श्रीराम समर्थ !!!

मला वाटतें अंतरिं त्वां वसावें | तुझ्या दासबोधासि त्वां बोधवावें |

अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा | महाराजया सदगुरू रामदासा ||

Thursday, December 16, 2010

||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम ||२|| समास तिसरा : कुविद्या लक्षण ||



||दशक दुसरा : मूर्खलक्षणनाम |||| समास तिसरा : कुविद्या लक्षण ||

||श्रीराम ||

ऐका कुविद्येचीं लक्षणें| अति हीनें कुलक्षणें |
त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें| त्याग घडे ||||

ऐका कुविद्येचा प्राणी| जन्मा येऊन केली हानी |
सांगिजेल येहीं लक्षणीं| वोळखावा ||||

कुविद्येचा प्राणी असे| तो कठिण निरूपणें त्रासे |
अवगुणाची समृद्धि असे| म्हणौनियां ||||

श्लोक  ||दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च |
            अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ||

काम क्रोध मद मत्सर| लोभ दंभ तिरस्कार |
गर्व ताठा अहंकार| द्वेष विषाद विकल्पी ||||

आशा ममता तृष्णा कल्पना| चिंता अहंता कामना भावना |
असूय अविज्ञा ईषणा वासना| अतृप्ती लोलंगता ||||

इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा| आनित्य ग्रामणी मस्ती सदा |
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा| दुर्वृत्ती दुर्वासना ||||

स्पर्धा खटपट आणि चटचट| तर्हे झटपट आणी वटवट |
सदा खटपट आणी लटपट| परम वेथा कुविद्या ||||

कुरूप आणी कुलक्षण| अशक्त आणी दुर्जन |
दरिद्री आणी कृपण| आतिशयेंसीं ||||

आळसी आणी खादाड| दुर्बळ आणी लाताड |
तुटक आणी लाबाड| आतिशयेंसीं ||||

मूर्ख आणी तपीळ| वेडें आणी वाचाळ |
लटिकें आणी तोंडाळ| आतिशयेंसीं ||१०||

नेणे आणी नायके| न ये आणी न सीके |
न करी आणी न देखे| अभ्यास दृष्टी ||११||
अज्ञान आणी अविस्वासी| छळवादी आणी दोषी |
अभक्त आणी भक्तांसी| देखों सकेना ||१२||

पापी आणी निंदक| कष्टी आणी घातक |
दुःखी आणी हिंसक| आतिशयेंसीं ||१३||

हीन आणी कृत्रिमी| रोगी आणी कुकर्मी |
आचंगुल आणी अधर्मी| वासना रमे ||१४||

हीन देह आणी ताठा| अप्रमाण आणी फांटा |
बाष्कळ आणी करंटा| विवेक सांगे ||१५||

लंडी आणी उन्मत्त| निकामी आणी डुल्लत |
भ्याड आणी बोलत| पराक्रमु ||१६||

कनिष्ठ आणी गर्विष्ठ| नुपरतें आणी नष्ट |
द्वेषी आणी भ्रष्ट| आतिशयेंसीं ||१७||

अभिमानी आणी निसंगळ| वोडगस्त आणी खळ |
दंभिक आणी अनर्गळ| आतिशयेंसीं ||१८||

वोखटे आणी विकारी| खोटे आणी अनोपकारी |
अवलक्षण आणी धिःकारी| प्राणिमात्रांसी ||१९||

अल्पमती आणी वादक| दीनरूप आणि भेदक |
सूक्ष्म आणी त्रासक| कुशब्दें करूनि ||२०||

कठिणवचनी कर्कशवचनी| कापट्यवचनी संदेहवचनी |
दुःखवचनी तीव्रवचनी| क्रूर निष्ठुर दुरात्मा ||२१||

न्यूनवचनी पैशून्यवचनी| अशुभवचनी अनित्यवचनी |
द्वेषवचनी अनृत्यवचनी| बाष्कळवचनी धिःकारु ||२२||

कओअटी कुटीळ गाठ्याळ| कुर्टें कुचर नट्याळ |
कोपी कुधन टवाळ| आतिशयेंसीं ||२३||

तपीळ तामस अविचार| पापी अनर्थी अपस्मार |
भूत समंधी संचार| आंगीं वसे ||२४||
आत्महत्यारा स्त्रीहत्यारा| गोहत्यारा ब्रह्महत्यारा |
मातृहत्यारा पितृहत्यारा| माहापापी पतित ||२५||

उणें कुपात्र कुतर्की| मित्रद्रोही विस्वासघातकी |
कृतघ्न तल्पकी नारकी| अतित्याई जल्पक ||२६||

किंत भांडण झगडा कळहो| अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो |
चाहाड वेसनी विग्रहो| निग्रहकर्ता ||२७||

द्वाड आपेसी वोंगळ| चाळक चुंबक लच्याळ |
स्वार्थी अभिळासी वोढाळ| आद्दत्त झोड आदखणा ||२८||

