श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, December 2, 2010

|| दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास सहावा : श्रोतेजनस्तवन


|| दशक पहिला : स्तवननाम ||||  समास सहावा : श्रोतेजनस्तवन

||श्रीराम ||

आतां वंदूं श्रोते जन| भक्त ज्ञानी संत सज्जन |
विरक्त योगी गुणसंपन्न| सत्यवादी ||||

येक सत्वाचे सागर| येक बुद्धीचे आगर |
येक श्रोते वैरागर| नाना शब्दरत्नांचे ||||

जे नाना अर्थांबृताचे भोक्ते| जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते |
नाना संशयातें छेदिते| निश्चै पुरुष ||||

ज्यांची धारणा अपार| जे ईश्वराचे अवतार |
नांतरी प्रत्यक्ष सुरवर| बैसले जैसे ||||

किं हे ऋषेश्वरांची मंडळी| शांतस्वरूप सत्वागळी |
जयांचेनि सभामंडळीं| परम शोभा ||||

हृदईं वेदगर्भ विलसे| मुखीं सरस्वती विळासे |
साहित्य बोलतां जैसे| भासती देवगुरु ||||

जे पवित्रपणें वैश्वानर| जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर |
ज्ञातेपणें दृष्टीसमोरे| ब्रह्मांड न ये ||||

जे अखंड सावधान| जयांस त्रिकाळाचें ज्ञान |
सर्वकाळ निराभिमान| आत्मज्ञानी ||||

ज्यांचे दृष्टीखालून गेलें| ऐंसें कांहींच नाहीं उरलें |
पदार्थमात्रांसी लक्षिलें| मनें जयांच्या ||||

जें जें कांहीं आठवावें| तें तें तयांस पूर्वीच ठावें |
तेथें काये अनुवादावें| ज्ञातेपणेंकरूनी ||१०||

परंतु हे गुणग्राहिक| म्हणौन बोलतों निःशंक |
भाग्यपुरुष काये येक| सेवीत नाहीं ||११||

सदा सेविती दिव्यान्नें| पालटाकारणें आवेट अन्नें |
तैसींच माझीं वचनें| पराकृतें ||१२||

आपुले शक्तिनुसार| भावें पुजावा परमेश्वर |
परंतु पुजूं नये हा विचार| कोठेंचि नाहीं ||१३||

तैसा मी येक वाग्दुर्बळ| श्रोते परमेश्वरचि केवळ |
यांची पूजा वाचाबरळ| करूं पाहे ||१४||

वित्पत्ती नाहीं कळा नाहीं| चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं |
भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं| गौल्यता नाहीं वचनाची ||१५||

ऐसा माझा वाग्विळास| म्हणौन बोलतों सावकाश |
भावाचा भोक्ता जगदीश| म्हणौनियां ||१६||

तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति| तेथें माझी वित्पत्ती किती |
बुद्धिहीण अल्पमती| सलगी करितों ||१७||

समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं| परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं |
तुम्हां संतांचा सलगी| म्हणौनि करितों ||१८||

व्याघ्र सिंह भयानक| देखोनि भयाचकित लोक |
परी त्यांचीं पिलीं निःशंक| तयांपुढे खेळती ||१९||

तैसा मी संतांचा अंकित| तुम्हां संतांपासीं बोलत |
तरी माझी चिंता तुमचे चित्त| वाहेलच कीं ||२०||

आपलेंची बोले वाउगें| त्याची संपादणी करणें लागे |
परंतु काहीं सांगणें नलगे| न्यून तें पूर्ण करावें ||२१||


हें तों प्रीतीचें लक्षण| स्वभावेंची करी मन |
तैसे तुम्ही संतसज्जन| मायेबाप विश्वाचे ||२२||

माझा आशय जाणोनी जीवें| आतां उचित तें करावें |
पुढें कथेसि अवधान द्यावें| म्हणे दासानुदास ||२३||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोतेस्तवननाम समास सहावा ||||१. ६


ग्रंथ श्रावण करण्यास किती थोर श्रोते बसले आहेत तें ऐका :
आता दासबोध ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न आणि सत्यवादी असे हे श्रोते आहेत.

प्रत्येकाचा अधिकार सांगतात :
एकजण सत्वगुणाचा समुद्र तर दुसरा विलक्षण बुद्धिमान, तर तिसरा शब्दरत्नांची जणूं खाणच आहे. त्याच्यापाशीं शब्दांचें अपार भांडार भरलेलें आहे. कोणी असें कीं वक्ता जें बोलेल त्याचा अर्थ बरोबर समजून रस घेणारे, तर कोणी असें कीं प्रसंग पडला असतां उत्तम वक्तृत्व गाजविणारे, तर कोणी असें अत्यंत निश्चित मताचें कीं कोणतीही शंका फेडून टाकणारे. कोणी ईश्वराचे अवतारच वाटतात. कारण ज्ञान सांठवण्याची त्यांच्या बुद्धीची शक्ति अफाटच असते. प्रत्यक्ष देवच सभेंत येऊन बसले आहेत असें वाटतें. असे श्रोते पहिले म्हणजे वाटतें कीं मूर्तिमंत शांति असलेली आणि सत्वगुणानें भरलेली ऋषिमंडळी सभेला आली असून त्यांच्यामुळें सभा शोभून दिसते. 

त्यांच्या अंत:करणात वेदांचा खरा अर्थ सहजपणें वावरतो, त्यांच्या तोंडांत म्हणजे जिभेवर सरस्वति खेळते. काव्य, नाटक, कथा, इत्यादि साहित्यप्रकारांवर ते भाषण कंरूं लागले तर प्रत्यक्ष बृह्स्पतीसारखे वाटतात.  

