श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, December 17, 2010

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास चवथा : भक्ति निरूपण ||||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास चवथा : भक्ति निरूपण ||

||श्रीराम ||

नाना सुकृताचें फळ| तो हा नरदेह केवळ |
त्याहिमधें भाग्य सफळ| तरीच सन्मार्ग लागे ||||

नरदेहीं विशेष ब्राह्मण| त्याहीवरी संध्यास्नान |
सद्वासना भगवद्भजन| घडे पूर्वपुण्यें ||||

भगवद्भक्ति हे उत्तम| त्याहिवरी सत्समागम |
काळ सार्थक हाचि परम| लाभ, जाणावा ||||

प्रेमप्रीतीचा सद्भाव| आणी भक्तांचा समुदाव |
हरिकथा मोहोत्साव| तेणें प्रेमा दुणावे ||||

नरदेहीं आलियां येक| कांही करावें सार्थक |
जेणें पाविजे परलोक| परम दुल्लभ जो ||||

विधियुक्त ब्रह्मकर्म| अथवा दया दान धर्म |
अथवा करणें सुगम| भजन भगवंताचें ||||

अनुतापें करावा त्याग| अथवा करणें भक्तियोग |
नाहीं तरी धरणें संग| साधुजनाचा ||||

नाना शास्त्रें धांडोळावीं| अथवा तीर्थे तरी करावीं |
अथवा पुरश्चरणें बरवीं| पापक्षयाकारणें ||||

अथवा कीजे परोपकार| अथवा ज्ञानाचा विचार |
निरूपणीं सारासार| विवेक करणें ||||

पाळावी वेदांची आज्ञा| कर्मकांड उपासना |
जेणें होइजे ज्ञाना- | आधिकारपात्र ||१०||

काया वाचा आणी मनें| पत्रें पुष्पें फळें जीवनें |
कांहीं तरी येका भजनें| सार्थक करावें ||११||

जन्मा आलियाचें फळ| कांहीं करावें सफळ |
ऐसें न करितां निर्फळ| भूमिभार होये ||१२||
नरदेहाचे उचित| कांहीं करावें आत्महित |
येथानुशक्त्या चित्तवित्त| सर्वोत्तमीं लावावें ||१३||

हें कांहींच न धरी जो मनीं| तो मृत्यप्राय वर्ते जनीं |
जन्मा येऊन तेणें जननी| वायांच कष्टविली ||१४||

नाहीं संध्या नाहीं स्नान| नाहीं भजन देवतार्चन |
नाहीं मंत्र जप ध्यान| मानसपूजा ||१५||

नाहीं भक्ति नाहीं प्रेम| नाहीं निष्ठा नाहीं नेम |
नाहीं देव नाहीं धर्म| अतीत अभ्यागत ||१६||

नाहीं सद्बुद्धि नाहीं गुण| नाहीं कथा नाहीं श्रवण |
नाहीं अध्यात्मनिरूपण| ऐकिलें कदां ||१७||

नाहीं भल्यांची संगती| नाहीं शुद्ध चित्तवृत्ती |
नाहीं कैवल्याची प्राप्ती| मिथ्यामदें ||१८||

नाहीं नीति नाहीं न्याये| नाहीं पुण्याचा उपाये |
नाहीं परत्रीची सोये| युक्तायुक्त क्रिया ||१९||

नाहीं विद्या नाहीं वैभव| नाहीं चातुर्याचा भाव |
नाहीं कळा नाहीं लाघव| रम्यसरस्वतीचें ||२०||

शांती नाहीं क्ष्मा नाहीं| दीक्षा नाहीं मैत्री नाहीं |
शुभाशुभ कांहींच नाहीं| साधनादिक ||२१||

सुचि नाहीं स्वधर्म नाहीं| आचार नाहीं विचार नाहीं |
आरत्र नाहीं परत्र नाहीं| मुक्त क्रिया मनाची ||२२||

कर्म नाहीं उपासना नाहीं| ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं |
योग नाहीं धारिष्ट नाहीं| कांहीच नाहीं पाहातां ||२३||

उपरती नाहीं त्याग नाहीं| समता नाहीं लक्षण नाहीं |
आदर नाहीं प्रीति नाहीं| परमेश्वराची ||२४||

परगुणाचा संतोष नाहीं| परोपकारें सुख नाहीं |
हरिभक्तीचा लेश नाहीं| अंतर्यामीं ||२५||

ऐसे प्रकारीचे पाहातां जन| ते जीतचि प्रेतासमान |
त्यांसीं न करावें भाषण| पवित्र जनीं ||२६||

पुण्यसामग्रेए पुरती| तयासीच घडें भगवद्भक्ती |
जें जें जैसें करिती| ते पावती तैसेंचि ||२७||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तिनिरूपणणनाम समास चवथा ||||२. ४


भाग्याच्या चढत्या पायर्‍या :
अनेक जन्मीं जीं सत्कर्में केलीं त्यांचें फळ म्हणून हा नरदेह मिळतो. त्यामध्यें भाग्य फळलें तरच माणूस सन्मार्गास लागतो. आधी नरदेह हें भाग्य, त्यांत ब्राह्मण, त्यावर स्नानसंध्या, त्यावर उत्तम वासना, त्यावर भगवंताचें भजन, या गोष्टी पूर्वपुण्याईनें घडतात. भगवंताची भक्ती ही उत्तमच पण त्यांत संतांचा समागम मिळणें हें त्याहून उत्तम होय. अशा रीतीनें आयुष्याचा काळ सार्थकी लागतो. हाच सर्वश्रेष्ठ लाभ समजावा. अंतर्यामीं भगवंताबद्दल खरें प्रेम आणि बाहेर संगतीला भक्तांचा समूह असावा. मग कोठे उत्सव होऊन जेव्हां अखंड हरिकथा चालते त्यानें भगवंताचें प्रेम दुप्पट वाढते.

