श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Sunday, February 13, 2011

||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम ||२|| समास चवथा : स्वगुणपरीक्षा क ||


||दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम |||| समास चवथा : स्वगुणपरीक्षा ||

||श्रीराम ||

लेंकुरें उदंड जालीं| तों ते लक्ष्मी निघोन गेली |
बापडीं भिकेसी लागलीं| कांहीं खाया मिळेना ||||

लेंकुरें खेळती धाकुटीं| येकें रांगती येकें पोटीं |
ऐसी घरभरी जाली दाटी| कन्या आणी पुत्रांची ||||

देवसेंदिवसा खर्च वाढला| यावा होता तो खुंटोन गेला |
कन्या उपवरी जाल्या, त्यांला- | उजवावया द्रव्य नाहीं ||||

मायेबापें होतीं संपन्न| त्यांचें उदंड होतें धन |
तेणें करितां प्रतिष्ठा मान| जनीं जाला होता ||||

भरम आहे लोकाचारीं| पहिली नांदणूक नाहीं घरीं |
देवसेंदिवस अभ्यांतरीं| दरिद्र आलें ||||

ऐसी घरवात वाढली| खातीं तोंडें मिळालीं |
तेणें प्राणीयांस लागली| काळजी उद्वेगाची ||||

कन्या उपवरी जाल्या| पुत्रास नोवऱ्या आल्या |
आतां उजवणा केल्या| पहिजेत कीं ||||

जरी मुलें तैसींच राहिलीं| तरी पुन्हां लोकलाज जाली |
म्हणती कासया व्यालीं| जन्मदारिद्र्यें ||||

ऐसी लोकलाज होईल| वडिलांचें नांव जाईल |
आतां रुण कोण देईल| लग्नापुरतें ||||

मागें रुण ज्याचें घेतलें| त्याचें परतोन नाहीं दिल्हें |
ऐसें आभाळ कोंसळलें| उद्वेगाचें ||१०||

आपण खातों अन्नासी| अन्न खातें आपणासीं |
सर्वकाळ मानसीं| चिंतातुर ||११||

पती अवघीच मोडली| वस्तभाव गाहाण पडिली |
अहा देवा वेळ आली| आतां डिवाळ्याची ||१२||


कांहीं केला ताडामोडा| विकिला घरींचा पाडारेडा |
कांहीं पैका रोकडा| कळांतरें काढिला ||१३||

ऐसें रुण घेतलें| लोकिकीं दंभ केलें |
सकळ म्हणती नांव राखिलें| वडिलांचें ||१४||

ऐसें रुण उदंड जालें| रिणाइतीं वेढून घेतलें |
मग प्रयाण आरंभिलें| विदेशाप्रती ||१५||

दोनी वरुषें बुडी मारिली| नीच सेवा अंगीकारिली |
शरीरें आपदा भोगिली| आतिशयेंसीं ||१६||

कांहीं मेळविलें विदेशीं| जीव लागला मनुष्यांपासीं |
मग पुसोनियां स्वामीसी| मुरडता जाला ||१७||

तंव तें अत्यंत पीडावलीं| वाट पाहात बैसलीं |
म्हणती दिवसगती कां लागली| काये कारणें देवा ||१८||

आतां आम्ही काये खावें| किती उपवासीं मरावें |
ऐसियाचे संगतीस देवें| कां पां घातलें आम्हांसी ||१९||

ऐसें आपुलें सुख पाहाती| परी त्याचें दुःख नेणती |
आणी शक्ती गेलियां अंतीं| कोणीच कामा न येती ||२०||

असो ऐसी वाट पाहतां| दृष्टीं देखिला अवचिता |
मुलें धावती, ताता| भागलास म्हणौनी ||२१||

स्त्री देखोन आनंदली| म्हणे आमुची दैन्यें फिटली |
तंव येरें दिधली| गांठोडी हातीं ||२२||

सकळांस आनंद जाला| म्हणती आमुचा वडील आला |
तेणें तरी आम्हांला| आंग्या टोप्या आणिल्या ||२३||

ऐसा आनंद च्यारी देवस| सवेंच मांडिली कुसमुस |
म्हणती हें गेलियां आम्हांस| पुन्हां आपदा लागती ||२४||

म्हणौनी आणिलें तें असावें| येणें मागुतें विदेशास जावें |
आम्ही हें खाऊं न तों यावें| द्रव्य मेळऊन ||२५||

ऐसी वासना सकळांची| अवघीं सोईरीं सुखाचीं |
स्त्री अत्यंत प्रीतीची| तेहि सुखाच लागली ||२६||

