|| दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास सातवा : कवेश्वरस्तवन
||श्रीराम ||
आतां वंदूं कवेश्वर| शब्दसृष्टीचे ईश्वर |
नांतरी हे परमेश्वर| वेदावतारी ||१||
कीं हे सरस्वतीचें निजस्थान| कीं हे नाना कळांचें जीवन |
नाना शब्दांचें भुवन| येथार्थ होये ||२||
कीं हे पुरुषार्थाचें वैभव| कीं हे जगदीश्वराचें महत्व |
नाना लाघवें सत्कीर्तीस्तव| निर्माण कवी ||३||
कीं हे शब्दरत्नाचे सागर| कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर |
नाना बुद्धीचे वैरागर| निर्माण जाले ||४||
अध्यात्मग्रंथांची खाणी| कीं हे बोलिके चिंतामणी |
नाना कामधेनूचीं दुभणीं| वोळलीं श्रोतयांसी ||५||
कीं हे कल्पनेचे कल्पतरु| कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु |
नाना सायोज्यतेचे विस्तारु| विस्तारले ||६||
कीं हा परलोकींचा निजस्वार्थु| कीं हा योगियांचा गुप्त पंथु |
नाना ज्ञानियांचा परमार्थु| रूपासि आला ||७||
कीं हे निरंजनाची खूण| कीं हे निर्गुणाची वोळखण |
मायाविलक्षणाचे लक्षण| ते हे कवी ||८||
कीं हा श्रुतीचा भावगर्भ| कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ |
नातरी होये सुल्लभ| निजबोध कविरूपें ||९||
कवि मुमुक्षाचें अंजन| कवि साधकांचें साधन |
कवि सिद्धांचें समाधान| निश्चयात्मक ||१०||
कवि स्वधर्माचा आश्रयो| कवि मनाचा मनोजयो |
कवि धार्मिकाचा विनयो| विनयकर्ते ||११||
कवि वैराग्याचें संरक्षण| कवि भक्तांचें भूषण |
नाना स्वधर्मरक्षण| ते हे कवी ||१२||
कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती| कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति |
कवि उपासकांची वाड कीर्ती| विस्तारली ||१३||
नाना साधनांचे मूळ| कवि नाना प्रेत्नांचें फळ |
नाना कार्यसिद्धि केवळ| कविचेनि प्रसादें ||१४||
आधीं कवीचा वाग्विळास| तरी मग श्रवणीं तुंबळे रस |
कविचेनि मतिप्रकाश| कवित्वास होये ||१५||
कवि वित्पन्नाची योग्यता| कवि सामर्थ्यवंतांची सत्ता |
कवि विचक्षणाची कुशळता| नाना प्रकारें ||१६||
कवि कवित्वाचा प्रबंध| कवि नाना धाटी मुद्रा छंद |
कवि गद्यपद्यें भेदाभेद| पदत्रासकर्ते ||१७||
कवि सृष्टीचा आळंकार| कवि लक्ष्मीचा शृंघार |
सकळ सिद्धींचा निर्धार| ते हे कवी ||१८||
कवि सभेचें मंडण| कवि भाग्याचें भूषण |
नाना सुखाचें संरक्षण| ते हे कवी ||१९||
कवि देवांचे रूपकर्ते| कवि ऋषीचें महत्ववर्णिते |
नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते| कवि वाखाणिती ||२०||
नस्ता कवीचा व्यापार| तरी कैंचा अस्ता जगोद्धार |
म्हणौनि कवि हे आधार| सकळ सृष्टीसी ||२१||
नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं| कवेश्वरेंविण तों नाहीं |
कवीपासून सर्वही| सर्वज्ञता ||२२||
मागां वाल्मीक व्यासादिक| जाले कवेश्वर अनेक |
