श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Monday, December 13, 2010

|| दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास पहिला : मूर्खलक्षण ||



|| दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास पहिला : मूर्खलक्षण || 
                  
||श्रीराम ||

नमोजि गजानना| येकदंता त्रिनयना |
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ||||

तुज नमूं वेदमाते| श्रीशारदे ब्रह्मसुते |
अंतरी वसे कृपावंते| स्फूर्तिरूपें ||||

वंदून सद्गुरुचरण| करून रघुनाथस्मरण |
त्यागार्थ मूर्खलक्षण| बोलिजेल ||||

येक मूर्ख येक पढतमूर्ख| उभय लक्षणीं कौतुक |
श्रोतीं सादर विवेक| केला पाहिजे ||||

पढतमूर्खाचें लक्षण| पुढिले समासीं निरूपण |
साअवध होऊनि विचक्षण| परिसोत पुढें ||||

आतां प्रस्तुत विचार| लक्षणें सांगतां अपार |
परि कांहीं येक तत्पर| होऊन ऐका ||||

जे प्रपंचिक जन| जयांस नाहीं आत्मज्ञान |
जे केवळ अज्ञान| त्यांचीं लक्षणें ||||

जन्मला जयांचे उदरीं| तयासि जो विरोध करी |
सखी मनिली अंतुरी| तो येक मूर्ख ||||

सांडून सर्वही गोत| स्त्रीआधेन जीवित |
सांगे अंतरींची मात | तो येक मूर्ख ||||

परस्त्रीसीं प्रेमा धरी| श्वशुरगृही वास करी |
कुळेंविण कन्या वरी| तो येक मूर्ख ||१०||

समर्थावरी अहंता| अंतरीं मानी समता |
सामर्थ्येंविण करी सत्ता| तो येक मूर्ख ||११||

आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२||

अकारण हास्य करी| विवेक सांगतां न धरी |
जो बहुतांचा वैरी| तो येक मूर्ख ||१३||

आपुलीं धरूनियां दुरी| पराव्यासीं करी मीत्री |
परन्यून बोले रात्रीं| तो येक मूर्ख ||१४||

बहुत जागते जन| तयांमध्यें करी शयन |
परस्थळीं बहु भोजन- | करी, तो येक मूर्ख ||१५||

मान अथवा अपमान| स्वयें करी परिच्छिन्न |
सप्त वेसनीं जयाचें मन| तो येक मूर्ख ||१६||

धरून परावी आस| प्रेत्न सांडी सावकास |
निसुगाईचा संतोष- | मानी, तो येक मूर्ख ||१७||

घरीं विवेक उमजे| आणि सभेमध्यें लाजे |
शब्द बोलतां निर्बुजे| तो येक मूर्ख ||१८||

आपणाहून जो श्रेष्ठ| तयासीं अत्यंत निकट |
सिकवेणेचा मानी वीट| तो येक मूर्ख ||१९||

नायेके त्यांसी सिकवी| वडिलांसी जाणीव दावी |
जो आरजास गोवी| तो येक मूर्ख ||२०||

येकायेकीं येकसरा| जाला विषईं निलाजिरा |
मर्यादा सांडून सैरा- | वर्ते, तो येक मूर्ख ||२१||


औषध न घे असोन वेथा| पथ्य न करी सर्वथा |
न मिळे आलिया पदार्था| तो येक मूर्ख ||२२.

संगेंविण विदेश करी| वोळखीविण संग धरी |
उडी घाली माहापुरीं| तो येक मूर्ख ||२३||

आपणास जेथें मान| तेथें अखंड करी गमन |
रक्षूं नेणे मानाभिमान| तो येक मूर्ख ||२४||

सेवक जाला लक्ष्मीवंत| तयाचा होय अंकित |
सर्वकाळ दुश्चित्त| तो येक मूर्ख ||२५||

विचार न करितां कारण| दंड करी अपराधेंविण |
स्वल्पासाठीं जो कृपण| तो येक मूर्ख ||२६||

देवलंड पितृलंड| शक्तिवीण करी तोड |
ज्याचे मुखीं भंडउभंड| तो येक मूर्ख ||२७||

घरीच्यावरी खाय दाढा| बाहेरी दीन बापुडा |
ऐसा जो कां वेड मूढा| तो येक मूर्ख ||२८||

