||दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास पांचवा : संतस्तवन
||श्रीराम ||
आतां वंदीन सज्जन| जे परमार्थाचें अधिष्ठान |
जयांचेनि गुह्यज्ञान| प्रगटे जनीं ||१||
जे वस्तु परम दुल्लभ| जयेचा अलभ्य लाभ |
तेंचि होये सुल्लभ| संतसंगेकरूनी ||२||
वस्तु प्रगटचि असे| पाहातां कोणासीच न दिसे |
नाना साधनीं सायासें| न पडे ठाईं ||३||
जेथें परिक्षवंत ठकले| नांतरी डोळसचि अंध जाले |
पाहात असताअंचि चुकले| निजवस्तूसी ||४||
हें दीपाचेनि दिसेना| नाना प्रकाशें गवसेना |
नेत्रांजनेंहि वसेना| दृष्टीपुढें ||५||
सोळां कळी पूर्ण शशी| दाखवू शकेना वस्तूसी |
तीव्र आदित्य कळारासी| तोहि दाखवीना ||६||
जया सुर्याचेनि प्रकाशें| ऊर्णतंतु तोहि दिसे |
नाना सूक्ष्म पदार्थ भासे| अणुरेणादिक ||७||
चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी| परी तो दाखवीना वस्तूसी |
तें जयाचेनि साधकांसी| प्राप्त होये ||८||
जेथें आक्षेप आटले| जेथें प्रेत्न प्रस्तावले |
जेथें तर्क मंदावले| तर्कितां निजवस्तूसी |
वळे विवेकाची वेगडी| पडे शब्दाची बोबडी |
जेथें मनाची तांतडी| कामा नये ||१०||
जो बोलकेपणें विशेष| सहस्र मुखांचा जो शेष |
तोहि सिणला निःशेष| वस्तु न संगवे ||११||
वेदे प्रकाशिलें सर्वही| वेदविरहित कांहीं नाहीं |
तो वेद कोणासही| दाखवूं सकेना ||१२||
तेचि वस्तु संतसंगें| स्वानुभवें कळों लागे |
त्याचा महिमा वचनीं सांगे| ऐसा कवणु ||१३||
विचित्र कळा ये मायेची| परी वोळखी न संगवे वस्तूची |
मायातीता अनंताची| संत सोये सांगती ||१४||
वस्तूसी वर्णिलें नवचे| तेंचि स्वरूप संतांचें |
या कारणे वचनाचें| कार्य नाही ||१५||
संत आनंदाचें स्थळ| संत सुखचि केवळ |
नाना संतोषाचें मूळ| ते हे संत ||१६||
संत विश्रांतीची विश्रांती| संत तृप्तीची निजतृप्ती |
नांतरी भक्तीची फळश्रुती| ते हे संत ||१७||
संत धर्माचें धर्मक्षेत्र| संत स्वरूपाचें सत्पात्र |
नांतरी पुण्याची पवित्र| पुण्यभूमी ||१८||
संत समाधीचें मंदिर| संत विवेकाचें भांडार |
नांतरी बोलिजे माहेर| सायोज्यमुक्तीचें ||१९||
संत सत्याचा निश्चयो| संत सार्थकाचा जयो |
संतप्राप्तीचा समयो| सिद्धरूप ||२०||
मोक्षश्रिया आळंकृत| ऐसे हे संत श्रीमंत |
जीव दरिद्री असंख्यात| नृपती केले ||२१||
जे समर्थपणें उदार| जे कां अत्यंत दानशूर |
तयांचेनि हा ज्ञानविचार| दिधला न वचे ||२२||
माहांराजे चक्रवर्ती| जाले आहेत पुढें होती |
परंतु कोणी सायोज्यमुक्ती| देणार नाहीं ||२३||
जें त्रैलोकीं नाहीं दान| तें करिती संतसज्जन |
तयां संतांचें महिमान| काय म्हणौनी वर्णावें ||२४||
जें त्रैलोक्याहून वेगळें| जें वेदश्रुतीसी नाकळे |
तेंचि जयांचेनि वोळे| परब्रह्म अंतरीं ||२५||
ऐसी संतांची महिमा| बोलिजे तितुकी उणी उपमा |
जयांचेनि मुख्य परमात्मा| प्रगट होये ||२६||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पांचवा ||५||१. ५
संत व संतसंग कात करतात :
परमार्थाचा आधार असणार्या सज्जनांना म्हणजेच संताना मी आतां नमस्कार करतो. सूक्ष्म अशा आत्मस्वरुपाचें ज्ञान गुप्त असतें. संतांच्या अस्तित्वामुळें लोकांमध्ये तें प्रगट होतें. परमात्मवस्तु अतिशय दुर्लभ आहे. ती मिळणें हाच खरा अलभ्य माभ होय. ती दुर्लभ वस्तु संतांच्या संगतीने सुलभरीतीनें लाभते.
