श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Saturday, December 4, 2010

|| दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास आठवा : सभास्तवन

|| दशक पहिला : स्तवननाम |||| समास आठवा : सभास्तवन

||श्रीराम ||

अतां वंदूं सकळ सभा| जये सभेसी मुक्ति सुल्लभा |
जेथें स्वयें जगदीश उभा| तिष्ठतु भरें ||||

श्लोक : ||नाह.म् वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ |
       मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ||

नाहीं वैकुंठीचा ठाईं| नाहीं योगियांचा हृदईं |
माझे भक्त गाती ठाईं ठाईं| तेथें मी तिष्ठतु नारदा ||||

याकारणें सभा श्रेष्ठ| भक्त गाती तें वैकुंठ |
नामघोषें घडघडाट| जयजयकारें गर्जती ||||

प्रेमळ भक्तांचीं गायनें| भगवत्कथा हरिकीर्तनें |
वेदव्याख्यान पुराणश्रवणें| जेथें निरंतर ||||

परमेश्वराचे गुणानुवाद| नाना निरूपणाचे संवाद |
अध्यात्मविद्या भेदाभेद| मथन जेथे ||||

नाना समाधानें तृप्ती| नाना आशंकानिवृत्ती |
चित्तीं बैसे ध्यानमूर्ति| वाग्विळासें ||||

भक्त प्रेमळ भाविक| सभ्य सखोल सात्त्विक |
रम्य रसाळ गायक| निष्ठावंत ||||

कर्मसीळ आचारसीळ| दानसीळ धर्मसीळ |
सुचिस्मंत पुण्यसीळ| अंतरशुद्ध कृपाळु ||||

योगी वीतरागी उदास| नेमक निग्रह तापस |
विरक्त निस्पृह बहुवस| आरण्यवासी ||||

दंडधारी जटाधारी| नाथपंथी मुद्राधारी |
येक बाळब्रह्मचारी| योगेश्वर ||१०||

पुरश्चरणी आणी तपस्वी| तीर्थवासी आणी मनस्वी |
माहायोगी आणी जनस्वी| जनासारिखे ||११||
सिद्ध साधु आणी साधक| मंत्रयंत्रशोधक |
येकनिष्ठ उपासक| गुणग्राही ||१२||

संत सज्जन विद्वज्जन| वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन |
प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान| विमळकर्ते ||१३||

योगी वित्पन्न ऋषेश्वर| धूर्त तार्किक कवेश्वर |
मनोजयाचे मुनेश्वर| आणी दिग्वल्की ||१४||

ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी| तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी |
योगाभ्यासी योगज्ञानी| उदासीन ||१५||

पंडित आणी पुराणिक| विद्वांस आणी वैदिक |
भट आणी पाठक| येजुर्वेदी ||१६||

माहाभले माहाश्रोत्री| याज्ञिक आणी आग्नहोत्री |
वैद्य आणी पंचाक्षरी| परोपकारकर्ते ||१७||

भूत भविष्य वर्तमान| जयांस त्रिकाळाचें ज्ञान |
बहुश्रुत निराभिमान| निरापेक्षी ||१८||

शांति क्ष्मा दयासीळ| पवित्र आणी सत्वसीळ |
अंतरशुद्ध ज्ञानसीळ| ईश्वरी पुरुष ||१९||

ऐसे जे कां सभानायेक| जेथें नित्यानित्यविवेक |
त्यांचा महिमा अलोलिक| काय म्हणोनि वर्णावा ||२०||

जेथें श्रवणाचा उपाये| आणी परमार्थसमुदाये |
तेथें जनासी तरणोपाये| सहजचि होये ||२१||

उत्तम गुणाची मंडळी| सत्वधीर सत्वागळी |
नित्य सुखाची नव्हाळी| जेथें वसे ||२२||

विद्यापात्रें कळापात्रें| विशेष गुणांची सत्पात्रें |
भगवंताचीं प्रीतिपात्रें| मिळालीं जेथें ||२३||

प्रवृत्ती आणी निवृत्ती| प्रपंची आणी परमार्थी |
गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती| संन्यासादिक ||२४||

वृद्ध तरुण आणी बाळ| पुरुष स्त्रियादिक सकळ |
अखंड ध्याती तमाळनीळ| अंतर्यामीं ||२५||

ऐसे परमेश्वराचे जन| त्यांसी माझें अभिवंदन |
जयांचेनि समाधान| अकस्मात बाणें ||२६||

ऐंसिये सभेचा गजर| तेथें माझा नमस्कार |
जेथें नित्य निरंतर| कीर्तन भगवंताचें ||२७||

जेथें भगवंताच्या मूर्ती| तेथें पाविजे उत्तम गती |
ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं| महंत बोलिले ||२८||

कल्लौ कीर्तन वरिष्ठ| जेथें होय ते सभा श्रेष्ठ |
कथाश्रवणें नाना नष्ट| संदेह मावळती ||२९||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सभास्तवननाम समास आठवा ||||१. ८


श्री समर्थ प्रथम अध्यात्मिक सभेची थोरवी सांगतात :
आतां सर्व प्रकारच्या अध्यात्मिक सभांना मी नमस्कार करतो. अशा सभेंत मुक्ति सुलभ होतें. तेथें ईश्वर आपण होऊन प्रेमाने तिष्ठत उभा राहतो. श्लोकाचा अर्थ : भगवान नारदाला सांगतात कीं, "नारदा, वैकुंठ योग्यांचें हृदय किंवा सूर्य यांचें ठिकाणी मी राहत नाही. माझे भक्त जेथें गायन करतात तेथें मी उभा असतो." मी वैकुंठात सांपडत नाहीं, योग्यांच्या हृदयांत आढळत नाहीं, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणीं गातात त्या त्या ठिकाणीं नारदा, मी उभा असतो. म्हणून सभा श्रेष्ठ मानवी. जेथें भक्त भगवंताचें गुणगायन करतात तें वैकुंठ समजावें. तेथें नामघोषाचा गडगडाट आणि भगवंताचा जयजयकार गर्जत असतो.