तयांपासून विवेक| सकळ जनासी ||२३||
पूर्वीं काव्यें होतीं केलीं| तरीच वित्पत्ती प्राप्त झाली |
तेणे पंडिताआंगीं बाणली| परम योग्यता ||२४||
ऐसे पूर्वीं थोर थोर| जाले कवेश्वर अपार |
आतां आहेत पुढें होणार| नमन त्यांसी ||२५||
नाना चातुर्याच्या मूर्ती| किं हे साक्षात् बृहस्पती |
वेद श्रुती बोलों म्हणती| ज्यांच्या मुखें ||२६||
परोपकाराकारणें| नाना निश्चय अनुवादणें ||
सेखीं बोलीले पूर्णपणें| संशयातीत ||२७||
कीं हे अमृताचे मेघ वोळले| कीं हे नवरसाचे वोघ लोटले |
नाना सुखाचे उचंबळले| सरोवर हे ||२८||
कीं हे विवेकनिधीचीं भांडारें| प्रगट जालीं मनुष्याकारें |
नाना वस्तूचेनि विचारें| कोंदाटले हे ||२९||
कीं हे आदिशक्तीचें ठेवणें| नाना पदार्थास आणी उणें |
लाधलें पूर्व संचिताच्या गुणें| विश्वजनासी ||३०||
कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं| आक्षै आनंदे उतटलीं |
विश्वजनास उपेगा आलीं| नाना प्रयोगाकारणे ||३१||
कीं हे निरंजनाची संपत्ती| कीं हे विराटाची योगस्थिती |
नांतरी भक्तीची फळश्रुती| फळास आली ||३२||
कीं हा ईश्वराचा पवाड| पाहातां गगनाहून वाड |
ब्रह्मांडरचनेहून जाड| कविप्रबंदरचना ||३३||
आतां असो हा विचार| जगास आधार कवेश्वर |
तयांसी माझा नमस्कार| साष्टांग भावें ||३४||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवेश्वरस्तवननाम समास सातवा ||७||१. ७
प्रथम कवीच्या प्रतिभेचे सामान्य स्वरूप सांगतात:
आतां मी थोर कवींना नमस्कार करतो. कवि शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. कवि म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय.काविचें अंत: कारण म्हणजे सरस्वतीचें स्वत:च्या मालकीचे राहतें घरच समजावें. कवीला सरस्वति पूर्ण वश असते, ती त्याच्यापाशी सदैव राहते. नाना प्रकारच्या कलांना कवि जिवंत ठेवतो. तसेंच अगदी खर्र्या अर्थानें किती तरी शब्द कवीच्या ह्द्यांत येऊन राहतात. कवीचा शब्दसंग्रह फार मोठा असतो.
जगांतील उत्तम मूल्यांचे एश्वर्य दाखवण्यासाठी, भगवंताचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तर्र्हेच्या कोंशल्याने संताची कीर्ती सांगण्यासाठी कवि जन्मास येतात. कवि हे शब्दरूपी रत्नांचे समुद्र असतात.त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो. कवींच्या अंत:करणरुपी सरोवरांत मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करतात.मुक्त पुरुषाच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना कवीच करुं शकतात. बुद्धीच्या विलासाचे नाना प्रकारचे खेळ करून दाखविणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात. कवि हे अध्यात्म ग्रंथांची खाण असतात. ते खूप अध्यात्मग्रंथ लिहू शकतात.ते बोलके जिवंत चितामणी असतात. कवि म्हणजे श्रोत्यांना विनाकष्ट प्यायला मिळालेले कामधेनचे अमृतासमान दूधच होय.
कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावे, कारणकारण हवी तेव्हां प्रतिभा त्याच्या सेवेला हजर असते.मोक्षाचा सांठा वाळगणारा हा कवि सायुज्यमुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच होय.कवि आपल्या काव्यामद्ये सायुज्यमुक्तीचें अति विस्तारानें वर्णन करतात. मृत्युलोकापलीकडे जीवाच्या अवस्था, योगी लोकांचा पटचक्रभेदन मार्ग आणि ज्ञानमार्गाने जाणार्यांचा परमार्थ हे तिन्ही अति सूक्ष्म, अतीद्रिय आणि म्हणून अति गुप्त असतात. कवि आपल्या शब्दसामर्थ्यानें त्यांना साकार करून उघड करतो, सामान्य माणसापर्यंत पोंचवतो. त्याचप्रमाणें परमात्मस्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध, मल रहित आहे. तें त्रिगुणांच्या बाहेर असतें, मायेच्या पलीकडे राहतें. माणसाची कल्पना व बुद्धी तेथें लटक्या पडतात. शब्द तेथें पोचूं शकत नाहींत. तरी कवि आपल्या काव्यशक्तीनें त्याची खून सागतो, ओळखण करून देतो आणि त्याचें लक्षण समजावून देतो.
कवि श्रुतीला काय सांगायचें आहे तें गूढ उकलतो. कवी भेटणें म्हणजे जणूं काय परमेश्वराचा अलभ्य लाभच होणें. कवीच्या सहवासानें आत्मज्ञान सुलभ होतें.
व्यक्तीवर व मानवीजीवनावर कवीचे होणारे परिणाम श्री समर्थ आतां सांगतात:
कवीच्या प्रतिभेनें मुमुक्षुला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते, साधन कोणतें करावें तें साधकांना समजतें, आणि सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते. कवीच्या प्रतीपादनेनें स्वकतव्याची जाणीव होते, मनोजयाचे उपाय समजतात आणि धर्मिकांना नीतीचें वळण लागतें. वैराग्याचें महत्व मनावर ठसून कवि माणसाना वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात, भक्तीचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात, आणि आचारधर्माची आवशक्यता सांगून धर्मरक्षण करतात. प्रेमी पुरुषाच्या प्रेमावस्था कवि शब्दांमध्ये गुंफतात, ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात, आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवितात. वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात, भक्तीचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गैरव करतात, आणि आचारधर्माची आवशक्यता सांगून धर्मरक्षण करतात. प्रेमी पुरुषाच्या प्रेमावस्था कवि शब्दांमध्ये गुंफतात, ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात, आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवितात. वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात, भक्तीचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गैरव करतात, आणि आचारधर्माची आवशक्यता सांगून धर्मरक्षण करतात. प्रेमी पुरुषाच्या प्रेमावस्था कवि शब्दांमध्ये गुंफतात, ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंताचा प्रत्यय अंतरी कसा येतो त्याची कल्पना देतात, आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवितात.
कवि नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात. अनेक प्रकारच्या साधनफलांचें वर्णन करतात आणि इतकेंच नव्हे तर त्यांच्या कृपेनेंच निरनिराळ्या कार्यामध्यें यश:प्राप्ती होते. कवीच्या वाणीचा विलास सुरु झाला, कवी काव्य बोलूं लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणार्यांचें कान अगदी तृप्त होतात. पूर्वीच्या कवींनी रचलेलीं उत्कृष्ट काव्यें वाचून नंतरच्या कवींची कविताश्क्ती जागी होते. विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता, आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवि अनेक प्रकारे वर्णन करतात. कवि नाना प्रकारचें काव्य प्रबंध रचतात.अनेक प्रकारच्या ग्द्याप्द्यादी वाड.मयांमध्यें कवि लेखनाच्या निरनिराळ्या धाटी, छंद, प्रास व अलंकार वापरतात. कवि त्यांचे नवेनवे प्रकार सुरु करतात. या चारचार सृष्टीला कवि एखाद्या दागीण्याप्रमाणें शोभून दिसतो. कवित्वामुळें ऐश्वर्य सजविलें जातें. कवि हे सर्व निर्णयांना निश्चीतपणा देतात. कवि सभेला शोभा आणतात, भाग्याला भूषण देतात, नाना प्रकारच्या सुखांचे संरक्षण करतात. अदृश्य देवांना कवि रुप्प देऊन दृश करतात. ऋषींचे महत्व पटवून देतात, आणि नाना शास्त्रांचें सामर्थ्य, अधिकार व स्थान समजावून सांगतात.. मोठमोठ्या कवींनीं उत्कृष्ट काव्यें रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता. म्हणून सबंध मानवी जीवनाला कवि हे मोठे आधार आहेत.
