श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, December 9, 2010

‎|| दशक पहिला : स्तवननाम ||१|| समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण ||




|| दशक पहिला : स्तवननाम|||| समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण ||

||श्रीराम ||

धन्य धन्य हा नरदेहो| येथील अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थलाहो| तो तो पावे सिद्धीतें ||||

या नरदेहाचेनि लागवेगें| येक लागले भक्तिसंगें |
येकीं परम वीतरागें| गिरिकंदरें सेविलीं ||||

येक फिरती तिर्थाटणें| येक करिती पुरश्चरणें |
येक अखंड नामस्मरणें| निष्ठावंत राहिले ||||

येक तपें करूं लागले| येक योगाभ्यासी माहाभले |
येक अभ्यासयोगें जाले| वेदशास्त्री वित्पन्न ||||

येकीं हटनिग्रह केला| देह अत्यंत पीडिला |
येकीं देह ठाईं पाडिला| भावार्थबळें ||||

येक माहानुभाव विख्यात| येक भक्त जाले ख्यात |
येक सिद्ध अकस्मात| गगन वोळगती ||||

येक तेजीं तेजचि जाले| येक जळीं मिळोन गेले |
येक ते दिसतचि अदृश्य जाले| वायोस्वरूपीं ||||

येक येकचि बहुधा होती| येक देखतचि निघोनि जाती |
येक बैसले असतांची भ्रमती| नाना स्थानीं समुद्रीं ||||

येक भयानकावरी बैसती| एक अचेतनें चालविती |
येक प्रेतें उठविती| तपोबळेंकरूनी ||||

येक तेजें मंद करिती| येक जळें आटविती |
येक वायो निरोधिती| विश्वजनाचा ||१०||

ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी| जयांस वोळल्या नाना सिद्धी |
ऐसे सिद्ध लक्षावधी| होऊन गेले ||११||

येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध| येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध |
ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध| विख्यात जाले ||१२||
येक नवविधाभक्तिराजपंथें| गेले, तरले परलोकींच्या निजस्वार्थें |
येक योगी गुप्तपंथें| ब्रह्मभुवना पावले ||१३||

येक वैकुंठास गेले| येक सत्यलोकीं राहिले |
येक कैळासीं बैसले| शिवरूप होऊनी ||१४||

येक इंद्रलोकीं इंद्र जाले| येक पितृलोकीं मिळाले |
येक ते उडगणी बैसले| येक ते क्षीरसागरी ||१५||

सलोकता समीपता| स्वरूपता सायोज्यता |
या चत्वार मुक्ती तत्वतां| इच्छा सेऊनि राहिले ||१६||

ऐसे सिद्ध साधू संत| स्वहिता प्रवर्तले अनंत |
ऐसा हा नरदेह विख्यात| काय म्हणौन वर्णावा ||१७||

या नरदेहाचेनि आधारें| नाना साधनांचेनि द्वारें |
मुख्य सारासारविचारें| बहुत सुटले ||१८||

या नरदेहाचेनि संमंधें| बहुत पावले उत्तम पदें |
अहंता सांडून स्वानंदे| सुखी जाले ||१९||

नरदेहीं येऊन सकळ| उधरागती पावले केवळ |
येथें संशयाचें मूळ| खंडोन गेलें ||२०||

पशुदेहीं नाहीं गती| ऐसे सर्वत्र बोलती |
म्हणौन नरदेहींच प्राप्ती| परलोकाची ||२१||

संत महंत ऋषी मुनी| सिद्ध साधू समाधानी |
भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी| विरक्त योगी तपस्वी ||२२||

तत्त्वज्ञानी योगाभ्यासी| ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी |
शडदर्शनी तापसी| नरदेहींच जाले ||२३||

म्हणौनी नरदेह श्रेष्ठ| नाना देहांमध्यें वरिष्ठ |
जयाचेनि चुके आरिष्ट| येमयातनेचें ||२४||

नरदेह हा स्वाधेन| सहसा नव्हे पराधेन |
परंतु हा परोपकारीं झिजऊन| कीर्तिरूपें उरवावा ||२५||

