श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Wednesday, December 15, 2010

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास दुसरा : उत्तम लक्षण ||



||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास दुसरा : उत्तम लक्षण ||

||श्रीराम ||

श्रोतां व्हावें सावधान| आतां सांगतों उत्तम गुण |
जेणें करितां बाणे खुण| सर्वज्ञपणाची ||||

वाट पुसल्याविण जाऊं नये| फळ वोळखिल्याविण खाऊं नये |
पडिली वस्तु घेऊं नये| येकायेकीं ||||

अति वाद करूं नये| पोटीं कपट धरूं नये |
शोधल्याविण करूं नये| कुळहीन कांता ||||

विचारेंविण बोलों नये| विवंचनेविण चालों नये |
मर्यादेविण हालों नये| कांहीं येक ||||

प्रीतीविण रुसों नये| चोरास वोळखी पुसों नये |
रात्री पंथ क्रमूं नये| येकायेकीं ||||

जनीं आर्जव तोडूं नये| पापद्रव्य जोडूं नये |
पुण्यमार्ग सोडूं नये| कदाकाळीं ||||

निंदा द्वेष करूं नये| असत्संग धरूं नये |
द्रव्यदारा हरूं नये| बळात्कारें ||||

वक्तयास खोदूं नये| ऐक्यतेसी फोडूं नये |
विद्याअभ्यास सोडूं नये| कांहीं केल्या ||||

तोंडाळासि भांडों नये| वाचाळासी तंडों नये |
संतसंग खंडूं नये| अंतर्यामीं ||||

अति क्रोध करूं नये| जिवलगांस खेदूं नये |
मनीं वीट मानूं नये| सिकवणेचा ||१०||

क्षणाक्षणां रुसों नये| लटिका पुरुषार्थ बोलों नये |
केल्याविण सांगों नये| आपला पराक्रमु ||११||

बोलिला बोल विसरों नये| प्रसंगी सामर्थ्य चुकों नये |
केल्याविण निखंदूं नये| पुढिलांसि कदा ||१२||
आळसें सुख मानूं नये| चाहाडी मनास आणूं नये |
शोधिलुआविण करूं नये| कार्य कांहीं ||१३||

सुखा आंग देऊं नये| प्रेत्न पुरुषें सांडूं नये |
कष्ट करितां त्रासों नये| निरंतर ||१४||

सभेमध्यें लाजों नये| बाष्कळपणें बोलों नये |
पैज होड घालूं नये| काहीं केल्या ||१५||

बहुत चिंता करूं नये| निसुगपणें राहों नये |
परस्त्रीतें पाहों नये| पापबुद्धी ||१६||

कोणाचा उपकार घेऊं नये| घेतला तरी राखों नये |
परपीडा करूं नये| विस्वासघात ||१७||

शोच्येंविण असों नये| मळिण वस्त्र नेसों नये |
जणारास पुसों नये| कोठें जातोस म्हणौनी ||१८||

व्यापकपण सांडूं नये| पराधेन होऊं नये |
आपलें वोझें घालूं नये| कोणीयेकासी ||१९||

पत्रेंविण पर्वत करूं नये| हीनाचें रुण घेऊं नये |
गोहीविण जाऊं नये| राजद्वारा ||२०||

लटिकी जाजू घेऊं नये| सभेस लटिकें करूं नये |
आदर नस्तां बोलों नये| स्वभाविक ||२१||

आदखणेपण करूं नये| अन्यायेंविण गांजूं नये |
अवनीतीनें वर्तों नये| आंगबळें ||२२||

बहुत अन्न खाऊं नये| बहुत निद्रा करूं नये |
बहुत दिवस राहूं नये| पिसुणाचेथें ||२३||

आपल्याची गोही देऊं नये| आपली कीर्ती वर्णूं नये |
आपलें आपण हांसों नये| गोष्टी सांगोनी ||२४||

धूम्रपान घेऊं नये| उन्मत्त द्रव्य सेवूं नये |
बहुचकासीं करूं नये| मैत्री कदा ||२५||
कामेंविण राहों नये| नीच उत्तर साहों नये |
आसुदें अन्न सेऊं नये| वडिलांचेंहि ||२६||

तोंडीं सीवी असों नये| दुसऱ्यास देखोन हांसों नये |
उणें अंगीं संचारों नये| कुळवंताचे ||२७||

देखिली वस्तु चोरूं नये| बहुत कृपण होऊं नये |
जिवलगांसी करूं नये| कळह कदा ||२८||

येकाचा घात करूं नये| लटिकी गोही देऊं नये |
अप्रमाण वर्तों नये| कदाकाळीं ||२९||

चाहाडी चोरी धरूं नये| परद्वार करूं नये |
मागें उणें बोलों नये| कोणीयेकाचें ||३०||

समईं यावा चुकों नये| सत्वगुण सांडूं नये |
वैरियांस दंडूं नये| शरण आलियां ||३१||

अल्पधनें माजों नये| हरिभक्तीस लाजों नये |
मर्यादेविण चालों नये| पवित्र जनीं ||३२||