सभेमध्यें कोणते कार्यक्रम चालतात :
प्रेमळ भक्तांचें गायन, भगवंताच्या कथा, हरिकीर्तनें, वेदांचें व्याख्यान आणि पुराणांचें श्रवण हे कार्यक्रम अध्यात्मिक सभेमध्यें निरंतर चालूं असतात. त्याचप्रमाणें परमेश्वराचें गुणानुवाद चालतात. परमार्थाच्या अनेक अंगांवर निरुपणें होतात व प्रश्नोत्तररूपीं संवाद चालतात आणि आत्मविद्येमध्यें जे अनेक भेदाभेद आहेत त्यावर चर्चा चालते. त्यामुळें त्याबद्दल विचारमंथन होतें.

अध्यात्मिक सभेंतील सभासदांची यादी :
या सभेमध्यें पुढें वर्णन केलेले सभासद बसतात. भक्त, प्रेमळ, भाविक, सखोल ज्ञानी, सात्विक, रम्य व रसाळ गाणारे, निष्ठावंत, कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र, पुण्यशील, शुध्द अंत:करणाचे कृपाळू, योगी, विरक्त, उदास, नियमानें चालणारे, इंद्रियनिग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, बहुदा अरण्यांत राहणारे, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव, बालब्रह्मचारी, मोठे योगी, पुरश्चरण करणारे, तपस्वी, तीर्थवासी, मन जिंकणारे, महायोगी, जनांत राहून जनापासून अलिप्त असणारे, सिद्ध, साधु, साधक, मंत्रयंत्र करून देणारे, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही, संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, प्रौढ, सर्वज्ञ, निर्मळ समाधान करणारे, योगी, विद्वान, ऋषीश्वर, धूर्त, तार्किक, महाकवी, मनोजय केलेले मोठे मुनि, दिगंबर, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी अथवा शरीरज्ञानी, योगाभ्यासी योगज्ञानी, उदासीन, पंडित, पुराणिक , विद्वान , वैदिक ,भट,यजुर्वेदी  पाठक,अति चांगले असणारे, वेदांचे मोठे ज्ञाते, याज्ञीक, अग्निहोत्री, वैद्य, पंचाक्षरी, परोपकार करणारे, भूत, भविष्य, आणि वर्तमान या तिन्ही काळांचें ज्ञान असणारे, बहुश्रुत, निराभिमानी, अपेक्षा नसणारे, शांतिक्षमादयाशील, पवित्र, सत्वशील, शुध्द अंत:करणाचे ज्ञानीशील पुरुष, त्यांना पाहिलें कीं देवाला पहिल्यासारखें वाटावें असे, उत्तम प्रकारचे मोठ्या योग्यतेचे अनेक सभासद अध्यात्मिक सभेंत असतात. अशा सभेंत शाश्वत कोणतें व अशाश्वत कोणतें याबद्दल सदैव विचारमंथन चालतें. त्यांचा थोरपणा अलौकिक असतो. त्याचें संपूर्ण वर्णन करणें अशक्यप्राय आहे. 

अध्यात्मिक सभेचा  मोठा फायदा: अशा तर्‍हेच्या सभेमध्यें परमार्थाची आवड असणारे लोकच बसतात. खरा परमार्थ त्यांना ऐकायला सापडतो. त्यामुळें सहजच लोकांचा उद्धार होतो. अत्यंत धीराची आणि सत्वगुणानें भरलेली उत्तम गुणानें संपन्न अशी परमार्थप्रेमी मंडळी जेथें जमतात तेथें नित्य नवा स्वानंद भोगायला मिळतो. विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेषगुणसंपन्न, भगवंताच्या प्रेमानें संपन्न अशी चांगली माणसें जेथें एकत्र येतात. त्याचप्रमाणे प्रवृत्त, निवृत्त, प्रापंचिक, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी, संन्यासी, वृद्ध, तरुण, लहानमुले, स्त्री, पुरुष, वगैरे सगळेजण ज्या सभेत बसून आपल्या हृदयात भगवंतांचे ध्यान करतात, ती परमेश्वराला प्रिय असणारी माणसे समजावी. त्यांच्या संगतीनें तत्काळ समाधान मिळतें. त्यांना मी नमस्कार करतो. ज्या सभेमध्यें भगवंताचें अखंड कीर्तन चालतें, जेथें हरिनामाचा गजर चालतो त्या सभेला माझा नमस्कार असो.

कलौ कीर्तन वरिष्ठ :
थोर पुरुषांनीं पुष्कळ ग्रंथांमध्यें असें स्पष्टपणें सांगितलें आहे कीं जेथें भगवंताच्या मूर्तीची अखंड उपासना चालते तेथें अनेकांना उत्तम गती लाभते.
कलियुगामध्यें कीर्तंच सर्वांत श्रेष्ठ उपाय आहे. जेथें कीर्तन चालतें ती सभा श्रेष्ठ होय.. कथाकीर्तन श्रवण केल्यानें अनेक प्रकारचे वाईट विकल्प आणि संशय नाहीसे होतात.