विदेसीं बहु दगदला| विश्रांती घ्यावया आला |
स्वासहि नाहीं टाकिला| तों जाणें वोढवलें ||२७||

पुढें अपेक्षा जोसियांची| केली विवंचना मुहूर्ताची |
वृत्ति गुंतली तयाची| जातां प्रशस्त न वटे ||२८||

माया मात्रा सिद्ध केली| कांहीं सामग्री बांधली |
लेंकुरें दृष्टीस पाहिलीं| मार्गस्त जाला ||२९||

स्त्रियेस अवलोकिलें| वियोगें दुःख बहुत वाटलें |
प्रारब्धसूत्र तुकलें| रुणानबंधाचें ||३०||

कंठ सद्गदित जाला| न संवरेच गहिवरला |
लेंकुरा आणी पित्याला| तडातोडी जाली ||३१||

जरी रुणानुबंध असेल| तरी मागुती भेटी होईल |
नाहीं तरी संगती पुरेल| येचि भेटीनें तुमची ||३२||

ऐसेएं बोलोन स्वार होये| मागुता फीरफिरों पाहे |
वियोगदुःख न साहे| परंतु कांहीं न चले ||३३||

आपुला गांव राहिला मागें| चित्त भ्रमलें संसारौद्वेगें |
दुःखवला प्रपंचसंगें| अभिमानास्तव ||३४||

ते समईं माता आठवली| म्हणे म्हणे धन्य ते माउली |
मजकारणें बहुत कष्टली| परी मी नेणेंचि मूर्ख ||३५||

आजी जरी ते असती| तरी मजला कदा न विशंभती |
वियोग होतां आक्रंदती| ते पोटागि वेगळीच ||३६||

पुत्र वैभवहीन भिकारी| माता तैसाचि अंगिकारी |
दगदला देखोन अंतरीं| त्याच्या दुःखें दुःखवे ||३७||

प्रपंच विचारें पाहातां| हें सकळ जोडे न जोडे माता |
हें शरीर जये करितां| निर्माण जालें ||३८||


लांव तरी ते माया| काय कराविया सहश्र जाया |
परी भुलोन गेलों वायां| मकरध्वजाचेनी ||३९||

या येका कामाकारणें| जिवलगांसिं द्वंद घेणें |
सखीं तींच पिसुणें| ऐसीं वाटतीं ||४०||

म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन| जे मायेबापाचें भजन |
करिती न करिती, मन- | निष्ठुर जिवलगांसीं ||४१||

संगती स्त्रीबाळकाची| आहे साठी जन्माची |
परी मायेबापेएं कैंचीं| मिळतील पुढें ||४२||

ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें| परी ते समईं नाहीं कळलें |
मन हें बुडोन गेलें| रतिसुखाचा डोहीं ||४३||

हे सखीं वाटती परी पिसुणें| मिळाली वैभवाकारणें |
रितें जातां लाजिरवाणें| अत्यंत वाटे ||४४||

आता भलतैसें करावें| परि द्रव्य मेळऊन न्यावें |
रितें जातां स्वभावें| दुःख आहे ||४५||

ऐसी वेवर्धना करी| दुःख वाटलें अंतरीं |
चिंतेचिये माहापुरीं| बुडोन गेला ||४६||

ऐसा हा देह आपुला| असतांच पराधेन केला |
ईश्वरीं कानकोंडा जाला| कुटुंबकाबाडी ||४७||

या येका कामासाठीं| जन्म गेला आटाटी |
वय वेचल्यां सेवटीं| येकलेंचि जावें ||४८||

ऐसा मनीं प्रस्तावला| क्षण येक उदास जाला |
सवेंचि प्राणी झळंबला| मायाजाळें ||४९||

कन्यापुत्रेएं आठवलीं| मनींहुनि क्षिती वाटली |
म्हणे लेंकुरें अंतरलीं| माझीं मज ||५०||

मागील दुःख आठवलें| जें जें होतें प्राप्त जालें |
मग रुदन आरंभिलें| दीर्घ स्वरें ||५१||

आरुण्यरुदन करितां| कोणी नाहीं बुझाविता |
मग होये विचारिता| आअपुले मनीं ||५२||

आतां कासया रडावें| प्राप्त होतें तें भोगावें |
ऐसे बोलोनिया जीवें| धारिष्ट केलें ||५३||

ऐसा दुःखें दगदला| मग विदेशाप्रती गेला |
पुढे प्रसंग वर्तला| तो सावध ऐका ||५४||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ||||३. ४