मूर्खासीं संमंध पडों नये| अंधारीं हात घालूं नये |
दुश्चितपणें विसरों नये| वस्तु आपुली ||३३||

स्नानसंध्या सांडूं नये| कुळाचार खंडूं नये |
अनाचार मांडूं नये| चुकुरपणें ||३४||

हरिकथा सांडूं नये| निरूपण तोडूं नये |
परमार्थास मोडूं नये| प्रपंचबळें ||३५||

देवाचा नवस बुडऊं नये| आपला धर्म उडऊं नये |
भलते भरीं भरों नये| विचारेंविण ||३६||

निष्ठुरपण धरूं नये| जीवहत्या करूं नये |
पाउस देखोन जाऊं नये| अथवा अवकाळीं ||३७||

सभा देखोन गळों नये| समईं उत्तर टळों नये |
धिःकारितां चळों नये| धारिष्ट आपुलें ||३८||
गुरुविरहित असों नये| नीच यातीचा गुरु करूं नये |
जिणें शाश्वत मानूं नये| वैभवेंसीं ||३९||

सत्यमार्ग सांडूं नये| असत्य पंथें जाऊं नये |
कदा अभिमान घेऊं नये| असत्याचा ||४०||

अपकीर्ति ते सांडावी| सद्कीर्ति वाढवावी |
विवेकें दृढ धरावी| वाट सत्याची ||४१||

नेघतां हे उत्तम गुण| तें मनुष्य अवलक्षण |
ऐक तयांचे लक्षण| पुढिले समासीं ||४२||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तामलक्षणनाम समास दुसरा ||||२. २


व्यक्तिगत आणि सामाजिक नित्य व्यवहार आणि नैतिक आचरण यांचें वर्णन :
आता मी उत्तम गुण सांगतो. श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावें. उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारें सर्व ज्ञान होईल. प्रवासाला जायचें असेल तर वाट विचारल्याखेरीज जाऊं नये. फळ खायचें असेल तर तें ओळखल्यावांचून खाऊं नये. वस्तु पडलेली दिसली तरी ती चटकन उचलून घेउं नये. फार वाद करुं नये, मनांमध्यें कपात ठेवून वागूं नये, कुलशीलाची नीट चोव्काशी केल्यावांचून मुलीशीं मग्न करुं नये.

विचार केल्याशिवाय बोलूं नये, ध्यानांत घेतल्यावांचून काम सुरूं करुं नये, नीतीधर्माच्या मर्यादा पाळल्यावांचून हालचाल करुं नये. प्रेम नसेल तेथें रुसूं नये. चोराला ओळख विचारूं नये, रात्रीं एकटेंपणें परवास करुं नये. लोकांशीं सरळपणाचें वागणें सोडूं नये, पापमार्गानें द्रव्यसंचय करुं नये, नीतीधर्माचा मार्ग कधीं सोडूं नये.

कोणाची निंदा करुं नये, कोणाचा द्वेष करुं नये, वाईट संगत धरुं नये, कोणाची बायको आणि संपत्ति बळजबरीनें काढून घेउं नये. वक्त्याला भलतेच प्रश्न विचारुं नयेत. लोकांत फूट पाडूं नये, कांहीं झाले तरी विद्याअभ्यास सोडूं नये. तोंडाळ माणसांशीं भांडूं नये, वाचाळ माणसाशीं वाद घालूं नये. मनामध्यें सज्जनाची संगती विसरुं नये. बेसुमार रागावूं नये, प्रेमाच्या माणसांना दुखवूं नये. दुसर्यामकडून चांगलें शिकण्याचा कंटाळा करुं नये. पदोपदीं रुसूं नये, खोटें मोठेपण सांगूं नये, केला नसेल तो पराक्रम सांगूं नये. दिलेला शब्द विसरुं नये, योग्य प्रसंगीं बलाचा उंपयोग केल्यावांचून राहूं नये. आपण करून दाखवल्याशिवाय दुसर्यााचा उपहास करुं नये. आळसाचें सुख मानूं नये, कोणाची चुगली चहाडी करण्याचें मनांत सुद्धां आणूं नये, सर्व बाजूंनीं विचार केल्यावांचून कोणतेंही काम करुं नये. देहाला फार सुख, आराम देऊं नये, माणसानें प्रयत्न कधीं सोडूं नये, सतत श्रम करावें लागलें तरी त्रासून जाऊं नये.  
सभेंमध्यें लाजूं नये, पण आचरटपणें भलतें बोलूं नये, कांहीं झालें तरी पैज मारू नये. कोणत्याही गोष्टीची फार काळजी करुं नये, आळशीपणानें दिवस घालवूं नये, दुसर्याजच्या बायकोकडे पापबुद्धीनें पाहुं नये. कोणाचा उपकार घेऊं नये, घेतलाच तर तो फेद्ल्यावाचून राहूं नये, दुसर्‍याला दु:ख देऊं नयें, त्याचा विश्वासघात करुं नये. स्वच्छतेशिवाय राहूं नये, घाणेरडें वस्त्र नेसुम नये, बाहेर जायला निघणार्या ला कुठें जातोस म्हणून विचारुं नये. उदार दृष्टीकोन सोडूं नये, दुसर्यांवर ओंझें घालूं नये, कोणाच्या आधीन होऊं नये. दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशी देणें-घेणें करुं नये, हलक्या माणसाकडून कर्ज घेऊं नये, साक्षीपुराव्याशिवाय कोर्टकचेरी करुं नये. खोटी हुज्जत घालूं नये, सगळी सभा खोटी ठरवूं नये, जेथे आपल्याबद्दल आदर नाहीं तेथें साहजिकच आपण बोलूं नये. महत्वाच्या गोष्टीची हेळसांड करुं नये, अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊं नये, आपल्या अंगीं शक्ति आहे म्हणून पाजीपणानें वागूं नये. अति आहार करुं नये, फार झोंप घेऊं नये, दुष्ट माणसाच्या घरीं फार दिवस राहूं नये. केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठीं साक्ष देऊं नये, आपला मोठेपणा आपण सांगूं नये, गोष्टी सांगत असतांना आपणच हंसूं नये.