अश्व वृषभ गाई म्हैसी| नाना पशु स्त्रिया दासी |
कृपाळूपणें सोडितां त्यांसी| कोणी तरी धरील ||२६||

तैसा नव्हे नरदेहो| इछा जाव अथवा रहो |
परी यास कोणी पाहो| बंधन करूं सकेना ||२७||

नरदेह पांगुळ असता| तरी तो कार्यास न येता |
अथवा थोंटा जरी असता| तरी परोपकारास न ये ||२८||

नरदेह अंध असिला| तरी तो निपटचि वायां गेला |
अथवा बधिर जरी असिला| तरी निरूपण नाहीं ||२९||

नरदेह असिला मुका| तरी घेतां न ये आशंका |
अशक्त रोगी नासका| तरी तो निःकारण ||३०||

नरदेह असिला मूर्ख| अथवा फेंपऱ्या समंधाचें दुःख |
तरी तो जाणावा निरार्थक| निश्चयेंसीं ||३१||

इतकें हें नस्तां वेंग| नरदेह आणी सकळ सांग |
तेणें धरावा परमार्थमार्ग| लागवेगें ||३२||

सांग नरदेह जोडलें| आणी परमार्थबुद्धि विसर्ले |
तें मूर्ख कैसें भ्रमलें| मायाजाळीं ||३३||

मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |
परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४||

मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |
मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५||

कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |
मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६||

विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |
झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७||

भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |
आळीका  म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८||

मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |
मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९||

पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |
पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०||

ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |
घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१||

पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |
सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२||

बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |
समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३||

पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |
घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४||

पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |
ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५||

तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |
आग्न म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६||

समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |
सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७||

अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |
मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८||

किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हें निश्चयात्मक |
हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९||

ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |
जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||

देह म्हणावें आपुलें| तरी हें बहुतांकारणें निर्मिलें |
प्राणीयांच्या माथां घर केलें| वा मस्तकीं भक्षिती ||५१||

रोमेमुळी किडे भक्षिती| खांडुक जाल्यां किडे पडती |
पोटामध्ये जंत होती| प्रत्यक्ष प्राणियांच्या ||५२||

कीड लागे दांतासी| कीड लागे डोळ्यांसी |
कीड लागे कर्णासी| आणी गोमाशा भरती ||५३||

गोचिड अशुद्ध सेविती| चामवा मांसांत घुसती |
पिसोळे चाऊन पळती| अकस्मात ||५४||

भोंगें गांधेंलें चाविती| गोंबी जळवा अशुद्ध घेती |
विंचू सर्प दंश करिती| कानटें फुर्सीं ||५५||

जन्मून देह पाळिलें| तें अकस्मात व्याघ्रें नेलें |
कां तें लांडगींच भक्षिलें| बळात्कारें ||५६||

मूषकें मार्जरें दंश करिती| स्वानें अश्वें लोले तोडिती |
रीसें मर्कटें मारिती| कासावीस करूनी ||५७||

उष्टरें डसोन इचलिती| हस्थी चिर्डून टाकिती |
वृषभ टोचून मारिती| अकस्मात ||५८||

तश्कर तडतडां तोडिती| भूतें झडपोन मारिती |
असो या देहाची स्थिती| ऐसी असे ||५९||

ऐसें शरीर बहुतांचें| मूर्ख म्हणे आमुचें |
परंतु खाजें जिवांचें| तापत्रैं बोलिलें ||६०||

देह परमार्थीं लाविलें| तरीच याचें सार्थक जालें |
नाहीं तरी हें वेर्थची गेलें| नाना आघातें मृत्यपंथें ||६१||

असो जे प्रपंचिक मूर्ख| ते काये जाणती परमार्थसुख |
त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक| पुढे बोलिलें असे ||६२||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ||१०||१. १०

|| दशक पहिला समाप्त ||


या नरदेहाच्या सहाय्यानें अनेक लोकांनी परमार्थाच्या साधनाचे अनेक प्रकारचे प्रयत्न केले आणि ते सिद्धीस नेले :
हा नरदेह अत्यंत धन्य आहे. याची अपूर्वता अशी कीं,परमार्थ लाभाव यासाठीं जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो.