त्याला पुष्कळ पोरें झाली. त्यामुळें निर्माण होणार्‍या सगळ्या समस्या त्याच्यापुढें उभ्या राहिल्या. पैसा मिळविणें हि सर्वात निकडीची समस्या होय. :
पुष्कळ मुलें झालीं पण घरांत सांठवून ठेवलेला पैसा संपला. खायला धड मिळेना मुलांना भिक मागण्याची पाळी आली. कांहीं कडेवर बसणारी तान्ही, कांहीं रंगणारी, अशी लहान मुलें घरांत खेळूं लागली. मुलामुलींची घरभर नुसती गर्दी होऊन गेली. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला. पैशाची आवक बंद पडली. मुली लग्नाच्या झाल्या. पण त्यांच्या लग्नासाठीं जवळ पैसा उरला नाही. आईबाप पैसा बाळगून होते. त्यांच्यापाशीं खूप द्रव्य होतें. त्यामुळें त्याला लोकांत मान होता, प्रतिष्ठा होती. लोकांत वागतांना पूर्वीच्या श्रीमंतीचा भ्रम त्यानें अजून ठेवला होता. परंतु घरामध्यें पहिली सुबत्ता राहिली नव्हती. घरांत दिवसेंदिवस दारिद्र्य येत चाललें. अशा रीतीनें घरप्रपंच वाढला, खाणारी माणसे वाढली. त्यामुळें त्याला दु:ख आणि काळजी वाटूं लागली. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून येऊं लागल्या. आतां मुलामुलींची लग्नें केली पाहिजेत अशी परिस्थिती आली. जर मुलें तशीच लग्नावांचून राहिली तर पुन्हां लोक नावें ठेवणार. लोक म्हणतील कीं हे जन्मदरिद्री होते. मग यांनीं इतक्या मुलांना जन्म तरी कां दिला.

अशी लोकांत आपली इज्जत जाईल, आपल्या वडिलांचे नाव जाईल. म मोठी समस्या पुढें उभी राहते ती ही कीं, " लग्नापुरतें कर्ज देणारा कोण भेटेल ? ", मागें ज्याचाकडून कर्ज घेतलें होतें तें फेडलें नव्हतें.
असें दु:खाचें आभाळ कोसळलें. आपण अन्न खातो रें पण तेंच आपल्याला खाते, म्हणजे खाल्लेलें अन्न अंगीं लागेनासें झालें. त्याचें मन रात्रंदिवस चितेनें ग्रासलें. लोकांत त्याची पत उरली नाहीं. घरांतील चीजवस्तू गहन पडली. तो म्हणू लागला " देवा, आतां दिवाळे काढण्याची वेळ आली. "
मग कांहीं चीजवस्तु मोडली, घरांतील जनावरें विकलीं, आणि व्याज देऊन कांहीं रोकड पैसा उभा केला. अशा रीतीनें कर्ज काढून लोकांत खोटा मोठेपणा मिरविला. त्यानें वडिलांचें नांव राखलें असें र्वज म्हणाले.

पण कर्जाचा भार फार झाल्यानें तो दोन वर्षें परदेशी गेला आणि कष्ट करून पैसा घेऊन आला. :
याप्रमाणें त्याला अतिशय कर्ज झालें. पैसा देणार्‍यांनीं त्याच्या भोंवतीं गराडा घातला. तेव्हां त्यानें परदेशी जाण्याचा निश्चय केला. दोन वर्षें तो परदेशांत राहिला, त्यानें हीन लोकांची नोकरी पत्करली, शरीरानें अतिशय हाल काढलें. परदेशांत त्यानें कांहीं पैसा मिळविला, मग घराच्या माणसांकडे जीव ओढ घेऊं लागला. त्यानें मालकाची परवानगी काढली आणि घराकडे जाण्यास निघाला.

घरीं बायकोमुलें त्याची आतुरतेनें वाट बघतच होतीं. तो आल्यानें त्यांना आनंद झाला. :
तो घरी आला तेव्हां घरांतील माणसे अति यातना भोगीत असलेली व आतुरतेनें वाट पाहात असलेली त्याला दिसली. ती म्हणत होती " देवा, कोणत्या कारणानें त्यांना परत येण्यास इतके दिवस लागले ? आतां आम्ही काय खावें, पाशी तरी तरी किती दिवस राहावें ! देवा, अशा दरिद्री माणसाच्या संगतीस आम्हाला कां ठेवलेस ? "
अशा रीतीनें प्रपंचात सगळी माणसे आपलें तेवढें सुख पाहतात. दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव माणसे ठेवीत नाहींत. आणि एकदा शक्ति क्षीण झाली कीं शेवटीं कोणीच उपयोगी पडत नाहींत.