नीच यातीसीं सांगात| परांगनेसीं येकांत |
मार्गें जाय खात खात| तो येक मूर्ख ||२९||

स्वयें नेणे परोपकार| उपकाराचा अनोपकार |
करी थोडें बोले फार| तो येक मूर्ख ||३०||

तपीळ खादाड आळसी| कुश्चीळ कुटीळ मानसीं |
धारीष्ट नाहीं जयापासीं| तो येक मूर्ख ||३१||

विद्या वैभव ना धन| पुरुषार्थ सामर्थ्य ना मान |
कोरडाच वाहे अभिमान| तो येक मूर्ख ||३२||
  
लंडी लटिका लाबाड| कुकर्मी कुटीळ निचाड |
निद्रा जयाची वाड| तो येक मूर्ख ||३३||

उंचीं जाऊन वस्त्र नेसे| चौबारां बाहेरी बैसे |
सर्वकाळ नग्न दिसे| तो येक मूर्ख ||३४||

दंत चक्षु आणी घ्राण| पाणी वसन आणी चरण |
सर्वकाळ जयाचे मळिण| तो येक मूर्ख ||३५||

वैधृति आणी वितिपात| नाना कुमुहूर्तें जात |
अपशकुनें करी घात| तो येक मूर्ख ||३६||

क्रोधें अपमानें कुबुद्धि| आपणास आपण वधी |
जयास नाहीं दृढ बुद्धि| तो येक मूर्ख ||३७||

जिवलगांस परम खेदी| सुखाचा शब्द तोहि नेदी |
नीच जनास वंदी| तो येक मूर्ख ||३८||

आपणास राखे परोपरी| शरणागतांस अव्हेरी |
लक्ष्मीचा भरवसा धरी| तो येक मूर्ख ||३९||

पुत्र कळत्र आणी दारा| इतुकाचि मानुनियां थारा |
विसरोन गेला ईश्वरा| तो येक मूर्ख ||४०||

जैसें जैसें करावें| तैसें तैसें पावाअवें |
हे जयास नेणवे| तो येक मूर्ख ||४१||

पुरुषाचेनि अष्टगुणें| स्त्रियांस ईश्वरी देणें |
ऐशा केल्या बहुत जेणें| तो येक मूर्ख ||४२||

दुर्जनाचेनि बोलें| मर्यादा सांडून चाले |
दिवसा झांकिले डोळे| तो येक मूर्ख ||४३||
  
देवद्रोही गुरुद्रोही| मातृद्रोही पितृद्रोही |
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही| तो येक मूर्ख ||४४||

परपीडेचें मानी सुख| पससंतोषाचें मानी दुःख |
गेले वस्तूचा करी शोक| तो येक मूर्ख ||४५||

आदरेंविण बोलणें| न पुसतां साअक्ष देणें |
निंद्य वस्तु आंगिकारणें| तो येक मूर्ख ||४६||

तुक तोडून बोले| मार्ग सांडून चाले |
कुकर्मी मित्र केले| तो येक मूर्ख ||४७||

पत्य राखों नेणें कदा| विनोद करी सर्वदा |
हासतां खिजे पेटे द्वंदा| तो येक मूर्ख ||४८||

होड घाली अवघड| काजेंविण करी बडबड |
बोलोंचि नेणे मुखजड| तो येक मूर्ख ||४९||

वस्त्र शास्त्र दोनी नसे| उंचे स्थळीं जाऊन बैसे |
जो गोत्रजांस विश्वासे| तो येक मूर्ख ||५०||

तश्करासी वोळखी सांगे| देखिली वस्तु तेचि मागे |
आपलें आन्हीत करी रागें| तो येक मूर्ख ||५१||

हीन जनासीं बरोबरी| बोल बोले सरोत्तरीं |
वामहस्तें प्राशन करी | तो येक मूर्ख ||५२||

समर्थासीं मत्सर धरी| अलभ्य वस्तूचा हेवा करी |
घरीचा घरीं करी चोरी| तो येक मूर्ख ||५३||

सांडूनियां जगदीशा| मनुष्याचा मानी भर्वसा |
सार्थकेंविण वेंची वयसा| तो येक मूर्ख ||५४||


संसारदुःखाचेनि गुणें| देवास गाळी देणें |
मैत्राचें बोले उणें| तो येक मूर्ख ||५५||

अल्प अन्याय क्ष्मा न करी| सर्वकाळ धारकीं धरी |
जो विस्वासघात करी| तो येक मूर्ख ||५६||

समर्थाचे मनींचे तुटे| जयाचेनि सभा विटे |
क्षणा बरा क्षणा पालटे| तो येक मूर्ख ||५७||

