||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास पाचवा : रजोगुण लक्षण ||
||श्रीराम ||
मुळीं देह त्रिगुणाचा| सत्त्वरजतमाचा |
त्यामध्यें सत्त्वाचा| उत्तम गुण ||१||
सत्वगुणें भगवद्भक्ती| रजोगुणें पुनरावृत्ती |
तमोगुणें अधोगती| पावति प्राणी ||२||
श्लोक ||ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः |
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ||
त्यांतहि शुद्ध आणी सबळ| तेहि बोलिजेति सकळ |
शुद्ध तेंचि जें निर्मळ| सबळ बाधक जाणावें ||३||
शुद्धसबळाचें लक्षण| सावध परिसा विचक्षण |
शुद्ध तो परमार्थी जाण| सबळ तो संसारिक ||४||
तयां संसारिकांची स्थिती| देहीं त्रिगुण वर्तती |
येक येतां दोनी जाती| निघोनियां ||५||
रज तम आणी सत्व| येणेंचि चाले जीवित्व |
रजोगुणाचें कर्तृत्व| दाखऊं आता ||६||
रजोगुण येतां शरिरीं| वर्तणुक कैसी करी |
सावध होऊनी चतुरीं| परिसावें ||७||
माझें घर माझा संसार| देव कैंचा आणिला थोर |
ऐसा करी जो निर्धार| तो रजोगुण ||८||
माता पिता आणी कांता| पुत्र सुना आणी दुहिता |
इतुकियांची वाहे चिंता| तो रजोगोण ||९||
बरें खावें बरें जेवावें| बरें ल्यावें बरें नेसावें |
दुसर्याचें अभिळाषावें| तो रजोगोण ||१०||
कैंचा धर्म कैंचें दान| कैंचा जप कैंचें ध्यान |
विचारीना पापपुण्य| तो रजोगुण ||११||
नेणे तीर्थ नेणे व्रत| नेणे अतीत अभ्यागत |
अनाचारीं मनोगत| तो रजोगोण ||१२||
धनधान्याचे संचित| मन होये द्रव्यासक्त |
अत्यंत कृपण जीवित्व| तो रजोगोण ||१३||
मी तरुण मी सुंदर| मी बलाढ्य मी चतुर |
मी सकळांमध्ये थोर- | म्हणे, तो रजोगुण ||१४||
माझा देश माझा गांव| माझा वाडा माझा ठाव |
ऐसी मनीं धरी हांव| तो रजोगोण ||१५||
दुसऱ्याचें सर्व जावें| माझेचेंचि बरें असावें |
ऐसें आठवे स्वभावें| तो रजोगोण ||१६||
कपट आणी मत्सर| उठे देहीं तिरस्कार |
अथवा कामाचा विकार| तो रजोगोण ||१७||
बाळकावरी ममताअ| प्रीतीनें आवडे कांता |
लोभ वाटे समस्तां| तो रजोगोण ||१८||
जिवलगांची खंती| जेणें काळें वाटे चित्तीं |
तेणें काळें सीघ्रगती| रजोगुण आला ||१९||
संसाराचे बहुत कष्ट| कैसा होईल सेवट |
मनास आठवे संकट| तो रजोगोण ||२०||
कां मागें जें जें भोगिलें| तें तें मनीं आठवलें |
दुःख अत्यंत वाटलें| तो रजोगोण ||२१||
वैभव देखोनि दृष्टी| आवडी उपजली पोटीं |
आशागुणें हिंपुटी- | करी, तो रजोगुण ||२२||
जें जें दृष्टी पडिलें| तें तें मनें मागितलें |
लभ्य नस्तां दुःख जालें| तो रजोगोण ||२३||
विनोदार्थीं भरे मन| शृंघारिक करी गायेन |