धूम्रपान करुं नये, मादक पदार्थ सेवूं नयेत, बोहोचक किंवा चोंबड्या माणसाशीं मैत्री करुं नये. उद्योगावांचून राहूं नये, कोणी टाकून बोलला तर सहन करुं नये, वडिलांचेंही अन्न मिंधेपणानें खाऊं नये. तोंडात शिवी असूं नये, दुसर्‍याला पाहून कुत्सितपणें हंसूं नये, चांगल्या कुळांतील माणसाच्या अंगीं हीनपणा चिकटवूं नये. पाहिलेली वस्तु चोरुं नये, फार कंजुषपणा करुं नये, प्रेमाच्या माणसांशीं कलह करुं नये.

कोणाचा नाश होईल असें त्याचें नुकसान करुं नये, खोटी साक्ष देऊं नये, वेद, शास्त्र, संत आणि व्यवहार यांना यांना अमान्य असें वर्तन कधींही करुं नये. चहाडीची किंवा चोरीची इच्छा कधीही धरुं नये, परस्त्रीशीं अनीतीचा संबंध ठेवूं नये, कोणाचेंही कमीपण त्याच्या मागें बोलूं नये.  

नुसत्या नीतीमान व्यवहारानें परमार्थ साधत नाही. त्यामध्यें भगवंताला स्थान हवें. त्याचें वरणार आतां श्री समर्थ करतात :
प्रसंग पडेल तेव्हां दुसर्‍यास मदत देण्यास चुकूं नये, सात्विक वृत्ति टाकूं नये, शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करुं नये. थोडा अधिक पैसा मिळाला तर उन्मत्त होऊं नये, भगवंताच्या भक्तीला कधीं लाजूं नये, पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेनें कधीं वागूं नये. मुर्खाशीं संबंध ठेवूं नये, अंधारांत हात घालू नये, निष्काळजीपणानें आपली वस्तू विसरुं नये. स्नानसंध्या सोडूं नये म्हणजे नित्योपासना सोडूं नये, कुलाचार मोडूं नयेत, आळसानें व चुकारपणानें अनाचारानें वागूं नये. हरिकथा सोडूं नये, प्रवचन टाळूं नये, प्रपंचाच्या पायीं परमार्थाकडे दुर्लक्ष करुं नये. 

देवाचा नवस फेडल्यावांचून राहुं नये, आपल्या धर्माला विरोध करुं नये, त्याला वाईट म्हणूं नये, नीट विचार केल्यावांचून भलतें काम करण्याच्या भरीला पडूं नये. कठोरपणा करुं नये, जीवाची प्राणहानि करुं नये, फार पाऊस असतां किंवा वेळ योग्य नसतां प्रवासाला जाऊं नये. सभा पाहून घाबरूं नये, योग्य वेळीं उत्तर देण्यास टाळूं नये. कोणी तोंडावर अपमान, निंदा किंवा तुच्छपणा केला तरी आपला धीरपणा, गंभीरपणा गमावूं नये. गुरुवांचून असूं नये पण हलक्या जातीचा गुरु करुं नये, ऐश्वर्य आणि आयुष्य कायम राहणारी समजूं नयेत. खरा मार्ग सोडूं नये, खोट्या मार्गानें जाऊं नये, खोट्याचा अभिमान कधीं धरूं नये. अपकीर्ति बाजूला सरावी, सत्कीर्ती वाढेल तें करावें, सत्याचा मार्ग विवेकानें घट्ट धरावा. जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाहीं तो अवलक्षणी बनतो. तीं अवलक्षणें पुढील समासात ऐका.