परमात्मा किती सूक्ष्म आहे याचें वर्णन :
खरें सांगायचें म्हणजे ती आत्मवस्तु अगदी उघड आहे. पण देहबुद्धीनें पाहूं म्ह्टलें तर ती कोणासच दिसत नाही. ती प्राप्त व्हावी म्हणून नाना प्रकारच्या साधनांचें कष्ट केलें तरी ती अनुभवाला येत नाहीं. अनेक वस्तु ओळखून काढणारे चांगले पारखी आत्मवस्तूच्या बाबतींत फसतात. डोळे असून देखील तेथें म्हणजे आत्मवस्तु पाहण्याच्या बाबतींत आंधळेपणाचा अनुभव येतो. पाहण्याचा प्रयत्न करीत असून सुद्धां स्वत:पाशींच असणारी ती वस्तु माणसे पहायला चुकतात. दिव्याच्या प्रकाशानें ती दिसत नाहीं. अनेक प्रकारच्या इतर प्रकाशांनीं ती सापडत नाहीं. डोळ्यात अंजन घालून पाहूं गेलें तरी ती नजरेसमोर येत नाहीं. सोळा कळांनी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आत्मवस्तु दाखवूं शकत नाहीं. इतकेंच नव्हे तर प्रकाशाच्या सगळ्या कळा ज्याच्यापाशीं आहेत असा तेजोमय सूर्य देखील ती वस्तु दाखवूं शकत नाहीं. कोळ्याच्या अंगातून बाहेर येणार अत्यंत बारीक धागा सूर्याच्या प्रकाशानें दिसतो. अणु व रेणुसारखे अतिशय बारीक पदार्थ सूर्याच्या प्रकाशानें दिसतात. इतकेंच काय पण केसांचे टोक चिरलें तर तें सुद्धां सूर्यप्रकाशानें दिसतें. हें जरी खरें तरी त्या प्रकाशानें आत्मवस्तु दिसूं शकत नाहीं. ती वस्तु संताच्या कृपेनें साधकाला प्राप्त होते.
वाणी, मन व बुद्धि यांच्या शक्तीच्या पलीकडे आत्मवस्तु आहे :
आत्मवस्तूचें स्वरूप असें आहे कीं, तिच्यापुढें सार्या शंका मावळतात, प्रयत्न वाया जातात; तर्काच्या सहाय्यानें ती जाणायला गेल्यास तर्कच क्षीण होऊन जातो.
विवेकानें तिचा शोध घेऊं म्हटलें तर विवेक लुळा पडतो. शब्द स्फुरणें बंद पडते, आणि चंचल मनाची धडपड उपयोगी पडत नाहीं. पुराणांतरीं असें वर्णन आहे कीं, शेषाला हजार तोंडें आहेत आणि प्रत्येक तोंड बोलूं शकतें. अर्थात त्याचा बोलकेपणा सर्वांच्यापेक्षां अधिक आहे. परंतु परमात्मवस्तु एवढी अपार आहे कीं, तिचें स्वरूपवर्णन करतां करतां तोही थकून गप्प बसला. जगांतील सर्व ज्ञान वेदानें प्रकाशांत आणलें असें ज्ञानी माणसे सांगतात. वेदांमध्ये नाहीं असें कांहीं नाहीं. असा सर्वज्ञ वेददेखील आत्मवस्तु कोणास दाखवूं शकत नाहीं.
सत्संगानें स्वानुभव येतो व ती वस्तु कळते :
संताच्या संगतीनें साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि अत्त्मवस्तू कशी आहे हें त्याला कळूं लागतें. त्या सत्त्संगाचा महिमा शब्दांनी सांगणारा माणूस जगांत नाहीं. मायेच्या अंगीं अनेक विचित्र व अनेक प्रकारच्या शक्ति आहेत. परंतु आत्त्मवस्तूची ओळख करून देण्याची कला आणि शक्ती तिच्यापाशीं नाहीं. मायेच्या पलीकडे असणार्या अनंत परमात्त्मवस्तुच्या प्राप्तीचा सोयीचा उपाय फक्त संतच सांगूं शकतात.
संताचें सांकेतिक वर्णन : संत आत्मस्वरूपच असतात. आत्मस्वरूपाचें वर्णन करतां येत नाहीं. म्हणून तेथें शब्द कामास येत नाहींत. हें जरी खरें तरी संत कसे असतात त्याचें खुणेंने वर्णन करतां येईल. संत परमानंदाचें स्थान, संपूर्ण सुखमय आणि संतोषाचें मूळ असतात. संतांपाशी अखंड विश्रांती व कायमची तृप्ती असते. भक्तीचें पर्यवसान झालें कीं संतपण येते.
संत हा तीर्थाप्रमाणें धर्माला जगवतो. संताचे अंत:करण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचें उत्तम भांडेंच होय. संताचा देह म्हणजे पुण्य सांठविण्याची पवित्र जागाच असते. संताच्या देहरूपीं मंदिरांत समाधीरूपीं देवता वास करते. संताच्या अंतरांत उत्तम विचारांचें मोठें भांडार भरलेलें असतें. संतांचे जीवन म्हणजे सायुज्यमुक्तींचें विश्रांतिस्थात असतें.
कांही झालें तरी संत सत्याला कधींही सोडीत नाहीं. संताचें चरित्र म्हणजे सफल जीवनाचें दृश्य रूप होय. संताची भेट होणें म्हणजेच आत्मवस्तु प्राप्त होण्याची वेळ आपणहून चालत येणें असें समजावें
संत काय देतात :
संत मोठें श्रीमंत असतात. मोक्षरुपी संपत्तीनें ते श्रीमंत बनतात. असंख्य दरिद्री जीवांना ही मोक्षलक्ष्मी देऊन संतांनी राजासारखे वैभवशाली केले अर्थात अनेक अज्ञानी माणसांना त्यांनीं आत्मज्ञानसंपन्न केलें. संत मोठे सामर्थ्यवान असतात व अत्यंत उदारपणें आपलें सामर्थ्य दुसर्याला सहाय्य करण्यासाठीं वापरतात. ते विलक्षण दानशूर असतात. अशा संतांकडून आत्मज्ञान मिळणार नाहींम असें केम होईल. अर्थात त्यांच्याकडूनच आत्मज्ञान मिळणें शक्य असतें. आजपर्यंत जगामध्यें पुष्कळ महाराजे व चक्रवर्ती राजे झाले, सध्यां आहेत व पुढें होतील. परंतु यांपैकीं कोणी सायुज्यमुक्ती देऊं शकणार नाहीं.
संतांचें अलौकिक दान :
त्रैलोक्यांत शोधलें तरी सापडणार नाहीं असें अलौकिक दान संत देत असतात. त्या संतांचा थोरपणा कोणच्या शब्दांनीं वर्णन करावा. जें परब्रह्म या दृश्य विश्वाहून निराळें आहे, वेद व श्रुती ज्याला जाणूं शकत नाहींत तें परब्रह्म संतांच्या कृपेनें साधकाच्या अंत:करणात प्रगट होतें. हा संतांचा महिमा आहे. तो वर्णन करण्यास ज्या उपमा द्याव्या त्या सगळ्या अपुर्या पडतात. संतांच्यामुळें मुख्य परमात्मा प्रगट होतो.