बहुतां दिवसांचे सेवक| त्यागून ठेवी आणिक |
ज्याची सभा निर्नायेक| तो येक मूर्ख ||५८||

अनीतीनें द्रव्य जोडी| धर्म नीति न्याय सोडी |
संगतीचें मनुष्य तोडी| तो येक मूर्ख ||५९||

घरीं असोन सुंदरी| जो सदांचा परद्वारी |
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी| तो येक मूर्ख ||६०||

आपुलें अर्थ दुसऱ्यापासीं| आणी दुसऱ्याचें अभिळासी |
पर्वत करी हीनासी| तो येक मूर्ख ||६१||

अतिताचा अंत पाहे| कुग्रामामधें राहे |
सर्वकाळ चिंता वाहे| तो येक मूर्ख ||६२||

दोघे बोलत असती जेथें| तिसरा जाऊन बैसे तेथें |
डोई खाजवी दोहीं हातें| तो येक मूर्ख ||६३||

उदकामधें सांडी गुरळी| पायें पायें कांडोळी |
सेवा करी हीन कुळीं | तो येक मूर्ख ||६४||

स्त्री बाळका सलगी देणें| पिशाच्या सन्निध बैसणें |
मर्यादेविण पाळी सुणें| तो येक मूर्ख ||६५||
  
परस्त्रीसीं कळह करी| मुकी वस्तु निघातें मारी |
मूर्खाची संगती धरी| तो येक मूर्ख ||६६||

कळह पाहात उभा राहे| तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे| तो येक मूर्ख ||६७||

लक्ष्मी आलियावरी| जो मागील वोळखी न धरी |
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी| तो येक मूर्ख ||६८||

आपलें काज होये तंवरी| बहुसाल नम्रता धरी |
पुढीलांचें कार्य न करी| तो येक मूर्ख ||६९||

अक्षरें गाळून वाची| कां तें घाली पदरिचीं |
नीघा न करी पुस्तकाची| तो येक मूर्ख ||७०||

आपण वाचीना कधीं| कोणास वाचावया नेदी |
बांधोन ठेवी बंदीं| तो येक मूर्ख ||७१||

ऐसीं हें मूर्खलक्षणें| श्रवणें चातुर्य बाणे |
चीत्त देउनियां शहाणे| ऐकती सदा ||७२||

लक्षणें अपार असती| परी कांहीं येक येथामती |
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं| क्ष्मा केलें पाहिजे ||७३||

उत्तम लक्षणें घ्यावीं| मूर्खलक्षणें त्यागावीं |
पुढिले समासी आघवीं| निरोपिलीं ||७४||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्षणनाम समास पहिला ||||२. १


समासारंभी गणपती, शारदा व श्रीसदगुरु यांना वंदन आणि श्रीरामस्मरण :
तीन डोळे व एक दात असलेल्या ओंकाररूप गजाननाला मी नमस्कार करतो. माझी प्राथना ही कीं "देवा, तुम्ही कृपादृष्टीनें आपल्या या भक्ताकडे पाहावें."

वेदांची माता आणि ब्रह्मदेवाची कन्या श्रीशारदा तिला मी नमस्कार करतो. माझी प्रार्थना अशी कीं, "हे दयामाय देवी, माझ्या अंत:करणात तूं स्फूर्तिरूपानें राहा." नंतर आत्मस्वरूप सदगुरुंच्या चरणांना मी नमस्कार करतो आणि माझ्या स्वामीचें म्हणजे श्रीरामचंद्राचें स्मरण करून मुर्खांची लक्षणें सांगतो ती ऐकावी व त्यांचा त्याग करावा.

मूर्खाचे प्रकार व त्यांची अपार लक्षणें :
जगांतील मूर्खाचे प्रकार दोन, एक मूर्ख व दुसरा पढतमूर्ख. दोघांची लक्षणें ऐकून गंमत वाटेल. श्रोत्यांनी आदरानें ती ऐकावीत आणि तयार विचार करावा. पढतमुर्खाचीं लक्षणें पुढील समासांत - म्हणजे दहाव्या समासांत सांगितली आहेत. शहाण्या श्रोत्यांनीं तीं लक्षपूर्वक ऐकावीत. येथें आतां मूर्खलक्षणांचा विचार करायचा आहे. समग्र सांगायचें म्हटलें तर ती लक्षणें अपार आहेत. त्यापैंकी कांहीं लक्षणें मी येथें सांगतो. ती मात्र मनापासून ऐकावीत.

