीरांतून काय निर्माण होतें आणि प्राणामुळें कोणतें दुख होतें हें स्पष्ट करून सांगणें जरूर आहे.

आतां पुढील जवळजवळ चाळीस ओव्यांमध्यें श्री समर्थांनी आध्यात्मिक तापाखालीं येणार्‍या दु:खाचें वर्णन केलें आहे. श्री समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म होतें, त्यांचें व्यवहारज्ञान केवढें अवाढव्य होतें, आणि त्यांची स्मृती कशी विलक्षण होती, हें या व पुढच्या समासांत पाहून घ्यावें. :
खरुज, कवडे, अंगावर उठणार्‍या पुळ्या, नारू, नखुरडें, मांजर्‍या, देवी व गोवर हे देहामाध्येंच उत्पन्न होणारे विकार आहेत. म्हणून त्यांना आध्यात्मिक ताप म्हणायचे. कांखमांजरी, केस्तुड, साधणारा व्रण, काळपुळी, रोगांमध्यें अति दु:सह अशी मुळव्याध,

बोटांचे दुखणें, गालफुगी, उगीच अंगभर सुटणारी खाज, हिरड्यांची सूज, दातांत भरणारें कसपट, अंगावर उगीच फोड उठणें, अंगावर सूज येणें, वाट होणें, तिडका लागणें, नयते, हाड्याव्रण, गजकर्ण, जलोदरानें फुगलेलें पोट, कानठळ्या बसून कान फुटणें, पांढरे कोड, महारोग, रोगांत श्रेष्ठ असा पांडुरोग किंवा रक्तक्षय, क्षयरोगाचे कष्ट, गांठ सरकणें, दुध प्यायल्यावर मुलाला लगेच होणारी वांति, हातापायांत येणार्‍या कळा, वारंवार चक्कर, घेर्‍या येणें, वोलांडा, वळ, पोटशूळाच्या यातना, अर्धशिशी, कपाळदुखी, कंबर, मान, पाठ, गळा, तोंड दुखणें, हाडांचें दुखणें, मोडशी, अजीर्णाची हागओक, कवील, पुरळ, गळवें, गंडमाळा, परदेशी पाणी बाधणें, कोरड पडणें, हिवताप, गरगरणें, डोळ्यापुढें अंधेरी येणें, ताप, दुखणें उलटणें, अंगावर उगाच शहारे येणें,

थंडी, उकाडा, तहान, भूक, झोंप, हगवण, अति संभोगानें होणारी वाईट अवस्था, आळशी, मूर्ख, अपेशी, मनात भय उत्पन्न होणें, विसराळू, सर्वकाळ उद्विग्न असणें, लाघवी अडणें, परमा, रक्तपिति, रक्तपरमा, मूतखड्याच्या यातना, मुरडा, हगवण, उन्हाळ्या लागणें, शौच कोंडल्यामुळें होणारी तगमग, रोग असून तो कोणता ते न कळणें,           

गांठ सरकणें, जंत होणें, आव व रक्त पडणें, अन्न पचन न होता जसेच्या तसेंच पडणें, पोट फुगणें, तडस लागणें, ठसका लागणें, घांस लागणें, फोडाला धक्का लागून जीव कासावीस होणें, उचकी लागणें, घांस अडकणें, पित्त उसळून वांति होणें, जीभकांटे येणें, पडसें खोकला होणें, दमा उसळणें, धाप लागणें, पडजिभेची ढास, कफ होणें, मोवाज्वर येंणें, अंगाची आग होणें, कोणी शेंदूर खायला घातल्यानें मनावर परिणाम होणें, घशामध्यें फोड होणें, घटसर्प, जीभ झडणें, सदा तोंडाला अति घाण येणें, दांत पडून हिरड्यांत कृमी होणें, पांथरी वाढणें, घोळणा फुटणें, गंडमाळा, आपोआप एकाएकी डोळा फुटणें, आपणच आपलें बोट कापून घेणें, कळा व तिडीक लागणें, दांत उपटले जाणें, ओठ व जीभ चावली जाणें.

कान ठणकणें, डोळे दुखणें, नाना प्रकारच्या दुः खानें ओरडणें, जन्मांध असणें, नपुंसक असणें, डोळ्यांत फुल पडणें, वडस वाढणें, मोतीबिंदू व कांचबिंदू  होणें, डोळ्याच्या पापण्यांना कीड लागणें, डोळे असून न दिसणें, रातंधळेपणा असणें, दुश्चितपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा असणें, मुकेपणा, बहिरेपणा, ओठतुटकें, हाततुटकें वृत्ती चळलेली, वेडेपणा, पांगालेपणा, कुबड, आंखुड पाय, तारवटलेले डोळे, वांकडी मान , काणा, तिरवा, घारे डोळे, अति ठेंगुपणा, ठेचाळणें, सहा बोटें, गेंगना, विद्रूंप, मोठे दांत, पुढें आलेले दांत, फार लांब नाक, नाक नसणें, कान नसणें, अर्थहिन बडबड, अति रोड, अति लठ्ठ,

तोतरा, बोबडा, अशक्त, रोगी, कुरूप, वांकड्या बुद्धीचा, मत्सरी, खादाड, तापट, संतापी, अनुतापी, मत्सरी, कामुक, हेवेदावे करणारा, तीरस्कारी, पापी, अवगुणी, विकारांच्या आधीन, ज्याला नीट उठता बसता येत नाहीं, अंग ताटणें, अवघडणें, लचक भरणें, सूज येणें, पायाचा संधिवात, न वाढणारा गर्भ, मुल आडवें येणें, गर्भपात, स्तनांतील गाठी, सन्निपात, संसारांतील अडचणी, अपमृत्युव, नखाचें विष बाधनें, नाखुडे, शिळें व कुपथ्याचें खाण्यानें प्रकृती बिघडणें, उगीच दांतखीळ बसणें, डोळ्याच्या पापण्या झडणें, भुवया सुजणें, डोळ्यांत रांजणवड्या होणें, चष्मा लागणें, अंगावर काळ्या पुळ्या येणें, तीळ, पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखीळ, गालगुंड, अंगावर मांस वाढणें, मनाला भ्रम होणें, अंगावर येणारें फुगवटे, आवाळे, अंगाला फार दुर्गंधी येणें, डोक्यावरचें केस गळणें, तोंडातून लाळ गळणें, अनेक काळज्यांनी काळवंडणें, अनेक दुःखांनी मानसिक यातना होणें, कांही रोग नसतांना जीवाची तगमग होणें, म्हातारपणाच्या यातना, सदा कांहींना कांहीं रोग होणें, देह नेहमी अशक्त असणें, अनेक रोग, अनेक दुःखें, अनेक भोग, अनेक जखमा, या सर्वांमुळें माणसाला दुःख होऊन त्याच्या जीवाची ती तळमळ होते त्याला आध्यात्मिक ताप असें म्हणतात. आध्यात्मिक ताप हा असा आहे. पूर्वी केलेलें पाप भडकल्यानें हा ताप भोगावा लागतो. त्याचें कितीही वर्णन केलें तरी तो संपणारा अफाट
दुः खसागर आहें.

आणखी किती सांगावें! श्रोत्यांनी खुणेनें समजावें. आतां पुढील समासात सहज ओघानें आधीभौतिक तापाचें  वर्णन करूं.

॥ श्रीराम समर्थ ॥