श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Monday, December 6, 2010

|| दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास नववा : परमार्थस्तवन ||


|| दशक पहिला : स्तवननाम |||| समास नववा : परमार्थस्तवन ||

||श्रीराम ||

आतां स्तऊं हा परमार्थ| जो साधकांचा निजस्वार्थ |
नांतरी समर्थामध्ये समर्थ| योग हा ||||

आहे तरी परम सुगम| परी जनासी जाला दुर्गम |
कां जयाचें चुकलें वर्म| सत्समागमाकडे ||||

नाना साधनांचे उधार| हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार |
वेदशास्त्रीं जें सार| तें अनुभवास ये ||||

आहे तरी चहूंकडे| परी अणुमात्र दृष्टी न पडे |
उदास परी येकीकडे| पाहातां दिसेना ||||

आकाशमार्गी गुप्त पंथ| जाणती योगिये समर्थ |
इतरांस हा गुह्यार्थ| सहसा न कळे ||||

साराचेंहि निजसार| अखंड अक्षै अपार |
नेऊं न सकती तश्कर| कांही केल्या ||||

तयास नाहीं राजभये| अथवा नाहीं अग्निभये |
अथवास्वापदभये| बोलोंच नये ||||

परब्रह्म तें हालवेना| अथवा ठावही चुकेना |
काळांतरी चळेना| जेथीचा तेथें ||||

ऐसें तें निज ठेवणें| कदापि पालटों नेणे |
अथवा नव्हे आदिक उणें| बहुतां काळें ||||

अथवा तें घसवटेना| अथवा अदृश्य होयेना |
नांतरी पाहातां दिसेना| गुरुअंजनेविण ||१०||

मागां योगिये समर्थ| त्यांचाहि निजस्वार्थ |
यासि बोलिजे परमार्थ| परमगुह्य म्हणौनि ||११||

जेंही शोधून पाहिला| त्यासी अर्थ सांपडला |
येरां असोनी अलभ्य जाला| जन्मोजन्मीं ||१२||

अपूर्वता या परमार्थाची| वार्ता नाहीं जन्ममृत्याची |
आणी पदवी सायोज्यतेची| सन्निधचि लाभें ||१३||

माया विवेकें मावळे| सारासारविचार कळे |
परब्रह्म तेंहि निवळे| अंतर्यामीं ||१४||

ब्रह्म भासले उदंड| ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड |
पंचभूतांचें थोतांड| तुछ्य वाटे ||१५||

प्रपंच वाटे लटिका| माया वाटे लापणिका |
शुद्ध आत्मा विवेका- | अंतरीं आला ||१६||

ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं| संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरीं |
दृश्याची जुनी जर्जरी| कुहिट जाली ||१७||

ऐसा हा परमार्थ| जो करी त्याचा निजस्वार्थ |
आतां या समर्थास समर्थ| किती म्हणौनि म्हणावें ||१८||

या परमार्थाकरितां| ब्रह्मादिकांसि विश्रामता |
योगी पावती तन्मयता| परब्रह्मीं ||१९||

परमार्थ सकळांस विसांवा| सिद्ध साधु माहानुभावां |
सेखीं सात्विक जड जीवां| सत्संगेंकरूनी ||२०||

परमार्थ जन्माचें सार्थक| परमार्थ संसारीं तारक |
परमार्थ दाखवी परलोक| धार्मिकासी ||२१||
  
परमार्थ तापसांसी थार| परमार्थ साधकांसी आधार |
परमार्थ दाखवी पार| भवसागराचा ||२२||

परमार्थी तो राज्यधारी| परमार्थ नाहीं तो भिकारी |
या परमार्थाची सरी| कोणास द्यावी ||२३||

अनंत जन्मींचें पुण्य जोडे| तरीच परमार्थ घडे |
मुख्य परमात्मा आतुडे| अनुभवासी ||२४||

जेणें परमार्थ वोळखिला| तेणें जन्म सार्थक केला |
येर तो पापी जन्मला| कुलक्षयाकारणें ||२५||

असो भगवत्प्राप्तीविण| करी संसाराचा सीण |
त्या मूर्खाचें मुखावलोकन| करूंच नये ||२६||

भल्यानें परमार्थीं भरावें| शरीर सार्थक करावें |
पूर्वजांस उद्धरावें| हरिभक्ती करूनी ||२७||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे परमार्थस्तवननाम समास नववा ||||१. ९


प्रथम परमार्थाचा श्रेष्ठपणा सांगतात :
मी आतां परमार्थाचें गुणवर्णन करतो. पर्मर्थ हा साधकांचें खरें ध्येय आहे. मानवी जीवनांत उत्तमांत उत्तम साध्य किंवा फल असेल तर तें म्हणजे परमार्थ होय.