राग रंग तान मान| तो रजोगोण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा| सांगणें घडे वेवादा |
हास्य विनोद करी सर्वदा| तो रजोगोण ||२५||
आळस उठे प्रबळ| कर्मणुकेचा नाना खेळ |
कां उपभोगाचे गोंधळ| तो रजोगोण ||२६||
कळावंत बहुरूपी| नटावलोकी साक्षेपी |
नाना खेळी दान अर्पी| तो रजोगोण ||२७||
उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती| ग्रामज्य आठवे चित्तीं |
आवडे नीचाची संगती| तो रजोगुण ||२८||
तश्करविद्या जीवीं उठे| परन्यून बोलावें वाटे |
नित्यनेमास मन विटे| तो रजोगुण ||२९||
देवकारणीं लाजाळु| उदरालागीं कष्टाळु |
प्रपंची जो स्नेहाळु| तो रजोगुण ||३०||
गोडग्रासीं आळकेपण| अत्यादरें पिंडपोषण |
रजोगुणें उपोषण| केलें न वचे ||३१||
शृंगारिक तें आवडे| भक्ती वैराग्य नावडे |
कळालाघवीं पवाडे| तो रजोगुण ||३२||
नेणोनियां परमात्मा| सकळ पदार्थी प्रेमा |
बळात्कारें घाली जन्मा| तो रजोगुण ||३३||
असो ऐसा रजोगुण| लोभें दावी जन्ममरण |
प्रपंची तो सबळ जाण| दारुण दुःख भोगवी ||३४||
आतां रजोगुण हा सुटेना| संसारिक हें तुटेना |
प्रपंचीं गुंतली वासना| यास उपाय कोण ||३५||
उपाये येक भगवद्भक्ती| जरी ठाकेना विरक्ती |
तरी येथानुशक्ती| भजन करावें ||३६||
काया वाचा आणी मनें| पत्रें पुष्पें फळें जीवनें |
ईश्वरीं अर्पूनियां मनें| सार्थक करावें ||३७||
येथानुशक्ती दानपुण्य| परी भगवंतीं अनन्य |
सुखदुःखें परी चिंतन| देवाचेंचि करावें ||३८||
आदिअंती येक देव| मध्येंचि लाविली माव |
म्हणोनियां पूर्ण भाव| भगवंतीं असावा ||३९||
ऐसा सबळ रजोगुण| संक्षेपें केलें कथन |
आतां शुद्ध तो तूं जाण| परमार्थिक ||४०||
त्याचे वोळखीचें चिन्ह| सत्वगुणीं असे जाण |
तो रजोगुण परिपूर्ण| भजनमूळ ||४१||
ऐसा रजोगुण बोलिला| श्रोतीं मनें अनुमानिला |
आतां पुढें परिसिला| पाहिजे तमोगुण ||४२||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ||५||२. ५
गुण किती व कोणतें, ते ओळखावें कसे, त्यांचा शुद्ध व शबल असा भेद यांचें वर्णन :
मुळांत आपला देह सत्व, रज व तम या तीन गुणांचा बनलेला आहे. त्यांपैकी सत्वगुण उत्तम होय. सत्वगुणामुळें भगवंताची भक्ति उत्पन्न होते. रजोगुणामुळे पुन: जन्म घून यावें लागतें. तमोगुणामुळे प्राणी खालच्या योनींत जन्म घेतात.
श्लोकार्थ : सत्वप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीस जातात. रज:प्रधान माणसे मध्यें राहतात, हीनगुण असलेल्या स्वभावाची तम:प्रधान माणसे खाली जातात. गीता १४-१८.