शठ शुंभ कातरु| लंड तर्मुंड सिंतरु |
बंड पाषांड तश्करु| अपहारकर्ता ||२९||

धीट सैराट मोकाट| चाट चावट वाजट |
थोट उद्धट लंपट| बटवाल कुबुद्धी ||३०||

मारेकरी वरपेकरी| दरवडेकरी खाणोरी |
मैंद भोंदु परद्वारी| भुररेकरी चेटकी ||३१||

निशंक निलाजिरा कळभंट| टौणपा लौंद धट उद्धट |
ठस ठोंबस खट नट| जगभांड विकारी ||३२||

अधीर आळिका अनाचारी| अंध पंगु खोकलेंकरी |
थोंटा बधिर दमेकरी| तऱ्ही ताठा न संडी ||३३||

विद्याहीन वैभवहीन| कुळहीन लक्ष्मीहीन |
शक्तिहीन सामर्थ्यहीन| अदृष्टहीन भिकारी ||३४||

बळहीन कळाहीन| मुद्राहीन दीक्षाहीन |
लक्षणहीन लावण्यहीन| आंगहीन विपारा ||३५||

युक्तिहीन बुद्धिहीन| आचारहीन विचारहीन |
क्रियाहीन सत्वहीन| विवेकहीन संशई ||३६||

भक्तिहीन भावहीन| ज्ञानहीन वैराग्यहीन |
शांतिहीन क्ष्माहीन| सर्वहीन क्षुल्लकु ||३७||
समयो नेणे प्रसंग नेणे| प्रेत्न नेणे अभ्यास नेणे |
आर्जव नेणे मैत्री नेणे| कांहींच नेणे अभागी ||३८||

असो ऐसे नाना विकार| कुलक्षणाचें कोठार |
ऐसा कुविद्येचा नर| श्रोतीं वोळखावा ||३९||

ऐसीं कुविद्येचीं लक्षणें| ऐकोनि त्यागची करणें |
अभिमानीं तऱ्हें भरणें| हें विहित नव्हें ||४०||

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कुविद्यालक्षणनाम समास तिसरा ||||२. ३


सुसंस्कृत माणसास न शोभणारी हीं लक्षणें आहेत एवढे ध्यानांत ठेवावें. म्हणजे त्याचें अधिक वर्णन किंवा वर्गीकरण करायची जरुरी नाही. :
आतां कुविद्येचीं लक्षणें ऐका. ती अतिशय हीन व वाईट लक्षणें आहेत. माणसानें त्यांचा त्याग करावा. तीं ऐकलीं म्हणजे त्यांचा त्याग घडतो. कुविद्येचा माणूस कसा असतो तें सांगतो. जन्मस येऊन तो स्वत:चें नुकसान करून घेतो. येथे सांगितलेल्या लक्षणांवरून तो ओळखता येईल. कुविद्येच्या माणसाच्या अंगीं खूप अवगुण असतात. या कारणासाठीं कोणी स्पष्ट उपदेश करुं लागला तर त्याला तो आवडत नाहीं.

श्लोकाचा अर्थ : दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा, आणि चांगल्या कुटुंबांत जन्म घेऊन अज्ञान असणें, ही आसुरी संपत्ती आहे. (गीता १६-४) :
काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईषणा, वासना, अतृप्ति, लोलंगता, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गुंडगिरी, सदा मस्ती, अभिमान, अवज्ञा, विपत्ति, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, तर्‍हेवाईकपणा, कसें तरी काम उरकायची घाई, वटवट, सदा तक्रार करायची संवय, आणि उलटेंसुलटें करायचा स्वभाव या लक्षणांनी प्रगट होणारी कुविद्या म्हणजे मोठा रोगच आहे. 

कुविद्येचा माणूस कुरूप असून हीन लक्षणीं, अशक्त असून दुर्जन आणि दरिद्री असून, अतिशय कंजुष असतो. तो आळशी असून खादाड, दुर्बळ असून लाथा झाडणारा, आणि फटकून वागणारा असून अतिशय लबाड असतो, तो मूर्ख असून तापत, वेडपट असून वाचाळ आणि खोटा असून अतिशय बोलका असतो. कुविद्येचा माणूस असा असतों कीं स्वत:ला कळत नाहीं पण दुसर्‍याचें ऐकत नाहीं, स्वत:ला येत नाहीं पण दुसर्‍याकडून शिकत नाहीं, आणि स्वत: करीत नाहीं पण अभ्यासदृष्टीनें निरीक्षणही करीत नाहीं.

तो अज्ञानी असून अविश्वासी, भलभलते अर्थ करणारा असून दोषी, आणि स्वत: अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. तो पापी असून निंदक, दु:खी असून दुसर्‍याचा घात करणारा, आणि स्वत: क्लेश भोगीत असून अतिशय निर्दय असतो. तो हीन असून ढोंगी, रोगी असून वाईट कर्मे करणारा, आणि कंजुष असून असून अधर्मांत रमणार्‍या वासनेचा असतो. तो हीन देहाचा असून मोठा अभिमानी, वाह्यात, असून फाटे फोडणारा. अर्थहीन बडबडणारा, आणि स्वत: दुर्दैवी असून लोकांना ज्ञान सांगणारा असतो. तो भित्रा असून उद्धट, बेकार असून डौल मिरविणारा, आणि डरपोक असून पराक्रमाच्या  बाता मारणारा असतो. तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ, विषयासक्त असून व्यसनी, आणि द्वेष करणारा असून अतिशय भ्रष्ट असतो. तो मोठा अभिमानी असून बंधन न पाळणारा, पैशाची ओढाताण असून दुष्ट वृत्तीचा आणि ढोंगी असून अतिशय उच्छृंखल असतो.        