हा नरदेह मिळाल्यावर  त्याचा उपयोग करुन कोणी भक्तीच्या नादीं लागेल, कोणी अत्यंत विरक्त होउन डोंगरकपारींचा आश्रय घेऊन राहिले. कोणी भक्तीच्या नादीं लागेल, कोणी अत्यंत विरक्त होऊन डोंगरकपारींचा आश्रय घेऊन राहिले. कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात, तर पुरशचरणें करतात, तर कोणी अत्यंत निष्ठेनें अखंड नामस्मरण करीत राहतात. कोणी तपाच्या साधनांत राहतात, कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात, तर कोणी अभ्यास करून वेदशास्त्रांमध्ये मोठे विद्वान होतात.

कोणी हटयोगाचा अभ्यास करून स्वदेहाला अत्यंत धारेवर धरतात,  तर कोणी "देव आहेच" ही भावना वाढवून तिच्या जोरावर देव आपलासा करून घेतात. कोणी महात्मा म्हणून प्रसिद्धी पावतात, कोणी भक्त म्हणून कीर्तिमान होतात, तर कोणी केव्हांही आकाशांत संचार करण्याची सिद्धी मिळवतात. कोणी तेजोरूप बनून तेजांत विलीन होतात, कोणी पाण्यात विरघळून जातात, तर कोणी वायुरूप होऊन पाहतां पाहतां दिसेनासे होतात.

कोणी एक असून अनेक रूपें घेतात, कोणी पाहतां पाहतां गुप्त होतात, तर कोणी एका ठिकाणी बसलेले असूनही अनेक ठिकाणीं फिरतात, समुद्रांतही जाऊन येतात. कोणी हिस्त्रापाशुंवर बसतात, कोणी जड वस्तू चालवतात, तर कोणी आपल्या तपाच्या बळाने प्रेतांना जिवंत करतात. कोणी तेजाला मंद करतात, कोणी जलाशय आटवून टाकतात, तर कोणी सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. कोणी मोठ्या तृध  निश्चयाने योगाचा अभ्यास करतात. त्यांना अनेक सिद्धी वश होतात. असे लक्षावधी सिद्ध होवून गेले आहेत.

कोणी मनोसिद्ध असतात. त्यांच्या मनांत येईल तें घडते. कोणी वाचासिद्ध असतात. ते बोलतील तें खरें होतें. कोणाला लहानसहान सिद्धी वश असतात, तर कोणाला सर्व सिद्धी वश असतात. असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत. कोणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने गेलें. स्वरूपाचा अनुभव येऊन ते कृतार्थ झाले. कोणी योगी आकाशाच्या गुप्त मार्गानें ब्रह्मलोकाला गेले. कोणी वैकुंठाला गेले, कोणी सत्यलोकात राहिले. तर कोणी शिवरूप होऊन कैलासांत राहिले. कोणी इंद्रलोकीं इंद्र झाले, कोणी पितृलोकांत मिसळले, कोणी नक्षत्रात जाऊन बसले, तर कोणी क्षीरसागरांत राहण्यास गेले.
साकोलता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तीपैकी ज्याला जी आवडली तिचा उपभोग धेत  कोणी  राहिले. याप्रमाणे असंख्य सिद्ध, साधू व संत आत्मसहित करण्याच्या मागे लागले.असा हा नरदेह मोठा प्रसिद्ध आहे. त्याचे वर्णन करावें तेवढें थोडेच होईल.

हा नरदेह श्रेष्ठ का आहे ?:
या नारदेहाच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते. अनेक साधनें करणें शक्य होतें. पण विशेषेकरून सारासार विचाराच्या सहायाने पुष्कळजन  मुक्त झाले.

या नरदेहाची प्राप्ती झाल्यामुळे पुष्कळजन अहंकार सोडून आत्मानंदाने समाधान पावले व उत्तम पाडस पोहोंचले. नरदेहांत येऊन पुष्कळजन श्रेष्ठ व उत्तम लोकांस जाऊन पोहोंचले. तेव्हां या नारदेहाच्या श्रेष्ठतेबद्ल आतां कोणास शंका राहणार  नाहीं.