असो, अशा रीतीनें घरांतील माणसे वाट पाहात असतां तो एकाएकी त्यांना दिसला. " बाबा, तुम्ही थकलात " असे म्हणत मुलें त्याच्याकडे धांवत गेलीं. त्याला बघून बायकोला पण आनंद झाला. " आपली दैना आतां संपली " असें ती म्हणाली. तेव्हां आपलें पैशाचें गांठोडें त्यानें तिच्या हातीं दिलें. घरांतील सगळ्यांनाच आनंद झाला. पोरें म्हणू लागली कीं आमचा बाप आला. त्यानें आमच्यासाठीं अंगरखे व टोप्या आणल्या आहेत. पण हा आनंद चार दिवसच टिकला. पुढें लगेच कुरबुर सुरु झाली. घरांतील माणसे म्हणूं लागली कीं, " हा आणलेला पैसा खर्च झाल्यावर आमचे हाल पुन्हा सुरूं होतील. " म्हणून त्यानें जे द्रव्य आणलें आहे तें इथेंच ठेवावें आणि पुन्हा परदेशास जावें. आम्हीं हें खाऊन संपविण्याच्या आंत नवीन द्रव्य मिळवून घरीं परत यावें.

त्याला धड विश्रांतीसुद्धां मिळाली नाहीं, लवकरच पुन्हा परदेशी जाण्यास निघावें लागले. बायकोमुलांचा वियोग त्याला सहन होईना. पण नाईलाजानें घोड्यावर स्वार होऊन तो गेला. :
अशी सगळ्यांची अपेक्षा होती. प्रपंचातील सारी नातीं केवळ सुखापुरती असतात. बायको आपल्यावर अत्यंत प्रेम करतें हें खरें; पण ती देखील आपल्या स्वत:च्या सुखाकडे लक्ष देऊन असते. परदेशांत त्याला फार दगदग झाली म्हणून विश्रांती घेण्यासाठीं तो घरीं आला. पण जरा थोडी विश्रांती घेतो न घेतो तोंच पुन्हा जाण्याची पाळीं आली. नंतर ज्योतिष्याला विचारून मुहूर्त ठरविला. पण त्याचा जीव घरांत अडकल्यामुळें प्रवासाला जाणें कांहीं त्याला योग्य वाटेना. मग थोडे पैसे घेतले, थोडीं औषधें बरोबर घेतलीं, थोडें धान्य, कपडे, भांडीं अशी सामग्री घेतली, त्यांचें गांठोडें बांधलें, सगळ्या मुलांबाळांना एकदा प्रेमानें पाहिलें आणि तो मार्गाला लागला. त्यानें बायकोकडे पाहिलें तेव्हां वियोगाचें अतिशय दु:ख झालें. आपल्या प्रारब्धांत कुटुंबाशी येवढाच ऋणानुबंध आहे असा मनांत विचार आला. त्याचा गळा दाटून आला गहिवर आवरेना, बापलेकरांची ताटातूट होणार म्हणून त्याला फार दु:ख झालें. " जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल. नाहीं तर हीच आपली शेवटची भेट समजावी " असें बोलून तो घोड्यावर बसला. पण तो सारखा पुन्हा पुन्हा मागें वळून पाहात होता. वियोगाचें दु:ख त्याला सहन होत नव्हतें. पण पुढें जाण्यावांचून दुसरा कांहीं उपाय नव्हता.
   
मग त्याला आपल्या आईची आठवण झाली. कामवासनेच्या बळानें आपण चांगलें वागलों नाहीं हें पटलें. प्रपंचांत सगळा स्वार्थाचा बाजार आहे हें लक्षांत आलें. :
घोडें चालूं लागल्यावर आपलें गांव मागे राहिलें. संसाराच्या कटकटीनीं त्याच्या मनांत गोंधळ झाला. मीपणानें प्रपंचाची संगत केल्यामुळें त्याला दु:ख झालें. त्यावेळीं त्याला आई आठवली व म्हणूं लागला कीं, " धन्य ती माउली, माझ्यासाठीं तिनें फार कष्ट काढले, पण मला त्याची जाणीव झाली नाहीं. आज जर ती असती तर तिनें मला कधीच परदेशी दूर जाऊं दिलें नसतें. वियोग झाला असतां इतर नातेवाईक मोठ्यानें रडतात खरें. पण आई रडतांना तिच्या पोटांतील आग, अंत:करणातील कळकळ कांहीं वेगळीच असते.