ज्यांना आत्मज्ञान नाहीं, जे अगदी अज्ञानी आणि म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणें गुंतलेले असतात, अशा लोकांचीं हीं सर्वसामान्य लक्षणें आहेत.

कामवासनेपायी अत्यंत स्त्रीआधीन जीवित जगणारा तो मूर्ख : ज्या आईबापांच्या पोटीं जन्म घेतो त्यांच्यावरच उलटतो, आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो, इतर सर्व नातेवाईकांना बाजूस सारून जो बाईलबुध्या बनतो, आपलें अंत:करण फक्त बायकोपाशींच उघड करतो, जो परस्त्रीवर प्रेम करतो, आपल्या सासुरवाडीस अन्हुत जाऊन राहतो, कुलशील न पाहतां कोणत्याही मुलीशीं लग्न करतो, तो माणूस मूर्ख समजावा.                

मोठा अहंकरी, बढाईखोर, निंदक आणि व्यसनी असणारा तो मूर्ख : आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसासमोर जो मोठया अहंकाराने वागतो, तो व आपण बरोबरीचे आहोत असें मनांत समजतो,तसा अधिकार नसतांना जो दुसर्र्यावर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो,जो आपण स्वतःच आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो तर दुसरीकडे " आमचे पूर्वज व वाडवडील असे होते तसे होते," वगैरे बढाई मारतो
कांहीं कारण नसतां जो औइच हंसत सुटतो, दुसर्‍यानें दिलेला योग्य सल्ला जो ऐकत नाही, जो पुष्कळ लोकाशीं वांकडा असतो. स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशीं मैत्री करतो, येतां जातां दुसर्‍याची निंदा करतो, पुश्लाजन जागत बसले असतां जो मध्यें हातपाय ताणून झोंपतों, दुसर्‍याच्या घरीं भरमसाट जेवतों, आपला मान किंवा अपमान जो स्वत:च्या तोंडानें उघड करतो, पुढील सात व्यसनांत (जुगार, वाहेरख्याल, चोरी, चहाडी, परस्त्री, पांखरांची झुंज, आणि नायकिणीचें गाणें) मग्न असतो. तो माणूस मूर्ख समजावा.


आळशी, ऐकण्याची बुद्धि नसणारा, लाजाळू  व विषय निर्लज्जपणें भोगणारा तो मूर्ख : दुसरा कोणी आपल्याला मदत करील या भरंवशावर जो स्वत:चा प्रयत्न हळंहळूं सडतो, जो आळशीपणांत संतोष मानतो, जो घरांत ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्यें गांगरून गप्प बसतो.

स्वत:पेक्षा श्रेष्ठ असणार्‍या माणसाशीं जो फार सलगी करतो, हिताच्या गोष्टी कोणी सांगूं लागला तर कंटाळतो, न ऐकणार्‍या लोकांना जो शिकविण्याच्या प्रयत्न करतो, वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो, सज्जन माणसाला भानगडीत अडकवितो, काम वासना भोगण्यापायीं जो एकाएकी लाजमर्यादा सोडतो आणि अत्यंत बेलगाम वागूं लागतो, तो माणूस मूर्ख समजावा. 

विरोध टाळून प्रपंचात सुखी होण्याचे पुढील सामान्य नियम न पाळणारा तो मूर्ख : रोग असून जो औषध घेत नाही, मुळींच पथ्य करीत नाहीं, जीवनांत जें आपल्या वाटयांस येईल तें आवडून घेत नाहीं, जो सोबतीवांचुन परदेशी जातो, ओळखीवांचून सोबती जोडतो, महापुरांत उडी घालतो, जेथें मान मिळतो तेथें जो अकारण वारंवार जातो, मिळालेला ममान सांभाळू शकत नाहीं, योग्य गोष्टींचा अभिमान धरीत नाहीं,

आपल्या पदरचा नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो, सदा सर्वकाळ अस्थिर चित्त असतो, कारणाचा नीट शोध न करतां अपराध नसून जो शिक्षा करतो, थोडक्या खर्चासाठीं भारी कंजुषपणा करतो, देवाची व वडील माणसांची जो पर्वा करीत नाहीं, अशक्त असला तरी वाचाळपणा करतो, कांहीं घरबंध न पाळतां जो अश्लील शब्द सर्रास वापरतो, जो घरांतील माणसांवर दांतओठ खातो, पण बाहेर मात्र दिनपणानें नरमाईनें वागतो. असा जो अज्ञानी व वेद असतो. तो माणूस मूर्ख समजावा. 