तो वाईट असून विकारधीन, खोटा असून अनुपकारी, आणि स्वत: हीन लक्षणी असून इतरांचा अतिशय तिरस्कार करतो. तो बुद्धी बेताची असून वाद करणारा, भिकार्‍यासारखा असून टोचून बोलणारा, आणि धूर्त किंवा कापती असून वाईट शब्दांनीं दुसर्‍यास दु:ख देणारा असतो. तो मनाला बोचेल असें बोलणारा, अंगावर ओरडून बोलणारा, कपटानें बोलणारा, संशयानें बोलणारा, दु:ख होईल असें बोलणारा, झोंबेल असें बोलणारा क्रूर, निर्दय, दुष्ट माणूस असतो. तो दुसर्‍याचें व्यंग बोलणारा, घातकी बोलणारा, अशुभ बोलणारा, क्षणोक्षणीं बोलणें बदलणारा, द्वेषानें बोलणारा, खोटें बोलणारा आणि धि:कार करून बोलणारा असतो. तो कापती, वांकड्या बुद्धीचा, आंतल्या गाठीचा, क्षुद्र मनाचा, अंगचोर, द्वाड, रागीट, पापद्रव्य असलेला, आणि अतिशय टवाळखोर असतो.

तो तापट, तामसी अविचारी, पापी, अनर्थ करणारा, फेफर्‍या, आणि अंगांत भूत, समंध यांचा संचार होणारा असा असतो. तो आत्मघातकी, स्त्रीघातकी, गाय्घातकी, ब्राह्मणघातकी, मातृघातकी, पितृघातकी, महापापी आणि भ्रष्ट असतो. तो सर्व दृष्टीनें कमी, अयोग्य, वाईट तर्क करणारा, मित्रद्रोही विश्वासघातकी, कृतघ्न, परस्त्रीशीं रमणारा, नरकाला जाण्यास योग्य, आततायी, आणि बडबड्या असतो.     

तो संशयी, भांडण, झगडा करणारा, कलहप्रिय, अधर्मानें वागणारा, जनराहाटी मोडणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, भेद उत्पन्न करणारा आणि मोठा हत्ती असतो. तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, लोकांना चाळवणारा, कवडीचुंबक, लोचट, स्वार्थी, हावरा, स्वैर वर्तनाचा, घट्ट मुठीचा म्हणजे परोपकारासाठीं कांहीं न देणारा, शिरजोर आणि दुसर्‍याचें चांगलें न पाहूं शकणारा असतो. तो लबाड, मठ्ठ, भित्रा, बेपर्वा, लुडबुड्या, लफंगा, उन्मत्त, पाखंडी, चोर, आणि दुसर्‍याची वस्तु लांबविणारा असतो. तो साहसी, स्वैर, उच्छृंखल, चटोर, चावत, गाजावाजा करणारा, थोतांड रचणारा, उद्धट, विषयासक्त, स्वजातींतुन भ्रष्ट झालेला आणि वाईट बुद्धीचा असतो. तो मारेकरी लुटारू, दरवडेखोर, घरांना खणती लावून धन शोधणारा, घातकी, भोंदू, परस्त्रीशीं रमणारा, भूल देऊन भुरळ पाडणारा आणि चेटूक करणारा असतो. तो नि:शंक, बेशरम, कळलाव्या, निरुद्योगी, पुष्ट, धटिंगण, उर्मट, चिवट, अक्षरशत्रु म्हणजे अगदी अशिक्षित, खट्याळ, नाटकी, सर्वांशीं भांडणारा आणि विकारधीन असतो.

तो उतावळा, उगीच आळ घेणारा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकल्यानें बेजार झालेला, थोटा, बहिरा, दमेकरी, असून देखील अभिमान सोडीत नाहीं. तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, भाग्यहीन, भिकारी, बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, विद्रूप, उक्तीहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन व क्षुल्लक असतो. त्याला वेळ कळत नाहीं, प्रसंग कळत नाहीं, अभ्यास कळत नाहीं, लोकांचे आर्जव करणें कळत नाहीं, मैत्री कशी करावी तें कळत नाहीं, सारांश त्याला कांहींच कळत नाहीं, असा तो अभागी असतो.

असें अनेक प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणीं असतात. वाईट लक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येचा माणूस श्रोत्यांनीं याप्रमाणें ओळखावा. आतापर्यंत सांगितलेलीं कुविद्येची लक्षणें ऐकावी व ऐकून तीं टाकावी. उगीच अभिमानानें इरेस पडून वाईट लक्षणें न सोडण्याचा हट्ट धरणें योग्य नाहीं.