मुलगा अगदी गरीब, भिकारी जरी असला तरी आई त्याला जवळ करते. त्याला दगदग किंवा श्रम झालेलें पाहून त्याच्या दु:खानें ती मनांत कळवळते. प्रपंचाबद्दल विचार करून पहिले तर असें दिसतें कीं प्रपंचांत बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण या शरीरास जिनें जन्म दिला ती आई मात्र मिळणार नाहीं. 

आई डाकीणी जरीं असली तरी मुलावर तिची अत्यंत माया राहते. हजार बायका केल्या तरी हें प्रेम त्यांच्यापाशीं येणार नाहीं. पण कामवासनेच्या बळानें मी अगदी वेड्यासारखा वागलों. या एका कामवासनेच्या नादानें मी जीवलगांशीं भांडलों, माझे हितकर्ते मित्र मला लबाड वाटूं लागले. म्हणून जी प्रापंचिक माणसे आईबापांशीं भक्तिभावानें वागतात ती धन्य होत. आपल्या जिवलगांच्या बाबतीत ती आपलें मन कठोर करीत नाहींत. बायको व मुलें यांचा सहवास आपल्याला जन्मभर लाभतो. परंतु आईबाप थोडे दिवस राहतात, त्यांचा सहवास जन्मभर कसा मिळेल.

या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या. पण तारुण्याच्या मस्तीमध्यें त्या कळल्या नाहींत. जणूं काय स्त्रीसुखाच्या डोहांत मन बुडून गेलें होतें. ज्यांना मी आपले मित्र मानले ते लबाड होते. माझ्यापाशीं असणार्‍या पैशाच्या निमित्तानें ते माझ्या भोवतीं गोळा झालेले होते. म्हणून पैशाशिवाय रिकाम्या हातांनी परत जाण्याची मला अत्यंत लाज वाटते. आता काय वाटेल ते करावे परंतु द्रव्य मिळवून नेले पाहिजे. आपण मोकळे ( द्रव्य न मेळवितां ) गेलो तरी तेथें सहजच दु:ख होणार. " अशा प्रकारचे विचार त्याच्या मनांत येऊं लागले. त्याचा जीव कष्टी झाला. आणि तो चिंतेच्या महापुरांत बुडुन गेला. 

या विचारांच्या प्रभावानें आपला जन्म प्रपंचापायीं फुकट गेला असें त्याला क्षणभर वाटलें. पण लगेच ममत्वाचा जोर होऊन मुलेंबाळें आठवली आणि तो मोठ्यानें गळा काढून रडूं लागला. पण तेथें अण्यांत कोण विचारणार ! मग स्वत:च शांत होऊन वाट चालूं लागला. :-
खरोखर हा आपला देह स्वत:च्या मालकीचा असून दुसर्‍याचा ताबेदार केला, ईश्वरासाठीं त्याचा वापर केला नाहीं, केवळ कुटुंबासाठीं कष्ट करण्यांत त्याला झिजविला. एका कामवासनेपायीं जन्मभर केवढा आटापिटा केला. आणि आयुष्य संपल्यावर शेवटीं एकट्यालाच जावें लागतें. अशा रीतीनें त्याच्या मनांत त्याला पश्चात्ताप झाला. तो क्षणभर अगदी उदास झाला पण लगेच तो पुन्हां मायेच्या ममत्वाच्या जाळ्यांत अडकला.

मुलींची व मुलांची त्याला आठवण झाली आणि अगदी मनापासून वाईट वाटलें. आपलीं मुलेंबाळें आपल्याला अंतरली असें तो म्हणाला. जें जें दु:ख त्यानें पूर्वी भोगलें होतें त्याचें स्मरण त्याला होऊं लागलें. मग मोठा लांब गळा काढून त्यानें रडण्यास आरंभ केला. अरण्यांत कोणी रडूं लागला तर तेथें त्याचें शांतवन करणारा कोणी भेटत नाहीं. म्हणून त्यानें आपल्या मनाशीच विचार केला. " आतां रडून काय बरें उपयोग ! जे आपल्या वाट्यांस येईल तें आपण मुकाट्यानें भोगावें. " असें बोलून त्यानें स्वत:लाच धीर दिला. दु:खानें थकलेला, भागलेला असा तो पुढें परदेशास गेला.

नंतर जो प्रसं घडला तो लक्ष देऊन ऐका.