कामवासनेबाबत ढिला, कृतघ्न, वाचाळ, दुष्टबुद्धीं असणारा, डरपोक, निर्लज्ज, वृथा अभिमानी, दुष्टकर्मे करणारा व मलीन होणारा तो मूर्ख :
जो हलक्या माणसाच्या संगतीत राहतों. दुसर्‍याच्या बायकोशीं एकांत करतो, रस्त्यानें खात खात जातो, आपण कोणावरही उपकार करीत नाहीं, दुसर्‍यानें उपकार केला तर त्याची फेड जो अपकारानें करतो, करतो पण बोलतो फार, जो तापट, आळशी, खादाड, दुर्वर्तनी, कपटी आणि धारिष्टशून्य असतो, विद्या, वैभव, धन, पराक्रम, सामर्थ्य किंवा मान यांपैकीं कांहीं देखील जवळ नसून जो उगीच अभिमान मिरवतो, उद्धट, खोटा, लबाड, दुराचारी, वांकड्या बुद्धीचा व बेशरम असून जो बेसुमार झोंप घेतो, जो उंच जागीं जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर परसाकडेस बसतो, सदा बहुतेक नग्नप्राय असतो किंवा फिरतो, ज्याचे दांत, डोळे, नाक, हात, कपडे व पाय नेहमीं अस्वच्छ असतात.

वैधृती आणि व्यतिपात अशा वाईट मुहूर्तावर जो प्रवासाला निघतो, अपशकुनानें दुसर्‍याचा घात करतो, तो माणूस मूर्ख समजावा.     
चंचल बुद्धीचा, स्वार्थी, पैशाला सर्वस्व मानणारा, ईश्वराला विसरणारा, कमी, दुर्जन संगतीत राहणारा, निंद्य वस्तू अंगीकारणारा, चोवीस तास विनोद करणारा, रागानें स्वत:चें नुकसान करणारा तो मूर्ख : फार राग आला किंवा अपमान झाला तर जो दुर्बुर्द्धीनें आत्महत्या करतो, जो बुद्धीनें अस्थिर असतोजिवलग माणसांना जो अति दु:ख देतो, त्यांच्याशी कधी गोड शब्दही बोलत नाहीं, नीच माणसांपुढे मात्र जो अगदी नमून असतो, जो स्वत:ला नाना प्रकारानें सांभाळतो, कोणी आश्रयाला आला तर त्यास दूर लोटतो, संपत्ति टिकेल या भरंवशावर राहतो, मुलगा, कुटुंब व बायको हाच आपला आधार समजून जो ईश्वराला विसरून जातो, "जसें करावें तसें फळ पावावें" हे ज्याला कळत नाहीं, स्त्रियांना पुरुषापेक्षां आठपट कामवासना असते असें म्हणतात, अशा अनेक स्त्रियांशीं जो विवाह करतो, दुर्जन माणसाच्या नादानें जो मर्यादा सोडून वागतो, भर दिवसा डोळे झांकतो म्हणजे ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो,

देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण व स्वामी यांचा जो विश्वासघात करतो, दुसर्‍याच्या दु:खानें जो सुखी होतो, दुसर्‍याच्या सुखानें दु:खीं होतो, हरवलेल्या वस्तूबद्दल जो शोक करीत बसतो, कोणाशीं बोलतांना आदर न ठेवतां बोलतो, कोणी विचारल्यावांचून साक्ष देतो, निंद्य वस्तूचा जो अंगिकार करतो, जो सरळ अनुमान सोडून बोलतो, आडमार्गानें जातो, नीच कर्म करण्यासाठीं सोबती जमवितो, जो आपली पत राखूं जाणत नाहीं. साडीव थट्टामस्करी करतो, कोणी हंसला तर जो चिडतो आणि हातघाईवर येतो, अवघड पैज मारतो, कारण नसतांना बडबडतो पण जरूर असते तेव्हां जो मुक्यासारखा गप बसतो,   

स्वत:पाशीं चांगला पोशाख किंवा उत्तम विद्या दोन्ही नसतांना जो उच्चासनावर जाऊन बसतो, नातेवाईकांवर विश्वास ठेवतो, चोराला आपली सगळी महिती सांगतो, दिसेल ती वस्तू मागतो, रागाच्या पायीं जो आपणच आपलें नुकसान करून घेतो, तो माणूस मूर्ख समजावा.          