या जन्मांत आत्महित साधण्यासाठीं काय काय उपयोगी पडतें त्याचें वर्णन :
आपल्याला नरदेह मिळाला आहे. कांहीं तरी त्याचें सार्थक करुन घ्यावें. तसें केलें तर अति दुर्लभ असणारा परलोक प्राप्त होतो. यथासांग ब्रह्मकर्म करावें. किंवा दया, दान, धर्म करावा, किंवा सोपे असें भगवंताचें भजन करावें. पश्चात्तापानें संसाराचा त्याग करावा, किंवा भक्तीच्या मार्गास लागावें, किंवा संतांचा समागम करावा.

अनेक शास्त्रांचा खोल अभ्यास करावा, किंवा तीर्थयात्रा तरी कराव्यात, किंवा पापक्षय होण्यासाठीं चांगलीं पुरश्चरणें करावीं. अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानमार्गाचा विचार करावा, किंवा संत आणि सदगुरू यांच्याकडून ऐकलेल्या प्रवचनांतील सारासार शोधून पहावें. वेदांची आज्ञा पालवी, कर्मकांड पाळावें, उपासना करावी, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार तेतो, पात्रता येते. कायेनें, वाचेनें आणि मनानें, तसेंच पान, फुल, फळ, किंवा पाणी यांपैकीं कशानें तरी भगवंताची पूजा करावी आणि सार्थक करून घ्यावें.

जन्मास येऊन जर आत्महित साधलें नाहीं तर तें जगणें मृतप्राय समजावें :
आपण मनुष्य म्हणून जन्मास आलों त्याचें कांहीं तरी फळ पदरांत पाडून घ्यावें. असें जर केलें नाहीं तर जन्म आपला वाया जातो आणि आपला देह केवळ भूमिभार होतो. कांहीं तरी आत्महित करून घ्यावें हेंच या नरदेहाला अत्यंत योग्य आहे. आपली शक्ति असेल त्याप्रमाणें आपलें मन आणि धन आपण भगवंताकडे लावावें.     

यांपैकीं कांहींच मनावर घेऊन जो करीत नाहीं तो जगात जिवंत असून मेल्यासारखे जगतो. जन्म घेऊन त्यानें आपल्या आईला उगाच कष्ट दिलें.

अशा प्रकारची जिवंत असून मेल्याप्रमाणें जगणारी माणसे कशी असतात त्यांचें वर्णन :
त्यांच्यापाशी स्नान, संध्या, भजन, देवपूजा, मंत्र, जप, ध्यान आणि मानसपूजा यांपैकीं कांहींच नसते. भक्ती, प्रेम, निष्ठा, नेम, देव, धर्म, पाहुणा यांपैकीं कांहींच नसते. सदबुद्धी, सदगुण, हरिकथाश्रवण, अध्यात्मनिरूपण, यांपैकीं कांहींच नसते. त्यांच्यापाशी भल्यांची संगति नाहीं, शुध्द, चित्तवृत्ती नाहीं, खोट्या गर्वामुळें, अहंकारामुळें  त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाहीं. निती, न्याय, पुण्याचा उपाय, परलोकाची सोय, आणि योग्य अयोग्य कृतीबद्दल विचार यांपैकीं कांहींच नसतें. विद्या, वैभव, चातुर्याचा विलास, कला व सुंदर सरस्वतीचा वाग्विलास यांपैकीं कांहींच नसतें. शांती, क्षमा, दीक्षा, म्हणजे एखादें घेतलेलें व्रत, मैत्री, शुभ व अशुभ यांचा विवेक, आणि साधना यांपैकीं कांहींच नसते.

पावित्र्य, स्वधर्माचरण, सदाचार, सद्विचार, इहलोक, आणि परलोक यांपैकीं कांहींच नसतें. त्याच्यापाशीं फक्त मनाला येईल त्याप्रमाणें वागण्याची स्वच्छंदता असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग, धारिष्ट, यांपैकीं कांहींच आढळत नाहीं.

विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणें, आणि परमेश्वराबद्दल आदर किंवा प्रेम यांपैकीं कांहींच नसतें. त्याला दुसर्‍याचा गुण पाहून संतोष वाटत नाहीं, परोपकार केल्यानें होणारें सुख नाहीं, त्याच्या अंतर्यामी हृदयामध्यें भगवंताच्या भक्तीचा लेशदेखील आढळत नाही.

अशी अपवित्र माणसे टाळावीत. भक्ती घडविण्यास पुण्य लागतें :
अशा तर्‍हेची माणसे पहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखी वाटतात. पवित्र माणसानें त्यांच्याशीं बोलूं सुद्धां नये. ज्याच्यापाशीं हवी तेवढी पुण्यसामग्री असते त्यालाच भगवंताची भक्ती घडते. जे जसे वागतात, कर्म करतात तसेंच त्यांना त्याचें फळ मिळतें.