जीवनामध्यें जी गतिमानता आहे, परिस्थितीवर स्वामित्व गाजविण्याची लालसा आहे,बदलण्याची हौस आहे, ती रजोगुणाचें व्यक्तिरुप समजावें. कोणतेंही मोठें ध्येय गांठ्ण्यास रजोगुणाची मोठीच मदत लागते. पण तो प्रपंचाकडे वळला कीं त्याचा दुरुपयोग होतो. त्यांचें वर्णन श्री समर्थ करतात :
शरीरांत रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो अगदीं लक्ष देऊन शहाण्यांनीं ऐकावें. हें घर माझें, हा संसार माझा आहे. त्यांत देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला ! असा जो खात्रीनें ठरवतो तो रजोगुण होय. आई, बाप, बायको, मुलगे, सुना आणि मुली इत्क्यांचीच जो काळजी करतो तो रजोगुण होय. बरें खावें, बरें जेवावें, बरें अंगावर घालावें, बरें नेसावें आणि दुसर्या च्या वस्तूंचा अभिलाष धरावा तो रजोगुण होय. कसला धर्म, कसलें दान, कसला जप, आणि कसलें ध्यान ! याप्रमाणें पापपुण्याचा जो विचारच करीत नाहीं तो रजोगुण होय. जो तीर्थ, व्रत, अतिथी, अभ्यागत जाणत नाहीं, अनाचाराकडे ज्याचें मन स्वभावत: वाल्तेम तो रजोगुण होय. ज्याच्या घरीं पैसा व धान्य पुष्कळ सांठवलेले असतात तरी ज्याचें मन पैशामध्यें गुंतलेले असतें, शिवाय जो अत्यंत कंजुषपणानें जगतो तो रजोगुण होय.
मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वांत मीच थोर आहे असें जो समजतो तो रजोगुण होय. माझा देश, माझें गांव, माझा वाडा, माझें ठिकाण असा अभिमान जो मनांत वागवतो तो रजोगुण होय.
रजोगुणी माणूस प्रपंचामध्यें माझेंपणानें, ममत्वानें कसा गुंतलेला असतो यांचें वर्णन झालें. आतां वासना गुंतल्यामुळें तो कसा दु:ख भोगतो तें सांगतात. :
दुसर्याचें सगळें नाहींसें व्हावें पण माझेंच मात्र चांगलें असावें असें स्वाभाविकपणें ज्याचें मन चिंतन करतें तो रजोगुण होय. ज्याच्या मनांत कपात असतें, जो दुसर्याचा मत्सर करतो, ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवतें आणि जो दुसर्यास तुच्छ समजतो तो रजोगुण होय. ज्याला मुलाबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळें बायको मनापासून आवडते, सर्वांचा लोभ असतो तो रजोगुण होय. आपल्या निकटच्या नातेवाइकाबद्दल जेव्हां मनास अस्वस्थता येऊन दु:ख वाटतें तेव्हां रजोगुण जोरानें अंतरीं शिरला आहे असें समजावें.
संसारामध्यें फार कष्ट आहेत, तो शेवटपर्यंत कसा जाईल, या विचारांनीं मन करूं लागलें आणि आतां तें भोग नाहींत म्हणून दुख वाटूं लागलें म्हणजे तो रजोगुण होय. दुसर्याचें वैभव पहिलें व आपल्याला तें असावें अशी इच्छा मनांत उत्पन झाली. त्या इच्छेपायी जो दु:ख करतो तो रजोगुण होय. जें जें डोळ्यांनीं पाहिलें तें तें हवें म्हणून मनानें मागितलें. परतुं तें मिळाले नाहीं तर जें दु:ख होतें तो रजोगुण होय. ज्याचें मन विनोदाच्या वृत्तीनें भरुन जातें जो शृंगारिक गाणीं गातो, राग, स्वर, ताना आणि हावभाव यांनीं गायनांत रंगून जातो त्याच्या अंतरीं रजोगुण भरला असें समजावें. जो दुसर्याची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, ज्याच्या बोलण्यानें वाद माजतो, जो सदा सर्वकाळ हास्यविनोद करतो त्याच्या अंतरीं रजोगुण भरला असें मानावें. ज्याच्या अंगांत अतिशय आळस शिरतो, जो नाना प्रकारच्या करमणुकीचें खेळ खेळतो, किंवा जेथें व्यसनांचा गदारोळ, धुमाकूळ चालतो तो रजोगुण होय.
जो कलावंत असतो,निरनिराळीं सोंगें घेऊं शकतो,नाटक पाहण्याचा फार शोकीन असतो, निरनिराळ्या खेळांत पैसा घालवितो त्यांच्या अंतरीं रजोगुण असतो. अंमल किंवा धुंदी आणणार्याअ पदार्थांवर अतिशय प्रेम, गांवगुंडीचें किंवा गांवच्या भानगडीचें सारखे चिंतन, हलकट लोकांच्या संगतींची आवड, या गोष्टी जेथें असतात तेथें रजोगुण असतो.