हलक्या लोकांच्या तोंडी लागणारा, मत्सरग्रस्त, वय वाया घालविणारा, देवास नावें ठेवणारा, विश्वासघातकी, जुन्या लोकांना सोडणारा, भ्रष्टाचारी, परद्वारी, चिंताग्रस्त, मुर्खसंगत करणारा, आणि ग्रंथांची काळजी न घेणारा तो मूर्ख :
हलक्या लोकांशीं जो बरोबरीनें वागतो, त्यांच्याशीं बरोबरीनें वाद घालतो, उत्तरास प्रत्युत्तर देतो, दाव्ह्या हाताने पाणी पितो, जो श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, जी वस्तू मिळणें अशक्य आहे तिच्यासाठीं हेवा करतो, स्वत:च्या घरांत चोरी करतो, ईश्वराला सोडून जो माणसावर भरंवसा ठेवतो, काही सार्थक न करितां आयुष्याचे दिवस वाया घालवितो, संसारांत भोगाव्या लागणार्‍या दु:खासाठीं जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्राचा दोष लोकांत उघड करतो, श्रेष्ठ माणसांच्या मनांतून जो उतरतो, सभेमध्यें किंवा बैठकीमध्यें जो नकोसा वाटतो, क्षणाक्षणाला ज्याचें मन बदलतें, जुने चांगले विश्वासू नोकर सोडून जो नवे नोकर ठेवतो, ज्याच्या सभेला आवरणारा नसतो, जो भ्रष्ट मार्गानें द्रव्य मिळवितो, धर्म, निती, न्याय सोडतो, बरोबर राहणार्‍या माणसांना तोडतो, घरीं स्वत:ची स्त्री सुंदर असून जो सदैव बाहेरख्यालीं असतो, जो पुष्कळांचें उष्टें खातो, आपला पैसा दुसर्‍यापाशीं ठेवून जो लोकांच्या पैशाची हव धरतो, हलक्या लोकांशीं देण्याघेण्याचा व्यवहार करतो, घरीं आलेल्या पाहुण्यास जो मदत करीत नाहीं, वाईट वस्तीच्या गांवांत राहतो, जो सदा सर्वकाळ चिंताग्रस्त असतो, दोन मांस खाजगी बोलत असतां जो न बोलावता तेथें जाऊन बसतो, दोन्ही हातांनी डोकें खाजवितो, जलाशयांत जो चूळ टाकतो, पायानें पाय खाजवितो, नीच लोकांच्या घरीं नोकरी करतो,

बायकोशीं व मुलांशी जो फाजील बरोबरीनें वागतो. भुताच्या जवळ बसतो, शिस्तीशिवाय कुत्रें पाळतो, जो परस्त्रीशीं भांडणतंटा करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्रानें मारतो, मूर्खाची संगत करतो, कोणाचें भांडण चालूं असेल तर जो पाहत उभा राहतो, तें सोडविण्याऐवजी त्याची गंमत पाहतो, जें खरें असतें तें सोडून खोटें सहन करतो,

श्रीमंत झाल्यावर पूर्वीच्या माणसांची ओळख जो विसरतो, देवब्राह्मणांवर सत्ता गाजवितो, आपलें काम होईपर्यंत जो अगदी नम्रपणे वागतो, पण दुसर्‍याच्या कामाला उप्तोगी पडत नाही, कांहीं वाचतांना जो मुळांतील अक्षरें सोडून देतो किंवा स्वत:च्या पदरची घालून तें वाचतो, जो पुस्तकांची जोपासना करीत नाही, जो स्वत: कधीं पुस्तक वाचीत नाहीं, दुसर्‍या कोणाला वाचायला देत नाहीं, नुसतें दप्तरांत बांधून ठेवतो, तो माणूस मूर्ख समजावा.

हीं मूर्खलक्षणें ऐकून मनुष्य चतुर होतो. शहाण्यानें त्यांचा त्याग करावा :
अशी हिम मूर्खलक्षणें आहेत. तीं ऐकल्यानें मनुष्य चतुर बनतो. शहाणीं माणसे लक्ष देऊन तीं सदा ऐकतात. वास्तविक मूर्ख लक्षणें अगणित आहेत. श्रोत्यांनी त्यांचा त्याग करावा म्हणून माझ्या बुद्धीला सुचलीं तीं लक्षणें मी येथें सांगितलीं. त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. आपण उत्तम लक्षणें घ्यावी. मूर्ख लक्षणें सोडून द्यावी. पुढील समासांत उत्तम लक्षणें सगळीं सांगितली आहेत.