परमार्थ अति सोपा व रोकडा आहे :
खरें पाहिलें तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संतसमागम केला तर तो सहज वश होतो. परंतु तो प्राप्त करून घेण्याचें हें वर्म चुकल्यामुळें तो अति कठीण होऊन बसला आहे. त्याचप्रमाणें साधनें नाना प्रकारची आहेत पण तीं संगळीं उधारीची आहेत. म्हणजे त्यांचें फल कालांतरानें मिळतें. त्यासाठी वाट पहावी लागते. पण परमार्थ हा अगदी रोकडा व्यवहार असल्यानें तेथें तत्काल फल मिळतें, लगेच ब्रह्मस्वरूपाचें साक्षात दर्शन घडतें. वेदांत आणि शास्त्रांत ज्या आत्मस्वरूपाचें वर्णन आहे. त्याचा एकदम प्रत्यक्ष अनुभव येतो. 

तात्विक दृष्टीनें परमार्थ ब्रह्मस्वरूपच आहे. तें स्वरूप अखंड, अक्षय, अपार व गुप्त आहे. :
पाहायला गेले तर परमार्थ सर्वत्र भरून आहे. पण त्याला पाहायला लागणारीं दृष्टी नाही म्हणून तो अणुइतका देखील दिसत नाहीं. सर्वसंग टाकून एकांतांत जाउन पहायचा प्रयत्न केला तरी तो दृष्टीस पडत नाहीं.

हृदयाकाशमार्गामध्यें हृदयस्थ स्वस्वरूपापर्यंत पोंचण्याचा जो गुप्त रस्ता आहे तो फक्त उत्तम योग्यांनाच माहित असतो. सामान्य माणसांना या गुप्त व सूक्ष्म अर्थांचें ज्ञान बहुदा होत नाहीं. सर्व ज्ञानाचें तात्पर्य, अखंड, अक्षय आणि अपार असा हा परमार्थ कांही केल्या चोराला चोरून नेतां येत नाहीं. राजा, अग्नी आणि श्वापदें यापैकी कोणाकडूनही परमार्थाला भय नाहीं. असल्या भयाचा उल्लेखसुद्धा करुं नये. परब्रह्म आपल्या जागेवरून उचलतां येत नाहीं. किंवा तें आपल्या स्थानावरून ढळत नाहीं. कितीही काळ लोटला आणि बदलला तरी तें इकडें तिकडें चालत नाहीं. जिथल्या तेथें जसेंच्या तसें स्थिर राहतें. अशी ही आपली स्वत:ची ठेव आहे. तिच्यांत कधींही पालट होत नाहीं. कितीही काळ गेला तरी त्यांत कमीजास्तपणा होत नाहीं. परब्रह्म कधीं झिजत नाहीं. किंवा दिसत नाहीं असें होत नाहीं. परंतु गुरूनें ज्ञानरूपीं अंजन आपल्या डोळ्यांत घातल्यावांचून नुसतें पाहूं गेलें तर तें दसत नाहीं.       

परमार्थ अति गुह्य आहे खरा पण जो शोधतो त्याला तो लाभतो :
पूर्वी जे मोठमोठे ज्ञानी हून गेले त्यांचेदेखील परमार्थ हेंच ध्येय होतें. तो अतिशय गूढ स्वरूपाचा आहे म्हणून त्याला परमार्थ अहेम म्हणतात. जे त्याचा शोध करतात त्यांना तो अर्थ सांपडतो. इतरांना मात्र तो जवळ असूनही अनेक जन्म गेले तरी सांपडत नाहीं.
परमार्थाची अपूर्वता :
हा परमार्थ मोठा विलक्षण आहे. त्याच्यापाशीं जन्म आणि मृत्यु या कालाधीन घटनांचा  मागमूस नाहीं. शिवाय त्याच्यामुळें सायुज्यमुक्तीची पदवी आपल्यापाशीच आपल्याला लाभते.