पशुदेहापेक्षा नरदेह श्रेष्ठ का ? :
पशुदेहांमध्ये उत्तम गती मिळत नाहीं असें सगळे सांगतात. म्हणून भगवंताच्या प्राप्तीला नरदेहच उपयोगी पडतो यांत शंका नाहीं संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध,साधू,समाधानी,भक्त,मुक्त,ब्रम्हज्ञानी, विरक्त, योगी,तपस्वी, तत्वज्ञानी, योगाभ्यासी,ब्रम्हचारी, दिगंबर,संन्यासी,षड्द्र्शनी , आणि तापसी हे सगळे नरदेहांतच  झाले.
म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारच्या प्राणी देहांमध्ये तो वरिष्ठ आहे. त्याच्या सहायाने यमयातनेचे संकट टळते. 

नरदेह स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, पराधीन किंवा परतंत्र नाहीं : 
नरदेहाचा आणखी एक मोठा गुण असा कीं तो स्वतंत्र असतो.सहसा तो परतंत्र होत नाहीं. परंतु त्याला परोपकार करण्यापायी झिजवावा आणि किर्तीरुपाने मागें  ठेवावा. घोडा, गाय, बैल, म्हैस, हीं जनावरे आणि असें इतर पशु जर दयाळूपणाने मोकळे सोडले तर त्यांना कोणीतरी धरून नेतो.स्रियांना विशेषत: दासींना हाच नियम लागूं आहे. पण पुरुषदेहाची स्थिती अशी नाहीं.

व्यंग असलेला देह कामाला येत नाहीं :
नरदेह पांगळा असेल तर त्यानें काम करता येत नाहीं, थोटा असेल तर परोपकार करतां येत नाहीं. तो अंधळा असेल तर संपूर्ण वाया जातो, बहिरा असेल तर त्याला प्रवचन किंवा निरुपण श्रवण करतां येत नाही. तो मुका असेल तर मनांतील शंका बोलून सांगता येत नाही,अशक्त, रोगी किंवा सडलेला असेल तर तो कुचकामाच होतो.तो बेअक्कल असेल, त्याला फेफरें येत असेल किंवा पिशाच्चबाधा असेल तर तो खात्रीने निरुपयोगी समजावा.

निर्व्यंग नरदेह परमार्थाला लावावा :
वर सांगितलेल्या व्यंगापैकी कोणताही व्यंग नसेल आणि नरदेह सर्व अवयवांनी चांगला धडधाकट असेल तर त्या माणसानें तत्काळ परमार्थाचा मार्ग चालण्यास आरंभ करावा.

निर्व्यंग उत्तम नरदेह मिळून सुद्धा मूर्ख माणूस परमार्थ न करतां मायेच्या जाळ्यात अडकतो :
मूर्ख माणसाला उत्तम निर्व्यंग देह मिळालेला असतो खरा. पण परमार्थाचा विचार करण्याचें तो विसरूनच जातो. मग मायेच्या जाळ्यात अडकून तो भ्रमाने वावरतो. उदाहरणार्थ, असा माणूस जमीन खणून स्वतःसाठी घर बांधतो. "घर माझे आहे" ही कल्पना तो घट्टपणें उराशी बाळगतो.पण ते बहुतांचे आहे, आपलें एकट्याचे नाहीं, ही गोष्ट त्याला कळतच नाहीं.

ज्या घराला मूर्ख माझे म्हणतो व त्यामध्यें माझेपणाने गुंतून राहतो त्या घरावर किती जीवजंतू व माणसें माझेपणा सांगतात त्याचें वर्णन :
उंदीर म्हणतात हें घर आमचें, पाली म्हणतात हें घर आमचें, माशा म्हणतात हें घर आमचें, याच रीतीनें कांतण्या, मुंगळे, मुंग्या, विंचू, साप, झुरळें, भुंगे, भिंगोर्‍या, घराच्या लाकडांतील आळ्या,  