रजोगुणी माणूस नुसता प्रपंचात गुंतलेला असतो इतकेंच नव्हे तर देहाला व इंद्रियांना सुख देण्याच्या सारखा मागें असतो. हें वर्णन झाल्यावर त्याला भक्ति, वैराग्य, सत्समागम हीं आवडत नाहींत असें श्री समर्थ सांगतात :
चोरी करण्यास शिकावें असें मनांतून वाटतें, दुसर्याचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असें वाटतें, आणि उपासनेच्या नित्य नियमाचा कंटाळा येतो तो रजोगुण होय. देवाचें कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठीं पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्यें ज्याचें मन गुंतून जातें तो रजोगुण होय. गोड खाण्याची मनापासून आवड असते, देहाला पोसण्याबद्दल मोठा आदर असतो, आणि उपवास केला तर तो सहन होत नाहीं तो रजोगुण होय. शृंगरिक विषय स्वाभाविकपणें आवडतात, भक्ति व वैराग्य मनापासून नको वाटतात, आणि मोठ्या रसिकपणें कलेचें कौतुक करण्यांत हुशार असतो तो रजोगुण होय.
परमात्म्याचें ज्ञान नसल्यामुळें सर्व दृश्य वस्तूंवर खरें प्रेम असतें आणि पुन:जन्म नको असला तरी ज्याच्या जबरदस्तीनें तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय. असो. रजोगुण हा असा आहे. मन आसक्तींत गुंतल्यामुळे तो जन्ममरण भोगायला लावतो. प्रपांच्यामध्यें त्याचा जोर असतो. तो भयंकर दु:ख भोगायला लावतो.
रजोगुणांमुळें वासना प्रपंचांत गुंतून राहते. तेथून ती सुटण्यास भगवंताची भक्ति हाच खरा उपाय आहे. आपलें मन भगवंताला अर्पून त्याच्यावर प्रेम करायला शिकावें. शबल रजोगुण संसारिक बनवतो तर शुद्ध रजोगुण भक्तीचा मार्ग दाखवतो :
आता रजोगुण हा तर सुटतां सुटत नाहीं, संसाराचीं बंधनें तर कांही तुटत नाहींत, वासना तर प्रपंचात गुंतून राहते. यावर काय उपाय करावा ! याला एकच आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ति साधण्यास वैराग्य हवें, म्हणजे प्रपंच्यात मन आसक्त नसावें, हें जर साधलेलें नसेल तर आपल्या शक्तीप्रमाणें भगवंताचें भजन करावें.
कायेनें, वाचेनें आणि मनानें पान, फुल, फळ व पाणी अगदीं मनापासून ईश्वराला अर्पण करावें व सार्थक करून घ्यावें, आपणांस शक्य असेल तेवढें दान करावें, पुण्यकर्म करावें. परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावें. तसेंच संसारामधील सुखदु:खें भोगीत असतां फक्त भगवंताचेंच चिंतन करावें. या दृश्य विश्वाच्या आधीं आणि नंतर एक देवच शिल्लक उरतो. मध्येंच तेवढी ही माया दिसते. म्हणून तिला खरी न मानतां फक्त भगवंतावर पूर्ण भरंवसा ठेवावा.
अशा शबल किंवा संमिश्र रजोगुणाचें थोडक्यात वर्णन केलें. शुद्ध रजोगुण परमार्थाकडे नेणारा असतो हें ध्यानांत ठेवावें. शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्वगुणांत आढळतात. तोच संपूर्णपणें भगवंताच्या भक्तीचें मूळ आहे. असा रजोगुण सांगून झाला. श्रोत्यांना कल्पनेनें त्याचा अंदाज आला, किंवा त्याच्या स्वरुपाची कल्पना आली. आता पुढें तमोगुण ऐकणें जरूर आहे.