ब्रह्मानुभवाचें अप्रतिम वर्णन :
आत्मानात्मविवेकानें माया अस्तंगत होते, नाहींशी होतें. सार काय व असार काय हें विचाराला बरोबर कळतें. आपल्या हृदयामध्यें ब्रह्मस्वरूप स्वच्छपणें अनुभवास येतें. आणत ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणें अनुभवास येउं लागल्यानें हें दृश्य विश्व त्यामध्यें बुडून जातें. तें कोठच्या कोठें नाहीसें होतें. पंचभूतांच्या अफाट फापट पसार्‍याची किंमत राहत नाहीं.
     
प्रपंच खोटा वर्तो. मायेचा पसारा केवळ कल्पनामय आहे असें वाटतें. आणि विवेकाच्या सामर्थ्यानें शुद्ध आत्मस्वरूपाचें अंतर्यामी दर्शन घडतें. आंतबाहेर ब्रह्मदर्शन होण्यची अवस्था अंतर्यामी स्थिर हली कीं, सर्व संशय पार नाहीसे होतात. हें सबंध दृश्य विश्व जुनें, फाटलेलें भोके पडलेलें आणि कुजत वाटूं लागतें. मनांतून बाहेर टाकून देण्याच्या लायकीचें वाटतें. 

मानवी जीवनांतील परमार्थाचें परम स्थान :
परमार्थ हा असा आहे. जोकरील त्याच्या जीवनाचें तें खरें सार्थक आहे. तो मुळांतच अत्यंत श्रेष्ठ, थोर, योग्य आणि शक्तिमान आहे. पुन: पुन: त्याला समर्थ म्हणण्याची जरूर काय ! या परमार्थामुळें ब्रह्मादिकांना विश्रांति मिळते, समाधान लाभतें. त्यानेंच ज्ञानी पुरुष परब्रह्माशीं एकरुप होऊन जातात. सिद्ध, साधु आणि महात्मे यांना परमार्थ विसावा देतो. सात्विक सामान्य माणसांनी जर संतसंगति धरली तर त्यांनाही शेवटीं असाच विसावा मिळतो, असेंच समाधान लाभतें.

परमार्थाचें सर्वसाधारण कार्य :
परमार्थ मनुष्यजन्माचें सार्थक करतो, परमार्थच संसारांतून नीटपणें पार पडतो. धर्मिक वृत्तीच्या माणसांना परमार्थच परलोकच्या सुखाचा मार्ग दाखवितो. परमार्थ तापसांना आश्रय देतो, साधकांना आधार देतो. या भवसागरांतून कसें पार पडावें हें परमार्थच सांगतो. ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा होय. जो परमार्थ करीत नाहीं तो एकपरीनें भिकारीच समजावा. परमार्थाची बरोबरी करील असें या जगांत कांहीं नाहीं.     

अनेक जन्मांचें पुण्य पदरीं असेल तरच हातून परमार्थ घडतो. परमार्थ घडला म्हणजे मुख्य परमात्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो.

परमार्थ न करणारा मूर्ख समजावा. शहाण्यानें परमार्थ करावाच:
जो मनुष्य परमार्थ जाणतो आणि आचरणांत आणतो त्याचा जन्म सार्थकीं लागतो. इतर सारे लोक पापी असून केवळ कुलक्षयासाठीं जन्म घेतात.भगवंताची प्राप्ती करून न घेतां जो संसारामध्ये शिणतो तो मूर्ख असतो. त्याचे तोंड पाहूं नये.

म्हणून चांगल्या माणसानें परमार्थाच्या नादीं लागावें आणि आपल्या शरीराचें सार्थक करावें. भगवंताची भक्ती करून आपल्या शरीराचें सार्थक करावें. त्याचप्रमाणें भगवंताची भक्ती करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करावा.