मांजरें, कुत्रीं, मुंगुसे, पाद्रे किडे, वाळव्या, पिसवा, ढेकूण, तांबड्या मुंग्या, घुंगर्डी, पिसोळे, गांधील माशा, सोट आणि गोमा हे सर्व किडे तें घर आपलें म्हणतात. या किड्यांची नांवें आणि पीडा आणखी विस्तारानें सांगणें नलगे. पशु, दासी  घरची माणसे घर आपलें म्हणतातच. शिवाय पाहुणे, मित्र, गांवकरी, चोर व राजाचे अधिकारी तें घर आपलें म्हणतात. फार काय सगळेजण म्हणतात. हा मूर्खही घर माझ म्हणतो. अखेर तें घर जड होतें. त्याचें ओझें वाटूं लागतें. मग तो गांव सोडून दुसरीकडे जातो.

त्या  काळच्या जनरीतीप्रमाणें गांव ओसाड पडला कीं सगळ्यांना घरदार टाकून जावें लागे. :
कालांतराने सगळीं घरें पडतात. सबंध गांव ओस पडतो. मग त्या उजाड घरांमध्यें जंगलीं जनावरें राहूं. लागतात. खरें म्हणजे किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच तें घर असतें. ते प्राणी तेथें वस्ती करतात. माझें माझें म्हणून गुंतणार्‍या बिचार्‍या या मूर्खाला मात्र घर सोडून जावें लागतें. घराची अवस्था, अशी होते. मातीचें घर माझें माझें म्हणणें किती खोटें आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. सारांश, जन्म म्हणजे जगांतील दोन दिवसांची वस्ती असते. ती कुठें तरी  करावी.

जसें घर खरें आपलें नाहीं तसा देहसुद्धां खरा आपला नाहीं :
देह आपला म्हणावा तर तेंही खरें नाहीं. घराप्रमाणेंच तो देखील अनेकांसाठीं जन्मास आला आहे. उदाहरणार्थ, माणसाच्या डोक्यांत उवा घर करतात आणि त्याचें डोकें खातात. केसांच्या मुळाशीं राहून किडे मांस खातात, एखादें गळू झालें तर त्यात किडे पडतात. माणसाच्या पोटांत जंत होतात हें तर आपण प्रत्यक्ष पाहतोंच. दंत, डोळे व कान यांना कीड लागते. कानाला कीड लागली तर तेथें गोमाशा गर्दी करतात.
गोचीड रक्त पितात, चामवा मांसांत घुसतात, पिसोळें चावून पळून जातात. भुंगे व गांधीलमाशा चावतात. गोमा व जलवा रक्त पितात, विंचू, साप, फुरशीं व घोणस दंश करतात, जन्मल्यापासून पाळलेला हा देह एकाएकी वाघ घेऊन जातो. उंदीर व मांजरें चावतात. कुत्रे व घोडे लचके तोडतात. अस्वलें व वान्रेम जीव कासावीस करून मारतात. उंट चावतात व उचलून फेंकतात. हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंग खुपसून ठार मारतात. चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात. पिशाच्चें अंगांत संचरून मारतात. असो. या देहाची अस्वस्था ही अशी आहे.

देह बहुतांचें आहे, परमार्थी लावण्यांत त्याचें सार्थक आहे. परमार्थ न जाणणारे ते मूर्ख : या दृष्टीने विचार केला तर हें शरीर पुष्कळांचें आहे. केवळ आपलें नाहीं हें स्पष्ट होतें. मूर्ख माणूस त्यास उगीच आपलें म्हणतो, तें जीवांचें खाद्य आहे. तापत्रय वर्णनांत ही पुढें सांगितली आहे.

देह परमार्थासाठीं झिजविला तरच त्यांचे सार्थक झालें असें समजावें. नाही तर नाना प्रकारच्या आघातांनीं तो वाया जातो आणि मृत्यू पावतो. असो. प्रपंच्यामध्यें गुंतलेल्या मुर्खांना परमार्थातील सुखाची कल्पना येऊं शकत नाही. अशा मूर्खाचीं लक्षणें पुढें सांगितलीं आहेत.

|| दशक पहिला समाप्त ||