ते अग्नीसारखे पवित्र असतात तर स्फूर्तिरुपी किरणांचे सूर्यच वाटतात. ज्याप्रमाणें सूर्यापासून प्रकाशकिरणें अखंड बाहेर पडतात त्याचप्रमाणें त्यांची स्फूर्ति सदैव जागी असते. त्यांचे ज्ञान इतकें अमर्याद असतें कीं त्यांच्या दृष्टीनें आपलें हें विश्व अगदीच क्षुल्लक समजलें जातें. सदैव सगळीकडे त्यांचें लक्ष असतें. त्यांना त्रिकाळाचें ज्ञान असतें. ते आत्मज्ञानी असून सदैव अत्यंत अभिमानरहित असतात. सर्वज्ञ असल्यामुळें  त्यांच्या नजरेखालून   गेलें नाहीं असें जगांत कांहीं उरत नाहीं. दृश्य आकार घेतलेल्या यच्चयावत वस्तु त्यांनी मनानें पाहिलेल्या असतात.
  
आपण अगदी विचार करून जें कांहीं सांगायला जावें तर तें या श्रोते मंडळीना आधींच माहित असतें असा अनुभव येतो. मग आपल्याकडे ज्ञातेपणा घेऊन त्यांच्यापुढें नवीन कांहीं कसें सांगतां येणार ?

असें असतां दासबोध कां सांगितला ? :
भाग्यवान व ऐश्वर्यसंपन्न पुरुष आपल्यासमोर जें येईल त्याचा अव्हेर करीत नाहींत. तें गुणग्राही असतात, प्रत्येकांतील गुणांचे सेवन करतात. त्याचप्रमाणें दासबोधाचें श्रोते अत्यंत गुणग्राही असल्यामुळे मी मोकळेपणानें ग्रंथ सांगत आहे.

ऐश्वर्यसंपन्न पुरुष नेहमी उत्तम उत्तम पक्वान्नें सदा सेवन करतात. पण तोंडाची चव पालटण्याकरितां व पक्वान्नांची रुचि राहण्याकरितां मधून मधून तें साधें अन्न खातात. त्याचप्रमाणें नेहमी संस्कृत वेदांतवाड्‍:मय सेवन करणार्‍यानीं माझा हा प्राकृत किंवा मराठी ग्रंथ केवळ रुचिपालट होण्यासाठी वाचावा. परमेश्वराची यथासांग पूजा करणें कठीण आहे हें खरें. तरी पण आपल्या शक्तीप्रमाणें आपण मनापासून त्याची पूजा करतोच. त्याची पूजा कठीण म्हणून ती करूंच नये असें कोणी कोठें सांगत नाहीं.       

दासबोध लिहितांना श्री समर्थांनी घेतलेली नम्र भूमिका :
त्याचप्रमाणें माझे श्रोते केवळ परमेश्वरस्वरूपच आहेत. मी वाचेनें दुर्बल आहे. माझी वाचा जें बडबडेल त्या ओबडधोबड शब्दांनी श्रोतेरूप परमेश्वराची पूजा मी करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक मी कसा आहे तें पहा. माझ्यापाशीं पद्धतशीर अभ्यासानें येणारी विद्वत्ता नाहीं, कला नाहीं कीं चातुर्य नाहीं. मला व्यवस्थित मांडणी केलेला ग्रंथ लिहितां येत नाहीं. माझ्यापाशीं भक्ती, ज्ञान  व वैराग्य नाहीं. मला सुंदर शब्दरचना करतां येत नाहीं.  

माझा वाड्‍:मयप्रकार हा असा आहे. पण पूजा करणार्‍याच्या  प्रेमाचा रस ईश्वर सेवन करतो. म्हणून मी स्वस्थपणें ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त झालों. माझ्या शब्दरचनेकडे तो पाहणार नाहीं.  

संतरुपी श्रोत्यांना अत्यंत नम्रपणें पण आपलेपणानें केलेली विनंती :
तुम्ही श्रोते प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात. तुमच्यापुढें माझी विद्वत्ता केव्हांही अपुरी पडेल. मी मंदबुद्धि आहे, माझे विचार प्रगल्भ नाहीतं. मी तुमच्याशीं सलगीनें एखाद्या थोर माणसाचा मुलगा मूर्ख असला तरी जगांत त्याला मोठेपणा मिळतो. त्याच न्यायानें मी हिंदीन असलों तरी तुमचा आहे. म्हणून मी तुमच्याशीं इतक्या निकटपणें वागतो. वाघ आणि सिंह या भयंकर प्राण्यांना पाहून लोक घाबरून जातात. पण त्यांची पिल्ले नि:शंकपणें त्यांच्यासमोर खेळतात. त्याचप्रमाणें मी तुम्हा संतांचे लेकरूं आहे. तुमच्यापुढें दासबोध सांगतो आहे. तुम्ही माझी काळजी घ्याल यांत शंकाच नाहीं.       

"न्यून तें पूर्ण करावें" ही प्रार्थना :
आपलें पोर कांही वावगें बोललें तर मायबापांना तें सांभाळून न्यावें लागतें. तसें करा म्हणून त्यांना सांगावें लागत नाहीं. तसें दासबोध सांगतांना मी जर कांही वावगें बोललों तर तुम्ही संत आपणहून तें संभाळून घ्याल हें सांगणें नलगे. माझ्या सांगण्यांत जें उणे पडेल तें तुम्ही आपोआप मला संभाळून न्याल. कारण जेथें प्रेम असतें तेथें मन स्वाभाविकपणें असें वागतें. माझ्या मनांतील हेतु तुम्ही आपल्या मनानें ओळखावा आणि जें योग्य असेल तें करावें. पुढें येणारा विषय मनापासून लक्ष देऊन देऊन ऐकावा अशी हा दासांचा दास रामदास तुमची प्रार्थना करतो.