पूर्वीच्या समकालीन आणि पुढच्या सर्व थोर कवींना श्री समर्थ वंदन करतात : अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळालें नसतें. काविमुळेच सर्व ज्ञान जगांत पसरतें. मागें व्यास, वाल्मिकी, इत्यादि अनेक महाकवी झाले. त्यांनीच लोकांना विवेक शिकविला. पूर्वी काव्यें केलेलीं होतीं. तीं पाठ केल्यानें मोठमोठ्या पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली. त्या विद्वत्तेमुळें त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली. पूर्वी असे मोठमोठे कितीतरी कवि होऊन गेले. आतां आहेत व पुढेंही होतील. त्या सर्वांना मी नमस्कार करतो.
कवि म्हणजे ईश्वरी शक्तीचें भांडार होय:
कवि हे चातुर्याच्या मूर्ती असतात. प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात. वेद श्रुतींना सुद्धां असें वाटतें कीं त्यांच्या मुखांने आपण शब्दरूपानें प्रगट व्हावें. केवळ परोपकारासाठी अनेक प्रकारचे सिद्धांत कवि आपल्या काव्यामध्यें सांगतात. पूर्णपणें संशयातीत असेच सिद्धांत अखेर तें सांगतात. कवि म्हणजे लोकांवर काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ किंवा नवरसांनीं भरून वाहणारे मोठे प्रवाह किंवा अनेक प्रकारच्या सुखांनीं भरलेलीं, उचंबळणारीं सरोवरें आहेत. कवि म्हणजे मनुष्यरुपानें प्रगट झालेलीं विवेकरुपीं संपत्तीचीं कोठारें आहेत. कवींचें अंतरंग परमात्मवस्तूच्या विचारांनीं गच्च भरलेलें असतें. आदिपुरूषीं दडी मारून राहणारी ईश्वराची निजशक्ति जी महामाया तिची ठेव, तिचें मर्मस्थान म्हणजे हे कवि. जगांतील सर्व पदार्थांना उणे मारणारी, तुच्छ करणारी हि ठेव पूर्वपुण्याईच्या योगानें असर्व लोकांना लाभते. कवि म्हणजे अक्षय स्वानंदानें काठोकांठ भरलेलीं सुखाची तारवें जीवन प्रवाहांत तरंगत असतात. अनेक योजना, अनेक उद्योग सफल करण्यासाठीं हीं जहाजें सर्व लोकांना उपयोगी पडतात.
कवि म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचें ऐश्वर्य होय. दृश्य विश्वाला अंतर्यामीपणानें सांभाळणारा जो विराट-पुरुष त्याची ध्यानावस्था म्हणजे हे कवि. भेदानें भरलेल्या विश्वात व्य्पून देखील ईश्वर अभेद अवस्थेंच राहतो. भेदांत असून भेदांचे भान त्याला नसते. हीं त्याची ध्यानमग्न अवस्था. तेंच कवीचें रूप होय. काव्य प्रसवतांना कवि ध्यानमग्न असतो, ईश्वराशीं तादात्म्य पावतो. कवि म्हणजे साकार झालेल्या भक्तीचा परिणाम होय. भगवंताच्या प्रेमाची कल्पना कवीच प्रत्यक्षांत मांडतो. आकाशाहून विशाल असणारीं ईश्वराची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवि.म्हणून कवीची काव्यरचना या ब्रम्हांडाहूनही विशाल असते. कविवर्णनाचे माझे विचार येथें मी पुरे करतो. महाकवी हे जगाचे म्हणजेच मानवसामाजाचे आधार असल्यामुळें त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो.