श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Friday, December 17, 2010

समर्थ रामदास स्वामी !!!


जीवन

बालपण :
श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (जि. जालना) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. इतरांहून वेगळे होता. अतिशय बुध्दिमान,निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते.

अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने १२ व्या वर्षी याचे लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.

तपश्चर्या आणि साधना :
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. १२ वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्रा केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. 'समान-शिले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. याच वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.

जीवनकार्य 
आत्म-साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.

सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा। यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा 'रामदासीसंप्रदाय' त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले.हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे। या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटुन महाराष्ट्रांत परत आले, तेव्हां त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता.

विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
साताराचाफळसज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: (१) दास मारुती,चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुतीचाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुतीशिंगणवाडीचाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुतीमाजगांवचाफळ (५) [उंब्रज]] मारुती (ता. कराड) (६)शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसुर मारुती (ता. कराड) (८) बहे-बोरगांव (क्रुष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि.कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि. कोल्हापूर).

दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म,श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा नेटका प्रपंचया सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.

व्यक्तिमत्व

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगुळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपायची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, कांखेस झोळी, अशा थाटांत समर्थांची रूबाबदार आणि दुस-यावर छाप पाडणारी मूर्ति संचार करीत असे. समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नान-संध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्तम पारख होती. ते स्वत:उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोक-स्थितीचे उत्तम ज्ञान होत, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती.

बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिला अशी श्रद्धा आहे. ते स्वयं-प्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वत:च ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वत:च शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करूणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्म-संस्थापना हेच त्यांचे कार्य होते.

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। 
कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।
हा त्याच्याबद्द्लचा श्लोक सार्थच आहे.

साहित्य व काव्यनिर्मिती
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङमय निर्मिति केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये होती. दासबोधमनाचे श्लोक,करुणाष्टकेभीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत. `श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोधया पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.

या शिवाय, दासबोध, रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युध्द ही कांडे, कित्येक अभंगआरत्या, भूपाळ्या, पदेस्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षडरिपु-विवेक इत्यादि विपुल लेखन समर्थांनी केले आहे.
समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्म-विश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती, हे त्यांच्या पुढील कांही वचनांवरून दिसून येइल.

समर्थ म्हणतात -
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||
२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||
३. जो दुस-यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||
४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||
५. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||
६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यांवें | राज्य आपुलें ||
७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||
८. आधी केलें | मग सांगितलें ||
९. सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे ||
१०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ दोन शव्दांत सांगतां येते - प्रयत्न व सावधानता.
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावेत्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले - जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की - प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।। समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या कारखानेया प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात, बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी। चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।। मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये। 
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।। 

लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली। 
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी। तैसी भाषा प्राकृत।।

असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

बोधामृत
  • मनाचे श्लोक- एकूण २०५ मनाचे श्लोक आहेत.
  •  सार्थ  दासबोध
  •  छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र
  •  मारुति स्तोत्र
  •  करुणाष्टके

समर्थसंप्रदाय 
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं मुख्यत्वेकरुन धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला. 
शिष्यमंडळ
  •  कल्याण स्वामी.
  •  उध्दव स्वामी
  •  भीम स्वामी
  • दिनकर स्वामी
  •  केशव स्वामी
  • हणमंत स्वामी
  •  रघुनाथ स्वामी
  •  रंगनाथ स्वामी
  •  भोळाराम
  • वेणा बाई
  •  आक्का बाई
  •  दिवाकर स्वामी
  •  गिरिधर स्वामी

जय जय रघुवीर समर्थ !!!