श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, December 10, 2010

सार्थ दासबोध, दशक दोन चालु करण्यापुर्वी दशक एकची उजळणी...



आम्हां तुम्हासि भववारिधिमाजी तारुं,
जें वाचितां परसितां मन होय तारूं ।
ते दासबोध रचना घडली जायला,
वंदूं निरंतर तया गुरुराजयाला ||

नमस्कार मंडळींनो,

श्री समर्थ कृपेने, सांगण्यास आनंद होत आहे कि "सार्थ दासबोध" यांचा अभ्यास करताना दशक पहिला स्तवनाचा आपण सर्वांनी पहिला.

यात समास एक ते समास नऊ ह्यात समर्थांनी ग्रंथारंभ लक्षण (ग्रंथाचे काय प्रयोजन आहे, मुळ दासबोध म्हणजे काय, त्याय काय काय विषय मांडले आहेत, याची रचना कशी झाली, कोणत्या कोणत्या ग्रंथांचा आधार घेतला, व दासबोधाच्या अभ्यासाने मिळणारे फळ याची माहिती दिली आहे), गणेशस्तवन (यांत श्रीसमर्थ गणेशाला वंदन करतात, गणपतीचे निर्गुण अथवा तात्विक व विश्वव्यापक रूप व त्यांच्या उपासनेचे फळ काय हे सर्व सांगितले आहे), शारदास्तवन (शारदेंचे मुळ स्वरूप, ती काय करतें, जीवनांत कोठे कोठे आढळते, तिचे सामर्थ्य व विविध रंगी रूप, कर्तृत्व, माहात्म्य, साधकाच्या जीवनातले तिचें स्थान तसेच शारदेचा विलक्षणपणा याचे महत्व सांगितले आहे),    सदगुरुस्तवन (यात समर्थांनी परमात्म स्वरूप कसें वर्णनातीत आहे, विविध रुपकांनी सदगुरूंनां उपमा दिल्यास ती कशी उणी पडते याचा उलगडा केला आहे), संतस्तवन (संत व संतसंग काय सांगतात, संतांचे सांकेतिक वर्णन, संतांचे अलौकिक दान याची माहिती दिली आहे).

श्रोतेजनस्तवन (ग्रंथ श्रावण करण्यास किती थोर मंडळी बसली आहेत, प्रत्येकाचा अधिकार व मुख्य म्हणजे या ग्रंथाचे वाचन कोण कोण करू शकतो हे सांगितले आहे), कवीश्वरस्तवन (यांत कवीच्या प्रतीभेंचे सामान्य स्वरूप, व्यक्तीवर व मानवीजीवनावर होणारे कवींचे परिणाम अशी माहिती देऊन सर्व कवींना वंदन केले आहे), सभास्तवन (प्रथम श्री समर्थ यात आध्यात्मिक सभेची थोरवी सांगतात, अशा सभांत कोणकोणते कार्यक्रम चालतात, यातील सभासदांची यादी, अध्यात्मिक सभेचा मोठा फायदा या सर्वांची माहिती दिली आहे), परमार्थस्तवन (प्रथम परमार्थाचा श्रेष्ठपणा सांगतात, त्याचे स्वरूप तसेच तो गुह्य असून शोधणार्‍याला कसा लाभतो, परमार्थाचे मानवी जीवनांतील परमस्थान व त्याचे कार्य आणि तो कोणी करावा हे सांगितले आहे).

दहावा समास - नरदेहस्तवन यांत नरदेह साधून किती लोकांनी परमार्थाच्या साधनांचे प्रयत्न केले आहेत व सिद्धीस नेले आहेत हे सांगितले आहे, हा नरदेह श्रेष्ठ का आहे याचे महत्व, नरदेहाचा सर्वात मोठा गुण, नरदेहाचे व्यंग आणि तो परमार्थाला कसा लावावा तसेच उत्तम नरदेह मिळून सुद्धा मूर्ख माणूस परमार्थ न करता मायेच्या जाळ्यांत कसा अडकतो ते दिले आहे, जसें घर हे आपले नाही तसेच देह पण आपला नाही हे सिद्ध करून सांगितले आहे.

या समासाच्या शेवटी श्री समर्थ म्हणतात देह बहुतांचे आहे, परमार्थी लावण्यांत त्यांचे सार्थक आहे. परमार्थ ज्यास नाही माहित तो मूर्ख आहे , प्रपंच्यामध्ये गुंतलेल्या मूर्खांना परमार्थातील सुखाची कल्पना येउं शकत नाही. अशा मुर्खांची काही लक्षणे पुढील दशकात सांगत आहे.

अशा रीतीने आपल्या सर्वांना पहिल्या दशकांत वरील ज्ञान प्राप्त झाले, प्रत्येक जन माणसाने ह्याचा बोध घ्यायलाच हवे कि कोणताही ग्रंथ करण्यामागचे प्रयोजन आणि त्याचे वाचन करण्या अगोदर त्यास ठेवलेले दूषण. आपण पामरांहून पामर आहोत व ज्ञान वाढवायाचे असल्यास समर्थांपाशी आपण नतमस्तक झालोच पाहिजे.

नमस्कार !

जय जय रघुवीर समर्थ !!!